काही शब्द, थोड्या रेषा: भारांचे काही मानसपुत्र (आणि कन्या)

काही शब्द, थोड्या रेषा: भारांचे काही मानसपुत्र (आणि कन्या)

- 'भारा'वलेले

फास्टर फेणे
-------

-------

तेराचौदा वर्षांचा मुलगा. सिंगल फसली म्हणतात तशी अंगयष्टी, तुडतुडीत हातपाय, काटकुळ्या तंगड्या, भोकरासारखे लुकलुकते डोळे. कितीही धावपळीत वा संकटात असला तरी एखादी भाषिक ’फुसकुली’ (अर्थात कोटी!) करायचा मोह याला आवरत नाही. चेहर्‍यावर ती मिश्किली हवीच. कधी कशाने चकित झाला तर त्याचे ते सुप्रसिद्ध ’टॉक्क्‌’. चौकडीचाच शर्ट - कसल्यातरी संकटात उडी घेतल्यानं बरेचदा घामानं पाठीला चिकटलेला. हातात गलोल. खिशात अधूनमधून एखादा खडा, बिल्ला, बोरे असला सटरफटर माल. एक टांग त्याच्या हडकुळ्या सायकलीवर टाकलेली. हा सहसा एकटा सापडायचा नाही. त्याची दोस्त सुभाष देसाई, चश्मिष्ट शरद शास्त्री, किंवा मामेबहीण माली... यांपैकी कुणीतरी त्याच्यासोबत असायचेच.

बैलगाडीपासून विमानापर्यंत, नेफापासून काश्मिरापर्यंत याच्या कारनाम्यांचे ठसे उमटलेले आहेत. याच्याबद्दल असं म्हणतात की तो संकटांना शोधत जात नाही, संकटंच याला शोधत येतात. देशाला धोक्यात घालणार्‍या दहशतवाद्यांपासून ते देवाला पोत्यात घालणार्‍या नकली भगतापर्यंत सगळ्या खलनायकांशी सामना फुरसुंगीच्या या काटकुळ्या हिरोने केला आहे. ना त्याला सुपरहिरोचं बलदंड शरीर मिळालंय, ना शास्त्रज्ञाची अफाट बुद्धिमत्ता, ना गुप्तहेराच्या सुविधा. त्याला मिळालीय वाईट काय - चांगलं काय ओळखायची सुबुद्धी, अन्यायाविरुद्ध आवाज उठवायची हिंमत आणि काटकुळ्या शरीरातलं काटकुळंच - पण हळवं - हृदय!

-------

माली

-------

-------

हीच ती फाफेची मामेबहीण. वय त्याच्याच एखाददोन वर्षे मागे. मुलगी अगदी फाफेची बहीण शोभावी अशी स्मार्ट आणि चपळ. तिची नजर फाफेवर आणि साहसात रसही त्याच्याइतकाच. सुरुवातीला ती फाफेला आवरायचा प्रयत्न करते. पण जसजसं रहस्य गहिरं होत जातं, साहस खुणावू लागतं तसतसे मालीचेही बाहू फुरफुरू लागतात आणि ती तनामनाने त्यात सामील होते!

माली उत्तम चित्रं काढते. त्यापायी एकदा एका पाकिस्तानी हेराने तिला पकडून कैदेतही टाकलं होतं. फाफेच्याच नादी लागून हिने एकदा चुकीच्या चिनी हेराला पकडून दिलं होतं! नंतर खरा हेर सापडला म्हणा! बन्याच्या झपाट्यापुढे माली क्वचित फिकी पडत असली तरी ती त्याच्या हो-ला-हो करणारी नाही. प्रसंगी त्यालाही झापायला ही तेज पोरगी कमी करायची नाही!

-------

सुभाष देसाई

हा फाफेचा दोस्त. फाफेसारखा किडकिडीत नव्हे, इंद्रूसारखा बाळसेदार. पण इंद्रूसारखा खुनशी नव्हे. गोंडस गुटगुटीत गंप्या. याचे बाबा मोठे उद्योगपती आहेत, पण पठ्ठ्याला त्याचा गर्वबिर्व नव्हे. इतरांसारखाच विद्याभवनच्या होस्टेलवर राहतो, रॅले सायकल मारतो, प्रसंगी कडमडतो धडपडतो.

हाही फाफेइतका फास्ट नसला, तरी त्याच्या बरोबरीनं साहसंही करत असतो. हां, आता साहसं कधीकधी अंगाशी येतात.

कोयनेच्या भूकंपाच्या आदल्या रात्री भाल्याच्या मोहात अडकलेल्या सुभाषला मौलीबाबाने किडनॅप केलं होतं. भूकंपाच्या आणि भुयाराच्या कृपेने सुटला. इंद्रूच्या हस्तकांकरवी बन्याबरोबर सुभाषही किडनॅप झाला होता. चालायचंच! फाफेची दोस्ती निभावायची म्हणजे असले प्रसंग येणारच! हा आपला गडी साधा-सरळ आहे, बावळट नव्हे.

-------

शरद शास्त्री

-------

-------

प्रत्येक वर्गात एकतरी ढापण्या पुस्तकपांडू स्कॉलर किडा असतोच. हो, कोयनेच्या भर भूकंपात, मध्यरात्री संस्कृत कोटेशन आणखी कोणाला आठवणार! बन्या, सुभाष इतका तुडतुडीत चपळ नसला तरी अगदीच घरबशा नव्हे, पण अनावश्यक धावपळ टाळण्याकडे याचा कल. म्हणजे सायकल ट्रिप काढायला हरकत नाही, पण मागे कॅरियरला एखादा जाडजूड ग्रंथ मात्र अडकवलेला. असाच एकदा त्याला वेड्यांच्या इस्पितळातून पळालेला वेडा भेटला, आणि शास्त्रीबुवांचाच ग्रंथ आटोपायची पाळी आली होती! असा हा शरद जितका हुशार, तितकाच हळवा. स्कॉलरशिप परीक्षेत नापास झाल्यावर त्याच्या वडिलांनी झापलं, आणि हा भाबडा चक्क आत्महत्या करायला निघाला होता! फास्टर फेणे होता म्हणून बरं...!

-------

इंद्रू इनामदार

पुण्याहून फुरसुंगीचा फाटा जिथे फुटतो, त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला हडपसर गाव आहे. त्या हडपसरच्या इनामदारांचे हे एकुलते एक लाडके - आणि म्हणूनच की काय - हुकलेले - चिरंजीव. विद्याभुवनातही वशिल्याने वर्णी लावू पाहणारे.

इंद्रूलाही स्वतःपलिकडे काहीही दिसत नाही. यालाही सायकल हाणायला आवडते, पण हार पचवायची खिलाडूवृत्ती नाही. सायकल शर्यतीत जिंकावं म्हणून एकदा याने बन्याला किडनॅप करायचा घाट घातला होता. मानापमानाच्या कल्पनेपायी बारागाड्यांची जत्रा उधळून द्यायचं कारस्थान रचलं होतं. आपला स्वार्थ साधला ना, आपलं मनोरंजन झालं ना, मग दुनिया गेली तेल लावत. जणू इंद्रू हाच विश्वाचा केंद्रबिंदू आणि बाकीच्यांचं अस्तित्व फक्त इंद्रूच्या सोयीसाठी!

हाही फाफेच्याच वयाचा, पण फाफेचा शत्रूच म्हणा ना. पण फाफेची चपळाई वा मिश्किली याच्यात औषधालाही नाही. याची अंगकाठीही फाफेच्या बरोबर विरुद्ध. पैलवानकीचा निसटता स्पर्श झाल्यासारखी गोटीबंद शरीरयष्टी. गुटगुटीत बाळसेदार चेहरा. डोळे बारीक, पण लुकलुकते. चेहर्‍यावरचे हावभाव मात्र खुनशी. हाही कधी एकटा दिसायचा नाही. पण याच्यासोबत असतात ते याचे जिगरदोस्त नसतात, ते असतात त्याचे पित्त्ये.

इंद्रूसारखेच लोक मोठे होऊन काळ्या काचांच्या स्कॉर्पियो उडवत फिरत असावेत.

-------

रॉबिन हुड

वयानं साधारण २२-२३ च्या अलीकडे पलीकडे असलेला इंग्लीश तरुण. हा गडी मूळचा सरदार घराण्यातला. पण पिढीजात वैरामध्ये वडील मारले गेले आणि याची सरदारकीही गेली. राजगादीकडूनही त्याला न्याय मिळालेला नाही. पण तो तसा हार मानणार्‍यातला नव्हे. अन्याय म्हणाल तर त्याला जर्रा सहन होत नाही. अंगात रग भारी. शरवुडच्या जंगलात दडून, दंड थोपटून त्यानं बंड पुकारलं आहे. शिडशिडीत पण काटक अंगकाठी. आव्हान स्वीकारायला आणि निशाण अचूक भेदायला कायम तयार असलेली तेजतर्रार नजर. मरियमकडे बघताना हीच नजर मृदू-मिश्किल होते.

धाकला जॉन, टक पुजारी, तांबडा विली अशा आपल्या टो़ळीतल्या सोबत्यांबरोबर असेल, तर रॉबिनचा मू़ळचाच रगेल स्वभाव अजूनच खुलतो. तसा रॉबिन अगदी दिलदार गडी, प्रसंगी अंगचे कपडेसुद्धा काढून देईल! पण तिरंदाजी ह्या विषयात त्याला जिवलग मित्राने जरी आव्हान दिलं तरी आपण वरचढ आहोत हे सिद्ध करायला तो जंग जंग पछाडील! रॉबिन आणि तिरंदाजी हे एक अद्वैतच.

अलीकडे टोळीचं पुढारीपण आल्यापासून साहेबांना थोऽडी ’ग’ची बाधा झालेली आहे म्हणा. पण मूळचा खेळकर स्वभाव खुलून दिसावा, इतपतच. अंगावर कायम हिरवेगार कपडे. त्याची ती फेमस लाल कुंची. पाठीवर अर्थात लाडका तीरकामठा. कमरेला शिंग. स्वारी खुशीत असताना लठ्ठंभारती बिशपबुवा किंवा कोतवालसाहेब भेटले, तर त्यांची कंबक्ती भरलीच म्हणून समजा..

-------

बिपिन बुकलवार

वय पंचविशीच्या आतबाहेर. हसरा, मिश्किल, चश्मिष्ट चेहरा. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे बेलबॉटम प्यांट घालतो. गिरगावातल्या फणसवाडीत भाड्याने राहतो, कॉलेजात शिकतो, महिन्याच्या महिन्याला बँक हापसून आणतो.

बिपिनदाच्या पैशाला वाटा अनेक. स्वारी सदैव रद्दीवाल्याकडच्या दुर्मीळ पुस्तकांत डोके घालून बसलेली तरी दिसेल, नाहीतर रद्दीवाल्याशी खेळकर घासाघिशी करून एखाद्या जुनाट पुस्तकाचा सौदा पटवण्यात तरी गर्क झालेली दिसेल. पोस्टाची तिकिटं, जुनीपुराणी दुर्मीळ पुस्तकं आणि एखाद्या खलाश्याच्या पोतडीत शोभतीलशा चित्रविचित्र चीजवस्तू यांत पठ्ठ्याला रस मोठा.

हा कधी एकटा भेटायचा नाही. सोबत मोना आणि विजू - वय वर्षं १२-१३ च्या आसपास - हे गोष्टीवेल्हाळ मित्र असणारच. त्यांना बिपिनभय्याकडून कायम गोष्टींचा रतीब हवा असतो. नि स्वत: बिपिनची तरी त्याला हरकत कुठे आहे!

तो आहे तसा वल्ली. पैज मारेल, आणि ती जिंकूनही दाखवेल. अठरा तासांत मुंबईला चक्कर मारायच्या भानगडीत ज्यूल व्हर्नने लिहिलेलं बिपिनचं लाडकं पुस्तक मात्र माशांनी खाल्लं. त्याचं दु:ख मोठं!

