कोरोना लस (भाग २) - जनुकीय लस

(भाग १)

कोरोनाची महासाथ आटोक्यात आणण्यासाठी विविध लशी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्या निमित्ताने लशींचे प्रकार आणि संशोधनाच्या विविध टप्प्यांवर असलेल्या लशींचा थोडक्यात परिचय करून देणारी ही लेखमाला आहे. या भागात आपण जनुकीय लशींविषयी माहिती घेऊ.

जनुकीय लस (Genetic Vaccines)
या प्रकारातील लशी कोरोना विषाणूची एक किंवा एकाहून अधिक जनुके लशीद्वारे पोचवून आपल्या शरीरात त्याच्या विरोधी प्रतिकारशक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
फेज ३ मधील जनुकीय लशी

१. Moderna

Moderna

३० नोव्हेंबरला बोस्टनस्थित Moderna या कंपनीने (प्राथमिक चाचण्या सुरू केल्यापासून एक वर्षाच्या आतच) अमेरिकन नियामक संस्था FDAकडे जनुकीय लशीकरता आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली. अशी परवानगी मागणारी ही दुसरी कंपनी आहे. याच्या दोन आठवडे आधी फायझर आणि बायोएन्टेक (संयुक्त) या कंपन्यांनी अशीच आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. Modernaला ही परवानगी मिळाली तर २१ डिसेंबरपासून याचे लसीकरण सुरू होऊ शकते.
फायझर बायोएन्टेकप्रमाणेच ही लसही mRNA (मेसेंजर RNA) या जनुकीय रेणूपासून बनविली आहे. या कंपनीने गेल्या काही वर्षांमध्ये mRNA वापरून इतर काही रोगांविरुद्ध लशींच्या चाचण्या केल्या आहेत. अर्थात यातील कुठल्याही लशी अजून बाजारात आलेल्या नाहीत.
२०२०च्या जानेवारी महिन्यातच या कंपनीने लसनिर्मितीचे प्रयत्न चालू केले. या लशीमधे कोरोनाविषाणूच्या स्पाईक प्रोटीनची निर्मिती करण्याची सूचना साठवलेली असते. जेव्हा ही लस आपल्या शरीरातील पेशींमध्ये येते तेव्हा त्या पेशी या स्पाईक प्रोटीनची निर्मिती करतात. स्पाईक प्रोटीन हा आपल्या शरीराचा भाग नाही, हा घुसखोर आहे हे आपल्या शरीराची प्रतिकारव्यवस्था ओळखते व त्याच्या विरुद्ध अँटीबॉडी निर्मिती चालू करते.

अमेरिकी सरकारने या कंपनीला ही लस तंत्रज्ञान व निर्मिती करण्यासाठी १ अब्ज डॉलर्सची मदत केलेली आहे. 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ'बरोबर भागीदारीत हा कार्यक्रम चालू आहे. या प्रयत्नांमध्ये सुरुवातीच्या प्रयोगांमध्ये ही लस माकडांना कोरोना विषाणूपासून वाचवते असे लक्षात आले. मार्च महिन्यात ही प्रथम माणसांमध्ये टोचण्यात आली. यात यश येत आहे ही माहिती पुढे आल्यावर पुढील फेज ३ चाचण्या ३०,००० स्वयंसेवकांमध्ये २७ जुलै रोजी चालू करण्यात आल्या.

या सर्व चाचण्यांची प्राथमिक माहिती (डेटा) १६ नोव्हेंबर रोजी व अंतिम माहिती (डेटा) ३० नोव्हेंबरला जाहीर करण्यात आला.
या फेज ३ मध्ये लसीकरण केलेल्या स्वयंसेवकांपैकी १९६ स्वयंसेवक कोविडबाधित झाले. यातील १८५ स्वयंसेवक हे प्लसिबो (लशीच्याऐवजी दुसरे काही, म्हणजे बहुधा सलाईनसारखे काहीतरी) दिले गेलेले होते. प्रत्यक्ष लस दिलेले फक्त ११ स्वयंसेवक कोविडबाधित झाले, परंतु या ११ बाधित व्यक्तींपैकी कुणालाही गंभीर आजार झाला नाही. (यावरून) संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की या लशीची परिणामकारकता ९४.१ आहे. हे अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहे. ही परिणामकारकता किती काळ टिकणार हे अजून स्पष्ट नाही. परंतु Modernaच्या अभ्यासानुसार स्वयंसेवकांची तीन महिन्यांनंतरही या विषाणूच्या विरोधी प्रतिकारशक्ती अतिशय उत्तम टिकली आहे. Modernaने २ डिसेंबरला १२ ते १८ वयोगटातील मुलांवर चाचणी करण्यासाठी परवानगीचा अर्ज केला आहे.

