Roman à clef , झिरझिरीत पडदा, "कलेचे कातडे", गॉसिप, नॉस्टाल्जिया इत्यादिवगैरे अंकलटाईप्स गोष्टी

सरत असलेल्या वर्षांबरोबर "अनेक पुस्तकं वाचायची राहून जात आहेत" या जाणीवेचं रूपांतर "आपलं  फारसं काहीच वाचून होणार नाहीये" अशात व्हायला लागतं. अशा नव्याने झालेल्या जाणीवेकरता  #राहूनगेलेलीपुस्तकं असा हॅशटॅग चालवावा असा एक विचार डोकावून जातो.

...तर निमित्त आनंद यादव यांच्या "कलेचे कातडे" नावाच्या कादंबरीचं. काही आठवड्यांपूर्वी हे पुस्तक एका मित्राकडे पाहिलं ते वाचायला आणलं. काही दिवसांपूर्वी वाचायला घेतलं.

kaleche-katade-yadav

कादंबरीच्या  सुरवातीला आनंद यादवांनी लिहिलेल्या मराठी साहित्यातल्या "कलावाद" या घटनेबद्दलचं विवेचन. ते सुमारे ६-७ पानांचं आहे. 

कादंबरीच्या सुरवातीच्या काही पानांतच माझ्या लक्षांत आलं अरे ही तर सरळसरळ Roman à clef आहे की. Roman à clef  म्हणजे कुठल्यातरी वास्तवजगातल्या व्यक्ती आणि घटनांबद्दलचं कथानक. पण सर्वांची नावं बदललेली असणं.  

म्हणजे वास्तवजगातल्या व्यक्ती/घटना आणि Roman à clef कादंबरीतल्या गोष्टी यांच्यामधे असतो एक पडदा. हा पडदा कितपत झिरझिरीत ठेवायचा (जेणेकरून वास्तवातल्या गोष्टींची ओळख पटकन समजेल किंवा समजणार नाही) , त्यामधे काल्पनिक गोष्टींची कितपत भर टाकायची ते लेखकाच्या निवडीवर अवलंबून असणार.

तेव्हा आता सर्वप्रथम वाचकांना कुतुहल असणार की बुवा यादवांनी ही  कादंबरी नक्की कुणाबद्दल नि कशासंदर्भात लिहिली असेल? तर त्याचं सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ उत्तर हे आहे की ती लिहिली आहे व्यंकटेश माडगूळकर आणि त्यांच्या पारितोषिक विजेत्या "सत्तांतर" या कादंबरीबद्दल.

sattantar-madgulkar

आता या वळणावर एक गमतीशीर गोष्ट नोंदवायला हवी. ती आहे कालानुक्रमाची. घटनांचा कालानुक्रम, त्या घडून गेल्यावर लोटलेला काळ, त्याबद्दलची अंधुक होत गेलेली वैयक्तिक स्मृती आणि सार्वजनिक स्मृती, संबंधित व्यक्तींची झालेली निधने, खुद्द वाचकाचं बदललेलं वय, त्याचा या गोष्टींबद्दलचा प्रतिसाद, त्या त्या गोष्टींचा विरळ होत गेलेला रिलेव्हन्स आणि या अनुषंगाने शेवटी महत्त्व नेमके कशाचे? ते किती काळ टिकायचे? व्यक्तींचं रेप्युटेशन, त्यांच्या कारकिर्दीतल्या बऱ्यावाईट गोष्टींचं विरळ होत गेलेलं माहात्म्य.... थोडक्यात काळाच्या पटलावर काय राहातं आणि मुख्य म्हणजे बहुतांशी सगळंच कसं विरून जातं याची एक वाचक म्हणून झालेली नोंद. खरं सांगायचं तर इतपत मांडणं या कारणापायीच या माझ्या छोट्याशा टिपणाचा प्रपंच.

 "सत्तांतर" ही कादंबरी वानरांबद्दलची; त्यांच्या समूहाबद्दलची; त्यातल्या सत्तासंघर्षाची. नर-मादी यांच्यातलं पॉवर पॉलिटिक्स, एखादा विशिष्ट नर त्यातला "अल्फा मेल" कसा बनतो, इतर नरांवर अधिराज्य कसं गाजवतो, अनेक माद्या कशा वर्चस्वाखाली आणतो, त्या सर्व घटनांमधली हिंसा, आदिम प्रवृत्ती इत्यादि गोष्टींचं चित्रण म्हणजे प्रस्तुत, सुमारे ६०-६५ पानांचं पुस्तक. त्यात माडगूळकरांनी केलेली स्केचेस आहेत. कादंबरीमधे एकही मानवी पात्र नाही.

