दादाभाई नौरोजी आणि आर्थिक राष्ट्रवाद - नरहर कुरुंदकर

संकल्पना

दादाभाई नौरोजी आणि आर्थिक राष्ट्रवाद

- नरहर कुरुंदकर

प्रा. नरहर कुरुंदकर यांच्या 'राष्ट्रवाद आणि समाजवाद' या दीर्घ निबंधातील हा एक उतारा. दादाभाई नौरोजी यांना दिसलेला आर्थिक राष्ट्रवाद त्यात कुरुंदकर विशद करतात. संपूर्ण निबंध 'अभयारण्य' या कुरुंदकरांच्या स्वातंत्र्यविषयक लेखांच्या संकलनात समाविष्ट आहे. प्रकाशक : देशमुख आणि कंपनी

भांडवलशाही शोषण करते हे सत्य आपणास मान्य आहे का? साम्राज्यशाही हे भांडवलशाहीचेच एक विकसित रूप आहे. ह्या नव्या रूपात एक संपूर्ण राष्ट्र दुसर्‍या राष्ट्राचे शोषण करते हे आपणास मान्य आहे का? मार्क्सवाद्यांना ही सत्ये मान्य केल्याविना गत्यंतरच नाही. कम्युनिस्टांनाही हे सत्य मान्य करणेच भाग आहे. कारण हा मुद्दा सांगण्यासाठी लेनिनने एक पुस्तकच लिहिलेले आहे. खरे म्हणजे हे सत्य मान्य करण्यासाठी मार्क्सवादी व कम्युनिस्ट असण्याची गरज नाही. वास्तवाकडे दृष्टी असणार्‍या सार्‍या देशभक्तांना केवळ मातृभूमीवरील प्रेमापोटी जाणवणारा हा मुद्दा आहे. परतंत्र देशातील स्वातंत्र्यलढा हा मूलतः साम्राज्यशाहीविरुद्धचा लढा असतो. म्हणून तो अंतिमतः पुरोगामी असतोच. पण जर हा लढा आर्थिक राष्ट्रवादावर आधारित असेल तर मग तो आरंभी, मध्यावर व शेवटी पुरोगामी असतो; आकृती व आशय म्हणूनही पुरोगामी असतो. चार-दोन प्रश्‍नांवर नेते बावरल्यासारखे वागले. त्यांचे आकलन चूक पद्धतीने झाले म्हणून सार्‍या चळवळीच्या मूल्यमापनात आपण चूक करण्याचे कारण नाही. लो. टिळक हे आर्थिक राष्ट्रवादाचे नेते होते. ती पुरोगामी चळवळ होती. ह्या आर्थिक राष्ट्रवादाला आधारभूत चिंतन न्या. रानडे ह्यांचे नसून दादाभाई नौरोजी ह्यांचे आहे.

दादाभाई नौरोजींना आपण धड विसरतही नाही, धड त्यांच्याविषयी कृतज्ञतेने आपले मन उचंबळूनही येत नाही. अशी काही चमत्कारिक अवस्था त्यांच्याबाबत होते. हा खरे म्हणजे पारशी माणूस. वयाच्या ऐंशीव्या वर्षीपर्यंत अतिशय तडफदारपणे राजकारणात चमकणारा हा एक विलक्षण वृद्ध. दादाभाई ऐंशी वर्षांचे असताना तरुण पिढीचे लाडके होते. जहालांना आणि मवाळांना विश्‍वसनीय वाटणारा हा एकच माणूस. पहिल्या पिढीत काँग्रेसचा तीन वेळा अध्यक्ष होणाराही हाच एक गृहस्थ. पुढे चालून हा मान पं. नेहरूंना मिळाला. हा पारशी आपल्या पुरोगामी आर्थिक राष्ट्रवादाचा आधार आहे. योगायोगाची गोष्ट अशी की दादाभाई व मार्क्स एकाच वेळी लंडनमध्ये दीर्घकाळ राहात होते. मार्क्सचे लिखाण दादाभाईंच्या वाचण्यात आलेले दिसत नाही. मार्क्सच्या लिखाणाचा प्रभाव त्यांच्यावर मुळीच दिसून येत नाही. मार्क्सच्या प्रसिद्ध 'कॅपिटल' ह्या ग्रंथाचा पहिला भाग इ. स. १८६७ साली प्रकाशित झाला. दादाभाईंनीसुद्धा आपल्या मवाळ भांडणास ह्याचवेळी आरंभ केला. ह्यावेळी दादाभाई सुमारे सदतीस वर्षांचे होते. भारतीय काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी दीड तप ज्या ठिकाणाहून दादाभाई आरंभ करतात, ती जागा मवाळ राजकारणाची आधारभूमी आहे. ह्यावेळी दादाभाईंचे म्हणणे इतकेच आहे की इंग्रजी राजवटीचे लाभदायक परिणाम अजूनही भारतीय जनतेला उपभोगण्यास मिळत नाहीत.

