मृत्यू – भाग ३

भाग ३ – मरणपूर्व प्रक्रिया

As a well spent day brings happy sleep, so life well used brings happy death.
– Leonardo da Vinci
विषयाची मांडणी

मृत्यूचा बदलता चेहेरा
वार्धक्य
डेथ झोन
ब्रोनी वेयरचे अनुभव
हॉस्पिटलमधील मृत्यू
हॉस्पिसची सेवा
कवींच्या दृष्टीतून
– – –

मृत्यूचा बदलता चेहेरा
पूर्वीच्या काळी मरण होते तसे आता राहिले नाही. पूर्वी मरण तरुण वयात आणि बर्‍याच वेळी काही क्रूर प्रसंगानंतर येत असे. फारच थोडे लोक वृद्धावस्था पहात. मरण हा एक प्रसंग असे, आता ती एक प्रक्रिया झाली आहे जी काही वर्षे चालू राहते.

आता आयुष्मान ७५पर्यंत पोचले आहे. संसर्गाच्या रोगाने मरण पुष्कळ कमी झाले आहे. डीजनरेटीव आजारांचे प्रमाण वाढले आहे. आधुनिक वैद्यक मृत्यू दूर करण्यात यशस्वी झाले आहे परंतु त्याला वृद्धत्व दूर ढकलता आलेले नाही. इतक्या जास्त प्रमाणात समाजात वृद्ध असणे ही स्थिती मानवाच्या इतिहासात प्रथमच घडत आहे.

मृत्यू या शब्दाचे तीन अर्थ आहेत – मरण्याची प्रक्रिया, मृत्यूचा प्रसंग आणि मरण पावलेली अवस्था. आपण या भागात पहिल्या अर्थाचा – मरण्याची प्रक्रिया याचा विचार करणार आहोत. मरण हा एक प्रसंग राहिलेला नाही, ती एक काही महिने चालू राहणारी प्रक्रिया झाली आहे. काही (सुदैवी) लोक या प्रक्रियेतून न जाता तात्कालिक मरण पावतात.
मरणाच्या प्रक्रियेच्या तीन अवस्था – स्टेजेस असतात –

  1. वार्धक्य – शारीरिक आणि मानसिक क्षमता कमी होणे, सामाजिक संपर्क कमी होत जाणे, स्मृतीचा नाश होणे,
  2. डेथ झोन – शरीरातील अवयवांचे काम क्षीण होत जाणे. याचा परिणाम हा होतो की व्यक्तीची जगण्याची इच्छा जाते आणि आपले मरण जवळ आले आहे याची जाणीव होते.
  3. मरणाचा प्रसंग

वैद्यकीय व्यवसाय आणि औषध कंपन्या या मृत्यू कसा टाळता येईल याकडे लक्ष देतात. व्यक्तीचा शेवटचा काल कमी त्रासात कसा व्यतीत व्हावा याकडे वैद्यकीय व्यवसायाचे लक्ष नसते. त्यामुळे आयुष्याचा शेवटचा काल अतिकष्टदायक जातो.

वार्धक्य

इंग्रजीत एजिंग असा एक शब्द आहे. याचा समानार्थी मराठी शब्द मला सुचला नाही. एजिंग ही प्रक्रिया आहे जी वयाच्या चाळीस वर्षांपासून सुरू होते आणि व्यक्तीला वार्धक्याकडे घेऊन जाते. वार्धक्यात ज्ञानेंद्रियांची क्षमता कमी होते – दिसणे आणि ऐकणे कमी होते. हाडांच्या सांध्यात झीज होते. स्नायू आक्रसतात, आपले हृदय आणि मूत्रपिंडे कमी क्षमतेने काम करतात. फुफ्फुसाची प्राणवायू शोषून घेण्याची क्षमता कमी होते. त्वचेला सुरकुत्या पडतात. स्मरणशक्तीचा ऱ्हास होतो.

साधारणपणे ७५ वयानंतर शरीराची अवस्था नाजुक झालेली असते. मधुमेह, उच्च रक्तदाब, मोतिबिंदू, संधिवात, प्रोस्टेट यासारख्या व्याधी चालू झालेल्या असतात. यानंतर उच्च श्रेणीतील व्याधी – हृदयविकार, कॅन्सर, पक्षघात, पार्किन्सन्स, अल्झायमर्स, advanced rheumatoid arthritis, chronic obstructive pulmonary disease यांचे आगमन होते.