आता थोडासा घटनाक्रम :

"सत्तांतर" माझ्या अंधुक आठवणीप्रमाणे १९८७च्या सुमारास आली. "सत्तांतर" ला '८७-८८च्या सुमारास पारितोषिक मिळाले. (बहुदा साहित्य अकादेमीचे पारितोषिक. गूगल सर्च करून उत्तर मिळालं नाही. किंवा मी धड सर्च केलं नाही.)  पारितोषिकाची बातमी आल्यानंतर काही महिन्यांमधेच "ही कादंबरी कुठल्यातरी डॉक्युमेंटरी की कुणा एका शास्त्रज्ञाच्या की काही शास्त्रज्ञांच्या संशोधनावरून सरळ सरळ उचललेली आहे असा आरोप एका लेखावाटे झाला. त्याला माडगूळकरांनी उत्तर दिलं आणि तेच उत्तर कादंबरीच्या पुढील आवृत्त्यांमधे प्रस्तावना म्हणून समाविष्ट केलं गेलं.

ऑगस्ट २००१ मधे माडगूळकरांचं निधन झालं. सप्टेंबर २००१ मधे "कलेचे कातडे" ही कादंबरी प्रसिद्ध झाली. (माडगूळकरांच्या निधनाला महिनाही झालेला नसताना.)

२००८ मधे आनंद यादव यांची "संतसूर्य तुकाराम" ही कादंबरी प्रसिद्ध झाली. २००९च्या साहित्यसंमेलनाचं अध्यक्षपद त्यांना मिळत असल्याची घोषणा झाली. साहित्यसंमेलनाच्या आधी काही महिने वारकरी संघटनेतर्फे "संतसूर्य तुकाराम"वर बंदी घालावी, त्याच्या सर्व प्रती नष्ट कराव्यात अशी मागणी आली. ती मुख्यमंत्री, तत्कालीन स्वागातध्यक्ष कौतिकराव ठालेपाटील इत्यादि लोकांपर्यंत पोचवण्यात आली. मोर्चे, आंदोलनं झाली. यादवांनी सुरवातीला या मागण्यांना वाऱ्यावर उडवून लावण्याचा प्रयत्न केला. मग जसा आंदोलनाचा जोर वाढला  तसा न्यायालयीन हस्तक्षेप झाला आणि ठालेपाटील सारख्यांनी मसलत केली  तसं यादवांनी माफी मागितली. माफीचा उपयोग झाला नाही. पुस्तकांच्या प्रती नष्ट करण्याचा न्यायालयीन आदेश मान्य करावा लागला. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.

२०१३ साली यादवांनी आपण लेखनसंन्यास घेत असल्याचं जाहीर केलं.

२०१६ साली यादवांचं निधन झालं.

आता थोडं विवेचन "कलेचे कातडे" या कादंबरीबद्दल.  ही कादंबरी व्यंकटेश माडगूळकर आणि "सत्तांतर"बद्दल आहे हे चटकन कळण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे त्यातल्या "अप्पासाहेब कुलकर्णी" या प्रथितयश लेखकाच्या पारितोषिकविजेत्या कादंबरीचं नाव असतं "भक्ष्यांतर". Duh. इथे म्हणजे यादवांनी झिरझिरीत असलेल्या बुरख्याला सरळसरळ मोठ्ठं भगदाडच पाडलेलं आहे.

तर "आप्पासाहेब कुलकर्णी" यांचं पुण्यातलं आयुष्य, त्यांची जीवनशैली, व्यावसायिक,  वैवाहिक आणि अत्यंत खासगी प्रकारच्या घटनांची वर्णनं,   त्यांची साहित्यिक कारकीर्द, आवडीनिवडी, लिखाणाचे विषय, आजूबाजूच्या सांस्कृतिक जगतातली त्यांची उठबस या सर्व चित्रणामधून व्यंकटेश माडगूळकर दिसले नसते तरच नवल.

