वृद्धत्वाकडे वाटचाल - भाग ३

भाग ३ – एजिंगचे परिणाम

सुधीर भिडे

(मागील भाग)

विषयाची मांडणी
त्वचेचे एजिंग
शरीरातील क्रियासंस्थांच्या कामात घट
संप्रेरकांतील बदल
विचार, आकलन आणि निर्णयक्षमतेचा ऱ्हास
मानसिक प्रश्न
सामाजिक आणि आर्थिक परिणाम
---

त्वचेचे एजिंग
त्वचेचे एजिंग हा जगाला माहीत होणारा पहिला परिणाम आहे. ‘ते / ती म्हातारी दिसायला लागली बरं का!’ हे वाक्य आपण ऐकले असेल. साहजिकच संशोधकांनी या प्रश्नाकडे चांगले लक्ष पुरविले आहे.


Ageing of Skin

सूर्यप्रकाशाचा त्वचेवर सर्वात मोठा परिणाम होत असतो. सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट किरण त्वचेची हानी करतात. त्वचेतील इलास्टीन नावाचे द्रव्य अल्ट्राव्हायोलेट किरण नष्ट करतात आणि त्यामुळे त्वचा लुळी होते. उन्हातान्हात काम करणारे कामगार लवकर म्हातारे दिसू लागतात.
वय वाढले की त्वचेत स्निग्ध पदार्थ सोडणाऱ्या ग्रंथी काम करेनाश्या होतात. त्यामुळे त्वचा रुक्ष होते. बहुतेक वृद्धांना त्वचेला खाज येणे हा अनुभव येतो. वृद्धांनी ग्लिसरीनयुक्त साबण (पेअर्स) वापरणे चांगले.

वय वाढले की त्वचेच्या खाली असणारा चरबीचा थर पातळ होऊ लागतो. त्यामुळे त्वचेचा लवचीकपणा जातो. त्याच बरोबर वृद्धांना थंडी जास्त वाजते.

त्वचेला रंग देणाऱ्या पेशी नाहीश्या होऊ लागतात, त्यामुळे त्वचेवर काळसर / लाल ठिपके दिसू लागतात.

शरीरातील क्रिया संस्थांच्या कामात घट

एजिंगचा शरीरातील सर्व अवयव आणि क्रियासंस्था (organ systems) यांवर प्रभाव पडतो.

हृदय आणि रक्तवाहिन्या

आपले हृदय हा एक पंप असतो. जन्माला आल्यापासून मृत्युपर्यंत हा पंप अविरत काम करत असतो.


Age-dependent changes to cardiovascular tissues

वयाबरोबर या पंपाची रक्त पंप करण्याची क्षमता कमी होत जाते. रक्तवाहिन्यांचा लवचीकपणा कमी होतो. वाहिन्यांत आतल्या बाजूला चरबीचे थर साठतात. त्यामुळे रक्तवाहनक्षमता कमी होते. या सर्वांचा परिणाम शारीरिक कामे करण्याची शक्ती कमी झालेली दिसते.

फुप्फुसे

छातीतील बरगड्या आणि पोटाच्या वरचा पडदा -diaphragm – या दोन्हीतील लवचिकतेमुळे आपले श्वसन होत असते. जसे वय वाढते तशी हवा आत घेण्याची आणि बाहेर सोडण्याची क्षमता कमी होत जाते. ही क्षमता पल्मनरी फंक्शन टेस्टद्वारा मोजली जाते. एका सेकंदात आपण किती हवा बाहेर टाकू शकतो - FEV1 - हे या उपकरणाने मोजले जाते. वयाबरोबर १ ते २ % हवा बाहेर टाकण्याची क्षमता दर वर्षी कमी होते


Age-related decline in forced expiratory volume in one second (FEV1)% predicted plotted as % of maximal at age

मूत्रपिंडे
वयाबरोबर मूत्रपिंडांचा आकार कमी होत जातो. मूत्रपिंडांकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे रक्त शुद्ध करण्याची क्रिया कमकुवत होते. नव्वदाव्या वर्षी रक्तशुद्धीची क्षमता तरुणाच्या तुलनेत ५० % झालेली असते.


