प्रकरण २– ॲलोपथीच्या आधीचे पाश्चिमात्य वैद्यक
सुधीर भिडे
लेखाची मांडणी
- अतिप्राचीन वैद्यक
- ग्रीक वैद्यक
- रोमन काळातील वैद्यक
- मध्ययुगीन काळातील वैद्यक
- बार्बर सर्जन्स
- ग्रह, चंद्र आणि इलाज
- चर्च आणि वैद्यक
- समालोचन
- ॲलोपथीपूर्व पाश्चिमात्य वैद्यकाला शास्त्रीय वैद्यक म्हणता येईल का?
***
ज्या वैद्यकाला आपण ॲलोपथी या नावाने ओळखतो, आणि जे शास्त्रावर आधारित आहे हे आपण पाहू, हे वैद्यक युरोपमध्ये विकसित झाले. याला पाश्चिमात्य वैद्यक असेही म्हणतात. हे वैद्यक सतराव्या शतकापासून विकसित झाले. त्याआधी युरोपमध्ये काय प्रकारचे वैद्यक अवलंबिले जायचे?
अतिप्राचीन वैद्यक
उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून मनुष्यप्राणी पृथ्वीतलावर वावरू लागले तेव्हापासूनच आजार हे असणार. आजार आले की आजारावर उपचार सुचविणारे आणि उपचार करणारे ‘शहाणे’ आलेच. त्या वेळचे उपाय अघोरी होते.
- जखमांना झाडपाला लावून बांधून ठेवणे.
- कवटीला भोक पाडून भूतांना बाहेर जाण्यास जागा देणे.
- प्राण्यांच्या चावण्यामुळे झालेल्या जखमांवर कच्चे मांस दाबून ठेवणे.
- भाजलेल्या जागेवर मंद आचेवर तेलात तळलेला बेडूक दाबून ठेवणे.
- कुजलेल्या यीस्टमध्ये बकऱ्यांच्या लेंड्या मिसळून जखमेवर त्याचा लेप देणे.
भारतात काय स्थिती होती?
चरक संहितेप्रमाणे क्षयासाठी जंगली श्वापदे, घुबड, मुंगूस, गिधाड यांच्या मांसाची तेलात फोडणी करून आणि त्यात सैंधव मिसळून रोग्यास खायला द्यावे.
तर्कशुद्ध विचारांचा अभाव ही बरीच जुनी परंपरा जगभर दिसून येते.
(कहाणी शस्त्रक्रियेची, डॉक्टर विजय बापये, रोहन प्रकाशन २०१०)
या प्राचीन वैद्यकातून पाश्चात्त्य वैद्यक विकसित झाले. पाश्चिमात्य वैद्यकाच्या विकासाचे तीन टप्पे दिसतात –
१. ग्रीकांचे वैद्यक
२. रोमन लोकांचे वैद्यक
३. मध्ययुगीन वैद्यक
ग्रीक वैद्यक
सुमारे अडीच हजार वर्षांपासून प्राचीन ग्रीसमध्ये शरीराची रचना आणि आजाराची कारणे यांचा अभ्यास चालू झाला. ग्रीक वैद्यक साधारणपणे आठशे वर्षे निरनिराळ्या बेटांवर विकसित होत राहिले; त्यामुळे त्यांत समानता दिसत नाही. आहाराचा आजाराशी संबंध असतो हे ग्रीकांनी लवकरच ओळखले. अस्क्लेपिअस हा देव आणि वैद्य समजला जातो. दैवी प्रकोपामुळे आजार होऊ शकतो असे मानले जाई. शरीरात चार द्रव असतात असा विश्वास होता. या चार द्रवांचे संतुलन बिघडले की आजार होतो अशी समजूत होती.
ख्रिस्तपूर्व ५००मध्ये वैद्यकशास्त्राचा जनक समजला जाणारा हिपोक्रातेस होऊन गेला. टोलेमी राजाने हिपोक्रातेसचे सगळे लिखाण एकत्र केले आणि त्या कॉर्पस असे नाव दिले. हे लिखाण अतिशय मुद्देसूद आहे. हिपोक्रातेसने वैद्यकाचे ज्ञान चार भागांत विभागले – रोगनिदान, शरीरशास्त्र, उपचार आणि वैद्यांना सूचना. वैद्यकीय व्यवसाय सुरू करताना हिपोक्रातेसने सांगितलेली शपथ आजही दिली जाते. रोग्याकडून मिळालेल्या माहितीची गोपनीयता हा या शपथेचा महत्त्वाचा भाग आहे.
