नागार्जुनाची शून्यता आणि धार्मिकतेची अशक्यता

प्रस्तुत निबंध नाशिक येथे भरलेल्या बृहन महाराष्ट्र प्राच्य विद्या परिषदेच्या १५व्या द्वैवार्षिक अधिवेशनात २४ डिसेंबर २०२३ रोजी सादर करण्यात आला.

नागार्जुन इ. स. दुसर्‍या तिसर्‍या शतकातला एक बौद्ध विचारक, शून्यतेचा पुरस्कर्ता, माध्यमिका ह्या बौद्ध शाखेचा संस्थापक, आणि महायाना परंपरेतील एक महत्त्वाचा तत्त्वज्ञ. अजूनही चीन, कोरिया, जपान, तिबेट, व व्हिएतनाम येथे त्याला आदराचे स्थान आहे. २०२२ च्या नोव्हेंबरात एक कोरीयन बौद्ध पथक धरमशालेत दलाई लामांच्या पीठात आले होते. त्यांच्या विनंतीवरून दलाई लामांनी नागार्जुनाच्या मध्यम मार्गावर प्रवचन दिले ज्याचे युट्यूब प्रक्षेपण आपल्याला आजही बघता येते.

नागार्जुनाचे साहित्य हे प्रज्ञापारमिता साहित्याचा एक भाग मानला जातो. प्रज्ञापारमिता म्हणजे पूर्णत्वाला गेलेली प्रज्ञा, wisdom par excellence. प्रज्ञापारमिता साहित्य कृष्णेच्या खोर्‍यात आताच्या आन्ध्रामध्ये इ. पू. पहिल्या शतकापासून रचायला सुरुवात झाली. ते संस्कृत, प्राकृत व पाली भाषेत रचले गेले. गांधार प्रदेशातही त्याचा समांतर विकास झाला.

मूलमध्यमककारिका ही नागार्जुनाची प्रसिध्द साहित्यकृती. साधारण तिसर्‍या शतकाच्या सुरुवातीला ती रचली असावी. चौथ्या शतकापासूनची कारिकेवरची भाष्ये आणि भाषांतरे उपलब्ध आहेत. कारिकेची सुरुवात आणि शेवट नागार्जुन बुद्धाला वदंन करून करतो. आणि मध्ये एका ठिकाणी म्हणतो,"न क्वचित् कस्यचित् कश्चित् धर्मो बुद्धेन देशित:" (२५.२४) बुध्दाने कधीही कुणालाही कुठलाही धर्म शिकवलेला नाही. हा काय प्रकार आहे? नागार्जुनाच्या काळापर्यंत बौद्ध धर्म सहाशे ते सातशे वर्षे अस्तित्वात होता. मग नागार्जुन नेमके काय सांगण्याचा प्रयत्न करतोय? ह्याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न. ह्यासाठी आपल्याला शून्यता समजून घेतली पाहीजे.

शून्यता ही संकल्पना नागार्जुनाच्या कारिकेचा गाभा आहे. शून्यता म्हणजे काय? शून्यता म्हणजे प्रत्येक रूप, संकल्पना नि:स्वभावी असते हे पाहणे. उदाहरणार्थ आपण बसलो आहोत ती खुर्ची - तिचा आकार, तिची रचना, विशिष्ट उपयुक्तता हे तिचे खुर्चीपण तिचा मूलस्वभाव नाही का? नागार्जुन म्हणतो - नाही. तिचे खुर्चीपण तिचा उपयोग करू पहाणार्‍या समाजावर अवलंबून आहे. आपल्याला खोलीतून एका ठिकाणाहून दुसरीकडे सहज नेता येणारी गोष्ट बसायला लागते म्हणून खुर्चीला खुर्चीपण. आपण नसू तर खुर्ची कुठली? तुम्ही म्हणाल की खुर्ची ही एक संयुक्त गोष्ट झाली. त्याला विभागत गेलात तर शेवटी मूलभूत कणांपर्यंत पोहोचाल. त्यांचे काय? हे मूलभूत कण मूलस्वभावी नाहीत का? तर नागार्जुन म्हणतो - नाही. वास्तवाच्या मूलघटकांना बौध्द तत्त्वज्ञानात, अभिधर्मिका साहित्यात, धर्म असे म्हटले आहे. हे मूलघटक द्रव्याचे असतात तसेच भावना, रंग ह्यांचेपण असतात. स्वातंत्रिका ह्या बौद्ध शाखेने ह्या धर्मांना मूलस्वभाव बहाल केलेला आहे. नागार्जुनाची कारिका ही प्रामुख्याने स्वातंत्रिकांशी केलेला संवाद आहे. आणि तो सांगण्याचा प्रयत्न करतोय की अगदी धर्मसुध्दा शून्य आहेत.

प्रत्येक गोष्ट, संकल्पना ही निःस्वभावी आहे, परिस्थिती सापेक्ष आहे हे बघण ह्याचीच दुसरी बाजू म्हणजे, नागार्जुनाच्या शब्दात (१३.८) - शून्यता सर्व दृष्टीनाम् प्रोक्ता निःसरणं जिनैः। जिनैः प्रोक्ता - जाणकार सांगतात, शून्यता म्हणजे सर्व दृष्टींचे निःसरण - सर्व ठाम भूमिकांचे गळून जाणे. प्रसरण होते तेव्हा फुगा फुगतो, निःसरण होते तेव्हा हवा निघून जाते. शून्यता म्हणजे आपल्या सगळ्या ठाम भूमिकांतली हवा निघून जाणे. मग शून्यवादाच काय? तिही एक भूमिकाच नाही का? १३.८ श्लोकाच्या दुसर्‍या ओळीत नागार्जुन म्हणतो, येषाम् तु शून्यता दृष्टी तान् असाध्यान् बभाषरे॥ जी व्यक्ती शून्यतेचा शून्यवाद करते तिच्या हातून शून्यता निसटलेली असते. जिला ठाम भूमिका नाही ती व्यक्ती वाद कशाला घालील? परमार्थोही आर्यानाम् तुष्णीम् भावः - चंद्रकीर्ती - कारिकेचा सातव्या शतकातील भाष्यकार म्हणतो, परमार्थ हा शहाण्या व्यक्तीसाठी मौनभाव धारण करतो.

कारिकेत नागार्जुन म्हणतो (१५.१०), अस्तिती शाश्वतग्राहो नास्तिती उच्छेददर्शनम्। तस्माद् अस्तित्वनास्तित्वे नाश्रयेत् विचक्षणः ॥ हे आहे-च, ते नाही-च च्या भानगडीत चाणाक्ष मंडळी पडत नाहीत. किंबहुना शून्यता म्हणजे च-कारात्मक समजूती आणि विचार दुःखाच्या मुळाशी आहेत हे पाहाण. जर सगळ्या गोष्टी शून्य तर बुद्धाने सांगितलेल्या चार आर्यसत्यांचे काय? तीही शून्य? होय. मग बुध्दाने एवढी प्रवचने देण्याचा खाटाटोप का केला? सर्वदृष्टीप्रहाणाय (२७.३०) - सर्व ठाम भूमिकांचे हनन व्हावे म्हणून.

नागार्जुन म्हणतोय की सत्य हे व्यावहारीक असते, परिस्थिती व समाज सापेक्ष असते, लौकिकार्थाने कामचलाऊ असते, त्यापलिकडे असलेले पारमार्थिक, परमोच्च सत्य असे काही नसते. सत्य म्हणजे अशा समजूती ज्या आयुष्य क्वचितप्रसंगी आनंददायी, पण बहुतांशी सुसह्य करत असतात. गेले पस्तीश वर्ष मी सकाळी उठून का धावतो? कारण मला धावायला मजा येते. जेव्हा मला धावताना मजा येईनाशी होईल किंवा शरीराला जमेनासे होईल तेव्हा थांबायचे. जसे धावणे, तसेच वाचणे, लिहिणे, स्वयंपाक करणे, झाडू मारणे, प्रवास करणे, उदरनिर्वाहासाठी काम करणे. ह्या सर्व गोष्टी माझ्यासाठी व्यावहारीकदृष्ट्या सत्य आहेत. तसेच त्या शून्यही आहेत.