व्यावसायिक आघाडीवर जुलै महिन्यात Moderna या लस तंत्रज्ञानाचा पेटंट खटला हरली. यामुळे या कंपनीने ऑगस्ट महिन्यात असे जाहीर केले की हे तंत्रज्ञान शोधणारे व वापरणारे (कोरोना विषाणूविरोधी लशीचे पण) ते पहिलेच आहेत असा दावा ते करू शकतील किंवा कसे हे नक्की सध्या सांगता येणार नाही. कंपनीने लशीला मान्यता मिळाली तर या अटीवर अनेक देशांबरोबर करार केले आहेत. ११ ऑगस्ट रोजी अमेरिकी सरकारने या कंपनीला लस सुरक्षित व परिणामकारक आहे असे सिद्ध झाले तर लशीच्या १० कोटी डोसेसकरता अजून (आधीच्या १ अब्ज डॉलर्सच्या वर) दीड अब्ज डॉलर्स देऊ केले आहेत. २५ नोव्हेंबरला युरोपियन युनियनबरोबर या कंपनीने लशीचे १६ कोटी डोस देण्याचा करार केला आहे. अशाच प्रकारचे करार कंपनीने कॅनडा, जपान व कतार या देशांबरोबरही केले आहेत.

२. फायझर, बायो एन्टेक व FOSUN PHARMA
९ नोव्हेंबरला न्यूयॉर्कस्थित फायझर व जर्मन कंपनी बायोएन्टेक यांनी आपल्या प्राथमिक डेटाच्या आधारावर त्यांची लस ही ९० टक्के परिणामकारक आहे अशी ऐतिहासिक घोषणा केली. कोरोना विषाणूंवर परिणामकारक लस परिप्रेक्ष्यात ही घोषणा अभूतपूर्व होती. यानंतर एका आठवड्यातच Moderna कंपनीनेही अशाच स्वरूपाची घोषणा केली.

या वर्षीच्या मे महिन्यात फायझर आणि बायोएन्टेक कंपन्यांनी त्यांच्या mRNA लशीच्या दोन प्रकारांच्या फेज १ आणि २ चाचण्या सुरू केल्या. त्यांना या दोन्ही mRNA लशीमुळे स्वयंसेवकांमधे SARS-CoV-२ विरोधी अँटीबॉडीजच सापडल्या एवढेच नव्हे, तर T-सेल्सचा सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे असेही लक्षात आले. त्यांच्या दोन लशींपैकी BNT १६२b २या लशीमुळे इतर परिणाम म्हणजे थकवा व ताप येणे हे खूप कमी आहे असे आढळल्यामुळे त्यांनी याच लशीच्या फ़ेज २आणि ३ चाचण्या चालू केल्या. २७ जुलैला या दोन्ही कंपन्यांनी USA, अर्जेंटिना, ब्राझील, जर्मनी या देशांमध्ये मिळून सुमारे ३०,००० स्वयंसेवकांवर फ़ेज २आणि ३ चाचण्या सुरू केल्याची घोषणा केली. चालू केल्यानंतर त्यांनी अंतरिम माहिती अशी दिली की लशीचा पहिला डोस दिल्यानंतर स्वयंसेवकांमध्ये किरकोळ ते मध्यम स्वरूपाचे साईड इफेक्ट्स दिसून येत आहेत. १२ सप्टेंबरला या दोन्ही कंपन्यांनी सांगितले की USAमध्ये ते चाचण्या ४३,००० स्वयंसेवकांपर्यंत वाढवत आहेत. त्या पुढच्या महिन्यातच त्यांनी १२ वर्षाखालील मुलांवरही चाचण्या करण्याची परवानगी मिळवली. अशी अमेरिकेत परवानगी मिळवणारी ती पहिली कंपनी ठरली.
सप्टेंबरमध्ये फायझरचे चीफ एक्झिक्युटिव्ह Dr. Albert Bourla यांनी सांगितले की कदाचित त्यांच्या लशीच्या फेज ३ चाचणीचे निष्कर्ष ऑक्टोबरमधेही येऊ शकतात. यामुळे लस उपयुक्त आहे किंवा नाही हे ऑक्टोबरमध्येही सांगता येऊ शकते. याचा आधार घेऊन राष्ट्रपती ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान "निवडणुकीपूर्वी लस उपलब्ध होणार" असे संकेत देणारी वक्तव्ये चालू केली. परंतु २७ ऑक्टोबरला Dr. Albert Bourla यांनी जाहीर केले की चाचणीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांमधील पुरेसे स्वयंसेवक अजून कोरोना इन्फेक्शनला सामोरे गेलेले नाहीत (किंवा पुरेसे स्वयंसेवक कोरोनाबाधित झालेले नाहीत), त्यामुळे लशीची परिणामकारकता इतक्या लवकर सांगता येईल असे नाही. अखेर ८ नोव्हेंबरला त्यांनी स्वयंसेवकांमध्ये आढळलेल्या १६४ कोरोना इन्फेक्शन्सच्या आधारावर अंतिम निष्कर्षांची घोषणा केली. लस ९५ टक्के परिणामकारक आहे असा तो निष्कर्ष होता. ६५ वर्षांच्या वरच्या वयोगटात (ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत झालेली असते) लशीची परिणामकारकता ९४ टक्के आहे असाही निष्कर्ष जाहीर करण्यात आला. या व्यतिरिक्त लसीकरणानंतर कुठलेही गंभीर दुष्परिणाम, साईड इफेक्ट्स नाहीत असाही निष्कर्ष जाहीर झाला.

२ डिसेंबरला युनायटेड किंगडमने फायझर-बायोएन्टेक लशीला इमर्जन्सी लसीकरणाकरिता तात्पुरती मान्यता दिली. प्रगत पाश्चिमात्य जगतात ही दिली गेलेली पहिली परवानगी. ८ डिसेंबरला यु.के.मधे हे लसीकरण चालू झाले व मार्गारेट किनन या नव्वद वर्षांच्या आजी लस घेणाऱ्या जगातील पहिल्या व्यक्ती ठरल्या. (पहिल्या काही व्यक्तींमध्ये विल्यम शेक्सपिअर हेही नाव आहे.) २० नोव्हेंबरला फायझरने USFDAकडे इमर्जन्सी वापराकरिता अर्ज केला आहे. या अर्जावर १० डिसेंबरला ऐतिहासिक सात-आठ तास चर्चा होऊन आता फायझरला इमर्जन्सी वापराकरिता परवानगी मिळू शकेल असे संकेत मिळाले आहेत. फायझरने ७ डिसेंबरला भारत सरकारकडे इमर्जन्सी वापराकरिता मान्यतेकरिता अर्ज केला आहे. भारत सरकारच्या subject matter expert समितीने फायझरकडे अजून तांत्रिक माहिती मागितली आहे.

गेल्या उन्हाळयात या दोन्ही कंपन्यांनी विविध देशांच्या सरकारांबरोबर लशीचा पुरवठा करण्याबद्दल करार करण्यास सुरुवात केली. ट्रम्प सरकारने जुलै महिन्यात या कंपनीबरोबर १० कोटी डोसेस डिसेंबर महिन्यात आणि गरज पडल्यास भावी काळात अजून ५० कोटी पुरवण्यासंबंधी १.९ अब्ज डॉलर्सचा करार केला. जपान सरकारने १२ कोटी डोसचा करार केला तर युरोपियन युनियनने २० कोटी डोसेसची मागणी केली आहे. या लशीला अंतिम मान्यता मिळाल्यास या दोन्ही कंपन्या मिळून २०२१च्या अखेरीपर्यंत संपूर्ण जगासाठी १.३ अब्ज डोसेस निर्मितीची तयारी करत आहेत.

अर्थात ही लस प्रयोगशाळेतून लसीकरणासाठी लोकांपर्यंत पोचविण्यात एक मोठी अडचण/आव्हान आहे. Moderna प्रमाणेच ही लस mRNA लस आहे. mRNA हे नीट राहण्यासाठी लस उणे ७० डिग्री सेंटीग्रेड तापमानाला साठवावी लागते. तपमान याहून वाढल्यास mRNA खराब होऊ शकतात.

फायझर कंपनीने आत्तापासूनच या तापमानाला साठवण करण्यासाठी विशेष खोकी (बॉक्सेस) ची निर्मिती चालू केली आहे. इतर लशींप्रमाणेच ही लसही बहुधा दोन डोस लागणारी असणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा लस दिल्यानंतर त्याच माणसाला तीन चार आठवड्यांनी पुन्हा दुसरा डोस द्यावा लागेल.

लस मोठ्या प्रमाणावर वितरण करण्यात उणे ७० डिग्री सेल्शियस तापमानाला साठवण कशी मेंटेन करणार हे एक मोठे आव्हान असेल.

फेज २ मधील जनुकीय लशी
१. झायड्स कॅडीला (Zydus Cadila) : जुलै महिन्यामध्ये भारतीय लसनिर्मिती कंपनी झायड्स कॅडीलाने त्यांच्या DNA तंत्रज्ञानावर आधारित लशीची फेज दोन चाचणी सुरू केली. ही लस स्किन पॅच वापरून दिली जाईल. डिसेंबर महिन्यात याची फेज ३ चाचणी चालू होणे अपेक्षित आहे.

२. Cure Vac क्युअर व्हॅक : या जर्मन कंपनीने त्यांचे mRNA लशीचे काम जर्मनीतून USA मध्ये हलवावे याकरिता त्यांच्यावर दबाव टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न ट्रम्प सरकारने करून बघितला. कंपनीने आपले काम जर्मनीमधेच पुढे चालू ठेवले. त्यांना उंदरांवर केलेल्या चाचण्यांमध्ये आश्वासक परिणाम मिळाल्यावर त्यांनी जुलै महिन्यात माणसांमध्ये फेज एक चाचण्या सुरू केल्या. यातही अतिशय आश्वासक निरीक्षणे आल्यावर सप्टेंबर महिन्यात फेज २ चाचण्या सुरू केल्या. कंपनी डिसेंबर महिन्यात फेज ३ चाचण्या सुरू करण्याची शक्यता असून पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत त्यांचा डेटा जगासमोर येण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर महिन्यात या कंपनीने युरोपियन युनियनबरोबर साडेबावीस कोटी डोसेस तयार करण्यासंबंधी वाटाघाटी केल्या. कंपनीने २०२१मधे ३० कोटी डोसेस तयार करण्याचे व २०२२ साली ६० कोटी डोस तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. क्युअर व्हॅक कंपनीने एलोन मस्क यांच्या टेस्लाबरोबर भागीदारी केली असून mRNAच्या मायक्रो फॅक्टरीज तयार करून त्याद्वारे अब्जावधी लशीचे डोस ती तयार करण्याची शक्यता आहे. १२ नोव्हेंबरला कंपनीने जाहीर केले की त्यांची लस ही ४१ डिग्री फॅरनहाईट म्हणजेच ५ डिग्री सेंटीग्रेड तापमानाला साठवणे शक्य आहे. वर म्हटल्याप्रमाणे फायझर, Moderna व इतर mRNA लशी या उणे ७० डिग्रीला साठवाव्या लागतात.

फेज १ फेज २ एकत्रित चाचण्या सुरू असलेल्या जनुकीय लशी

१. इंपिरियल कॉलेज लंडन व मॉर्निंगसाईड व्हेंचर्स
इंपिरियल कॉलेज लंडन येथील संशोधकांनी विकसित केलेली Self amplifying RNA आधारित लस
२. AnGes, ओसाका विद्यापीठ व ताकारा बायो DNA आधारित लस
३. Arcturus Therapeutics and Duke-NUS Medical School : mRNA लस

Invovio फेज २ : DNA लस

फेज १ मधील जनुकीय लशी

GENEXINE या कोरियन कंपनीने जून महिन्यात DNA लशीची सुरक्षितता चाचणी सुरू केली. ते फेज २ चाचण्या आता सुरू करणे अपेक्षित आहे.

चीनमधील मिल्ट्री मेडिकल सायन्सेस अकॅडमी, अबोजेन बायोसायन्सेस आणि वोलव्हॅक्स बायोटेकनॉलॉजी यांनी विकसित केलेली mRNA तंत्रज्ञानावर आधारित लस

थायलंडमधील Chulalongkorn University mRNA नामकरण ChulaCov १९ अ
Entos Pharmaceuticals नावाच्या कॅनेडियन कंपनीने एक DNA लस विकसित केली आहे.
Symvivo सिमव्हीव्हो DNA oral application
Oncosec immunotherapies

न्यूजर्सीस्थित Oncosec या कंपनीने प्रायोगिक तत्वावर कर्करोगाकरता ट्युमरमध्ये (कर्करोगाची गाठ) जनुक पोचवण्याचे तंत्रज्ञान / पद्धत विकसित केली आहे. हे जनुक कर्करोगाच्या गाठीत पोचल्यानंतर नैसर्गिक संकेत देणारा (सिग्नलिंग) IL -१२ नावाचा रेणू तयार करतात, ज्यामुळे शरीराच्या प्रतिकारव्यवस्थेला नक्की कुठे आक्रमण करायचे आहे हे लक्षात येते. ऑन्कोसेक कंपनीने याच तंत्रज्ञानाचा वापर करून कोरोनाविरोधी लस विकसित करण्यास काही महिन्यांपूर्वी सुरुवात केली. या CORVAX १२ नामकरण केलेल्या प्रस्तावित लशीमध्ये विषाणूचे स्पाइक प्रोटीन व IL -१२रेणू या दोन्ही तयार करण्याची माहिती ठेवलेली असते. IL-१२मुळे शरीराच्या प्रतिकारव्यवस्थेने विषाणूच्या स्पाईक प्रोटीनविरोधी अँटीबॉडी तयार करणे अपेक्षित आहे. १३ नोव्हेंबर रोजी या कंपनीने फेज १ सुरक्षितता चाचण्यांसाठी नोंदणी केली. लशीचे नाव CORVax -१२ असे असणार आहे.

