एथिकल टुरिझम

इटालियन भाषेच्या क्लासला सुट्टी लागली, तेव्हा मह्या आणि मी वीकेंडला साईड बिझिनेस करायचं ठरवलं. बिझिनेस काय तर टूरिझम. भेंजो प्रत्येकालाच कुठेतरी जाऊन फोटो काढून इन्स्टावर टाकायला आवडतं.

डहाणूजवळच्या एका गावात मह्याच्या ओळखी होत्या. तिकडे जाऊन आम्ही सेटिंग लावून आलो. प्लॅन असा की शनिवारी सकाळी बसनी निघायचं, गावात जाऊन चिकन हाणायचं, दुपारी झोप काढायची, संध्याकाळी जरा शेतात भटकायचं, मग दारूशारू करून जेवून झोपायचं. सकाळी उठून नीरा प्यायची, नाश्ता करून परत शेतात फिरायचं, मग जेवून बसनी परत यायचं. फुल्ल चिल मारायचा प्लॅन भेंजो.

तर मह्याने अजून आयडिया काढली. एथनिक टूरिझम करायची. म्हणजे त्या गावातल्या घरावर थोडी वारली पेंटिंग काढायची, रात्री जेवणापूर्वी कॅम्पफायर आणि फोकडान्स, आणि बियरऐवजी मोहाची दारू. आता पालघर जिल्ह्यात मोहाची दारू कुठून येणार भेंजो, पण एथनिक टूरिझम तर एथनिक टूरिझम.

तर मह्या एथनिक सेटिंग लावायला तिथे गेला, आणि मी पॅम्प्लेट छापून घ्यायच्या मागे लागलो. पेपरात टाकून फुल अॅडकॅम्पेन भेंजो. प्रिंटरकडे गेलो आणि त्याला मॅटर लिहून देत होतो तेवढ्यात आमच्या ऑफिसातल्या नेहाचा फोन आला काहीतरी एचारचं विचारायला. फोनवर माफक गूळ पाडत होतो तर प्रिंटर प्रूफ घेऊन मधेमधे यायला लागला. आता नेहा समोरून फोन करते म्हणजे अलभ्य लाभ; मग मॅटर न बघता प्रिंटरला ओके सांगितला.

तिसऱ्या दिवशी रविवार होता. मह्याच्या घरी गेलो. त्याची आई पोहे मस्त करते. हाॅलमधे त्याचे बाबा आणि त्यांचे मित्र पत्रकार देसाई पोहे चापत होते. मला बघून हातातलं पॅम्प्लेट नाचवत देसाईकाका म्हणाले, "काय रे, हे टूरिझमचं काय नवीन? आणि एथिकल टुरिझम म्हणजे काय?"

मी पॅम्प्लेट जवळजवळ ओढून घेतलं. इंग्लिशमध्येच होतं, आणि मजकूर होता "एथिकल टुरिझम: एक्स्पिरिअन्स द जाॅईज ऑफ एथिकल टुरिझम. काॅन्टॅक्ट अमुक अमुक". भेंजो माझी फुल तंतरली. प्रिंटरनी मोठा लोचा केला होता.

मह्या शांतपणे बोलू लागला, "त्याचं काय ना काका, पर्यावरणाशी जवळीक साधली पाहिजे. लोकल प्रोड्यूस वापरलं पाहिजे. हे करणारं टुरिझम म्हणजे एथिकल टुरिझम."

देसाईकाका जाम खूष झाले. त्यांनी दुसऱ्या दिवशी पेपरात छोटं आर्टिकलपण छापून आणलं भेंजो, अगदी माझ्या आणि मह्याच्या फोटोसकट. फटाफट टूरची बुकिंग आली आणि फक्त पाच दिवस शिल्लक होते.

मग आम्ही दोघांनीही सीएल टाकल्या आणि खपून सगळी सेटिंग बदलली.

शनिवार आला. बुकिंग केलेले वीसजण पिकप पाॅईंटला आले. भाड्याने घेतलेल्या सायकली आम्ही तयार ठेवल्या होत्या. "पर्यावरण वाचवायचं तर सुरूवात स्वतःपासून केली पाहिजे," मह्या म्हणाला. सगळे सायकलींवर बसलो आणि रेल्वे स्टेशनला गेलो. काही अंकल धापा टाकत होते पण कोणी कंप्लेन नाय केली.

सायकली स्टॅन्डावर लावल्या आणि मग ट्रेनमधून डहाणूला गेलो. तिथे परत सायकलींची अरेंजमेंट केली होती. आधी बैलगाडीचा विचार केला होता पण भेंजो बैलाला ते एथिकल वाटलं नसतं. तर अर्धा तास सायकल चालवून गावात पोचलो.

