लाल परी (दमा दम मस्त) कलंदर!

सिंध प्रांत
पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील ग्रामीण भाग हा नेहमीच बाहेरच्या देशातील पर्यटकांसाठी अगदीच वेगळा मामला आहे. मातीची कच्ची घरं, निळ्या फरश्यानी सजवलेले सुफी संतांचे दर्गे, त्यावर उभे असलेले पांढरे मिनार, दोन खेड्यामध्ये काही ठिकाणी वाळवंट व काही ठिकाणी कापूस, भात व उसाचे पीक असलेली शेतं, सिंधू नदीच्या तीरावरील सुपीक जमीन, अशा प्रकारे विविध अंगाने नटलेला हा प्रदेश सिंधू नदीच्या अरबी समुद्रातील संगमापर्यंत विखुरलेला आहे. काही पर्यटकांना हा प्रदेश इजिप्तची आठवण करून देतो. फक्त येथे असलेल्या जमीनदारीचे वर्चस्व, त्यांच्याकडील शस्त्रास्त्राचा साठा, खासगी सैन्य, स्वतंत्र तुरुंग, त्यांच्या कर्जाच्या विळख्यात अडकलेले गुलामी जीवन जगणारे वेठबिगार शेतमजूर, यावरून येथे कायदे - कानून, पोलीस व्यवस्था, न्यायालय आहे की नाही असा संशय येऊ लागतो. गावची गावे रातो रात लुटल्या जातात. लुटारूंना शिक्षा होत नाही; त्यांच्यांवर कुणाचाही वचक नाही. कायद्याचे राज्य नाही.

मुळात सिंध प्रांतात कायदा व सुव्यवस्था राखणे पुरातन काळापासूनच अत्यंत जिकिरीचे होते. डोंगराळ दुर्गम भाग, रणरणते ऊन, पाण्याचे दुर्भिक्ष, इत्यादीमुळे हा प्रदेश नेहमीच भटक्यांची, लुटारूंची, चोर- दरोडेखोरांची, निराश्रितांची, भणंगांची लपून राहण्यासाठी अत्यंत सोईचा होता. याचबरोबर या प्रदेशाने भारतातील हिंदू साधू - सन्याशांना व मध्य एशियातील मुस्लिम फकीर, पीर इत्यादींनासुद्धा आकर्षित केले. गांजा, अफू, भांग या व्यसनांची, एकट्याने मुक्तपणे राहण्याची त्यांची इच्छा पूर्ण करण्यास येथील भौगोलिक परिस्थिती अनुकूल होती. त्यामुळे कालांतराने हा प्रांत हिंदू-मुस्लिम यांचे ऐक्याचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्धीस आला. येथील रहिवाश्यात हिंदूंचे काही रीती-रिवाज व मुस्लिमांचे काही रीती- रिवाज यांचा सुरेख संगम बघण्यास मिळतो. यातूनच सूफी पंथाचा जन्म झाला. सूफी पंथियांनी ही परंपरा पुढे नेली. या प्रदेशातील बहुतेक खेड्यात सूफी संतांच्या दर्ग्यांचे अवशेष सापडतात. काही गावात अजूनही या दर्ग्यांची देखभाल केली जाते. दरवर्षी त्या संतांचे उरुस साजरे केले जातात.

