सुरकुती

#ललित #मन्वंतर #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२१

सुरकुती

- विवेक घोडमारे

पुढे-पुढे चालणारा विघ्नेशच आहे याची खात्री होताच अबीरने मागून त्याच्या खांद्यावर घट्ट हात रोवला. विघ्नेशने चटकन वळून मागे पाहिलं. अबीरच्या चेहऱ्यावर नजर पडताच विघ्नेशने खांदे सोडले. आता काही इलाजच नव्हता. शरणागती पत्करल्याचा चेहरा घेऊन विघ्नेश त्याच्याकडे बघत नुसताच उभा राहिला. अबीरच्या चेहऱ्यावरचा राग स्वाभाविक होता. विघ्नेशचं बखोट धरून ओढतच तो त्याला गर्दीच्या दूर घेऊन गेला.

विघ्नेश समुद्राकडे निघाला होता. इच्छा झाली होती, जरा वेळ बसावं त्याच्या पुढ्यात. दिवस बुडायला निघाला होता. अबीर बसला. विघ्नेशही बसला वाळूवर. विघ्नेशच्या लक्षात आलं, अबीर अजून एकही शब्द बोलला नव्हता. त्याला वाटलं, बोलणारही नाही तो. बघत बसेल माझ्याकडे. स्वत:च सांगावं म्हणून. पण मीही समुद्रात खोलवर बघत राहीन अन् तो माझ्याकडे. त्याचे सर्व प्रश्न मला माहीत आहेत. माझीही सर्व उत्तरे मला माहीत आहेत. मात्र एकमेकांना ती चपखल बसली तरी त्याने त्याचं आणि माझं समाधान होणार नाहीच. मेख ही नेहमी अशी असते असल्या अबोल संवादात.
"कुठेतरी एकाएकी नाहीसं व्हावंसं वाटत होतं काही काळ, काही दिवस किंवा काही महिने…" विघ्नेश समुद्राकडे बघतच बोलला अखेर बऱ्याच वेळाने.
"काय गवसलं?" त्यानेही पुढेच बघत शांतपणे विचारलं.
"तो प्रश्न मीही विचारतो आहे स्वत:ला." अपयश लपवण्याची विघ्नेशला गरज नव्हती, त्यासोबत खिन्नताही.
"पंधराएक तरी वर्षं झालीत तुला ओळखतो. तुला समुद्रात उडी मारायची असेल तरी माझी ना नाही… पण माकडा, वहिनींना सांगून तरी करत जा असले चाळे." शेवटी एकदाचा अबीर चिडला. कायकाय बोलत बसला रागारागात. निर्मला कशी काळजीत आहे, तो कसा काळजीत होता वगैरे.
"तिला सांगूनच निघालो," विघ्नेशने शांतपणे सांगितलं.
"घरी येणार आहेस?"
"येईनच. आता नको."
"कुठे थांबलायस?"
"प्रयागच्या खोलीवर. तू त्याला ओळखत नाहीस."
"चल तुला सोडतो.""
मग दोघेही खोलीवर आले. एक बिछाना, खुर्ची-टेबल, पंखा अन् रितेपणा भासवणाऱ्या भिंती. टेबलावरचे कोरे कागद चाळले त्याने.
"भांडून निघालास?"
"मघाशी सांगितलं ना, सांगून निघालो."
"लेखकपणाचा फायदा उचलतोस पण नेहमी शोधतोस पळवाटच." त्याचा राग परत एकदा उफाळून आला. पण विघ्नेशला राग नाही वाटला त्याच्या चिडण्याचा.
"खरं आहे, प्रत्येक वेळी पळवाट नको वाटते. म्हणून आता हा असा प्रयत्न. तू निघावंस आता." विघ्नेशला आणखी त्याच्याशी बोलायचं नव्हतं.
"वहिनींना सांगतो गाठभेट झाली म्हणून."
विघ्नेश हो किंवा नाही काही बोलला नाही पण त्याची हरकत नव्हती. तो नाही म्हणाला असता तरी अबीर सांगायचा राहिला नसता. अबीर गेला. थोड्या वेळाने भाजी-पोळीवाला मुलगा डबा देऊन गेला. विघ्नेश जेवला. शतपावली करत फिरत राहिला अंगणात.

