IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ३)

(भाग १)

लोहियांनी म्हटलं आहे, ‘सुंदर बाई’ ही पुनरुक्ती आहे. तेवढं टोकाला नाही गेलं, तरी वयात येणारी प्रत्येक मुलगी सुंदर, आकर्षक दिसते, यात शंका नाही. त्यामुळे मुलीच्या वयात येण्यावर असलेल्या चित्रपटात ‘ती गोड दिसते,’ हा शेरा गैरलागू होय.

मागच्या वेळचं शेवटचं निरीक्षण: मुख्य भूमिकेत पुरुष असलेल्या बहुतेक चित्रपटांमध्ये बायका पुरुषांसाठी भोज्ज्यापुरत्या असतात, या अंगाने विचार केला पाहिजे. तर, ते तत्त्वत: बरोबर वाटलं तरी तसं नाही. कारण हे जग पुरुषप्रधान व्यवस्था पाळतं. चूक असो वा बरोबर, वस्तुस्थिती तशी आहे. वेगळ्या शब्दांत मांडायचं, तर जगात ‘कारक’ भूमिका पुरुष बजावत आहे आहेत. आता बदल होऊ लागला आहे, हे खरं; पण अजून मूल्यव्यवस्था, मानसिकता नीटशी बदललेली नाही. तेव्हा सर्वसाधारण कथानकात पुरुष मुख्य पात्राच्या भूमिकेत असताना बायकांना भोज्ज्यापुरतं स्थान दिलं, तर ते ‘नॉर्मल’ आहे. पुन्हा चूक-बरोबर हा वेगळा मुद्दा; ते तसं आहे.

LAS NIÑAS Pilar Palomero

स्कूल गर्ल्स हा आणखी एक चित्रपट वयात येणाऱ्या मुलीला केंद्रस्थानी ठेवणारा. पण ही मुलगी (सेलिया) नुसती ‘एक वयात येणारी मुलगी’ नाही. ती चर्चने चालवलेल्या मुलींच्या शाळेत जाते. तिची आई कडक शिस्तीची आहे. सेलिया आज्ञाधारक आहे. आपल्याला बाप नाही आणि या गोष्टीमुळे इतर मुली आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघतात, हे तिला माहीत आहे. यामुळे आणि आर्थिक परिस्थितीमुळे सेलिया एक अबोल मुलगी झाली आहे. चित्रपट चालू होतो तो एका वेगळ्याच फ्रेममध्ये. सेलिया आणि तिचा वर्ग कॉयरमध्ये गात आहेत. पण कोणाच्याच तोंडून आवाज येत नाही. मग सूचना ऐकू येते : तोंड आणखी उघडा, आणखी हलवा! अजून मुलींचा आवाज नाहीच. शेवटी पुन्हा सूचना येते, हं, आता गा; तू, तू आणि तू सोडून. तुम्ही नुसतं तोंड हलवायचं. पण असं हलवायचं की गाताय, असं वाटलं पाहिजे. या न गाता तोंड हलवणाऱ्या मुलींच्यात एक सेलिया. बिचारी. घुसमट होणारी. मनातलं मनात कोंडणारी.

मग एक नवीन मुलगी येते आणि सेलियाची मैत्रीण बनते. तिलासुद्धा बाप नसतो; पण ती बंडखोर असते. तिच्यामुळे सेलियाला तारुण्याच्या उंबरठ्यावरच्या जगाची ओळख होते. मेकप, सिगारेट, दारू, नाइट क्लब, मुलांशी सलगी, अशा गोष्टी. शाळेत कळतं, त्यामुळे आईला कळतं आणि सेलियाला आईकडून ओरडा खावा लागतो. ‘तुला मोठं होऊन माझ्यासारखं व्हायचं आहे का? नाही ना? मग शीक. अभ्यास कर. इकडे तिकडे लक्ष देऊ नकोस!’ अगदी परिचयाचं!

