...ए स्ट्रेंजर इन टाउन... ‘फ्रैंक मोर्गन’

गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो..

आठवणीतला हॉलीवुड-सात

सुट्‌टया सगळ्यांनाच हव्या, अगदी सुप्रीम कोर्टचा जज देखील याला अपवाद नाही. एक जज सुट्‌टीवर जातो, त्यासोबत ज्या घटना घडतात त्यावर 1943 साली एक चित्रपट आला होता- ‘ए स्ट्रेंजर इन टाउन.’ सत्तर मिनिटे लांबीच्या या चित्रपटाचा दिग्दर्शक होता- राॅय रॉलैंड (Roy Rowland).

चित्रपटाची सुरवात कोर्टरूम मधे नुकत्याच संपलेल्या केस पासून होते. दुसरया दिवसापासून कोर्टची सुट्‌टी आहे...सुप्रीम कोर्टचा ऑनरेबल जस्टिस जॉन जोसेफी ग्राँट (फ्रैंक मोर्गन) वरांड्यात येतो तर सोबतीचे जज त्याला हॉलीडे विश करतात. त्यांचा स्वीकार करीत ते आपल्या रुम कडे निघतात. दार उघडणार इतक्यांत मीडियाची माणसं त्यांना अडवतात...सर जॉन, काही प्रश्न विचारायचे होते...

जज साहेब म्हणतात-तीन मिनिटांपूर्वीच प्रश्न-उत्तरे संपली की...

त्या पैकी एक विचारतो- सर, आपण सुट्‌टीवर कधी जाणार...

जज साहेब उत्तरतात...-लगेच...,तुम्ही मला सोडा, हा मी निघालोच...आणि ते आपल्या रुम मधे शिरतात...मीडियाची मंडळी बाहेर घुटमळत उभी असते, इतक्यांत आतून आवाज येतो- कम इन...मग जज साहेब मीडियावाल्यांशी थोडंसं खेळी-मेळीच्या वातावरणांत बोलतात, मग मीडियाची मंडळी निघून जाते.

आता जज साहेब आपल्या टेबलावरील कागदं बघतांत...शेजारी त्यांची सेक्रेटरी लूसी गिलबर्ट (जीन रॉजर्स) त्यांना पुढच्या केसची माहिती देत असते, तिचं सगळं लक्ष आपल्या बॉस कडे असतं...कागदांमधे सेक्रेटरीच्या नावाचा कागद बघून जज साहेब दचकतात...आणि तिला विचारतात- हे काय...

ती सांगते हे माझं रेजिग्नेशन लैटर आहे...तुम्ही इतकं काम करवून घेता की मला दुसरा काही पर्यायच नाही.

यावर जज साहेब प्रेमळपणे तिला सांगतात- मला माहीत आहे...की मी तुझ्याकडून खूप काम करवून घेतो...पण बेटा (माय चाइल्ड), यात तुझं भलंच होणार आहे...दुसरी कडे जे तू दोन वर्षात शिकशील ते तू इथे वर्षभरात शिकशील. ते काही नाही...मी हा कागद फाडून टाकलाय...आपण सुट्‌टी नंतर भेटू तेव्हां या विषयावर बोलू...काही तोडगा निघेलच की. हे बघ आज पासून मी सुट्‌टीवर आहे...माझा पत्ता कोणाला कळता कामा न ये...

आणि जज साहेब निघतात वाशिंगटन जवळच्या क्राउनपोर्ट गावांत शिकार करण्यासाठी. ती देखील बतखांची शिकार (डक हंटिंग) करायला...

पुढच्याच दृश्यात जॉन बंदूकीने नेम धरुन घोडा ओढणार, तेवढ्यात माशी शिंकते आणि आवाज येतो-

थांबा, तुम्ही इथल्या बतखांची शिकार करु शकत नाही, मी या गावाचा पोलिस ऑफिसर (गेम वार्डन) आहे...तुमचा शिकारीचा परवाना दाखवा...