वृद्ध व्यक्तींत वजन कमी होणे ही एक महत्वाची खूण असते. ७५च्या आसपास वय असलेल्या १६,००० व्यक्तींची चार वर्षे पाहणी करण्यात आली. (Journal of American Medical Association, टाईम्स, १२ एप्रिल २०२३ )


Weight loss and Death

वजनाबरोबर कंबर बारीक होणे ही पण एक खूण होती. याच काळात थोडी वजनवाढ यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढलेले दिसले नाही.

ज्यांचे वजन कमी झाले नाही अशा ८.८% व्यक्ती निरनिराळ्या कारणांनी चार वर्षांत मृत्यू पावल्या. ज्यांचे वजन कमी झाले अशा व्यक्तींच्या बाबतीत जितके वजन कमी झाले तेवढी मृत्यूची शक्यता वाढली. कर्करोग आणि हृदयरोग ही मृत्यूची प्रमुख कारणे होती. वृद्ध व्यक्तींनी आपल्या वजनाकडे लक्ष दिले पाहिजे. वजन कमी होत असल्यास तपासणी केलेली चांगली. याशिवाय हाताला कंप चालू होणे, एक जिना चढल्यावर दम लागणे, कारण नसताना मधूनमधून थोडा ताप येणे अशी साधी कारणे मोठ्या आजाराचे निदर्शक असू शकतात. आपण लवकर मरणार आहोत हे माहीत हवे.

वार्धक्याच्या पुढच्या स्थितीत व्यक्ती बेडरिडन होते. व्यक्तीच्या बोलण्यात मी आणि माझा आजार हेच विषय राहतात. अशा व्यक्तीची सहा-आठ महिने देखभाल केल्यावर घरातील माणसे कंटाळतात.

या सुमारास एखादी छोटी घटना व्यक्तीला डेथ झोनमध्ये घेऊन जाते.

डेथ झोन

फिलिप गुल्ड इंग्लंडमध्ये लेबर पार्टीत काम करायचे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक म्हणून पण काम करायचे. २००८ साली त्यांना कॅन्सरचे निदान झाले आणि २०१२ साली त्यांचा मृत्यू झाला. या चार वर्षांच्या मृत्यूपर्यंतच्या प्रवासाचा अनुभव त्यांनी लिहून ठेवला. मृत्यूनंतर ‘When I die’ हे त्यांच्या अनुभवांवर आधारित पुस्तक प्रसिद्ध झाले. पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणाचे नाव डेथ झोन असे होते. डेथ झोनची कल्पना अशी की त्या स्थितीतून रोगी मृत्यूच्या दिशेने वाटचाल करू लागतो. आणि रोग्यास याची कल्पना असते. हा काळ काही आठवडे किंवा महिने असू शकतो. मृत्यूच्या वेळी त्यांनी आपल्या दोन मुलींना बोलावून घेतले. मुलींनी दोन हात धरले होते. पत्नी नजरेसमोर पायाशी होती. अशा स्थितीत त्यांनी शांतपणे प्राण सोडला.

व्यक्तीच्या दृष्टीने आपल्या आयुष्यातील या शेवटच्या भागाचे सत्य समजणे हे महत्त्वाचे असते. डेथ झोनमध्ये व्यक्ती तीव्र भावनांनी जगतात. एक कॉफीचा कप खूप आनंद देऊन जातो. शेवट किती शांतपणे यावा हे व्यक्तीच्या हातात असते. व्यक्तीने एकदा मृत्यूचे सत्य समजून घेतले की व्यक्ती सामाजिक आणि मानसिक मृत्यूच्या जवळ जाते.
डेथ झोनमध्ये गेलेली व्यक्ती चार अवस्थांतून जाते.

  1. प्रथम अविश्वास – मलाच हा त्रास का व्हावा
  2. त्यानंतर राग – डॉक्टरांवर, जगावर राग
  3. मग डिप्रेशन, नैराश्य
  4. शेवटी स्वीकृती

या काळात संवाद आणि समुपदेशन या दोन्हींची गरज राहते. तीन प्रकारचा संवाद गरजेचा असतो.