मला कधी कधी असे वाटते की इ. स. १८६७ सालची दादाभाईंची भूमिका कितीही मवाळ असो, त्यांचे ब्रिटिश राजवटीवर कितीही प्रेम असो, व दादाभाईंनी कितीही सद्‌भावनेने मते मांडलेली असोत ती मवाळांची भूमिका नव्हतीच, ते जहाल विचारांचे बीज होते. इतक्या जुन्या काळी दादाभाई म्हणतात, भारताच्या एकूण वसूल करांच्यापैकी १/४ सरळ इंग्लंडला जातो. हा पैसा नेण्यास त्यांची हरकत नाही. पण जर अशा प्रकारे उत्पन्नाचा फार मोठा भाग भारताबाहेर गेला तर भारताची दरसाल कर देण्याची शक्ती कमी होते. म्हणून हा पैसा नव्या भांडवलाच्या रूपाने जर भारतात गुंतवला तर इंग्रजांना दीर्घकाळ कर मिळतील. भारताजवळ कर देण्याची शक्ती राहील असे ते म्हणतात. एका बाजूने पाहिले तर ही इंग्रज राजवट लोकप्रिय करण्याची भूमिका आहे. दुसर्‍या बाजूने पाहिले तर दादाभाईंनी सरळ आर्थिक शोषणावर बोट ठेवले आहे. मार्क्सतर त्यांच्या वाचनात नव्हताच. लेनिनचे लिखाण दादाभाईंना फार उत्तरकालीन आहे. मार्क्स अगर लेनिन ह्यांपैकी कुणाचेही लिखाण न वाचता हा माणूस आपल्या सर्व चिंतनाचा मध्यवर्ती प्रश्‍न भारताचे आर्थिक शोषण हा करीत आहे, व त्यावर आपल्या आयुष्यव्यापी राजकारणाची उभारणी करीत आहे. इतर कोणत्याही सैद्धान्तिक विवेचनाचा आधार नसताना स्वाभाविक गतीने एक माणूस सत्याच्या गाभ्यापर्यंत जात आहे हे मला महत्त्वाचे वाटते. त्यांचे साम्यवादी भूमिकेशी आश्‍चर्यकारक साम्य दिसते हेच नवल आहे.

मार्क्सचे मोठेपण कशात आहे? मार्क्स नावाचा कुणी ईश्‍वराचा प्रेषित होता व इतर कुणाला न कळणारे ज्ञान परमेश्‍वराने त्याला दिले होते असे मी समजत नाही. ज्या घटना आणि पुराव्याचा मार्क्स विचार करीत होता त्या सर्वांच्या समोरच होत्या. अनेक भूतदयावाद्यांना त्यातील काही घटना दिसत होत्या. मार्क्सचे मोठेपण ह्यात आहे की तो ह्या घटनांचे सैद्धान्तिक स्पष्टीकरण देतो, कारणमीमांसा सांगतो, त्यातून बाहेर पडण्याचा रस्ता दाखवितो. मार्क्स हा काही धर्मगुरु नव्हे की एखादी बाब त्याने सांगितली म्हणून खरी मानावी. त्याचे मोठेपण तो सांगतो ते श्रद्धेने सत्य म्हणून मानावे ह्या जातीचे नसून, जे सत्य आहे ते अचूकपणे तो सांगतो ह्या जातीचे आहे. ज्यांचा मार्क्सशी संबंध नाही असे लोक स्वतंत्र्यरीत्या त्याच निर्णयावर पोचतात, ज्याचा मार्क्सने उल्लेख केलेला असतो. ह्याचा अर्थ काय? मार्क्स जे सत्य सांगतो ते न टाळता येण्याजोगे सत्य आहे, असा त्याचा अर्थ आहे. दादाभाईंचे विवेचन हा मी मार्क्सवादाची सत्यता सिद्ध करणारा स्वतंत्र पुरावा समजतो. भारताच्या राजकीय नेत्यांत भारताचा मुख्य प्रश्‍न आर्थिक आहे ह्या निर्णयावर दादाभाई सर्वप्रथम आले.

पुढच्या सार्‍या जहाल मवाळांनी मूळ प्रश्‍न आर्थिक मानला ह्याचे कारण दादाभाई होते. ह्यामुळे भारताच्या राजकीय नेतृत्वाने आर्थिक प्रश्‍नांच्याकडे वेळोवेळी लक्ष दिले. मवाळांच्यापैकी फिरोजशहा मेहतांनी सेंट्रल बँकेच्या स्थापनेत फार मोठा भाग घेतला. लाला लजपतराय ह्यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. लालाजी पहिल्या अखिल भारतीय कामगार संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी व बिपिनचंद्र पाल ह्यांचा बंगालमधील उद्योगांशी निकट संबंध होता. स्वतः टिळकांनी एक जिनिंग-प्रेसिंग-फॅक्टरी काढली होती. पैसा फंडात त्यांचा सहभाग होता. नव्या अर्थरचनेच्या निकट संपर्कात भारताचे राजकीय नेतृत्व सतत राहिले हा एकप्रकारे दादाभाईंच्या विचारपद्धतीचा परिपाक म्हटला पाहिजे. भारतात असणारे जमीनदार नेहमीच एक वर्ग म्हणून काँग्रेसला प्रतिकूल राहिले (व्यक्ती अपवाद समजावयाच्या). नवे उद्योगपती काँग्रेसला नेहमीच वर्ग म्हणून अनुकूल राहिले. ज्यावेळी भांडवलशाहीला जनतेच्या पाठिंब्यावर वाटचाल करावी लागते त्यावेळी आरंभापासून तिला वेगवेगळ्या तडजोडी मान्य कराव्या लागतात. हे चित्र भारतात कायमचे राजकीय चित्र झाले आहे.

