मानसोपचारतज्ञाकडे जाण्यापूर्वी - १

मानसोपचाराबद्दल बरेच प्रमाणात गैरसमज आहेत असं सर्वसामान्य चित्र दिसतं. मानसोपचार कधी, का घ्यावेत, त्यातून अपेक्षा कसली ठेवावी अशा प्रकारचा संवाद मानसोपचार-समुपदेशक सुलभा सुब्रह्मणम यांच्याशी केला. हा लेख म्हणजे त्याचं संकलन आहे.

सुलभा सुब्रमण्यम गेली १७ वर्ष मानसोपचार या क्षेत्रात कार्यरत आहेत. ठाण्यातल्या Institute for Psychological Health, IPH, मधे त्या समुपदेशक आणि ट्रेनर, मैत्र नामक दूरध्वनी-समुपदेशक प्रकल्पाच्या संयोजक आणि अन्य काही सामाजिक संस्थांशीही संबंधित आहेत. एका बहुराष्ट्रीय कंपनीत १२ वर्ष संशोधनाचा अनुभव. सुलभाताईंना जनसंपर्क आवडतो, त्यातून कामासाठी उत्साह आणि लोकांशी निगडीत असण्याची भावना मिळते.

प्रश्नः सुलभाताई, 'मानसोपचार तज्ञाकडे जाण्यापूर्वी' अशा प्रकारचं मार्गदर्शन तुमच्याकडून मिळेल अशी अपेक्षा आहे. एकदा तज्ञाकडे गेलो की मग त्याच्याकडून माहिती मिळते. पण तज्ञाकडे कधी जावं, त्याचा फायदा काय-कसा होतो, याबद्दल थोडं सांगा.

उत्तरः मानसोपचारतज्ञाकडे जाण्यासाठी म्हणजे माणूस ठार वेडाच असला पाहिजे अशी एक कल्पना आहे. जरा त्रास होतो, राग येतो, अस्वस्थता वाटते, हे सगळं सामान्य आहे. आपण होऊनच हे सगळं ठीक झालं पाहिजे असं वाटतं. लोकांना हे माहित नसतं किंवा माहित असेल तरीही काही तरी चुकतंय हे मान्य करायचं नसतं.

जेव्हा आजार वाटेल असा काही मानसिक त्रास होत असतो तेव्हा भास होणं, इतरांवर संशय घेणं ही अशी लक्षणं दिसतात. त्याचा पॅटर्न बनतो. वेगळंच काहीतरी झालेलं असतं आणि पृष्ठभागावर ही लक्षणं दिसतात. जसं डोकेदुखी हे एक लक्षण आहे. डोकं दुखण्याची मूळ कारणं पंधराएक आहेत. झोपेचा अभाव, पोट बिघडणं, ऊन लागलं असेल असं काहीतरी वाटतं. थोडा वेळ झोपून पाहू मग बरं होईल असं आपण विचार करतो. पण त्याचं काही गंभीर कारणही असू शकतं अर्धशिशी, मेंदूचा आजार, डोळ्याचा विकार, किंवा ताण, नैराश्य (depression), अस्वस्थता (anxiety) अशा प्रकारचे मानसिक विकार झाल्यामुळेही डोकेदुखी होते.