प्री क्लिनिकल चाचण्या
प्री क्लिनिकल चाचणी स्टेजला असलेल्या जनुकीय लशी तयार करू इच्छिणाऱ्या इतर कंपन्यांची नावे खालीलप्रमाणे SANOFI , Tranlate Bio, Applied DNA Sciences, EvviVax and Takis Biotech; DIOSynVax; Elixirgen Therapeutics; ETheRNA; HDT Bio; Infectious Disease Research Institute and Amyris; Mediphage Bioceuticals; the OPENCORONA Consortia; Scancell; the Spanish National Center for Biotechnology and the Spanish National Research Council.

(भाग ३)

field_vote: 
0
No votes yet

ह्या लसींबद्दल वाचून झाल्यावर काऊन की मले अंब्रेला कार्पोरेशन आठून ह्रायल. झोंब्या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

प्रत्येक लशीच्या साठवणीची आणि कार्यक्षमता राखून ठेवण्यासाठीची वैज्ञानिक मागणी वेगळी आहे हे लक्षात येतंय.
सरकारला निर्णय घ्यायचा तर मेडिकल एक्सपर्ट टीमच्या हवाल्यावर घ्यायचा आहे. पुढे कायदेशीर बाबी आणि खर्च यांचाही विचार करायचा आहे.
लस निर्माण करणारे त्यांच्याच देशात ( मल्टी न्याशनल कंपन्या असल्यास कोणते देश हा प्रश्न आहेच) वापर सुरू करणार का प्रथम?
उणे ७० अंश तापमान नाही राखलं तर काय? म्हणजे आमच्याकडे गावागावांत विजेची बोंब आहे तर लस तिकडे न्यायची की रुग्णांना शहरांत आणायचं? हे सर्व प्रश्न विकसन होण्याच्या मार्गावरच्या गरीब देशांना सतावणारच.

या भागात सध्याच्या नवीन घटना एकाच ठिकाणी आणल्यामुळे माहिती झाल्या.
धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उणे ७० हे साठवणूकीचे तपमान फक्त फायझरच्या लसीला गरजेचे आहे.
बाकीच्या लसी या नेहमीच्या साध्या फ्रीज मधे साठवू शकतात ,त्यामुळे त्यांच्याबाबतीत फार अडचण नाही.
फायझर च्या लसीचे ब्रिटनमधे लसीकरण सुरू झाले आहे. USA मधेही त्याला मान्यता मिळाली आहे , व लसीकरण आता चालू होईल.
आपल्याकडे अजून मान्यता मिळाली नाहीये.
मिळाली तरीही ही साठवण्याची अडचण राहील फायझरला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उणे ७० हे साठवणूकीचे तपमान फक्त फायझर व moderna च्या लसीला गरजेचे आहे.

मॉडर्नाचं नाव इथे चुकून आलंय का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

होय . चूक दुरुस्त केली आहे . आभार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुणाला आधी लस देणार हे त्या त्या कंपन्यांचे कुठल्या देशांबरोबर करार झाले आहेत त्यावर ठरणार.
आपण उणे ७० ला भिण्याचे कारण नाही कारण आपल्याच देशात सिरम लस मोठ्या प्रमाणात तयार करत आहे . ती नेहमीच्या फ्रिजमधील तापमानाला साठवता येते . ती खूप स्वस्तही आहे . मान्यता आपल्या सरकारची Subject Expert committee कधी देते त्याची वाट बघुयात

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ती सिरम संस्थेची लस म्हणजे अमेरिकेतली ॲस्ट्राझेनेकाची, त्या नावानं ओळखली जाणारी का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

होय. तीच ती. तंत्रज्ञान ऑक्सफर्ड विद्यापीठ, अस्ट्रा झेनेका
भारतातील उत्पादन सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परवाच्या शुक्रवारी (दिनांक २६ फेब्रुवारी २०२१) अमेरिकेत नॅशनल टीव्हीवर बातमी होती की फायझरची लस दोन आठवडे मेडिकल फ्रीजमध्ये टिकू शकते. त्यासाठी उणे ७० अंश सेल्सियसची गरज नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.