एका सधन घराण्यात इ. स. १८२५ साली दादाभाईंचा जन्म झाला. मुंबईतील आद्य सुशिक्षितांत व प्राध्यापकांत त्यांची गणना होत असे. मुंबईतील आद्य विद्यार्थी चळवळीशी त्यांचा संबंध होता. काही दिवस ते प्राध्यापकाचे कामही करीत होते. तारुण्य मुंबईत व्यतीत करून थोडे प्रौढावस्थेकडे झुकल्यानंतर ते इंग्लंडला गेले. इंग्लंडला जाण्याचा त्यांचा हेतू व्यापारात सहभागी होणे हाच होता, पण लवकरच त्यांच्या जीवनात व्यापार गौण झाला आणि भारताच्या राजकीय प्रश्‍नावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. आपल्या समकालीनांच्याप्रमाणे नौरोजीही मवाळच होते. पण भारतातील सुधारणावादी ज्या प्रश्‍नांचा विचार करीत त्यापेक्षा निराळ्या दिशेने दादाभाईंचा प्रवास सुरू झाला. इंग्रजांनी भारताला शांतता, सुव्यवस्था व कायद्याचे राज्य दिले, नवे शिक्षण, नवा दृष्टिकोण आणि आधुनिक उद्योग दिले. ह्यामुळे दादाभाई फारसे प्रभावित झाले नाहीत. कदाचित इंग्लंडमधील दीर्घकाळच्या वास्तव्यामुळे ह्या बाबी आनुषंगिक आहेत, असे त्यांच्या सुप्त मनात रुजले असावे. जागृत मनाने मात्र ते इंग्रजांचे मित्र होते. त्यांना अगदी प्रथम जाणवला तो प्रश्‍नसुद्धा भारतात काय असावे, काय व्हावे हा नसून इंग्रजांनी काय करू नये हा होता.

मवाळ वातावरणामुळे इंग्रज करीत असलेली एखादी घटना चूक आहे असे दादाभाईंना म्हणवेना. एवढे मोठे राज्य इंग्रज चालवीत आहेत तेव्हा त्यांना त्यांचा मोबदला मिळालाच पाहिजे असे त्यांनी मानले. कररूपाने जमा होणार्‍या पैशाचा २५ टक्के भाग मोबदला म्हणून घेणे योग्य आहे काय? हा प्रश्‍न त्यांनी विचारला नाही. हा मोबदला त्यांनी रास्तच मानला. पण प्रश्‍न असा की रास्त मोबदला दिल्यामुळे भारत जास्त गरीब होत आहे त्याचे काय करावे? आरंभीच ह्या प्रश्‍नाने दोन मते बाद होतात. पहिले मत म्हणजे इंग्रज भारताच्या उद्धारासाठी आले आहेत. ते एक कर्तव्य करीत आहेत. दादाभाई म्हणणार, 'तुम्ही एक काम करता, त्याचा मोबदला घेता.' बाद होणारे दुसरे मत म्हणजे इंग्रजांच्या राज्यात भारत क्रमाने विकसित होत आहे. दादाभाई म्हणणार, 'भारत क्रमाने गरीब होत आहे.' मुळातच ही मते सुधारणावादात सामावणारी नव्हती. ह्यावेळी ते म्हणाले, 'हे भारताबाहेर जाणारे भांडवल भारतात गुंतवा.' पुढच्या सुधारणावाद्यांनी ह्या मुद्द्यावर खूप आग्रह धरला.

दादाभाई दीर्घकाळपर्यंत मवाळांचे ज्येष्ठ नेते मानले जात. कारणे कोणतीही असोत पण दीर्घकाळपर्यंत त्यांच्या लिखाणात व व्याख्यानात एक मुद्दा आग्रहाने पुनःपुन्हा मांडलेला आहे. तो म्हणजे आपण इंग्रजांचे मित्र व चाहते आहोत. इंग्रजी राजवट दीर्घकाळ टिकावी ह्याचा प्रयत्न करणारे व तिचे स्वागत करणारे आहोत. हे राज्य बळकट व लोकप्रिय असावे ह्यासाठीच आपला सारा प्रयत्न चालू आहे. वेळोवेळच्या त्यांच्या ह्या घोषणेमुळे मवाळांना त्यांचा फार मोठा भरवसा होता. शिवाय दादाभाई पारशी होते. हिंदूंना प्राचीन भारताविषयी जी गौरवबुद्धी व आत्मीयता होती, तसे नौरोजींना वाटण्याचे कारण नव्हते. मनाने ते आधुनिक होत. सर्व सामाजिक सुधारणांना अनुकूल होते. सुधारणावाद्यांच्या कळपातच ते वावरत होते. त्यामुळे दादाभाई सगळ्या इंग्रजी राजवटीचे नैतिक अधिष्ठान उद्ध्वस्त करत आहेत, हे कुणालाही जाणवले नाही. अतिशय मूलगामी बाबी अत्यंत निरुपद्रवी भाषेत मांडण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. भारतातील आर्थिक राष्ट्रवादाला त्यांचे विवेचन आधारभूत होईल, त्यांच्या सूचना पुढच्या राष्ट्रवादाचा कार्यक्रम होतील असे मवाळांना वाटले नाही.

दादाभाई नौरोजींच्या विचारांचा एक टप्पा इ. स. १८७६ साली म्हणजे काँग्रेसस्थापनेच्या नऊ वर्षे आधी पूर्ण होतो. ह्यावर्षी दादाभाईंनी आपला प्रसिद्ध ग्रंथ 'भारतातील दारिद्र्य' प्रसिद्ध केला. ह्या ग्रंथात अतिशय तपशिलाने एक मुद्दा त्यांनी सिद्ध केला आहे. तो मुद्दा असा की इंग्रजी राजवट पद्धतशीरपणे भारताची प्रचंड लूट करीत आहे व त्यामुळे भारत क्रमाने दरिद्री होत आहे. पूर्वी त्यांना वाटे की इंग्रज जी राजवट भारतात चालवीत आहेत, त्यामुळे शांतता, सुव्यवस्था व कायद्याचे राज्य चालू आहे. आता त्यांना असे वाटत नाही. ते आता म्हणतात भारताच्या हिताकडे दुर्लक्षच करून केवळ इंग्लंडच्या हितासाठी ही भारतीय राजवट वापरली जात आहे. कोणतीही विदेशी राजवट एखाद्या देशावर राज्य करू लागली म्हणजे घडणारी स्वाभाविक घटना निराळी आणि इंग्रजी राजवट निराळी. सहेतुकपणे भारतीय उद्योगधंद्यांचा नाश व भारतीय संपत्तीचे अपहरण चालू आहे. इंग्रजी राजवट आत्मघाताच्या मार्गाने वाट चालत आहे. निसर्गाचे काही नियम अचल असतात. रात्रीनंतर निश्‍चितपणे दिवस येतो त्याप्रमाणे इंग्रजांच्या धोरणाचा परिणाम होईल. दादाभाईंना आता इंग्रजी राजवट मूलतःच अन्यायकारक वाटू लागली आहे. इंग्लंडच्या हिताच्यासाठी ती भारताचे अहित करणारी वाटू लागली आहे. दादाभाईंच्या ह्या विवेचनात एक अपरिहार्य निष्कर्ष असा की, इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्‍वास ठेवणे व्यर्थ आहे. दुसरा निष्कर्ष असा की इंग्रज राजवटीविरुद्ध इंग्लंडच्या जनतेत प्रचार करणे व्यर्थ आहे, कारण दोघांचे हितसंबंध परस्परविरोधी आहेत. दादाभाईंनी हे निष्कर्ष काढलेले नाहीत. उलट ते 'मी मवाळ आहे' हे सांगत राहिले.

