Skip to main content

येती एअरलाइन्स फ्लाइट ६९१. अ क्रॅश इन कॅव्हॉक ..

कॅव्हॉक हा शब्द पायलट्स अगदी रोजच्या बोलण्यात वापरतात. त्याचा अर्थ आहे सीलिंग अँड व्हिजिबिलिटी ओके.

नेपाळच्या पोखरा एअरपोर्ट वर अगदी उतरता उतरता एक एटीआर ७२ विमान क्रॅश झालं आहे. तर अत्यंत स्वच्छ अशा cavok हवामानात हे विमान क्रॅश झालं आहे.

A

इमेज आभार wikimedia / wikipedia

विमानांच्या उड्डाणासाठी आणि एकूण मार्गाचं प्लॅनिंग करण्यासाठी जी माहिती लागते त्यातला महत्वाचा भाग म्हणजे मेटार (METAR). याचा अर्थ मेटरॉलॉजिकल टर्मिनल एअर रिपोर्ट. त्यातला हा एक कीवर्ड.

हल्लीच रनवे ३४ या सिनेमाने हा मेटार जगप्रसिद्ध केला असावा असे वाटते. अजय देवगण उर्फ कॅप्टन विक्रान्त खन्ना, ज्याची मेमरी फोटोग्राफिक असते, तो हवामानाचा रिपोर्ट घडाघडा पाठ म्हणून दाखवतो. तोच तो मेटार.

या अपघातात एकूण एक ६८ प्रवासी आणि सर्व म्हणजे ४ क्रू ठार झाले आहेत. या अपघाताचे दोन व्हिडीओज देखील उपलब्ध आहेत. हे अपघाताच्या तपासात फार महत्वाचे ठरणार आहेत. विमानाच्या आतून अगदी क्रॅश होईपर्यंत एक पॅसेंजर लाईव्ह व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रक्षेपित करत होता. या व्हिडिओत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोणत्याही पॅसेंजरला अपघाताबद्दल जराही पूर्वकल्पना आली होती असं दिसत नाहीये. मजेत गप्पा चाललेल्या दिसत आहेत. नंतर अगदी अनपेक्षितरित्या तीन ते चार सेकंदात विमान पूर्ण विघटित होऊन प्रचंड आगच आग कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पॅसेंजर्सचे शेवटचे श्वासही त्यात ऐकू येत आहेत. अत्यंत विचलित करणारा हा व्हिडीओ आहे.

दुसरा व्हिडीओ कोण्या नागरिकाने आपल्या घराच्या गच्चीवरून काढलेला आहे. त्यात विमानाचे शेवटचे काही क्षण दिसत आहेत. विमान त्यानंतर लगेचच वस्तीच्या मध्ये असलेल्या दरीत कोसळलेलं आहे.

फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर हे दोन्ही सापडले आहेत. त्यावरून अधिक माहिती येईलच. पण तोवर हा क्रॅश फॉलो करण्यासाठी हा धागा सुरु करत आहे.

येती नावाच्या या एअरलाईनचा तत्कालीन मालक हा खुद्द विमानाच्या क्रॅश २०१९ मध्ये ठार झाला. आत्ताच्या पोखरा अपघाताच्या वेळी अंजू, जी विमानाची को पायलट होती, तिचा पती २००६ मध्ये अशाच स्वरूपाच्या विमान अपघातात ठार झाला होता. हा देश गेल्या काही वर्षांत विमान प्रवासासाठी नरक ठरला आहे. त्यात ही आणखी एक अत्यंत विचलित करणारी भर. आता सोळा वर्षांच्या अंतराने अंजू देखील अशीच विमान अपघातात जीव गमावून बसली आहे. ही फ्लाईट तिची को पायलट म्हणून या विमानावर शेवटची फ्लाईट होती. हे एक लँडिंग पूर्ण झाल्यावर ती एटीआर ७२ मॉडेलची पायलट इन कमांड बनणार होती. आत्ताचा पायलट इन कमांड, कमल, हा जवळजवळ २२००० तास उड्डाणाचा अनुभव असलेला जुना जाणता एव्हिएटर होता. तो तिची टेस्ट घेत होता.

एटीआर ७२ हे विमान फ्रान्स आणि इटली या दोन देशांतील कंपन्यांनी एकत्र येऊन बनवले आहे. एअरबस ही या संयुक्त उपक्रमाची एक पेरेंट कंपनी आहे.

या अपघातात नष्ट झालेलं हे विमान आगोदर किंगफिशर एअरलाईन्सच्या वापरात होतं. भारतीय एअरलाईन्सची जुनी विमानं खरेदी करून डागडुजी करून वापरणं ही नेपाळमध्ये अगदी रुळलेली पद्धत आहे. मी खुद्द अशी उदाहरणे पाहिली आहेत. काही एटीआर पायलट्सशी थेट संवादाचा योगही आला आहे. ७० ते ७४ इतकी आसनक्षमता असलेलं हे विमान आहे. दोन टर्बोप्रॉप इंजिन्स असतात. टर्बोप्रॉप इंजिन हे पिस्टन इंजिनपेक्षा खूप वेगळं असतं. यात हवा आत घेऊन दबावाखाली इंधनस्फोटासाठी पुरवली जाते. हे टर्बाईन इंजिन प्रॉपेलरला फिरवतं.

टॉप स्पीड ५१८ किमी प्रति तास, सलग १५०० किलोमीटर प्रवास करण्याची फ्युएल कॅपॅसिटी, सुमारे साडेसात किलोमीटर सर्व्हिस सीलिंग (सर्व्हिस सीलिंग म्हणजे किती उंचीपर्यंत हे विमान जाऊ शकतं. साधारण ७६०० मीटर्स).