आप्पासाहेब कुलकर्णी यांच्या एकंदर महात्म्याचा आब राखून, त्यांच्याविषयी अगदी थेट अनुदार, वाईट, कटु अशी टिप्पणी न करतांही, त्यांना वैयक्तिक आयुष्यात आणि सामाजिक/साहित्यिक संदर्भात दांभिक आणि मॅनिप्युलेटिव्ह असल्याचं दाखवणं हा कादंबरीचा मोठासा भाग. तो चित्रित करताना यादवांनी एकंदर सभ्यता राखली आहे; पण ज्याकडे निर्देश केलेला आहे तो करताना उरलेली चार बोटं यादवांकडे निर्देश करत येतातच. "बापरे, तुम्ही दंभस्फोट करायचा म्हणून लिहायला गेलात आणि तो करताना तुमचीही 'मलिदा मिळत नाही' म्हणून वाटणारी अतृप्ती तुम्ही दाखवलीत" असं मनातल्या मनात वाचक यादवांना म्हणून जातो.

"आप्पासाहेब कुलकर्णींनी" वाङ्मयचौर्य केलं आहे आणि ते करून सवरून वर परत त्याची सफाई सुद्धा ते देतात आणि एकंदरीत पुण्यामुंबईकडचे साहित्यिक जगतातले लोक यात सामील आहेत, त्यांनी त्यावर पांघरूणही घातलं आहेच आणि एकंदर सांस्कृतिक वातावरणच असं "तू माझे हितसंबंध जप; मी तुझे जपतो" अशा प्रकारचं आहेत हे यादवांनी कादंबरीतून दाखवायचा केलेला प्रयत्न. असा एकंदरीत प्रकार.

हे कमी पडतं म्हणून की काय, "अप्पासाहेब कुलकर्णी" यांच्या वैवाहिक आणि  विवाहबाह्य संबंधांन अनुलक्षून व्यक्ती आणि घटनांची पेरणी. त्यात केलेली वास्तवातल्या सर्वज्ञात गोष्टींची आणि काल्पनिक गोष्टींची सरमिसळ. त्यातली, काही एक अंशी मिटक्या मारीत केलेली वर्णनं. (एक गोष्ट मान्य करायला पाहिजे. सुनीताबाई देशपांडे यांनी ना. गो. कालेलकरांवरच्या मृत्युलेखात व्यंकटेश माडगूळकरांबद्दलच्या या भागाचा काहीसा जाताजाता केलेला उल्लेख आलेला असल्याने ही बाजू अगदी कणमात्र प्रमाणात माहिती होती. मात्र सुनीताबाईंच्या लिखाणात गॉसिपचा किंवा काही चीप उद्देशाने लिहिण्याचा लवलेश मला जाणवलेला नव्हता.)

...आणि या सर्वाला अस्तर आहे ते यादवांनी केलेल्या उच्चवर्णीय आणि विशेष करून ब्राह्मण जातीतल्या व्यक्तीं आणि समूहांचं स्टिरिओटिपिकल चित्रणाचं. पुन्हा एकदा, ते लिहिताना यादवांनी एकंदर सभ्यता राखली आहे; पण ज्याकडे निर्देश केलेला आहे तो करताना उरलेली चार बोटं यादवांकडे निर्देश करत येतातच. "म्हणजे तुम्ही सर्वकाही जातीच्या चष्म्यातून पाहात आहात असता तर..." असं मनातल्या मनात वाचक यादवांना म्हणून जातो.

मी वर म्हण्टल्याप्रमाणे, या सर्व घटना घडून गेल्यावर अचानक जेव्हा असं काही वाचायचा योग इतक्या वर्षांनी येतो तेव्हा एक वाचक म्हणून मनात निर्माण झालेला प्रतिसाद काहीसा रंगीबेरंगी असतो. यादवांचं चार भागातलं आत्मचरित्र मला आवडलेलं होतं. त्यांचा एक "पाटी आणि पोळी" शीर्षकाचा धडाच आम्हाला मराठीत होता. कुठल्याही संघर्षातून मोठ्या झालेल्या माणसाबद्दल जे वाटतं तेच या सर्वातून वाटत आलेलं होतं. त्याला कुठेतरी २००९ सालीच तडा गेला होता; आता हे वाचल्यावर म्हण्टलं ठीक आहे यादव आपले मातीतलेच आहेत.