इंग्रजी राजवट मूलतः भारताच्या कल्याणाची आहे. तिच्या व्यवहारात दोष असतील तर ते तात्पुरते व सुधारता येण्याजोगे आहेत. ह्या राजवटीचे लाभ अनेक आहेत व ती दीर्घकाळ टिकणे अंतिमतः भारताच्या हिताचे आहे. ही थोडक्यात मवाळांची म्हणजे आर्थिक सुधारणावादाची भूमिका आहे. ती काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीची आहे. दादाभाई स्वतःला मवाळ म्हणवणारे पण त्यांचा सिद्धान्त हा की इंग्रजी राजवट प्रचंड लूट करणारी व भारताला दरिद्री करणारी आहे. तिचे लाभ असतील तर ते वरवरचे, गौण असून तोटे आहेत ते मूलभूत आहेत. ही ब्रिटिश राजवट निदान चांगल्या हेतूने चालविली जात आहे असे म्हणावे काय? दादाभाईंच्या मते हेतूचा प्रामाणिकपणा ठरविण्याची कसोटी एकच आहे, ती म्हणजे ही लूट थांबणार आहे का? (मवाळांचा प्रश्‍न इतकाच होता की नव्या औद्योगीकरणाला गती मिळणार आहे का?) इंग्रज जर हे कार्य करणार नसतील तर मग भारताचा एकही प्रश्‍न सुटणार नाही असे दादाभाईंना वाटे, दादाभाईंच्या विचारात एक फट शिल्लक होती तीही क्रमाने बुजत गेली. दादाभाईंचे हे चिंतन काँग्रेसच्या जन्माआधीचे आहे. आर्थिक राष्ट्रवाद उत्तरकालीन नाही. रानड्यांच्यानंतर टिळक उदयाला येतात हे व्यक्तीबाबतचे सत्य आहे. सुधारणावाद क्रमाने राष्ट्रवादात विकसित होतो हे सार्वजनिक भूमिकेबाबतचे असत्य आहे.

दादाभाई काँग्रेसच्या संस्थापकांच्यापैकी एक होते. काँग्रेसच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला तेव्हा ते साठ वर्षांचे झाले होते. हे वय सार्वजनिक धावपळीत निवृत्त होण्याचे असते. ह्यावेळी रानडे नुकतेच चाळिशी ओलांडून पुढे सरकले होते व ते सरकारी नोकर होते. त्यांना काँग्रेसच्या स्थापनेत पुढाकार घेणेही शक्य नव्हते; अग्रभागी राहून नेतृत्व करणेही शक्य नव्हते. त्यांना नेहमीच पिछाडीवर बसून सल्ला-मसलत देणे भाग असे. ह्या वस्तुस्थितीची नोंद रानडे ह्यांचे महत्त्व कमी लेखण्यासाठी केली नसून काँग्रेसच्या आरंभकाळी ते दादाभाईंइतक्या महत्त्वाचे नव्हते हे सांगण्यासाठी केली आहे. अगदी आरंभापासून दादाभाईंनी काँग्रेसला आकार दिला. त्यांचा पहिला महत्त्वाचा आग्रह हा राहिला की काँग्रेसचे स्वरूप अखिल भारतीय व राजकीय संघटनेचे आहे. म्हणून ह्या व्यासपीठावर फक्त राजकीय प्रश्‍नांची चर्चा व्हावी व हे प्रश्‍न अखिल भारतीय स्वरूपाचे असावे.

