एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १७

दोन समाजसुधारक राजे

सुधीर भिडे

भाग सात आणि आठमध्ये आपण त्या काळात धर्माची काय स्थिती होती आणि धार्मिक सुधारणेसाठी काय प्रयत्न झाले याचा विचार केला. त्यानंतर पुढच्या चार भागात आपण दलित आणि स्त्रियांचे काय प्रश्न होते ते पाहिले. गेल्या दोन भागांपासून आपण समाजाच्या स्थितीचा विचार करत आहोत. गेल्या भागात समाजसुधारकांचा विचार केला. या भागात बॉम्बे प्रेसिडेंसीमधील दोन समाजसुधारक राजांच्या कामाकडे पाहणार आहोत.

शाहू महाराज

(माहिती मराठी विश्वकोशातून)

शाहू महाराजांचा जन्म १८७४ साली घाटगे घराण्यात झाला. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले (१८८४). त्यांचे शिक्षण राजकोट व धारवाड येथे झाले. त्यांना राज्याधिकार १८९४ साली प्राप्त झाला. प्रशासनात त्यांनी बहुजन समाजातील गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमण्यास सुरुवात केली. १९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला. तेथील भौतिक प्रगतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले.

बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्याचे दारिद्र्य, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला (१९१७). प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता.

मागासलेल्या वर्गांच्या उन्नतीसाठी शाहू महाराजांनी मोठे प्रयत्न केले. स्वराज्याच्या आधी जातिभेदाच्या शृंखला तोडण्याची त्यांना गरज वाटत होती. स्वतःच्या वागणुकीतून त्यांनी समाजाला दिशा दाखविली. स्वतःच्या कुटुंबातील विवाह समारंभात त्यांनी घोडागाडीसाठी अस्पृश्य कोचमन नेमले. राजदरबारी द्वारावर असलेल्या रक्षकपदी महाराची नेमणूक केली. गावातील बलुते पद्धत त्यांनी कायद्याने बंद केली. काही कामे अस्पृश्यांनीच करायची हा प्रकार बंद केला. गावात कुलकर्णी आणि तलाठी या जागांवर अस्पृश्यांची नेमणूक चालू केली. संस्थानातील दवाखान्यात अस्पृश्यांना इलाज देणे चालू केले. ज्या डॉक्टर आणि नर्सेसनी अस्पृश्यांवर इलाज करण्यास नकार दिला त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. संस्थानातील सर्व शाळांतून अस्पृश्य आणि सवर्ण मुलांना एकच वागणूक सुरू केली. अस्पृश्य मुले वर्गात बसू लागली. कोल्हापूर नगरपालिकेत अस्पृश्यांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या. सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे त्यांना स्वतःला जेवण देणारा नोकर अस्पृश्य नेमण्यात आला. अशा अलौकिक उदाहरणामुळे अस्पृश्य त्यांना देव समजू लागले. हे बदल अर्थातच कोल्हापूर संस्थानात लागू झाले. पण त्याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रात उमटले.शाहू महाराज

१९०२ साली महाराजांनी नोकरीत मागासलेल्या वर्गांसाठी ५०% जागा राखून ठेवाव्यात असा हुकूम काढला. याच बरोबर संस्थानाच्या खात्यात ब्राह्मणेतर लोकांची नेमणूक चालू झाली.

१८९४ - एकूण अधिकारी ७१, ब्राह्मण अधिकारी – ६०
१९१२ – एकूण अधिकारी ९५, ब्राह्मण अधिकारी – ३५
या आकडेवारीवरून आपल्याला ब्राह्मणांचे वर्चस्व किती कमी झाले ते कळते.

शाहूंनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. अल्लादियां खाँ, हैदरबक्ष खाँ, भूर्जी खाँ, सुरश्री केसरबाई, गानचंद्रिका अंजनीबाई मालपेकर अशा अनेक कलाकारांनी शाहूंच्या आश्रयाने किर्ती संपादन केली. त्यांनी अनेक नाटक कलावंतांनाही पुढे आणले. त्यांचे निधन मुंबईत, वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी झाले.

महाराष्ट्रातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर दुही

एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात ब्राह्मण-ब्राह्मणेतर दुहीला सुरुवात झाली. तीन निरनिराळ्या लेखकांनी याविषयी काय लिहिले आहे ते पाहू.