ग्रीक वैद्य हेरोफिलोस शास्त्रशुद्ध शरीर शास्त्राचा जनक समाजाला जातो. त्याने शवविच्छेदनाला सुरुवात केली आणि शरीरातील अवयवांचे नामकरण केले. प्रक्सागोरसने प्रथम नाडीची हालचाल शोधली. शरीरात रोहिणी आणि नीला अशा दोन प्रकारच्या वाहिन्या असतात हे त्याने शोधले.
त्या काळात वैद्यकाचे शिक्षण आणि पदवी असा प्रकार नव्हता. जिला वाटे की तिला रोगांची माहिती आहे ती व्यक्ती गावोगावी हिंडून उपचार करत असे, औषधे वनस्पतीजन्य पदार्थांची बनलेली असत.
युद्धात जखमी झालेल्या सैनिकांवर शल्यक्रिया केली जात असे. जखमी सैनिकांवर उपचार करताना वैद्यास पुष्कळ शिकता येई. भूल देण्याच्या तंत्राचा शोध नसल्याने शल्यक्रिया रोग्यास अतिशय वेदनादायक असत. जखमा धाग्याने शिवून त्यावर मद्य, व्हिनेगर, अंड्याचा बलक आणि काही झाडांची पाने लावून जखम बंद करण्यात येई.
इसवी सन पूर्व ४०० वर्षांपासून प्राण्यांच्या शवाचे विच्छेदन सुरू झाले आणि वैद्यांना शरीरातील आतल्या अवयवांची माहिती होऊ लागली. इसवी सन पूर्व २०० वर्षांपासून मानवी देहाचे शवविच्छेदन सुरू झाले. ग्रीक वैद्यांनी वैद्यकाला योग्य दिशेने नेण्यास सुरुवात केली होती. पुढे रोमन काळात ही प्रगती थांबली.
रोमन काळातील वैद्यक
रोमन सम्राट कॉन्स्टंटाईन याने ३३१ साली ख्रिस्ती धर्म स्वीकार केला. चर्चचा प्रभाव पुढे सहाशे वर्षे कायम राहिला. या प्रभावाखाली वैद्यकीय व्यवसायावर गदा आली. राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा कुठल्याही शास्त्रावर चांगला किंवा वाईट परिणाम होतो. मध्ययुगातील युरोपात समाजावर धर्माचा विलक्षण पगडा होता. धर्माला वैद्यकशास्त्रात प्रगती नको होती. देवाने घडविलेल्या शरीरात हस्तक्षेप करण्याची धर्माची मान्यता नव्हती. त्यामुळे त्या काळात वैद्यकक्षेत्राची प्रगती खुंटली. शास्त्रोक्त विचारसरणीवर जपजाप्य यांनी मात केली.
यानंतरचा राजा, ज्याने राजकारण आणि धर्म आणखी जवळ आणले, शार्लमेन (७४२ – ८१४) हा होता. यानंतर धर्माला मान्य असेल तेच शास्त्र आणि तेच नियम असा प्रकार चालू झाला. आजारपण ही देवाने दिलेली शिक्षा आहे असे मानल्यामुळे शास्त्रोक्त उपचार निषेधार्ह ठरले. वैद्यकीय मदत म्हणजे प्रार्थना. पारंपरिक वैद्यकशास्त्र दाबून ठेवले गेले.
(कहाणी शस्त्रक्रियेची, डॉक्टर विजय बापये, रोहन प्रकाशन २०१०)
मध्ययुगीन काळातील वैद्यक
ही माहिती British library article, Medicine in middle ages, Author Alexie Bovie, 20 April 2015 या लेखातून.
शरीरात चार प्रकारचे द्रव पदार्थ असतात अशी समजूत ग्रीक काळापासून आली होती. हे चार द्रव काळी बाईल, पिवळी बाईल, रक्त आणि फ्लेम (कफ) हे समजले जायचे. या चार द्रवांतला समतोल गेला की आजार होतात अशी समजूत होती. ही समजूत मध्ययुगीन वैद्यकात चालू राहिली. या चार द्रवांमुळे व्यक्तीची वृत्ती आणि शरीरक्रिया यांचेवर परिणाम होतो; असा विश्वास निर्माण झाला.
The concept of the four humors evolved into a theory of temperament, which accounted for psychological and social as well as physical characteristics. An excess of blood, phlegm, yellow bile, or black bile made a person sanguine, phlegmatic, choleric, or melancholic.
(Medicine in the Middle Ages, Heart Views. 2012 Oct-Dec; 13(4): 158–162.,Rachel Hajar, M.D.
निदान
आजाराचे निदान करण्यासाठी रोग्याची नाडी, त्वचा, मूत्र आणि विष्ठा याचा तपास केला जाई.