Ageing changes in Kindney and Bladder

दृष्टी
डोळ्यात एक पारदर्शक द्रव पदार्थ असतो. वयानुसार त्यात बदल होतो आणि डोळ्यात येणारे प्रकाश किरण संपूर्णत: रेटीनावर – पडद्यावर पोचत नाहीत. डोळ्याच्या बाहेरच्या पडद्याची – कॉर्नियाची गोलाई कमी होते. बुब्बुळाचे स्नायू शिथिल होतात. या सर्वाचा परिणाम दृष्टी अधू होण्यात होतो.

चव आणि वास समजण्याची क्षमता
म्हातारपणाबरोबर वास समजण्याची क्षमता कमी होत जाते. साधारणपणे साठीनंतर वास समजण्याची क्षमता कमी होऊ लागते आणि ऐंशी वर्षांच्या पुढील ७५% व्यक्तीत वास समजण्याची क्षमता कमी झालेली असते. जशी वास समजण्याची क्षमता कमी होते त्याचबरोबर चव समजण्याची क्षमता पण कमी होऊ लागते. ज्या वृद्धांना श्वासनलिका आणि फुप्फुसाचे प्रश्न असतात त्यांना हा त्रास लवकर चालू होतो. याचा धूम्रपानाशी संबंध असतो.

दुर्दैवाने वास आणि चव समजण्याची क्षमता जाणे याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. वास न आल्याने काही अपघात होण्याची शक्यता वाढते. याशिवाय भूक कमी लागणे, अन्न बेचव वाटून आहार कमी होणे हे प्रश्न चालू होतात.

आता हे समजले आहे की वास समजण्याची क्षमता कमी होणे याचा शरीर क्षीण होणे आणि शेवटची घंटा वाजणे याच्याशी संबंध असू शकतो. एका अभ्यासात वृद्ध व्यक्तींना सहा निरनिराळे वास देण्यात आले. हे वास ओळखणे किंवा न लक्षात येणे यावर या वृद्ध व्यक्तींची प्रकृती किती क्षीण आहे हे समजू शकते. याचा उपयोग करून एजिंगची प्रक्रिया किती पुढे गेली आहे हे समजू शकेल का यावर संशोधन चालू आहे.

हाडे आणि सांधे
वयाबरोबर हाडातील कॅल्शियम कमी होत जाते. त्यामुळे हाडे ठिसूळ होत जातात. वयानुसार आतड्यात कॅल्शियम शोषून घेण्याची क्षमता कमी होते.
चाळीस वर्षांनंतर दर दहा वर्षांत हाडांचे वजन पुरुषांत ३%ने तर स्त्रियांत ८%ने कमी होते.


Age and Bone Mass

Osteoporosis

सांध्यातील cartilage झिजत जाते ज्यामुळे सांधेदुखी चालू होते.

स्नायू

बालपणापासून वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत स्नायूंचे वस्तुमान वाढत जाते. यानंतर स्नायूंचे वस्तुमान आणि क्षमता कमी होऊ लागते. एका दशकात ५% वस्तुमान कमी होते. हा वेग सत्तरीनंतर १०% होतो.

मेंदूतील पेशींप्रमाणे स्नायूंचेही आहे – use it or lose it

संप्रेरकातील बदल

शरीरातील बऱ्याच क्रिया संप्रेरकांच्या नियंत्रणाखाली होतात. वयाबरोबर संप्रेरकांचा स्राव कमी होतो. यात लैंगिक विकासाचे संप्रेरक (sex hormones) यांचे मोठे योगदान असते. अ‍ॅन्ड्रोजेन आणि इस्ट्रोजेन हे दोन लैंगिक विकासाचे संप्रेरक (sex hormones) - यांचा स्राव कमी होऊ लागला की त्याचा एजिंगवर परिणाम होतो .

