IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ७)

(भाग ६)

(ह्या भागातले दोन्ही चित्रपट स्त्रियांनी दिग्दर्शित केलेले आहेत आणि त्यांच्या केंद्रस्थानी स्त्री व्यक्तिरेखा आहेत.)

सन-मदर

Son-Mother (2019)

ही एक ओळखीची गोष्ट. एकेकाळी आपल्याकडे ‘आर्ट फिल्म’ला 'गरिबी दाखवणारा सिनेमा', म्हणून हिणवलं जायचं. ते खरं तर चोराच्या उलट्या बोंबा होत्या. कारण धंद्यासाठी काढलेला सिनेमा भपकेबाज असायचा. मुख्य पात्रं गरीब असोत की श्रीमंत, पडद्यावरचे रंग, नाचगाणी, कपडे आणि अगदी पार्श्वभूमीवरचं शहर वा गावसुद्धा कसं चकाचक, ‘श्रीमंत’ असायचं. आता बदलतंय हळूहळू.

तर, तेव्हा तेव्हाच्या त्या वेगळ्या वाटेवरच्या सिनेमात सापडणारी ही एक ‘ओळखीची गोष्ट’. गरीब लोकांच्या जीवनातले प्रश्न रंगवणारी. लोक गरीब असतात, त्यांच्या जगण्यात समस्या येतात आणि त्यांना मेटाकुटीला आणतात पण त्या समस्यांच्या मागे कुणी खलनायक नसतो. सगळ्या दु:खाचं टेपर एकावर (आणि त्याच्या सोबत्यांवर) ठेवून त्याचं शेवटी निर्दाळण केलं की कहाणी सुफळ संपूर्ण, ही पळवाट नसते. त्यामुळे हा सिनेमा बर्‍याचदा सुखान्त-दु:खान्त अशा रकान्यात सुलभपणे घालता येत नाही.

एक विधवा आई. तिला वाढत्या वयातला मुलगा. आणि एक लहान मुलगी. कारखान्यात नोकरीला. पैशांची, नोकरीत वेळ पाळण्याची, दोन मुलांचं खाणंपिणं-शाळा सांभाळण्याची सदा ओढाताण. त्यात पुरुषाविना रहाण्याचा ताण वेगळाच.भवसागरात गटांगळ्या खात असताना नाक पाण्यावर ठेवणं जेमतेम जमत असताना तिला कारखान्यात नेणार्‍या बसचा ड्रायव्हर तिला प्रपोज करतो. पण त्याला एक तरुण मुलगी आणि तिथल्या पद्धतीनुसार ती घरात असेपर्यंत तारुण्याच्या उंबरठ्यावरच्या मुलग्याला तो मुलीबरोबर एका घरात ठेवू शकत नाही. असा तिढा. ‘मुलाला सोड,’ असं तो म्हणत नाही. त्याची कुठेतरी तात्पुरती सोय लावावी, मुलीचं लग्न करून दिलं की मी आणतोच त्याला घरी, असं त्याचं म्हणणं. स्वत:च्या सुखासाठी मुलाला अडचणीत टाकण्याचा विचार बाई करू शकत नाही.

पण स्थिती बिघडत जाते आणि तिला लग्न करण्यावाचून पर्याय उरत नाही. एका वयस्क शेजारणीच्या मदतीने मुलाची रवानगी ती बेकायदेशीरपणे एका मूकबधीर मुलांच्या निवासी शाळेत करते. मुळात अबोल असलेला मुलगा तिथे कुढू लागतो. अजिबात जुळवून घेत नाही. आणि तिथल्या एका सोबत्याच्या मदतीने पळून जाण्याचा प्रयत्न करतो.

बाई गरीब, कष्टकरी वर्गातली आणि चेहरा सोडून बाकी बुरख्यात झाकलेली, अशी असूनही आकर्षक दिसते. तिची ‘सर्वसामान्य आकर्षकता’ मान्य होते, म्हणून कथेला विश्वासार्हता मिळते. तिची तरातरा चाल आणि सदा घाईत असल्यासारखं वर्तन तिच्या आर्थिक, सांस्कृतिक स्थितीशी सुसंगत वाटतं. एक प्रसंग संपल्यावर तिथले संवाद ऐकू येत रहाण्याने, तर कधी पुढच्या दृश्यातले संवाद अगोदर ऐकू येऊ लागल्याने कथानकाला वेग येतो. गोष्ट घडत असताना शहरातल्या अखंड ट्रॅफिकमुळे गोष्टीला 'न थांबलेल्या बाह्य जगा'ची चौकट मिळते. ती रहाते त्या वस्तीच्या सुनसानपणातून त्यांच्या साचलेल्या जगण्याचीही कल्पना येते. कॅमेरा वेळोवेळी पात्रांच्या चेहर्‍याच्या जवळ जातो आणि गोष्ट मुख्यत: भावनांची आहे, हे सांगत रहातो.

ड्रायव्हरच्या दाढीचे खुंट पिकलेले. तो ड्रायव्हिंग करतो आणि ड्रायव्हर दिसतो. तिच्याशी जराही लघळपणा करताना दिसत नाही. तरीही त्याच्यामुळे तिला लोकांचे बोल सहन करावे लागतात. तो कधीही तिच्याशी लगट करत नाही किंवा दुसरा कुठला पुरुष तिच्यावर हात टाकू बघत नाही. ही इराणी संस्कृती भारतापेक्षा वेगळी असावी. इराणी मुसलमानांच्यात बाईला किमान शारीरिक सुरक्षिततेची ग्वाही मिळत असावी. पण तेवढं पुरेसं नसतं. पुरुषांच्या तुलनेत बाईला संस्कृतीने करकचून बांधूनच घातलेलं असतं, याची जाणीवही होत रहाते.

वरवर विनोदी वाटणार्‍या ‘मुसलमानांना साप कमी चावतात,’ या विधानाचा ‘कारण मुसलमान सहसा जमिनीवर न झोपता खाटेवर झोपतात आणि जमिनीवर सरपटत जाणारा साप मुद्दाम खाटेवर चढून जात नाही,’ हा वैज्ञानिक खुलासा माहीत असल्यामुळे ती बाई आणि तिची मुलं खाली झोपताना दिसली, हे खटकलं. हे गरिबीचं लक्षण म्हणावं, तर खाली झोपण्यातल्या वेगळेपणाकडे जराही लक्ष वेधलेलं आढळलं नाही. मग जमिनीवर न झोपणे, हे लक्षण भारतीय मुसलमानांचं आहे का?

---***---

अ‍ॅट फाइव्ह इन द आफ्टरनून

At Five in the Afternoon (2003)

गोष्ट ओळखीची असली तरी ती कशी सांगितली, याला महत्त्व असतं. सांगण्याच्या रीतीतून गोष्टीतले कंगोरे ठळक होतात, डोळ्यांत भरतात.
अफगाणिस्तान! मोसेन मखमलबाफची मुलगी समीरा (जी स्वत:ही नामवंत दिग्दर्शक आहेच), हिचं नाव दिग्दर्शक म्हणून नसतं तरी अफगाणिस्तानातलं काहीतरी बघायला मिळणार, या कौतुकापोटी मी हा चित्रपट बघण्याचा प्रयत्न केलाच असता. वेळ सत्कारणी लागला.

अमेरिकेच्या हल्ल्यानंतरचं अफगाणिस्तान. उद्ध्वस्त इमारती. घरदार गमावलेले लोक. आदिम स्थितीला पोचलेली आर्थिक, सामाजिक व्यवस्था. आणि त्यात मुलगी, सून आणि नातू यांना घेऊन एक वयस्क पुरुष आसरा शोधतो आहे; बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध घेतो आहे. हा परिस्थितीशरण. आसपासच्या सर्व लोकांप्रमाणे धार्मिक. बिनबुरख्याची बाई नजरेच्या टप्प्यात आली की भिंतीकडे तोंड करणारा. ‘सगळीकडे नुसता अधर्म माजला आहे, बायकांनी तर लाजच सोडली आहे,’ अशी उदास कुरकुर स्वत:कडे करणारा. परमेश्वराशी संभाषण करून त्याला सवाल करणारा.