***

आपणच वाद उकरून काढतो हे निर्मलेलाही कळतं. पण एकदा भांडायचं ठरवलं तर शेवटचं वाक्य आपलं कसं राहील, हे ती बघते. त्यात तिला जिंकण्याचा आनंद मिळतो. तो आनंद तिला मिळावा म्हणून मग आपण शांत झालो तर बरेचदा तोही परत वादाचा विषय होतो. "आत का गुळणी धरलीयस", या शब्दांत. विघ्नेश आपल्या विचारांत फिरत होता तर समोरून रती आणि सुहास येताना दिसले.

त्याच्या गवसण्याची बातमी वेगाने पसरली होती तर. तिघेही वर खोलीत बसले.
"निर्मलेशी बोललो आम्ही…" रतीने सुरुवात केली. "...आता तू घरी परतायला हवंस."
"एवढा हट्टी नव्हतास तू विघ्नेश," लगोलग सुहासही चटकन बोलून गेला.
हो, नव्हतोच मी हट्टी. मला आठवतं तेव्हापासून. अर्थात मटेरीयालिस्टीक गोष्टींबाबत. मात्र स्वत:च्या वागण्या–विचाराबाबतीत होतो मी हट्टी. तरी आपल्या हट्टाचा दुसऱ्यांना त्रास व्हायला नको याची काळजी घ्यायचो मी.
पण खरं तर माणसं आहे तशी राहतात थोडीच? कालचा मी आजचा थोडाच असणार आहे. दररोजच्या अनुभवातून आलेल्या शहाणपणाची झालर आपण आपल्या निर्णयांना लावणारच ना?
पण हे प्रकरण माझ्या हट्टी असण्याबाबतीत नव्हतंच मुळी!
हा सगळा विचार करत विघ्नेशने सांगून टाकलं. "आणखी काही दिवस तरी मी इकडे थांबेन." नेमकं काय झालं याची उजळणी करायची त्याला इच्छा नव्हती. ती निर्मलेकडे साग्रसंगीत झाली असेलच. "अर्थात इकडे एकांतात राहून मी काही टोकाचा निर्णय घेईन अशी वगैरे तुम्ही समजूत नका करून घेऊ."
"अरे, पण हे असे खटके होतच राहणार, बायको म्हटली तर सोबत कटकट येणारच!" सुहास नको ते बायकोसमोर बोलून गेला आणि रती उसळलीच, "व्वा! छान. ही वेळ असलं ज्ञान पाजळायची आहे?"
"नाही, तसं नाही गं! पण बघ, हे छोटेमोठे वाद होतच राहणार. पण म्हणून सरळ घर सोडून दुसरीकडे राहायला निघून जायचं..."
"तसं काही नाही सुहास, जरा समजण्यात घोळ होतोय. मला काही वेळ, काही दिवस… साऱ्या पसाऱ्यातून मोकळं होऊन राहायचं होतं, एकटंच! ती वेळ नेमकी निर्मलेशी झालेल्या खटक्यासोबत जुळून आली एवढंच."
"कोण्या बाईचं वगैरे प्रकरण नाही ना?" सुहास आणखी खोलात शिरला.
रतीने घाईने त्याच्याकडे बघत डोळे वटारले.
सुहाससुद्धा विघ्नेशचा बालमित्र. पण बायको सोबत असताना मित्रांना कसले प्रश्न विचारावेत ही अक्कल अजून आलीच नाही त्याला. ही रती आहे म्हणून चाललं आहे बेट्याचं.
विघ्नेश काही बोलला नाही त्यावर.
मग थोड्या वेळ कोणी काहीच नाही बोललं.
रतीचा मूड गेलाय हे उघड दिसत होतं. अशा वेळेस ती बोलणंच कमी करते. अगदी विघ्नेशची सवय! म्हणून तिचा स्वभाव विघ्नेशला आवडतो. इतर वेळेस हे दोघे घरी आले की रतीच विघ्नेशशी जास्त बोलते. तिच्या समजुतीचा आवाका मोठा आहे. सुहास तिच्या पासंगालाही पुरत नाही. सुहासचं उथळ निर्मलेशी चांगलं जुळतं. तो विघ्नेशच्या घरी आला की त्याला हमखास निर्मलेच्या हातचा एक तरी जिन्नस खायला मिळतो. त्यातच खुश असतो तो.
थोड्या वेळाने दोघेही गेले धुसफुसत. विघ्नेशला समजावण्याच्या नादात त्यांचं आज भांडण होणार हे स्पष्टच दिसत होतं.