तिकडे वांगी, टाॅमेटो वगैरे लोकल प्रोड्यूसच्या भाज्या आणि लोकल पिठाच्या भाकऱ्या खाल्ल्या. मग जरा झोप काढून नंतर शेतात जाऊन श्रमदान केलं. म्हणजे मी आणि मह्या सोडून, कारण आम्ही मुकादमगिरी करत होतो आणि लोकांचे निढळाच्या घामाचे वगैरे फोटो काढत होतो. पब्लिक जाम खूष होतं. मग रात्री बक्षीस म्हणून सगळ्यांना लोकल नदीतल्या माशांचं कालवण आणि भात दिला. शाकाहाऱ्यांना वांग्याचा रस्सा आणि भात. मग सगळे दमून झोपले तेव्हा मी आणि मह्या बाईकवरून स्टेशनला गेलो आणि चिकन मांचुरियन खाऊन आलो.

दुसऱ्या दिवशी नाश्त्याला भाताची पेज दिली. भाभी आणि आंटी लोक "अय्या कित्ती एथनिक" वगैरे म्हणत होत्या. "आणि गावातलाच तांदूळ, म्हणजे एथिकलसुद्धा" मह्या म्हणाला.

मग गावात चक्कर मारून पब्लिकला विहीर, तिच्यावरचा रहाट, गुरांचे गोठे वगैरे दाखवलं. मग सगळ्यांना सायकलींवर चढवलं आणि डहाणू स्टेशनला आणून ट्रेनमध्ये बसवलं.

मह्या आणि मी डहाणूलाच थांबलो आणि सगळ्यांना त्यांचेत्यांचे एथिकल टुरिझमचे फोटो व्हाॅटसॅप केले. मग एकेक बियर मारली आणि मग बाईकनी घरी गेलो.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

खरंच केलंत? का निव्वळ कथा? प्लान तर मला पण आवडला.
मग नेहाला पार्टी दिलीत काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी पॅम्प्लेट जवळजवळ ओढून घेतलं. इंग्लिशमध्येच होतं, आणि मजकूर होता "एथिकल टुरिझम: एक्स्पिरिअन्स द जाॅईज ऑफ एथिकल टुरिझम. काॅन्टॅक्ट अमुक अमुक". भेंजो माझी फुल तंतरली. प्रिंटरनी मोठा लोचा केला होता.

हे प्रिंटरलोक नेहमी असाच गोंधळ करतात.

पूर्वी पुण्यात लक्ष्मीरोडवर 'जनसेवा दुग्धमंदिर' नावाचे एक आत्यंतिक मराठमोळे, रादर भटुरडे असे उपाहारगृह-कम-दुकान होते. (गेऽले बिचारे! ईमृशांदे.) दूध तथा दुधाचे पदार्थ, मिठाया, चकल्याचिवडे, 'पियूष', खरवस, माफक कोल्ड्रिंके वगैरे विकत. नंतरनंतर साबूदाण्याची खिचडी तथा सांजासुद्धा विकायला सुरुवात केली होती, असे कळते. पदार्थांची क्वालिटी चांगली होती, परंतु रेंज तितकीच. (चहा विकत नसत. आणि, इडली-डोसा-संकीर्णसौथिण्डियन वगैरे विकण्याच्या निव्वळ कल्पनेनेसुद्धा बहुधा चालकमालकांचा धर्म भ्रष्ट होत असावा. असूद्या बिचारा.)

तर एकदा मंडळींनी नवीन मेनूकार्डे छापवून घेतली. त्यात कोल्ड्रिंकांच्या यादीत 'रिमझिम मसाला डोसा' अशी एक एंट्री निघाली. मग त्या 'डोशा'वर बॉलपेनाने काट मारून त्याशेजारी बॉलपेनानेच हाताने 'सोडा' असे लिहिलेली मेनूकार्डे त्यानंतर कित्येक दिवस तेथील टेबलांना विशोभित करीत असत.

पु.लं.च्या 'नारायणा'त लग्नाच्या पत्रिकेखाली 'तिकीट विक्री चालू आहे.' असा मजकूर आढळल्याचा एक किस्सा आहे. तो निव्वळ कपोलकल्पित असावा, अशी कित्येक दिवस माझी जवळजवळ खात्री होती. परंतु हे पाहिल्यावर तो किस्साही अगदीच अशक्य कोटीतला नसावा, असे हल्ली वाटू लागले आहे. चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मह्यानं काही गोंगाट केला नाही? का डब्बल पैसे लावले, एथिकल म्हणून?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहाहा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झक्कास!

- (एथिकल) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0