याचा प्रॉपेलर कॉन्स्टन्ट स्पीड प्रॉपेलर आहे. म्हणजे तो नेहमी एका विशिष्ट वेगाने फिरतो. पॉवर कमी जास्त करण्यासाठी त्याचा पिच म्हणजे ब्लेडचा अक्षाशी असलेला कोन कमीजास्त केला जातो. हा कोन समोरून येणाऱ्या हवेला समांतर असेल तेव्हा त्याला फीदरींग असं म्हणतात. अशा कोनात तो कितीही वेगाने फिरला तरी हवेत विमानाला पुढे ढकलू शकत नाही.

B

फीदर केलेला प्रोपेलर ओळखा.

आभार wikimedia / wikipedia

१५ जानेवारी २०२३ या तारखेला नेपाळच्या स्थानिक वेळेनुसार दहा वाजून पन्नास मिनिटांनी (काही ठिकाणी अकरा अशी वेळही नोंदवलेली दिसते) ही २५ मिनिटांची काठमांडू पोखरा फ्लाईट पोखरा एअरपोर्टच्या अगदी जवळ पोचली. पायलटसनी कोणतीही अडचण रिपोर्ट केली नव्हती. फक्त त्यांनी आधी असाईन झालेला रनवे बदलून मागितला होता. आणि अगदी शेवटच्या एखाद दोन मिनिटांत ते काहीही संपर्क न करता कोसळले.

विमानाच्या आतून बनवल्या गेलेल्या व्हिडिओत जे दिसतं त्यानुसार असं भासतं की हसते खेळते लोक क्षणात आगीने वेढले गेले आणि स्फोट झाला. हेच मत प्रथमदर्शनी होईल. म्हणूनच काही शक्यता नीट तपासणं आवश्यक आहे. डेव्हील इज इन द डीटेल्स.

घराच्या गच्चीतून जो व्हिडीओ बनवला गेला आहे तो अत्यंत काळजीपूर्वक फ्रेम बाय फ्रेम पाहिला तर खालील गोष्टी स्पष्ट होतात.

१. विमान स्टॉल झालं आहे. यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे अचानक आग, स्फोट असं काही दिसत नाही.

स्टॉल होणे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर विमानाच्या पंखांचा हवेशी असलेला कोण अतिशय जास्त वाढल्याने आणि स्पीड अतिशय कमी झाल्याने पंखांवर विमानाचं वजन उचलून धरण्याइतकी लिफ्ट न उरणं आणि विमान एखाद्या दगडांप्रमाणे खाली पडणं. कारण यात त्याचं "विमानपण"च नष्ट होतं. अशा वेळी विमानाचं नाक खाली दाबून आणि इंजिन पॉवर पूर्ण जोरात लावून त्याद्वारे अनुक्रमे

अ . विमानाच्या पंखांचा हवेशी असलेला कोन कमी करायचा असतो
आणि
ब. विमानाला पुरेसा वेग द्यायचा असतो .

अशी कोणतीही हालचाल पायलट्सकडून झालेली या व्हिडिओत दिसत नाही. विमानाचं नाक आगोदर अधिकच वर उचललेलं दिसतं आणि इंजिन पॉवर वाढवल्याचा कोणताही आवाज येत नाही. हा आवाज लपून राहणं अशक्य आहे. इंजिन्स जवळपास आयडल मोडमध्ये आहेत (जे लँडिंगच्या त्या शेवटच्या टप्प्यात योग्यच होतं.) जमिनीच्या इतक्या जवळ नाक खाली दाबणं आणि इंजिन पॉवर वाढवणं हे तांत्रिकदृष्ट्या कितीही आवश्यक असलं तरी ते करायला हात रेटणं कदाचित अवघड झालं असू शकेल. को पायलट तिच्या टेस्टिंग फेजमध्ये होती आणि हे शेवटचं लँडिंग तिला पायलट इन कमांड या नात्याने करायचं होतं. त्यामुळे तिला पायलट इन कमांड पद मिळणार होतं. यातील प्रेशरचा भाग दुर्लक्षित करून चालणार नाही.

२. स्टॉल टाळण्यासाठी कोणतीही हालचाल केली नाही की बहुतांश वेळा विमानाचा एक पंख कलतो आणि विमान 'स्पिन' नावाच्या डेथ स्पायरलमध्ये जातं. वाळकं पान जसं गरगर फिरत खाली येतं तसं. अशा वेळी विमानाच्या गिरक्यांच्या उलट दिशेत कंट्रोल कॉलम फिरवून आणि पॉवर देऊन ते रिकव्हर करण्याची थोडीशी संधी अजून उरलेली असते, जर मन स्थिर असेल तर. पण या सर्वासाठी जमीन आणि आपण यात काही हजार फूट अंतर लागतं. या केसमध्ये विमान जमिनीच्या अगदी जवळ होतं. त्यांच्याकडे वेळ आणि संधी दोन्ही उरले नव्हते.

३. विमानाच्या आतून घेतलेल्या व्हीडीओस काळजीपूर्वक (आणि ते खूप वेदनादायक आहे, पण केवळ अभ्यासक म्हणून तसं करण्याची हिम्मत बांधल्यास) फ्रेम बाय फ्रेम पाहता शेवटचे काही क्षण आग दिसण्यापूर्वी आणि इम्पॅक्टचा धाड आवाज येण्यापूर्वी विमान डावीकडे तीव्रपणे झुकलेलं दिसतं. त्या क्षणी फोकस जरी विमानाच्या आतल्या दृश्याकडे असला तरी हे लक्षात येतं.

आता ही स्टॉल आणि स्पिनची स्थिती त्या क्षणी उत्पन्न झाले की आगोदरपासून बिल्ड अप होत होती ते फ्लाईट डेटा रेकॉर्डरवरून कळेल.