पण वेगळ्या जगाची आणि स्वतंत्र विचार करण्याची तोंडओळख झालेली सेलिया आईला पूर्वीप्रमाणे ‘शरण जात’ नाही. अवघड प्रश्न करते. ‘मला वडील नाहीत म्हणून मुली तुला वेश्या म्हणतात,’ असं आईला ऐकवते. मग आईला एक पत्र येतं. तिचे वडील, सेलियाचे आजोबा मृत्यू पावलेले असतात. आई एकट्याने जायची तयारी करते. सेलिया हट्टाने सोबत जाते. त्या आजोळच्या भेटीत सेलियाला काही गोष्टी उलगडतात. मायलेकींची मनं मोकळी होतात आणि शेवटी पुन्हा कॉयरमध्ये गाताना सेलिया नुसतं तोंड उघडत नाही, खरोखर गाते. तिच्या घशातून आवाज बाहेर येतो.

या कथेत काहीही नावीन्य नाही. नन्सच्या शाळेतलं दडपणमय वातावरण, तरीही जमेल तशा खोड्या करणाऱ्या मुली, ‘मोठं’ होण्याची प्रोसेस; एकदा ‘एका दडपलेल्या मुलीला वयाने, समजेने मोठं व्हावं लागतं,’ ही थीम ठरवली की तपशील किमान इतके तर येणारच. त्यामुळे कथा कशी सांगितली आहे याला जास्त महत्त्व येतं. ते नीट केलं आहे. पण तिथेही काही खास चमकदार आहे, असं नाही. तरीपण आपल्याकडच्या सांगण्यापेक्षा तिथला वेगळेपणा उठून दिसतो. भावतो. ‘तुझे वडील अचानक गेले. कसे? अचानक. म्हणजे हार्ट अटॅक येऊन.’ असं आई म्हणालेली असते. माहेरी पोचल्यावर स्वत;च्या घराचं दार ठोठावण्याअगोदर ती आई बोटातली अंगठी काढून पर्समध्ये ठेवते. ती माहेरचं आडनावच लावत असते! यावर कुठे रेंगाळणं नाही, कुठे अधोरेखित करणं नाही! आपण काय ते समजून घ्यायचं. सेलिया घेते. पण पुन्हा इथे स्पॅनिश, म्हणजे युरोपातली पुराणमतवादी संस्कृती असली; तरी भारतासारखी दांभिक संस्कृती नाही. सेलियाच्या मनात आईविषयी दुरावा निर्माण होत नाही!

स्कूल गर्ल्सचं लेखन दिग्दर्शन बाईचं आहे. या चित्रपटातदेखील पुरुषपात्रं उगीच नावाला आहेत. पण ‘जोआना’प्रमाणे सारं जग बायकांचं आहे, अशी भावना होत नाही! याला अर्थात ढळढळीत कारणं आहेत. द फर्स्ट डेथ ऑफ जोआनामध्ये नुसतं वयात येणं नाही. लैंगिकतेची ओळख दोन्हीकडे आहे. स्कूल गर्ल्समध्ये ती सांकेतिक मार्गामधून होताना दिसते. जोआनात ही प्रोसेस तरल आहे. आत्ममग्न आहे. लैंगिकतेबरोबर स्वत:ची, लैंगिकता कशी सगळ्यांच्या शरिराला व्यापून असते, ही जाणीव आहे.