हायपोथलॅमस या मेंदूतील भागातून टेस्टॉस्टेरोन आणि अ‍ॅन्ड्रोजेन या संप्रेरकांच्या स्रावण्याची आज्ञा जाते. लैंगिक इच्छेबरोबरच हाडांची घनता आणि स्नायूंचे वस्तुमान टिकविण्यात या संप्रेरकांची मदत असते. ३५ वर्षांपासून टेस्टॉस्टेरोन आणि अ‍ॅन्ड्रोजेन या संप्रेरकांचा स्राव वर्षाकाठी दोन टक्क्यांनी कमी होतो. यामुळे हाडे ठिसूळ होत जातात. स्त्रियांच्या शरीरात पुरुषांपेक्षा अ‍ॅन्ड्रोजेनचे प्रमाण २५% कमी असते. त्यामुळे हाडांच्या ठिसूळपणाचा प्रश्न स्त्रियांच्यात जास्त प्रमाणात असतो.

स्त्रियांच्या शरीरात इस्ट्रोजेनचे प्रमाण पुरुषांच्यापेक्षा जास्त असते. प्रजननाच्या बरोबर इस्ट्रोजेन हा संप्रेरक इतर जरुरी कामे - जसे दाह कमी करणे - करत असतो. मासिक पाळी बंद झाल्यावर स्त्रियांच्या शरीरात इस्ट्रोजेनचे प्रमाण ८०%ने कमी होते. प्रजननक्षमता जाण्याबरोबर त्याचे इतर वाईट परिणाम होतात.

मेंदूतील बदल

व्यक्ती विशीच्या पलीकडे गेली की मेंदूच्या एजिंगची क्रिया चालू होते. चाळिशीनंतर ही क्रिया अधिक वेगाने होते आणि एका दशकात मेंदूचा आकार ५% नी कमी होतो, सत्तरीनंतर हा कमी होण्याचा वेग ७% होतो. मेंदूतील पेशींना न्युरॉन म्हणतात. या पेशी सारख्या कमी होत असतात.


Brain Ageing

इंग्रजीत एक वाक्य आहे – Use it or lose it – वापर करा नाही तर क्षमता नाहीशी होईल. सत्तरीनंतरच्या मेंदूला हे पुरेपूर लागू होते.
मेंदूत राखाडी आणि पांढऱ्या रंगाचा भाग असतो. सर्व हुशारीची कामे राखाडी रंगाच्या पेशी करत असतात. या राखाडी रंगाच्या पेशींचा वयाबरोबर नाश होतो. वयाबरोबर नवीन शिकण्याची क्रिया थांबली की राखाडी पेशी नवीन जोडणी करत नाहीत आणि मग निराळ्या झालेल्या पेशी काम करेनाश्या होतात.

मेंदूत पेशीमधील संवाद dopamine and serotonin या दोन द्रव्यांमार्फत होत असतो. वयाबरोबर या द्रव्यांचे उत्सर्जन कमी होते.

एजिंगच्या परिणामाने होणारे शारीरिक आजार

National Council on ageing of America यांच्या पाहणीप्रमाणे उच्च रक्तदाब (६०%) आणि मधुमेह (२७%) हे सामान्यपणे वृद्धांत आढळणारे आजार आहेत. परंतु हे आजार घरी गोळ्या घेऊन नियंत्रणात ठेवता येतात. याशिवायचे असे आजार आहेत की त्यासाठी औषधे फार काम करत नाहीत. असे आजार खालीलप्रमाणे – Osteoporosis 40 %, Arthritis 35 %, Chronic Cancer 28 %, Chronic Kidney disease 25 %, Dementia 12 %, Parkinson’s disease 8 %, Chronic Obstructive Pulmonary disease 11 %

Osteoporosis मुळे पडल्यानंतर हाडे / सांधे तुटतात.

या सर्वांची बेरीज १०० % पेक्षा जास्त होते. याचा अर्थ असा की बहुतेक ज्येष्ठांना एकापेक्षा जास्त आजार असतात. हे सर्व आजार एजिंगच्या परिणामे होतात.

अशा आजारात क्लेशशमन सेवा (पॅलीएटीव केअर) महत्त्वाची होऊन बसते.

