सरत असलेल्या वर्षांबरोबर "अनेक पुस्तकं वाचायची राहून जात आहेत" या जाणीवेचं रूपांतर "आपलं फारसं काहीच वाचून होणार नाहीये" अशात व्हायला लागतं. अशा नव्याने झालेल्या जाणीवेकरता #राहूनगेलेलीपुस्तकं असा हॅशटॅग चालवावा असा एक विचार डोकावून जातो.
...तर निमित्त आनंद यादव यांच्या "कलेचे कातडे" नावाच्या कादंबरीचं. काही आठवड्यांपूर्वी हे पुस्तक एका मित्राकडे पाहिलं ते वाचायला आणलं. काही दिवसांपूर्वी वाचायला घेतलं.
कादंबरीच्या सुरवातीला आनंद यादवांनी लिहिलेल्या मराठी साहित्यातल्या "कलावाद" या घटनेबद्दलचं विवेचन. ते सुमारे ६-७ पानांचं आहे.
कादंबरीच्या सुरवातीच्या काही पानांतच माझ्या लक्षांत आलं अरे ही तर सरळसरळ Roman à clef आहे की. Roman à clef म्हणजे कुठल्यातरी वास्तवजगातल्या व्यक्ती आणि घटनांबद्दलचं कथानक. पण सर्वांची नावं बदललेली असणं.
म्हणजे वास्तवजगातल्या व्यक्ती/घटना आणि Roman à clef कादंबरीतल्या गोष्टी यांच्यामधे असतो एक पडदा. हा पडदा कितपत झिरझिरीत ठेवायचा (जेणेकरून वास्तवातल्या गोष्टींची ओळख पटकन समजेल किंवा समजणार नाही) , त्यामधे काल्पनिक गोष्टींची कितपत भर टाकायची ते लेखकाच्या निवडीवर अवलंबून असणार.
तेव्हा आता सर्वप्रथम वाचकांना कुतुहल असणार की बुवा यादवांनी ही कादंबरी नक्की कुणाबद्दल नि कशासंदर्भात लिहिली असेल? तर त्याचं सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ उत्तर हे आहे की ती लिहिली आहे व्यंकटेश माडगूळकर आणि त्यांच्या पारितोषिक विजेत्या "सत्तांतर" या कादंबरीबद्दल.
आता या वळणावर एक गमतीशीर गोष्ट नोंदवायला हवी. ती आहे कालानुक्रमाची. घटनांचा कालानुक्रम, त्या घडून गेल्यावर लोटलेला काळ, त्याबद्दलची अंधुक होत गेलेली वैयक्तिक स्मृती आणि सार्वजनिक स्मृती, संबंधित व्यक्तींची झालेली निधने, खुद्द वाचकाचं बदललेलं वय, त्याचा या गोष्टींबद्दलचा प्रतिसाद, त्या त्या गोष्टींचा विरळ होत गेलेला रिलेव्हन्स आणि या अनुषंगाने शेवटी महत्त्व नेमके कशाचे? ते किती काळ टिकायचे? व्यक्तींचं रेप्युटेशन, त्यांच्या कारकिर्दीतल्या बऱ्यावाईट गोष्टींचं विरळ होत गेलेलं माहात्म्य.... थोडक्यात काळाच्या पटलावर काय राहातं आणि मुख्य म्हणजे बहुतांशी सगळंच कसं विरून जातं याची एक वाचक म्हणून झालेली नोंद. खरं सांगायचं तर इतपत मांडणं या कारणापायीच या माझ्या छोट्याशा टिपणाचा प्रपंच.
"सत्तांतर" ही कादंबरी वानरांबद्दलची; त्यांच्या समूहाबद्दलची; त्यातल्या सत्तासंघर्षाची. नर-मादी यांच्यातलं पॉवर पॉलिटिक्स, एखादा विशिष्ट नर त्यातला "अल्फा मेल" कसा बनतो, इतर नरांवर अधिराज्य कसं गाजवतो, अनेक माद्या कशा वर्चस्वाखाली आणतो, त्या सर्व घटनांमधली हिंसा, आदिम प्रवृत्ती इत्यादि गोष्टींचं चित्रण म्हणजे प्रस्तुत, सुमारे ६०-६५ पानांचं पुस्तक. त्यात माडगूळकरांनी केलेली स्केचेस आहेत. कादंबरीमधे एकही मानवी पात्र नाही.
आता थोडासा घटनाक्रम :
"सत्तांतर" माझ्या अंधुक आठवणीप्रमाणे १९८७च्या सुमारास आली. "सत्तांतर" ला '८७-८८च्या सुमारास पारितोषिक मिळाले. (बहुदा साहित्य अकादेमीचे पारितोषिक. गूगल सर्च करून उत्तर मिळालं नाही. किंवा मी धड सर्च केलं नाही.) पारितोषिकाची बातमी आल्यानंतर काही महिन्यांमधेच "ही कादंबरी कुठल्यातरी डॉक्युमेंटरी की कुणा एका शास्त्रज्ञाच्या की काही शास्त्रज्ञांच्या संशोधनावरून सरळ सरळ उचललेली आहे असा आरोप एका लेखावाटे झाला. त्याला माडगूळकरांनी उत्तर दिलं आणि तेच उत्तर कादंबरीच्या पुढील आवृत्त्यांमधे प्रस्तावना म्हणून समाविष्ट केलं गेलं.