***

कागद रंगवून लिखाण घडण्याचा प्रश्नच नव्हता. आणलेले कागद तसेच पडले होते. मन जाग्यावर नव्हतंच. त्या दिवशी घरून निघाल्यावर विघ्नेश थेट गावाला बाबांकडे गेला होता. दिवेलागणीची वेळ. बाबा बाहेरच खुर्चीवर बसले होते. बाजूलाच काकूही होती. आई गेल्यावर बाबांची काळजी काकूच घेते. तिने घरात येऊन राहायला विघ्नेशची आधीपासूनच ना नव्हती. मोठ्याचा, विनोदचा विरोध अपेक्षित होताच.

त्याला अनपेक्षितपणे आलेलं बघून दोघेही आनंदले.

आईच्या शेवटच्या आजारपणातच बाबांच्या आणि काकूच्या प्रकरणाची लोकांनी आवई उठवली होती. बाबा तसे खंबीर होतेच पण काकूनेही कोणाला भीक नाही घातली. उलट आईला, "तू या आजारपणातून उठली नाहीस तर तुझ्या नवऱ्याची काळजी मी घेईन, तुला चिंता करायचं काही कारण नाही," असं सांगून ती तिचं करायला घरात आली होती. मोठ्याचं त्यावर म्हणणं की या धक्क्यामुळेच आई गेली. विघ्नेशला मात्र तसं वाटत नाही. प्रत्येकाची आपली वेळ असते.

मोठा तेव्हापासून घरी पाय ठेवत नाही.

चहा झाल्यावर तो बसला बोलत बाबांजवळ. त्यांच्या चेहऱ्याच्या काही सुरकुत्या आणखी खोल गेल्या होत्या. आधीही त्यांच्यात संवाद चांगलाच होता, मोकळा.

"तू जसा आता एकटा आलास तसं निर्मलानेही एखाद्या वेळेस एकटं यायला हवं," बाबा तुळशी समोरच्या समईच्या ज्योतीकडे बघत बोलले. त्याचे कान आपोआप टवकारले. त्याला त्याच्या विषयावर संवाद नको होता. ज्यापासून पळायचं तेच परत समोर कशाला?
विषयाला वेगळं वळण देत हसत तो म्हणाला, "सांगतो तिला निरोप. इकडची गुपितं, ठेव्या तिलाही माहीत व्हायला हव्यात."
मग वेगळं काही बोलायचं म्हणून लगेच तो म्हणाला, "तुमचं आणि काकूचं मला भारी कौतुक वाटतं. काकूच्या वेळेस तुम्ही कुणालाच बधला नाहीत त्या वेळेसचं तर आणखीनच."
"मला नेहमीच वाटायचं, गुण जुळणं वगैरे नुसते साहित्यिक शब्द! जुळणी नमनाला झाली. नंतर काय? लग्न टिकवायचं म्हणजे नवरा-बायको दोघांनीही सतत बदलत राहायला हवं, अर्थात एकमेकांच्या बदलाला स्वीकारण्याच्या गतीला सांभाळून."
"म्हणजे?"
"बघ, आपल्याकडे लग्न म्हणजे जन्माचं बंधन. पन्नास-साठ वर्षांसाठी आपली गाठ कोणाशी तरी बांधून घेणे. आता या पन्नास-साठ वर्षांत दोघेही लग्न करताना जसे होते तसेच्या तसे थोडेच राहणार? तरी आपण जोडीदाराशी भांडतांना काय म्हणतो, आधी तू अशी नव्हतीस!"
तो हसायला लागला.
"बाबा, नेमकं हे नवरा-बायको दोघांनाही कळायला हवं ना?"
"तुझ्या काकूला मात्र नेमकं हे बरोबर कळलं. म्हणून मी तिच्या संबधांबाबत ठाम राहिलो."
आपण या बाबतीत बाबांची बाजू घेतली याचा मग त्याला स्वत:लाच अभिमान वाटत राहिला.
जेवण झाल्यावर रात्री खाट टाकून तो टेरेसवरच झोपला. तो गावाला आला की त्याची झोपायची जागा हीच. निवांतपणा गवसतो त्याला इथे.

