"नफरत छोडो भारत जोडो" म्हणत रागा उर्फ पप्पू उर्फ राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या पदयात्रेला चांगल्यापैकी प्रतिसाद मिळत असावा असं चित्र सध्या वर्तमानपत्र आणि सोशल मीडिया निर्माण करत आहेत. विशेषतः राहुलने महाराष्ट्रात आल्यानंतर सावरकरांवर भाष्य करून जाणीवपूर्वक आरोप-प्रत्यारोप सत्र चालू केलं असा मतप्रवाह आहे. त्यामागे मोदी मीडियाला यात्रेची दखल घेणं भाग पडावं असा हेतू होता आणि तो साध्य झाला असं काँग्रेस समर्थक, हितचिंतक आणि सध्याच्या राजवटीमुळे निराश झालेले लोक सांगत आहेत. त्याहीपुढे जाऊन एक भाबडा आशावाद सोशल मीडियावर दिसतो आहे. तो म्हणजे - द्वेषमूलक राजकारण आणि राजकारणी यांचा अतिरेक झाल्यानंतर लोकांना प्रेमाची भाषा हवी आहे आणि समजते आहे. विशेषतः मोदी प्रभावाबाहेर असलेल्या सुशिक्षित मध्यमवर्गातील लोकांकडून राहुलचं हास्य, देहबोली, सामान्य लोकांमध्ये मिसळणं ह्या गोष्टींचं प्रचंड कौतुक चालू आहे. त्याच्या सुरक्षा रक्षकांची धावपळ, चिंता वगैरे फोटोतून दिसत आहेच पण राहुल मजेत चालताना, पळताना, सामान्य लोकांसारखं मिळेल ते खाताना, लहान मुलांना मायेने उचलून घेताना, स्त्री-पुरुष असा भेद न करता सगळ्यांना प्रेमाने मिठी मारतानाचे फोटो शेअर केले जात आहेत. या यात्रेमुळे राहुल व्यक्ती म्हणून आमूलाग्र बदलला आहे आणि नेता म्हणून तो पुढे येईल अशी प्रचंड आशा या लोकांना वाटते आहे . प्रत्यक्षात यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादाचं रूपांतर काँग्रेसला निवडणुकांच्यात होणाऱ्या मतदानात आणि वाढीव जागांमध्ये होणार कि नाही याबद्दल कोणालाही खात्री नाही. परंतु केवळ आशेचा किरण दाखवणारा माणूस म्हणून त्याला उचलून धरलं जात असावं अशी शंका घ्यायला वाव आहे. राहुलवर व्यक्तिगत टिप्पणी न करता म्हणावंसं वाटतं की फॉरेस्ट गम्प पळत निघाल्यावर लोक जसे त्याच्यामागे धावत निघतात, आणि एक दिवस तो थांबल्यानंतर पूर्णपणे गोंधळून जातात तशी अवस्था व्हायला नको! नाहीतर पुन्हा एकदा 'मोदी नाही तर कोण?' हा वैतागवाणा प्रश्न विक्रमादित्याला ग्रासणाऱ्या वेताळासारखा मानगुटीवर बसेल.