माडगूळकरांबद्दल इतकं प्रतिमाभंजन होण्याचं कारण नव्हतं. ते कलंदरच होते आणि त्यापेक्षा वेगळं काही अजूनही वाटत नाही. आजही मी त्यांची बनगरवाडी  - इतकंच काय तर सत्तांतरही परत मिळाली तर - मजेत वाचू शकेन. त्याचा आस्वादप्रक्रियेत गॉसिपी नीतीमत्ता येऊ देणार नाही.

पण मुद्दा केवळ अमुक व्यक्तींचं प्रतिमाभंजन (किंवा मनातून उतरणं वगैरे) इतकाच नाही. खुजेपणाचा आहे. यादवांच्या लिखाणातून तो प्रतीत होतो; त्यानी केलेली वर्णनं वाचताना आपणही त्याच पातळीवर पोचल्याचं काही वेळ वाटतं. आणि मग काही वेळाने म्हण्टलं "हट् ! मी काय एक वाचक म्हणून या असल्या गढूळ पाण्यात डुंबत बसणार नाही."

आणखी गमतीचा मुद्दा आहे आठवणींचा आणि रिलेव्हन्सचा. "सत्तांतर"ची प्रत माझ्याकडे नाही. असती तर मी या प्रसंगाने प्रेरित होऊन परत वाचली असतीच. 
इथे थोडं स्मरणरंजन येतं. सुनीताबाई आणि पुलं (ज्यांची आयुष्यभराची माया आणि आत्मचरित्राला प्रस्तावना यादवांना मिळाली) त्यांची आठवण आली. पुलं आणि सुनीताबाईंचं आपल्या स्थान अजूनही अढळच आहे याची खातरजमा झाली.

आणि मग शेवटी सामूहिक स्मृती : या वाचनाच्या निमित्ताने साहित्यातलं काय गेलंय आणि काय शिल्लक राहिलंय, एकंदर काहीही विशेष स्मृतीत न राहाण्याच्या काळात आपण आलो आहोत, साहित्य वगैरे "किस चिडिया का नाम हय" वाटावं असं मस्त वातावरण आहे याची उजळणी झाली.  आणि म्हण्टलं चला अंकलगिरी पुरे झाली आता जरा टिकटॉक व्हिडिओ पाहू, इन्स्टा चाळू, ट्विटर आजमावू, फेसबुकला चक्कर मारू आणि ओटीटीवर काही आहे का ते बघू.

बातमीचा प्रकार निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कल्पनकिल्ली कादंबरीचा परिचय आवडला. ‘सत्तांतर’ प्रसिद्ध झाली तेव्हा मी वाचली होती. वाङ्मयचौर्याचा आरोप तर झालाच, पण मुळात तिला कादंबरी का म्हणायचं इथूनच लोकांना शंका होत्या.

---
> आस्वादप्रक्रियेत गॉसिपी नीतीमत्ता येऊ देणार नाही.
---

हे ‘सत्तांतर’च्या प्रकृतीला साजेसं आहे. त्यातलं कुठलंही माकड ‘नीतिमत्ते’ने वागत नाही. एथिकली तर नाहीच नाही, पण मोरली पण नाही. ते इंद्रिय त्यांना नसतं.

साहित्यिकांतले हेवेदावे आणि असूया चव्हाट्यावर येणं ही तशी वाईट गोष्ट असली तरी साहित्यामध्ये आणि अनुषंगाने साहित्यिकांमध्ये समाज रस घेत असे याचं ते लक्षण आहे. तो काळ आता बहुतेक गेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

साहित्यामध्ये आणि अनुषंगाने साहित्यिकांमध्ये समाज रस घेत असे याचं ते लक्षण आहे. तो काळ आता बहुतेक गेला.

इतके थोडे जण तेव्हा लिहित होते की "साहित्य" आणि "साहित्यिक" म्हणजे आपल्यासारखेच पण हाताला एक पेन फुटलेले लोकं आहेत हे बहुतेक लोकांना समजाय्चं नाही, त्या अप्रूपापायी रस घेत असावेत.

आता तेच चित्रपटनटनट्यांबद्दल होतंय. उद्या कोणी टिकटॉकचा बाप आला आणि सगळेच लोक सिनेमातून कामं करू लागले, तर मग चित्रपटताऱ्यांकडे कोण बघील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> म्हणजे त्यातल्या "अप्पासाहेब कुलकर्णी" या प्रथितयश लेखकाच्या पारितोषिकविजेत्या कादंबरीचं नाव असतं "भक्ष्यांतर".