p1

सूफी पंथ
सूफी पंथीयाने येथील गोर गरीबांची काळजी घेतली. त्याना मानसिक आधार दिला. सूफी संतांचे चमत्कारसदृश (मानसिक) रोगोपचार, त्यांची सन्यस्त वृत्ती, परमेश्वराच्या चरणी लीन होण्याचा ध्यास इत्यादीवरून हा पंथ हिंदू धर्माच्या अगदी जवळचा होता की काय अशी शंका येते. सर्व धर्मांची नाळ एकच असून परमेश्वरापाशी जाण्यासाठीचे ते वेगवेगळे मार्ग आहेत, यावर सूफी संतांचा विश्वास होता. त्यांच्या मते देवळात किंवा मशीदीत जावून बाष्कळ कर्मकांड करण्यापेक्षा अंतर्मनातील परमेश्वराशी संवाद साधल्यास स्वत:तच स्वर्ग दिसेल. खुदाचा शोध अंतर्मनातूनच घेतल्यास धर्मग्रंथ, धार्मिक रूढी व परंपरा यांची गरजच भासणार नाही. त्यांच्या याप्रकारच्या प्रबोधनामुळे हिंदू व मुस्लिम धर्मातील सामाऩ्यांना सूफी पंथाचे आकर्षण वाटू लागले. सूफी संतानी त्यांच्या पंथातील बारीक सारीक गोष्टी गाण्याच्या स्वरूपात (कव्वालीत) गात असल्यामुळे अती सामान्यांना त्या कळण्यास सोपे झाले. त्यांची गाणी फक्त तुर्की वा पर्शियन मुस्लिमांसाठीच नव्हत्या तर सिंधी, पंजाबी वा हिंदीतूनही असल्यामुळे ती गाणी लोकप्रिय झाल्या. त्या गाण्यातील उदाहरणं धूळीने माखलेले रस्ते, वाहते पाणी, वाळवंटातील तहान, वाळलेली झाड - झुडप, पाऊस, वारा इत्यादींशी जोडलेले असल्यामुळे कळण्यास त्या फारच सोप्या होत्या व त्यातील आशय ऐकणाऱ्यांच्या मनापर्यंत पोचत होता. सूफी पंथाची ही शिकवण केवळ त्या प्रांतातील मुस्लिमासाठी नव्हती तर भारतातील मुस्लिमांना हिंदुत्वाबद्दल आपुलकी निर्माण करणारी होती. सूफी पंथीयांना हिंदू धर्मातील अनेक ग्रंथ पवित्र वाटत होत्या. त्यांच्यातील अनेक जण योग, ध्यान, तपस्या यांचा अभ्यास करत असत. भर उन्हात तासन तास ध्यान करणाऱ्यांची संख्या कमी नव्हती.

18व्या शतकातील शाह अब्दुल लतीफ हा सूफी संत सिंध व राजस्थान मध्ये भटकत असताना नाथ पंथीयांच्या संपर्कात आला. त्याच्या मते हे साधू व सिद्ध पुरुष श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवण्यात निष्णात असल्यामुळे त्यांना सिद्धी प्राप्त झाली व त्यांच्यातील या अलौकिक शक्तीमुळे ते जमिनीपासून काही अंतरावर तरंगू शकतात, भविष्याचा वेध घेऊ शकतात, मैलो न मैल दूरचा संवाद ऐकू शकतात. या सर्व शक्तीमुळे ते 'महासिद्ध' होतात. हे महासिद्ध हिंदू देव - देवतांच्यापेक्षा जास्त शक्तिवान असतात. शाह अब्दुल लतीफच्या परिक्रमातील अनुभवांचे पद्यस्वरूपातील लेखन त्यांच्या सूर रामकली या संग्रहात सापडते. लतीफच्या मते हिंदू व मुस्लिम धर्मात मुळातच काही फरक नाही. फक्त त्यांच्यातील काही परंपरावाद्यामुळे व त्यांच्या आडमुठेपणामुळे त्यांच्यातील दरी वाढत आहे.