वयात येणाऱ्या मुलीवरचा तिसरा चित्रपट ‘बाहेरून’ पहाता अगदी वेगळा होता. चित्रपटाचं नाव स्प्रिंग ब्लॉसम. सुझन लिंडन हिने ही कथा वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिली आणि विसाव्या वर्षी या चित्रपटाचं दिग्दर्शन करताना त्यात सुझन ही प्रमुख भूमिकासुद्धा केली! ही कहाणी वयात येण्याची नाही; त्या वयात एखादीला कसं ‘वेगळं’, एकटं वाटू शकतं, यावरची आहे. हिला तिच्या वयाची मुलंमुली बोअर होतात! हो, असं असू शकतं. पण चित्रपट हे विधान तेवढं करतो. बोअर होण्याच्या आत फार शिरत नाही. मात्र, सुझन बोअर होते आहे, हे आपल्याला जाणवताना ती स्नॉबिश होत नाही. खरोखर माफक बोअर झालेली दिसते. मग तिच्या शाळेच्या रस्त्यावर असलेल्या एका नाट्यगृहाबाहेर एक नट तिला दिसतो. दाढीवाला, देखणा, स्वत:त मग्न भासणारा, जगाकडे फारसं लक्ष नसणारा. ती त्याला रोज बघू लागते. मग त्यांची ओळख होते. जवळीक होते. दोघांना संगीत आवडत असतं, दोघे वाचन करणारे असतात. ती त्याच्या तालमी बघायला जाते. दोघे एकत्र आइस्क्रीम खातात, सरबत पितात, वगैरे. नाही, पुढे काही खळबळजनक होत नाही! आकर्षण वाढतं, वाढतं आणि दोघांना आपापलं भान येतं. बस्स.

Seize Printemps - Suzanne Lindon

यात सुझनचं घर, तिचे आईवडील यांचं चित्रण नीट आहे. विशेषत: सुझन आणि तिचा बाप यांचं नातं कसं मोकळं आहे, हे त्यांच्या देहबोलीतून दिसून येतं. ‘तो’ दुरून आवडत असताना ती बापाला विचारते, तुम्हाला एखादी मुलगी कशी बघायला आवडेल? ड्रेसात की ट्राउझर्समध्ये? बाप प्रामाणिकपणे उत्तर देतो, ‘ड्रेसात. कारण त्यात तिचं शरीर जास्त दिसेल!’ ताबडतोब ती तिच्या नटापुढे गुडघ्याच्या बराच वर जाणाऱ्या ड्रेसात मिरवू लागते. सुझन भरपूर उंच, टंगाळी आहे. ती लचकत मुरडत चालत नाही. रस्त्याने ‘डोळे मोडीत’ चालत नाही. तो नटसुद्धा संकोची, लाजाळू असा आहे. वयाने वीसेक वर्षांनी लहान मुलगी जवळ येऊ लागल्यावर तो अवघडतो. ‘काय शिकार साधली!’ असं त्याला बिलकुल होत नाही. अर्थात सुझन ‘अल्लड’ नसतेच. धीटपणे पुढाकार घेत असली, तरी स्वत:च्या कृतीची जबाबदारी घेणारी असते. तिच्या कुटुंबियांमुळे, घरच्या वातावरणामुळे हे असं असावं, असं आपोआप वाटणं, हे दिग्दर्शनाचं यश मानावं का?

काही बारीक बारीक गोष्टी मला खटकल्या. उदाहरणार्थ, ते पॅरिसच्या टिपिकल फूटपाथवर टेबलं असणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये (फ्रेंच चित्रपटावर लिहिताना रेस्त्राँ लिहावंसं वाटतं! रेस्टॉरंट हा शब्द इंग्रजीपेक्षा मराठी वाटू लागतो. खडबडीत होतो!) बसले असताना ज्या ऑर्डरी देतात, त्या डिलिव्हर कधी होतात, कशा होतात, यात जाणाऱ्या वेळाकडे लक्ष दिलेलं नाही, असं वाटलं. ‘मला संगीत आवडतं’ हे भोंगळ विधान आहे. संगीत खरोखर आवडणारे दोघे ताबडतोब आवडत्या, नावडत्या, जास्त-कमी पसंतीच्या संगीताबद्दल बोलू लागतात. नुसतेच एकमेकांशी सहमत होत नाहीत. तेच वाचनाबद्दल. गोष्टी बारीक आहेत; पण त्यामुळे पात्रं उथळ नाही, तरी पोकळ वाटू लागतात.