विचार, आकलन आणि निर्णयक्षमतेचा ऱ्हास

चेहेऱ्याच्या सुरकुत्या आपल्याला दिसतात पण मनाच्या सुरकुत्या दिसत नाहीत. ज्याला आपण आनंदी एजिंग म्हणू अशा एजिंगमध्ये पण मनाच्या cognitive functions मध्ये वयाबरोबर त्रुटी दिसू लागतात. या ठिकाणी आपण स्मृतिभ्रंश झालेल्या व्यक्तींचा विचार करत नाही. सामान्य एजिंग अनुभवणाऱ्या व्यक्तींचा विचार करत आहोत. वर आपण मेंदूमध्ये वयाबरोबर काय बदल होतात ते पाहिले. त्याचा आपल्या आकलन आणि निर्णयक्षमतेवर परिणाम होतो.

पहिला फरक लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर दिसतो. एखाद्या विषयावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी झाली की दैनंदिन जीवनात त्याचे परिणाम दिसतात. नवीन गोष्टी आकलन करणे अवघड होते.

स्मृती कमी होते. नवीन शिकलेल्या गोष्टी आठवणे अवघड जाते. तसे पाहिले तर एजिंगमुळे कमी होत जाणारी स्मृती आणि स्मृतिभ्रंश यात फार अंतर राहत नाही. गोष्टी विसरणे याकडे वय वाढल्यावर नीट लक्ष द्यावे कारण ती अल्झायमर रोगाची सुरुवात असू शकते.

आकलनशक्ती हा तिसरा बदल असतो. आपली इंद्रिये सभोवतालहून येणारे संदेश गोळा करून ते मेंदूकडे पाठवतात. मेंदू त्यांचा अर्थ लावतो. आपण एखादे पुस्तक वाचतो त्याचे मेंदूवर परिणाम होतात. ही समजण्याची क्रिया हळूहळू मंद होत जाते. वयानुसार दृष्टी आणि श्रवणशक्ती कमी होते. याचा आकलनशक्तीवर मोठा परिणाम होतो.

वॉशिंग्टन येथील जॉर्जटाऊन विद्यापीठाने २०२१ साली ५८ ते ९० वयोगटातील ७०० वृद्धांच्या वर केलेला एक अभ्यास प्रसिद्ध केला. या अभ्यासाप्रमाणे काही बाबतीत वृद्धांचा मेंदू तरुण व्यक्तींच्या मेंदूपेक्षा जास्त चांगले काम करतो.

  • नव्या माहितीचा योग्य वापर
  • मन भरकटणारी माहिती बाजूला करणे, ज्यायोगे प्रत्येक स्थितीत जे सर्वात महत्त्वाचे असेल त्यावर लक्ष केंद्रित करता येणे
  • शब्दसंग्रह आणि शब्दांचा योग्य वापर
  • सामान्यज्ञान
  • मानसिक प्रश्न

एका अनुमानाप्रमाणे २० % वयस्कर व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजार असतात.

निवृत्तीनंतर येणारी पहिली समस्या भूमिकेतील बदलामुळे होते. ज्या व्यक्ती अधिकारपदावरून निवृत्त होतात त्यांना आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना काम सांगून काम करून घेण्याची सवय लागलेली असते. निवृत्तीनंतर दुसऱ्याच दिवशी काम स्वतःच करायचे असते.
सर्वात मोठी समस्या चिंता – Anxiety – ही असते. येणाऱ्या काळातील समस्यांची चिंता. दीर्घकाळ चालणारे अवघड आजार झाले की नैराश्य – Depression – येते. आर्थिक अडचणी असल्या की दोन्ही समस्या जास्त गंभीर होतात. ज्या जोडीदाराबरोबर आयुष्य काढले त्याबरोबर मतभेद उतू जातात. कारण दोघांची मतभेद सहन करण्याची शक्ती कमी झालेली असते. कमी होत जाणारी आकलनशक्ती भांडणाचे कारण बनते.
वयस्क महिलांचे निराळे प्रश्न असतात. स्त्रियांचे आयुष्यमान पुरुषांपेक्षा जास्त असते हे जैविक सत्य – biological fact – आहे. बहुसंख्य स्त्रियांना जोडीदार गेल्यावर काही वर्षे जगायचे असते. असे जगण्याचे निराळे प्रश्न असतात.

