‘डर’ –एक भयकथा ! (लेख)

असं म्हणतात की झुरळ हा प्राणी फारच प्राचीन आहे. प्रागैतिहासिक का कुठल्याश्या काळापासून तो पृथ्वीवर वास्तव्य करून आहे. मानव तर तसा 'आनी-जानी'च आहे म्हणा. पण झुरळं मात्र माणसांच्या आधीपासून होती आणि माणसांच्या नंतरही राहणार आहेत असं आम्ही कुठेतरी वाचलंय. पण य:कश्चित झुरळाला इतकी सिनिअ‍ॅरिटी देऊन त्याचं 'प्रतिमासंवर्धन' करणं काही आम्हाला पटत नाही. मग या झुरळांपेक्षाही जुनं काय असावं जे आजही आपल्या आजूबाजूला सर्व चराचर व्यापून आहे ? थोडं डोकं खाजवल्यावर लक्षात आलं की- आहे ! अशी एक गोष्ट आहे जी या पृथ्वीवर फडतूस झुरळांपेक्षाही जुनी आहे ती म्हणजे भय, भीती किंवा डर !

वास्तविक 'घाबरणे' या एकाच क्रियेचे हे वर्णन करणारे हे वेगवेगळे शब्द. पण 'डर' या शब्दामध्ये जो डॉल्बी डिजीटल इफेक्ट आहे तो भय वा भीती या शब्दांमध्ये नाही. जसं आरोपीला गुन्हेगार ठरवण्यात येणं किंवा 'मुलजिम को मुजरिम' असा 'करार' देणं ही वास्तविक एकच क्रिया. पण दुसर्‍यात जसं आपण सिनेमातल्या कोर्टरूम मध्ये बसलो आहोत, एका कटघर्‍यात दाढीबिढी वाढलेला मुलजिम उभा आहे, समोर स्व:ची जुल्फे झटकत एक वकील येरझारा घालतो आहे, कधी एकदाचा निकाल सांगून आपण 'मोकळे' होतो अशा बद्धकोष्ठी आविर्भावात एका उच्चासनावर माननीय मिलार्डसाहेब बसलेले आहेत, एका फोटोत सदाहसतमुख बापू शांतचित्ताने सर्व उपस्थितावर आपल्या स्मितहास्याची पखरण करत स्नेहार्द्र दृष्टीने बघत आहेत इत्यादी इत्यादी वातावरणाचा कसा 'फील' येतो तसा पहिल्यात येत नाही. पहिलं म्हणजे अगदीच भुरट्या चोरीचं सामान्य गुन्हेगारी वृत्त वाचल्यासारखं- ....अमुक अमुक (कंसात वय) याला भादंवि च्या अमुक (अ) तमुक (ब) कलमाखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय देशमुख करत आहेत....- असं मिळमिळीत. तर ते एक असो.

ज्ञानी लोक म्हणतात की माणूस हा सामाजिक प्राणी आहे. असेलही, पण आम्ही (म्हणजे अज्ञानी लोक, ज्ञानी लोक नेहमी 'मी मी' करत असतात तर अज्ञानी 'आम्ही आम्ही' उदा: आपल्याले काय मालूम बाप्पा, आपन्तं अडानी मानूस !) म्हणतो की माणूस हा मुळात घाबरट प्राणी आहे. तो कोणकोणत्या गोष्टींना घाबरत नाही याची सर्विस टॅक्ससारखी निगेटीव्ह लिस्ट केली तर ती अभिषेक बच्चनच्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीपेक्षाही छोटी होईल. मानववंशशास्त्र, पुरातत्वशास्त्र, धर्मशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र आदी शास्त्राचा अभ्यास तुम्ही (एकाच वेळी) करू शकत असाल तर करुन पाहा, तुम्हाला हेच आढळेल की माणूस आदिम काळापासून केवळ घाबरतच आला आहे. किंबहुना भय आणि आळस या दोनच गोष्टी माणसाच्या आजच्या प्रगतीच्या 'प्राईम मूव्हर' आहेत असं आमचं अभ्यासपूर्ण व ठाम प्रतिपादन आहे. तर माणूस हा आगीला घाबरतो, पाण्याला घाबरतो, सापांना घाबरतो, भुताखेतांना घाबरतो, अंधाराला घाबरतो, आकाशातल्या वीजेला घाबरतो, उंचीला घाबरतो, पाळीव प्राण्यांना घाबरतो तितकाच जंगली श्वापदांना घाबरतो, किडामुंग्यांना घाबरतो, अपयशाला घाबरतो, बदनामीला घाबरतो, मृत्यूला घाबरतो आदी अनेक गोष्टींना घाबरतो आणि सर्वात जास्त म्हणजे दुसर्‍या माणसाला घाबरतो!

पण या सगळ्या झाल्या जुन्या ऐतिहासिक गोष्टी. आजचं काय? प्राध्यापकी भाषेत एका(च) वाक्यात सांगायचं तर आजच्या समकालीन सामाजिक-आर्थिक-राजकीय परिप्रेक्ष्यात (जमला बाबा शब्द, हुश्श!) 'डर' वा भय या आदिम प्राकृतिक मानवी मनोवस्थेचे एकूण मानवी जीवनप्रक्रियेतील स्थान, तिचे परिशीलन करण्याची आणि परिणाम मोजण्याची परिमाणे आणि साधने इत्यादींचा जागतिक आणि वैयक्तिक अशा एकाच वेळी व्यापक व सूक्ष्म पातळीवर मागोवा घेतला असता असे आढळते की भय या मनोवस्थेचे अस्तित्व आणि नेणीवेच्या पातळीवर जाणवणारी तिची जाणीव यात कालानुपरत्वे काही अपरिहार्य आणि स्थूलगामी बदल झाले असले तरी या चित्तवृत्तीचे मूलगामी स्वरूप खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या (अर्थात खा.उ.जा.- हे आणल्याशिवाय प्राध्यापकी लेखनाला परिपूर्णता येत नाही. होतकरूंनी नोंद घ्यावी. असो) संगणकीय आधुनिक युगातील या एकविसाव्या शतकातही बरेचसे तसेच (म्हणजे कसे हे आम्हाला विचारू नका) राहिले आहे. तर वाचकहो, घाबरून जाऊ नका, म्हणायचे इतकेच की 'डर' या गोष्टीच्या महात्म्यात काहीही फरक पडलेला नाही. फक्त स्वरूप बदलत गेलं ते कसं हे आपण पाहूच.

आजची विविध प्रकारचे डरे (डरचे बहुवचन) कुठली याचा अभ्यास करण्यासाठी काही तुम्हाला प्राध्यापक होण्याची गरज नाही. समजायला सुलभ म्हणून घराच्या दिवाणखान्यापासून सुरुवात करू. तुमच्या दिवाणखान्यातला टीव्ही चालू केलात तरी तुम्हाला हे ब्रह्मज्ञान चुटकीसरशी मिळेल. तरी तेवढेही श्रम आपणास करण्यास लागू नयेत म्हणून आम्ही हा रेडीमेड अभ्यास आपल्यासमोर मांडतोय.

