IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ५)

(भाग १)

बॉर्डरलाइन ह्या चित्रपटाची लेखिका ॲना आल्फिएरी आहे. दिग्दर्शक ॲना आल्फिएरी आहे. आणि चित्रपटातली प्रमुख भूमिका ॲना आल्फिएरी हिने केली आहे.

एक लेखिका असते. तिचं एका मुलीवर प्रेम बसतं. लेखिका, म्हणजे कलावंत, म्हणजेच आवेग. कॅमेरा दोघींच्या प्रेमाची अभिव्यक्ती ताकदीने पकडतो. प्रचंड शारीरिक प्रेम. विशेषत: ॲनाला मैत्रिणीशी लगट केल्याविना चैनच पडत नाही. घरात, पलंगावर, जमिनीवर, बाहेर बागेत, समुद्रावर, डोंगरात, आणखी कुठे प्रचंड प्रेमाचा आवेगी आविष्कार. पुष्कळ वेळ आणि अनेक वेळा. मात्र या ‘अनेक वेळां’मध्ये मुद्दा शरीर दाखवणे हा नाही, आवेगाचं दर्शन घडवणे, हाच आहे. शरिरं अनावृत होतात, हात अंतर्वस्त्रं उतरवतात (कधी न उतरवताच कुठे कुठे शिरतात, वगैरे); पण कॅमेरा हलत रहातो. संगीत धडकत रहातं. आवेग जाणवत रहातो. चित्रपटात पुरुष जवळपास एकदाही फोकसमध्ये येत नाही!

Borderline (2019) Anna Alfieri

इतका वेळ आणि इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी आवेग पाहिल्यावर वाटू लागतं, या ऑब्सेशनमधून कथा पुढे सरकणार आहे. ती तशीच सरकते; पण अपेक्षेपेक्षा वेगळ्या तऱ्हेने. काही वर्षांपूर्वी ‘ब्लू इज द वॉर्मेस्ट कलर’ हा चित्रपट इफ्फीतच पाहिला होता. त्यातही लेस्बियन सेक्सची मुबलक दृश्यं होती (इतकी की त्यासाठी गर्दी व्हायची). त्या दृश्यांमध्ये घाई नव्हती. आवेग कमी होता. दुथडी भरून वाहणारं प्रेम होतं. प्रेमाची भूक होती आणि त्या प्रेमक्षुधेची तृप्तता होती. त्यामुळे पुढे दुरावा झाल्यावर एकीची होणारी तडफड प्रेक्षकाच्याही जिव्हारी लागली. इथे तसं काही नव्हतं. पुष्कळ वेळ (आणि वेळा) प्रेम भोगून झाल्यावर ॲना तिला सांगू लागते की ‘मी तुला मला हवं तसं प्रेम देऊ शकणार नाही. माझी जशी इच्छा आहे, तशी सुखी तुला करू शकणार नाही. आणि याचा मला त्रास होत राहील. आपण दूर व्हावं.’

मग ॲनाला असाही साक्षात्कार होतो की या जगात प्रेमामधून स्वत:च्या जगण्याचं साफल्य शोधणं चूक आहे. स्वत:च्या जगण्याचं साफल्य स्वत:च्याच कृतीमधून मिळू शकतं!

या निष्कर्षाला येईपर्यंत ॲनाला बऱ्यात प्रक्षोभातून जावं लागतं. तशी ती जाते आणि मग तिने लिहिलेली कादंबरी एका प्रकाशन संस्थेकडून स्वीकारली जाते. आणि तिला साफल्य मिळतं!

कल्पना उत्तम आहे. दोन निरीक्षणं. एक, ॲना बायसेक्शुअल आहे. तिच्या लेस्बियन प्रेमप्रकरणामुळे चित्रपटाच्या संदेशाला काहीच पुष्टी मिळत नाही. या दोघी जिथे जिथे शारीरिक लगट करतात तिथे त्यांना कोणी अडवत नाही, कसल्या शिष्टाचाराची त्यांना अडचण होत नाही; उलट जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये जसं नायक-नायिका गाणं म्हणत झाडांभोवती गिरक्या घेऊ लागतात तेव्हा तिथे पूर्ण कर्फ्यू लागलेला जाणवतो, तसंच इथेही होतं. आसमंतात कोणी नसतं. यातून ‘प्रेम करत असताना या दोघींसाठी एक दुसरी सोडून बाकी जग वजा होतं,’ असाही अर्थ काढता येईल. पण प्रेम, आवेग, सेक्स हे समलिंगी असण्यातून चित्रपटाच्या आशयात भर पडत नाही.

अर्थात, असं म्हणता येईल, की काय बिघडलं समलिंगी संबंध असल्यामुळे? तर, बरोबर आहे. प्रेमातून जीवनसाफल्य मिळत नाही, असं सांगण्यासाठी भिन्नलिंगी प्रेमाऐवजी समलिंगी प्रेम उदाहरणार्थ घेतलं, तरी काहीच बिघडत नाही. मुद्दा गौण आहे.

दुसरं असं की या मुद्याचा पूर्वपक्ष, म्हणजे प्रेम; त्याचं दर्शन भरपूर काळ आणि अवकाश व्यापतं; पण उत्तर पक्ष, म्हणजे ‘केवळ प्रेम पुरेसं नाही,’ हा भाग केवळ शब्दांमधून येतो! त्या शब्दांमध्ये व्यक्त होणारी ॲनाची तडफड आउट ऑफ फोकस बघायला मिळते; पण त्याचं कारण हा चित्रपट आहे, दृक्‌श्राव्य माध्यम आहे, साहित्य नाही; इथे शाब्दिक मांडणी पुरेशी नाही, काहीतरी दाखवायला पाहिजे, याचं दडपण आहे! (कदाचित या दडपणापोटी निवेदनात मागेपुढे उड्या आहेत, रंगांची गडबड आहे, टाइट क्लोजप्स आहेत, वगैरे.) इथे चित्रपट अगदीच फसतो. ॲना प्रेम राखून साफल्य मिळवण्याचा प्रयत्न करते आहे; मैत्रिणीचा सहवास न सोडता हातून कला करू बघते आहे – आणि ते तिला जमत नाही, असं दिसत नाही.

हे बरोबर नाही.

तिसरी गोष्ट अशी, की चित्रपटाची लेखिका, दिग्दर्शक, प्रमुख कलाकार यांना (म्हणजे ॲनाला) तिचं जगणं निर्वाणीच्या महत्त्वाचं वाटतं, तसं प्रेक्षकाला वाटण्याचं कारणसुद्धा नीट जाणवत नाही. थोडक्यात, चित्रपट फारच आत्ममग्न आहे. मी माझं प्रेम, माझं साफल्य, माझी कादंबरी, माझं सेक्स, यात नंतर तथ्य रहात नाही.

ज्या कोणाला (वा कोणीला) ॲनाशी पूर्ण समरस होता येईल, त्याला/तिला हा चित्रपट म्हणजे एक प्रत्ययकारी अनुभवसुद्धा वाटू शकेल.

या चित्रपटात लेस्बियन संबंध दाखवण्याचं कारण काय, या प्रश्नाचा थोडा जास्त पाठपुरावा केला, तर मग हा ‘बाईचा’ चित्रपट आहे, हे सुचतं. यात एकदा ॲनाबरोबर पुरुष आहे; पण त्या वेळी आणखी एक बाईसुद्धा आहे! तेव्हा तिघे ड्रगही घेतात. पण पुरुष समाधान देऊ शकत नाही, बाईची जागा घेऊ शकत नाही, हे अधोरेखित होतं. म्हणजे, प्रेम पुरेसं नाही, याच्या बरोबर ‘पुरुषाचं तर नाहीच नाही; बाईचंसुद्धा नाही’ असा एक कंस जाणवतो!

आय नेव्हर क्राय ही एक सरळपणे सांगितलेली गोष्ट आहे. ती गोष्ट एका सतरा वर्षांच्या मुलीची आहे. पोलंडमधल्या या मुलीचा बाप कमाई शोधत आयर्लंडला गेला आहे. तिथून तो पाठवत असलेल्या पैशांवर घर चालतं आहे. त्यात तो मुलीला गाडी घेता यावी यासाठी पैसे साठवतो आहे. अट एक, ‘तुला ड्रायव्हिंग लायसन्स मिळालं, की लगेच पैसे पाठवतो!’ ती गाडी शिकते आहे.