जॉन बंदूक मागे घेत खिशातून शिकारीचा परवाना दाखवतो...तो बघून परत देतांना पाेलिस ऑफिसर म्हणताे-हे कामाचं नाही...यावर लोकल बाॅडीचा शिक्का नाही...तुम्हाला पाच डाॅलर दंड भरावा लागेल...

जॉन मुकाट्यानं पर्समधून पैसे काढून देतो...तर पोलिस ऑफिसर सूट वाढवून देण्यासाठी आणखीन पैसे मागतो...

आता याची सटकते...तो दिलेले पैसे परत घेऊन पर्स खिशांत टाकतो आणि पोलिस ऑफिसरला म्हणतो-चल, कुठे नेशील मला...

कोर्टमधे जॉन सांगतो की माझ्या जवळ हंटिंग करण्यासाठी स्टेटचा परवाना आहे...

पण जज (ऑस्टिन हार्कले) त्याचं काहीच ऐकून घेत नाही आणि शंभर डालर्सचा दंड ठोठावतो...जॉन मुकाट्याने रक्कम भरतो...म्हणजे बतखांची शिकार तर दूर, फक्त बंदूकीने नेम धरण्याचा दंड शंभर डॉलर्स...!

त्याच वेळेस कोर्टात दुसरी केस आली आहे...ती केस नायक लढवीत असतो, पण जज त्याचं काहीच ऐकून न घेता एकपक्षी निर्णय देतो...

हे बघतांना जॉनला जाणवतं की या क्राउनपोर्ट शहरांत काही तरी गडबड आहे...इथल्या मेयरनी कायदा-कानून आपल्या मुठीत ठेवून भ्रष्टाचार माजवला आहे...सगळीकडे त्याचीच माणसे दिसताहेत...

कोर्टच्या बाहेर पार्लरमधे (सेलून) त्याला नायक बिल एडम्स (रिचर्ड कार्लसन) भेटतो...पार्लर मधे बिलचा क्लाइंट टॉम कूनी येतो...तो बिल जवळ आपल्या केस बद्दल बोलतो...त्याची चूक इतकीच असते की त्याने लोन वर घेतलेल्या ट्रैक्टरची एक किश्त डीलरजवळ जमा केली नाही...यावर जजनी ते ट्रैक्टर डीलरला परत द्यायला सांगितलंय...त्याच दुकानात मेयरची माणसं असतात. ती बिलला डिवचतात. तर बिल आणि त्या लोकांमधे मारामारी होते...या घटनेमुळे मेयर आणि होटल मालक बिलला धडा शिकवण्याची शक्कल लढवतात...

पार्लर शेजारीच बिलचं ऑफिस आहे, तिथे जॉन बिलची प्रशंसा करतांनाच त्याच्या दुर्गुणांवर देखील बोट ठेवतो...तो सांगतो की मी देखील रिटायर्ड वकील आहे...आणि तू टाॅमच्या केसची चिंता नको करु. तिथे जॉन त्याला सांगतो तुझ्या मागच्या कपाटातील कायद्याच्या पुस्तकांकडे जरा लक्ष दे, तुला तुझ्या सगळया प्रश्नांची उत्तरे या पुस्तकांमधे सापडतील...बिल पुस्तक उघडून बघतो आणि चकित होतो...त्या पुस्तका प्रमाणे त्या डीलरला ट्रैक्टरचे सुटे भाग बारा महीने ठेवणं जरूरी असतं...आणि त्याच्याजवळ सुटे भाग नसतात...या मुद्यावर बिलचा क्लाइंट निर्दोष सुटतो...या घटनेमुळे बिलचा जॉनवर विश्वास बसतो...