पण नेटवर वाचलेल्या एका रिव्ह्यूमध्ये वेगळा दृष्टिकोन आहे. तो नट ज्या भूमिकेसाठी तालमी करत असतो, ती तरुण मुलग्याच्या प्रेमात पडणाऱ्या वयस्क ग्रीक गॉडची असते. तिच्या हातातलं पुस्तक साक्ष देतं की तिला पुरुष ‘पटलेल्या’ मुलीशी कसे लबाडीने वागतात, याची तिला जाणीव आहे. आणि शेवटी दोघांचा शारीरिक रोमान्स न दाखवून मळलेल्या चाकोरीवरून जाणं दिग्दर्शक सुझनने शिताफीने टाळलं आहे!
मुद्दा माझं बरोबर की त्या रिव्ह्यू करणाऱ्याचं हा नाही. दिग्दर्शक सुझन प्रख्यात आणि यशस्वी फ्रेंच कलाकारांचं अपत्य आहे, हे त्या रिव्ह्यू करणाऱ्याला माहीत आहे आणि त्यामुळे त्याच्या बघण्यावर निश्चित प्रभाव पडलेला आहे. दुसरं म्हणजे ग्रीक मायथॉलॉजी, फ्रेंच साहित्य यांचीही त्याला चांगली माहिती आहे. त्यामुळे दिग्दर्शकाचा सूचकपणा त्याने नीट टिपला आहे. (पण राज कपूर या दिग्दर्शकाने १९७० साली जेव्हा ‘मेरा नाम जोकर’मध्ये एका विमान प्रवासात पद्मिनीच्या हातात ‘टाइम’, राज कपूरच्या हातात ‘लाइफ’ आणि राजेंद्र कुमारच्या हातात ‘फॉर्च्यून’ ही नियतकालिकं दाखवली, तेव्हा त्याला ढोबळ ठरवू नये!) याच्या पुढे जाऊन मला असंही वाटतं, की एकूण फ्रेंच संस्कृती आणि रीतीरिवाज माहीत असलेल्याला यातले सगळेच तपशील जास्त स्पष्ट, जास्त आशयघन दिसले असणार. माझ्या भारतीय-मराठी नजरेला न जाणवलेलं असं आणखीही काही असणार. ज्याचा उल्लेखही करण्याची गरज त्या रिव्ह्यूअरला वाटली नाही! आणि मुद्दा नुसता तपशिलांचा नाही. चित्रपटासारख्या ‘मास मीडिया’चं एक ग्रामर विकसित होतं. उदाहरणार्थ, हिंदी चित्रपटातली गाणी. त्यांचं तिथे काम काय, हे तुम्हाला आम्हाला अगदीच नीट माहीत आहे. मला तर हिंदी चित्रपटातली गाणी अजिबात खटकत नाहीत. काहींना हे अंग जास्त चांगलं वापरता येतं, हे मात्र खरं. पण बाहेरचा कुणी नव्याने हिंदी चित्रपट बघताना बावरून जाण्याची मोठी शक्यता आहे. आणि हिंदी चित्रपटातली गाणी सवयीची झालेल्यांना माझं आव्हान आहे की त्या गाण्यांचं नेमकं काम काय, हे उकलून दाखवावं.
असो. फेस्टिवलचं अपील असं निरंतर असतं. सतत नवीन काही सापडतं. कधी कलेतलं, कधी संस्कृतीतलं, कधी स्वत:तलंच.

थोडं परिशिष्ट. आजच्या लोकसत्तामध्ये एका डच कादंबरीचा परिचय आहे. तो वाचावा. हॉलंडमध्ये घडणाऱ्या हिडन इन द स्पॉटलाइट या चित्रपटावर लिहिताना मी काही आक्षेप घेतले होते, त्यांचा संदर्भ आठवतो.

(क्रमशः)

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet