वेदांग ज्योतिष पंचागाबद्दल थोडेसे
भारतीय पंचांगामध्ये असलेली एक मोठी न्यूनता म्हणजे पृथ्वीवरील ऋतू आणि पंचागातील तिथी यांची सांगड घालण्यामधली या पंचांगाची अक्षमता. आपले सगळे सणवार हे पंचांगातील तिथी प्रमाणे येत असतात. परंतु या सणांच्या वेळी हवामान कसे असेल हे सांगणे मोठे दुरापास्त असते कारण हवामान हे ऋतूंप्रमाणे बदलते. पंचांग ऋतूंशी जुलवून घेण्यासाठी पंचांगकर्त्यांना अधिक महिन्यासारख्या नाना क्लुप्त्या योजाव्या लागतात. याच प्रमाणे दुसरी अडचण म्हणजे आपल्या पंचांगातील तिथी या चंद्राच्या कलांशी जुळवलेल्या असतात तर दिवस रात्र हे सूर्य उगवणे मावळणे याच्याशी संबंधित असतात. सध्या प्रचलित असलेल्या सायन पंचांगातील वर्षाचा प्रथम बिंदू चित्रा या तारकेच्या स्थानाशी जोडलेला आहे. परंतु मोठ्या कालावधीमधे हा प्रारंभ बिंदू टिकविणे अशक्यप्राय आहे कारण पृथ्वीच्या परांचन गतीमुळे तार्यांची स्थाने साधारण 72 वर्षाला एक अंश या गतीने बदलत रहातात. आपले सध्याचे सिद्धांत ज्योतिष पंचांग साधारण ई. स. 400 पासून प्रचलित झाले असावे असे मानले जाते.
या आधीच्या कालात भारतात वेदांग ज्योतिष पंचांग प्रचलित होते. या पंचांगाचा कालखंड ई. स.पूर्व 1300 ते ई. स. 400 असावा असे मानले जाते. या कालखंडात अनेक महत्वाच्या घटना भारतवर्षात घडल्या. महाभारत युद्ध याच काळात लढले गेले. बुद्ध आणि महावीर हे याच कालखंडात होऊन गेले. हया पंचागाची थोडक्यात ओळख करून घेणे म्हणूनच रोचक ठरावे. वेदांग ज्योतिष खालील मुद्द्यांवर आधारित होते असे म्हणता येते.
1. वर्ष हे एकक न मानता पाच वर्षाचे युग हे कालगणनेचे एकक होते. या युगात संवत्सर, परिवत्सर, इदावत्सर, अनुवत्सर आणि इद्वत्सर अशी पाच वर्षे गणली जात. या पाच वर्षात 60 सौरमास असत तर 62 चंद्रमास असत. 1830 सौरदिन तर 1860 तिथी असत. सौरमास व चंद्रमास यांची संख्या एकसारखी करण्यासाठी एका युगात 2 महिने अधिक समजत असत. एका युगात लोप झालेल्या तिथी 30 असत.
2. वर्षाचा प्रारंभ अवष्टंभ (22 डिसेंबर किंवा Winter solstice) या दिवसानंतर येत असलेल्या शुक्ल प्रतिपदेपासून पासून सुरू होत असे. ज्या वेळी हे पंचांग प्रचलित झाले त्या कालात सूर्य धनिष्ठा (Delphinus) या नक्षत्रासमोर वर्षारंभी असे. वर उल्लेख केल्याप्रमाणे पृथ्वीच्या परांचन गतीमुळे वर्षारंभाचे नक्षत्र बदलत गेले. महाभारत काली ते श्रवण (Capricorn) नक्षत्र होते तर वराहमित्राच्या कालात (इ.स.640) ते पुनर्वसू (Gemini) होते.
3. वर्षारंभकाली असणार्या सूर्य नक्षत्रावर अवलंबून येत नाही ही गोष्ट लक्षात आल्याने या पंचांगात वेळोवेळी बदल केले गेले. 30/35 वर्षाच्या कालात येणारे अधिक महिने कमीजास्त करुन वर्षारंभ अवष्टंभ दिनाजवळ राहील अशी व्यवस्था केली गेली.
4. वर्षात 12 मास असत. त्यांची नावे व क्रम हा सिद्धांत ज्योतिष पंचांगाप्रमाणेच असला तरी माघ हा वर्षाचा पहिला चंद्रमास असे. श्रावण किंवा माघ हे महिनेच अधिक मास म्हणून वर्षात मिळवले जात. एका चंद्रमासात दोन पक्ष व 30 तिथी असत. या कालात राशी ही संकल्पना भारतात नसल्याने महिन्यांची नावे सध्यासारखीच त्या कालातील सूर्य नक्षत्राशी जोडलेली होती.
हे पंचांग वापरातून कमी होण्याची नक्की कारणे देणे शक्य नाही. कदाचित युग आणि वर्षे यांची गणिते त्रासदायक होत असतील. वराहमिहिर या पंचांगाला, पितामह किंवा ब्रम्हाने निर्माण केलेले पंचांग असे नाव देतो. हे पंचांग सुद्धा सिद्धांत ज्योतिष पंचांगाप्रमाणेच ऋतू आणि तिथी यांची सांगड घालण्यात अयशस्वीच होते असे वाटते.
या पंचांगाची ही तोंडओळख वाचकाना आवडेल अशी अपेक्षा करतो.
प्रतिक्रिया
भारतीय {सौर} पंचांगामध्ये असलेली एक मोठी न्यूनता
हे पहिले वाक्यच स्पीड ब्रेकर आहे.
मुळात हे उद्योग करण्याचा हेतू काय होता तर ठराविक तिथी-महिन्याला ठरावीक सण असतील असे पंचांग करा असा आदेश वरून निघाला. निधी वर्ग केला,समिती नेमली आणि तसे पंचांग तयार केले.
आता एक धरलं तर दुसरं सुटणारच. मग ओरड (विरोध)कशाला?
सर्वसमावेशक एकच पंचांग करायला ते चंद्र सूर्य काय आपण सांगू तसे भ्रमण करतात काय?
सौर पचांग
हे सौर पंचांग कोठून आले? माझा लेख तर वेदांग ज्योतिष पंचांगाबद्दल आहे..
वेदांग पंचांग आता प्रचलित आहे का कुठे?
मी म्हटलेले भारतीय सौर हे अगदी अलिकडचे आहे . त्यात अयनाचा विचार करून पंचांग केले आहे. तरीही त्रुटी (तृटी) राहणारच. ऋतू पकडले की तिथींची गोची होते.