Palliative Care

डेथ झोनमध्ये गेलेल्या व्यक्तीशी सहज रोजचा संवाद चालू ठेवणे महत्त्वाचे असते. होते काय की जवळच्या व्यक्तींना हे माहीत झाले की रोगी काही दिवसाचा सोबती आहे की त्यांचे रोग्याशी बोलणे सीमित होऊन जाते. हे योग्य नाही. सामान्य बोलणे चालू राहिले पाहिजे.

जी व्यक्ती डेथ झोनमध्ये प्रवेश करती झाली आहे त्या व्यक्तीचे समुपदेशन गरजेचे असते. त्या व्यक्तीने मृत्यू हे सत्य मानणे हे जरूर असते. असा संवाद आणि समुपदेशन करणार्‍या व्यक्तीचे मन विकसित हवे. पाश्चात्य देशांत अशा व्यक्तींची खास नेमणूक केलेली असते. जोसेफ शार्प या व्यक्तीला सांगण्यात आले की त्यास HIV संसर्ग झालेला असून त्यास काही वर्षेच आयुष्य आहे. (ही वीस वर्षांपूर्वीची घटना आहे , आता HIV प्राणघातक राहिलेला नाही.) शार्प यांनी आपले नेहमीचे काम सोडून धर्मगुरूचे काम घेतले. त्यानंतर स्वत:च्या मरणापर्यंत त्यांनी डेथ झोनमधील व्यक्तींचे समुपदेशन केले. आपल्या अनुभवावर त्यांनी ‘Living our dying’ हे पुस्तक लिहिले.
याशिवाय डेथ झोनमधील व्यक्तींच्या जवळील नातेवाईकांचे समुपदेशन गरजेचे असते.

ब्रोनी वेयरचे अनुभव

ब्रोनी वेयर ही तरुण मुलगी बँकेतील रुक्ष कामाला कंटाळली. वर्तमानपत्रात तिने एका एजन्सीची जाहिरात पाहिली. एका वृद्ध व्यक्तीला लिव-इन साथीदार हवा होता. तिने ते काम घेतले. मग ब्रोनीच्या लक्षात आले की त्या वृद्ध व्यक्तीने डेथ झोनमध्ये प्रवेश केला आहे. त्या व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत ती त्या व्यक्तीबरोबर राहिली. तिने हे काम इतके चांगले केले की मग ब्रोनीला एकामागून एक डेथ झोनमध्ये गेलेल्या व्यक्तींबरोबर राहण्याचे काम मिळू लागले. तिने पाच-सात वर्षे हे काम केले. या कामाचा मानसिक तणाव एवढा आला की सर्व काम सोडून, एका निर्जन ठिकाणी राहून योग आणि ध्यानधारणा यात ती आपला वेळ व्यतीत करू लागली. मानसिक स्थिती सुधारल्यावर तिने आपल्या अनुभवाविषयी एक पुस्तक लिहिले.
(The top five regrets of the dying. मराठी भाषांतर डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके, मंजुळ प्रकाशन, २०२२.)

ब्रोनीचे सर्व पेशंट्स अर्थातच सांपत्तिक सुस्थितीत होते. नर्सिंग, आणि शिवाय लिव-इन साथीदार ठेवणे त्यांना शक्य होते. या सर्व पेशंट्सना आपण लवकरच मरणार आहोत याची जाणीव होती. ब्रोनीबरोबर या पेशंट्सनी जो संवाद केला तो या पुस्तकात आला आहे. आपला समाज मरणाविषयी विचार करणे आणि मरणाविषयी बोलणे याला तयार नसतो. त्यामुळे मरण या घटनेची तयारी नसते.

डेथ झोनमध्ये गेलेल्या व्यक्तींची मानसिकता कशी असते? त्यांना त्यांच्याबरोबर चोवीस तास राहणारी व्यक्ती असणे हे फार महत्त्वाचे असते. कोणाशी तरी बोलता येणे, हातात हात घेऊन भावना व्यक्त करणे याला डेथ झोनमधील व्यक्तीच्या दृष्टीने महत्त्व असते.

सुरुवातीच्या धक्क्यानंतर बहुतेक जण मृत्युकल्पनेला समजून घेतात. आपल्या व्यतीत केलेल्या आयुष्यासंबंधी विचार करताना मी हे करायला पाहिजे होते किंवा मी हे करायला नको होते असे विचार व्यक्त करतात. याच्या उलट काही व्यक्ती असे समजतात की जे आयुष्य निघून गेले त्याविषयी विचार करण्यात काय अर्थ?