दैनंदिन भाषेत नैराश्य आणि खिन्नता (sadness) यांच्यात गल्लत होते. हतोत्साह असणं (low feeling) आणि नैराश्य यात फरक आहे. आपल्याला वेळोवेळी हतोत्साह असल्यासारखं वाटू शकतं; दु:ख वाटू शकतं; कशात काही राम नाही असं वाटू शकतं. हे आपल्याला सगळ्यांना होतंच. ते वाटलं की लगेच तज्ञाकडे जायची आवश्यकता नसते. हीच लक्षणं वारंवार दिसतात, दैनंदिन जीवन अडतं, कामं करताना त्रास होतो, नातेसंबंध बिघडत आहेत असं दिसत असेल तर आपला फॅमिली डॉक्टर किंवा मानसोपचारतज्ञाकडे जाऊन विचारणं योग्य. मानसोपचारतज्ञ म्हणजे सायकियाट्रिस्ट किंवा सायकॉलॉजिस्ट; पण सायकॉलॉजिस्टला सर्व तपशील माहित असतीलच असं नाही. मेंदूचे सगळे विकार सायकॉलॉजित शिकले/शिकवले जातातच असं नाही. पुरेसा अनुभव, शिक्षण असेल तर क्लिनिकल किंवा काऊन्सेलिंग सायकॉलॉजिस्टचाही फायदा होतो. अन्यथा एखाद्या सायकियाट्रीस्टकडे जाऊन मेंदूच्या विकारांसंदर्भातही चिकीत्सा करून घेणं योग्य आहे. संबंधित लक्षणं हा मेंदूसंबंधातला विकार आहे का हे तात्पुरतं आहे, फक्त समुपदेशनातून यावर इलाज होईल का औषधांचीही आवश्यकता आहे अशा प्रकारचं निदान सायकियाट्रिस्ट-डॉक्टर करू शकतो. त्याचप्रमाणे, मानसिक त्रासाच्या लक्षणांमागे अनेक वेगवेगळी कारणं असू शकतात ज्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणे उत्तम.

प्रश्नः सायकियाट्रिस्ट आणि सायकॉलॉजिस्ट यांच्यात काय फरक आहे?

उत्तरः सायकियाट्रिस्टचं मूळ शिक्षण वैद्यकामधली असते. सायकॉलॉजिस्टचं मूळ शिक्षण भारतात बी.ए. आणि मग एम.ए. असं असतं. बाहेरच्या देशांमधेसुद्धा मानसोपचारातली पदवी मिळते. सायकॉलॉजी या विषयात मेंदूबद्दल काही प्रशिक्षण मिळतं, पण मुख्यतः विचार, भावना आणि वर्तन यांच्याबद्दल विचार केला जातो. यांचा आपसातला संबंध, त्यातल्या अडचणी, या अडचणी सोडवण्याचे मार्ग, मेंदू आणि सामाजिक-मनोविज्ञान यांचा विकास कसा होतो, लहान मुलांपासून उतारवयापर्यंत हा प्रवास काय असतो, त्यात आपली जडणघडण कशी होते, अ‍ॅटीट्यूड, श्रद्धा, वर्तन, स्वभाव यांचा विचार सायकॉलॉजित होतो. सायकियाट्री या विषयात हेच विषय पण मेंदूचं कार्य कसं चालतं, मेंदूत विचार, भावना आणि वर्तन यांचे होणारे परिणाम, औषधं यांचा विचार अधिक खोलवर होतो. या औषधांमुळे ही लक्षणं दूर होण्यासाठी मदत होते. सायकियाट्रीमधे कोणते विचार, भावना रुग्णाच्या मानसिक स्वास्थ्याच्या आड येतात याचा विचार होतो. आणि या अडचणींवर मात करणं यांचा विचारही सायकॉलॉजित होतो.

मेंदू आणि त्याचं जीवशास्त्र हा भाग सायकियाट्रीचा आणि या विषयासंबंधातले सामाजिक परिणाम हा भाग सायकॉलॉजित येतो.

प्रश्नः नैराश्य म्हणजे स्वतःचं स्वतःबद्दल असणारं वाईट मत असं समजता येतं का?

उत्तरः ऊर्जा कमी होणं, मूड खराब असणं, मोटीव्हेशन नसणं आणि नकारात्मक विचार हे जर खूप काळ टिकत असेल तर ते नैराश्य. नाहीतर ती फक्त खिन्नता. हा काळ किती असेल त्याची ठराविक व्याख्या असते. त्याचे आंतरराष्ट्रीय नॉर्म्स आहेत. ते ठराविक काळाने बदलले जातात. पण बोलीभाषेतलं नैराश्य ही बहुतांशी खिन्नता असते. नैराश्याची लक्षणं म्हणजे शरीरात उर्जा आणि काही नवीन करण्याची इच्छा नसते, मनातून काही करण्याचा उत्साह रहात नाही, रस संपतो, प्रत्येक गोष्टीतली नकारात्मक बाजू दिसते, स्वारस्य आणि आत्मविश्वासाचा अभाव हे ही दिसतं. भूक आणि झोपेवर परिणाम होतो. भूक मरते, कमी होते किंवा अति खाणं होतं. झोप कमी होते, उडते, गाढ झोप (deep sleep) होत नाही. किंवा मग पुरेसं झोप येते तरीही उठल्यावर थकल्यासारखं वाटतं. इतर काही परिणाम म्हणजे माणूस सतत गोंधळलेला असतो, सुचत नाही, आयुष्यात अर्थ नाही, आयुष्य संपवायला हवं किंवा संपायला पाहिजे असं वाटतं. शारीरिक दुखणी होतात त्याला काही वैद्यकीय कारणं दिसत नाहीत. पाठदुखी वगैरे असं काही दिसतं, एक्स-रे चिकीत्सा करून काही सापडत नाही, जीवनसत्त्व घेऊन फरक पडत नाही. मानसिक अनारोग्याचे शरीरावर परिणाम दिसतात. नैराश्य आणि अस्वस्थता दोन्हींचे हे परिणाम दिसू शकतात.

प्रश्नः मानसोपचारतज्ञाकडे जाणं या गोष्टीबद्दल समाजात टॅबू आहे असं अनेकदा दिसतं. या संदर्भात मुद्दाम नोंदवण्यासारखे तुमचे अनुभव आहेत का?

उत्तरः होय. वैद्यक व्यवसायाशी संबंधित लोकही, डॉक्टर, पॅरामेडीक्स, स्वतः मानसोपचार व्यावसायिक, मानसोपचार घेण्याबद्दल आढेवेढे घेतात. "माझं मी बघून घेईन" अशा प्रकारचा विचार त्यामागे असतो.तिला "मी या फील्डमधे आहे तर मी कणखर असलं पाहिजे. ही भावना फार विचित्र आहे. तर ही अशी काही लक्षणं दिसत आहेत आणि त्याचा अर्थ काय हे मला समजतंय तर मला ही माझी अडचण सोडवता आलीच पाहिजे. मला समजतंय तर औषधांची गरज काय?" एका विशिष्ट मर्यादेपलिकडे शरीर साथ देत नाही. मग ते अंगावर काढलं जातं. माझ्या एका मैत्रिणीचा अनुभव या बाबतीत आहेत. तिच्या आयुष्यातल्या, आजूबाजूच्या घटनांमुळे तिला स्वतःलाच व्यक्तिगत पातळीवर त्रास होत होता. दरदरून घाम फुटणं, पॅनिक अटॅक अशी अस्वस्थतेची लक्षणं होती. तिने ते अनेक महिने किंवा वर्षभर असं अंगावर काढलं. आधी स्वतःचं स्वतः करायचा प्रयत्न केला; मग समव्यावसायिकांची, म्हणजे माझी, (जेव्हा मला आवश्यकता वाटते, तेव्हा मी सुद्धा मदत घेतेच.) मदत घेतली. परिस्थिती सुधारलीही.

आपलं आपणच थोडं काम करून जर ही लक्षणं जात नाहीत तर मग योग्य ती मदत घेणं इष्ट. औषधं घेऊनच मानसिक विकाराची जी लक्षणं आहेत त्यांचा परिणाम कमी केला की आपणच वेगळ्या पद्धतीने मुख्य अडचणींना सामोरं जाऊ शकतो. औषधांचं काम हेच आहे.