आणखी एक निरीक्षण. लँडिंगच्या वेळी फ्लॅप्स (पंखांवरचा एक अवरोधक भाग, जो लिफ्ट आणि अवरोध दोन्ही वाढवतो आणि टेक ऑफ / लँडिंगच्या वेळी विशिष्ट कोनात खाली केला जातो) खाली केलेले नसावेत असं व्हिडीओजवरून वाटतं. हे कोणत्या कारणाने झालं असेल तेही इन्वेस्टीगेटर्स शोधतील.

आणखी एक तपशील. पोखरा (VNPK) या ठिकाणी दोन विमानतळ आहेत. जुना आणि नवा. नवा एअरपोर्ट एक जानेवारीला सुरु झाला. तोवर जुन्याच विमानतळावर वाहतूक होत होती. विमानाने नव्या एअरपोर्टच्या ३० क्रमांकाच्या रनवेवर लँड करणं अपेक्षित होतं . ही दिशा साधारणपणे वाऱ्याच्या दिशेवर ठरवण्यात येते. पण ऐनवेळी पायलट्सनी रनवे बदलून मागितला आणि १२ क्रमांकाच्या रनवेवर उतरण्याचा बेत केला. सर्वसाधारण माहितीसाठी, रनवेचा नंबर हा त्याची दिशा दाखवतो. उदा. रनवे ०९ म्हणजे ९० डिग्री. म्हणजे बरोब्बर पूर्वेकडे तोंड असलेली दिशा. २७ म्हणजे २७० म्हणजे बरोब्बर पश्चिमेकडे तोंड. (हे आकडे मुंबईच्या मुख्य रनवेचे आहेत अनुक्रमे कुर्ला आणि जुहू या दिशेने उड्डाण.)

दोन्ही एअरपोर्ट खालील नकाशात पाहता येतील. डावीकडे आहे तो जुना विमानतळ. उजवीकडे खाली आहे तो नवा विमानतळ. ते जे स्टेडियम दिसतं आहे ते त्या व्हिडिओत देखील आहे. त्यामुळे विमानाची त्या क्षणीची साधारण पोझिशन दाखवण्याचा प्रयत्न लाल फुलीद्वारे केला आहे. निळी रेघ ही ढोबळ मानाने पुढील उतरण्याचा पाथ आहे. उलट दिशेतला लाल बाण हा मुळात असाईन झालेला रनवे आहे. (दिशा). विमान त्या मधल्या घळीत कोसळलं. आगोदर माहीत असलेली कोणतीही इमर्जन्सी असती तर जुन्या विमानतळावर थेट सरळ रेषेत लँडिंग करणं शक्य होतं.

C

बेस नकाशा आभार गूगल

तर्क खूप लावता येतील. अधिक माहिती जशी जशी पुढे येईल तसं तसं अधिक कळेल. केवळ पार्श्वभूमी स्पष्ट होण्यासाठी हा प्लेसहोल्डर धागा.

१. संपूर्ण लक्ष केवळ बाहेर लँडिंग वर राहिल्याने स्टॉल उशिरा लक्षात येणं .
२. आपण रनवेच्या जवळ पोचूनही अद्याप पुरेसे खाली आलेलो नाही हे जाणवून पटकन खाली येण्यासाठी विमानाचं नाक किंचित वर उचलून पुढे जाण्याचा वेग कमी आणि त्याच वेळी खाली जाण्याचा वेग वाढवण्याचा नकळत प्रयत्न.
३. स्टॉल आणि शार्प लेफ्ट टर्न यांची एकच वेळ येणं आणि त्यामुळे स्पिन अवस्था येणं.
४. दरीतून येणारी एखादी जबरदस्त विंड गस्ट.
५. जुना एअरपोर्ट आणि नवा एअरपोर्ट यात अचानक प्रोसेस बदलामुळे काही गोंधळ (पण यापूर्वी दोन्ही वैमानिकांनी पोखरा या ठिकाणी लँडिंग केलेलं असल्याने ही शक्यता बाळबोध वाटते.

कोणीतरी विमानात फोन चालू करून व्हिडीओ शूटिंग लाईव्ह केल्याने विमानाच्या सिटीम्स बिघडून क्रॅश झाला अशी एक चर्चा अनेक ठिकाणी दिसतेय. टु कट इट शॉर्ट, त्यात काही तथ्य नाही.

तूर्तास इतकंच. अधिक काळात जाईल तसं अपडेट करूया. लेख विस्कळीत आहे. ललित असा उद्देश नसल्याने हा एक प्लेस होल्डर समजावा.

सर्व मृतांना श्रद्धांजली. आणि नेपाळमधलं हे अपघातसत्र कायमचं संपावं अशी तीव्र इच्छा.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

सुनील Tue, 17/01/2023 - 20:29

अत्यंत दुर्दैवी घटना. माहितीपूर्ण लेख.

गेल्या काही काळात नेपाळात बरेच विमान अपघात झाले आहेत. जुनी विमाने वापरणे हे प्रमुख कारण असावे काय?

गवि Wed, 18/01/2023 - 08:23

In reply to by सुनील

१. हो. बहुतांश विमाने इतर देशांतून वापरुन झालेली जुनी.
२. अत्यंत डोंगराळ आणि high altitude भूभाग. त्यामुळे काठमांडूचा मुख्य विमानतळ वगळता अन्यत्र छोटे छोटे रन वे. तिथे लहान आकाराची टर्बोप्रॉप किंवा पिस्टन इंजिन बेस्ड प्रोपेलर विमानेच वापरता येतात. ATR हेच त्यातल्या त्यात जरा मोठे टर्बोप्रॉप विमान असल्याने ते जास्त वापरलं जातं. बाकी बीचक्राफ्ट कंपनीची १९००, किंगएअर वगैरे.

ही सर्व विमाने मोठ्या जेट विमानाइतकी सुस्थिर नसतात. विशेषत: तिथल्या सतत आणि झटपट बदलणाऱ्या हवामानात.

त्यातून तिथे १९-२० एअरलाईन्स उगवल्या आहेत. त्यामुळे स्पर्धा, प्राईस वॉर, सुरक्षिततेशी तडजोड हे आहेच.

युरोपियन युनियनने नेपाळी एअरलाइन्सना त्यांच्या एअरस्पेसमध्ये बंदी केली आहे.

सुनील Wed, 18/01/2023 - 10:30

In reply to by गवि

धन्यवाद.

अत्यंत डोंगराळ भाग त्यामुळे रेल्वे नाही. रस्त्याने जाणे प्रचंड वेळखाऊ. आणि आता विमान प्रवास बेभरवशाचा. अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असल्यामुळे नेपाळला यातून मार्ग काढणे भाग आहे.

अतिशहाणा Wed, 18/01/2023 - 01:26

अतिशय दुर्दैवी घटना. तुमच्या लेखातून बरीच माहिती मिळत आहे. लेखातील फोटोतल्या विमानावर 'सती एअरलाईन्स' लिहिले आहे का?

'न'वी बाजू Wed, 18/01/2023 - 02:27

In reply to by अतिशहाणा

लेखातील फोटोतल्या विमानावर 'सती एअरलाईन्स' लिहिले आहे का?

यती

.

(फोटोवर टिचकी मारल्यास मोठी आवृत्ती दिसते.)

गवि Wed, 18/01/2023 - 08:37

In reply to by अतिशहाणा

यती अधिक अचूक उच्चार. यती आणि येती दोन्ही उच्चार केले जातात.
उदा. गोवा आणि गोंय असा फरक. तिकडे गेल्यावर देवनागरी लोकल बोर्डावर गोंय असेच दिसेल.

Rajesh188 Wed, 18/01/2023 - 09:09

सर्व रिपोर्ट आल्या शिवाय अपघात चे नक्की कारण समजणार नाही.

मानवी चूक होती,विमानात बिघाड होता, .
हवामान उत्तम च होते म्हणून ती शक्यात नाही.
मानवी चूक की यांत्रिक बिघाड ह्या मधील एक कारण च अपघात ला कारणीभूत आहे

अस्वल Thu, 19/01/2023 - 00:18

तपशील आणि आकृत्यांसह केलेल्या खुलाशाबद्दल धन्यवाद!
(मात्र तो व्हिडिओ पाहण्याचं धाडस झालं नाही.)

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 19/01/2023 - 00:42

ही अपघातमालिका थांबवण्यासाठी नेपाळला शुभेच्छा. को-पायलटबद्दल वाचून फारच वाईट वाटलं.

अरविंद कोल्हटकर Thu, 19/01/2023 - 07:18

३०-४० वर्षांपूर्वी अशी समजूत होती की हिमालयासारख्या उंच प्रदेशामध्ये काही मानवसदृश प्राणी राहतात. त्यांना 'यति' म्हणजे ऋषि असे नाम मिळाले. असे कोणी प्राणी नाहीत हे आतापावेतो स्पष्ट झाले आहे पण 'यति' शब्द टिकून आहे आणि तेच नाव ह्या विमानकंपनीस मिळाले आहे.

गवि Thu, 19/01/2023 - 07:57

In reply to by अरविंद कोल्हटकर

हो. आणि कोणत्या तरी लष्करी अधिकाऱ्यांनी किंवा विभागाने (चू भू द्या घ्या) हा यति अथवा यतिसदृश व्यक्ती हिमालयात प्रत्यक्ष पाहिल्याचा सफोटो दावा केला होता असे वाचल्याचे स्मरते.

यति म्हणजे हिममानव असेही वाटत असे.

Rajesh188 Thu, 19/01/2023 - 12:43

मला पण हे प्रश्न पडले.
1), विमान automode पण टाकता येते.

विमान इतकी सुसज्य असतात तांत्रिक बाबतीत.
की सर्व काही तांत्रिक यंत्रणाच करते.
पायलट कडे काहीच थोडी जबाबदारी असते.
२) हवेची दिशा,विमानाची उंची, इच्छित स्थळ चे अंतर.
विमानाची हवेत उडण्यासाठी हवी असणारी योग्य स्थिती .
जे सर्व यंत्र च ठरवतो.किंवा यंत्रणा तशा सूचना देत असते.
वैमानिक पण त्या वर अवलंबून असतो.

काही चुकीचे वैमानिक कडून कृती झाली की यंत्रणा तशी सूचना देते.
हे सर्व खरे असेल तर सर्व च प्रश्न निकाली निघतात.
पायलट च्या हट्ट मुळे चुकीचा निर्णय घेणे.
सूचनेकडे दुर्लक्ष करणे.
हेच एकमेव अपघात चे कारण असू शकत.
किंवा खराब हवामान.
किंवा

यांत्रिक बिघाड.

shantadurga Thu, 19/01/2023 - 13:27

लेखामुळे बरीच नवीन माहिती मिळाली, आभार. विमानाच्या आतून live video transmit कसा केला असेल? तो पाहण्याचं धाडस माझ्याच्याने होणार नाही, पण कुतुहल..
फार दुःखद अपघात आहे. नेपाळ ह्यावर काहीतरी उपाय योजना करेल अशी अपेक्षा. EU चा बॅन बोलका आहे :-(

गवि Fri, 20/01/2023 - 08:06

स्टॉल वॉर्निंग कॉकपिटच्या आत ऑडियो रुपात येते,

याशिवाय अधिकची खबरदारी म्हणून बहुसंख्य प्रवासी विमानांत स्टिक शेकर आणि स्टिक पुशर या दोन यंत्रणा असतात. या ATR ७२ ५०० विमानातही त्या होत्या.