महाराष्ट्राच्या इतिहासाची चर्चा ब्राह्मणेतर चळवळीचा संदर्भ घेतल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक अशा सर्वच बाजू या चळवळीत होत्या. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात ब्राह्मणांच्या हाती ज्ञानसत्ता, अर्थसत्ता आणि धर्मसत्ता याचे झालेले केंद्रीकरण याची ब्राह्मणेतर चळवळ ही प्रतिक्रिया होती.

– देवकुमार अहिरे, मिळून साऱ्याजणी, एप्रिल २०२२

खालील माहिती डॉ. सदानंद मोरे यांच्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या पुस्तकातून घेतली आहे. (सकाळ प्रकाशन, २०१९)

या दुहीची बीजे शेकडो वर्षांपूर्वी रोवली गेली. धर्मशास्त्राची परंपरा असे सांगते की नंद हे अखेरचे क्षत्रिय घराणे असून पुढील क्षत्रियांत संकर झाल्याने क्षत्रिय आणि वैश्य या दोन वर्णांचे अस्तित्वच संपुष्टात आले. त्यामुळे ब्राह्मण आणि उर्वरित शूद्र अशी व्यवस्था झाली. (पृष्ठ ९८) त्यामुळे अठराव्या शतकात समाजात तीन वर्ण होते, ब्राह्मण, शूद्र आणि अस्पृश्य. ही ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर दुहीची सुरुवात होती. ब्राह्मणेतरांची समस्या ही, दक्षिण वगळता, देशाच्या इतर प्रांतामध्ये महाराष्ट्राइतकी गंभीर नव्हती. महाराष्ट्रात पेशवाईच्या काळात ब्राह्मणांनी राजकीय सत्तेच्या आधारे खालच्या जातींवर अन्याय केला अशी ब्राह्मणेतरांची तक्रार होती. (पृष्ठ २२१)

१९१६ साली माँटेग्यु-प्रणित सुधारणांमध्ये प्रोविंशियल कौन्सिलात जातीजमातीसाठी राखीव जागांची तरतूद करण्यात आली होती. पात्रता हाच केवळ निकष लावला तर ब्राह्मणेतर जाती मागासलेल्या असल्याने त्यांच्यात पात्र उमेदवार कमीच असणार हे उघड आहे. ब्राह्मण प्रतिनिधी आपल्या हितसंबंधांचे रक्षण करतील असा विश्वास मागास जातींना नव्हता. त्यामुळे येऊ घातलेल्या निवडणुकांत ब्राह्मणेतरांचा गट राजकीय पक्ष म्हणून पुढे येणार हे उघड होते. (पृष्ठ २२०)

The following is from a Conference paper presented at Shivaji University by R. N. Chavan in 1987, sic, original is faithfully reproduced

Non Brahmin movement in Maharashtra fought for self respect, equal status and justice. North India did not require such movement because there was very little dominance of Brahmins. Non Brahmin leaders gave birth to the depressed class movement - Mahatma Phule, Sayajirao Gaikvad, Karmaveer Shinde, Shahu Maharaj, Bhaaurao Patil and many others. Shahu was the main leader of Non Brahmin movement and also the depressed class movement. Both were carried side by side till the death of Shahu. We cannot split these two movements because both were anti Brahmanical religion. Non Brahminical movement including depressed classes movements were also economical and political.

Even though Peshavai was finished, Brahmins took new English education and got all jobs in civil services. In this way they again became the master.

It is true that the Congress was founded for all Indian people irrespective of caste, religion or creed. However, leaders came from upper strata of society. Phule saw that Congress was for upper classes. Shahu Maharaj organised his own Non Brahmin party and got reserved seats in Bombay council. Non Brahmin Party worked for ten or twelve years and turned into a political movement in 1919. However Ambedkar felt that the Non Brahmin Party did not solve problems of untouchables and depressed classes and paved the way for his own politics. After the death of Shahu Maharaj Non Brahmin movement got no strong leadership.

शाहू महाराज आणि ब्राह्मणेतर चळवळ

या भागातील माहिती श्री आ. बा. लठ्ठे यांनी १९२५ साली लिहिलेल्या श्री छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्र, पुनःप्रकाशन वरदा प्रकाशन २०१९, या पुस्तकातून घेतली आहे. शाहू महाराजांच्या ब्राह्मणेतर चळवळीचे तीन भाग होते.
– धार्मिक
– शैक्षणिक
– राजकीय

या चळवळीची सुरुवात १९०० साली उद्भवलेल्या वेदोक्त प्रकरणापासून सुरू झाली. ब्राह्मणेतर समाजाच्या शिक्षणाची सोय महाराजांनी त्याच सुमारास सुरू केली. ब्राह्मणेतर राजकीय चळवळीची सुरुवात त्यांनी १९१६ साली केली.