त्याला काय त्याच्याबरोबरच्या दोन बायकांना काय; कष्ट टाळणे अशक्य. कोणाचीच नशिबाविषयी जोराची तक्रार नाही. तशात मुलगी चोरून शिकू बघते. बापाची नजर चुकवून ‘शाळे’त निघाली की नेहमीच्या काळ्या चपला टाकून पांढर्‍या उंच टाचेच्या चपला घालणे, ही तिची बंडखोरी. ‘पाकिस्तानमध्ये नाही का बेनजीर भुत्तो झाली, मग मी का नाही होणार या देशाची प्रेसिडेंट!’ असा आशावाद, अशी आकांक्षा बाळगणारी. त्यासाठी त्यासाठी रात्री उठून गुरांसमोर भाषण पाठ करणारी. आणि त्याबरोबर एकटीच छापापाणी खेळणारी! काय तिचा बोलका चेहरा! काय तिच्या डोळ्यातला निरागस आत्मविश्वास! अनोळखी सोजिराशी खुशाल इंग्रजीत संभाषण सुरू करते. तू कुठला? तुमच्या देशाचा प्रेसिडेंट कोण? तू त्याला का मत दिलंस? तू नाही तरी इतरांनी का दिलं? लोक भाषण ऐकून मत देतात का? त्याच्यासारखं भाषण करता यायला काय करावं लागेल? अशा तिच्या चौकशा. स्वतःचं इंग्रजी अपुरं पडायला लागल्यावर दुभाष्याची मदत घेत केलेल्या. पण सोजिरापासून बऱ्यापैकी अंतर राखूनही केलेल्या.

कॅमेरा लांब जातो आणि लोकांच्या आवाजाचा नुसता कोलाहल ऐकू येत रहातो. सावकाश हलणारे लोक. उघड्या वाळवंटाची पार्श्वभूमी. तंबू, उंट, गाढवं, घोडे. पण यंत्रवाहन नाही. इमारतीत ठिबकणार्‍या पाण्याचा आवाज येतो पण पाणी दिसत नाही. भविष्याकडून आशा ठेवण्याचं एक कारण दिसत नाही; पण आशा सुटत नाही. एक थकलेला इसम भेटतो. ‘मी कंदाहारला चाललोय. ओसामा बिन लादेन आणि मुल्ला उमर यांना त्या पाखंडी अमेरिकनांच्या ताब्यात देऊ नये, असं सांगायला.’ त्याचा आवाज कमकुवत. त्याच्यापाशी मरायला टेकलेलं गाढव.

या चित्रपटाला थोर म्हणावं का, किती थोर म्हणावं, मला सांगता येणार नाही. पण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जे सांगायचंय ते कसं सांगितलंय, या मुद्द्यावर मला हा चित्रपट मोठा वाटतो. कथेपेक्षा पटकथा मोठी, याचं उत्तम उदाहरण वाटतो. अफगणिस्तानची वाताहत ही बातमी नाही. तिथल्या सामान्य लोकांना सुखवस्तू जगण्याचा हक्क नाही, हीसुद्धा नाही. पण ‘लोक’ या घोळक्यातून एक व्यक्‍ती बाहेर काढून जेव्हा तिची कहाणी संवेदनशीलपणे समोर येते, तेव्हा ट्रॅजेडीची खरी मिती कळते.

(चित्रपटाला २००३ साली कान महोत्सवात ज्यूरी पुरस्कार आणि IFFI मध्ये सुवर्ण मयूर मिळाला होता. ह्या वर्षी IFFIची पन्नासावी आवृत्ती असल्यामुळे पूर्वीच्या पुरस्कार विजेत्यांचा खास विभाग महोत्सवात होता. त्यात हा दाखवला गेला.)

(भाग ८)

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet