काल लई वर्षांनी टीव्हीचा रिमोट हातात मिळाला. सर्फता सर्फता ’दिल है के मानता नही’ दिसलं. थांबले.
त्यात शेवटच्या कडव्यापूर्वी पूजा भट आणि आमीर खानचा बागेतला प्रसंग आहे. कलिंगड खातानाचा प्रसंग. आमीर ते कलिंगड तस्सं एका बुक्कीत फोडून खातो आहे. पूजा भट त्याच्याकडे पाहतेय. तो तंद्रीत कलिंगडात मग्न. त्याच्या गालावर चिकटलेली बी. न राहवून पूजा भट ती बी काढते आणि मग - स्वप्नातून जागी होते. मग जाते नि तिरीमिरीत कलिंगड हिसकावून घेते! आमीर बिचारा एकदा घेऊ बघतो, नाही. दुसर्यांदा घेऊ बघतो, नाहीच देत. मग फिस्कारून हात उडवतो नि जातो झोपायला. ’डोण्ट टच मी!’ची पाटी लावून. काय फणकारा! अविश्वासानं बघत राहिलेली पूजा भट.
आख्खं गाणं बघितलं नि मग माझ्या लक्षात आलं, गाण्याचं चित्रीकरण किती काळ लक्षात राहिलं होतं ते.
मग अशीच गाणी आठवत गेली. एरवी कवायतीमास्टर नाहीतर पडदेमास्टर असलेल्या शामक दावरच्या नृत्यदिग्दर्शनाखालचं ’दिल तो पागल है’मधल शाहरुख-माधुरीचं एक गाणं आठवतंय? शाहरुख आणि माधुरीची एक जोडी कथानकातल्या वास्तवातली. एक जोडी त्या जोडीला न्याहाळणारी. पहिली जोडी भांडतेय, दुसरी त्या भांडणातली गोडी जाणवून मनापासून खुशाललेली. पहिली जोडी एकमेकांच्या पानातलं पळवून खाण्यात मग्न, दुसरी प्रेमभरानं त्यांना न्याहाळणारी. ते पाहून मला तेव्हा ’चार दिवस प्रेमाचे’ नामक मराठी नाटकातल्या नायक+नायकाचं मन आणि नायिका+नायिकेचं मन अशा अशक्य चलाख क्लृप्तीची आठवण झाली होती.
तुम्हांला आवडतात - आठवतात अशी गाणी निव्वळ चित्रीकरणामुळे लक्षात राहिलेली? असणारच.
गुरुवर्य विजय आनंद यांच्या सिनेमातली बहुतेक गाणी त्यात हजेरी लावून जातील. खिडक्या-फेम 'पलभर के लिये...'त्यात असेलच. ग्लासात बर्फाचा तुकडा टाकल्यावर गारठलेली नूतन असलेलं ’इक घर बनाउंगा तेरे घर के सामने’ही नक्की असेल. काही केवळ थोर मुद्राभिनयामुळे अजरामर झालेली निघतील. ’जाती हूं मै, जल्दी है क्या’सारखी काही निव्वळ आचरट नि बीभत्स नाचामुळे लक्षात राहिलेली असतील. हिरवा-हिरविणींनी एकमेकांना खुन्नस देत म्हटलेली अनेक पार्टी-सॉंग्स असतील. काहींशी तुमच्या एखाद्या खास आठवणीचा धागा जुळलेला असेल...
सांगा ना, तुम्हांला कुठली गाणी चित्रीकरणामुळे आवडतात-आठवतात, नि त्यांत काय आहे असं विशेष?