प्रथम आपण वेदोक्त प्रकरण आणि धार्मिक बदल यांची माहिती घेऊ. क्षत्रिय कोण आणि वेदोक्ताचा अधिकार कोणाला हा वाद कोल्हापूरला या काळात झाला. पुरोहितांची उर्मट आणि कोती मनोवृत्ती वेदोक्त-पुराणोक्त विवादात दिसून येते. पुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे वैदिक कर्मकांडे फक्त ब्राह्मणांसाठीच आहेत. ब्राह्मणांच्या विधीसाठी वेदातील मंत्र वापरून क्रियाकर्म करता येतात, तर ब्राह्मणेतरांसाठी पुराणोक्त कर्मकांडे म्हणजे पुराणातील मंत्र आणि क्रिया आहेत.

या तत्त्वाचा आधार घेऊन शाहू महाराजांच्या पुरोहितांनी त्यांच्यावर वेदोक्त संस्कार करण्याचे नाकारले. पुढे जाऊन त्यांनी शाहू महाराजांना असेही सांगितले की ते क्षत्रिय नाहीत. शाहू महाराजांनी पुरोहितांना सांगून पाहिले की ते शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. तरीही पुरोहित बधले नाहीत. शाहू महाराजांनी मग पुरोहितांची सर्व वतने रद्द केली.

जेव्हा वेदोक्त प्रकरण झाले तेव्हा कोल्हापुरातील शंकराचार्यांच्या मठाचे वैभव आणि सत्ता वरच्या पदावर होती. भिलवडीकर या घराण्यात ही सत्ता वडिलोपार्जित बनली होती. १९०१मध्ये या घराण्यात मठाच्या मालकीवरून अंतस्थ तंटा उपस्थित झाला. मठाच्या उत्पन्नाचा बराचसा भाग कोल्हापूर दरबाराकडून येत होता. या प्रकरणात दरबाराने चौकशी केली. त्यामध्ये आर्थिक अफरातफरीच्या विलक्षण गोष्टी उघडकीस आल्या. शाहू महाराजांनी स्वामींना सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. जेव्हा पितळ उघडे पडेल हे लक्षात आले तेव्हा स्वामी कोल्हापूरहून पळून गेले आणि त्यांनी आपला एक शिष्य ब्रह्मनाळकर यांना मठाधिपती म्हणून नेमले. या 'जगद्‌गुरू'स महाराजांनी मंजुरी दिली नाही. महाराजांनी मठाचे उत्पन्न बंद केले. या ब्रह्मनाळकरांचे पुण्यात लोकमान्य टिळकांनी मोठे स्वागत केले. आता दोन जगद्‌गुरू झाले. पळून गेलेले भिलवडीकर आणि ब्रह्मनाळकर. भिलवडीकरांच्या लक्षात आले की जर महाराजांचे क्षत्रियत्व नाकारले तर उत्पन्न बंद होईल. म्हणून त्यांनी महाराजांना क्षत्रिय घोषित केले. ब्रह्मनाळकर टिळकांच्या पाठिंब्यावर उड्या मारीत होते. जेव्हा उत्पन्नाचे रस्ते बंद झाले तेव्हा दुसऱ्या जगद्‌गुरुनेही नांगी टाकली आणि महाराजांना क्षत्रिय घोषित केले. आता राजोपाध्यांचा मार्ग खुंटला आणि त्यांनीही वेदोक्त विधींना परवानगी दिली. अशा प्रकारे हे वेदोक्त प्रकरण संपले.

या नंतर शाहू महाराजांनी मठप्रमुख नेमण्याचे अधिकार आपल्या हातात घेतले. त्यांनी असा मठाधिकारी नेमला जो सर्व जातींस वैदिक अधिकार आणि शिक्षण देईल. परंतु हा नवा मठाधिकारीही बधण्याची चिन्हे दिसेनात. तेव्हा महाराजांनी क्षात्र जगद्‌गुरूची नेमणूक केली. यानंतर शिवाजी क्षत्रिय-वैदिक पाठशाळा चालू केली. सर्व जातींची सुमारे ६० मुले वैदिक शिक्षण घेऊ लागली. वर्षभरातच राजवाड्यातील सर्व धार्मिक विधी हीच मुले करू लागली.

