लशीचा दुसरा डोस - तेची पुरुष दैवाचे

लशीचा दुसरा डोस - तेची पुरुष दैवाचे

हेमंत नवरे

(अनेक माननीय आणि त्यांचे कार्यकर्ते यांचे लशीकरण मोहिमेतील श्रम यांची जाणीव मला आहे. त्यांच्या मदतीशिवाय मला लशीचा दुसरा डोस मिळाला नसता. हे सत्य. तरीही हेसुद्धा सत्य)

द्वितीय मात्रा लस मिळवूनी
जे निश्चिंत जाहले |
थोर भाग्य तयांचे |
तेची पुरुष दैवाचे |
धन्य धन्य जगी साचे ||

अशी माझी गत गेल्या शुक्रवारी ३० एप्रिलला झाली. मग ही पुण्यप्राप्ती कोणत्या कारणे झाली याचा शोध घेणे क्रमप्राप्त होते. या जन्मात माझ्या हातून कोणतेच असे कर्म घडले नव्हते की ज्याचे फल मला लशीद्वारे मिळेल. गतजन्मात असे कोणते कुकर्म मी केले ज्यामुळे हा प्रकार घडला याचा शोध मी काही काळ ध्यान लावून घेतला. पण अंत:चक्षूला माझी कर्मे दिसण्याऐवजी कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुण्यनगरी येथील सरकारी आरोग्य केंद्रांसमोर मारुतीच्या शेपटीसारख्या वळणदार आणि ना-अंत रांगांमध्ये लस प्रतीक्षेत उभे असलेले स्त्री पुरुष दिसू लागले. मग मी घाबरून, घाईघाईने ध्यानाशी फारकत घेतली आणि मर्त्य जगात परतलो. Smile

मार्चमध्ये सरकारी दवाखान्यात लशीचा पहिला डोस घेतला तेव्हा रांगा लावून, खुर्चीत काही काळ प्रतीक्षा करून लस मिळत असे. एखादा डॉक्टर इन चार्ज, पोलीस आणि नर्सताई यांच्या आधिपत्याखाली केंद्राचा कारभार व्यवस्थित चालत असे. काही राजकीय कार्यकर्ते ऐनवेळी आलेल्यांची नोंद करणे, अति वृद्ध मंडळींची ने आण करणे, रांग लावायला मदत करणे अशी मदत करत असत.

नंतर हे चित्र उलटे झाले. आपापल्या भागातील शासकीय इमारती, समाज मंदिरे, शाळा, क्रीडा संकुले सर्व पक्षांच्या मान्यवरांनी काबीज केली. या जणू इतिहासकालीन गढ्या आणि त्यांच्यावर ज्यांचा अंमल चालतो ते माननीय म्हणजे किल्लेदार. सार्वजनिक कामासाठी सदैव तत्पर कार्यकर्त्यांची कुमक जवळ होतीच. एकूणच लसीकरणाची प्रोसेस ही मंडळी सांभाळू लागली. आरोग्य कर्मचारी यांना दुय्यम स्थान प्राप्त झाले. जसजसा लस पुरवठा होईल त्यानुसार ही केंद्रे बंद किंवा चालू राहू लागली. टोकन वाटून लस मिळू लागली. इच्छुक जनता कधी नव्हे ते मॉर्निंग वॉकला फाट्यावर मारून टोकनप्राप्तीसाठी केंद्रांवर पहाटेपासून स्वारी करू लागली. Cool

आम्ही आधी ग्रुपमध्ये नाव नोंदणी केल्यामुळे त्या शुभ दिनी आम्हाला केंद्राच्या अंतर्भागात विना अडथळा प्रवेश मिळाला. बाहेर काहीशे मंडळी दैवावर हवाला ठेऊन उभी होती. काहीजण हुज्जत घालत होते. आपण आजवर किती वेळा आलो याचा पाढा पहारेकऱ्यासमोर वृथा वाचत होते. आजचा दिवस पदरात पाडून घेण्याचा काही मार्ग दिसतो आहे का त्याचा मोबाईलवर शोध घेत होते. योग्य ते अंतर असलेल्या खुर्च्यांवर आमची बसण्याची व्यवस्था झाली. आधार कार्ड तपासून प्रत्येकास एक टोकन मिळाले. प्रत्येकाचे नाव व मोबाइल नंबर अशी एक यादी तयार करण्यात आली. अधूनमधून कार्यकर्ते माहिती देऊन जात होते. "तुम्हा सर्वांना टोकन मिळाले आहे. तुमचे लसीकरण आधी होईल. मग बाकीच्यांचे. पहिला डोस कोणाला मिळणार नाही. प्राधान्य दुसऱ्या डोसला आहे. नोंदणी केली नसल्यास डोस मिळणार नाही." आणि इथेच माझी गफलत झाली. (एकेकाळी) महान संस्कृती असलेल्या देशातील माझे सत्तर प्लस वर्षांचे वास्तव्य वाया गेले असे मला जाणवले. आपल्याला अद्याप देशाची नाळ समजली नाही यामुळे मी थोडासा दु:खीसुद्धा होण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्ते जा-ये करत होते, आपणच काही क्षणापूर्वी दिलेले आदेश सोईस्करपणे विसरून काही माणसांना लशीचा लाभ देत होते, आधुनिक संस्कृती आत्मसात केलेली जनता 'रांगेचा लाभ सर्वांना' ही एसटी स्टँडाच्या भिंतीवर रंगवलेली सरकारी घोषणा विसरल्यासारखे दाखवून मध्ये घुसून लस घेऊन जात होती. नव्याने नोंदणी होत होती. दुसऱ्या लशीला असलेले प्राधान्य ढगात जाऊन लस पहिलटकर मंडळी परस्पर लस घेऊन पश्यार होत होती. मध्येच एका पेगपेक्षाही कमी क्वांटिटीचा चहा आला. ‘फुकटचे जे जे, ते ते सोडो नये‘ अशी विचारधारा आत्मसात केलेली जनता मास्क बाजूला करून चहापानानंद घेत होती. काही बुभुक्षित जनतेने नंतर आलेल्या जेवणाच्या थाळीवर आपला हक्क प्रस्थापित केला. एका गब्रुला बहुधा लगीनघरातील बुफे पंगत सुरू आहे असा भास झाला असावा. त्याने परत थोडे पदार्थ स्वहस्ते वाढून घेतले. लस कुठे जाते? अन्न हे पूर्णब्रह्म महत्त्वाचे!