भावना किंवा विचार ही मेंदूच्या दृष्टीने ठराविक प्रकारची रसायनं आहेत. आपण विचार करतो किंवा भावना उत्पन्न होतात, त्यानुसार मेंदूत ही रसायनं तयार होतात. त्यांचं मेंदूतलं प्रमाण बदललं किंवा ही रसायनं साचून राहिली तर नेहेमीच्या कामकाजात अडथळा येतो. हे म्हणजे असं की वीजेच्या वायरीवर गंज चढला, तर वीजवहनात अडथळा निर्माण होतो. मेंदूमधेही रसायनांचं प्रमाण फार बदललं तर मेंदूचं कामही योग्य पद्धतीने काम होत नाही; विचार होत नाही. या रसायनांचं प्रमाण ताब्यात आणण्यासाठी, मेंदूतला गंज काढण्यासाठी औषधं. औषधांशिवाय आयत्या वेळी विचार करताना आपण यावर मात करू शकत नाही. मेंदूच्या सर्किट्सवर गंज असतोच. तो उतरवायला औषधांची गरज आहे. औषधं घेण्याकडे नकारात्मक पद्धतीने पाहिलं जातं; I am not good enough अशी भावना येते. मन कमकुवत झालेलं आहे असं वाटायला लागतं. मी एवढी हुशार, उच्च तार्किक पातळीवर विचार करणारी व्यक्ती आहे तर मग माझं मला सगळं सावरता आलंच पाहिजे असा हट्ट असतो. शिवाय औषधांवर आपण अवलंबून राहू अशी एक भीती वाटायला लागते. ही औषधं मात्र सवय, व्यसन लागेल अशा प्रकारची नसतात. माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत हे माहित असूनही औषधं सुरू करायची तयारी नव्हती. कारण "मी या मानसोपचार क्षेत्रात काम करत असल्यामुळे मला हे जमलंच पाहिजे." हा अडथळा ओलांडायला वेळ लागला. तिचा आत्मविश्वास गेला; सगळं सोडून देऊन घरी बसू का असं तिला वाटायला लागलं होतं. शेवटी तिने औषधं घ्यायला सुरूवात केली; त्यानंतर समुपदेशन अशा पायर्‍या ओलांडून ती पुन्हा सामान्य स्थितीला आली.

या क्षेत्रात काम करणारे लोकही असा विचार करू शकतो तर सामान्य माणूस असा विचार करूच शकतो.

एकंदर मानसोपचार क्षेत्राबद्दल गैरसमजही असतात की एकदा समुपदेशन करून घेतलं की जादूची छडी फिरवल्यासारख्या सगळ्या अडचणी नाहीशा होतील. यामुळे आमच्यावर थोडं दडपण येतं. पालक-मुलं, नवरा-बायको किंवा अगदी स्वतःच्याच अडचणी घेऊनही लोकं येतात. "मला अशा एखाद्या गोष्टीची अतार्किक भीती phobia आहे आता ते तुम्ही बरं करून टाका." पण हे 'बरं होण्यामागे' एक लांबलचक प्रक्रिया आहे; ती काही महिने किंवा वर्ष चालत रहाते. याबद्दल लोकांना वाचन करूनही फार माहिती असते असं वाटत नाही. पण गेल्या पाच-सात वर्षांमधे थोडा चांगला फरक पडलेला आहे असं दिसतंय.

प्रश्नः हा पाच-सात वर्षांमधला फरक जो दिसतोय तो कशामुळे पडला असेल असं तुम्हाला वाटतं?

उत्तरः भारतीय (मराठी, हिंदी) आणि अभारतीय चित्रपटांचा मोठा प्रभाव जाणवतो. हे काही गूढ नाही, हे विकार सामान्य लोकांनाही होऊ शकतात हा विचार चित्रपटांमुळे रूजतो आहे. नशीबाने या चित्रपटांमधे मानसोपचाराची मानवी बाजू दाखवलेली आहे. कुटुंबीयांचं काय होतं, त्यांची कशी द्विधावस्था होते, विकार आहे हे ओळखणं कठीण जातं, इलाज सुरू झाल्यावर बरं होण्याची प्रक्रिया कशी असते, बरं होणं याची व्याख्या काय अशा गोष्टी दाखवल्या जात आहेत. मानसिक विकार बरे होणं म्हणजे सर्दी-खोकल्यासारखे ते पूर्णपणे नाहीसे होतात का या स्थितीमधे माणूस आपलं दैनंदिन आयुष्य बिनाअडथळा जगू शकतो याचाही विचार करावा लागतो. काही जन्मजात कंडीशन्स असतात, त्या आयुष्यभर तशाच रहातात, पूर्णतया जात नाहीत. पण आपण त्याच्यासोबत जगू शकतो. त्यासाठी औषधं, समुपदेशन, संबंधित विकाराबद्दलची संपूर्ण माहिती रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांनाही, काही प्रमाणात समाजालाही देणं - शिक्षण, याचा चांगला परिणाम दिसतो आहे.

