दागेरेओतीप: एक आगळावेगळा टाइम ट्रॅव्हल?

#संकल्पनाविषयक #मन्वंतर #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२१

दागेरेओतीप: एक आगळावेगळा टाइम ट्रॅव्हल?

- सई केसकर

दागेरेओतीप पोस्टर

कल्पना करा की आपल्याला भूतकाळात घेऊन जाणारी एक आगगाडी आहे. आगगाडीत बसून आपण एक-एक स्टेशन मागे-मागे जात आहोत. आणि आपल्या आठवणीत चिरकाल टिकलेल्या, आपल्या लाडक्या अशा एखाद्या जागी उतरायची आपल्याला परवानगी आहे.

ती कुठली जागा असेल?

शाळेला जायचा (किंवा शाळेतून परत यायचा!) रस्ता, एखादा इटुकल्या पिटुकल्या वस्तूंनी भरलेला बाजार; शेतामध्ये खुरपलेल्या, सपाट काळ्या जमिनीत घट्ट उभ्या राहिलेल्या चिंचेच्या झाडाला लावलेला टायरचा झोका; लेक्चर बंक करून सिनेमा बघायला जायचो ते सिंगल स्क्रीन थेटर; पहिल्यावहिल्या प्रियकराला भेटायला जायचो ती टेकडी, असं काहीही असू शकेल. पण त्या जागा अजूनही आपल्याच शहरात असल्या, तरी त्या तशाच नसतात. डोळे बंद केले की डोळ्यासमोर दुतर्फा, आलटून पालटून असलेल्या बुचाच्या आणि गुलमोहराच्या झाडांचा रस्ता आठवतो. नुकत्याच येऊन गेलेल्या वळिवानं केलेला काळा कुळकुळीत डांबरी रस्ता आणि त्यावर अस्ताव्यस्तपणे चिकटलेली, तरीही सुंदर दिसणारी लालभडक गुलमोहोराची पानं दिसतात. थोडा वेळ त्यात रमलो, तर बुचाच्या फुलांचा आणि पावसाचा मिळून येणारा गंधही आठवतो. पण डोळे उघडले, की तिथली झाडं कापलेली असतात, रस्ता रुंद करून सिमेंटचा केलेला असतो, बसक्या घरांच्या जागी इमारती आलेल्या असतात. असं बघितलं की वाईट वाटतं. आपण आपल्याला न जाणवणाऱ्या, तरीही अटळ अंताच्या दिशेने जात असलो, आणि आपण कुणी थोर नाही हे स्वतःला सारखं सारखं सांगत असलो, तरी आपल्या आठवणीतला एखादा गोड रस्ता असा अगोड झालेला पाहणं अवघडच. आगगाडीमध्ये बसून जाणं अगदीच परीकथेतलं वाटलं तरी असे रस्ते, त्यांवर राहणारी माणसं, दुकानं, उधळलेल्या मुलांच्या रस्त्यातल्या क्रिकेट मॅचेस, फेरीवाले, बोहारणी, कोपऱ्यावरचे चांभार, त्या वेळी कुणी एखाद्या सिनेमात घालून ठेवले असते तर किती छान झालं असतं, असं मला अनेकदा वाटून गेलं होतं. पण एखाद्या रस्त्याबद्दल खरंच एक सबंध माहितीपट कुणी करून ठेवला असेल असा विचारही माझ्या मनात कधी आला नाही.

आन्येस वारदा इलस्ट्रेशन

आन्येस वारदा - इलस्ट्रेशन

आन्येस वार्दाचा 'दागेरेओतीप' (Daguerréotypes) हा १९७५ सालचा फ्रेंच माहितीपट, आन्येस जिथे राहायची त्या 'ऱ्यु दागेर ' (Rue Daguerre) या रस्त्याबद्दल आहे. त्या रस्त्यावरचे, म्हणून दागेरेओतीप असा अर्थ अभिप्रेत आहे. वार्दाचा मुलगा लहान असल्याकारणाने तिला कामासाठी घरापासून फार दूर जाता यायचं नाही. म्हणून तिच्या घराच्या आसपासच हा माहितीपट बनवला आहे. त्यात प्रामुख्यानं तिच्या रस्त्यावर असलेलं 'ब्लु थिसल' नावाचं अत्तर आणि इतर अनेक गोष्टींचं दुकान आहे. अगदी वयोवृद्ध म्हणता येतील असे आजी-आजोबा हे दुकान चालवतात. अशाच एका, पण थोड्या तरुण दांपत्यानं चालवलेलं खाटकाचं दुकान आहे. एक वाणसामानाचं दुकान आहे. एक बेकरी आहे. एक न्हाव्याचं आणि एक धोब्याचं अशी दुकानं आहेत. या दुकानांमध्ये आलटून पालटून वार्दाचा वावर आहे. याव्यतिरिक्त चारचाकी चालवायला शिकवणाऱ्या एका प्रशिक्षकाचा आणि एका जादूगाराचाही यात सहभाग आहे. या सिनेमाची सुरुवातीची पात्रओळख मिस्टॅग नावाच्या या जादूगाराच्या मोठ्या आवाजातील मजेदार घोषणांतूनच आहे.