---
प्रश्न: ह्या कादंबरीचा प्लॉट दिलेला आहे का? Play within a play अनेकदा असतो. Novel within a novel त्यामानाने क्वचित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

सत्तांतरचं भक्ष्यांतर , माकडांचं तरस केलेलं आहे.

एक गोष्ट मान्य करतो. "कलेचे कातडे" ही कादंब्री मला रेटावी लागली. केवळ बोअरिंग होती. केवळ गॉसिपी असल्याने वाचत राह्यलो नायतर TLDR मारला असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

एखाद्या लेखकाची उंची आपल्याला गाठता येणार नाही याची खात्री पटल्यावरच हे असं पडद्याआडून चारित्र्यहनन सुरु होतं. असे नमुने त्याकाळीही होते आणि आजही आहेत.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२००८ मधे आनंद यादव यांची "संतसूर्य तुकाराम" ही कादंबरी प्रसिद्ध झाली. २००९च्या साहित्यसंमेलनाचं अध्यक्षपद त्यांना मिळत असल्याची घोषणा झाली. साहित्यसंमेलनाच्या आधी काही महिने वारकरी संघटनेतर्फे "संतसूर्य तुकाराम"वर बंदी घालावी, त्याच्या सर्व प्रती नष्ट कराव्यात अशी मागणी आली

शोधायचा आळस करतो आहे, पण हे नक्की काय आक्षेप घेत होते? असं काय लिहिलं त्या पुस्तकात की सगळ्या प्रती नष्ट करायला लागल्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या वेबसाईटवर थोडाफार तपशील आहे.

https://www.maayboli.com/node/61300

बाकीच्या सर्च-रिझल्ट्स मधून फार काही हाती लागलं नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार प्रती नष्ट कराव्या लागल्या, यादव आणि मेहता प्रकाशकांना दंड झाला असा मोघम वृत्तांत आहे. यात मेख अशी की न्यायालयाच्या मते जर तो बदनामीकारक मजकूर असेल तर तो नक्की काय होता हे (भारतातल्या) पेपरांना छापता येणार नाही. आपली न्यायालयं देखील रेमेडोकेपणा फार करतात.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

अक्षरनामावर एका लेखात यादवांच्या लिखाणाचा आढावा घेतलाय, त्यात 'संतसूर्य तुकाराम' पेक्षा 'कलेचे कातडे' चीप असण्याबद्दल उल्लेख आहे
https://www.aksharnama.com/client/article_detail/220

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यक्ती आणि वल्ली हे "Roman à clef" म्हणता येईल का? त्यातला पडदा जवळपास अपारदर्शक आहे - पण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑल फिक्शन इज रोमान अ क्ले Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

> रोमान अ क्ले

---
तूर्तास चालवून घेऊ, पण हा उच्चार देवनागरीत अचूक लिहायला ‘अविनाश समरज्योत’च हवेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

कोण हे 'अविनाश समरज्योत'? आणि ते अवतरणांत का आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

समरज्योत हे एका सीकेपी आडनावाचं मराठीतच केलेलं गमतीशीर भाषांतर आहे.
अविनाश हे भाषांतर चुकलेलं आहे.
बाय द वे, "अविनाश समरज्योत" इतकेच "तेज:पुंजा वैराग्यळेहात" सुद्धा उपलब्ध आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

समरज्योत हे एका सीकेपी आडनावाचं मराठीतच केलेलं गमतीशीर भाषांतर आहे.

हात्तेच्या! ते होय? मग, त्यापेक्षा, सरळसरळ 'कॉम्रेड' म्हटले असते, तर सहज कळले नसते? हा (मराठीतून मराठीतच भाषांतर करण्याचा) द्राविडी प्राणायाम कशासाठी?

'अविनाश'च्या ऐवजी 'अजिंक्य' हे (शब्दश: नव्हे, तरी) योग्य पर्यायाच्या थोडे अधिक जवळ आले असते काय?