त्यांच्या जवळच्या व्यक्तींबाबत काही गैरसमज असले तर ते दूर करणे काहींच्या बाबतीत महत्त्वाचे ठरते. एका व्यक्तीला तिच्या तरुण वयातील मित्रमैत्रिणींना भेटून फार आनंद झाला.

डेथ झोनमधील व्यक्ती काय अनुभवतात?

पहिली बाब ही की त्यांच्या दैनंदिन व्यवहारात काहीही व्यक्तिगत असे उरत नाही. कमोडवर बसणे, आंघोळ करणे या क्रियांत पण काहीही प्रायव्हसी रहात नाही. स्वाभिमान ही कल्पना पूर्ण सोडून द्यावी लागते. आयुष्याच्या शेवटी इतका थकवा आलेला असतो की भेटीला आलेल्या लोकांबरोबर संवाद पण अवघड होतो. जेव्हा बोलण्याची शक्ती जाते त्यावेळी परिस्थिती अजूनच अवघड होते. कुठे खाज येत असेल तर तेही सांगता येत नाही. या काळात कोणाचा तरी हात पकडणेयातही समाधान असते. डेथ झोनमधील बर्‍याच व्यक्ती आपल्या जवळच्या नातेवाईकांपेक्षा निराळ्याच व्यक्तीची कंपनी योग्य समजतात.

हॉस्पिटलमधील मृत्यू

बर्‍याच लोकांचा मृत्यू हॉस्पिटल्समध्ये होतो. मरण्यासाठी हॉस्पिटल ही अतिशय अयोग्य जागा आहे. हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि सेवकवर्ग यांना रोग्याचे प्राण कसेही करून वाचवायचे याचे शिक्षण दिलेले असते. जी व्यक्ती डेथ झोनमध्ये जाते ती रोगी रहात नाही. मृत्यू हा काही आजार नव्हे. डेथ झोनमधील व्यक्तीला सुखाने मरण यावे याविषयी मेडिकल शिक्षणात काही शिकविले जात नाही. डेथ झोन मधील व्यक्तीला प्रथम हे जेव्हा कळते की त्यांच्याकडे थोडे दिवस आहेत, त्या वेळेला बर्‍याचदा राग ही प्रतिक्रिया असते. हॉस्पिटलमधील सेवकवर्गाला हा राग अजिबात समजत नाही.

एखादी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये मृत झाली की एवढे प्रयत्न करून रोगी मेला याचे डॉक्टरांना दु:ख असते. जेव्हा रोगी मरतो तेव्हा डॉक्टरांच्या दृष्टीने एक केस संपते.
डॉक्टरना मृत्युमुखी असलेल्या रोग्याची कशी काळजी घ्यावी याचे शिक्षण नसते. भारतात नुकतेच अशा प्रकारचे शिक्षण चालू झाले आहे. काही धार्मिक कल्पना आणि जवळच्या नातेवाईकांचे विचार यामुळे शेवटच्या दिवसांतील काळजी हा एक प्रश्नच झाला आहे. (The Psychology of Death, Lawrence Samuel, Ph. D., March 2019)

हॉस्पिसची सेवा

डेथ झोनमधील व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये जी सेवा मिळू शकत नाही ती उणीव हॉस्पिसने दूर करणे अपेक्षित आहे. हॉस्पिसमध्ये व्यक्तीचा आजार बरा करण्याचा उपचार केला जात नाही, परंतु व्यक्तीला आराम कसा मिळेल याचा प्रयत्न केला जातो. याला palliative care ( दुःखशामक काळजी ) म्हणतात. अशा प्रकारच्या संस्थांची आज फार गरज आहे. अशा प्रकारची सेवा देणार्‍या ज्या संस्था आहेत तेथील खर्च सामान्यांना परवडणारा नाही. कॉर्पोरेटस आणि सरकार यांनी मिळून सामान्यांसाठी हॉस्पिस संस्था मोठ्या प्रमाणावर चालू करणे गरजेचे आहे.