जॉन ज्या हॉटेलात थांबलाय, तिथून दिसणारया होर्डिंगवर मेयरचा मोठ्ठा फोटो...खाली जाहिरात असते की येणारया निवडणुकीत मलाच मत द्या....तो ओळखतो इथे लवकरच निवडणूक होणार आहे...आता जाॅन ठरवतो की आपली ओळख न दाखवता बिलची मदत करायची...ताे टेलीग्राम करुन आपल्या सेक्रेटरी लूसीला बोलावून घेतो...त्यांत तिला बजावतो देखील की मी इथे डक हंटिंग साठी आलोय...इतकंच सांगायचं की पूर्वी मी वकील होतो...

लूसी येते... तिला रिसीव करायला बिल जातो...तो तिला हॉटेलात नेतो. पण तिच्या सोबत बिलला बघून हॉटल मैनेजर तिला खोली द्यायला तयार होत नाही...कारण काय तर लूसी सोबत काहीच सामान नाहीये...तिथे झालेल्या घटनांमुळे बिल आणि लूसी दोघांना कोठडीत डांबून ठेवतात. जॉन शिकार करायला गेलाय...तो परत येताे तेव्हां त्याला सगळा घोटाळा कळतो...तो दोघांना सोडवताे...सगळे जॉनच्या हॉटेलवर येतात...लूसीला खोली मिळते...आता हॉटेल मालक या लोकांवर आपल्या माणसांकरवी नजर ठेवतो...

हॉटेल मधील जॉनच्या खोलीत रात्री परिचारिका त्यांचं अंथरुण नीट करीत असते...चादर थोडी लहान असल्यामुळे ती पलंगावर नीट अंथरता येत नाही...जॉन विचारताे चादर लहान आहे कां...तर ती सांगते दोन वर्ष झालीत मैनेजरला सांगतेय की या चादरी लहान आहेत मोठया चादरी आण, तो लक्षच देत नाहीये...

ती गेल्यावर काही विचार करुन जॉन लूसीला (ती दुसरया खोलीत आहे) सांगतो की हॉटेलच्या चादरीची लांबी सांग...मग बिलला म्हणतो की कायद्याप्रमाणे हॉटेल मधील चादरीची लांबी किती असायला हवी, हे कायद्याचं पुस्तक बघून सांग...

दुसरया दिवशी न्यायालयांत बिल आणि लूसीवर लावलेले आरोप हॉटेल मालक परत घेतो...आणि समेट करण्याचा प्रस्ताव ठेवतो...बिल तयार होतो...नंतर पद्धतशीरपणे बिल हॉटेल मालकावर केस करताे की यांच्या हॉटेलमधील चादरी लहान आहेत आणि कायद्याशी सुसंगत नाहीयेत...हॉटल मालकाला भुर्दंड भरावा लागतो...

आतां जॉन बिलला टिप्स देतो. तो बिल ला सांगतो-सगळया गोष्टी कायद्याच्या पुस्तकांमधे लिहिलेल्या आहेत...फक्त आलमारी मधील पुस्तकं काढ आणि वाचून तर बघत जा...

आणि बिल कोर्टात केस जिंकत जातो...

शेवटचा कोर्ट सीन...

आपल्या चुकांमुळे मेयर कार्लिसनला आरोपी ठरवतात. तेव्हां तो रागावून विचारतो की मला आरोपी ठरवणारा हा कोण म्हातारा, आपल्या शहरात राहणारा ही नाही...कुठल्या अधिकारांनं हा मला जाब विचारतोय...

तेव्हां जज जाॅन आपली ओळख देतात...

ते म्हणतात...तुम्ही विचारताय की मी कुठल्या अधिकारांनं तुम्हाला जाब विचारतोय...मी जज आहे म्हणून नव्हे तर मी या देशाचा एक नागरिक आहे... त्या नात्यानं मी तुम्हाला जाब विचारतोय...