आधुनिक टीव्हीजगात डरांचे अनेक प्रकार आहेत जसे की खुबसुरतीसे डर, किटाणुओंसे डर, बाल सफेद होने का डर, डॅन्ड्रफका डर इत्यादी. त्यातलं आजचं सगळ्यात मोठं 'डर' जर असेल तर ते 'किटाणुओंसे डर'. एका अभ्यासानुसार माणूस आयुष्यात जितक्या जाहिराती टीव्हीवर पाहतो, रेडिओवर ऐकतो त्याच्या दसपट किटाणु आपल्या अंगावर बाळगत असतो. (म्हणजे बघा किती? मोडा बोटं, लावा हिशेब) या किटाणूंचं 'व्यवस्थापन' करण्यासाठी विविध प्रकारचे साबण, उटी, द्रावण, स्प्रे बाजारात उपलब्ध आहेत. काही बंटींचे साबण 'स्लो' आहेत तर काही बबलींचे साबण 'फास्ट' आहेत. काही साबणांच्या इफिशियंसीबाबत ते, 'सौ बीमारी फैलानेवाले जर्म्ससे छुटकारा' की 'बीमारी फैलानेवाले सौ जर्म्ससे छुटकारा' (जाड ठश्याकडे लक्ष असू द्या) देणारे आहेत असा मतभेद 'एक्स्पर्ट'च्या मनात आहे. बरं या किटाणुंमध्येही काही कमी 'जैवविविधता' नाही. काखेतले किटाणू वेगळे, दातातले किटाणू वेगळे, पाठीवरचे किटाणू वेगळे (हे हंगामी असतात. अधिक प्रादुर्भाव उन्हाळ्यात), जांघेतले किटाणू वेगळे (यांच्या स्ट्रॅटेजिक लोकेशनमुळे त्यांचं तपशीलवार विश्लेषण पाहायला मिळणे अंमळ अवघडच), पोटातले किटाणू वेगळे, दाद-खाद-खुजलीवाले वेगळे. शेंबडं नाक मनगटाने पुसल्यावर तिथे उमटणारे किटाणू वेगळे, मातीतले किटाणू वेगळे, कपड्यांवरचे किटाणू वेगळे, शौचकुपाच्या बेसिनच्या कडेखालून तुमच्यावर नजर ठेवून असणारे आणि मध्येच फणा काढून अचकट विचकट हसत अंगावर येणारे किटाणू वेगळे- ही सगळ्यात खतरनाक प्रजाती बरं का! रांगणार्‍‍या बाळांच्या मागे लागणारे- फरशीवरचे किटाणू वेगळे, स्वयंपाकघरातल्या खरकट्या भांड्यांवर रात्रीच्या अंधारात फिरणार्‍या झुरळांच्या अंगावरचे किटाणू हा अधिकच स्पेशल प्रकार. घरातल्या घरात चिमुकले विश्वरूपदर्शनच जणू! परंतु त्यांच्यातही भारतीय जनतेत आहे तशी विविधतेतही आपल्याला त्रास देणं व त्याच्या निवारणापोटी खिसा हलका करणं या बाबतीत दुर्मिळ अशी एकता आहे.

या सगळ्या किटाणूंचं प्रचंड डर जनमानसात बसलेलं आहे. कायम स्टेथॉस्कोप गळ्यात मिरवत हिंडणारे डॉक्टर प्रत्येक लहान मुलाच्या हातावर त्यांच्या विशेष किटाणूशोधक टॉर्चने जांभळा प्रकाश टाकत घरोघरी किटाणू शोधत फिरताना तुम्ही पाहिले असतील. काही टोपीवाले प्रत्येक घराचं दार ठोठावून घरातल्या गृहिणीने शौचालय निर्किटाणू करून घेतले की नाही याची स्वत: 'स्पर्शज्ञानाने' खातरजमा करून घेत आहेत. तमाम आया आपापल्या लेकरांच्या आरोग्याच्या काळजीने चिंताक्रांत आहेत. जोवर ते लेकरू किटाणूनाशक साबणाने टीव्हीच्या पडद्यावर उघड्यावरच आंघोळ करत नाही तोवर त्या माउलीच्या जीवाला ना चैन पडत ना एखादं गाणं सुचत, इतकं या किटाणूंचं डर आहे. पण हे साबणही तसे परिपूर्ण नाहीतच. कितीही रगडलं तरी 'सौ प्रतिशत संपूर्ण स्नान' केल्यावरसुद्धा त्या जांभळ्या प्रकाशातल्या वर्तुळात दोन किटाणू वळवळत राहतातच. या दोन किटाणूंचं 'व्यवस्थापन' करण्याचा इलाज अद्याप तरी सापडलेला नाही.