'तेज:पुंजा' ठीकच आहे, परंतु, 'वैराग्यळेहात' हे ('ळे'चे भाषांतर न जमल्याकारणाने) कैच्याकैच वाटते. (शिवाय, 'वैराग्य' हेही भाषांतर अचूक नव्हे. 'बैरागी' कदाचित थोडे अधिक जवळ येईल.) मात्र, दुसरा, चांगला पर्यायही सुचत नाही. ('बायडेनकंठहात' धेडगुजरी तथा तात्कालिक वाटते, तसेच, त्यात दंत्यतालव्य 'जो'च्या ठिकाणी तालव्य 'जो'चे प्रत्यारोपण करावे लागते, हाही दोष आहेच. शिवाय, आज 'बायडेनकंठहात' जर चालवून घेतले, तर उद्या 'बायडेनविष्ठा' का चालवून घेऊ नये, असाही प्रश्न कधी ना कधी उद्भवेलच. त्यापेक्षा, नकोच ते!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

बाय द वे, "अविनाश समरज्योत" इतकेच "तेज:पुंजा वैराग्यळेहात" सुद्धा उपलब्ध आहेत.

उपयोगाच्या नाहीत!

इथे आधीच संस्थळावर ‘बामणीपणा’चे आरोप होत असताना तुम्ही (“समरज्योत”ना डावलून) “वैराग्यळेहातां”चा पुरस्कार करा. आरोप वाढतील, नाही तर काय कमी होतील?

शिवाय, एक पुरोगामी, प्रगतिशील संस्थळ या नात्याने, “अब्राह्मणी फ्रेंच”ला पुढे आणणे/प्रोत्साहन देणे(/वेळ पडल्यास डोक्यावरसुद्धा घेणे) हे आपले कर्तव्य बनत नाही काय?

केवढी ही कर्तव्यच्युतियेगिरी! (पण शेवटी तुम्हीपण पडले बामणच! तुमच्याकडून दुसरी अपेक्षा ती काय करणार?)

तेव्हा, “वैराग्यळेहातां”पेक्षा “समरज्योत”नाच विचारीत जाऊ यात. (नाहीतर त्यांना कोण विचारेल?)

असो. चालू द्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

नाव घ्यायला लाजत असलात तरी रोमांनाक्लेफ हा उच्चार चालेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

@राबा - तसं नाय हो.
पण आता उदा. "तो". हे १०१% कुणावर तरी बेतलेलं आहे - फक्त कोण ते कळायला (मला तरी) मार्ग नाही. कदाचित इतरांना ते सूर्यप्रकाशाएवढं. इ.इ.
किंवा मग "भय्या नागपूरकर" - पु.ल बहुतेक ह्या गृहस्थांना नंतर फारा वर्षांनी भेटले आणि त्यांची चांगलीच निराशा झाली होती.
ह्या दोन व्यक्तींवरून वाटलं की हे रोमा-अ-क्ले असेल.

मराठीत अजून काही पुस्तकं आहेत का अशी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लखू रिसबूड तर १००% टक्के खऱ्या माणसावर बेतलेले असणार.
अवांतर: एकही ह्या सबंध पुस्तकात एकही वल्ली बाई नाही हे आश्चर्यजनक वाटते. ते चौकोनी कुटुंब मध्ये मालतीबाई आहेत पण तो त्या चौकोनाचा एक कोन म्हणुन. नेमाडेंनी कुठे तरी म्हटलेलं की पुलंसारखी विनोदी पुस्तकं काही दिवसात लिहू शकेन ते बहुतेक ह्याच पुस्तकाला उद्देशून होते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

माझ्या मते व्याख्येत नीट बसणार नाही. उदाहरणार्थ, ‘अण्णा वडगावकर’ ही व्यक्ती आपल्या (जवळजवळ) खऱ्या नावानिशी आलेली आहे. (खूप वर्षांपूर्वी त्यांच्या एका विद्यार्थ्याला मी भेटलेलो आहे. असा एक प्राध्यापक माणूस होता हे नक्की. नाव तंतोतंत हेच होतं का याबद्दल खात्री नाही.) याउलट ‘नारायण’ हा बहुधा कुटुंबात (आणि विशेषत: लग्नकार्यात) त्या काळी ठराविक भूमिका बजावणाऱ्या अनेक माणसांचं मिश्रण असावा. तसंच ‘लखू रिसबूड’ बद्दलही वाटतं. मात्र ‘नामू परटा’मागे कुणीतरी एकच खरी व्यक्ती असावी असा संशय येतो. हा सगळा नुसता माझा अंदाज. यातलं काहीच मला पुराव्याने शाबीत करता येणार नाही.