खुर्चीवरचा पहिला नंबर, हाती असलेले टोकन, यादीतील पहिला नंबर या कशाचाही संबंध लस वेळेवर मिळण्याशी नव्हता याचे ज्ञान मला मिळेपर्यंत केंद्रातील बहुतांशी लशीकरण आटोपत आलेले होते. आणि माझा शेवटून दुसरा तिसरा नंबर होता. रांग मोडणे, झुंडीने पुढे घुसणे, कोणताही दस्तावेज न बाळगता हट्टाने लस मिळवणे अशी आधुनिक भारतीय संस्कृती अंगी न बाणवलेला मी, एक अतिशिस्तप्रिय नागरिक, लस घेऊन बाहेर पडलो तेव्हा फकस्त चार तास झाले होते. Scratch one-s head ऑलिंपिक पदकविजेते खेळाडू विजयी ठरल्यावर आकाशाकडे हातवारे करतात, आपली छाती पिटून घेतात. विजयी विश्वसुंदरी दोन तळहात गालांवर ठेऊन ओठांचा चंबू करते, डोळ्यात आलेले पाणी थोपवण्याचा प्रयत्न करते. त्या धर्तीवर काही करावे व आजचा लस विजय साजरा करावा असे मी आज्याबात केले नाही, याची कारणे दोन. पहिले माझ्या भोवताली टीव्ही फौज हाजीर नव्हती. दुसरे पोटातली भूक मला घराकडे जावे असा आदेश देत होती. तर 'योग्य' मार्गाने लस मिळवून कृतार्थ झालेली जाणती जनता कधीचीच माध्यान्ह भोजन उरकून वामकुक्षीच्या मार्गावर होती. Yahoo

- हेमंत नवरे

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

भारी लिहिलंय. तुम्हाला स्थितप्रज्ञ ही पदवी मिळायला हरकत नाही. या सगळ्या अनुभवावर एक मिष्किलीचा डीओ फवारा मारून सादर केल्याबद्दल अनेक विश्वसुंदऱ्या तुमच्याभोवती गोळा होवोत ही सदीच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही अगदी आमच्या मनांतलंच लिहिलं हो! की आपण एकाच सेंटरवर गेलो होतो ? वर्णन पुण्यातले वाटत आहे.
पहिल्या डोसच्याच वेळचा अनुभव, दुसऱ्या डोसच्यावेळी कामाला आला. कोविशिल्डच्या आशेने गेल्यावर कोवॅक्सिनने तोंड वेंगाडून दाखवले तेंव्हाच पुढचे संकट ध्यानी आले. आणि ४५+ च्या पाठोपाठ १८+ च्या महत्वाकांक्षी घोषणेमुळे त्यावर शिक्कामोर्तबच झाले आणि आमच्यातला मूळ मुंबईकर जागा झाला. आकाशपाताळ एक करुन, आम्ही तो दुसरा डोस दंडात पाडून घेतला. नाहीतर मे उजाडल्यावर ' मे डे, मे डे' करत असहाय्य होण्याची वेळ आली असती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लै भारी ! आमच्या कॉम्प्लेक्षात बरेच दैवी पुरुष आणि इस्त्रीया आहेत. त्यांना दुसरा डोस मिळाला आहे. काही जण मात्र स्पुटनिक लाईट ची वाट पाहत आहेत. एकाच डोसात करोनाला ठोसा मारण्यासाठी !
शिर्षक वाचून लगोलग प्रभाकर कारेकर यांनी गायलेले "तेच पुरुष दैवाचे" ऐकून घेतले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0