स्टिक शेकर ही यंत्रणा जेव्हा स्टॉल स्पीड इतका कमी स्पीड होतो तेव्हा पायलटच्या हातातील कंट्रोल कॉलम खडखड, खडखड असा तीव्र कंपन करून हलवते. त्यामुळे पायलटला थेट इशारा मिळतो आणि कृती करण्यास शारीरिक स्टिम्युलेशन मिळतं.

स्टिक पुशर ही यंत्रणा यापुढे एक पाऊल जाऊन खुद्दच कंट्रोल कॉलम खाली दाबते आणि अँगल ऑफ अटॅक कमी करते. म्हणजे आवश्यक ती कृती स्वतःच करते. पण यात नाक खाली होऊन विमान वेगाने खाली जात असल्याने ही यंत्रणा विशिष्ट उंचीच्या खाली आपोआप डिसेबल होते. इथे या केसमध्ये ५०० फुटाखाली ती बंद झाली असली पाहिजे.

तरीही स्टॉल झाला म्हणजे काहीतरी अनपेक्षित घडलं आहे. गच्चीतून व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीने तो व्हिडिओ का काढला असावा असा प्रश्न उपस्थित होतो. त्या व्यक्तीने याबाबत मीडियाला असं सांगितलं की या १२ नंबर रनवेवर जी काही विमाने येतात ती या स्थितीपर्यंत (या जागी पोचेपर्यंत) ऑलरेडी पूर्ण वळलेली असतात. हे विमान मात्र खूप पुढे आलेलं असूनही वळलेलं नव्हतं आणि अधिकच खालच्या लेव्हलला उडत होतं हे पाहून त्याला आश्चर्य वाटलं. हे विमान त्या घरापासून ५०-१०० मीटर्सच्या आत कोसळलं. त्यामुळे त्याला धक्का बसला असणारच.

Rajesh188 Sat, 21/01/2023 - 23:57

अपघात चे कारण खरे कधीच प्रसिद्ध होणार नाही.

आज पर्यंत अनेक विमान अपघात झाले .
पण त्याचे पुढे काय झाले कधीच प्रसिद्ध झाले नाही.

लष्करी विमान पण अपघात ग्रस्त झाली प्रशिक्षित मूल्यवान जवान प्राण ला मुकले.
पण त्या नंतर चोकशी होवून .
दोषी कोण ह्याची शहानिशा करून कोणावर केस चालून कोणाला शिक्षा झाल्याचे मी आज पर्यंत तरी .
वाचले नाही ,ना ऐकले आहे.
विमान अपघात मध्ये .
वैमानिक,विमानाची तांत्रिक स्थिती,खराब हवामान ह्या .

बरोबर.
विमान नियंत्रित जमिनी वरून करणारी यंत्रणा पण जबाबदार असते.

पण त्या वर कधीच चर्चा होत नाही.

काय जादू आहे

गवि Sun, 22/01/2023 - 00:08

In reply to by Rajesh188

दोषी कोण ह्याची शहानिशा करून कोणावर केस चालून कोणाला शिक्षा झाल्याचे मी आज पर्यंत तरी .
वाचले नाही ,ना ऐकले आहे.

तसं नाहीये. निकाल येतात. नवे नियम लागू होतात. दोष निश्चित होतो. नुकसाभरपाई मिळते.

Rajesh188 Sun, 22/01/2023 - 00:19

In reply to by गवि

मेलेल्या माणसाला नुकसान भरपाई कशी देणार.
एक चूक अनेक वेळा झाली अशी उदाहरणे नाहीत का)
मग नवीन नियम, सुधारणा ह्या शब्दाना जय अर्थ आहे

गवि Sun, 22/01/2023 - 12:27

In reply to by Rajesh188

मेलेल्या माणसाला नुकसान भरपाई कशी देणार.

मुद्दा रास्त आहे. मृताला नुकसानभरपाई देता येत नाही. त्याच्या नातेवाईकांना देता येते. त्यानेही बराच फरक पडतो. कुटुंबाला पाहिला धक्का संपला की पुन्हा आयुष्य जगायचे असते. त्यात आधार मिळतो. शिवाय विमान कंपनीला ही भरपाई एका प्रकारे दंडच असतो. तो प्रचंड खर्च ही एक प्रकारे पुढे अधिक चोख काळजी घेण्यासाठी deterrent म्हणून काम करतो. भले विमा उतरवलेला असला तरी असे अपघात झाल्यावर रिस्क रेटिंग वाढून विम्याचा खर्चही वाढतो.

एक चूक अनेक वेळा झाली अशी उदाहरणे नाहीत का)

विमानन क्षेत्रात हे प्रमाण अत्यल्प आहे. कारण इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा अधिक खर्चिक आणि खोलवर तपास विमान अपघातांचा होतो. अगदी किरकोळ असला तरी. अपघात सोडा, अगदी नुसती ऑन बोर्ड स्टाफमध्ये शिवीगाळ झाली तरी.

मग नवीन नियम, सुधारणा ह्या शब्दाना जय अर्थ आहे

विमान क्षेत्रात निश्चित कायमच्या सुधारणा कडक नियमांच्या रुपात जगभर लागू केले जातात. जराही शंका आली तरी त्या टाइपची सर्व विमाने ग्राउंड केली जातात.

Rajesh188 Mon, 23/01/2023 - 15:23

In reply to by 'न'वी बाजू

एकदा गुंड,नालायक, भ्रष्ट माणूस मेला म्हणजे .

फक्त गोड गोड बोलून श्रद्धांजली व्यक्त करायची.
कारण माणूस मेला आहे .
हे मला नाही पटत.
खरे च बोलावे.
आणि त्या विषयातील प्रश्न भावनांना मुठ माती देवून
च खरे बोलयचेच नाही.
हे आपल्याला नाही जमत.

अनेक अपघात झाले विमानाचे .

मिग विमान चे अपघात झाले एअरफोर्स मधील तरुण मेले.
पुण्यातील वैमानिकांच्या आई नी मुद्धा उचलला .
विनाकारण तरुण मिग मुळे जीवाला मुकत आहेत.
काय बदललं .
हा प्रश्न नको विचारायला

गवि Mon, 23/01/2023 - 16:03

In reply to by Rajesh188

प्रश्न विचारलेच पाहिजेत. उपाय झालेच पाहिजेत. म्हणून तर विमानन क्षेत्रात इतका खर्च करून अपघात संशोधन आणि उपाय होतात.

अगदी एअर ट्रॅफिक कंट्रोल पासून ते स्क्रू टाईट करणाऱ्या मेंटेनन्स कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांची खोल चौकशी होते. त्यातून निघालेले निष्कर्ष कडक रितीने जगभर अंमलात आणले जातात. हेच सांगण्याचा प्रयत्न आहे.

याबाबत जागरूकता होणे आवश्यक आहे.

एअर फोर्स मिग विमानाचे तुम्ही म्हणता त्यावर हल्लीच्या काळात बदल निश्चित घडत आहेत. अर्थात ते सिव्हिल एविएशन या विभागांतर्गत येत नसल्याने अधिक तपशील देता येत नाही.

Rajesh188 Sun, 22/01/2023 - 00:19

In reply to by गवि

मेलेल्या माणसाला नुकसान भरपाई कशी देणार.
एक चूक अनेक वेळा झाली अशी उदाहरणे नाहीत का)
मग नवीन नियम, सुधारणा ह्या शब्दाना जय अर्थ आहे

वामन देशमुख Mon, 23/01/2023 - 15:43

या महत्वपूर्ण धाग्यावरून अनावश्यक प्रतिसाद काढून टाकण्यात यावेत अशी विनंती.

शक्य झाल्यास काही सदस्यांना काही काळासाठी वाचनमात्र करण्यात यावे.

नंतर हा प्रतिसादही काढून टाकण्यात यावा.

गवि Tue, 24/01/2023 - 19:47

या अपघाताचे कॉकपिट voice रेकॉर्डर आणि फ्लाईट डाटा रेकॉर्डर फ्रान्सला पाठवले तर आहेत पण अद्याप काही उलगडा किंवा प्राथमिक माहिती दिसत नाही

मात्र नुकसाभरपाई कमी मिळणार असं तांत्रिक कायदेशीर कारणाने दिसतं आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 25/01/2023 - 03:59

In reply to by सुनील

मलाही हा प्रश्न पडला.

काही उलगडा किंवा प्राथमिक माहिती दिसत नाही

ती जाहीर केलेली नाही; का ही माहिती रेकॉर्ड झालेली नाही?

गवि Wed, 25/01/2023 - 08:10

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

१९९९ मधल्या माँट्रीयल संकेतानुसार नेपाळने इतक्या वर्षांनी आत्ता म्हणजे २०२० मध्ये नुकसाभरपाईबद्दल नवीन कायद्याचा मसुदा तयार केला. आतापर्यंत नेपाळी लोकल नियमानुसार २०००० अमे. डॉलर्स भरपाई एअरलाईन मृत अथवा जखमी पॅसेंजर्सना देणे लागते. नवीन कायदा १००००० डॉलर्स भरपाई कम्पल्सरी करतो.

पण तो अजून संमत झाला नाही. आता लगेच टेबलवर येणार आहे. पण अपघात ऑलरेडी होऊन गेल्याने आंतरराष्ट्रीय पातळीची १००००० डॉलर भरपाई न मिळता देशातील सद्य कायद्यानुसार जुनी २०००० डॉ भरपाई मिळणार असे दिसते.

ती जाहीर केलेली नाही; का ही माहिती रेकॉर्ड झालेली नाही

गूढ आहे आजरोजी. एरवी दोन चार दिवसांत अधिकृत घोषणा नसली तरी किमान काही 'लीक", "रिपोर्ट्स","सूत्रे", गॉसिप तरी येते बाहेर. या वेळी चिडीचूप. बातमीही मागे गेली.

गवि Wed, 25/01/2023 - 22:19

In reply to by गवि

अपडेट: आगोदर ब्लॅक बॉक्स (FDR, CVR) अनालिसिससाठी फ्रान्सला पाठवला असं वाचण्यात आलं होतं. इतके दिवस पुढे काहीच का कळत नाही म्हणून शोधत असता आता कळतं की उद्या ते एफडीआर आणि CVR सिंगापूरला पाठवणार आहेत.

इतके दिवस त्यावर का बसून होते माहीत नाही. ब्लॅक बॉक्स १५ किंवा १६ तारखेलाच सापडला होता. सिंगापूर हे काम फ्री ऑफ चार्ज करणार आहे.

गवि Wed, 25/01/2023 - 07:34

In reply to by चिमणराव

अहो. तेव्हा काही पुस्तकं वगैरे काढायचे म्हणून काही निवडक लेख फार पूर्वीच दोन्हीकडून अप्रकाशित केले. सर्व नव्हे.. आता तो बेत लांबणीवर किंवा रद्द आहे.

पण हा लेख नवीन लिहिला आहे. कोण्या पुस्तकांसाठी नव्हे. आणि म्हणून तो खोडला नाही. तरीही लेख नकोसा असल्याचे पुरेसे प्रतिसाद आले तर काढून टाकेनही.

खटाटोप कशाला म्हणाल तर हौस, दुसरे काय.? तसदीबद्दल दिलगीर.