ऑगस्ट २००१ मधे माडगूळकरांचं निधन झालं. सप्टेंबर २००१ मधे "कलेचे कातडे" ही कादंबरी प्रसिद्ध झाली. (माडगूळकरांच्या निधनाला महिनाही झालेला नसताना.)
२००८ मधे आनंद यादव यांची "संतसूर्य तुकाराम" ही कादंबरी प्रसिद्ध झाली. २००९च्या साहित्यसंमेलनाचं अध्यक्षपद त्यांना मिळत असल्याची घोषणा झाली. साहित्यसंमेलनाच्या आधी काही महिने वारकरी संघटनेतर्फे "संतसूर्य तुकाराम"वर बंदी घालावी, त्याच्या सर्व प्रती नष्ट कराव्यात अशी मागणी आली. ती मुख्यमंत्री, तत्कालीन स्वागातध्यक्ष कौतिकराव ठालेपाटील इत्यादि लोकांपर्यंत पोचवण्यात आली. मोर्चे, आंदोलनं झाली. यादवांनी सुरवातीला या मागण्यांना वाऱ्यावर उडवून लावण्याचा प्रयत्न केला. मग जसा आंदोलनाचा जोर वाढला तसा न्यायालयीन हस्तक्षेप झाला आणि ठालेपाटील सारख्यांनी मसलत केली तसं यादवांनी माफी मागितली. माफीचा उपयोग झाला नाही. पुस्तकांच्या प्रती नष्ट करण्याचा न्यायालयीन आदेश मान्य करावा लागला. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.
२०१३ साली यादवांनी आपण लेखनसंन्यास घेत असल्याचं जाहीर केलं.
२०१६ साली यादवांचं निधन झालं.
आता थोडं विवेचन "कलेचे कातडे" या कादंबरीबद्दल. ही कादंबरी व्यंकटेश माडगूळकर आणि "सत्तांतर"बद्दल आहे हे चटकन कळण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे त्यातल्या "अप्पासाहेब कुलकर्णी" या प्रथितयश लेखकाच्या पारितोषिकविजेत्या कादंबरीचं नाव असतं "भक्ष्यांतर". Duh. इथे म्हणजे यादवांनी झिरझिरीत असलेल्या बुरख्याला सरळसरळ मोठ्ठं भगदाडच पाडलेलं आहे.
तर "आप्पासाहेब कुलकर्णी" यांचं पुण्यातलं आयुष्य, त्यांची जीवनशैली, व्यावसायिक, वैवाहिक आणि अत्यंत खासगी प्रकारच्या घटनांची वर्णनं, त्यांची साहित्यिक कारकीर्द, आवडीनिवडी, लिखाणाचे विषय, आजूबाजूच्या सांस्कृतिक जगतातली त्यांची उठबस या सर्व चित्रणामधून व्यंकटेश माडगूळकर दिसले नसते तरच नवल.
आप्पासाहेब कुलकर्णी यांच्या एकंदर महात्म्याचा आब राखून, त्यांच्याविषयी अगदी थेट अनुदार, वाईट, कटु अशी टिप्पणी न करतांही, त्यांना वैयक्तिक आयुष्यात आणि सामाजिक/साहित्यिक संदर्भात दांभिक आणि मॅनिप्युलेटिव्ह असल्याचं दाखवणं हा कादंबरीचा मोठासा भाग. तो चित्रित करताना यादवांनी एकंदर सभ्यता राखली आहे; पण ज्याकडे निर्देश केलेला आहे तो करताना उरलेली चार बोटं यादवांकडे निर्देश करत येतातच. "बापरे, तुम्ही दंभस्फोट करायचा म्हणून लिहायला गेलात आणि तो करताना तुमचीही 'मलिदा मिळत नाही' म्हणून वाटणारी अतृप्ती तुम्ही दाखवलीत" असं मनातल्या मनात वाचक यादवांना म्हणून जातो.
"आप्पासाहेब कुलकर्णींनी" वाङ्मयचौर्य केलं आहे आणि ते करून सवरून वर परत त्याची सफाई सुद्धा ते देतात आणि एकंदरीत पुण्यामुंबईकडचे साहित्यिक जगतातले लोक यात सामील आहेत, त्यांनी त्यावर पांघरूणही घातलं आहेच आणि एकंदर सांस्कृतिक वातावरणच असं "तू माझे हितसंबंध जप; मी तुझे जपतो" अशा प्रकारचं आहेत हे यादवांनी कादंबरीतून दाखवायचा केलेला प्रयत्न. असा एकंदरीत प्रकार.