पूर्वी जे चित्रण चित्रपटांत दिसायचं ते खूप 'टिपिकल' होतं. एखादा मेंटल हॉस्पिटलचा सीन असायचा, सगळे जन्मजात वेड्यासारखे, २४ तास वागत आहेत, हे आयुष्य फार भयानक आहे आणि यातून सुटका नाही असं साचेबद्ध चित्रण होतं. आता तसं होत नाही. आताच्या कथा, चित्रपटांमधून वास्तववादी चित्रण होतंय. वर्तमानपत्र, नियतकालिकांमधून या विषयाशी संबंधित जे लिखाण येतंय ते ही योग्य दिशा देणारं आहे. प्रश्नोत्तराच्या स्वरूपातलं लिखाणही दिसतं. हे प्रश्न विकार, नातेसंबंध किंवा इतर गोष्टींबद्दल असतात. इतर गोष्टी म्हणजे सायकियाट्रिक केसेस - जे विकार पूर्णतः बरे होणारे नसतात पण त्याच्यासोबत सामान्य आयुष्य जगता येतं. काही आजार आहेत ज्यात रोगासोबत जगणं हेच एक मोठा प्रकल्प होऊन जातो. यात बर्‍याच लोकांचा समावेश असतो, कुटुंबीय, मित्रपरिवार इ. ह्याबद्दल प्रश्न विचारणं, लैंगिकतेबद्दल प्रश्न विचारणं याबद्दलही वर्तमानपत्रांमधून लिखाण होतं. या प्रकारातले चित्रपटही विषयाचं अंतरंग दाखवणारे आहेत. नक्की काय होतं, बाहेर पडण्याची प्रक्रिया, मार्ग याबद्दल वास्तववादी चित्रण दाखवलं जात आहे. या संदर्भात वास्तववादी म्हणजे काय, तर रुग्णाचं डोकं आपटलं आणि जादू झाल्यासारखा आता आजार, विकार बरा झाला असं काही दाखवत नाहीत. ही प्रक्रिया बर्‍यापैकी तपशीलात दाखवलेली आहे. विकार आणि बरं होण्याच्या वेगवेगळ्या बाजू दाखवल्या गेल्या आहेत. म्हणजे स्किझोफ्रेनिया, डिमेन्शिया, अल्झायमर्स, बायपोलर या प्रकारच्या गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत. हे दाखवताना डॉक्टर-रुग्ण, डॉक्टर-रुग्णाचे कुटुंबीय, सामाजिक कार्यकर्ते-रुग्णाचे कुटुंबीय, दोन कुटुंबीय ज्यांच्यापैकी एकाला या विषयातली अधिक समज आहे तो दुसर्‍याला सांगतोय अशा प्रकारे ही माहिती दाखवली जात आहे. काही रुग्ण असेही पाहिले आहेत कि ज्यांनी स्वतःच्या मनोविकारांचं निदान स्वतःच केलं होतं. "हा असा काही लेख वृत्तपत्रात वाचला आणि यातल्या अनेक गोष्टींचा त्रास मला होतो आहे.", असं ते स्वतःच सांगतात याचा फायदा उपचारांमधे होतो.

प्रश्नः चित्रपटांचा विषय निघालाच आहे तर 'मैने गांधी को नही मारा' या चित्रपटात अशा प्रकारचा विषय हाताळला गेला आहे. या चित्रपटाला तुम्ही चांगला, वास्तववादी चित्रपट म्हणाल का?