दादाभाईंच्या मते अखिल भारतीय स्वरूपाचे महत्त्वाचे प्रश्‍न तीन आहेत. पहिला प्रश्‍न भारताच्या राज्यशासनात भारतीयांचा सहभाग वाढावा हा आहे. दुसरा त्याहून महत्त्वाचा प्रश्‍न भारतीय कायदेमंडळावर जनतेचे प्रतिनिधी असण्याचा आहे. तिसरा सर्वांत महत्त्वाचा प्रश्‍न भारताचे दारिद्र्य हा आहे. त्यांना इतर प्रश्‍नांची चर्चा ह्या व्यासपीठावर नको होती. सर्वांच्या संमतीने पण विशेषतः त्यांच्या आग्रहामुळे काँग्रेसचे स्वरूप असे ठरल्यामुळे सांस्कृतिक राष्ट्रवादाला किंवा समाजसुधारणेच्या प्रचाराला हे व्यासपीठ वापरता आले नाही. समाज-सुधारणांचा प्रचार करण्यासाठी वेगळी सामाजिक परिषद भरवण्यात येई. टिळकांना एक तरुण कार्यकर्ता म्हणून हे राजकीय व्यासपीठ जिंकणे, तिथे प्रभाव निर्माण करणे भाग होते. दादाभाईंनी पुढच्या अधिवेशनापासून भारताचे दारिद्र्य हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्‍न केला. ते म्हणाले, 'भारतातील माणसाचे दरडोई उत्पन्न वार्षिक वीस रुपये इतकेच आहे. हे सर्वसाधारण उत्पन्नाचे मान आहे. गरिबांचे उत्पन्न तर याहून कमी आहे. इंग्रज सरकार कैद्यांच्यासाठी दरडोई किमान खर्च २७ रुपये करते. भारतातील स्वतंत्र माणूस कैद्याहून निकृष्ट जगतो. भारतात असणार्‍या ह्या अफाट दारिद्र्याचे कारण येथील उत्पादनच गरजेहून कमी आहे हे आहे.' दादाभाई असे मानत की उत्पादनक्षमता इतकी कमी आहे हे दारिद्र्याचे कारण नसून तो दारिद्र्याचा परिणाम आहे. भारताची प्रचंड लूट होत असते. कररूपाने जमणार्‍या पैशाचा मोठा भाग इंग्लंडला जातो. आयात-निर्यातीच्या मधील फरक हीसुद्धा भारताची लूट असते. (हा फरक इ. स. १८९८च्या सुमारास दरसाल ४० कोटी रुपयांच्या आसपास होता.) पूर्वी दादाभाई विदेशी भांडवलाचे स्वागत करणारे होते. आता म्हणू लागले की हे विदेशी भांडवल कशातून निर्माण होते?

भारताची लूट पुन्हा भारतात भांडवल म्हणून आणली जाते, व हे भांडवल भारताची नव्याने लूट करते, कारण नफा परदेशात जातो. अशा सर्व मार्गाने इ. स. १८३५ ते इ. स. १८९३ ह्या काळात सरासरी दरसाल २५ कोटी रुपये भारताला गमवावे लागले. ही रक्कम एकूण १२०० कोटींच्यावर जाते. (इ. स. १८९३नंतर हे प्रमाण वाढतच गेले. रमेशचंद्र दत्तांच्या हिशोबानुसार ही लूट इ. स. १९०५ साली दरसाल ५१ कोटी रुपये होती.)

आता दादाभाईंच्या विचारांतील सर्व फटी बंद झालेल्या आहेत. भारतातून इंग्रजी राजवट कररूपाने भारताबाहेर २५ टक्के रक्कम नेते व भारत गरीब होतो हा विचारांचा आरंभ. ह्याला उत्तर काय? आरंभीचे उत्तर हे की हा पैसा पुन्हा भारतात गुंतवून भारताची क्षमता वाढवा. नंतरचे उत्तर हे की विदेशी भांडवल नको, त्यामुळे अधिकच लूट होते व भारत दरिद्री होतो. दादाभाईंचे म्हणणे असे की ह्या प्रचंड लुटीमुळे भारतात भांडवली संचय अशक्य होतो म्हणून उत्पादकतेचा विकास होत नाही. उत्पादनाचा अभाव हे दारिद्र्याचे कारण नसून तो परिणाम आहे. सरळ तीन ठिकाणी दादाभाईंचा आर्थिक सुधारणावाद्यांशी मत विरोध येतो. सुधारणावाद्यांना औद्योगिक विकासासाठी विदेशी भांडवल हवे आहे. दादाभाईंना विदेशी भांडवल जास्त लूट करते म्हणून नको आहे. सुधारणावाद्यांना दीर्घकाळ विकासासाठी इंग्रजी राजवट हवी आहे. दादाभाईंच्या मते जितके दिवस हे राज्य राहील तितके आपण दरिद्री होऊ. सुधारणावाद्यांना अंतिमतः ही राजवट हिताची वाटते, दादाभाईंना ती मूलतः भारताच्या अहिताची वाटते. तरी दादाभाई हे मवाळ म्हणण्याची प्रथा आहे. दादाभाईंचा हा सिद्धांत 'ड्रेन थिअरी' म्हणून प्रसिद्ध आहे. दादाभाईंच्यापासून अनेकांनी प्रेरणा घेऊन पुढे भारताच्या हानीचा विचार विचार केला. ह्या अभ्यासकांत रमेशचंद्र दत्तांचे भारताच्या आर्थिक इतिहासाचे दोन खंड सर्वांत तपशिलाने विचार करणारे आहेत. हे दत्तही स्वतःला मवाळच समजत. हे प्रसिद्धच आहे की 'ड्रेन थिअरी'वर रानडे व गोखले ह्यांचा विश्‍वास नव्हता, पण काँग्रेसने इ. स. १८९६ साली ह्या सिद्धांताला मान्यता दिलेली दिसते.