चिमणराव Wed, 25/01/2023 - 11:26

पुस्तक लेखन रद्द झाले तर संग्रही लेख असल्यास ते पुन्हा चिकटवणे योग्य ठरेल नाही का? प्रतिसादांतील चर्चा वाया जाते.
विमानांसंबंधी आणि इकडे लेखांत नसलेली माहिती लिहून पुस्तक काढल्यास वाचक वाचतीलच. प्रकाशक मिळत नसल्यास KDP (Kindle Direct Publishing) चा पर्याय कुणी वापरला असल्यास उपयुक्त ठरावा हे माझे मत.
तांत्रिक तंत्रज्ञानयुक्त माहिती मराठीत देत आहात हे चांगलेच आहे. लेख नकोसा वाटलेला असणे यांचे काहीच कारण नाही. पूर्वीची अशी माहिती गेली याबद्दल वाईट वाटले.
( माझ्या इथल्या लेखनात - प्रतिसादांत काही वक्तव्ये ऐसी अक्षरे च्या धोरणाविरुद्ध जात असल्याचे कळल्यावर ते काढले होते. जिथे मते चुकीची होती व त्यावर प्रतिसाद आले होते ते काढले नाही. कारण काय चुकीचे आहे व काय बरोबर आहे ही एक चर्चा असते. त्यातून पुढच्या वाचकांना बोध होतोच. )

(मला विमानाची ओळख फक्त तळाकडूनच म्हणजे आकाशात विमान खालून पाहताना तळ पाहणे एवढाच संपर्क आल्याने इथे लेखाला काही प्रतिसाद दिला नाही.)

गवि Wed, 25/01/2023 - 11:31

In reply to by चिमणराव

आत्ता क्लिअर समजले. तरी म्हंटले कंकाका खवटले कशापायी सकाळी सकाळी. प्रेमळ तक्रार आहे तर..

प्रकाशक समस्या नाही. माझेच मधल्या काळात मत बनले की तूर्त तरी छापील पुस्तक नको. बाकी ते राहू द्या.

किमान हा लेख अप्र करणार नाही असे तुम्हास वचन देतो :-) . _/\_

Rajesh188 Wed, 25/01/2023 - 12:47

विमान अपघात मधील मृत शरीराची ओळख पटवणे तसे अवघड च असते.

मग पूर्ण dna वैगेरे टेस्ट करून अमका तमका व्यक्ती मृत झाला आहे .
अशी पद्धत असते का?
ज्यांची ओळख पटत नाही किंवा मृतदेह च मिळत नाही.

त्यांच्या विषयी नेमके काय ठरवले जाते.
मृत की बेपत्ता,

Rajesh188 Wed, 25/01/2023 - 13:45

जगात ह्याच्या अगोदर विमान अपघात झाले आहेत.
त्या मधील कोणत्या एका अपघात चा detail report उपलब्ध आहे का?
अपघात झाला चोकशी झाली , कारणे सांगितली गेली.

अपघात का झाला ह्या विषयी
असा एकदा चोकशी अहवाल उपलब्ध आहे का?
पब्लिक साठी

गवि Wed, 25/01/2023 - 13:48

In reply to by Rajesh188

अवश्य.

https://www.ntsb.gov/investigations/AccidentReports/Pages/Reports.aspx

विशिष्ट सर्वात भयंकर पैकी अपघाताचा हा एक रिपोर्ट.

https://www.faasafety.gov/files/gslac/courses/content/232/1081/finaldut…

प्रत्येक दखलपात्र अपघातानंतर जगभर काही ना काही बदल कायम स्वरुपी झाले आहेत.

उदा. उपरोक्त KLM, Pan Am भीषण अपघातानंतर विमानाच्या रेडीओवर संभाषण कसे करावे यातील संदिग्धता नष्ट करण्यापासून ते वाहतूक नियमनापर्यंत अनेक बदल झाले.

९ ११ च्या हल्ल्यानंतर कमर्शियल passanger फ्लाइट्सच्या कॉकपिटमध्ये क्रू सोडल्यास कोणालाही थेट प्रवेश करणे अशक्य झाले. सेफ्टी डोअर आली. फक्त पायलट्स कडे त्याचा कोड असतो. अपहरण कर्ते थेट पायलटच्या मानेवर बंदूक ठेवू शकत नाहीत. पूर्वी लहान मुलांना कॉकपिट दाखवायला सहज नेत असत. कोणीही आत घुसू शकत असे.

त्याचा उलट परिणाम होऊन जर्मन विंग्ज केस मध्ये मुख्य पायलट बाथरूमला गेला असता को पायलटने विमान कोसळवले आणि शेवटपर्यंत मुख्य पायलटला बाहेरच अडकवून ठेवले. म्हणून मग एकटाच पायलट आत उरु नये यासाठी एक पायलट बाथरूमला गेल्यास एक केबिन crew आत बसवणे सुरू झाले.

प्रत्येक मोठ्या तांत्रिक दोषयुक्त अपघातानंतर ते ते पार्टस आणि त्यांची रचना, दोन्ही कायमचे बदलले गेले. एकाच पार्टवर पूर्ण भार असेल तिथे डबल पार्ट लावून सेफ केले गेले. हे जगभर झाले. असंख्य उदाहरणे आहेत. बस अथवा ट्रक / कार अपघातांची याच्याशी तुलना करता येत नाही. अर्थात त्याही क्षेत्रात अशी खबरदारी घ्यायला हवी. ती दुर्दैवाने घेतली जात नाही.

Rajesh188 Wed, 25/01/2023 - 14:28

पण आजकाल खूप बातम्या येतात.
कोणी विमानात हवाई सुंदरी शी गैर वर्तन करतो.

खूप जास्त दारू पीवून. विमानात .
सिगारेट पिली जाते.
आपसात मारामारी होते.

विमानात प्रवेश केल्या नंतर
लहान मूल (१८ वर्ष वया पर्यंत ची)
स्त्रिया,मुली ज्या एकट्या प्रवास करतात.