आत्मसन्मान

या तक्त्यात एक चाचणी आहे. त्याला रोजेनबर्ग आत्मसन्मान चाचणी म्हणतात.

Low self esteem कमी आत्मसन्मान High self esteem उच्च आत्मसन्मान
Disagree 1. On the whole, I am satisfied with myself. Agree
Agree 2. At times I think I am no good at all. Disagree
Disagree 3. I feel that I have a number of good qualities. Agree
Disagree 4. I am able to do things as well as most other people. Agree
Agree 5. I feel I do not have much to be proud of. Disagree
Agree 6. I certainly feel useless at times. Disagree
Disagree 7. I feel that I'm a person of worth. Agree
Agree 8. I wish I could have more respect for myself. Disagree
Agree 9. All in all, I am inclined to think that I am a failure. Disagree
Disagree 10. I take a positive attitude toward myself. Agree

खरी चाचणी वर दर्शविल्यापेक्षा जास्त क्लिष्ट असते. खऱ्या चाचणीत strongly agree and strongly disagree अशा दोन जास्त श्रेण्या असतात. आपल्याला अंदाज यावा म्हणून सोपी चाचणी लिहिली आहे.

आता मूळ मुद्द्याकडे येऊ. खालील आलेखात हे दिसते की व्यक्तींचा आत्मसन्मान साधारण पासष्ट वर्षांपासून कमी होऊ लागतो. स्त्रियांना हे आवडणार नाही, पण सर्व वयात स्त्रियांना आत्मसन्मान कमी वाटतो असे हे संशोधन म्हणते. (Self-Esteem Development Across the Lifespan, Current Directions in psychological Science, Richard W. Robins, Department of Psychology, University of California and Kali H. Trzesniewski, Institute of Psychiatry, King’s College, London)


How Self-esteem changes with Age

सत्तरीनंतर आत्मसन्मान कमी होण्याचे प्रमुख कारण - स्वावलंबन कमी होते आणि परावलंबित्व वाढत जाते. व्यक्तीने एजिंगचे परिणाम दूर ठेवण्यासाठी व्यवस्थित प्रयत्न केले असतील तर आत्मसन्मान टिकून राहण्याचे वय ऐंशीपर्यंत लांबविता येते.

सत्तरीच्या पुढच्या व्यक्तींनी आत्मसन्मान सुधारण्यासाठी काय करावे?

नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींच्या सहवासात राहू नका. स्वतःला माफ करा, आपली तुलना दुसऱ्याबरोबर करू नका, काहीतरी नवे उपक्रम चालू करा, केवळ दुसऱ्याला खूश ठेवण्यात आपला वेळ घालवू नका.

सामाजिक आणि आर्थिक परिणाम

उत्क्रांतीच्या नियमांनुसार वृद्ध जीवाने जगत राहणे निरर्थक झालेले असते. असे वाहन मोडीत काढण्यातच फायदा असतो. अशी मोडकळीत निघालेली वाहने चालू ठेवण्यात समाज फार खर्च करीत असतो.

समाजात वीस ते पासष्ट वयोगटातील व्यक्ती आर्थिक उत्पादन कार्यात क्रियाशील असतात. या उलट वृद्ध नागरिक आणि लहान मुले संसाधनांचा फक्त वापर करीत असतात, उत्पादन करीत नाहीत. यामुळे ज्या समाजात वृद्धांचे प्रमाण वाढत जाते त्या समाजात GDP वाढ दर कमी होत जातो. पश्चिम युरोपीय देशात हे साफ दिसून आले आहे. याशिवाय सर्व पश्चिम युरोपमधील प्रगत देशांत सामाजिक कल्याणाच्या (social security) योजना आहेत. या योजनांअंतर्गत वृद्धांवर समाज खूप खर्च करीत असतो.