यानंतर ब्राह्मणेतर चळवळीच्या शैक्षणिक कामाची माहिती घेऊ. ब्राह्मणेतर तरुण पिढीच्या शिक्षणाची सोय करणे आवश्यक आहे हे महाराजांनी ओळखले. सन १९००मध्ये महाराजांनी मराठा विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंग स्कूल चालू केले. या पाठोपाठ १९०२ साली जैन वसतिगृह चालू करण्यात आले. या नंतर १९०७ साली लिंगायत वसतिगृह अस्तित्वात आले. यानंतर सारस्वत, कायस्थ प्रभू आणि मुसलमान विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे बनली. १९१३ साली सत्यशोधक समाजाची शाळा कोल्हापुरात चालू झाली.

यानंतर आपण ब्राह्मणेतर चळवळीच्या राजकीय कामाकडे वळू. १९१६ साली डेक्कन रयत असोसिएशनची स्थापना झाली. ब्रिटिश सिंहासनाबाबत राजनिष्ठा कायम ठेवून मागासलेल्या वर्गाच्या हितसंबंधांचे संरक्षण करणे, मागासलेल्या वर्गात शिक्षण प्रसार आणि धार्मिक गुलामगिरीतून मुक्तता हे या संस्थेचे हेतू होते. गोऱ्या लोकांच्या मदतीनेच ब्राह्मणांच्या जाचातून आपली मुक्तता होईल असे रयतेस वाटे. १९१७ साली पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिश सत्ता आता भारतात टिकत नाही आणि परत जुनी जुलमी राजवट येण्याची भीती रयतेस वाटू लागली. त्यासाठी शिक्षण आणि धार्मिक गुलामगिरीतून मुक्तता या बरोबरच राजकीय चळवळीची रयतेस जरूर वाटू लागली. तत्कालीन राजकारणात उच्च वर्गाचे महत्त्व होते. त्याकरता ब्राह्मणेतर परिषद स्थापिली गेली. यानंतर ब्राह्मणेतर परिषदेच्या पुण्यातील एका सभेत मारामारी झाली. त्याविषयी महाराज लिहितात – ब्राह्मण लोकांचे पुढारी इतक्या नीचपणाचे धोरण स्वीकारण्याइतके पतित आहेत हे माझ्या लक्षात आले नाही. १९२१ साली नवी कौन्सिले अस्तित्वात आली. त्यामध्ये ब्राह्मणेतरांचे काही प्रतिनिधी कायदेमंडळात प्रविष्ट झाले.

सयाजीराव गायकवाड

सयाजीरावांची माहिती साधनाच्या २०२०च्या दिवाळी अंकात बाबा भांड यांनी लिहिलेल्या लेखातून आणि सयाजीराव गायकवाड, लेखक वी. के. चावडा, अनुवाद स. गं. मालशे, नॅशनल बुक ट्रस्ट, १९८७ येथून घेतली आहे.

दत्तकविधान

खंडेराव गायकवाड निवर्तले (१८७०) तेव्हा निपुत्रिक होते. त्यांचे बंधू मल्हारराव गादीवर आले. हे अतिशय दुर्वर्तनी होते. त्यांच्या तीन वर्षांच्या गैरकारभारानंतर त्यांना पदच्युत करण्यात आले आणि खंडेरावाच्या पत्नीला दत्तक घेण्याचा सल्ला देण्यात आला. त्याप्रमाणे १२ वर्षांचे गोपाळराव गायकवाड यांना १८७५ साली दत्तक घेण्यात आले. पुण्याजवळ कवळाने खेड्यात त्यांचा जन्म झाला होता. दत्तक विधांनांनंतर त्यांचे नाव सयाजी ठेवण्यात आले. सयाजी अठरा वर्षांचे होईस्तोवर राज्यकारभार पाहण्यासाठी इंग्रज सरकारने टी. माधवराव यांची दिवाणपदी नेमणूक केली. टी. माधवराव तंजावरचे मराठी ब्राह्मण होते.