पण विचारांचं चक्र मात्र सुरूच होतं त्याच्या मनात. त्याला वाटलं, आपल्या मनाची चलबिचल बाबांना नक्कीच जाणवली असणार. त्याशिवायच का त्यांनी निर्मलेने एकटी येण्याचा विषय काढला. आपण स्वत:ला कितीही संतुलित दाखविण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या देहाचं अंग-अंग खरं-खुरं बोलत असतंच. तशी वेळ आल्याशिवाय बाबा सरळ विचारणार नाहीतच. पण त्यापेक्षा उद्या सकाळीच इथून निघालेलं उत्तम.

***

प्रयाग आणि नूपुरने जास्त काही प्रश्न विचारले नाहीत त्याला. अनायसे त्याच्याकडे एक खोली रिकामी होती. विघ्नेशला आनंदाने त्यांनी ती दिली. इतर वेळेस पर्यटकांचा राबता असतो त्यांच्या खोल्यांवर. इथून समुद्रही नजरेच्या अंतरावर. प्रयाग तसा बालमित्र नव्हेच. दहा वर्षांपूर्वी एका परिसंवादात भेट झाली आणि त्यांच्या तारा जुळल्या. वय वाढून चांगलं समजून-उमजून येण्याच्या काळात घडलेली आणि काळाच्या ओघात टिकून राहिलेली ही मैत्री. ग्राहकांसाठी शेअर खरेदी-विक्रीचा त्याचा धंदा असला तरी मैत्रीत नफा-तोट्याच्या विचार नाही करत तो.

चार दिवस बूड टेकवून खोलीतच पडून राहिला तो. बाहेर कुठे निघायची इच्छाच नव्हती होत. प्रयागलाही सांगून ठेवलं होतं त्याने लिखाण करायचंय म्हणून. तोही मध्ये येऊन लुडबुडला वगैरे नाही. नूपुरने कोणाला तरी सांगून जेवणाच्या डब्ब्याची सोय करून दिली होती.

या भागात तो सहसा येत नाही. त्यांचं घर राहिलं याच शहरात वरच्या अंगाला. फेरा मारत यावं लागतं. त्यात तिन्ही त्रिकाळ पर्यटकांची गर्दी. वेळ जातो खूप.

निर्मलेवरचा त्याचा राग कमी झाला असला तरी साशंकता मनाला घेरून होतीच. हे सारं कुठवर हा भला मोठा प्रश्न होताच. फारशी बोलायची निर्मलेची सवय नाही. त्यामुळे तिची मैत्रीही कोणाशी फारशी नाही. जे काही मित्र-मैत्रीण आहेत ते त्याचेच आणि मग सामाईक झालेले. पण भांडण झालं की तिच्या तोंडाला मोठाच जोर चढतो. ते का याचं कारण त्याला अजून पुरतं उमगलेलं नाही. ते तिच्या बालपणातल्या कोणत्या तरी कटू घटनेत असावं असं त्याला वाटते. आडून-आडून त्याने विचारून पाहिलं आहे त्याबद्दल तिला पण तसली घटना कोणती ते तिला स्पष्टपणे काही सांगता नाही आलं कधीच.