लाल शाहबाज कलंदर
शाह अब्दुल लतीफच्या दर्ग्याच्या ठिकाणी दर वर्षी मोठ्या प्रमाणात उरुस साजरा होतो. इस्लाम धर्माने जे जे काही नाकारलेले आहे त्या सर्व गोष्टी उरुसाच्या वेळी येथे जमलेले करतात. संगीत, नाचगाणे, प्रेम व विरह गीतांची मेहफिल, स्त्रियांचा उत्स्फूर्त सहभाग, भांग-गांजा-अफू यांची नशापाणी, आणि मशीदीतील अल्लाऐवजी एका मृतव्यक्तीला शरण जाणे या गोष्टी इस्लामात निषिद्ध असूनही येथे जाहीरपणे केले जातात. म्हणूनच या सिंधी मुस्लिमावर वहाबी मुल्लांचा राग आहे. परंतु सूफी पंथियांच्या मते ही मुल्ला मंडळी दांभिक व ढोंगी आहेत. कारण आयुष्यात प्रेमाशिवाय दुसरे काही असूच शकत नाही. पैगंबराच्या शिकवणीचा अत्यंत चुकीचा अर्थ लावून मुल्ला-मौलवी सामान्यांची फसवणूक करतात. मुल्लांना फक्त आपले हित कळते. त्यांना तुरुंगातच कोंबले पाहिजे, अशी प्रतिक्रिया सूफी पंथीय व्यक्त करतात.

भित शाह येथील शाह अब्दुल लतीफच्या दर्ग्याच्या ठिकाणापासून जवळच अजून एक असाच भन्नाट लाल शाहबाज कलंदर याचा दर्गा सेहवान या ठिकाणी आहे. लाल शाहबाज कलंदरचे वर्णन लाल ससाणा म्हणूनही केला जातो. सेहवान हे गाव एके काळी शैव पंथियांचे मुख्य ठिकाण होते. या गावाचे या पूर्वीचे नाव शिवस्तान असून त्याचे अपभ्रंश होत होत आज सेहवान म्हणून ओळखले जात असावे. भारत - पाकिस्तान व हिंदू - मुस्लिम यांच्यातील गेल्या 60 वर्षाच्या धुमश्चक्रीतसुद्धा या दर्ग्याचा प्रमुख - सजदा नशीन - एक हिंदूच आहे. व त्याच्यावरच उरुसाची जबाबदारी असते. त्याकाळी वेगवेगळ्या ठिकाणाहून हिंदू साधू, सन्यासी या दर्ग्याला भेट देतात. हिंदू - मुस्लिम भक्त नवस फेडतात. 1970 पर्यंत दर्ग्याच्या बाहेरच्या आवारात दगडी शिवलिंगही येथे होता. तोडफोड होण्याच्या शक्यतेमुळे व भीतीमुळे आता ते शिवलिंग एका खोलीत बंदिस्त आहे.

लाल शाहबाजच्या आशिर्वादासाठी वाळवंटी प्रदेशातील हिंदू येथे जमतात. दर्ग्याची देखभाल करणारे, पाण्याची सोय करणारे हिंदूच असतात. हिंदूंच्या मते लाल शाहबाज कलंदर हा पूर्वजन्मी संस्कृत कवी भर्तृहरी होता. चौथ्या शतकातील हा सन्यासी उज्जैन दरबारातील सुख-ऐश्वर्य यांचा त्याग करून या शिविस्तानमध्ये अंगभर राख फासून तपश्चर्या करू लागला. याच लाल शाहबाजला अनेक सिंधी हिंदू 'झुलेलाल' या नावानेसुद्धा ओळखतात. त्यांच्या मते झुलेलाल हा सिंधू नदीचा रक्षणकर्ता आहे. मात्र मुस्लीम भक्तासाठी लाल शाहबाज कलंदरच सिंधू नदीचा नियंत्रक असतो.
p2

'धमाल'
सेहवान शरीफच्या दर्ग्याला भेट देणारे तेथील दोन गोष्टींचा आवर्जून उल्लेख करत असतात. एक, धमाल व दुसरे लाल परी मस्तानी या महिला फकीराचे दर्शन. उरुसाच्या काळातील संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर रात्रभर सूफी फकीर व इतर भक्त भक्तीगीत, कव्वाली, नाचगाणी यांचा मनमुराद आनंद घेतात. या प्रकाराला ‘धमाल’ म्हणतात. लाल परी कलंदर भडक तांबडे कपडे घातलेली, हातात एक जाडजूड काठी घेतलेली, गलेलठ्ठ असलेली फकीरा त्या गर्दीत सहजपणे ओळखली जाते.