एका अंदाजाप्रमाणे भारतात दर वर्षी ५४ लाख लोकांना दुःखशामक काळजीची गरज भासते. दुर्दैवाने त्यापैकी फक्त १% लोकांना ही सुविधा मिळते – Palliative and End of Life Care in India – Current Scenario and the Way Forward, J Assoc Physicians India, 2020 Nov; 68(11):61-65.
इंडियन असोशिएशन ऑफ पॅलिएटीव केअर यांच्या मते पॅलिएटीव केअर म्हणजे जे रोगी अशा आजाराने ग्रासले आहेत की त्यावर उपाय दिसत नाही अशा व्यक्तींना शारीरिक आणि मानसिक उपचार देणे ज्यायोगे त्यांचे उरलेले दिवस कमी कष्टप्रद स्थितीत जातील.

खालील माहिती या लेखातून – Prescription trends at the end of life in a palliative care unit, BMC Palliative Care volume 21, Article number: 65 (2022) Published: 04 May 2022

Palliative care – दु:खशामक उपचार आयुष्याच्या शेवटच्या काळात महत्त्वाचे असतात. या काळात असलेला आजार बरा करणे यासाठीचे उपचार थांबविण्यात येतात. रोगी या स्थितीतून ती एक व्यक्ती बनते. शेवटचे दिवस कमीत कमी वेदनेत जावेत यासाठी प्रयत्न केले जातात. व्यक्तीच्या शेवटच्या काळात शरीरात निरनिराळे बदल होत असतात. जी लक्षणे दिसतात त्यावर औषधे दिली जातात. सामान्यत: दिली जाणारी औषधे –
Opioid analgesics, Antispasmodics, Corticosteroids, (anti-allergy and sense of wellbeing), Laxatives, Antipsychotics.

ही सर्व औषधे जास्त काळ घेतल्यास दुष्परिणाम असतात, पण डेथ झोनमध्ये प्रवेश केलेल्या व्यक्तीच्या दृष्टीने हे महत्त्वाचे नसते.

Palliative care unitमध्ये जाण्याचा किंवा दाखल करण्याचा निर्णय व्यक्तीचा किंवा व्यक्तीच्या नातलगांचा असतो. Palliative care unitसंबंधी गैरसमज आढळतात. माझ्या ओळखीच्या एक व्यक्ती अशा युनिटमध्ये शरीरात निरनिराळ्या नळ्या टाकून सहा महिनेपर्यंत जिवंत ठेवण्यात आल्या. व्यक्तीला कोणत्याही प्रकारची invasive treatment नको हे Palliative care unitला स्पष्ट करावे लागते. अशा वेळी व्यक्तीचे लिव्हिंग विल कामाला येते.

कवींच्या दृष्टीतून

तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे
निद्रिस्त शांत काय आता पडून आहे
गुंफून शेज त्याची हळुवार पाकळ्यांनी
हा वेल मोगर्‍याचा पानी मिटून आहे.

जाई जुई बसून कोन्यात दूर कोठे
अस्फुट गीत मंद हुरहूर बोलताहे
बोले अखेरचे तो आलो इथे रिकामा
सप्रेम द्या निरोप बहरून जात आहे.

आरती प्रभू

हालली का गर्द झाडी मंद झाले दिवे
शीळ आली कापरी अन गारवा हा जाणवे

पायवाटेची अडाणी नागमोडी वक्रता
देतसे देहास वेढे पाय खिळतो चालता
कोण होतो तेही नक्की नाठवे माझे मला
वादळापूर्वीच झालो मी निनावी एकला

लोळ आला अन विजेचा रान सारे पेटले
भूत जन्मापूर्वीचे त्या येथ माझे भेटले
जन्म अन मृत्यूमधे ते ते घरी अन अंतरी
कोण मी अन का इथे मी प्रश्नचिन्हांच्या परी

हालली का गर्द झाडी कापरे झाले दिवे
गोठलेल्या अन गळ्यांचे स्तब्ध येथे पारवे

आरती प्रभू

असणे आता असत असत नसण्यापाशी अडले आहे
जिव्हाळ्याच्या चिता पेटवत बरेच चालणे झाले आहे
माथ्यावरचा आभाळ बाबा सवाल आता पुसत नाही
पृथ्वी झाली पावलाएवढी अल्याड पल्याड दिसत नाही

कुसुमाग्रज

कंठात आर्त ओळी, डोळ्यात प्राण आले
आता समेवरी हे कैवल्यगान आले
चरणावरी स्वरांच्या, मी टेकवून माथा
अर्पून चाललो मी माझी अबोल गाथा
भवताल ऐहिकाचे दोलायमान झाले
आता समेवरी हे कैवल्यगान आले

पैलावरून आला ओंकारनाद कानी
ही दाद ओळखीची ही सोयरी विराणी
संचित युगायुगांचे एका क्षणी मिळाले
आता समेवरी हे कैवल्यगान आले.