अखिल विश्वाला भयकंपित करून सोडणारे दुसरे डर म्हणजे डॅण्ड्रफका डर. या डरा मुळे तर जगातल्या तमाम लॅबोराटर्‍यातले एक्स्पर्टस त्राहि माम करत आहेत, या 'ब्रेक' मधून त्या ब्रेकमध्ये त्रस्त चेहर्‍याने फिरत आहेत असं तुम्हाला दिसेल. या डराच्या प्रभावामुळे लोकांनी काळ्या बाह्या असलेले शर्ट घालणे बंद केले आहे. त्यामुळे काळे कपडे तयार करणार्‍यांचा धंदा आता फक्त वकील आणि 'युनिसेक्स सलून'मधल्या कारागिरांच्या भरोशावर चालू आहे. 'ये रेशमी झुलपे' म्हणत प्रेयसीच्या मोकळ्या केशकुंतलातून प्रेमळ हात फिरवणेसुद्धा प्रियकरांसाठी दुरापास्त झाले आहे. कारण हात फिरवला तिथे डॅण्ड्रफ. घाऊक आणि स्वस्तात मिळणार्‍या डॅण्ड्रफमुळे काही बदमाष व्यापार्‍यांनी खसखशीमध्ये डॅण्ड्रफची भेसळ करणे चालू केल्याचाही बातम्या येत आहेत. खरे खोटे देव जाणे! या काही निवडक उदाहरणांवरून डॅण्ड्रफची समस्या किती भीषण आहे याची पुसटशी कल्पना येऊ शकेल. इतर काही फुटकळ डरं पण आहेत. जसं काही आयांना आपली पोरं स्पर्धेत मागे पडण्याचं डर आहे त्यामुळे त्यांनी डायरेक्ट विमानासोबतच रेसिंग लावायचं ट्रेनिंग पोरांना दिलं आहे. काही माउलींना आपलं पोरगं डबा पूर्ण न खाण्याचा डर सतावते आहे, त्यासाठी त्या 'कुछ भी' करायला तयार आहेत.

दिवाणखान्यातल्या इंटेलिजंट बॉक्स मधले असले हे डर कमी झालेत की काय म्हणून बाहेरच्या जगातही या डरांचा फैलाव झाला आहे. रेसिंडेट डॉक्टरांना कुठल्या पेशंटचा नातेवाईक कधी येऊन आपल्या कानाखाली वाजवून जाईल याचं डर आहे. जीएस्टीच्या फेर्‍यानंतर, आजवर 'कर नाही त्याला डर कशाला' असे म्हणून करडोहाच्या किनार्‍याकिनार्‍याने पोहत 'निर्डर' जीवन जगणार्‍या शेठ लोकांच्या ढेरीवरच्या आठ्या कमी होऊन कपाळावरच्या आठ्या वाढल्याचा एका 'मार्केट सर्व्हे'चा निष्कर्ष आहे. शिक्षकांना आता आपल्याला कुठल्या सर्व्हेच्या कामाला लावतात याचं डर आहे. सरकारला आता कुठला 'समाज' आरक्षण मागतो याचं डर आहे. 'जिओ'चं सिम वापरणार्‍‍यांना किती रुपयांचं बिल आपल्या नावावर फाडण्यात येईल याचं 'अनलिमिटेड' डर आहे.

सर्वात जुन्या पक्षाच्या प्रवक्त्यांना आपले 'युवराज' कुठे काय बोलतील आणि आपली बोलती बंद करतील याचं डर सतावत असतं. काश्मिरी फुटीरांना भारताने खरंच मनावर घेऊन कश्मीरवरचा हक्क सोडला तर खायचे वांधे होतील याचं डर आहे. मराठी वृत्तपत्रांना 'सामना'ने एखाददिवस भाजपावर टीकात्मक अग्रलेख लिहिला नाही तर आपण कशाची बातमी करायची याचं एक वेगळंच डर आहे. महानायकाला म्हातारपणातही पोराचा संसार आणखी किती दिवस चालवायचा याचं डर आहे. इत्यादी.

