काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ७ (२ फेब्रुवारी २०२०)

टॅक्सी ताब्यात घेऊन आज सरळ पार्ल्याला लायब्ररीत गेलो.

टिळकमंदिरची ही खूप जुनी आणि मस्त लायब्ररी.
पण आजकाल महिनो न महिने पुस्तक बदलायचं राहून जातं...
माझ्याकडून दंड घेऊन घेऊन शेवटी इकडच्या मुलींनाच माझी दया येते आणि त्याच परस्पर पुस्तकं एक्स्टेन्ड करतात.
(इकडे पाहिल्यापासून सगळं स्त्री राज्य आहे. ह्या लायब्ररीला "ऍमेझॉन" म्हटलं तर ते बऱ्याच अर्थानी चपखल बसेल Lol
...

पार्ला कॉलेजला असताना मी आणि मित्रवर्य सचिन भट दोघं रोज आपापली दोन पुस्तकं वाचून मग स्वॅप करून आणखी दोन वाचून दुसऱ्या दिवशी परत लायब्ररीत हजर व्हायचो...
आणि काउंटरवरच्या मुलीनी आ वासला की आसुरी आनंदाने टाळ्या द्यायचो ते आठवलं.
गेले ते दिन गेले...

पण आज किरण गुरवांचं "राखीव सावल्यांचा खेळ" घेतलं.
(क्लास कथा आहेत एकेक... "बलबीराचे पाश" मला सगळ्यात आवडली.)

पार्ल्यावरून एक डायरेक्ट आर्थर रोडचं भाडं मिळालं.
(लांबच भाडं मिळाल्याने मी खुश!)
पॅसेंजर बहुतेक भायखळ्याच्या फुले मंडईतला फळांचा किंवा भाज्यांचा ट्रेडर असावा.
छान दिलखुलास माणूस होता.
गावी नुकतंच छोटंसं घर बांधलं होतं त्यामुळे खूप खुश होता.
मित्राला फोनवर सांगत होता, अरे बाल्या मस्त गावच्या घरी गच्चीव खाट टाकून लोळायचं आणि दोन पोरी द्राक्ष भरवायला...
आम्हा पुरुषांच्या फॅंटसीज तशाही शतकानुशतकं त्याच आहेत Smile

मग जे. जे. फ्लायओव्हरजवळ एक स्मोकर उचलला.
शिस्तीत सिगरेट विझवून तो तंद्रीत टॅक्सीत बसला.
म्हणजे असं मला ग्लोरिफाय नाय करायचंय पण काही काही हेव्ही स्मोकर माणसं जाम सेक्सी वाटतात मला...
त्यांच्या काळसर ओठांसकट.
हाही असाच खूप ऑर्डीनरी असूनही हँडसम होता.
मला उगीचच नवाजुद्दीनची आठवण झाली...
तो तर सरळ सरळच हँडसम आहे पण त्याच्या अंगाला कायम सिगरेटचा वास येत असणार असं मला का कोण जाणे वाटत राहतं...
त्यातून बाबा आठवले, त्यांच्या अंगाला विल्स सिगरेट + मुंबई लोकल्सचा घाम + ओल्ड स्पाईसचं मस्क फ्लेवरचं आफ्टरशेव्ह असा तिपेडी वास यायचा.
मी त्यांच्या तुंदील पोटात तो वास घेत घेत खोल घुसत जायचो.
आजचा दिवस पुरुषांच्या नावे आहे बहुतेक...

तिकडून एक कोवळं मुस्लिम कपल उचललं त्यांना 'गुलशन ए इराण' ला जायचं होतं.
इट सीम्स हे हॉटेल भेंडीबाजार / पायधुणी / महम्मद अली रोडच्या लोकल क्राउड मध्ये बरंच पॉप्युलर आहे.
ट्राय करायला हवं एकदा... नेहमीचं 'शालीमार' थोडं मेन-स्ट्रीम झालंय आताशी.

...

...

...

बाकी मग काळा घोडा फेस्टिव्हल चालू असल्याने तिकडून बरीच भाडी मारली.
तिकडून एका तरूण पारशी कपल आणि त्यांच्या बाबूला कुलाबा कॉजवेला सोडलं.

आज अचानक लक्षात आलं असावं तिच्या...
नवऱ्याला म्हणाली, "दस्तूर आ बध्धा टॅक्सीजना रूफ्स बहु अमेझिंग ??? हॅव यु एव्हर नोटीस्ड डिअर?"
आयला हो खरंच टॅक्सीजच्या रूफ कव्हर्सची हटकून इंटरेस्टींग पॅटर्न्स असतात.
उदाहरणार्थ हे माझ्या टॅक्सीचं रूफ:

roof

कुलाब्याला आलो की इलेक्ट्रिक हाऊस वरून लेफ्ट मारून कूपरेज जवळच्या रस्त्यावर जायचं हे मला आता नीटच कळालेलं .
तिकडे गाडी लावून थोडा मायक्रो ब्रेक घ्यायचा पाणी बिणी प्यायचं... वहीत अशा नोंदी करायच्या...
पुढेच सुलभ असल्याने हलकंही होता येतं.
तेवढ्यात एक शिडशिडीत छान मुलगी बसली तिला चर्चगेटला सोडायचं होतं...
ह्यावेळेस मागच्या रविवारी खाल्लेल्या चटपटीत मुलीच्या शिव्या स्मरून मी न चुकता तो जुगाडू U टर्न परफेक्ट मारला.