किंवा वयस्कर.
ह्यांच्या सुरक्षेचा मुद्धा आज पण गंभीर आहे.
विमानात सशस्त्र सुरक्षा रक्षक आज पण उपलब्ध नाहीत.

दारू विमानात सर्व्ह केली जाते.
हे नक्कीच धोकादायक आहे.
अपघात होण्या मागे दारू ची नशा हे कारण कशावरून नसेल
प्रवाशी दारू पीत असतील तर वैमानिक किंवा बाकी स्टाफ
नशा कशावरून करत नसतील.
विमान land झाल्यावर.
सर्व स्टाफ ची तपासणी होते का.?
Regularly.
की ते नशेत नव्हते.
कारण अनेक व्यावसायिक ठिकाणी .
सुरक्षा नियमा मुळे त्रास होवू नये .
आणि व्यवसाय वर परिणाम होवू नये म्हणून.
कडक तपासणी होत नाही
विमान hijack करणारी लोक हत्यार सहित विमानात प्रवेश मिळवतात.
ते कसे?
सुरक्षा लाच प्राथमिकता दिली तर .
मला नाही वाटत अपघात होतील.

.

गवि Wed, 25/01/2023 - 14:37

In reply to by Rajesh188

विमानात दारु सर्व्ह करावी की नाही हा फार वेगळा विषय आहे आणि त्याला सरळ हो नाही असं उत्तर देणं कठीण आहे.

काही प्रमाणात calm down करायला, निवांत व्हायला उपयोग होत असू शकेल. मर्यादा कशी घालावी यावर उपाय करता येतील.

उदा. अमर्याद फुकट ऐवजी पेड आणि मर्यादित. आत येतानाच कोणी अतिरिक्त पिऊन आला असेल तर अधिक नाकारणे इत्यादि.

बाकी पायलट आणि हवाई सुंदरी यांची मात्र प्रत्येक फ्लाईट आगोदर अल्कोहोल टेस्ट होते.

विमान hijack करणारी लोक हत्यार सहित विमानात प्रवेश मिळवतात.

हल्ली हे तुम्ही म्हणता तितकं सोपं अजिबातच राहिलेलं नाही.

Rajesh188 Wed, 25/01/2023 - 15:00

फ्लाईट मध्येच दारू मिळत असेल तर ते अगोदर का दारू पितील.
.land झाल्यावर त्यांची टेस्ट होते का?
हा माझा प्रश्न आहे

अबापट Wed, 25/01/2023 - 16:24

गवि शेठ ,
तुमच्या पेशन्सला नमस्कार.
कंकाका का उचकले कळेना.
बाकी आमचे राजेशभाउंचे फार लोड घेऊ नका . निरागस आहेत ते .

चिमणराव Wed, 25/01/2023 - 20:06

In reply to by अबापट

एक तर इन मीन तीन मोजकीच चांगली संस्थळं आणि तीही मराठीत उरली आहेत जिथे थेट लिहिता येते. ती सुरू राहावीत. शिवाय त्यातल्या त्यात लेख आणि प्रतिसादही संपादन सोय फक्त ऐसीवरच राहिली. मिपा,माबोवरची गेली (माबोवरची काढावी लागली) ती एका आद्य सभासदाने बावीस पंचवीस वर्षांपूर्वीपासूनचे असंख्य लेख(पाककृती) डिलीट केले. डोशाला,आंबोळी, घावने यांना भोके चांगली असली तरी संस्थळाला बरी नाही वाटत.

Rajesh188 Sun, 05/02/2023 - 23:14

अपघात कशामुळे झाला.
हे माहीत पडले की नाही?..
.आज पर्यंत अनंत विमान अपघात झाले पण त्याचा पाठ पुरावा मीडिया नी कधीच केला नाही.
ना जबाबदार यंत्रणेने अपघात ची कारण जाहीर केली

गवि Tue, 07/02/2023 - 00:30

Flight data recorder चा प्राथमिक रिपोर्ट आला आहे. त्यानुसार बेस लेगमध्ये (लँडिंग सर्किटचा फायनल वळण घेण्यापूर्वीचा लेग किंवा सेगमेंट) असतानाच दोन्ही प्रॉपेलर पूर्ण फीदर्ड मोडमध्ये गेले. वर सांगितल्याप्रमाणे फीदर्ड अवस्थेत पंखे (पाती) असतात तेव्हा ती कोणतीही पॉवर निर्माण करू शकत नाहीत. समोरून येणाऱ्या हवेशी समांतर कोनात राहतात. संदर्भ: लेखातील फोटो

याचाच अर्थ काहीतरी तांत्रिक बिघाड असू शकतो. पायलट खुद्द अशा नाजूक वेळी स्वहस्ते प्रोपेलर फीदर करून टाकेल असे वाटतं नाही. मुद्दाम फीदर करणं फक्त एकाच केसमध्ये केलं जातं ती म्हणजे दोन्ही इंजिनांत आग लागून किंवा अन्य कारणाने ती बंद पडल्याचे लक्षात येणे. मग फीदर करून हवेचा अवरोध (ड्रॅग) कमी केला जातो, जेणेकरून इंजिन पॉवरच्या अनुपस्थितीत विमान तरंगत तरंगत (ग्लायडिंग करत) जास्तीत जास्त अंतरापर्यंत नेता यावं. दोन्ही इंजिन्स एकदम बंद पडणे अगदी दुर्मिळ. कोणते तरी एक इंजिन बंद पडले असेल पण डिटेक्ट व्हायला वेळ लागला असेल तर नेमका दोष कुठे आहे ते शोधेपर्यंत दोन्ही पंखे फीदर केले जाऊ शकतात.

अधिक माहिती येईल. वाट पाहणे आले.