या इतक्या मोठ्या देशाचा नागरिक होणं काही क्षुल्लक गोष्ट नव्हे...हा माझा सम्मान आहे की मी या देशाचा नागरिक आहे...या नात्याने माझी, आम्हां सर्व नागरिकांची जवाबदारी मोट्ठी आहे...शासन चालवण्यासाठी आपण कुणाला तरी निवडून देतो...निवड केली म्हणून आपली जवाबदारी संपत नाही...निवडलेला माणूस गडबड करत असेल तर त्याचे कान धरणं आपलं कर्तव्य आहे...तो गडबड करतोय म्हणून आपण गप्प बसावं...हे चूक आहे...त्याला वठणीवर आणण्याची जवाबदारी आपली आहे...डोळे बंद करुन जगणं सोडा...

(आजच्या परिस्थितीत देखील लागू होतात हे शब्द...)

मेयर आपल्या चुकांची कबूली देतो. त्याला आणि त्याच्या माणसांना कोठडीत पाठवतात...

----------------

असा होता फ्रैंक मोर्गन

हॉलीवुडच्या अमेरिकन चरित्र नायक फ्रैंक माेर्गनचं नाव फ्रांसिस फिलिप वुपरमॅन होतं. 1 जून 1890 साली न्यूयार्क सिटी येथे जन्मलेल्या फ्रैंकचा मृत्यु 18 सप्टेंबर 1949 साली ब्रेवरली हिल्स कैलिफोर्निया मधे झाला. अकरा भाऊ-बहिणीं (सहा मुलं-पाच मुली) मधला एक फ्रैंक मोठ्या भावामुळे ब्राडवे कडे वळला. त्याने ब्राडवेवरील नाटकांमधे काम केलं. 1916 सालचा ‘दि गर्ल फिलीप्पा’ (The Girl Philippa) हा त्याचा पहिला चित्रपट होता. त्याला प्रामुख्यानं मेट्रो गोल्डविन मेयरच्या कान्ट्रेक्ट प्लेअर आणि दि विजार्ड ऑफ ओज मधील त्याच्या भूमिकेसाठी ओळखलं जातं...या शिवाय 1943 सालच्या ‘दि ह्यूमन कामेडी’ मधील टेलीग्राफ ऑपरेटर, 1940 सालच्या ‘दि शॉप एराउंड द कार्नर’ मधील दुकानमालकाची त्याच्या प्रमुख भूमिका होत्या. 1934 सालच्या ‘दि अफेयर ऑफ सिलेनी' मधील भू्मिकेसाठी फ्रैंकला बेस्ट एक्टरचं नामिनेशन मिळालं होतं.

असा पदरी पडला ‘दि विजार्ड ऑफ ओज’

फ्रैंकची खरी ओळख पटते ती 1939 सालच्या ‘दि विजार्ड ऑफ ओज’ मधील प्रोफेसर मार्वल/ दि विजार्ड मुळे. त्याची ही भूमिका गाजली. (या चित्रपटाची नायिका होती जूडी गारलेंड). आधी या भूमिकेसाठी डब्ल्यू.सी. फील्डस चं नाव ठरलं होतं. पण वेतनच्या मुद्यावर गाडी कुठे तरी अडली आणि ती भूमिका फ्रैंकला मिळाली. याच चित्रपटांत चेटकिणीची भूमिका मारग्रेट हेमिल्टन या नटीने केली होती. तिने फ्रैंकची आठवण सांगताना म्हटलं होतं-चित्रपटातील एक दृश्यात प्रो मार्वल (फ्रैंक मोर्गन) आपल्या काळया बैग मधून काढून डोरोथी आणि तिच्या मित्रांना बक्षिसं देतो...हे दृश्य बघतांना माझे डोळे पाणावतात. कारण सांगताना ती म्हणाली-

‘Frank Morgan was just like that in real life-very generous.’

लेंब्स क्लब चा आजन्म सदस्य

फ्रैंक मोर्गन लेंब्स क्लबचा (Lambs Club) लाइफटाइम मेंबर होता. हा क्लब थिएटरच्या क्षेत्रातील सर्वात जुना क्लब होता.

ही साइट बघा-

https://youtu.be/dpMtvh0eUFA

-------------------

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)