उत्तरः हो, जरूर. रीमा लागूचा 'धूसर' नावाचा मराठी चित्रपटही या बाबतीत चांगला आहे. हिंदीत 'इजाजत' हा जुना एक चित्रपट आहे. तो खरंतर मानसोपचार या दृष्टीने बनवलेला नाही त्यामुळे त्यात माहिती अशी फार नाही. पण त्यात नातेसंबंध आणि व्यक्तिचित्रण खूप चांगलं केलेलं आहे. अनुराधा पटेलचं त्यातलं पात्र हे बॉर्डरलाईन पर्सनालिटी डिसॉर्डर प्रकारचं आहे. इंग्लिश चित्रपटांमधे 'ब्रेकफास्ट अ‍ॅट टीफनी'मधलं ऑड्री हेपबर्नचं पात्र हे असंच आहे. जॉन नॅश या गणितज्ञाच्या आयुष्यावर आधारित असणारा 'ब्यूटीफुल माईंड' हा उत्तमरित्या चित्रित केलेला आहे. मानसिक आरोग्य कसं ढळतं, ते सुधारण्यात, मेंटेन करण्यात कुटुंबीयांचं किती योगदान असतं हे ही आहे. त्यात शेवटी स्किझोफ्रेनिया आहेच, पण तो maintained आहे. उपचार , आणि कुटुंबीयांनी मदत करणं - या केसमधे त्याच्या बायकोने खूप कष्ट केले - हे दाखवलेलं आहे. त्याचं नोबेल पुरस्कारप्राप्त काम करतानाही, अगदी शेवटपर्यंत त्याला लोक आहेत असे भास होत रहातात. बरं होण्याबद्दल मी जे म्हणत होते ते हे, की त्रास संपूर्णतः संपेलच असं नाही. पण या माणसाला कमीतकमी त्रास होईल आणि लाईफस्टाईल आणि कामात अडथळा होऊ नये. जॉन नॅशला हा त्रास होतच राहिला, पण "हा मागचा, नकोसा गोंगाट (background noise) आहे आणि मी माझं काम करू शकतो." असा विचार करून त्याने त्याचा विकार मॅनेज केला.

असे बरेच रुग्ण येतात ज्यांना ओसीडी (obsessive compulsive disorder) आहे किंवा स्किझोफ्रेनिया असे सायकॉटिक प्रकारचे आजार असतात ज्यात नको ते विचार येणं, वाटणं, आवाज किंवा दृष्याचे भास होणं हे कमी होऊ शकतं. पण असं काही झालं तरी त्याचा स्वतःवर परिणाम होणार नाही याची काळजी ते घेऊ शकतात. त्याच्याचमुळे हे लोक विकाराचा सामना करण्यात यशस्वी होतात.

मानसोपचारतज्ञाकडे जाण्यापूर्वी - २

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (4 votes)

प्रतिक्रिया

नैराश्याच्या अनेक कारणात पोषकद्रव्यांचा अभाव हे महत्त्वाचे कारण असु शकते (जसे बी१२चा अभाव) आणि याचा शोध न घेता मिटर चालु ठेवायचे म्हणुन कित्येक मानसोपचार तद्न्य नैराश्यनाशके देताना दिसतात...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही म्हणता ते खरेही असु शकेल. तसे सगळ्याच पेशात असे होताना दिसते. पण म्हणुन सरसकट विधान करावे का?
नैराश्याला अनेक कारणे असतात; पैकी फक्त १(ते सुद्धा मोस्ट कॉमन कारण नव्हे)ब१२ वीटामिन ची कमी.. अशी आणखी बरीच कारणे. प्रत्येकाची चिकीत्सा करुनच डॉ ठरवतात की काय योग्य ठरेल. जर इतर कारण असेल, अनि आपण ब१२ दिले अणि बरे नाही वाटले तरी पण कोणी असेच म्हणेल.. मग काय करावे?? दोन्हिकडुन बुक्क्यान्चा मार.
अनेकदा नवे शोध लागतात. त्याची परिणीती उपचार पध्दतीत लगेच सगळे करतीलच/करु शकतील असे नाही. तसे योग्य ही नाही. ऱोगी व नातेवाइक असेच आरोप करु शकतात म्हणुन; शिवाय ग्यान एक जैसा नही फैलता.
आपण थोडे त्र्ययस्थाच्या भुमिकेतुन पाहुया. जरा जे मानसोपचार घेउन बरे झाले आहेत, त्यान्चा उपहास नको करुया.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुलभाताई, आपले स्वागत. (हा प्रकार उंबरठ्यावरून ओसरीतल्याचे स्वागत करण्याचा आहे, तरीही...)

विज्ञानाला मानसिक आजार कायमचा दुरुस्त करण्याचे तंत्र अजून गवसलेले नाही. त्यामुळे 'अपाय कमी करणे', 'त्यातल्या त्यात परिस्थिती बरी ठेवणे', 'आजारांतला गॅप वाढवणे', इत्यादींवर डॉक्टरांचा जोर असतो. या सगळ्या प्रयत्नांमधे सातत्य लागते. म्हणून रुग्णांचा 'मीटर' चालू ठेवले आहे असा गैरसमज होतो. अर्थात याला काही स्वार्थी डॉक्टरही जबाबदार असतील.

बाकी मराठी लिहायची मज्जाच और ! ऐसी आणि मीमराठी नसते तर मी आयुष्यात कधीच लेखी मराठी वापरली नसती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मला जेव्हा सायकियाट्रिस्ट ने बी १२ ची टेस्ट करायला सांगितली तेव्हा मी ती केली. माझा काउंट १९४ होता. स्टँडर्ड मधे काउंटची रेंज १८७ ते ८८३ असा होता. अगदीच बॉर्डर वर आला आहे म्हणुन ब१२ च्या गोळ्या चालू केल्या. कार्डिऑलॉजिस्ट कडे रुटीन चेकप ला गेलो तेव्हा त्यांनी पाहिले व म्हणाले शाकाहारी माणसाचे बी १२ तसे कमीच असते. थोडक्यात भुमिका अशी असते कि घेतलेले काय वाईट अपाय तर नाही ना? असु द्यावे पूरक म्हणून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

खूपच चांगली मुलाखत.
प्रश्न मला फार आवडले. कारण उत्तरं अखेर त्या अनुषंगाने येतात.
प्रत्येक क्षेत्रात जे बदल होतात, जी नवी संशोधनं येतात आणि त्यानुसार कृती करतानाही नवे प्रयोग केले जातात... ते वेळीच समोर येतात असे नाही.
मानसोपचाराबाबत गेल्या काही वर्षांत ज्या नव्या पद्धती आल्या आहेत, त्या फार रोचक आहेत. आय.पी.एच.मध्ये त्या वापरल्या जातात, त्याविषयीही कधीतरी सुलभाताईंना विचारता येईल. खेरीज सेल्फ हेल्प ग्रुप्सबाबतही.
मी काही महिन्यांपूर्वी एका लेखनानिमित्त तिथला एक सेल्फ हेल्प ग्रुप कसा चालतो, ते पाहण्यास गेले होते आणि अधिक काही माहिती एका विकाराबाबत हवी होती, तीही मला तिथे मिळाली. हे सारे काम, त्यातला रुग्णांचा व रुग्णांच्या नातलगांचा आणि इतर नागरिकांचा सहभाग हेही खूप दिलासा देणारे आहे.
ही मुलाखत अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचली पाहिजे.
धन्यवाद अदिती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

या माहितीबद्दल आभार.

सध्यातरी मला सुलभाताईंना आणि आय.पी.एच.ला प्रत्यक्ष भेट देऊन हे पहाता येणं शक्य नाही. पण तुमच्याकडून माहिती आणि/किंवा प्रश्नावली घेऊन, सुलभाताईंशी बोलून ते मांडण्याचं काम मी करू शकते. तेवढा वेळ माझ्याकडे जरूर आहे.

अशा प्रकारची माहिती, लेखन आंतरजालावर असावं अशी कल्पना सुचवून, वेळोवेळी पाठपुरावा करणार्‍या मनोबाचेही आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Smile (य)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला देखिल खुप छान वाटले. मानसिक आरोग्य अणि ते बिघडले तर त्या व्यक्तिची अणि कुटुम्बाची परवड होउ शकते. साधे सोपे उपाय आणि आपलेपणाने केलेले (डॉ व घरच्या लोकान्नी मिळुन) उपचारातले अनेक प्रकार वेळिच वापरुन अनेकदा खुप चान्गले परीणाम दिसतात. फक्त सातत्य पहिजे अणि सह्रिदय भाव. त्यामुळे अनेक चिवट (क्रॉनिक) मानसिक आजार नीट हाताळले जाउ शकतात. डॉ, ग्रस्त माणुस, नातेवाइक व समाज मिळुन "अनहोनी को होनी" करायला भाग पाडु शकतात. इथे सेल्फ हेल्प गट अणि स्वयम्सेवकान्चा मोठा वाटा आहे कारण प्रोफेशनल लोक सर्व काही करत बसले तर वेळ अणि स्किलचा अपव्यय होईल; कमी लोकान्ना त्यान्चा फायदा होईल. शिवाय आपल्या सर्वान्चे काही सामाजिक र्हुण असतेच ना! मानसिक आरोग्या/विकारा विषयी गैरसमजुती दुर केल्या पहिजेत.

मलाही आवडेल ह्याबद्दल चर्चा करायला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुरेख आहे मुलाखत. नेमकी आणि माहितीपूर्ण. वाचते आहे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मनापासुन धन्यवाद Smile
हे मराठीत लिहितन किती मस्त वाटतेय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही म्हणता ते खरेही असु शकेल. तसे सगळ्याच पेशात असे होताना दिसते. पण म्हणुन सरसकट विधान करावे का?
नैराश्याला अनेक कारणे असतात; पैकी फक्त १(ते सुद्धा मोस्ट कॉमन कारण नव्हे)ब१२ वीटामिन ची कमी.. अशी आणखी बरीच कारणे. प्रत्येकाची चिकीत्सा करुनच डॉ ठरवतात की काय योग्य ठरेल. जर इतर कारण असेल, अनि आपण ब१२ दिले अणि बरे नाही वाटले तरी पण कोणी असेच म्हणेल.. मग काय करावे?? दोन्हिकडुन बुक्क्यान्चा मार.
अनेकदा नवे शोध लागतात. त्याची परिणीती उपचार पध्दतीत लगेच सगळे करतीलच/करु शकतील असे नाही. तसे योग्य ही नाही. ऱोगी व नातेवाइक असेच आरोप करु शकतात म्हणुन; शिवाय ग्यान एक जैसा नही फैलता.
आपण थोडे त्र्ययस्थाच्या भुमिकेतुन पाहुया. जरा जे मानसोपचार घेउन बरे झाले आहेत, त्यान्चा उपहास नको करुया.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे मी चुकीच्या जागी टाइप केलेय. सॉरी. सवय नाही. Smile
मग बरोबर जागी कॉपी पेस्ट केलेय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुलभाताईंची मुलाखत आवडली. मानसिक आरोग्य हा महत्त्वाचा विषय इथे ऐसी च्या टीमचे नुसता चर्चाला न आणता त्याकरता योग्य माहिती आणि तज्ज्ञ व्यक्ती या दोन्ही गोष्टींची सांगड घातली. हे पाऊल उत्साहवर्धक आहे.
अभिनंदन आणि शुभेच्छा
सोनाली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका शब्दपेक्षा दोन बरे.

मालिका आणि प्रतिसादांतूनही माहिती मिळाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

जेव्हा आजार वाटेल असा काही मानसिक त्रास होत असतो तेव्हा भास होणं, इतरांवर संशय घेणं ही अशी लक्षणं दिसतात. त्याचा पॅटर्न बनतो. वेगळंच काहीतरी झालेलं असतं आणि पृष्ठभागावर ही लक्षणं दिसतात. जसं डोकेदुखी हे एक लक्षण आहे. डोकं दुखण्याची मूळ कारणं पंधराएक आहेत.

.
एक आस्तिक व गूढ गोष्टीवरच्या विश्वासाचा फेसग्रुप जॉइन केलेला होता. अनंत गोष्टी पटत नव्हत्या पण आपल्याला काय हवं तेवढच उचलून माझ्या वैयक्तिक ब्लॉगवर साठवत होते. पण उंटाच्या मदारीवरची शेवटची काडी पडुन, उंटाने बसकण मारायला पुढील पोस्ट घडली.

पोस्ट - काल आमच्या घरात सुगंध येत होता. कोणतीही उद/अगरबत्ती लावलेली नसताना.
प्रतिसाद १ - देवाची कृपा समजा ताई.
प्रतिसाद २ - होते भक्तीमार्गात हे अनुभव येतात्
प्रतिसाद ३ - चांगली खूण आहे.
.
.
.
अशा प्रकारचे अजुन १० प्रतिसाद्
.
तो ग्रूप सोडुन दिला. किती चूकीचे सल्ले बाप रे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमची लिहिण्याची हातोटी खूप छान आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विद्या द्यावी