त्याच्या लग्नाला झालीत वीस वर्षं. मुलंही आहेत दोन. आपापल्या शिक्षणात मग्न. दोघेही वेगवेगळ्या होस्टेलवर. तो आपली करतो पत्रकारिता. परत तऱ्हेतऱ्हेच्या मासिकांत इकडचं-तिकडचं काहीबाही लिहून बऱ्यापैकी चालवतो घर. कोण्या प्रेमप्रकरणात अडकला म्हणावं तर तसंही नाही.

पण मध्येच निर्मला काहीतरी का उकरून काढते ते त्याला कळतच नाही.

मागच्याच महिन्यातली गोष्ट. दीपाली घरी येणार असं निर्मला त्याला सांगत होती. दीपाली तिच्या माहेरच्या शेजाऱ्यांची मुलगी. तिला इथेच कुठेतरी नोकरी मिळाली. रुजू व्हायचं होतं. दोनचार दिवस थांबणार होती दुसरीकडे काही सोय होईस्तो. तर तशी ती आली. बोलणं वगैरे झालं पण जेवण करून निघून गेली.

रात्री झोपताना त्याने निर्मलेला विचारलं, "काय गं, तू तर म्हणाली होतीस दीपाली आपल्याकडे थांबणार म्हणून. ती तर काही थांबली नाही. तूसुद्धा तिला थांबायचा विशेष आग्रह नाही केलास?"
त्यावर ती काहीच नाही बोलली. नुसतीच शांतपणे पडून राहिली उजवा हात डोक्याखाली घेऊन. त्याने परत विचारलं, "अगं मी काहीतरी विचारतोय, तू कसल्या विचारात आहेस का?"
"तिला काही काम निघालं," ती तुटकपणे बोलली. आणि कूस बदलून त्याच्याकडे पाठ करून झोपून गेली. त्यानेही मग तो विषय ताणला नाही.
पण मग चार दिवसांनी स्फोट झालाच. असाच तो बाहेरून आला. निर्मला स्वयंपाकखोलीत काही करत होती. जरा झोकात मागून येऊन त्याने तिच्या छातीवर हात दाबला, तो तिने लगोलग त्याला झटकून टाकलं. "येताजाता इथेतिथे हात नको लावत जाऊस," ती ओरडली. त्याने पाहिलं, तिचा राग लटका नव्हता.
"एवढं काय...?"
"एवढं काय म्हणजे? तुला जराही शरम नाही वाटत थेट बायकांच्या छातीकडे बघायला?" त्याला काहीच कळेना. "मला बघायला आला होतास तेव्हाही तुझं लक्ष माझ्या तिकडेच होतं!" चकित होऊन तो तिच्याकडे बघतच राहिला. हे त्याला अनपेक्षित होतं आणि तेही आज इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदा?

कुठली गोष्ट कुठे चालली याचा त्याला काही अंदाजच लागेना.
"आपल्यालाही मुलगी आहे याचा विचार करावा जरा माणसाने..."
"तू जरा थेट बोलशील का? कोणाच्या छातीकडे मी बघत होतो ते?" त्याने घुश्श्यात विचारलं.
"म्हणून तर ती दीपाली थांबली नाही!"

त्याच्या डोक्यात प्रकाश पडला! म्हणजे हे...

पण मी केव्हा तिच्या छातीकडे? आठवूनही तसलं काही केल्याचं त्याला आठवेना. मदत करावी या उद्देशाने तो तिच्याशी जरा गोड बोलला असेन एवढंच.

त्याला भयंकर राग आला. चीडही आली.
"बाहेर चाललो मी. सात-आठ दिवस नाही येणार," रागातच तिला काही बोलू न देता तो घराबाहेर पडला.