उरुसाच्या दिवशी नखशिखांत काळे वा तांबडे कपडे घातलेले दाढी वाढवलेले (व काही न वाढवलेले) गळ्यात तावीज घातलेले, हातात मंतरलेले अंगठे घातलेले अनेक फकीर, मलंग येथे जमतात. घुंगरू बांधलेल्या काठीने आवाज काढत नाचाच्या तयारीत आतुरलेले असतात. पूर्ण माहोल एखाद्या युरोपियन बॅले नृत्यासारखा वाटू लागतो. काही क्षणातच धमालचा ठेका चालू होतो. मलंग, पीर, साधू, सन्यासी बाहेर पडत ठेका धरू लागतात. वयाचे बंधन नाही; कपड्याचे भान नाही; स्त्री - पुरुष भेद नाही; आकाशाकडे डोळे लावून हसत, खिदळत, एकेक पाऊल पुढे सरकत, काही वेळा एकाच ठिकाणी पळाल्यासारखे पदन्यास करत ढोलकीच्या तालावर नाचू लागतात. दमा दम मस्त कलंदर, जियो झुलेलाल, सारख्या गाण्यांचा आवाज घुमत जातो. रात्र सरकत असताना हा आवाज असाच वाढत जातो. नाचणारे (व बघणारेसुद्धा!) बेहोश झाल्यासारखे दिसू लागतात. नाचगाण्याची नशा चढलेली असते. चहू बाजूने गुलाबी फुलांच्या पाकळ्यांची उधळण होत असते. ऊदबत्तीचा (व त्याचबरोबर अफू गांजांचा) धूर अवकाशात पसरत असतो.

जाणकारांच्या मते हा धमालचा प्रकार हातात डमरू घेऊन नाचणाऱ्या शंकराची व शिवभक्तांची आठवण करून देते. ही एक डमरूच्या तालावर नाचणाऱ्या नटराजाशी जवळीक साधणारी प्रथा वाटते. सहाव्या शतकातील चीनचा प्रवासी हुएन त्सांगच्या मते हे ठिकाण शाक्त पंथीयांचे मुख्य ठिकाण होते. हे पशुपती नाच करत करत शंकराच्या चरणी विलीन होत असत. शंकरनृत्याचे काही अंश अजूनही येथील सूफी पंथात ठळकपणे दिसतात.

धमालमध्ये सहभागी होण्याचे नवस बोलले जातात. नवस फेडण्यासाठी आलेल्या भक्तावर लाल शाहबाज प्रसन्न होऊन त्यांची मनोकामना पूर्ण करतो यावर भक्तगणांची पूर्ण श्रद्धा आहे. परंतु बहुतेक महिलांचे नाच भूत पिशाच्च अंगात संचारल्यासारखे वाटतात. भोवतालच्या खेडोपाड्यातील मनोरुग्ण महिलांना उपचार करण्यासाठी म्हणून येथे आणतात. अंगात आलेल्या भुताला प्रश्न विचारतात. कदाचित मारझोडही होत असेलच.