थोडक्यात मी म्हणेन की ‘किल्ली’ (clef) ने दार उघडून आत गेलं तरी तिथेही अंधारात चाचपडायलाच होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

ह्या लेखामुळे नुकताच 'न्यू यॉर्कर'मध्ये वाचलेला लेख आठवला. ऑस्कर पुरस्कार विजेता, इराणी चित्रपट दिग्दर्शक असगर फरहादी (ऑसगर फॉरहॉदी) यानं पुरस्कारविजेत्या चित्रपटांमागच्या कल्पना इतर कुणाकडून उचलल्या का, आणि त्यांना पुरेसं श्रेय दिलं नाही का, याबद्दल हा लेख आहे. लेखाच्या केंद्रस्थानी आहे त्याची माजी विद्यार्थिनी आजादेह मासिहजादेह आणि तिच्या माहितीपटावर आधारित फरहादीचा चित्रपट 'अ हिरो'.

त्या संदर्भातला खटला जोवर न्यायालयात जात नाही, तोवर आजादेहचं म्हणणं असतं की फरहादीनं सिनेमे बनवत राहावेत; कारण फरहादीचे सिनेमे तिला आवडतात. पुढे तिचं मत आणखी कडवट होतं. इतरही काही चित्रपटांचं श्रेय फरहादीनं दिलं का नाही, याबद्दल या लेखात शंका उपस्थित केल्या आहेत.

हा फरहादीबद्दलचा लेख आठवण्याचं मुख्य कारण म्हणजे इराणी न्यायव्यवस्थेवर पाश्चात्त्यांचा फार विश्वास नाही. त्यामुळे खटल्यात सुरुवातीला मासिहजादेहच्या बाजूनं म्हणावा असा निकाल लागलेला असला तरीही फरहादीच्या प्रतिष्ठेला कुठेही धक्का पोहोचलेला दिसत नाही.

लेखातला हा एक परिच्छेद -

Taraneh Alidoosti, arguably Iran’s most distinguished actress, who has starred in four of Farhadi’s films, including “The Salesman,” which won an Oscar in 2017, said that she laughed when she saw the title “Everybody Knows,” because it seemed to speak to Farhadi’s own fears. His films portray characters who lie to protect their social status and are terrified of what people will say about them if their secrets are uncovered. She said that, for a long time, “we always laughed about it, like, ‘O.K., everything is yours, Asghar, go on with it.’ ” She added, “We are talking about a genius, but he is also a genius in the ways that he has to suck the people around him out of their ideas.” When she learned a student had claimed that Farhadi took her idea, “I said, ‘Of course. I know it. I already know it.’ ”

लेखाचा दुवा - Did the Oscar-Winning Director Asghar Farhadi Steal Ideas?

लेख जरा लांबडा आहे; पण जरूर वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

व्याख्येची ओढाताण केली तर कदाचित नेमाड्यांच्या कादंबऱ्या (बिढार-जरीला-झूल) ह्या रोमां आ क्ले म्हणता येतील. उदाहरणार्थ, ‘बिढार’मधले ‘कुलकर्णी प्रकाशक’ हे खरे रा.ज. देशमुख आहेत. याखेरीज त्यांत वर्णन केलेली गावं आणि कॉलेजं ह्या खानदेश-मराठवाड्यातल्या खऱ्या जागा असाव्यात, पण कुठल्या हे मला ओळखता येणार नाही.

पण मराठीत आणखी तशी उदाहरणं आठवत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

बिढार तर १००% - आणि बऱ्याच ठिकाणी ही टीका बोचरी, काही वेळा वैयक्तिक आकस ठेवून केली आहे हे स्पष्ट जाणवतं.
उदा. रत्नागिरीकर = चिं.त्र्य. खानोलकर.
बाकी शंकर, कुलकर्णी प्रकाशक, बाळ्या, नामू, रामराव ही सगळी मंडळी खऱ्याखुऱ्या लोकांवर बेतली आहेत हे अशोक शहाण्यांच्या "नपेक्षा" पुस्तकात एके ठिकाणी सापडलं होतं मागे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

९०च्या दशकातला सईपरांजपेंचा "साज" हा सिनेमा cinéma à clef.
लता-आशाला समोर ठेवून काढलेला.
मला पसंत न पडलेला.
पण त्यातली गाणी आवडली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

तसा दिवाळी अंकातला 'आत्याचा सल्ला'ही यातलाच म्हणता येईल. मला कित्ती लोकांनी 'फोन आपलं बोलणं ऐकतो' हे ऐकवलं आहे...!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.