-------

शब्दचित्रे: आदूबाळ, अस्वल, मेघना भुस्कुटे, संवेद
रेखाचित्रे: अमुक

***
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

टारगटपणाबद्दल स्वारी, पण माली विक्षिप्तबैंसारखी दिसतेय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

माली उत्तम चित्रं काढते.

मेघनाताई, आख्खा अंक काढण्याएवढं भागवतांचं साहित्य तुम्ही वाचलं आहेत. आपली दोघींची ओळखही बऱ्यापैकी म्हणायचीत. तर मला चित्रं काढताना कधी बघितलं आहेत का! उगाच का माझी बदनामी करताय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ती तुझ्यासारखी चित्र काढते असं कुठे म्हणत्ये मी? ती तुझ्यासारखी 'दिसत्ये' असं म्हटलं. नीट वाचा की ओ बै!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वाहव्वा! ऐसीकरांनीच शब्दचित्रे आणि रेखाचित्रे चितारण्याची कल्पना आवडली!
अमुक यांची रेखाटने नेहमीप्रमाणे छान!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला फाफेचं हे रेखाचित्र सगळ्यांत जास्त आवडलं. त्याच्या डोळ्यांत तो मिश्कीलपणा अचूक आला आहे. हे चित्र घ्यायचं की संपादकीयात छापलेलं चित्र घ्यायचं, अशी रस्सीखेच होती. पण त्या फाफेमध्ये बाकीच्या गोष्टी असल्या (गलोलीतून खडा सुटायपूर्वीचा नेमका क्षण आणि लक्ष्यावर रोखलेला भोकरडोळा), तरी मिश्कीलपणा नाहीय. म्हणून मग 'ट्टॉक्' जिंकलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मला या पानावर तीनच चित्र दिसतायत. फाफे, माली आणि शरद. अजूनही आहेत का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

इथे छापलेलं चित्र घ्यायचं की या पानावर छापलेलं चित्र घ्यायचं, असा पेच होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तीनच आहेत. म्हणूनच शीर्षकात '..थोड्या रेषा..' आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile
ओके. मला वाटलं माझ्या इथे काही झोल आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

शरद शास्त्रीचं चित्र भारी आवडलं. अतिअभ्यासू मुलाचे नर्डी भाव मस्त जमले आहेत. मालीच्या चेहेऱ्यावर एक त्रासिकपणा दिसतो, जो मूळ व्यक्तिरेखेत अपेक्षित नसावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मालीचं चित्र विक्षिप्तबैंसारखं दिसतंय म्हटल्यावर एक खडूस त्रासिकपणा नको का? Wink

सिर्‍यसली: मालीला स्वतःहून साहसं खुणावत नाहीत सहसा. सुरुवातीला तरी ती 'सरळ मार्गानं जाणं बरं' या पंथात असते. पण बन्याच्या पाठोपाठ पाठलागात वा तत्सम साहसात उडी घेतल्यावाचून तिला राहवत नाहीच, खेरीज तिचा त्याला नाईलाजही असतो. त्यामुळे तिच्या चेहर्‍यावर थोडे 'अँक्शस' (मराठी प्रतिशब्द?), त्रासिक, घाईत असल्यासारखे भाव असतात, असं माझं मत. ती साधीसरळ, मिश्कील, गोडबीड कमी वेळा दिसते. किंबहुना तशी असताना आपल्याला दिसत नाहीच. शिवाय बन्याला झापायच्या तयारीत असलेली मुलगी थोडी तरी तिरकस-त्रासिक हवीच. एरवी तो तिला काय धूप घालतो! असंही.

अर्थात मतांतरं असू शकतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

राजेशशी सहमत.
ही माली तीक्ष्ण/फटकळ वाटण्यापेक्षा कावलेली/कंटाळलेली अधिक वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ती मूळच्या चित्रात इतकी त्रासिक नव्हती, मी तशी मागणी करून ती करून घेतलीय. माझी चूक. Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हे सगळं वाचल्यावर, "हं बरोबर आहे तुमचं" म्हणण्याशिवाय पर्याय नाही. त्रासिकपणाच्या मागणीबद्दल तुमचे अभिनंदन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.