धमाल हा एका प्रकारे सेफ्टी व्हाल्वसारखे काम करत असावे. शारीरिक व्याधीची लक्षणं भूत, प्रेत, पिशाच्च अंगात शिरल्यामुळेच दिसत असून त्याला शरीराबाहेर काढण्यासाठीच ढोल, गाणीं, नाच, कव्वाली, यांच्या आधारे उपचार करण्याची प्रथा रूढ झाली असावी. यासर्व प्रकारामुळे त्रस्त महिला बधिरावस्थेत पोचून तिच्यातील वेदना, चिंता कमी होत होत शेवटी ती पूर्ण बरी होईल यावर त्यांचा विश्वास असतो. घागरा चोळी घातलेल्या बायकांच्या थवेच्या थवे येथे दर्शनासाठी लोटतात.

p3

लाल परी कलंदर
या सर्व पुरुषप्रधान धार्मिक उन्मादात 50 -55 वयाची गलेलठ्ठ लाल परी कलंदर उठून दिसत होती. अंगावरील लाल भडक कपडे, कांकणभर चांदीच्या बांगड्या, बंगाली बायकाप्रमाणे भांगेत सिंधूर, गळ्यात एक भली मोठी साखळी यावेशात ती नाचताना एखाद्या दरवेशासारखी दिसत होती. लाल शाहबाज कलंदर अंगात आल्यासारखे तिचे नाचणे, घुमणे होते. धमालमध्ये नाचताना" मला अली व हसन बरोबरच लाल शाहबाज कलंदरही माझ्या जवळ-पास असतो". लाल परीचा विक्षिप्तपणा व दरारा तिच्या वागण्या बोलण्यात ठळकपणे दिसत होता. पवित्र मूर्खांच्या (holy fools) सदरात ती फिट्ट बसली असती. निरक्षर असूनही तिच्या साध्या व सरळ वागण्यामुळे तिच्यात दैवी शक्ती व चमत्कार करण्याचे सामर्थ्य आहे अशी समजूत होती.

मुळात ती तीन वेळा विस्थापित झालेली बाई होती. प्रथम मुस्लिम कुटुंबातील मुलगी म्हणून 1960 साली भारतातून पूर्व पाकिस्तानात तिला जावे लागले. 1971 च्या युद्धात बिहारी मुस्लिम म्हणून बांगलादेशमधून तिची हकालपट्टी पाकिस्तानात झाली. शेवटी एकटीच बाई म्हणून ती या दर्ग्याच्या आश्रयाला आली. तालीबानीकरण झालेल्या पाकिस्तानमधील सिंध प्रांतात सूफी पंथीय म्हणून ती येथे राहू लागली. एकीकडे टोकाचा विद्वेश व हिंसाचार व दुसरीकडे प्रेम, दया, सहानुभूती व कणव या कात्रीत ती सापडलेली होती.

बिहारमधील सोनेपूर येथे जन्माला आलेली लाल परी एका मुस्लिम शेतकऱ्याची मुलगी. कुरेशी कुटुंबातील या मुलीचे बालपण इतर हिंदू मुस्लिम मुलींबरोबर खेळण्यात, बागडण्यात गेले. तिच्या बालपणातच क्षयरोगाने तिच्या वडिलाचा बळी घेतला. तिच्या आईने दुसरे लग्न केले. सावत्र बाप तिला मारझोड करत तिला उपाशी ठेवायचा. आई चोरून तिला खायला देई. त्याच काळात हिंदू -मुस्लीम दंग्यांना ऊत आला होता. एकदा मशीदीत जमलेल्यांची कत्तल केली. यात तिचा सावत्र बाप मेला. या दंगलीच्या काळात तिच्या आईने या भाऊ - बहिणींना जंगलातील एका खड्ड्यात झाकून ठेऊन वर पाला पाचोळ्यांनी खड्डा बुजवला. अशा प्रकारे 15 -20 दिवस काढल्यानंतर येथून पूर्व पाकिस्तानातील तिच्या मामाकडे जाण्याचा निर्णय तिच्या आईने घेतला. भारत - पूर्व पाकिस्तानच्या सीमेवरील हवालदाराला लाच दिल्यानंतर त्यानी नदीपार करून जाण्यास या कुटुंबाला मदत केली. सर्वांना पळण्यास भाग पाडले. कसेबसे ते मुक्कामी पोचले. काही दिवस ती तेथील शाळेत शिकतही होती. बांबूच्या झोपडीवजा घरातील जीवन तिला सुखकर वाटू लागले. नदीला महापूर आल्यानंतर कुठेतरी आसरा शोधायचा व पाणी ओसरल्यानंतर पुन्हा एकदा झोपडी बांधून शेती करायचे व जीवन जगायचे याची त्यांना सवय लागली होती.