तिकडून एका मुलीला ताजच्या पाठच्या गेटवर सोडायचं होतं.
आता ताजच्या पाठच्या गल्लीत पण हे SSS खोदून ठेवलेलं त्याच्या राईट किंवा लेफ्ट दोन्ही कडून एकच गाडी जाईल एव्हढी फकॉल जागा मला वाटलं खड्ड्यांच्या पुढे दोन्ही रस्ते एकमेकांना भेटतील म्हणून मी मनात टॉस करून गाडी राईटला घातली आणि च्यायची पुढे रस्ता बंद.
झक मारत पुन्हा गाडी बाहेर आणून - पुन्हा कुलाबा कॉजवेवर आणून पुन्हा - रिगलचा U मारून गाडी कशीबशी ताजच्या ढुंगणाला लावली.
अस्सल मुंबईकर मॅडमचा डोळ्यांतला संताप अर्थातच माझी पाठ भाजून काढत होता.
शिवाय तिची हॉटलेची शिफ्ट असणार आणि आधीच उशीर झाला असावा बहुतेक तिला.
परत सॉरी सॉरी बोलून ४६ चे ३० च घेतले.

आज जहांगीरजवळच्या रस्त्यावर काळा घोडा फेस्टिव्हलची उत्फुल्ल गडबड होती.
आयुष्यभर मुंबईत राहून फेस्टिव्हलला जायचा योग आला नव्हता... आज जाऊयाच बोल्लो माँ की आग!
हुतात्मा चौकातल्या रिंगणातल्या पार्कींग लॉट मध्ये टॅक्सी बरोब्बर एका तासासाठी पार्क केली.
हे सेंटर पीसचं इन्स्टॉलेशन आवडलं

Horse

आणि हा आमच्या मुंबईच्या एरियल फोटोग्राफी प्रदर्शनातला हा आमच्या गव्हर्नमेंट कॉलनीचा फोटो:

Colony

(मार्क केलेला आमचा चौक)
गर्द झाडांमधल्या ह्या सुबक कॉलनीत वाढतानाच्या असंख्य कडू-गोड आठवणी आहेत...
स्वतःच्या आणि खास दोस्तांच्या जीवावरच्या मारामाऱ्या / प्रेमप्रकरणं / ब्रेकअप्स / एकसंध जोडलेल्या गच्चीतले घामेजलेले मेकाऊट्स / गणपती / दिवाळ्या / होळ्या / हंड्या / मॅचेस / पार्ट्या आणि काय काय आठवून पोटात तूटलं...
आमचा चौकही तूटलाय आता...
कालाय तस्मै वगैरे...

एक तास संपायला आला होता...
काळा घोड्याच्या चेतना हॉटेलचं पण बरंच नाव बरीच वर्षं ऐकून होतो.
फटाफट थाळी खाल्ली... ठीक वाटली... नॉट ग्रेट आणि चिकार महाग, जिलबी मात्र छान.

टॅक्सी लॉटमधून काढायला गेलो तर पार्किंगमधला इसम १०० रुपये मागायला लागला.
ह्या टेबलनुसार टॅक्सीचा रेट ३५ रुपये आहे.

हुज्जत घातल्यावर तो बोर्ड वेगळ्या पार्कींगचा आहे वगैरे काहीही वेडा बनवायला लागला.
अरे साक्षात पार्किंगच्या रिंगणात असलेला बोर्ड दुसऱ्या पार्किंगचा कसा असेल?
शेवटी ७० रुपये घेतले.
माझ्या गाडीचं प्रायव्हेट पार्किंग समजलं तर सत्तर रुपये ठीक आहेत
पण टॅक्सीचे खरे ३५ च हवेत.
इन जनरल ते माणूस बघून बिल फाडतायत.
आजूबाजूच्या दोन तीन लोकांना विचारलं असता सर्रास त्यांच्याकडून तासाभरासाठी १०० / दोन तासांसाठी २०० रुपये घेत असल्याचं कळलं.
ह्या लूटमारीचा कडाडून निषेध!

बाकी मग फेस्टिव्हलला उत्साही लोकांची गर्दी असल्याने कुलाबा-काळाघोडा-चर्चगेट अशी भाडी मारत राह्यलो.
चार विरारवाल्यांना चर्चगेटला सोडलं आणि जडावून झोप आली एकदम.
जिलब्या बहुतेक अंगावर आल्या Smile

चर्चगेट स्टेशनच्या (विरारकडे तोंड केल्यास) उजवीकडे काही शांत गल्ल्या आहेत एस एन दि डी टी कॉलेजच्या आसपास.
ही पण एक आम्हा टॅक्सीवाल्यांच्या विश्रांतीची आवडती जागा.
इकडे टॅक्सी लावून वीस मिनटं डोळे मिटले...

तेवढ्यात थाड्कन टॅक्सीवर आपटलं काहीतरी...
तीनचार पोरं फुटबॉल घेऊन चालली होती...
मी थोडी खुन्नस दिली...
"अंकल मै नही इसने मारा", त्यांनी एकमेकांवर बिल फाडलं.

आम्ही पण कॉलनीत असेच अत्रंगी होतो त्याची आठवण येऊन हसू यायला लागलं.
झोप तशीही उडाली होती एक कडक चहा मारला आणि परत भाडी मारायला लागलो.

आजची कमाई: ६५० रुपये

क्रमश:
आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ मे आणि २९ मे २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १५ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २२ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट माईलस्टोन: २० जुलै २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० जुलै ते डिसेंबर पहिला आठवडा २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १ (८ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २ (१५ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ३ (२२ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ४ (२९ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ५ (१९ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ६ (२६ जानेवारी २०२०)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)