रु दागेर

'दागेरेओतीप' या शब्दाचा उगम खरंतर लुई दग्येर या तंत्रज्ञाने विकसित केलेल्या Daguerreotype या छायाचित्र काढायच्या पद्धतीत आहे. लुई दग्येरचं नाव या रस्त्याला दिलं आहे. चांदीचा वर्ख असलेल्या, तांब्याच्या पत्र्यावर कॅमेऱ्याच्या साहाय्याने चित्र टिपून, मग पाऱ्याची वाफ देऊन तो दृश्य अवस्थेत आणायचा; अशा अनेक विषारी पदार्थांनी युक्त असलेली ही प्रक्रिया होती. श्रीमंत लोकांचे पोर्ट्रेट काढायला ही पद्धत वापरली जायची. हा सबंध चित्रपटच या रस्त्यावरील लोकांचे दागेरेओतीप, म्हणजेच व्यक्तिचित्रं आहेत. या प्रकारे फोटो काढायची ही पहिलीच आणि फार जुनी पद्धत आहे. त्यामुळे हा सिनेमा जितका जुना होईल, तितकी याच्या शीर्षकातली गंमत वाढत जाईल.

दुकानांतून फिरत फिरत तयार केलेला माहितीपट कुणाला का आवडेल, असा प्रश्न पडणं साहजिक आहे. पण तो आपल्याला गुंतवून का ठेवतो याची शोधावी तितकी कारणं कमी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, हा आपल्याला १९७५ सालच्या फ्रान्समध्ये नेणारा आहे. दुकानातल्या वस्तू जरी निरखून पाहिल्या, तरी त्यांचं वेगळेपण एक स्वतंत्र आणि पुरेसं कारण आहे. चित्रपटाची सुरुवात ब्लु थिसल या दुकानातून होते. पुण्यात, तुळशीबागेच्या झगमगाटाच्या पलीकडे काही भांडी, काचेच्या वस्तू, निरनिराळ्या मुळ्या, तेलं आणि पाले विकणारी दुकानं जशी असायची, तसं हे दुकान आहे. दुकान ही केवळ विकायचा माल साठवण्याची जागा आहे या तत्त्वावर ठाम असलेलं. तिथे ग्राहकाला वावरता यावं म्हणून गालिच्यांचे रस्ते नाहीत; किंवा ग्राहकाच्या दृष्टिक्षेपात मुद्दाम येतील अशा मांडून ठेवलेल्या गोष्टींचे सोशल इंजिनियरिंग नाही. दुकानाच्या दर्शनी भागात लावलेल्या वस्तूही पंचवीस वर्षं तशाच आहेत असं वार्दा सुरुवातीलाच सांगते. नीटपणे अजागळ म्हणता येईल असं हे दुकान! तीच गत वाणसामानाच्या दुकानाचीही. वस्तूंचा आणि पदार्थांचा खच पडून काउंटरपलीकडचा माणूस दिसेनासा झाला आहे अशी स्थिती. त्यातून ग्राहकाला हवं ते बरोब्बर शोधून द्यायला समर्थ असा दुकानदार आणि त्याचे मदतनीस. वाणसामानाच्या दुकानातील दुधांचे डबे, वेगवेगळ्या गोड पदार्थांचे पुडे, टिनबंद गोष्टी एखाद्या परग्रहावरच्या वाटाव्यात अशा आहेत.