***

अर्थात हे झालं तत्कालीन कारण. नुसत्या या एका कारणामुळे तो नक्कीच नाही पडला घराबाहेर. पण आता घराबाहेर पडून सहा दिवस झालेत आणि त्याची उत्तरं त्याला सापडत नाही या त्रासापेक्षाही मुळात आपण कोणत्या प्रश्नांची उत्तरं शोधतोय ते प्रश्नच आपल्याला गवसत नाहीत याचा त्याला अधिक त्रास व्हायला लागला होता.

खरं तर निर्मलेने उकरून काढलेला मुद्दा महत्त्वाचा नव्हताच. साऱ्यांच बायकांना माहीत असतं की वेळ आणि प्रसंग मिळाला की आपला पुरुष चोरटी का होईना एक नजर परस्त्रीच्या छाताडावर टाकतोच टाकतो. ऐंशी टक्के पुरुषांत तसलं साॅफ्टवेअर आधीपासूनच असतं.

पण मग एकाएकी आपल्यावर घाणेरडे आरोप करून निर्मलेला काय सुचवायचं आहे? तू वाईट नजरेचा; मी चांगली असा भेद करून काय साध्य करायचं आहे तिला? हा फरक ठळक करून दाखवायची गरज का भासते आहे तिला?

पण बराच वेळ विचार करूनही ते नेमकं कारण त्याच्या काही लक्षात येईना.
त्याला वाटलं, मुद्दा यापेक्षा काहीतरी वेगळाच आहे !
पण मग जर मुद्दा वेगळाच आहे तर तो मुद्दा कोणता?
तो तिने सांगितलाच नाही. आणि तिने सांगितल्याशिवाय तो आपल्याला कळणार तरी कसा?
तो एकाएकी उठून बसला. काहीतरी गवसतंय असं जाणवायला लागलं होतं त्याला.

अचानक काही गोष्टी नव्याने त्याच्या ध्यानात यायला लागल्या होत्या. लग्नाला इतकी वर्षं झाल्यावरही आपल्या नात्यात मोकळेपणा आलाच नाही. तो मोकळेपणा न येण्यात तिच्यासोबत आपणही तेवढेच जबाबदार आहोत. आपण तिला कधी निवांतपणे बसवून मोकळ्या मनाने कधी बोललोच नाही. त्या दिवशीसुद्धा आपण तिच्याशी शांतपणे बोललो असतो तर कदाचित इथवर गोष्टी आल्या नसत्या. कदाचित दीपालीचा मुद्दासुद्धा इतक्या आडवळणाने तिला पोहोचवावा लागला नसता आपल्यापर्यंत?

मात्र एकाएकी आपलं लग्न बहुदा धोकादायक वळणावर आलंय याची जाणीव होताच तो दचकलाच. अस्वस्थपणे तो आपल्या खोलीत उगाच फेऱ्या मारत राहिला बराच वेळ. सुरुवातीचा तो धक्का उलटून गेल्यावर मात्र थोड्या वेळाने त्याला जाणवलं की आता आपल्याला बरं वाटायला लागलंय. गुंतागुंत झालेला लांबलचक दोरा उलगडल्यामुळे मनातून हुरहूर जशी एकदाची हद्दपार होते तसली काहीशी ही भावना होती.

मात्र या बरं वाटण्याला चांगलं समजायचं की चिंताजनक हे मात्र त्याला ठरवता येईना.

***

सकाळीसकाळीच प्रयाग उगवला, अगदी झकपक कपडे घालून तयार झालेला. विघ्नेश नुकताच उठला होता. रात्री उशिरापर्यंत झोप लागलीच नव्हती त्याला. त्यामुळे ऊर्जा कमीच वाटत होती शरीरात.