धार्मिकता म्हणजे लौकिकार्थाने चकारात्मक समजुतींचा समुच्चय. जन्मापासून मरणापर्यंत - हे झालेच पाहिजे, ते करूच नये - अशा शास्त्रानुसार किंवा सामाजिक रूढींनुसार करायच्या गोष्टी. शून्यता दिसते तेव्हा अशा प्रकारची धार्मिकता जोपासण अशक्य. ह्याच्या उलट आपल्याला एखाद्या गोष्टीचा खूप त्रास होत असेल तर आपण शोध घेऊ शकतो की आपण कुठल्यातरी चकारात्मक समजूतीला कवटाळून तर नाही ना बसलोय? उदाहरणार्थ पूजा करणं माझ्याकडून होत नाहिये, आणि त्याची रुखरुख मला लागून राहिली आहे. अशा वेळी असा शोध घेता येईल की पूजा रोज झालीच पाहिजे असे मी घट्ट धरून तर बसलो नाहिये?

एखादी व्यक्ती म्हणेल तिला पूजा आवडते आणि ती केल्यामुळे तिच्या मनाला शांति मिळते म्हणून जेव्हा शक्य होते तेव्हा ती व्यक्ती पूजा करते. जेव्हा तिला पूजा आवडेनासी होईल तेव्हा ती पूजा करणे थांबविल. अशी च-कारात्मक विचार नसलेली धार्मिकता असू शकणार नाही का? असू शकेल, किंबहुना आहे.

नागार्जुनाच्या शून्यतेची २१व्या शतकातील विज्ञानाशी सांगड घालता येते का? विज्ञानातही वाद असतात, त्यात विविध सिध्दांतांमध्ये लोकप्रियतेसाठी चढाओढ असते. त्यातील काही सिध्दांत, स्पष्टीकरणे ह्यांच्याशी नागार्जुनाच्या शून्यतेची सांगड घालता येते. कार्लो रॉवेली हे पूंज वादाच्या सापेक्षता स्पष्टीकरणाचे (Relational interpretation of quantum mechanics) प्रवर्तक. त्यांच्या हेल्गोलॅंड (Helgoland, 2020) ह्या सर्वसाधारण वाचकासाठी लिहिलेल्या पुस्तकात नागर्जुनावर एक प्रकरण आहे. कार्ल फ़्रिस्टन ह्यांच्या सक्रिय अनुमानाच्या सिद्धांताची नागार्जुनाच्या शून्यतेची सांगड घालता येते असे मला वाटते. ह्याबद्दल अधिक पुन्हा कधीतरी.

शेवट कारिकेतल्या एका श्लोकाने करतो. नागार्जुन म्हणतो (२४.१४), सर्वं च युज्यते तस्य शून्यता यस्य युज्यते । सर्वं न युज्यते तस्य शून्यं यस्य न युज्यते ॥ शून्यतेशी संगती तर जीवनाशी संगती, शून्यतेशी विसंगती म्हणजे जीवनाशी विसंगती.

संदर्भ:
१. Nagarjuna's middle way: Mulamadhyamakakarika, by Mark Siderits and Shoryu Katsura, Wisdom Publications, 2013.
२. मूलमध्यमककारिका at bodhisarva.com, accessed on Jan 2, 2024
३. मूलमध्यमककारिका देवनागरी लिपीत (archive.org), accessed on Jan 2, 2024
४. Madhyamika sunyata: A reappraisal, by G C Nayak, Indian Council for Philosophical Research, 2001

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet