सावरकर - एक अंतर्मनाला भिडणारा सिनेमा

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट हा पूर्णपणे सावरकारमय राष्ट्रभान समृद्ध करणारा अनुभव आहे. वि. दा. सावरकर यांचा बायोपिक खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यलढ्याचा संकीर्ण इतिहास आणि स्वातंत्र्योत्तर काळातील व्यवस्थेने नाकारलेला महानायक याचा कालपट असणं सहाजिकच आहे. सावरकरांचे विचार हे सहजासहजी पचत नाहीत. कारण त्यांच्या राजकीय आणि सामाजिक भूमिका ह्या अंगिकारून समाजात वावरणं राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांना शक्यच नाही. प्रत्येकाने आपापल्या विचारधारेला अनुसरून सावरकर आपले केले आहेत. जी मंडळी सावरकरवादी म्हणून खऱ्या अर्थानं सावरकरांचे विचार लिखाण सर्वसामान्य जनतेला समजावे म्हणून झटत असतात त्यांना खूप मोठ्या नकारात्मक वातावरणात झगडावे लागते. कारण सावरकरविचार हा अनेक स्थित्यंतरे बघून तावून सुलाखून तयार झाला आहे. सावरकरांची कृती हेच त्यांची विचार पसरवण्याचे साधन होते. तत्कालीन व्यवस्थेचा त्यांना कसलाच पाठिंबा नसल्याने ते एकेरी झुंज देत होते.

सावरकर यांचे विचार त्यांच्या जाणीवेतून आणि सहन केलेल्या अनुभवामुळे कट्टर झाले. सावरकर हे नेहमी रॅशनल पद्धतीने व्यक्त झाले. कदाचित त्यांच्या काही भूमिका अत्यंत टोकाच्या वाटतात तर काहींना त्यात मुस्लिम द्वेष दिसतो. यावर एक महत्त्वाचा भाग नेहमीच लक्षात ठेवायला हवा की निष्पक्षपणे जर सावरकरविचार समजून घ्यायचा असेल तर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंड समजून घ्यावा लागेल. १८५७ चे स्वातंत्र्यसमर मध्ये सर्वधर्मसमभावाचे समर्थन करणारे सावरकर अंदमानात प्रखरपणे विज्ञाननिष्ठ हिंदुत्ववादी कसे झाले हा मुद्दा खरा चर्चेचा आहे. अगदी असं काय घडलं की सावरकरांची भूमिका ही हिंदुत्ववादी झाली. आधीचे सावरकर आस्तिक होते नंतर ते नास्तिक आणि विज्ञानवादी झाले. असं का? याचा धांडोळा घेण्यासाठी तत्कालीन राजकीय परिस्थितीत काय काय घटना घडल्या त्यांचा अभ्यास आणि आकलन खूप महत्त्वाचे. ह्या अशा सगळ्या प्रसंगाची रेलचेल सिनेमात व्यवस्थितपणे हाताळली आहे. सावरकर रोखठोकपणे त्यांची मते मांडत. त्यामुळे त्यांची बरीचशी मतं तत्कालीन सनातन्यांना मानवली नाहीत. काही विचार तर तत्कालीन कॉंग्रेसच्या लोकांना पण रूजले नाहीत.

सिनेमात १८९९ ते स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा काळ चित्रित करण्यात आला आहे. त्यातही सावरकरांची हिंदुत्व विषयीची पारदर्शक आणि सडेतोड भूमिका दाखवण्यात आली आहे. साहित्यिक आणि समाजसुधारक सावरकर यांच्या बद्दलचे अनेक कंगोरे चित्रपटात दाखवता आले असते. पण तुरळक आणि जनसामान्यांच्या माहितीतील घटनांचा उल्लेख सिनेमात केला आहे. सावरकरांचे जीवनमान एका सिनेमात दाखवणं शक्यच नाही. कारण सावरकरांची आयुष्यातील १८८३ ते १९६६ हा कालखंड दाखवण्यासाठी ओटीटी सिरिजचे किमान दोन तीन सीझन तरी होतील. कारण त्यांच्या कार्याची व्यापकता खूप मोठी आहे खूप वेगवेगळ्या क्षेत्रात आहे. सावरकरांचे बंधू आणि त्यांच्या कार्याची माहिती बऱ्यापैकी लोकांना माहिती नसते. त्यांच्या घरच्या एकूण हलाखीच्या परिस्थितीत काय काय सहन करावं लागलं हे ह्या सिनेमामुळे लोकांना समजेल. एखाद्या कुटुंबातील सदस्यांना स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला म्हणून किती विपरीत गोष्टींना तोंड द्यावे लागते हे सिनेमात दाखवण्यात आले आहे. डिटेलिंगच्या बाबतीत सिनेमा अप्रतिम झाला आहे. सिनेमा तयार करण्यासाठी जी जी आयुधं असतात तीचा चपखल वापर लार्जर दॅन लाईफ सावरकर उभे केले आहेत. बॉलीवूडमध्ये अशी आयुधे नको त्या गोष्टी प्रभावित करण्यासाठी आजवर वापरली. मात्र या सिनेमाच्या निमित्ताने सावरकरांना स्पर्श करणारा अमराठी कलाकार अभ्यासू करून सावरकर साकारतो हे फार महत्त्वाचे. सावरकर खरं तर देशासाठी लढले. आपल्याकडील दळभद्री व्यवस्थेने सावरकरांचे विचार, लिखाण आणि मते द्वेष पसरवण्यासाठी वापरली. त्यात सावरकर आणि गांधीजी यांच्या बाबतीत तर सावरकर व्हीलन आणि गांधीजी महानायक असंच भकास चित्रण आजवर वापरलं गेलं. मुळातच सावरकरांचा गांधीजींच्या अहिंसक पद्धतीला प्रचंड विरोध होता. कारण त्यांना ब्रिटिश लोकांचे कारनामे कसे असतात हे लंडनमध्ये शिक्षण घेत असताना माहीत झाले होते. कायद्याचे शिक्षण घेणारा तरुण ज्या पद्धतीने क्रांतिकारक कारवायांची आखणी करत होता त्यावरून सावरकरांची अहिंसेसोबत असलेली फारकत लक्षात येण्यासारखी आहे. सावरकर प्रत्येक वेळी हिंसेचा वापर करत होते असे नाही. कित्येक वेळा त्यांनी हिंसेचा वापर न करता केवळ आंदोलने करून महत्वाचे प्रश्न समस्या लोकांसमोर आणल्या. बहुतांशी सोडवल्या. पण त्याला म्हणावा तसा व्यापक प्रतिसाद नंतरच्या काळात मिळाला नाही. कारण तशी व्यवस्था त्यांच्या पाठीमागे उभी नव्हती केली कोणीही.

भारतीय जनमानस प्रभावित होण्यासाठी आपल्या देशात खूप मोठ्या व्यक्ती होऊन गेल्या. तत्कालीन राजकीय, सामाजिक परिस्थिती मध्ये ह्या व्यक्तींचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. मात्र या सर्वच व्यक्तींमध्ये सावरकर नेहमीच द्वेषाचे टार्गेट राहिले आहेत. जे जे मुद्दे द्वेष पसरवण्यासाठी वापरले गेले ते ते मुद्दे सिनेमात ज्या पद्धतीने हाताळले आहेत त्याला तोड नाही. उदाहरणार्थ माफी पत्रे. म्हणजे मर्सी पिटिशन्स. ही राजकीय कैद्यांना ब्रिटिश सरकारने दिलेली मुभा होती. अर्धा डझन पिटिशन लिहिल्यावर सावरकरांची अंदमानातून सुटका झाली. सावरकरांचे केले जाणारे हाल, त्यांच्या दिसणाऱ्या वेदना आणि मर्सी पिटिशन चा व्हॉईसओव्हर ज्या पद्धतीने अंगावर येतो ते अफलातून आहे. हिच सिनेमाची जमेची बाजू आहे. सावरकरांची भूमिका कशी होती आणि आपल्याकडील व्यवस्था त्यांचा माफीपत्रे लिहिली म्हणून कुत्सितपणे उल्लेख करते यावर विशेष मेहनत सिनेमात घेतली आहे. दिग्दर्शन आणि अभिनय या जबरदस्त जमलेल्या बाजू आहेत. कुठेच सिनेमा अडकत नाही, खटकत नाही की संथ होऊन प्रेक्षक बाहेर पडत नाही. सिनेमा सलगपणे गुंतवून ठेवण्यात कमालीचा यशस्वी झाला आहे. सावरकर पेन्शनसाठीची मागणी करतात ही पुसटशी गोष्ट सिनेमा दाखवतो. पण राजकीय कैद्यांना मिळणारा हक्काचा भत्ता देखील किती अर्ज, विनंत्या केल्यानंतर मिळाला आणि तो ही कमी कालावधीसाठी हा मुद्दा घेणं गरजेचं होतं. पण एका सिनमध्ये आटोपला आहे. दिग्दर्शकाला खूप घटना दाखवणं शक्य नसतं. मात्र तो हिंट देण्यात यशस्वी ठरलाय.

प्रगल्भ, जाज्वल्य आणि विज्ञाननिष्ठ ह्या त्रयींवर आधारलेली सावरकर नीती सहजपणे समजत नाही. त्यासाठी सावरकरांच्या लिखाणाचे वाचन चिंतन मनन गरजेचे आहे. शिवाय तत्कालीन आजूबाजूला ज्या घटना घडत होत्या त्यावर सावरकर प्रतिक्रियावादी कधी नव्हतेच. दूर्दैव हेच की त्यांच्या साहित्यातून संदर्भ न घेता काहीतरी उचलून त्यावर भाष्य करण्याचा अनेकांचा धंदा झालेला आहे. सावरकर कसे सनातनी आणि व्हीलन होते हे ठरवण्यासाठी एक योजना बद्ध इकोसिस्टिम उभी राहिली आहे. त्यांच्यावर वाट्टेल ते आरोप करणे, त्यांच्याविषयी दळभद्री भाषा वापरणे हे गेल्या दशकभरात एका नियोजित इकोसिस्टीमच्या जोरावर वाढले आहे. जनसामान्यांच्या मनात मात्र सावरकरांची जी प्रतिमा आहे तिला तडा जाण्यासाठी ह्या इकोसिस्टिमला सहजसाध्य नाही. कारण सध्याच्या परिस्थितीत सावरकरांचे राजकीय सामाजिक विचार कसे अत्यावश्यक होते हे नकळतपणे पटतेच. कारण सध्याच्या जगात उजवीकडे झुकलेल्या सत्ताधाऱ्यांचा एक मोठा वर्ग आहे. जगभरात दहशतवादी कारवायांमुळे राष्ट्रवादी विचारांची पकड घट्ट होतेय. यावर रामबाण उपाय म्हणजे सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या. त्यातही पुण्यभूमी मानणारे. सावरकर मुस्लिम द्वेष करतात हा गैरसमज खूप लोकांनी पसरवला. मुस्लिम समाजाचे आपल्या देशाबद्दल आणि धर्माप्रती असलेल्या संबंधावर सावरकर भाष्य करतात. हे असे इस्लामबद्दल प्रखर आणि तिखट भाष्य आंबेडकर आणि सावरकर त्याकाळात करतात हे खूप महत्त्वाचे. फरक हाच की आंबेडकर यांच्या इस्लाम विषयक विचारांवर कोणीही टार्गेट करू शकत नाही. कारण त्यांच्या मागे भक्कमपणे उभी असलेली व्होट बँक. सावरकर मास लीडर होऊ शकले नाहीत. ना कोणी त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणत्याही व्यवस्थेत सामावून घेतले नाही त्यामुळे सावरकरांची नकारात्मक प्रतिमा जास्त उगाळली गेली. गांधीजींना नेहमी मुस्लिम लांगूलचालन करतात म्हणून हेटाळले गेले. पण मुस्लिम समाजाचे लांगूलचालन होईल अशी सुरुवात टिळकांच्या लखनौ करार झाला तेव्हापासूनच झाली. त्यांनंतर सुभाषचंद्र बोस यांच्या मुस्लिम समाजाविषयी विचारांची पण दखल घेणं गरजेचं. द्विराष्ट्र संकल्पना मांडली गेली तो मुद्दा खूपच महत्वाचा. या सगळ्या गदारोळात सावरकर हे उठावदार आणि पारदर्शक हिंदुत्ववादी भूमिका घेतात हे फार सूचक आहे. त्यासाठी मुस्लिम लीग, कॉंग्रेस आणि हिंदू महासभा यांच्या सामाजिक राजकीय भूमिका समजावून घेणं तितकंच महत्त्वाचं. ह्या सगळ्या बाबींचा फार मोठा संदर्भ ह्या सिनेमात येतो. तो दिग्दर्शकाने अजून खोलवर जाऊन मांडायला हवा होता. चित्रपटाची लांबी वाढली असती. पण ते येणं गरजेचं होतं. सावरकरांचे तत्कालीन व्यवस्थेबद्दल असणारं फ्रस्ट्रेशन आणि त्यातून त्यांनी सुचवलेले उपाय जनतेला अशा सिनेमांमधून किमान पक्षी समजतात. कारण लेखन कमी वाचकांना प्रभावित करतं सिनेमा माध्यमातून खूप मोठा जनसमुदाय आकर्षित केला जातो. सिनेमा बनवणं सर्वात महागडी कला आहे. त्यात बॉलिवूडमध्ये सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला मध्यभागी ठेवून सिनेमा बनवणं म्हणजे संघर्ष आणि फक्त संघर्ष. त्यामुळे रणदीप हुडाला यासा शंभर पैकी शंभर गुण दिले पाहिजेत.

गांधीहत्या झाल्यावर सावरकरांची बदनामी करण्याची नामी संधी तत्कालीन राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील धुरिणांनी साधली. मुळात गांधीहत्या ही कोण्या एका माथेफिरूने योजना आखून केलेला खूनाचा कट एवढंच नाही. गांधीजींच्या भूमिका त्याकाळातील कित्येक लोकांना खटकत होत्या. अगदी कॉंग्रेस मधील नेत्यांना सुद्धा. गांधीजी काही साधेसुधे व्यक्ती नव्हतेच कोणीतरी येईल आणि त्यांना गोळी मारुन जाईल. तो एक व्यापक कट होता का? यावर संशोधन, चर्चा होणं खूप गरजेचे आहे. एखाद्या प्रसंगांला वेगवेगळे कंगोरे असतात तसाच ह्या हत्येचा आणि त्या मागच्या कारणमीमांसांचा तपशील लोकांसमोर आणला पाहिजे. कारण गांधीजींचा अडसर फक्त हिंदुत्ववादी लोकांनाच होता का? जर होता तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच का हत्या केली गेली? स्वातंत्र्यपूर्व काळात पण गांधीहत्या केली गेली असती? नक्की ५५ कोटी दिले म्हणून हत्या झाली की "डायरेक्ट ऍक्शन डे" चा परिणाम झाला कट्टर हिंदुत्ववादी लोकांवर झाला म्हणून हत्या केली होती का? अजून काय कारणं असतील? सावरकर यांनी नथुराम गोडसेच्या कोणत्या तरी वृत्तपत्रात गुंतवणूक केली होती म्हणून त्यांच्याकडे सगळी संशयाची सूई जाते का? संघाशी निगडित किंवा हिंदू महासभा पक्षाशी निगडीत असलेल्या लोकांनाच गांधीजी नकोसे झाले होते का? गांधीजींना मारणं ते पण दिवसाढवळ्या हे काही एकाएकी घडलेलं नाही. आधीपासूनच गांधीजींवर हल्ले होत होते. बरं हत्या केली म्हणून जे दोषी होते त्यांना फाशीची शिक्षा मिळाली. जे निर्दोष सुटले त्यात फक्त सावरकरांचीच वर्णी होती का? मग सावरकरांची बदनामी करायची आणि व्यवस्थेतून बाद करायचे असा कोणता योजनाबद्ध कार्यक्रम होता का? असेल तर कोणी आखला होता? असे कितीतरी प्रश्न उभे राहतात त्यामुळे एका सिनेमात किंवा लेखात किंवा पुस्तकातून ह्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत. त्यासाठी १९४२ ते १९४८ पर्यंतचा काळ वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघितला पाहिजे. नेमकं कोण कोणाला नकोसं होत होतं ते समजेल. कारण गांधीजींना सहजासहजी संपवणं शक्य नव्हतं. ते त्याकाळी सर्वोच्च संघटनेचे सर्वोच्च नेते होते. त्यामुळे त्यांची हत्या अमुकतमुकने केली कारण तो फलानाटिमका संघटनेचा होता. हे एवढ्यावर निष्कर्ष काढून काहीच हाती लागणार नाही. गांधीजींना जीवंतपणी ब्रिटिश सरकारने व्यवस्थितपणे गरजेनुसार वापरलं आणि मृत्युनंतर कॉंग्रेसने पण गरजेनुसार वापरलं. गांधीवादी विचारधारा ना कॉंग्रेसने अंगिकारली ना कोणत्या नेत्यांनी जोपासली. गांधीवादी समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते खूप झाले पण व्यवस्थेत त्यांना नेहमीच बाजूला रहावे लागले. या सिनेमात १९४८ ते १९६६ हा सर्वात महत्त्वाचा काळ दाखवला गेला नाही. तो महत्त्वाचा भाग आहे ज्या काळात सावरकर कशा पद्धतीने सिस्टिमच्या बाहेर फेकले गेले हे दाखवणं गरजेचं होतं. तरीही सिनेमा जबरदस्त पकड घेतो ते सावरकरांची लंडनमधील कारकिर्द ते रत्नागिरीमधील कारकिर्द या काळात. कारण हाच महत्त्वाचा गाभा दिग्दर्शक म्हणून हुडा फारच रंजक पद्धतीने लोकांना दाखवतो. अभिनयाची छाप पडतेच वेगवेगळ्या देहबोलीतून. काळ्या पाण्याची शिक्षा बघताना अंगावर काटा येतो. त्यावेळेस जे चित्रण केले आहे त्यात एक करूणा दाटलेली जाणवते. त्यामुळे नकळतपणे प्रेक्षक अंतर्मुख होऊन विचार करू लागतो. हीच सिनेमाची खरी ताकत आहे.

हा सिनेमा बघताना सावरकर आणि गांधी हा मुख्य धागा पकडून बनवला आहे का? तर प्रथमदर्शनी तसंच दिसतंय. मात्र सिनेमा बघताना नकळतपणे प्रेक्षक म्हणून आपण गुंतत जातो आणि विचार करू लागतो स्वातंत्र्य मिळवणं हे समुद्रमंथन असल्यासारखे आहे. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असली तरी ध्येय स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे हेच होतं. तत्कालीन कम्युनिस्ट, हिंदुत्ववादी, समाजवादी, आणि कॉंग्रेसचे धुरंधर संघर्ष करत होते. मात्र ब्रिटिश सरकारने शिताफीने कॉंग्रेसचा चेहरा माध्यम म्हणून वापरला. नकळतपणे तेव्हाचे उद्योजकांना कॉंग्रेसच जवळ वाटली त्याचा पुरेपूर फायदा कॉंग्रेसने उचलला. त्यामुळे आंबेडकर यांचा अस्पृश्यांचा लढा, कम्युनिस्ट, मुस्लिम लीग, हिंदू महासभा या संघटना पिछाडीवर गेल्या. त्याचे संदर्भ १९४२ च्या चले जाव चळवळीत आले असते तर सिनेमाला अजून जास्त कॅनव्हास मिळाला असता. पण सिनेमा आटोपशीर करताना काही मुद्दे टू दि पॉईंट घेऊन सावरकर, आंबेडकर, गांधी आणि मोहम्मद अली जिना यांना फारच बारकाईने चितरले आहे. या सगळ्याचा परिपाक म्हणजे सावरकरांची नीती कीती द्रष्टी होती ते समजते. सावरकर यांची एकूणच त्याकाळी किती गरज होती आणि ते कसे डावलले गेले हे दाखवताना दिग्दर्शक बऱ्यापैकी यशस्वी होतोय. रणदीप हुडा एक अभिनेता म्हणून तर ओळखला जातच होता या सिनेमाच्या निमित्ताने त्यातील बारकावे टिपणारा दिग्दर्शक पण समोर आला आहे. सावरकर आवडोत अगर न आवडो एकदा तरी हा सिनेमा बघाच. किमानपक्षी सिनेमा पाहून समजेल तरी, सावरकरांची ऐन तारुण्यात झालेली ससेहोलपट, उतारवयातील केलेली अवहेलना कशी झाली ते. एवढं सगळं होऊनही न ढळणारे तात्यांचे संघर्षमय जीवन नक्कीच प्रेरणादायी आहे. एखादी गोष्ट साध्य होणार नाही हे समजून देखील खचून न जाता सावरकर कशा पद्धतीने लढत होते हे सिनेमा बघून नक्कीच समजेल.

© भूषण वर्धेकर
२७ मार्च २०२४
पुणे

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

भूतकाळ इतिहास फेकून ध्या उगळण्यात काही अर्थ नाही.
आज आपली काय अवस्था आहे त्या वर लक्ष केंद्रित करा .

आताचे राज्य करते नेते देशाला दिशा देण्यास योग्य आहेत का ते बघा.

प्रतेक बाबतीत देश मागास आहे .
ना अती उच्च दर्जा चे जलद आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन.

ना शेती, जल संपत्ती, वातावरण,पर्यावरण ,ह्याची गंभीरता ना नियोजन.

शिक्षणाचा खेळ खंडोबा.
बेरोजगारी.
गरिबी.
किती तरी गंभीर प्रश्न अजून गंभीर होत आहेत .
आणि लायक नेतृत्व च भारतात सध्या अस्तित्वात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंतर्मन वगैरे भानगडी आपल्याला नसल्यामुळे प्रस्तुत चित्रपट त्यास भिडण्याची शक्यता सुतराम् नसल्याकारणाने, प्रस्तुत चित्रपटाच्या वाटेस जाण्याचा आपला इरादा नाही. सबब, आपला पास.

बाकी तुमचे चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सावरकरांचा गांधीजींच्या अहिंसक पद्धतीला प्रचंड विरोध होता.

गांधीजींच्या कोणत्या अहिंसक पद्धतीला विरोध होता?

कायद्याचे शिक्षण घेणारा तरुण ज्या पद्धतीने क्रांतिकारक कारवायांची आखणी करत होता त्यावरून सावरकरांची अहिंसेसोबत असलेली फारकत लक्षात येण्यासारखी आहे.

कायद्याच्या शिक्षणाचा आणि अहिंसेसोबत फारकतीचा काय संबंध ?

सावरकर प्रत्येक वेळी हिंसेचा वापर करत होते असे नाही. कित्येक वेळा त्यांनी हिंसेचा वापर न करता केवळ आंदोलने करून महत्वाचे प्रश्न समस्या लोकांसमोर आणल्या. बहुतांशी सोडवल्या. पण त्याला म्हणावा तसा व्यापक प्रतिसाद नंतरच्या काळात मिळाला नाही. कारण तशी व्यवस्था त्यांच्या पाठीमागे उभी नव्हती केली कोणीही

हिंसेचा वापर न करता आंदोलन करून समस्या सोडवल्या ( अहिंसक आंदोलन म्हणायचे आहे का? की त्या शब्दाची ॲलर्जी आहे? )
गांधीजींनी ह्या मार्गाने आंदोलन केले तेव्हा कोणती व्यवस्था त्यांच्या पाठीमागे होती?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सावरकरांनी रत्नागिरी मध्ये जो लढा दिला किंवा जी आंदोलने केली ती हिंसक होती का?
१९४१ मध्ये भागलपूर येथील शिस्तबद्ध लढा दिला तो हिंसक होता का?
हैदराबाद मध्ये जो काही निशस्त्र लढा दिला आर्य समाजासोबत तो हिंसक होता का?
अंदमानातील कारावासात सावरकरांनी जी आंदोलने किंवा उपोषणं केली ती अहिंसक मार्गानेच केली ना?

ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी १६०० साली स्थापन झाली. १६०८ च्या सुमारास व्यापार करण्यासाठी भारतात आले नंतर बंगालमध्ये जम बसवला नंतर १६१५ मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये कारखाना काढला. (बहुतेक सुरतमध्ये). मुघलांनीच त्यांना परवानगी दिली होती त्याकाळी. त्यानंतर ब्रिटिश लोकांनी ज्या पद्धतीने व्यापार करता करता स्वतःची व्यवस्था उभी केली हे सर्वश्रुतच आहे. सावरकर लंडनला गेले तेव्हा त्यांनी ब्रिटिशांबद्दल आणि त्यांच्या राज्यकारभाराविषयी जे वाचन केले त्याआधारे १८५७ विषयी लिहिले. त्याआधी इंग्रजांनी १८५७ हे सैन्यातील बंड म्हणून अधोरेखित केले होते. सावरकर वाचल्यावर समजतं की सावरकरांची ब्रिटिशांच्या बाबतीत निरिक्षणे फार सूक्ष्म होती. बहादूर जफरबद्दल सावरकरांची मते या सिनेमात येतात. जफर मुघल होता आणि त्याला हरवून इस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्याचा अधिकृतपणे ब्रिटिश राज मध्ये रुपांतर झाले. हे घडलं १८५८ च्या सुमारास. एक थिअरी असे सांगते त्यानंतरच्या काळात ब्रिटिशांनी १८५७ सारखं बंड होऊ नये म्हणून एलन ह्यूमकरवी इंडियन नॅशनल काँग्रेस ची स्थापना केली आणि क्रांतिकारी लोकांच्या चळवळी दडपायला सुरूवात केली. हे सगळे माहिती झाल्यावर कायदेशीर मार्गाने लढणे योग्य की हिंसेचा आधार घेऊन सशस्त्र लढा देणे योग्य हा विचार सावरकरांनी केलाच असेल ना?

मुळातच सावरकर चळवळे संघटना बांधण्याची कौशल्य असणारे तरुण कार्यकर्ते होते. त्यांनी लंडनमध्ये राहून भारतातील क्रांतिकारक लोकांना ज्या पद्धतीने शस्त्रं, बॉम्ब बनविण्याचे साहित्य आणि कृती पुरवली त्यावरून त्यांच्या योजनांबद्दल नक्कीच काहीतरी नीती असणार. हे सर्व घडत होते इंडिया हाऊस मधून. जिथे ब्रिटिश लोकांची करडी नजर होती. ह्या सगळ्या घटनांचे संदर्भ सिनेमात आले आहेत. माझ्या मते भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा जर खरा पारदर्शी कालखंड पडताळून पहायचे असेल तर १९४० नंतरचा लढा, १९२० ते ४० चा लढा, १९२० च्या आधीचे लढे आणि सर्वात महत्त्वाचे १८५७ चा लढा इत्यादी कालखंड खूप महत्त्वाचे आहेत. त्यातला सगळ्यात जास्त हॅपनिंग कालखंड म्हणजे टिळकांच्या मृत्यूनंतर ते स्वातंत्र्य बहाल करण्यापर्यंतचा. त्यामुळे तात्यारावांनी अहिंसक पद्धतीने लढण्यापासून फारकत घेतली असावी असं विधान मी केले आहे. तशी कारणमीमांसा सिनेमा दाखवतोच.

शेवटचा मुद्दा. सावरकरांच्या मागं कोणतीही व्यवस्था उभी नव्हती. रत्नागिरी मध्ये असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय त्यांना बाहेर जात येत नव्हते. दहा वर्षांत अंदमानातील कारावासात राहून लढ्यापासून तुटलेपणा त्यांना जाणवत होता. शिक्षा पूर्ण झाल्यावर कॉंग्रेसमध्ये जाणं शक्यच नव्हतं. कारण सावरकर विचार हा कॉंग्रेसच्या नेत्यांना कधीही पटणारा नव्हता. त्यावेळी मुस्लिम लीगच्या झेंड्याखाली मुस्लिम समाज एकवटला होता. विशेषतः १९३६ साली निवडणुकीत कॉंग्रेसने विजय मिळवल्यानंतर मुस्लिम लीगचे जे पानीपत झाले त्यानंतर मोहम्मद अली जिना यांनी इस्लाम धर्मासाठी मुस्लिम देश हा लढा तीव्र केला. परमोच्च बिंदू तर 'डायरेक्ट एक्शन डे' होता. हे सगळे घडत असताना सावरकरांनी हिंदू महासभेचा पर्याय उपलब्ध होता. मुस्लिम जसा एकवटला धर्मासाठी तसा हिंदू एकवटला नाही. त्यामुळे तशी व्यवस्था सावरकरांच्या मागे उभी राहिली नाही.

सावरकर समजण्यासाठी खूप वाचन गरजेचे आहे. आजूबाजूला ज्या घटना घडत होत्या त्यांचं आकलन करणं पण खूप गरजेचे आहे. एका सिनेमात समजणं शक्य नाही. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

विशेषतः १९३६ साली निवडणुकीत कॉंग्रेसने विजय मिळवल्यानंतर मुस्लिम लीगचे जे पानीपत झाले त्यानंतर मोहम्मद अली जिना यांनी इस्लाम धर्मासाठी मुस्लिम देश हा लढा तीव्र केला. परमोच्च बिंदू तर 'डायरेक्ट एक्शन डे' होता. हे सगळे घडत असताना सावरकरांनी हिंदू महासभेचा पर्याय उपलब्ध होता.

१९३७ सालच्या (१९३६ सालच्या नव्हे!) निवडणुकांमध्ये काँग्रेसचा प्रचंड विजय आणि मुस्लिम लीगचे पानिपत झाले, हा भाग ठीकच आहे. मात्र, त्या निवडणुकांमध्ये हिंदुमहासभेनेही काही देदीप्यमान कर्तृत्व (काँग्रेसच्या सोडा, परंतु मुस्लिम लीगच्या तुलनेतसुद्धा) दाखवल्याची नोंद इतिहासात असल्याचे आढळत नाही. (परंतु, ते ठीकच आहे. निवडणुका म्हटल्या, म्हणजे कधी चढणे आले, तर कधी पडणे आले. चालायचेच.)

मात्र, त्यानंतर काय झाले, ते महत्त्वाचे आहे. काँग्रेस बहुतांश प्रांतांतून विजयी झाली आणि त्यात्या प्रांतांतून काँग्रेसची मंत्रिमंडळे स्थापिली गेली. मात्र, पुढे १९३९ साली, व्हाइसरॉयने हिंदुस्थानी लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता हिंदुस्थानच्या वतीने परस्पर युद्ध घोषित केल्याच्या निषेधार्थ, या तमाम काँग्रेसी मंत्रिमंडळांनी घाऊक भावात राजीनामा दिला. तेव्हा, ती पोकळी भरून काढण्यासाठी, हिंदुमहासभा आणि मुस्लिम लीग हे दोन्ही पक्ष सरसावले. आणि, इतकेच नव्हे, तर, काँग्रेसचा अडसर मार्गातून अनायासे दूर झालेला असूनसुद्धा केवळ स्वबळावर जमेना, म्हणून हिंदुमहासभा आणि मुस्लिम लीग यांनी (सावरकरांच्या आशीर्वादाने) युती करून सिंध, सरहद्द, अशा काही प्रांतांत मंत्रिमंडळे स्थापिली.

हेही नसे थोडके, म्हणून, यांचे युती मंत्रिमंडळ असतानाच्या काळात जेव्हा सिंध असेंब्लीमध्ये पाकिस्ताननिर्मितीच्या संदर्भात काही ठराव पारित करण्यात आला, तेव्हा या युती मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी त्याचा जाहीर निषेध वगैरे केला, परंतु, मंत्रिमंडळातून राजीनामा दिला नाही. (ती 'प्रतियोगी सहकारिता' की काय म्हणतात ती, यालाच म्हणत असावेत काय?)

परंतु, बाकी काहीही असो, मात्र, सावरकर हे मुसलमानांच्या विरोधात होते, किंवा मुसलमानांचा द्वेष करीत, हे धादान्त खोटे असल्याचे यातून सिद्ध होते. (हं, त्यांच्या (काऊचिऊच्या) कादंबऱ्यांमधून नि कथांमधून अनेकदा, एखादे मुसलमान पात्र कल्पायचे, त्याच्याकडून बळेच (शक्य तोवर 'हिंदू अबलां'वर – हो, हिंदू स्त्रिया या अबलाच असल्या पाहिजेत, नि हिंदू पुरुषी हस्तक्षेपाविना त्या गर्ता या एकमेव गंतव्यस्थानाच्या मार्गावर असल्या पाहिजेत, हे तत्कालीन मराठी सामाजिक तथा साहित्यिक संकेतांस अनुसरूनच होते! – आणि त्यातसुद्धा शक्य तोवर फसवणुकीने) विविध लैंगिक अत्याचार करवून घ्यायचे, आणि वाचकांच्या भावना भडकविण्याकरिता त्या प्रसंगांचे वर्णन आत्यंतिक नाटकी आणि भडकाऊ भाषेत करायचे, असले प्रकार सर्रास चालत, तो भाग सोडून द्या. (प्रस्तुत कादंबरीचा दुवा हा निव्वळ वानगीदाखल आणि सहज सापडला म्हणून दिला आहे. मात्र, ही एक जॉन्र आहे.) असला मसाला भरल्याशिवाय त्या काळात मराठी कथाकादंबऱ्या सहज खपत नसतील, म्हणून नाइलाजास्तव, केवळ कादंबरी खपविण्यासाठी तसे केले असेल, म्हणून सोडून देऊ. हे सावरकरांपेक्षासुद्धा तत्कालीन सरासरी मराठीभाषक हिंदू वाचकाच्या मानसिकतेचे नि अभिरुचीचे द्योतक आहे, असेही म्हणता येईल, कदाचित. नि तसेही, चळवळ करायची, तर प्रचंड जनसंपर्क पाहिजे, नि साहित्याच्या माध्यमातून यशस्वीपणे जनसंपर्क करायचा, तर पुस्तके खपायला पाहिजेत, नि पुस्तके जर खपायची असतील, तर वाचकांच्या पातळीवर उतरायला नको काय? म्हणूनच केले असणार अर्थात. मुसलमानांना विरोध किंवा मुसलमानांबद्दल वैयक्तिक द्वेष म्हणून नव्हे काही. मुसलमानांना विरोध किंवा मुसलमानांबद्दल वैयक्तिक द्वेष जर असता, तर (Politics makes strange bedfellowsच्या धर्तीवर) मुसलमानांनी ओतप्रोत भरलेल्या मुस्लिम लीगबरोबर युती करून मुस्लिम लीगचे political bedfellow होऊ शकले असते काय? काहीतरीच बोलतात लोक! तेथे प्रेमाचेच अधिष्ठान पाहिजे!)

(किंबहुना, वाचकांच्या पातळीवर उतरायचे, म्हणून तर 'ग्वाटेमाला म्हणजे गौतमालय', झालेच तर 'झांजिबार म्हणजे हिंदूबाजार' असल्या (सरासरी मराठी वाचकाला सहज पटतील, अशा) ढुसकुल्याही त्यांनी सोडून ठेवलेल्या आहेत. वास्तविक, सावरकर हे अत्यंत बुद्धिमान म्हणून समजले जाण्याची आपल्याकडे प्रथा आहे. त्यामुळे, त्यांच्याकडून असले काहीतरी आलेले पाहून प्रथमदर्शनी आश्चर्य वाटू शकते. (एका विशिष्ट गोटात ते 'तात्या वाक्यं प्रमाणम्' म्हणून कोठलाही प्रश्न न उभारता गट्टमस्वाहा करण्याचीही प्रथा आहे, ती सोडून देऊ. परंतु, फारश्या बुद्धिमान जरी नाही, तरी थोडाबहुत कॉमनसेन्स अद्यापही शाबूत असलेल्या त्या गोटाबाहेरील एखाद्या वाचकास (यांना 'लिब्रांडू' अथवा 'वोक' असे संबोधण्याची आजकाल प्रथा आहे.) याबद्दल आश्चर्य वाटू शकते. तर ते एक असो.) मात्र, आपल्या (तत्कालीन) वाचकाची नाडी सावरकरांनी अचूक पकडल्याचे ते द्योतक आहे, हे लक्षात घेतल्यास असे आश्चर्य वाटण्याचे खरे तर कारण नाही. (ते ज्या वाचकवर्गाकरिता लिहीत होते, तो वाचकवर्ग सरसकट बिनडोक होता, यात सावरकरांचा काय दोष?) किंबहुना, असल्या ढुसकुल्या सोडल्यावरसुद्धा आपला वाचकवर्ग, 'आपली खेचली जात आहे' याची पुसटशी शंकासुद्धा न येता त्या ढुसकुल्यांना डोक्यावर घेतो, हे पाहून, 'कशी खेचली' म्हणून स्वत:लाच टाळी देत नि स्वत:चीच पाठ थोपटीत सावरकर खदाखदा हसले असतील, अशी शंका मला नेहमीच वाटत आलेली आहे. कोण म्हणतो सावरकरांना विनोदबुद्धी नव्हती, म्हणून?)

सावरकर समजण्यासाठी खूप वाचन गरजेचे आहे.

नाही हो! अज्ञानात आनंद असतो. सावरकर जोवर वाचलेले नव्हते, तोवर (शाळेतल्या शिक्षकांचे ऐकून वगैरे) त्यांच्याबद्दल प्रचंड भाबडा आदर वगैरे होता. त्यांचे साहित्य प्रत्यक्षात वाचीत गेल्यावरच त्यांच्याबद्दलचे मत खराब होत गेले. (नसते वाचले, तर गेला बाजार निरागसपणा तरी कायम राहिला असता. असो, आता खूप उशीर झाला!)

चालायचेच.

  • ‌मार्मिक4
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१९३७ मध्ये निवडणुकीत हिंदू महासभेचे पण पानीपत झाले होते. हे काही नवीन नाही. मात्र हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग यांच्या युतीमुळे कॉंग्रेस बाजूला पडत होती हे महत्त्वाचे. ती एक पॉलिटिकल तडजोड होती असं बघायला लागेल. (भाजपा नको म्हणून जसे एकमेकांना पाण्यात पाहणारे लोकनेते पक्ष वगैरे एकत्र येतात तसे. भाजपाला बाजूला टाकून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा एक तमाशा झाला. तो टिकला का? ) त्या काळी मुस्लिम लीग काय किंवा हिंदू महासभा या पक्षातील नेत्यांना राजकारणात जम बसवणे गरजेचं होते. जे व्यवहार्य ते त्यांनी केले असावे. बऱ्याच वेळा सरकार मध्ये गेल्याशिवाय व्यवस्थेत टिकाव लागणार नाही हे राजकारणाचे अंतिम आणि शाश्वत सत्य असल्याने अशा अगम्य राजकीय तडजोडी भारतात होत होत्या आणि होणारच. इंग्रजांनी एका विशेष माध्यमातून कॉंग्रेस सोबत वाटाघाटी करण्यासाठी एक व्यवस्था उभी केली. त्या व्यवस्थेचे सर्वात मोठे लाभार्थी हे कॉंग्रेसेच नेते होते. ( उदाहरणार्थ इलेक्शन बॉंड सारख्या व्यवस्थेचे भाजपाच सर्वात मोठा लाभार्थी आहे. स्पष्टपणे दिसणारी ही बायस्ड पद्धत लीगली सर्वपक्षीयांनी स्विकारली पक्षनिधी उभा करण्यासाठी) ब्रिटिश राज फार चलाखीने भारतातील प्रश्न हाताळत होते. (अमेरिका जसं इतर देशांत उगाचंच ठेकेदार म्हणून भुमिका वठवतं स्वतःला व्यावसायिक फायदा बघून तसं) दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांना अवजड आणि अवघड झालेली परिस्थिती आणि भारतावरील पकड ढीली झाली होती मुख्य कारण आझाद हिंद सेनेचे लढे आणि सैनिकातील बंड. ह्याविषयी सिनेमात काही उल्लेख आले आहेत. ह्या पार्श्वभूमीवर मुस्लिम लीग हा एकत्रित मुस्लिम समाजाला धर्माच्या नावाखाली घेऊन लढत असेल तर हिंदू मागं राहिला तर हिंदू महासभा पुढे येणारच ना? कॉंग्रेसची इच्छाशक्ती नव्हतीच. तेव्हा हिंदू बहुसंख्य हा अनभिज्ञ होता. तो आजही धर्मासाठी एकत्र होत नाही. त्याकाळी मुस्लिम लीग चे सरळसरळ इस्लामिक देशासाठी लढा हेच ब्रीद होते. हिंदूंसाठी लढणाऱ्या संघटना दोनच. आर.एस.एस. आणि हिंदू महासभा. त्यात आर.एस.एस. नुकतीच सुरू झाली होती. तेवढा तिला जनाधार नव्हताच मुळी. इथे एक खूप महत्वाची गोष्ट घडते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधी आणि सावरकर नकोसेच झाले होते एका अदृश्य शक्तीला. त्या अदृश्य शक्ती ने गांधींच्या हत्येनंतर सावरकराना शिस्तबद्ध पद्धतीने अडगळीत फेकले आणि पर्यायाने हिंदू महासभेचे जनमानसातील प्रभावी राजकारण नेस्तनाबूत केले. त्यामुळे नंतरच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत हिंदू महासभा कदीच भरघोस मतांनी निवडून आली नाही. कॉंग्रेसची तत्कालीन व्यवस्था हीच मजबूतीने उभी होती आणि जनतेने बहुमताने कॉंग्रेसला निवडणुकीत मतदान केले होते. कारण जनतेला तोच सक्षम पर्याय वाटत होता. (परत एक उदाहरण देतो. सध्याचे राजकारण हे भाजपा वरचढ असल्याने सगळे डाव आपल्याच पथ्यावर कसे पडतात याचे राजकारण करतो. कारण व्यवस्थेवर असणारी मजबूत पकड. जनतेला सुद्धा सध्या भाजपाच सक्षम पर्याय आहे हे जाणवतं) थोडक्यात काय तर कॉंग्रेसचे तत्कालीन राजकीयदृष्ट्या वजन जबरदस्त होते कंपेअर टू हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग. यावर उतारा म्हणजे कॉंग्रेसला डावलून युती करण्याचा एकमेव पर्याय दोहोंनी स्विकारला.

मुस्लिम समाजाबद्दल आकस असण्याची कारणं काय होती? सावरकरांनी कुराणाचा अभ्यास केल्यावर आणि तत्कालीन राजकीय सामाजिक घडामोडींची जाणीव ठेवून इसेंशियल्स ऑफ हिंदुत्व हे इंग्रजी पुस्तक लिहिले. पुण्यभूमी हा शब्द फार महत्त्वाचा. (एक उदाहरण घेऊ. इस्लाम या विषयावर आंबेडकर यांनी सडेतोड लिखाण केले आहे. फाळणी बद्दल त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. मात्र सावरकरांची मुस्लिम समाजाबद्दलची मते राजकारणात उल्लेखली जातात. आंबेडकर यांच्या विचारांचा का उल्लेख केला जात नाही? अशी काय सोशोइकोपॉलिटिकल नेसेसिटी आहे की सावरकरांन टार्गेट करण सोपं जातं?) एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सावरकर एकाकीपणे झुंजत होते हिंदुत्ववादी विचारधारेत समस्त भारतीय जनमानस एकत्र बांधून ठेवण्यासाठी. इस्लामिक देश व्हावा यसाठी डायरेक्ट एक्शन डे मुळं काय काय झाले हे काही नवं नाही. डायरेक्ट एक्शन डे झाला तेव्हा अहिंसक मार्गाने तत्कालीन लोकांनी हिंदूंना देश सोडून जा सांगितले होते का? अशा कट्टर प्रसंगाना गुलाबपुष्प देऊन किंवा कबुतरे उडवून काउंटर करता येत नाही. हिंसा हे एकमेव पुर्वापार चालत आलेलं आयुध आहे एखादी गोष्ट बळकावण्यासाठी. त्यात धर्माच्या नावाखाली अजून जोर येतो हिंसेला. गेल्या काही दशकांत इस्लामिक टेररिस्ट एक्टीव्हीटिज ह्या 'अमन कायम रहे' यासाठी झाल्या का?

मुस्लिम द्वेष करतात म्हणून जर सावरकर त्याज्य असतील तर त्याच धर्तीवर ब्राह्मण द्वेष करणारे त्याज्य होतात का? ही एक मोडस ऑपरेंडी आहे. (उदाहरणार्थ ब्राह्मणांना शिव्या दिल्या की अमुकतमुक विचारसरणीचे पालकत्व प्रदान केले जाते आणि राजकीय सामाजिक लाभार्थी पण होता येते. नंतर कार्यभाग साधला की हळून बेडूक उडी मारून जातापण येते.)

मतितार्थ असा आहे की, सावरकर वाचन करताना जर हेतूपुरस्सर कलुषितं जर मनात ठेवली (जशी कलुषितं गांधींविषयी गांधी द्वेष्टे ठेवतात) तर सावरकर खटकणारच. मुळातच सावरकरांच्या भुमिका आणि कार्यपद्धतीवर मनोविश्लेषणात्मक चिकित्सा (हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे खूप वर्षांपासून) गरजेची आहे.

असो. (अबब बरंच खरडलं की नबास्टाईल Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

स्वतंत्र सैनिक, हुतात्मे आणि नेते ह्यांचे बलिदान पूर्ण वाया गेलेले आहे.

भारतीय राज्य करण्यास लायक नाहीत हेच परत सिद्ध झाले

आहे.
भारतीय लोकांना देश बिलकुल चालवता आला नाही.
त्या पेक्षा ब्रिटिश आज पण सत्तेत असते तर भारताची खूप प्रगती झाली असती.

..बिचारे बलिदान देवून फसले असेच स्वतंत्र विर न विषयी वाटते
नियमात बसत नसेल, भारतीय कायद्यात बसत नसेल तर कॉमेंट admin ni delete करावी.
पण सर्व सामान्य लोकांना आजची देशाची स्थिती बघून हेच वाटते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे जिवन म्हणजे स्वातंत्र्य चा महामेरू

म्हणून आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेतलि पाहिजे

आपल्या देशाला स्वातंत्र्य त्यांनी मिळवून दिले आहे आणी देशाचे रक्षण करण्याची जबबदारी सर्व च नागरिकांची आहे

भारत हा कृषी प्रधान देश आहे तसेच आपल्या देशाला खूप मोठी शुर परमपरा मिळाली आहे

म्हणून त्यांनी जय जवान जय किसान हि घोषणा दिली

आपण स्वदेशीचा स्वीकार केला पाहिजे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणून त्यांनी जय जवान जय किसान हि घोषणा दिली

'जय जवान जय किसान' ही घोषणा सावरकरांनी दिली? ही माहिती माझ्याकरिता तरी नवीन आहे.

परतु, कोणास ठाऊक, असेलसुद्धा! फार कशाला, 'नावात काय आहे?' ही 'घोषणा'सुद्धा सावरकरांनीच दिली असेल. असेल असेल. 'कुछ भी मुमकिन है।'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जय किसान,जय जवान ही घोषणा दिल्या मुळे राज्य कर्त्या
लोकांनी त्याचे पालन केले आणि आज अग्निविर,जवान झाले आणि किसान समृध्द आणि सुखी झाले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा सीनेमा हिंदित आहे असे ऐकुण आहे. ‘भाषाशुद्धी’ वर त्यात काही मार्गदर्शण केले आहे का? कारन मला वाटते कि हिंदिभाशा शुध्ध करणेची खुप गरज आहे. ब्रीटीशांनाहि ते जमले नाहि. किंवा कारनामा म्हणुन त्यांनि ते मुद्दाम केले नाहि. ‘उद्या’ आणी ‘काल’ यासाठि जी भाशा एकच शब्द वापरते ति शुध्ध करायलाच पाहीजे. सावरकरांनि ‘काला पानि’ भोगले तेव्हा ह्या प्रक्रणाकडे का लक्ष दिले नाहि? तीथे बराकीत पठाणपण राहात होते त्यांची मदत का घेतलि नाहि?!
---

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

हिंदी ची भाषाशुद्धी का केली नाही हे त्यांनाच जाऊन विचारावे लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

‘भाषाशुद्धी’ वर त्यात काही मार्गदर्शण केले आहे का?

'मागर्दशर्ण'.

('आई तुझा आर्शिवाद'च्या मराठी ट्रकपरंपरेला जागून.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाषाशुद्धी, साहित्य याविषयी फारसं भाष्य नाही. जाती निर्मुलनाचा लढ्याबद्दल तुरळक प्रसंग आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

(हा प्रतिसाद खवचट मोडमध्ये लिहिलेला आहे, हे लक्षात घेऊनसुद्धा…)

‘उद्या’ आणी ‘काल’ यासाठि जी भाशा एकच शब्द वापरते ति शुध्ध करायलाच पाहीजे.

ही हिंदीची खासियत खाशी नसावी. गुजराती, बंगाली, अशा अनेक इंडोआर्यन भाषांतून हीच परिस्थिती दिसते. (कन्नड, तमिळ आदि द्राविडी भाषांत काय पद्धत आहे, याबद्दल मला कल्पना नाही.) किंबहुना, इंडोआर्यन भाषांत हा नॉर्म असून मराठी भाषाच तेवढी आउटलायर असावी की काय, अशी शंका अनेकदा येते. (मात्र, ‘परवा’/‘तेरवा’च्या बाबतीत मराठी ‘सुबह का भूला’ ‘प्रॉडिगल सन’सारखी शिस्तीत नॉर्मावर येते.) हं, बोलताना अनेकदा ‘आवतु काल’ (गुजराती)/‘आगामी काल’ (बंगाली)/‘आनेवाला कल’ (हिंदी) वगैरे क्वालिफायर लावून निःसंदिग्धीकरणाचा प्रयत्न करतात खरे, परंतु त्यापेक्षा मग सरळसरळ वेगळे शब्द ठेवले, तर काय वाईट, असा प्रश्न पडू शकतो.

आणि, इथेच गोची होते. भाषा ही कालानुरूप, ती भाषा बोलणारांच्या सोयीनुसार निसर्गतः संक्रमित होत जाते. त्याऐवजी ‘हे असेच बोलले पाहिजे’ हे ठरविणारे आपण (पक्षी: तुम्ही, मी, किंवा, फॉर्दॅट्मॅटर, सावरकर) नक्की कोण? (नि काय म्हणून/कोठल्या अधिकाराने ठरवायचे?)

असो चालायचेच.

——————————

खुद्द संस्कृतात ‘काल’ आणि ‘उद्या’बद्दल नक्की काय परिस्थिती आहे, कल्पना नाही; शोध घेण्याचा प्रयत्न करूनसुद्धा खात्रीलायक माहिती मिळू शकली नाही. आणि, इयत्ता आठवी ते दहावी पन्नास मार्कांचे संस्कृत शिकून (नि त्वरित विसरून)सुद्धा, इतकी मूलभूत माहिती कधी सामोरी आली नाही, हा निव्वळ दैवदुर्विलास आहे. चालायचेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> खुद्द संस्कृतात ‘काल’ आणि ‘उद्या’बद्दल नक्की काय परिस्थिती आहे, कल्पना नाही..

'ह्य:' आणि 'श्व:'

----

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

आभार.

परंतु मग, संस्कृतशी घनिष्ट संबंध असलेल्या हिंदी-गुजराती-बंगाली आदि भाषांत हा भेद एकजात लुप्त का (खरे तर कसा काय) झाला असावा, हे समजत नाही.

(‘का’ याला खरे तर उत्तर नसावे, त्यामुळे, ‘कसा काय’च.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शीर्षक: ‘(परकर: एक अंतर्वस्त्राला भिडणारा जामानिमा)’

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0