बार्बर सर्जन्स
माहितीचा स्रोत – The History Of the Barber Surgeon, Barbar Surgeons Gield, BSG publication, November 6, 2017, In Intel. By Daniel Lee Hue
शल्यचिकित्सेची कहाणी रोचक आहे. साधारण एक हजार वर्षांपूर्वी ख्रिश्चन मठांतून न्हावी लोक दाढी करणे आणि केस कापणे यांबरोबर जळवा लावण्याची सेवा देऊ लागले. रक्तात दोष निर्माण होऊन आजार होतात आणि रक्त काढल्याने आजार बरे होतात अशी समजूत होती. नंतर गळू कापणे, काटे काढणे अशी कर्मे ते करू लागले. त्यानंतर युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना उपचार देणे असा प्रकार चालू झाला. सोळाव्या शतकात हॉस्पिटलचे दोन भाग असत. औषध देण्याचे काम फिजिशियन करीत तर शल्यक्रिया न्हावी करीत. १५४०मध्ये या लोकांनी आपली एक संस्था स्थापन केली, जी पुढे बार्बर सर्जन्स गिल्ड म्हणून ओळखली जाऊ लागली; बी. एस. जी. (Barber Surgeons Guild) पब्लिकेशन अजूनही अस्तित्वात आहे.
शास्त्रीय वैद्यकाची सुरुवात होण्यापूर्वी जळू लावून रक्त काढणे हा सामान्य उपचार होता. जॉन्स हॉपकीन्स या नामवंत विश्वविद्यालयातील त्या काळातील एका प्रोफेसरचे मत असे की न्यूमोनियाच्या आजारात जळू लावून रक्त काढणे फायदेशीर ठरते. १८३३मध्ये फ्रान्समध्ये ४ कोटी जळवा आफ्रिकेतून या उपचारासाठी आयात केल्या गेल्या.
अठराव्या शतकात युरोपमध्ये कवटीच्या आकारावरून माणसाच्या निरनिराळ्या कुवती ठरविल्या जायच्या. याला फ्रेनॉलोजी असे म्हटले जायचे. नोकरीसाठी फ्रेनॉलॉजिस्टचे सर्टिफिकेट लागे.
कोणाच्या अन्ननलिकेत त्रास निर्माण झाला तर गुदद्वारातून अन्न ढकलले जायचे.
ग्रह, चंद्र आणि इलाज
डॉक्टर्स आपल्याबरोबर पंचांग ठेवत असत. सन १५००मध्ये, युरोपात रोग्यावर काय इलाज करायचा आणि इलाज केव्हा चालू करायचा हे पंचांगावरून नक्की करण्याची कायदेशीर सक्ती होती. निरनिराळ्या राशी शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर प्रभाव टाकतात असा समज होता. त्यामुळे जन्माची रास आणि चंद्र कोणत्या राशीत आहे त्यावरून इलाज निश्चित होई. जळवा केव्हा लावायच्या हेही पंचांगावरून ठरे.
चर्च आणि वैद्यक
वैद्यकावर चर्चचे पूर्ण नियंत्रण होते. इस्पितळे धार्मिक संस्था चालवत.
The Roman Catholic Church effectively dominated what direction the medical world took. Any views different from the established Roman Catholic Church view could veer towards heresy with the punishments that entailed. Therefore, when the Roman Catholic Church stated that illnesses were punishments from God and that those who were ill were so because they were sinners.
(Medicine in the Middle Ages, Heart Views. 2012 Oct-Dec; 13(4): 158–162., Rachel Hajar, M.D.
औषधे
बहुतेक औषधे वनस्पतीपासून बनलेली असत. डिओस्कोराईडीज या ग्रीक वैद्याने या संबंधात बरेच लिखाण केले आहे. मध्ययुगीन पाश्चिमात्य वैद्यकाचा हाच पाया राहिला. सुगंधी वनस्पतींच्या लाकडाचा धूर देणे हा एक उपाय वापरला जाई (आपल्याकडचा धूप). ख्रिश्चन मठांत औषधी वनस्पती लावून त्यांची निगराणी केली जात असे.
समालोचन
आपण ज्या वैद्यकीय प्रणालीला पाश्चिमात्य वैद्यक म्हणत आहोत ती प्रणाली खऱ्या अर्थाने युरोपमध्ये विकसित झालेली प्रणाली आहे. पण आपल्या वापरात पाश्चिमात्य हा शब्द जास्त असतो. या प्रणालीची सुरुवात ग्रीक काळात साधारणपणे २५०० वर्षांपूर्वी झाली. ग्रीक विचारवंत तर्कशुद्ध विचार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याप्रमाणे त्यांनी सुरुवात तर चांगली केली. दुर्दैवाने रोमन काळात धर्माचे प्रस्थ वाढले आणि तार्किक विचार करण्याची मुभा राहिली नाही. त्यामुळे अंधश्रद्धा बळावत गेल्या. कोणत्याही प्रमेयाला का असा प्रश्न विचारणे शक्य राहिले नाही आणि या प्रणालीची अधोगती झाली.