1971च्या युद्धाच्या भडक्यात बांगला मुस्लीम उपऱ्या मुस्लिम बिहारींना हाकलून द्यायला लागले. पाकिस्तान शासनाने या उपऱ्यांची पाकिस्तानात राहण्याची, कामधंदा देण्याची सोय केली. आईव्यतिरिक्त इतर कलकत्ता ते दिल्ली व दिल्ली ते लाहोर असा प्रवास करत पोचले. मुलतानमधील सूतगिरणीत तुटपुंज्या पगारावर भाऊ नोकरी करू लागला. बंगाल - बिहारमध्ये असताना भात व मासे खाणाऱ्यांना मांस - गहू खाण्याचा कंटाळा आला. लाल परी रिकामीच असल्यामुळे दिवसभर ती त्या गावातील दर्ग्यांना भेट देऊ लागली. तेथील फकीरांशी तिची गट्टी जमली. आपणही सूफी फकीर व्हावे असे तिला वाटू लागले.

तिचा भाऊ चांगला होता परंतु त्याच्या मृत्युनंतर त्याची बायको हिचा छळ करू लागली. भांडू लागली. या रोजच्या भांडणाला कंटाळून तिला घरातून पळून जावेसे वाटू लागले. एके रात्री मुलतान येथील सूफी संत शेख बहाउद्दीन झकारिया तिच्या स्वप्नात आला व त्यानी तिला मार्गदर्शन केले. तिच्या स्वप्नात एक लांब दाढीवाला म्हातारा समोर दिसत असलेल्या गाडीत बसून येण्यास सांगत होता. ती मुलतान स्टेशनला पोचली व समोर दिसत असलेल्या गाडीत जाऊन बसली. गाडी सिंध प्रांतातील हैदराबादला जात होती. तिला कुणीही तिकीट विचारले नाही. उलट गाडीतील टीसीने तिला खायला घातले. डब्यातील बहुतेक यात्रिक दमादम मस्त कलंदर हे गाणे म्हणत होते. एका फकीराने तिच्या हातात तावीज देत हे तुझे रक्षण करेल असे सांगून गेला. त्या तावीजवर तिला स्वप्नात दिसलेल्या वृद्ध माणसाचे चित्र होते. हाच तो लाल शाहबाज कलंदर. सगळे यात्रिक उरुसाला चालले होते. ती पण त्यांच्यात मिसळली. स्वप्नात दिसल्यासारखाच तो दर्गा होता. 20 वर्षापूर्वी आलेली लाल परी तेथेच रुळली. हातातील सोटा गुंडांपासून तिचा रक्षण करत होता. शांत स्थळ. लतीफची गाणी म्हणण्यात व ऐकण्यात तिला समाधान मिळत होते. फक्त तेथील मुल्ला - मौलवींची व वहाबींची आजकाल तिला भीती वाटत होती.

वहाबींची भीती
वहाबींची भीती फक्त तिलाच नव्हे तर सर्व सूफी पंथीयांना वाटत आहे. पाकिस्तानमधील मुल्ला, मौलवी, वहाबी व तबलिघी सूफी संतांचा द्वेश करतात. अलिकडेच खैबर पासजवळ असलेल्या 17व्या शतकातील पुष्तू कवी संत रहमान बाबाचा दर्गा डायनामाइट पुरून फोडला गेला. रहमान बाबाचा दर्गा कवी व संगीतकारांचे पवित्र स्थान होते. पुष्तू भाषेतील या संताच्या कविता लोकप्रिय होत्या. या दर्ग्याच्या वाटेवरच वहाबीने एक मदरसा बांधून इस्लामचे शिक्षण देऊ लागले. मदरश्यातील तालिबान्यानी एके दिवशी दर्गा उडवून टाकला.