एक अर्थशास्त्रीय सिद्धांत म्हणून दादाभाईंचा सिद्धांत बरोबर आहे का चूक आहे हा प्रश्‍नच गौण आहे. (मी हा सिद्धांत बव्हंशी बरोबर आहे असे मानतो.) हा सिद्धांत अनुसरणारे राजकारणच अतिशय मूलगामी निर्णय देत होते, हे महत्त्वाचे आहे. दादाभाई अर्थशास्त्राचे सैद्धान्तिक भाष्यकार नव्हते. त्यामुळे भांडवलशाही शोषण करतेच असा सार्वत्रिक सिद्धांत त्यांनी मांडला नाही. इतर कुणी त्यांच्यासमोर हा सिद्धांत ठेवला असता तर कदाचित त्यांनी तो मान्यही केला नसता. पण ब्रिटिश भांडवलशाही भारतीयांचे शोषण करते हा विशिष्ट निर्णय मात्र त्यांनी दिला. इतर कुणाचा सैद्धान्तिक आधार न घेता दिला. ह्याचा अर्थ विदेशी भांडवल नको असा होतो म्हणजे स्वदेशीचा झगडा निर्माण करणे भाग पडते. स्वदेशीच्या आग्रही पुरस्काराचा हा आरंभबिंदू आहे. तशी स्वदेशीची कल्पना लोकहितवादींनीही मांडली होती. पण स्वदेशी म्हणजे विदेशी राष्ट्राची भारतात होणारी जी भांडवली गुंतवणूक, तिचा विरोध स्वदेशी म्हणजे आपले शोषण करणार्‍या भांडवलदारी सत्तेचा विरोध ही कल्पना त्यांना नव्हती. लोकहितवादींच्या राष्ट्रीय चिंतनाला मर्यादाच फार मोठ्या होत्या. लो. टिळकांनी स्वदेशीचा पुरस्कार हे एक शस्त्र मानले. ते म्हणाले, 'इंग्लंडचा कारखानदार भारतीयांना फक्त गरीब शेतकरी ठेवू इच्छितो. त्या इच्छेविरुद्ध हा आमचा लढा आहे.' बिपिनचंद्र पाल पुढे आसाममधील चहामळ्यांतील मजुरांच्या गुलामगिरीविरुद्ध लढले. अजून दोन दशकांनी गांधी चंपारण्यात गेले. ह्या सर्वांच्यामागे विदेशी भांडवलाचा विरोध ही अखंड भूमिका आहे. तिचा वैचारिक आधार दादाभाईंचे विवेचन आहे.

दादाभाईंच्यामुळे इंग्रज उदार, न्यायी, शांतता व ज्ञान देणारा ही भूमिका मागे पडली व इंग्रज लुटारू, देश दरिद्री करणारा ही नवी भूमिका पुढे आली. भारतात नवे शस्त्र व शिक्षण वाढावे हा मुद्दा मागे पडला, व इंग्रज गेल्याशिवाय एकही प्रश्‍न सुटणार नाही, ही भूमिका पुढे आली. दादाभाई स्वतः इतिहास विवेचनाकडे फारसे वळले नाहीत पण त्यांच्यापासून प्रेरणा घेणार्‍या रमेशचंद्र दत्तांनी इंग्रजी राजवटीचा सगळा इतिहास इ. स. १८७६पासून इ. स. १९०५पर्यंत तपशिलाने पुढे ठेवला. दत्तांनी हे पुराव्याने सिद्ध केले की दुकानदार ज्याप्रमाणे नफ्यातोट्याचा विचार करून दुकान चालवतो, त्याप्रमाणे ईस्ट इंडिया कंपनी नफ्यातोट्याचा विचार करून राज्य चालवी व नफा इंग्लंडला पाठवी. प्रत्यक्ष संसदेशी संबंध आल्यानंतर भाषा बदलली पण व्यवहार तोच राहिला. दत्तांनी हे सिद्ध केले की इंग्रज येईपावेतो भारत पक्क्या मालाची निर्यात करणारा देश होता. इंग्रजांनी कायद्याच्या जोरावर भारतातील असलेले उद्योग उद्ध्वस्त केले व भारताचे कच्चा माल निर्यात करणार्‍या देशात रूपांतर केले. म्हणजे इंग्रजी राजवटीने भारताचे दारिद्र्यच वाढले नाही तर औद्योगिक मागासलेपणही वाढले. विदेशी राजवट हा नुसता दरिद्री करणारा भाग नसून मागासलेपण वाढवणाराही भाग आहे व सर्व प्रगतीतील क्रूर अडथळा आहे असा ह्याचा अर्थ होता. दत्तांचा हा मुद्दा एक ऐतिहासिक सत्य म्हणून चुकीचा आहे. भारत पक्का माल निर्यात करी हे खरे असले तरी आधुनिक उद्योग भारतात नव्हतेच, ते नष्ट करण्याचा प्रश्‍नही नव्हता. इंग्रजांनी नष्ट केले असतील ते आमचे ग्रामोद्योग. त्यामुळे औद्योगिक मागासलेपणा निर्माण होण्याचे कारण नाही. पण हा प्रश्‍न सत्यासत्याचा नसून इंग्रज राजवटीच्या नैतिक आधारांना सुरुंग लावण्याचा आहे. ते कार्य दत्तांनी चोखपणे केले.

दादाभाई स्वतः इतिहासाकडे वळले नाहीत, पण त्यांनी एक महत्त्वाचा ऐतिहासिक मुद्दा मांडला, ते म्हणाले, 'नादिरशहासारखे लुटारू भारतात आले व प्रचंड लूटमार करून गेले, पण प्रथम म्हणजे इंग्रजी राजवटीच्या मानाने ही लूट नगण्य आहे. दुसरे म्हणजे ती वर्ष, दोन वर्षांपुरती असे, कायमीच नसे. तिसरे म्हणजे ह्या लुटालुटीमुळे भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली नाही, म्हणून इंग्रज नादिरशहापेक्षा वाईट आहेत.' (दादाभाईंनंतर वीस वर्षांनी अजून एक चौथा मुद्दा मांडला गेला, तो हा की इंग्रजी राजवटीत दुष्काळाने जितकी माणसे मेली त्यामानाने नादिरशहाच्या कत्तली नगण्य होत.) ते म्हणाले, 'मोगलांनी प्रचंड पैसा गोळा केला पण हा पैसा ह्याच देशात खर्चला गेला, त्यामुळे देशाची लूट झाली नाही. इंग्रजी राजवट नादिरशहा व मोगल ह्याहून वाईट आहे.' भारतीय राष्ट्रवादाच्या उभारणीत हे सूत्र फार महत्त्वाचे आहे. सांस्कृतिक राष्ट्रवाद हिंदूंना, मुसलमानांचा द्वेष शिकवीत होता. इंग्रज राजवटीकडे मुसलमानांच्या गुलामगिरीतून मुक्तता म्हणून काही जण पाहत. काही जण इंग्रजांच्यासह मुसलमान राजांचा काळही आपल्या गुलामगिरीचा काळ म्हणून पाहत. मोगल हे देशी राजे होते. त्यांनी राष्ट्राची लूट केली नाही हे सूत्र आधुनिक राष्ट्रवादाला फार उपकारक ठरले. लो. टिळकांनी एकीकडे नादिरशहा व मोगल, दुसरीकडे इंग्रज राजवट ही तुलना अनेकदा आपल्या लिखाणात केली आहे. आर्थिक राष्ट्रवाद जातिधर्मातीत रूपच घेणार ह्या प्रवाहाशी सुसंगत टिळकांचे वागणे झाले.