शिक्षण

दत्तकविधान झाले तेव्हा सयाजीराव निरक्षर होते. प्रथम इंग्रजी, मराठी, गुजराती आणि उर्दू या भाषांचा अभ्यास चालू झाला. या नंतर भूगोल, इतिहास आणि गणित या विषयांची जोड देण्यात आली. या काळात सयाजीरावांना आपल्या खऱ्या आईवडिलांना भेटण्याची परवानगी नव्हती. दत्तकविधानानंतर लगेचच त्यांची मुंबई भेट झाली. प्रिन्स ऑफ वेल्स मुंबईला आले होते. त्यानिमित्त सयाजीराव मुंबईला गेले. पुढच्याच वर्षी ते दिल्ली दरबारात भाग घेण्यासाठी दिल्लीला गेले. त्यांच्या बरोबर १०००च्या अधिक बडोद्याचे दरबारी होते. याशिवाय १८० हत्ती, उंट, बैल असे प्राणीही बडोद्याहून नेण्यात आले. दिल्ली दरबारात त्यांना ‘ब्रिटिश सरकारचा लाडका पुत्र‘ हा किताब देण्यात आला. सयाजीराव अठरा वर्षांचे होईस्तोवर त्यांचे शिक्षण पूर्ण झाले होते.

राज्यारोहण

१८७५ साली त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला परंतु कारभार पूर्वीच्या कारभाऱ्यांच्या हातात होता. १८८१मध्ये त्यांच्या हातात पूर्ण सत्ता आली. मराठी बोलणारा मराठा गुजराती बोलणाऱ्या लोकांवर राज्य करू लागला. त्यांनी केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा घेऊ.

 • जातपात, वर्ण, धर्म यांचा विचार न करता त्यांनी योग्य अधिकारी नेमले.
 • जमीनसाऱ्याचे दर कमी करून जमिनीच्या प्रतीनुसार करआकारणी सुरू केली.
 • प्रशासनाचे विकेंद्रीकरण केले.
 • कायदेसंहिता तयार केली.
 • महसूल खाते आणि हिशेब तपासणी ही कामे निराळी करण्यात आली.
 • बडोदा कॉटन आणि स्पिनिंग मिल चालू केली.
 • बडोद्यात पाणीपुरवठा योजना चालू केली.
 • आधुनिक रुग्णालय बांधले.
 • सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण चालू केले.
 • दर वर्षी तीस या प्रमाणे पाच वर्षांत राज्यात दीडशे शाळा चालू केल्या.
 • लोहमार्गाने राज्यातील प्रमुख शहरे बडोद्याला जोडली.
 • बँक ऑफ बरोडा सुरू केली.
 • स्थानिक स्वराज्य संस्थांची सुरुवात केली.
 • कृषिसंशोधन केंद्र सुरू केले.

महाराष्ट्राच्या प्रगतीत सयाजीरावांचे योगदान दुर्लक्षित राहिलेले दिसते. याचे कारण भाषावार प्रांत रचनेनंतर बडोदा संस्थान गुजरात राज्यामध्ये गेले हे असावे. इतिहासाच्या चिकित्सक अभ्यासकांनी सयाजीरावांच्या कामाकडे का दुर्लक्ष केले हा प्रश्न अनुत्तरित आहे. सयाजीरावांच्या कारकीर्दीचा कालखंड साधारण १८८० ते १९३० अशी पन्नास वर्षे आहे. या काळात बडोदा संस्थान निराळे असले तरी ते बॉम्बे प्रॉव्हिन्सच्या भौगोलिक सीमेत होते. त्यामुळे कोल्हापूर संस्थान आणि बडोदे संस्थान यांची स्थिती महाराष्ट्राच्या दृष्टीने एकच होती.

सयाजीराव आणि त्यांचा बडोद्यातील राजवाडा

महाराष्ट्रातील समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना त्यांनी ९० कोटी रुपयांची मदत केली. त्याचे आजचे मूल्य १,८०,००० कोटी एवढे होईल. १९०९ साली महाराजांनी डिप्रेस्ड क्लासेस हा निबंध लिहिला. अस्पृश्योद्धाराची सुरुवात त्यांनी राजवाड्यापासून केली. स्वत: अस्पृश्यांबरोबर पंक्तीभोजन चालू केले. अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश चालू केला. बाबासाहेब आंबेडकरांच्या परदेशातील शिक्षणाचा खर्च त्यांनी उचलला. धर्मसुधारणा चालू केल्या. पुरोहितांची परीक्षा घेऊन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यासच पौरोहित्यास परवानगी देण्यास सुरुवात केली. मुलामुलींच्या विवाहाचे किमान वय ठरविले. महाविद्यालयीन स्तरावर धर्मांचा तौलनिक अभ्यास चालू केला.

सयाजीरावांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना दूःखाचा सामना करावा लागला. त्यांची प्रथम पत्नी आणि तीन मुले अकाली निधन पावली. त्यांनी परदेशाच्या तीस वाऱ्या केल्या याबद्दल त्यांची पुष्कळ टीका झाली. त्यांना चेष्टेने अनुपस्थित (अब्सेंटी) राजा संबोधले जायचे. पहिल्या महायुद्धाची पाच वर्षे सोडता ते वर्षातील चार सहा महिने भारताच्या बाहेर असत.

१९२५ साली सयाजीरावांच्या कारकिर्दीची पन्नास वर्षे पूर्ण झाली त्याबद्दल मोठा कार्यक्रम करण्यात आला. बडोद्यात किर्ती मंदिर ही देखणी वास्तू बांधण्यात आली. आधुनिक बडोद्याचे शिल्पकार, सयाजीराव यांचे १९३९ साली मुंबईत निधन झाले.

शाहू – सयाजीराव संबंध

महाराष्ट्राच्या इतिहासात शाहू आणि सयाजीरावांची मैत्री ही माहीत नसलेली गोष्ट आहे.

(साप्ताहिक साधना, दिनेश पाटील, २६ जून २१)

सयाजी-शाहू पत्रव्यवहार चाळला तरी महाराजा सयाजीराव शाहू महाराजांसाठी ‘फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड’ होते या ऐतिहासिक सत्यावर पूर्ण प्रकाश पडतो. सयाजीराव शाहू महाराजांच्या आधी १३ वर्षे गादीवर बसले. कोल्हापुरातील वेदोक्त प्रकरणापासून त्यांच्यात वैचारिक संवाद चालू झाला. शाहू महाराजांच्या वेदोक्ताच्या संघर्षात सयाजीराव शाहू महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. खुद्द सयाजीरावांनी १८९६पासून आपल्या राजवाड्यातील धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीनेच सुरू केली होती.

राजर्षी शाहू आणि खासेराव जाधव यांच्यातील नाते अत्यंत जिव्हाळ्याचे होते. कित्येक प्रसंगी शाहू महाराज खासेरावांना खाजगी पत्रे लिहून महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करत असत. राजर्षी शाहू खासेरावांना गुरुस्थानी मानत होते. तर खासेराव सयाजीरावांचे नातेवाईक आणि विश्वासू अधिकारी होते.

निष्कर्ष

राजकीय नेतृत्वाची इच्छा असेल तर समाजात बदल प्रभावीपणे घडू शकतात हे शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या चरित्रांवरून दिसते. या दोन राजांत एक साम्य म्हणजे दोघेही राजघराण्यात दत्तक गेले होते. शाहूंच्या तुलनेत सयाजीरावांचे पद्धतशीर शिक्षण करण्यात आले. या दोन संस्थानिकांनी आपल्या स्वत:च्या वागणुकीतून समाजापुढे आदर्श ठेवला. मागासवर्गाच्या उद्धाराच्या कामाबरोबर त्यांनी कलाकारांनाही मदत केली. आपल्या संस्थानांत दोघांनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले.

पुढच्या दोन भागात – भाग १८ आणि भाग १९ मध्ये आपण १८५७ सालातील घटनांचा विचार करू.

मागचे भाग -

भाग १ – एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती
भाग २ – अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी
भाग ३ – अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती
भाग ४ – अठराव्या शतकातील शासनयंत्रणा
भाग ५ – धर्मशास्त्रे आणि कर्मकांडी धर्म
भाग ६ – अठराव्या शतकातील धर्माचे स्वरूप
भाग ७ – धार्मिक सुधारणांची आवश्यकता
भाग ८ – धार्मिक सुधारणांचे प्रयत्न
भाग ९ – समाजसुधारणा – दलित कोण आणि कसे?
भाग १० – समाज सुधारणा – दलितांच्या उद्धाराचे प्रयत्न
भाग ११ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १२ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १३ – समाजातील बदल
भाग १४ – समाजातील बदल – मुंबईचा विकास
भाग १५ – समाजातील बदल – पुण्याचा विकास
भाग १६ – समाजातील बदल

लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.

सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण.

सुधीर भिडे

field_vote: 
0
No votes yet