या मैफिलीत आता मी तू कुणीच नाही
घे रे सुखात घे रे, घे ईश्वरा तिहाई
लय ताल सूर सारे शून्यात एक झाले
आता समेवरी हे कैवल्यगान आले.

वैभव जोशी

An old man, close to dying, reminisces –
I sit beside the fire and think of all that I have seen
Of meadow flowers and butterflies in summer that I have been
Of yellow leaves and gossamer in autumn that there were
With morning mist and silver sun and wind upon my hair

I sit beside the fire and think of how the world will be
When winter comes without a spring* that I shall ever see
And still there are so many things that I have never seen
In every wood and every spring there is different green

I sit beside the fire and think of people long ago
And people who will see a world that I shall never know
*suggestion of death
JRR Tolkein

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

एजिंग = पिकत जाणे ( पक्व होत जाणे )
च्यूस डे विथ मूरी या नावाचे पुस्तक आहे. अगदी लहानखुरेच आहे. पण डेथ झोन मधे गेलेल्या एका माणसानेच हे लिहिलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख वाचताना मन भूतकाळात गेले. 27 सप्टेंबर 1989 ला माझे वडिल मृत्यूशय्येवर होते. माझे त्यावेळी लग्न व्हायचे होते.पुण्यात स्वत:चे वा भाड्याचे घर नव्हते. सरकारी निवासस्थानासाठी अर्ज दिला होता. पण मिळाले नव्हते तो पर्यंत मी माझ्या प्रकाश सोनवणे या मित्राच्याच रुमवर रहात होतो. वडीलांनाही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यावर तिथे आणले होते.कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यात ते होते. काही तासांचेच ते सोबती होते. ते अर्धवट ग्लानीत बोलत होते.माझ्या मुलाचे लग्न आहे आणि मला मांडवात का जाउ देत नाहीत ही लोक? असे काहीसे ज्याला वातात बडबडणे असे म्हटले जाते. यावरुन त्यांच्या चक्षुपुढे काय दृष्य तरळत असावे याचा अंदाज उपस्थितांना येत होता. नैनं छिंदंति शस्त्राणि नैनं दहति पावक: । असे स्वत:शी म्हणत असतानाच त्यांना शेवटची घर घर लागली व त्यांनी प्राण सोडला.
नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे’ या ओळी ऐकताना आपल्या हृदयात कालवाकालव होते.मृत्युशय्येवरील रुग्णाजवळ अनेकदा जवळच्या व्यक्ती जमलेल्या असतात आणि अखेरच्या क्षणी किमान निरोपाचे काही शब्द बोलता यावेत, अशी त्यांची इच्छा असते. रुग्ण संवाद साधण्या -न साधण्याच्या सीमारेषेवर घोटाळत असतो. त्याला प्रत्यक्ष देता येत नाहीत, अशी उत्तरे तो त्याच्या विचारप्रक्रियेत आणि स्वतःच्याच दृष्टिपटलावर त्या त्या व्यक्तीला आणून देतो. त्या दृष्यपटांच्या लहरी आपल्याला मॉनिटरवर पाहता येतात. असे संशोधन झाले आहे. एखाद्या व्यक्तीची माफी मागण्यापासून ते एखाद्याचे आभार मानण्यापर्यंत किंवा एखादी खंत व्यक्त करण्यापासून ते समाधान व्यक्त करण्यापर्यंत शेकडो भावनांची ही आंदोलने असू शकतात.
वडील विज्ञानाचे शिक्षक. हायस्कूल मधे हेडमास्तर होते. पण जुन्नर तालुक्यात आमचे बेल्हे गाव सोडून अन्य गावांच्या शाळेत होते. ओतूर,नारायणगांव,पिंपळवंडी,आळे अशा गावांतील हायस्कूलमधे होते. आजोबा गेल्यावर मात्र मास्तरकी सोडून घरची परंपरागत शेतीच पाहू लागले होते. पुण्यात आता फ्लॅट घ्यायचा या टप्प्यावर आले असतान कॅन्सरने अगोदरच गाठले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

ह्या वाक्यावर परत आक्षेप आहे.आधुनिक वैद्यक ह्या एकमेव कारण मुळे लोक जास्त जीवंत राहत नाहीत.
बाकी अनेक कारण त्याच्या जोडीला आहे.
1) स्थिरता.
२) कमी युद्धाचे प्रसंग.
३) सिंचन व्यवस्था.
४) शिक्षण.
अनेक घटक जबाबदार आहेत.
माझे वय ५२ वर्ष आहे. एकदा फक्त मलेरिया झाला होता त्या मध्ये आधुनिक वैद्यक शास्त्र नसते तर जीव गेला असता
बाकी एक पण आजार जीवाला धोका होईल असा झाला नाही..
माझे आई चे वय ८२ वर्ष आहे.
जीव जाईल असा आजार अजून पण झाला नाही.
अशी आजू बाजू ल किती तरी लोक आहेत त्यांनी सहज पन्नाशी क्रॉस केली आहे आणि त्या मध्ये आधुनिक वैद्यक शास्त्र शी काही संबंध नाही.
पहिले सर्वात जास्त जीवित हानी.
१) कॉलरा,मलेरिया,क्षय, धनुर्वात, अशा काही आजाराने होत होती.
त्या वर मात केली आहे.
२) covid मध्ये लाखो लोक मेली आहेत,एड्स मध्ये लाखो लोक मेली आहेत..
साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवले हा दावा च साफ चूक आहे.
Covid पेक्षा उपचार आणि लसी मुळे च जास्त लोक मेली असा च खूप लोकांचा संशय आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेश काका ,
मधूनच काय होते हो तुम्हाला ?

1) स्थिरता.
??
२) कमी युद्धाचे प्रसंग.
हे ठीक
३) सिंचन व्यवस्था.
म्हणजे ? सिंचन व्यवस्थेमुळे जीवितहानी कमी झाली म्हणता ?
४) शिक्षण.
??
जरा सांगणार का विस्कटून ?

Covid पेक्षा उपचार आणि लसी मुळे च जास्त लोक मेली असा च खूप लोकांचा संशय आहे
संशय म्हणजे काय ? कुणाचा संशय ? संशय येतो म्हणजे ते खरेच ठरते कि काय ?
काही याविषयी डेटा वगैरे द्याल का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

1) स्थिरता

पहिले रोज युद्धाचे प्रसंग होते .त्या मुळे कोणत्याच क्षेत्रात प्रगती करण्यास योग्य वातावरण नव्हते.
जीवाची भीती नेहमी असायची.
२) युद्धाचे प्रसंग.
राजे महाराजे ह्याचे एकमेव काम रोज हल्ले करा एकमेकावर.
जागतिक संघटना नव्हती.
युनो सारखी.
कोणत्याच सुविधा जनतेला देण्यास राजे बांधील नव्हते.
३) सिंचन व्यवस्था.
हे खूप मोठे काम आहे ये संघटित पने केले तर च सर्वदूर पोचते.
जे काम राज सत्तें नीच करणे अपेक्षित.आहे.
पण राजे महाराजे हे करत नव्हते.
निसर्ग लहरी आहे.
दहा दिवस जरी पावूस पडला नाही तरी पीक वाया जातात.
सिंचन व्यवस्था असेल तर शेती उत्पादन ची हमी असते.
अन्न धान्य चे पुरेसे उत्पादन होते.
अन्न वाचून लोकांचे जीव जात नाहीत.
ते पूर्वी हमखास जात होतें
शिक्षण.
ह्या मुळे लोकांस स्वतःची काळजी कशी घ्यावी हे समजले.
संकटावर उपाय काय कराबेत जे समजले.
Heart attack तंदुरुस्त लोकांना पण हल्ली होत आहेत .
जगात ह्या वर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे .
आणि त्याचा संबंध covid लस,उपचार, covid शी
आहे
ह्या वर जगात चर्चा होत आहे.
तुम्ही वाचत नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1