पुढे टिळक स्वदेशीच्या चळवळीत हिरीरीने पडले, तेव्हा आपण बंगाली मुसलमानांची बाजू घेतो आहोत असे त्यांना वाटले नाही. मुसलमान हे भारतीय आहेत, परदेशी नाहीत हा मुद्दा महत्त्वाचा ठरला. ढाक्क्याच्या मुसलमानांना यंदा टिळक काँग्रेसचे अध्यक्ष व्हावेत अशी मागणी करण्यातही संकोच वाटण्याचे कारण नव्हते. गफलत आपली होते कारण आपण टिळकांना सांस्कृतिक राष्ट्रवादाचे नेते समजण्याची चूक पत्करून बसलो आहोत. दादाभाईंचे सूत्र पुढे समाजवाद्यांनी विकसित केले. ते म्हणत, 'जनतेच्या गुलामगिरीच्या दृष्टीने पाहिले तर हिंदू राजे व मुसलमान राजे ह्यांत फरक काहीच नाही, राष्ट्रीय दृष्टीने पाहिले तर मुसलमान राजवटीचे हितसंबंध इथेच गुंतलेले होते.' (इतिहास म्हणून पाहिले तर ही भूमिका अर्धसत्य आहे, पण ती स्वातंत्र्यपूर्वकाळी आधुनिक राष्ट्रवादाला पोषक ठरली.)

दादाभाई काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते. (मुंबई इ. स. १८८५) ह्यापूर्वी त्यांचे विचार निश्‍चित झालेले होते. ह्या पहिल्याच अधिवेशनात दादाभाईंनी अतिशय निरुपद्रवी भाषेत एक मूलगामी व उपद्रवी मुद्दा मांडला आहे. ते म्हणाले, 'आम्हांला नेमके काय पाहिजे? आम्हांला सुधारणा हवी आहे. आमच्यावर कर बसवण्याचा अधिकार ही आम्हांला हवी असणारी पहिली सुधारणा आहे.' भाषा सोडून देऊन आशय पाहिला तर काँग्रेसच्या पहिल्याच अधिवेशनात दादाभाईंनी भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे, असे दिसून येईल. स्वतःवर कर बसवण्याचा जनतेचा अधिकार म्हणजे काय? देशाचे अंदाजपत्रक तयार करण्याचा, उत्पन्न व खर्च ठरवण्याचा अधिकार जनतेला हवा, अशी ही मागणी आहे. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाचा आरंभ ह्याच आशयाच्या घोषणेपासून होतो. पुढे इ. स. १८९४ साली टिळक म्हणाले, 'कायदेमंडळावर जनतेच्या निवडलेल्या प्रतिनिधींचे बहुमत असावे व त्यांना अंदाज-पत्रकावर मतदान करणच हक्क असावा.' ही मागणी करणारे टिळक दादाभाईंचाच विचार स्पष्ट करीत होते.

एका राष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्याचा विचार करताना मी व्यक्तीला गरजेहून जास्त प्राधान्य देत आहे काय? कदाचित काही प्रमाणात हा आक्षेप खरा असेलही, कारण ह्या माणसावर माझे प्रेम आहे. पण बव्हंशी हा आक्षेप व्यर्थ आहे. कारण माझ्यासमोर व्यक्ती नसून विचार आहेत, राजकीय भूमिका आहेत. स्वतःला मवाळ म्हणवणार्‍या दोन भूमिका काँग्रेस-स्थापनेपूर्वी जन्मलेल्या आहेत. ह्या दोन भूमिकांपैकी एकीचे नेते रानडे, दुसरीचे नेते नौरोजी आहेत. मी नौरोजींकडे एका भूमिकेचे प्रतिनिधी म्हणून पाहातो. स्वतःला आग्रहाने 'मवाळ' म्हणवणार्‍या ह्या पारश्यावर सर्व जहालांचा विश्‍वास होता, कारण त्यांचा विचार जहाल होता, तो आर्थिक राष्ट्रवादाचा आधार होता. न्या. रानडे यांच्या विषयी टिळकांना आकस होता असे म्हणणार्‍यांनी ह्या प्रश्‍नाचा कधी विचारच केला नाही की इंग्रजी राजवट टिकावी, लोकप्रिय व्हावी, विदेशी भांडवलाचे स्वागत व्हावे ह्या बाजूने सारी शक्ती पणाला लावणार्‍या न्या. रानड्यांचे नेतृत्त्व व महत्त्व संपूर्णपणे नेस्तनाबूत करणे स्वातंत्र्याची चळवळ उभारणार्‍यांना आवश्यक होते; ते त्यांचे पवित्र कर्तव्य होते. कारण असो वा नसो, रानडे गोखल्यांच्यावर धार धरणे टिळकांना भाग होते. ती एक लढाईची आघाडी होती.