ब्लु थिसलमध्ये अत्तरं विकता विकता, बटणं, तेलं अशा अनेक वस्तूही तिथले आजोबा विकत असतात. मध्येच एक माणूस ब्रिलियंटीन घ्यायला येतो. पण त्यानं ते मागायच्या आधीच, त्याच्या केशरचनेवरून, तो नक्की केस चप्प बसवायचं काहीतरी विकत घेणार हे ओळखता येतं. ब्लु थिसल आजोबा स्वतः अत्तरं बनवतात. त्यांच्या दुकानात तयार अत्तरंही विकायला असतात. पण फ्रान्स ज्यासाठी प्रसिद्ध आहे त्या शनेल, जीवँशी, दीओरच्या नाजूक आणि कमनीय दिसणाऱ्या बाटल्या इथे दिसत नाहीत. पॅरिसलाही एक घरगुती अघळपघळ रूप असू शकतं हे बघून मनाला फार समाधान वाटतं. वार्दाची मोठी मुलगी रोझली अत्तर मागते तेव्हा आजोबा तिला तिच्या आवडीच्या बाटलीत ते सरळ ओतून देतात!

दागेरेओतीप आजी आजोबा

वाणसामानाच्या दुकानात एक आजी येतात. त्यांना दूध हवं असतं. पण वाण्याकडे स्टरलाइझ्ड दूध असतं (पाश्चराइझ्ड नसतं) म्हणून आजी नाक मुरडून एक पिटुकला आटवलेल्या दुधाचा टिन घेऊन जातात. तो नव्वद सेंटचा टिन घेतानाही त्या, कुठल्याही फ्रेंच व्यक्तीप्रमाणे मन लावून कटकट करतात. दुकानदार म्हणतो, "मी तुम्हाला लिटरमध्ये स्टरलाइझ्ड दूध देऊ शकतो. ते घ्या!" तरीही आपला हेका न सोडता त्या तो टिन घेऊन जातात. स्टरलाइझ्ड आणि पाश्चराइझ्ड असे दोन्ही प्रकार त्या काळी का विक्रीला असावेत, हा प्रश्न पडला. स्टरलाइझ्ड दूध १२० सेल्सियसला तापवून त्यातले सगळे जीवाणू मारले जातात. भारतातील लोकही पाश्चराइझ्ड दूध पुन्हा उकळून त्याला स्टरलाईझ करतात. पण आपण त्यातली साय वेगळी करण्यासाठी हे करतो. दुधावर होणाऱ्या या निर्जंतुकीकरणाच्या आणि एकजीव करण्याच्या प्रक्रियांमुळे, दुधापासून बनवल्या जाणाऱ्या इतर पदार्थांचं (साय, दही, लोणी, चीझ) प्राक्तनही कसं बदलून गेलं आहे हे लक्षात येतं. अनेक प्रगत देशांत, भारतात जसं घरीच दही आणि लोणी करता येतं तसं आता करता येत नाही. हे सगळे प्रकार सुबक वेष्टनात वेगवेगळे मात्र सर्रास उपलब्ध असतात.

ही दुकानं अजून एका कारणाने वेगळी वाटतात. आज सगळीकडे सुळसुळाट असलेलं प्लास्टिक इथे अगदी क्वचित बघायला मिळतं. काचेच्या दुधाच्या बाटल्या, सामान भरून न्यायला खाकी रंगाच्या कागदी पिशव्या, खाटकाच्या दुकानात स्टेक कापून झाल्यावर, त्याला हाताच्या यंत्रवत हालचाली करत बांधायला वापरलेला बटर कागद. पाव, बगेतसारख्या गोष्टी अकारण प्लास्टिकमध्ये न बांधता सरळ उघड्या विकायला ठेवणं (जे पॅरिसमध्ये आजही होतं). आपली आयुष्यं प्लॅस्टिकच्या असंख्य पिशव्या, बाटल्या, डब्यांनी भरून जायच्या आधीही त्यांच्याविना लोक नीट जगू शकत होते याची जाणीव पुन्हा पुन्हा होते. दुकानांमध्ये प्लास्टिक नाही तसंच लोकांच्या वेशभूषेतही त्याचा लवलेश नाही. आज जर हिवाळ्यात अमेरिकेत किंवा युरोपमध्ये गेलात तर सगळीकडे गडद केशरी, लाल, फ्लॉरोसंट हिरवे, गुलाबी माणसांचे ठिपके दिसतात. आदिदास, नॉर्थफेस, कोलंबिया अशी नावं मिरवणारी सिंथेटिक जाकिटं आणि कोट सगळीकडे दिसतात. हे असले कपडे या चित्रपटात अजिबात दिसत नाहीत, त्यामुळे यातले लोक कधी कधी देनिसच्या गोष्टीतील चित्रांसारखे दिसतात. फेल्ट कापडाचे, मातकट रंगाचे ओव्हरकोट; बायकांचे रंगीत, पण लोकरीचे स्वेटर; ब्युटी पार्लरमध्ये केस कुरळे करायला वापरलेले धातूचे रोलर असं सगळंच प्लास्टिकविरहित आहे. पण काही काही गोष्टी मात्र अजूनही बदलल्या नाहीत, हे बेकरीतल्या पावाला आकार द्यायच्या टोपल्या बघून वाटतं. फक्त हल्ली त्या टोपल्या ॲमेझॉन मिळतात आणि थोड्या अधिक टापटीप दिसतात.

एखाद्या वरवर रटाळ वाटणाऱ्या कामातलं सौंदर्य कसं दाखवता येतं हे या सिनेमात सतत जाणवत राहतं. मला सगळ्यात रमणीय वाटणारं काम म्हणजे बुलॉन्जरी अर्थात बेकरीमधलं पाव बनवायचं काम. कणकेला आकार देण्यासाठी तलम कापड लावलेल्या वेताच्या टोपल्या एकसारख्या मांडून ठेवलेल्या दिसतात. जागा बंदिस्त आणि थोडी अंधारी असली तरी कणीक पावाच्या साच्यात घालून एका जाड फळकुटावर ठेवून भट्टीमध्ये रवाना करतानाचा प्रसंग इतका छान टिपला आहे, की इथे फक्त त्या भट्टीत भाजलेल्या पावाचा वास येऊ शकला असता तर फार बरं झालं असतं असं वाटून जातं. एका संध्याकाळी या सिनेमातले सगळे कलाकार मिस्टॅगचा जादूचा प्रयोग बघायला गेलेले दाखवले आहेत, आणि जादूगाराच्या प्रयोगात बेमालूमपणे यातील प्रत्येक दुकानदाराच्या पुन्हा पुन्हा होणाऱ्या हालचालीचे प्रसंग घालते आहेत. ते बघताना वार्दाच्या डोळ्यांतच जादू आहे याचा प्रत्यय येतो.

हळूहळू या लोकांच्या कामांचं स्वरूप आणि त्यांचा दिनक्रम दाखवून झाल्यावर, त्या सगळ्यांच्या मुलाखती येतात. यातले बरेचसे लोक फ्रान्समधल्या खेड्यापाड्यातून आणि त्युनिशियासारख्या फ्रेंच वसाहतींतून पॅरिसमध्ये आलेले आहेत. प्रत्येकजण आपली गोष्ट तीन ते चार ओळींत सांगतो. मग त्यांना, त्यांच्या बायको/नवऱ्याला ते कसे भेटले हा प्रश्न विचारला जातो. त्याला उत्तर देताना, बायका आणि पुरुष दोघेही हटकून लाजतात. ते सगळेच प्रसंग अगदी गोड आणि हळुवार आहेत. कदाचित ते सगळे लोकच एका अत्यंत साध्या आणि कष्टकरी वर्गातून येतात त्यामुळे असेल की काय, पण आपल्या जोडीदाराबद्दल विचारल्यावर इतकं निरागस हास्य त्यांच्या चेहऱ्यावर येतं ते बघून मला थोडं आश्चर्य वाटलं. आणि अशा चेहऱ्यांवर येणारे असे भाव वार्दाला टिपावेसे वाटले, आणि ते पंचेचाळीस वर्षांनी मला इतके आवडले, याचंही.

दागेरेओतीप आजी

तुम्हाला स्वप्नं काय पडतात, असं विचारल्यावर मात्र सगळ्यांना रोजच्या दगदगीची आणि कामाचीच स्वप्नं पडतात हे बघून थोडं वाईट वाटतं. हा रस्ता, ही दुकानं आणि त्यांचं काम यातच ही जोडपी गुरफटलेली आहेत. ब्लु थिसलमधल्या आजींना वयामुळे स्मृतिभ्रंश झाला असावा असं वाटतं. त्यांचं एकसारखं शून्यात बघणं, विचारलेल्या प्रश्नांना नीट उत्तरं न देता येणं, दुकानाच्या दारात त्यांचं येणाऱ्या जाणाऱ्यांच्या रस्त्यात घुटमळणं हे सगळं सुरुवातीला काही क्षण अस्वस्थ करून जातं. पण कॅमेरा जेव्हा पुन्हा पुन्हा त्या दुकानात येतो, तेव्हा हळूहळू डोळे आजींनाच शोधायला लागतात. त्या नाजूक दिसणाऱ्या हरवलेल्या आजी, आणि सतत चेहऱ्यावर एक हसू घेऊन वावरणारे आजोबा हुरहूर लावून जाणारे आहेत. याचं कारण फक्त त्यांच्या दिसण्यात नाही. कदाचित, त्यांच्या नसण्यानेच सगळ्यात आधी हा रस्ता बदलणार आहे, हेदेखील असावं.

बघता बघता या वेगवेगळ्या दुकानांतून चाललेल्या गोष्टींची एक कथाच होते. आणि त्यातल्या काही लोकांमध्ये गुंतून जायला होतं. या माहितीपटात, इतर माहितीपटांमध्ये एक दिशा ठरवून, त्या ओघाने मांडलेले मुद्दे असतात तसं काही नाही. उलट मध्येच जादूगाराचे प्रसंग आल्यामुळे आधी गोंधळायलाच होतं. एकदा सगळी दुकानं बघून झाल्यावर आता पुढच्या आवर्तनात विशेष असं काय होणार, असाही प्रश्न पडतो. पण हे तात्कालिक प्रश्न आणि गोंधळ फार काळ टिकत नाहीत, हेच या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे. हे बघायला इतकं छान का वाटतं या प्रश्नावर विचार केला तर असं वाटतं की आन्येस वार्दाला माणसांबद्दल अपार माया आणि सहानुभाव आहे. माणसांकडे बघण्याची तिची दृष्टी एखाद्या प्रेमळ मानववंशशास्त्रज्ञासारखी आहे. त्या रस्त्याची रचना, तिथल्या लोकांची स्थलांतरं, त्या काळी वापरात असलेल्या वस्तू, गाड्या या सगळ्या ढोबळ अभ्यास करण्याच्या गोष्टींबरोबर तिथल्या माणसांची स्वप्नं, त्यांची प्रेमं, दुकानात कुणी नसेल तेव्हा त्यांचं संथ बसून राहणं, भिरभिरणं हे टिपल्यामुळे याला 'माहितीपट' म्हणणंदेखील शेवटी बरोबर वाटत नाही.

हा चित्रपट बघून आपल्याला स्मरणरंजन करायला आवडतं हे चारचौघांत मान्य करण्याचा आत्मविश्वास आला एवढं नक्की. नुसतंच माझ्या आयुष्यातलं असं नाही, पण मी वार्दाच्या या प्लास्टिक आणि मोबाईल फोन नसलेल्या रस्त्यावर इतकी रमले की मला आपण चुकीच्या दशकात जन्माला आलो असंही वाटायला लागलं. आता ही चूक सुधारण्यासाठी असे अनेक सिनेमे शोधावे लागतील!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेख आवडला.
प्रत्येकाच्या मनात अशा काळाच्या ॲम्बरमध्ये जैसे थे राहीलेल्या आठवणींचे झळझळते जीवाश्म असतातच.
उदाहरणार्थ मला 'छोटीसी बात' आणि 'बातो बातोमे' मधल्या त्या स्कूटर आणि मॅनीला वाल्या, ताण रहीत नोकऱ्या असलेल्या आणि लोकलला गर्दी नसलेल्या सत्तरच्या दशकात जावं असं नेहेमी वाटत आलंय.

किंवा ऐंशीच्या पूर्वार्धातली माझी डोंबिवली पूर्व आणि उत्तरार्धातली वांद्रे गव्हर्नमेंट कॉलनी ही अशीच गोड होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला माझ्या लहानपणीचा हा काळ अनेक कारणांसाठी आवडतो. पण ठळकपणे अठवणारी एक गोष्ट म्हणजे तेव्हा भारतात पेप्सी, कोक, MacDonald असं काही नव्हतं. त्यामुळे ठराविक भारतीय ब्रँड असायचे. पार्लेची कोल्ड्रिंक्स असायची जी अगदी क्वचित कधीतरी मिळायची. पुण्यात कॅम्प मध्ये एक बर्गर किंग नावाचं भारतीय हॉटेल होतं (not to be confused with the brand). तिथे अफलातून क्रीम सोडा मिळायचा. आणि तिथले बर्गर फास्टफूडसारखे नसायचे. सिंहगड रोडवर एकेकाळी प्रचंड मोठी वडाची झाडं असायची जी निर्दयीपणे कापली. आता तो रस्ता एकदम भकास रुक्ष दिसतो. चितळ्यांची कुठेही शाखा नव्हती तेव्हाचे दिवसही रम्य होते. आता बिचारे खूप झुकले जगापुढे. तरी माझ्या लहानपणीदेखील त्यांच्या दोन शाखा होत्याच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"रम्य अशा स्थानी रहावे रात्रंदिन फुलुनी" अशा प्रकारची ही गंमत.

ती आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.