अशात फोन येतो आणि कळतं की बापाचा मृत्यू झाला. आईला इंग्रजीचा गंध नसतो. नवऱ्याच्या शवावर योग्य ते अंत्यसंस्कार व्हावेत, त्याचं पार्थिव त्याच्या लोकांच्या जवळ मातीत मिळावं,अशी तिला तीव्र इच्छा होते. यासाठी मुलीला एकटीने आयर्लंडला जाऊन बापाची शवपेटी घेऊन येणं भाग असतं. त्यात मुलीचा स्वार्थही असतो: तिच्या गाडीसाठी बापाने साठवलेले पैसे! त्याच पैशातून आईला योग्य अंत्यसंस्कार करायचे असतात!

पुढची सगळी गोष्ट म्हणजे त्या मुलीचा एक प्रकारचा आत्मशोध. आणि त्यातून तिला घडणारा साक्षात्कार.

I never Cry (2020)

पण मागे म्हटल्याप्रमाणे चांगल्या चित्रपटाच्या बाबतीत काय सांगितलंय, यापेक्षा कसं सांगितलंय, याला जास्त वजन असतं. हा चांगला चित्रपट आहे. पोलंडमधली गरिबी पुरुषाला घर सोडून पार दूर देशी जायला लावते, हे दिसतं. विनिमय दरामुळे आयर्लंडमध्ये मजुरी करून मिळणारे पैसे पोलिश माणसासाठी आकर्षक ठरतात. (पण मुलगी जाते तेव्हा सिगारेटची किंमत तिच्या आवाक्याबाहेरची असते!) जास्त पैसे कमावण्यासाठी तो दुसऱ्याच्या नावावरसुद्धा काम करत असतो; पण नेमक्या त्याच कारणामुळे त्याचा मृत्यू जरी काम करताना झालेला अपघात असला, तरी अवैध उपस्थितीतला असल्याने विम्याचा लाभ मिळू शकत नाही. आयर्लंडमध्ये तिला तरुण लोक भेटतात, तेव्हा त्यांच्यात आणि तिच्यात काहीच फरक नसल्याचं तिल्या लक्षात येतं. नोकरीसंबंधी किचकट नियम, शव नेण्याचा अवाढव्य खर्च, गरीब परदेशातून आलेल्या बाईचं होणारं शोषण, झोपायचं कुठे, खायचं काय, नोकरशाहीला तोंड कसं द्यायचं, पैसे कसे पुरवायचे, स्वत:चा जीव बचावायचा आणि पैसेही वाचवायचे, ... अनंत अडचणींना तोंड देत, मिळेल तिथून मदत घेत आणि जमेल तिथे टक्कर देत ही मुलगी ओला तिच्यावर ओढवलेला प्रसंग कशी निभावून नेते, हे बघताना स्वत:चं जग विसरायला होतं. आख्खा चित्रपट भावनाप्रधानतेच्या काठावरून प्रवास करतो. ओलाच्या चेहऱ्यावर अपरिपक्व आक्रमकता दिसत रहाते. चित्रपट कधीही अश्रू ढाळत नाही - चित्रपटाचं नावच मुळी ‘आय नेव्हर क्राय’! पण चित्रपट बघून झाल्यावर मनही भरून गेल्यासारखं होतं. जबाबदारी, मोह, आकांक्षा, कर्तव्य या साऱ्याची वास्तवदर्शी ओढाताण. जग चांगलं की वाईट, परिस्थितीला अन्यायकारक म्हणावं की नशिबाला दोष द्यावा, कोणत्या प्रसंगी स्वार्थ सांभाळावा आणि कुठे दुसऱ्याचा विचार करावा, ... हे सगळे प्रश्न आशयाला धरून आहेत. पण खरं सांगायचं, तर संगीत ऐकणे, कॅमेऱ्याची हालचाल लक्षात ठेवणे, छायाप्रकाशाचा खेळ टिपणे, सीन कुठे, कसे संपतात, सुरू होतात, याकडे लक्ष देणे यातल्या कशाचंही भान चांगला चित्रपट बघताना रहात नाही. ‘येथे दिग्दर्शक दिसतो,’ असं प्रथमदर्शनी जाणवत नाही. त्यासाठी चित्रपट पुन्हा बघावा लागेल!