मदरश्यातील शिकवणीप्रमाणे गाणी, कविता, नाच इस्लामच्या विरोधातील गोष्टी आहेत, व स्त्रियांनी बुरखा घालून घरीच बसायला हवे, असा त्यांचा आग्रह होता. अशा प्रकारच्या मदरश्यांची संख्या अफगाण युद्धानंतर मोठ्या प्रमाणात वाढू लागली. 1947 मध्ये फक्त 245 मदरसे असलेल्या पाकिस्तानात आता सुमारे 8000 मदरसे आहेत. देवबंदी व वहाबींचे त्यावर पूर्ण नियंत्रण आहे. वहाबींना थडग्याची पूजा करणे पसंत नाही. मेलेल्या माणसाच्या प्रार्थनेला कुराणात विरोध आहे. जी काही प्रार्थना करायची ती मशीदीतच अल्लासाठी करायला हवी, इतर ठिकाणी नव्हे, यावर त्यांचा जोर आहे. वहाबींच्या मते सूफी हा धर्मच नव्हे; ती एक जादू आहे, ती एक अंधश्रद्धा आहे. सूफी संत, फकीर, पीर जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेतात, असा त्यांचा आरोप आहे.

लाल परीच्या मते मुल्ला, मौलवी कितीही आरडा ओरडा, विध्वंस करत असले तरी सूफी पंथ कधीच मरणार नाही. तिचे हे शब्द खरे ठरवण्याची जबाबदारी आता लाल शाहबाज कलंदरवरच आहे!

संदर्भ: Nine Lives: In Search of the Sacred in Modern India by William Delrymple

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हेच जर सुफी पंथाऐवजी हिंदू, बौध्द अथवा जैनांच्या पंथाबद्दल लाल परीला औत्सुक्य असते तर नानावटींनी लेख लिहिला असता का?
\

छे छे उलट घृणा आणि टीकेने भरलेला लेख छापला असता

नानावटींचे लेखन सिलेक्टीव असते... हिंदूंवर टिका बाकीच्यांना मात्र वा वा बहोत खुब !

- अहिरावण

अवरंग्याला महान सिद्ध करणे हा डाव्या विचारांच्या आणि स्वत:ला उदारमतवादी समजणा-या मतलबी, धुर्त, स्वार्थी लोकांचा सध्याचा धंदा आहे.

सूफी फकीर व इतर भक्त भक्तीगीत, कव्वाली, नाचगाणी यांचा मनमुराद आनंद घेतात
पूर्ण माहोल एखाद्या युरोपियन बॅले नृत्यासारखा वाटू लागतो
स्त्री - पुरुष भेद नाही;
आकाशाकडे डोळे लावून हसत, खिदळत, एकेक पाऊल पुढे सरकत, काही वेळा एकाच ठिकाणी पळाल्यासारखे पदन्यास करत ढोलकीच्या तालावर नाचू लागतात
चहू बाजूने गुलाबी फुलांच्या पाकळ्यांची उधळण होत असते

मग स्त्री भक्ताचे वर्णन करताना अचानक ह्याचा उन्माद कसा काय झाला, तोही पुरुषप्रधान?

हे पुस्तक आहे माझ्याकडे.
Nine Lives: In Search of the Sacred in Modern India by William Delrymple.
लेखकाने एक जैन,एक बौदृध,वगैरे सात प्रकारच्या लोकांबरोबर राहून जीवन आणि विचार जाणून घेतले आहेत. कुठेही टीका न करता,निवाडा न करता नोंदी आपल्यासाठी दिल्या आहेत.
लेखाबद्दल धन्यवाद.