हे कमी पडतं म्हणून की काय, "अप्पासाहेब कुलकर्णी" यांच्या वैवाहिक आणि विवाहबाह्य संबंधांन अनुलक्षून व्यक्ती आणि घटनांची पेरणी. त्यात केलेली वास्तवातल्या सर्वज्ञात गोष्टींची आणि काल्पनिक गोष्टींची सरमिसळ. त्यातली, काही एक अंशी मिटक्या मारीत केलेली वर्णनं. (एक गोष्ट मान्य करायला पाहिजे. सुनीताबाई देशपांडे यांनी ना. गो. कालेलकरांवरच्या मृत्युलेखात व्यंकटेश माडगूळकरांबद्दलच्या या भागाचा काहीसा जाताजाता केलेला उल्लेख आलेला असल्याने ही बाजू अगदी कणमात्र प्रमाणात माहिती होती. मात्र सुनीताबाईंच्या लिखाणात गॉसिपचा किंवा काही चीप उद्देशाने लिहिण्याचा लवलेश मला जाणवलेला नव्हता.)
...आणि या सर्वाला अस्तर आहे ते यादवांनी केलेल्या उच्चवर्णीय आणि विशेष करून ब्राह्मण जातीतल्या व्यक्तीं आणि समूहांचं स्टिरिओटिपिकल चित्रणाचं. पुन्हा एकदा, ते लिहिताना यादवांनी एकंदर सभ्यता राखली आहे; पण ज्याकडे निर्देश केलेला आहे तो करताना उरलेली चार बोटं यादवांकडे निर्देश करत येतातच. "म्हणजे तुम्ही सर्वकाही जातीच्या चष्म्यातून पाहात आहात असता तर..." असं मनातल्या मनात वाचक यादवांना म्हणून जातो.
मी वर म्हण्टल्याप्रमाणे, या सर्व घटना घडून गेल्यावर अचानक जेव्हा असं काही वाचायचा योग इतक्या वर्षांनी येतो तेव्हा एक वाचक म्हणून मनात निर्माण झालेला प्रतिसाद काहीसा रंगीबेरंगी असतो. यादवांचं चार भागातलं आत्मचरित्र मला आवडलेलं होतं. त्यांचा एक "पाटी आणि पोळी" शीर्षकाचा धडाच आम्हाला मराठीत होता. कुठल्याही संघर्षातून मोठ्या झालेल्या माणसाबद्दल जे वाटतं तेच या सर्वातून वाटत आलेलं होतं. त्याला कुठेतरी २००९ सालीच तडा गेला होता; आता हे वाचल्यावर म्हण्टलं ठीक आहे यादव आपले मातीतलेच आहेत.
माडगूळकरांबद्दल इतकं प्रतिमाभंजन होण्याचं कारण नव्हतं. ते कलंदरच होते आणि त्यापेक्षा वेगळं काही अजूनही वाटत नाही. आजही मी त्यांची बनगरवाडी - इतकंच काय तर सत्तांतरही परत मिळाली तर - मजेत वाचू शकेन. त्याचा आस्वादप्रक्रियेत गॉसिपी नीतीमत्ता येऊ देणार नाही.
पण मुद्दा केवळ अमुक व्यक्तींचं प्रतिमाभंजन (किंवा मनातून उतरणं वगैरे) इतकाच नाही. खुजेपणाचा आहे. यादवांच्या लिखाणातून तो प्रतीत होतो; त्यानी केलेली वर्णनं वाचताना आपणही त्याच पातळीवर पोचल्याचं काही वेळ वाटतं. आणि मग काही वेळाने म्हण्टलं "हट् ! मी काय एक वाचक म्हणून या असल्या गढूळ पाण्यात डुंबत बसणार नाही."
आणखी गमतीचा मुद्दा आहे आठवणींचा आणि रिलेव्हन्सचा. "सत्तांतर"ची प्रत माझ्याकडे नाही. असती तर मी या प्रसंगाने प्रेरित होऊन परत वाचली असतीच.
इथे थोडं स्मरणरंजन येतं. सुनीताबाई आणि पुलं (ज्यांची आयुष्यभराची माया आणि आत्मचरित्राला प्रस्तावना यादवांना मिळाली) त्यांची आठवण आली. पुलं आणि सुनीताबाईंचं आपल्या स्थान अजूनही अढळच आहे याची खातरजमा झाली.
आणि मग शेवटी सामूहिक स्मृती : या वाचनाच्या निमित्ताने साहित्यातलं काय गेलंय आणि काय शिल्लक राहिलंय, एकंदर काहीही विशेष स्मृतीत न राहाण्याच्या काळात आपण आलो आहोत, साहित्य वगैरे "किस चिडिया का नाम हय" वाटावं असं मस्त वातावरण आहे याची उजळणी झाली. आणि म्हण्टलं चला अंकलगिरी पुरे झाली आता जरा टिकटॉक व्हिडिओ पाहू, इन्स्टा चाळू, ट्विटर आजमावू, फेसबुकला चक्कर मारू आणि ओटीटीवर काही आहे का ते बघू.