अशा तऱ्हेने मृत्यू केवळ लांबवित जाणे समाजाच्या हिताचे नसते.
---
(पुढील भाग)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

रोगांची लक्षणं वाचताना यातली एक-दोन लक्षणं आपल्यातही दिसत आहेत; म्हणजे आपल्यालाही हा रोग झाला आहे, अशी शंका यायला लागते. हे निरीक्षण अनेकांनी नोंदवल्याचं वाचलं आहे. ही लेखमाला वाचतानाही दोनचार लक्षणं माझ्यात दिसतात असं वाटलं.

यातल्या एका आकृतीबद्दल माझा काहीसा आक्षेप आहे. हाडांची घनता स्त्रियांमध्ये कमी होण्याचं कारण मेनोपॉज असं लिहिलेलं आहे. मेनोपॉजच्या काळात इस्ट्रोजन स्रवण्याचं प्रमाण कमी होतं; त्यामुळे हाडांचा ठिसूळपणा वाढतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्या डार्विन साहेबांच्या डोक्यावर स्वतःची पाप फोडण्यात काही अर्थ नाही.
१) प्रजनन करणे इतकाच जीवांचा जीवंत राहण्याचा हेतू नसतो.
पर्यावरण साखळी मध्ये प्रतेक जीवाचे महत्व असते आणि त्या नुसार च त्याचे आयुर्मान असते.
आंब्याचा झाडाला एका वेळेस हजारो आंबे येतात त्यांचे प्रजनन एकाचं वर्षात पूर्ण होईल.
हजारो आंब्याची झाडे निर्माण होतील पण आंब्याचे झाडं शेकडो वर्ष फळ देते ते प्रजनन साठी नाही अन्न साखळीतील महत्वाचे अन्न पुरवणे ही जबाबदारी त्याच्या वर असते म्हणून.
२) 'म्हातारी माणसं बोजा असतात"
हे पण चुकीचे वाक्य आहे .कित्येक लोक वयाच्या ७५ पर्यंत काम करत असतात.
उलट १ ते २१. वर्षाची मुल काहीच उत्पादक का.म करत नाहीत
३) निसर्ग नियम नुसार २o वर्षाच्या आत मुलाला जन्म देणे गरजेचे आहे तेव्हा मुल जवान होईल पर्यंत आई वडील पण जवान च असतात.
आता आई वडील आणि मुल ह्यांच्या वयातील अंतर खूप वाढत आहे..
एक पिढी म्हातारी आणि पुढची पिढी बाल अवस्थेत.
अशी समाजाची स्थिती होताना दिसत आहे ही स्थिती अर्थ व्यवस्थेसाठी खरे तर धोकादायक आहे.पण त्या वर लेखक भाष्य करत नाहीत.
४) ह्या ब्रह्मांड मध्ये मृत्यू प्रत्येकाला आहे ग्रह,तारे,आकाश गंगा ह्यांना पण मृत्यू आहे .
वृध्द अवस्था निर्जीव,सजीव सर्वांना येते.
सूर्य पण म्हातारा होत चालला आहे.
एक दिवस त्याचा पण मृत्यू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखमाला वाचत आहे -

जीविताचे उद्दिष्ट म्हणजे खाणे, संभोग करणे, प्रजोत्पत्ती करणे
मानवी दृष्टिकोना मधून पैसे कमावणे, लग्न करणे अपत्ये करणे

माणसाला पैसे कमाई करणे चालू करायला २५ वर्षे लागतात मुले उत्पन्न करायला ३०-३५ वर्ष लागतात
पन चाळीशी उलटली कि तो म्हातारा होऊ लागतो
म्हणजे त्याच्या आयुष्याची २५ वर्षे केवळ पायाभरणीची
आणि पुढची फकत १०-१५ वर्षे उत्पदक

असे का?

याउलट कुत्रा २-२.५ वर्षांत तरुण होतो आणि पुढे ८-१० वर्ष प्रजोत्पादन करत राहतो

मग चांगल जीवन कोणाचे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0