"मी चार दिवसांसाठी बाहेर चाललोय म्हणून म्हटलं भेटून घ्यावं," तो म्हणाला. "तुझा काय प्लान?"
"...अं..." खरं तर त्याच्या डोक्यात काहीच नव्हतं.काही ठरलंच नव्हतं.
तेवढ्यात प्रयागच म्हणाला, "अॅक्चुली चार दिवसानंतरचं बुकिंग आहे या खोलीचं. इटालियन कपल. दोन महिन्यांआधीच झालेलं. नूपुर म्हणाली, आधीच सांगून दे विघ्नेशला नाहीतर मग त्याची दुसरी खोली शोधायला धावपळ होईल."
मग त्याच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला, "विघ्नेश डोन्ट टेक अदरवाइज यार, बुकिंग नसतं तर मी खरंच बोललो नसतो..."
"अरे, वेडा आहेस का? मी दोन दिवसांनी निघणारच होतो. आपली भेटच नाही झाली ना म्हणून नाही सांगता आलं. मलाही कळतं रे, शेवटी बिझनेस इज बिझनेस," तो हसत बोलला.
"चल, तू एन्जॉय. मी निघतो आता. बाहेर गाडी उभी आहे."

लगबगीने प्रयाग निघून गेला आणि विघ्नेशला जाणवलं, कोणतेही निर्णय अनंत काळासाठी नाही टाकता येत लांबणीवर. खोली काय, आज उद्यात सोडून देऊ ती. पण निर्मला? तिच्या बाबतीत काय?

हीच जर एखादी कथा असती आणि घर सोडून गेलेल्या नायकाने घरी परतावं की नाही हा संघर्ष उभा झाला असता तर

बिनदिक्कतपणे काहीतरी युक्ती करत नायकाचं त्याच्या बायकोशी समेट घडवून त्याने नायकाला घरी पाठवला असता. पण ही कथा नव्हती आणि समेट घडवून आणल्यावर कथेसारखी ती एकदाची संपणारही नव्हती. परत-परत तसेच प्रसंग उद्भवण्याची शक्यता इथे मुळात जास्त होती आणि म्हणूनच घरी परतण्याबाबत तो साशंक होता. आपली भेट झाल्यावर अबीरने नक्कीच निर्मलेला निरोप पोहोचवला असेल. मात्र आज दोन दिवस उलटले तरी ती त्याला भेटायला आली नव्हती. ती कसली वाट बघतेय? त्याच्यी स्वतःहून परतण्याची? ही तिची नेहमीची सवय आहे. भांडण उकरून काढायला तिचा पुढाकार असतो, मात्र एक पाऊल मागे घेत भांडण मिटवायला ती नेहमीच मागे असते.

तो माघार घेईल हे तिने नेहमीच गृहीत धरलेलं असतं.
एकाएकी त्याच्या लक्षात आलं- हेच ते!
त्याचं घरातून बाहेर पडण्याचं खरं कारण ते हेच - तिचं त्याला नेहमी गृहीत धरणं!
त्याला जो वेगळा मुद्दा वाटत होता तो हाच होता.

मनाने तू माझ्यापेक्षा मजबूत नाहीस आणि म्हणून प्रत्येक वेळेस तूच नाक घासत माझ्यापर्यंत यायला हवंस हेच ती ठसवू बघते आहे. दीपालीच्या प्रसंगातही तिला हेच सुचवायचं होतं, नव्हे ठसवायचं होतं म्हणून आपली मुलींच्या बाबतीत तशी कारकीर्द नसतानासुद्धा तिने आपल्यावर तसले आरोप केले.

आताही तिला हेच वाटत असेल की एकदाची आपल्या मनात चुकल्याची भावना प्रबळ झाली की आपणच स्वतःहून घरी परतू.
अर्थात अजूनही ती त्याला गृहीतच धरते आहे, तो घर सोडून निघून गेला तरीसुद्धा.
एकाएकी त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रचंड राग दाटून आला. घर सोडताना तिच्याबद्दल जी चीड निर्माण झाली होती तीच परत त्याच्या नसानसात उसळून आली.

काय करायचं या निर्मलेचं?

***

तो पोहोचला तेव्हा दिवस बराच उजाडला होता. बाबा, काकूच्या आंघोळी आटोपून त्यांचा नाश्ताही झाला होता. त्याला बघताच दोघांच्याही चेहऱ्यावर तेज उमललं. हसत दोघेही सामोरे आले.