प्रणालीचे पायाभूत स्वरूप असे होते. शरीरात चार प्रकारचे द्रव पदार्थ असतात – काळी बाईल, पिवळी बाईल, रक्त आणि श्लेष्मा. या चार द्रवांतला समतोल गेला की आजार होतात. व्यक्तीत जो द्रव जास्त प्रमाणात असेल त्या प्रमाणे त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व बनते.
आजाराचे निदान करण्यासाठी रोग्यांची नाडी, त्वचा, मूत्र आणि विष्ठा यांचा तपास केला जाई. प्रत्येक वैद्याकडे मूत्र घेण्यासाठी एक विशिष्ट आकाराचा काचेचा फ्लास्क असे.
बहुतेक औषधे वनस्पतींपासून बनलेली असत. डॉक्टर आपल्याबरोबर पंचांग ठेवत असत. रोग्यांवर काय इलाज करायचा आणि इलाज केव्हा चालू करायचा हे पंचांगावरून नक्की करावे लागे. जळू लावून इलाजासाठी रक्त काढणे हा एक उपचार होता.
या सर्व उपचारपद्धतीला कोणत्याही प्रकारचा प्रयोगांचा आधार नव्हता.
ॲलोपथीपूर्व पाश्चिमात्य वैद्यकाला शास्त्रीय वैद्यक म्हणता येईल का?
हा प्रश्न विचित्र यासाठी की मध्ययुगीन पाश्चिमात्य वैद्यकाच्या काळात शास्त्रीय विचारसरणी आणि सिद्धांत अस्तित्वातच नव्हते. जसा शास्त्राचा उदय झाला तसा मध्ययुगीन वैद्यकाचा अस्त झाला. अशी स्थिती आयुर्वेद आणि युनानीच्या बाबतीत झाली नाही कारण या प्रणाली अजूनही होत्या तशाच वापरात आहेत. तरीही आपण ठरविलेले मानदंड लावले तर काय दिसते?
ज्या मूळ सिद्धांतांच्या पायावर हे वैद्यक उभे आहे हे सिद्धांत कसे सिद्ध झाले? परत प्रयोग करून हे सिद्धांत पाहिजे तेव्हा सिद्ध करता येतील का? या प्रयोगांतून काय प्रकारचे मोजमाप वापरण्यात आले? सुरुवातीला ग्राह्य धरलेले कोणते सिद्धांत मागून चूक ठरले?
चार ह्यूमर्सचा सिद्धांत त्या वेळेला सिद्ध झाला नाही, ना त्यानंतर तो कधी सिद्ध झाला! अशा प्रयोगांचे शोधनिबंध इतर तज्ज्ञांनी तपासून मग प्रसिद्ध केले जातात का? त्या काळात प्रयोग, शोधनिबंध आणि ते प्रसिद्ध करणे ही कल्पनाही नव्हती. रोगाच्या निदानासाठी काय प्रकारच्या चाचण्या वापरल्या जातात? या चाचण्यांत काय मोजमाप केले जाते? चाचण्यांचे निष्कर्ष मानवी हस्तक्षेपाशिवाय रेकॉर्ड होऊ शकतात का? (उदाहरणादाखल आपण रक्तदाबाच्या चाचणीचे उदाहरण घेऊ. दंडाला पट्टा बांधून मशीन चालू केले की दोन मिनिटांत स्क्रीनवर रक्तदाबाचे रीडिंग येते. डॉक्टरला काय वाटले यापेक्षा डॉक्टरला काय दिसले हे महत्त्वाचे.)
रोगनिदानाच्या चाचण्या पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ (subjective) होत्या, वस्तुनिष्ठ (objective) नव्हत्या. मोजमाप काहीही नव्हते. औषध देण्याअगोदर RCT केल्या जातात का? RCT कुठल्या संस्थेमार्फत केली जाते? या संस्थेची स्वायत्तता कशी राखली जाते? RCTही संकल्पना अस्तित्वात नव्हती.
या सगळ्यावरून आपण म्हणू शकतो की मध्ययुगीन पाश्चिमात्य वैद्यकाला काही शास्त्रीय आधार नव्हता.
(क्रमशः)
***
भाग १ - शास्त्रीय दृष्टीकोनातून निरनिराळ्या वैद्यकीय प्रणालींचे मूल्यांकन