या तर झाल्या मोठ्या गोष्टी, घराघरातही आपली सासू सिरीअल पाहून पाहून आपल्याही डोळ्यात घालायच्या काजळात मिरपूड तर टाकणार तर नाही ना याचं डर सुनेचा डोळ्याला डोळा लागू देत नाही. बॉयफ्रेंडला आपली गर्लफ्रेंड अजून किती 'बॉयां'ची फ्रेंड आहे याचं एक डर आतल्या आत खात असतं. मुलींना आपल्या फेसबुकवर 'प्रोफाइल पिक' म्हणून रोज नवनवीन फुलं, बाहुल्या, पर्‍या, जेनेलिया डिसूझ्या आणि अमृता रावा कुठून आणायच्या याचं एक प्रॅक्टिकल डर आहे. मुलांना 'लेडीज' मेम्बर असलेल्या व्हॉटस अप ग्रुप मध्ये 'तसला' मेसेज जातो का याचं एक 'इमेजिनरी' डर असतं. बापाला समोरून बाईकवर गेलेल्या भंटोल पोराला चिकटून बसलेली 'फडकंनशीन' पोरगी आपलीच तर नाही याचं डर आहे. अजून आईच्या पोटातच असलेल्या बाळाला आपले मायबाप आपल्यासाठी किती कठीण नाव शोधतील आणि कितव्या महिन्यात शाळेत टाकतील याचं डर जन्माच्या आधीपासूनच असतं म्हणतात आजकाल. शेवटी डर अपना अपना !

तरी वर दिलेली भयकारक परिस्थिती वाचून वाचकांनी कृपया निराश होऊ नये, स्वत:ची ब्लू व्हेल होऊ देऊ नये. परिस्थिती तितकीही गंभीर झालेली नाही. कारण 'चांदनी चौक तो चायना' ते 'हमशकल्स' मार्गे 'आरजीव्ही की आग' असे भयपट तयार करणारे व पैसे मोजून ते थेटरात जाऊन पाहणारे धैर्यशील वीर जोवर या भरतभूवर आहेत तोवर आपलं भवितव्य उज्ज्वल असून असल्या डरांच्या डरकाळीला घाबरण्याचं मुळीच कारण नाही.

तर असो. तूर्त आम्ही लेखणी आवरती घेतो. कारण शेवटी कितीही फुशारक्या मारल्या तरी आम्हालाही संपादकांच्या कात्रीचे 'डर' आहेच की !

(पूर्वप्रकाशित)

ब्लॉग लिंक

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्त लिहिलय :D:D

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भन्नाट लेख..
बऱ्याच पंचेसवर फुटलो.

वास्तविक 'घाबरणे' या एकाच क्रियेचे हे वर्णन करणारे हे वेगवेगळे शब्द. पण 'डर' या शब्दामध्ये जो डॉल्बी डिजीटल इफेक्ट आहे तो भय वा भीती या शब्दांमध्ये नाही. जसं आरोपीला गुन्हेगार ठरवण्यात येणं किंवा 'मुलजिम को मुजरिम' असा 'करार' देणं ही वास्तविक एकच क्रिया. पण दुसर्‍यात जसं आपण सिनेमातल्या कोर्टरूम मध्ये बसलो आहोत, एका कटघर्‍यात दाढीबिढी वाढलेला मुलजिम उभा आहे, समोर स्व:ची जुल्फे झटकत एक वकील येरझारा घालतो आहे, कधी एकदाचा निकाल सांगून आपण 'मोकळे' होतो अशा बद्धकोष्ठी आविर्भावात एका उच्चासनावर माननीय मिलार्डसाहेब बसलेले आहेत, एका फोटोत सदाहसतमुख बापू शांतचित्ताने सर्व उपस्थितावर आपल्या स्मितहास्याची पखरण करत स्नेहार्द्र दृष्टीने बघत आहेत इत्यादी इत्यादी वातावरणाचा कसा 'फील' येतो तसा पहिल्यात येत नाही.

गविंच्या कोर्टटीपा आठवल्या..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

आता येतेत झायरातीवाले केस ठोकायला तुमच्यावर. डरा तुम्ही त्यांना. मुन्नी बदनाम हुयी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

लै भारी लिहिलंय राव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तं लिहिलंय. आवडलं!! विशेषतः 'डर'चे अनेकवचन (डरे) तर झक्कास!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0