पण सकाळी-सकाळी कसं काय येणं केलं ते मात्र कोणी नाही विचारलं त्याला.
आंघोळ आटोपून मग त्यानेही नाश्ता उरकला.
"मी वासुदेवासोबत शेतावर जाऊन येतो जरा," नाश्ता झाल्यावर त्याने सांगून टाकलं.
"सांभाळून जा रे बाबा. आतल्या पायरस्त्यावर काटी उगवलीत बरीच. या आठवड्यात काढायची होती पण या देवाला फुरसत तर मिळायला हवी," काकूने वासुदेवाला सुनावत त्याला सांगितलं .काकू त्याला देवाच म्हणून हाक मारते.
आता शेतावर जात आहोत तर आज काटी उपटायचीच या हिशोबाने त्याने वासुदेवाला कुऱ्हाड सोबत घ्यायला सांगितली.

मग दिवसभर तो शेतावरच थांबला. कुऱ्हाडीने काटी तर काढलीच पण विहिरीवरचं इंजिनही उघडून त्याने साफसूफ करून टाकलं. दुपारी कोणीतरी जेवण घेऊन आला. जेवण झाल्यावर मळ्यातच त्याने चांगली दीर्घ झोप काढली. मग संध्याकाळी कांद्याला पाणी करायचं कामही त्यानेच उरकलं.

घरी जाताना त्याच्या लक्षात आलं, नेहमीप्रमाणे आज आपण निर्मलेचा एक पैशानेही विचार नाही केला. वर्तमानात होतो सबंध दिवस आज आपण, विचारात नव्हतोच मुळी.

संध्याकाळी जेवणं उरकल्यावर तो नेहमीप्रमाणे टेरेसवर गेला. शतपावलीच्या चार चकरा मारून तो खाटेवर बसला तोच त्याला बाबा पायऱ्या चढून वर येताना दिसले. तो उठून उभा झाला. पायाच्या दुखण्यामुळे बाबा सहसा टेरेसवर येत नाहीत. त्याला नवल वाटलं.
"आज आकाश मस्त निरभ्र आहे. सूर्यप्रकाशात लखलख चकाकणाऱ्या नितळ पाण्यासारख्या चांदण्याही चमकतायत. आकाशाच्या अगदी जवळ जावसं वाटतंय आज… आणि हळूच हात लावावं त्यांना." तो ऐकत राहिला. बाबा आत्ममग्न व्हायला लागले की असं काव्यात्मक बोलतात.

"...आकाशाच्या ह्या विस्तीर्ण पसाऱ्याकडे पाहिल्यानंतर स्वतःकडे लक्ष गेलं की माझ्या अंगोपांगी एकच भावना उमटते, मस्त जागून घ्यावं, बेभान आणि मनमुराद! ह्या अमर्याद विश्वात आपण आलो ते कुढत-कुढत जगायला नव्हेच मुळी..."

विघ्नेश भान हरपून ऐकत बसला त्यांचं बोलणं. किती तरी वेळ!
"मी काही दिवस इथेच राहीन म्हणतो," तो एकाएकी बोलून गेला. "किती दिवस ते नाही सांगता येणार. कदाचित आता एकदाचा निर्णय घ्यावाच लागेल अशी वेळ येईपर्यंतसुद्धा राहीन किंवा..."
बाबांनी त्याच्या खांद्यावर थोपटलं. हसत म्हणाले, "कुठेतरी एकाएकी नाहीसं होण्यापेक्षा हे उत्तम आहे!"
तो चमकलाच!

घरून निघालो तेव्हा आपण नेमकं कुठेतरी एकाएकी नाहीसं होण्याचाच विचार करत होतो. पण बाबांना हे कसं कळलं?

त्याने चटकन बाबांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांत एखादी सुरकुती नाहीसे होण्याच्या अनुभवाची नक्कीच असावी असं त्याला वाटून गेलं.

अन् तो योगायोग लक्षात येताच तो अंतर्बाह्य थरारला.

***

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

छान कथा!