दादाभाईंचे महत्त्व कोणते? त्यांच्या मर्यादा कोणत्या? त्यांनी जो नवा दृष्टिकोन दिला ते त्यांचे महत्त्व आहे. त्यांनी आम्हांला नवभारताच्या समस्यांकडे जाण्याची वाट मोकळी करून दिली. स्वातंत्र्य कशासाठी? ह्या प्रश्‍नाचे उत्तर हा विचार असे देतो की भारताची लूट थांबवून उत्पादन क्षमता वाढावी आणि जनतेचे दारिद्र्य संपावे, ह्यासाठी स्वातंत्र्य आहे. हे दारिद्र्य कुणाचे? सर्वांचेच. पण प्रामुख्याने ह्या देशातील शेतकर्‍यांचे. हे दारिद्र्य संपवायचे कसे? आधुनिक उद्योगांची उभारणी करून; शेतीवरील लोकसंख्येचा बोजा कमी करून; धरणे व कालवे बांधून. ह्यासाठी हवे असणारे सरकार कुणाचे? जनतेच्या निवडलेल्या प्रतिनिधींचे, ह्या सरकारजवळ पैसा हवा, तो कसा मिळणार? श्रीमंतांवर अधिक कर बसवून; गरिबांना शक्य तो करमुक्त ठेवून. अंदाजपत्रकाची किंमत किती? जितका पैसा जनतेच्या विकासावर खर्च होईल तितकी. असे अनेक विचार दादाभाईंनी आम्हाला दिले. 'ड्रेन थिअरी'ची ही विधायक बाजू आहे. तिने नवभारताचे राजकारण निर्माण केले. सूत्ररूपाने ते आजवर पुरले आहे. जनतेचे दारिद्र्य हा आधार धरून ह्या सूत्रांचा क्रमाने आशय स्पष्ट करीत आजचे राजकारण चालते. दादाभाई सर्व सुधारणांना अनुकूल होतेच. त्यामुळे त्यांच्यासमोर असणार्‍या राष्ट्रवादात सुधारणावादाचा सर्व आशय गृहीतच होता. शासनाच्या आर्थिक व्यवहारावर व अंदाजपत्रकावर लक्ष केंद्रित करावे हे त्यांनी प्रथम आम्हांला शिकविले. सारेच मवाळ भारताच्या हानीचा विचार शासकीय चूक म्हणून करीत व विकासाची मागणी करीत.

दादाभाईची मर्यादा कोणती? दादाभाई कधीही समाजवादी विचारवंत नव्हते. ही मी त्यांची मर्यादा मानणार नाही. वयाच्या ८०व्या वर्षाच्या आसपास एकदा ते समाजवादी परिषदेला उपस्थित राहिले. ह्या त्यांच्या धैर्याचे महत्त्व मान्य केले तरी त्यामुळे वस्तुस्थिती हीच राहते. दादाभाईंची माझ्या मते सर्वांत महत्त्वाची मर्यादा ही की त्यांच्यासारखा आर्थिक प्रश्‍नांचा विचार करणारा माणूस एका बाजूचा विचार करीत राहिला, दुसर्‍या बाजूचा विचार त्यांनी केलाच नाही. त्यांना विदेशी सरकार व भांडवल भारतीय जनतेचे शोषण करते हे दिसलेच, पण स्वदेशी जमीनदार, सावकार, व्यापारी, उद्योगपती भारतीय जनतेचे शोषण करतात हे दिसलेच नाही. शोषणाचे मूळच त्यांना सापडले नाही. ते मूळ जनतेला जबाबदार नसणारे शासन व भांडवल हेच होते. ते शेतकर्‍यांचा विचार करीत राहिले. त्यांना काही प्रश्‍न दिसले, काही प्रश्‍न दिसलेच नाहीत. जे प्रश्‍न दिसले नाहीत, ते महत्त्वाचे होते. पण जे दिसले ते ही प्रश्‍न खरे आणि मूलभूत, महत्त्वाचे होते. आर्थिक प्रश्‍न हा खरा प्रश्‍न आहे, हे त्यांना समजले पण आपल्या शोषणाची संपूर्ण रचना त्यांना समजली नाही. आर्थिक राष्ट्रवादाला त्यांनी जन्म दिला, पण आपल्या भूमिकेचे सर्वव्यापी रूप त्यांना पाहता आले नाही. दादाभाईंची दुसरी मर्यादा त्यांच्या वयाने निर्माण केली आहे. अखिल भारतीय व्यासपीठ निर्माण झालेले पाहण्याचा त्यांना योग आला तेव्हा त्यांचे साठावे वर्ष उजाडले होते. हे व्यासपीठ क्रमाने लोकप्रिय करीत नेणे, काँग्रेसच्या शब्दाला सरकार दरबारी फारसे वजन नसले तरी भारतीय जनतेत वजन निर्माण करणे ह्यासाठी ते झटत राहिले. संघर्षाच्या दिशेने विचार शक्य व्हावा ह्यासाठी विसाव्या शतकाचा आरंभ पाहावा लागला, तेव्हा ते ७५ वर्षांचे झाले होते. जनतेच्या प्रश्‍नांना घेऊन जे संघटन व संघर्ष असा कार्यक्रम ठेवतात, त्यांचा जसा विकास होतो तसा दादाभाईंचा झाला नाही. त्यांना विचार देऊन थांबावे लागले.

सदर लेखन प्रकाशित करण्यासाठी अनुमती दिल्याबद्दल श्री. विश्वास कुरुंदकर आणि देशमुख आणि कंपनी ह्यांचे आभार

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

विवेचन अतिशय आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0