हा चांगला चित्रपट आहे. यातल्या ओलाचे डोळे कधीही विसरता येणार नाहीत. त्या भूमिकेसाठी Zofia Stafiej (उच्चार करून घ्या!) हिला अभिनयाचं पारितोषिक मिळालं, हे कळल्यावर खूप बरं वाटलं.

मेहरून्निसा या चित्रपटाचा दिग्दर्शक संदीप कुमार हा भारतीय वंशाचा ऑस्ट्रियन पुरुष आहे. चित्रपट लखनऊमध्ये घडतो. यात काहीच सांगण्यासारखं नाही. ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटात अमिताभ बच्चनच्या पत्नीचं, बेगमचं काम करणारी फारुख जफर जशीच्या तशी इथे येते आणि तिथे जे करते, जशी बोलते; त्याचीच आणखी एक आवृत्ती इथे काढते. यातल्या अभिनयाविषयी सांगण्यासारखं काही नाही. कथा, पटकथा सामान्य आहेत. लखनऊ-कानपूर या शहरांना असलेलं ठसठशीत व्यक्तिमत्व कुठे जाणवत नाही. एक सपाट चित्रपट. परदेशात घडताना काहीतरी मिळण्याची शक्यता असते; तीसुद्धा इथे नाही.

मार्टिना साकोवा दिग्दर्शित समर रिबेल्स या चित्रपटाला बायकांच्या चित्रपटात समाविष्ट करावं का?

Summer Rebels (2020) - Martina Sakova

हा चित्रपट ‘सोज्वळ’ आहे. एनिड ब्लायटनच्या कादंबऱ्यांसारखा. एका लहान मुलाचं साहस. जगात कोणीही पापी, दुष्ट नाही; एनिड ब्लायटनच्या काळाच्या आपण पुढे आल्याचा पुरावा म्हणजे ‘जगात स्त्री-पुरुष आकर्षणही नाही,’ इथपर्यंत चित्रपट जात नाही. चित्रपटाच्या दहा-अकरा वर्षांच्या नायकाला एक समवयस्क मुलगी भेटते, तीदेखील त्याला ‘असं असं झालं तर आपण बहीण-भाऊ होणार ना?’ असं विचारते!
चित्रपटाने, म्हणजे दिग्दर्शकाने स्वत:वर घालून घेतलेली ही सोज्वळपणाची मर्यादा मान्य करून चित्रपट पाहिला, तर ठीकच आहे. मुलाच्या वागण्यात वयाला न शोभेसा आगाऊपणा नाही. रंगसंगती प्रसन्न आहे. कथेतले पेचप्रसंग नेमके आहेत आणि त्यांमधून बाहेर पडण्याचे मार्गही तसंच आहेत. कुठेही नैतिक प्रश्न उभा रहात नाही आणि कुणी वयाने मोठा लहानग्यांच्या ‘मोठेपणा’वर आक्रमण करत नाही. मुलाच्या, मुलीच्या वाढदिवसाला आवर्जून बघावा, दाखवावा, असा चित्रपट.

चित्रपट जर्मनीत घडतो. पण समुद्रकिनारा आहे. नदीसुद्धा आहे. वातावरण इतकं साधं, ग्रामीण आहे की पूर्व जर्मनी असल्यागत वाटावं!

शेवटी ‘बायकांच्या सिनेमा’चा सारांश काढायचा तर असंच म्हणावं लागेल की किमान चित्रपटकलेत बायकांचा-पुरुषांचा असा भेद करता येत नाही. वयात येणे, या बाबतीत मुलगा आणि मुलगी यांच्यात निश्चित फरक आहे. तो सांस्कृतिक आहे. त्यामुळे वयात येणाऱ्या मुलीचं मन न्याहाळताना पुरुषाची अडचण वाटून पुरुषाला बेदखल करणं सोयीचं ठरू शकतं. तसंच, लैंगिक शोषण या बाबतीतही बायकांचे प्रश्न वेगळे आहेत. जगभर पुरुषप्रधानता आहे, याचा अर्थ लैंगिक शोषण या विषयाला स्पर्श करताना पुरुषाला दुष्ट, दोषी ठरवण्याकडे कल होऊ शकतो.

पण ‘चांगला’ चित्रपट अशा खाचाखोचांच्या वर उठून एकूण मानवी अस्तित्वावरच भाष्य करतो.

(क्रमशः)

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet