IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग ४)

(भाग १)

पुढचा ‘बायकांचा’ चित्रपट, वाइल्डफायर. हा नॉर्दर्न आयर्लंडमध्ये घडतो. ‘नॉर्दर्न आयर्लंड’ जरी आयर्लंडच्या उत्तरेला असलं, तरी त्यापलीकडे त्याला ओळख आहे. ब्रिटन आणि आयर्लंड ही दोन स्वतंत्र राष्ट्रं आहेत. आयर्लंड हे ब्रिटनच्या शेजारी असलेलं बेट आहे. पण त्या बेटाचा उत्तरेकडचा भाग आयर्लंड या देशाचा नाही, तर ब्रिटन या देशाचा भाग आहे. तिथल्या तणावात कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट हा भेद काम करत होताच; आता आणखी एक वाढला: ब्रिटन जरी युरोपियन संघातून बाहेर पडलं (ब्रेक्झिट) तरी आयर्लंड नाही. मोठी गोची अशी की आयर्लंडमधून उत्तर आयर्लंडमध्ये प्रवेश मुक्त होता. आणि उत्तर आयर्लंड ब्रिटनचा भाग असल्यामुळे तिथून इंग्लंडात वा ब्रिटनच्या अन्य भागात येण्याला काहीच अटकाव नव्हता. याचा अर्थ असा की युरोपमधल्या कोणत्याही देशातून आयर्लंडच्या रस्त्याने ब्रिटनमध्ये शिरणं सहज शक्य आहे. याला असलेला विरोध, हे ब्रेक्झिटमागचं सर्वात मोठं कारण होतं! मग ब्रेक्झिटमुळे काय फरक पडला? असा गोंधळ झाला आहे. थोडं मागचं सांगायचं तर ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी उत्तर आयर्लंडमध्ये कित्येक वर्षं तुंबळ हिंसक चळवळ चालली. किंबहुना आयरिश रिपब्लिकन आर्मी ही जगातली फुटून निघण्यासाठी काम करणारी पहिली दहशतवादी गुप्त संघटना असावी!

Wildfire Cathy Brady

या चित्रपटात या हिंसक पार्श्वभूमीचा उल्लेख येतो. सुरुवात तर अशी होते की जणू यातूनच चित्रपटाची कहाणी पुढे सरकत जाणार आहे. कारण एक सैरभैर दिसणारी तरुण मुलगी कस्टममधून बाहेर पडताना दिसते. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड टेन्शन. भणंग दिसते. चोरट्या वाटाव्यात अशा हालचाली करते. रात्रीच्या वेळी एका गावाजवळ पोचते. गावात न शिरता बाहेर थबकते. तिथे एक लांडगा येतो आणि ती एकदम पळत सुटते. निर्मनुष्य रस्त्यावरून वेगाने पळत एका घरापाशी येते आणि दार वाजवते. वातावरण गूढ.

यातून वातावरण निर्मिती जरूर होते; पण ती फसवी असते. कसं आहे, चित्रपटाच्या प्रकृतीशी सुसंगत असं वातावरण कॅमेऱ्याने, संगीताने, अगदी लोकेशन्सच्या दर्शनाने घडवावं, हे खरं; पण असं वातावरण हे मूड निर्माण करत आहे, ते घटना सांगत नाही, हेसुद्धा स्पष्ट व्हायला हवं. ठीक, तेदेखील समजा नाही झालं, प्रेक्षकाची दिशाभूल ठरवूनच करायची असली, तरी हरकत नाही; पण मग त्या दिशाभूल करण्याला आशयात स्थान हवं. नुसतंच गूढ, तणावपूर्ण वातावरण घडवायचं आणि नंतरच्या कथानकात त्या वातावरणनिर्मितीतल्या तपशिलांचा काही सहभागच नसावा, हे काही खरं नाही.

अर्थात हे माझं आकलन. शक्य आहे, की काही सांस्कृतिक, सामाजिक बारकावे मला जाणवले नसतील. पण चित्रपट जसजसा पुढे सरकत गेला, तसा त्याचा विषय आणि कथेला पुढे ढकत नेणारा धागा, अधिकाधिक स्पष्ट होत गेला आणि माझं मत घट्ट होत गेलं.

एक तरुण मुलगी मोठ्या काळानंतर घरी, म्हणजे स्वत:च्या गावी परत येते. (ती कुठे, का गेलेली असते आणि परत येण्याचं तात्कालिक कारण काय, हे मला समजलं नाही.) तिची बहीण तिथे लग्न करून रहात असते. तिथल्या कारखान्यात काम करत असते. परागंदा बहीण परतल्यामुळे दोघींच्यात जरी (मागचं) टेन्शन पुन्हा जिवंत झालं, तरी दोन बहिणींमधली रक्ताची ओढसुद्धा जागी होतेच. दोघी अतिशय मनस्वी असतात, बेदरकार असतात, रागीटदेखील असतात. त्यांच्या आईने आत्महत्या केलेली असते आणि या घटनेने दोघींना पछाडलेलं असतं. त्याची आठवण कशामुळे जागी झाली, कोणी करून दिली की दोघींचा तोल जातो आणि अनवस्था प्रसंग ओढवतो.

तर असं होत जातं आणि शेवटी खरंच दोघींचं तारतम्य हरवून दोघी सामाजिक स्थैर्य, सारासारविवेक झुगारून देतात.

साऱ्या कथानकात दोघींच्या वडिलांचा उल्लेख जेमतेम येतो. पण आईच्या अनैसर्गिक मृत्यूने त्या जेवढ्या पछाडलेल्या दिसतात, त्या मानाने वडिलांबद्दल विचार करताना दिसत नाहीत. काही वेळा योगायोग, काही वेळा अंगावर प्रसंग आढवून घेतल्याने, तर काही वेळा इतरांच्या असंवेदनीलतेमुळे या दोघींवर झगडा करण्याची वेळ येते आणि तशी वेळ आल्यावर त्या मागे हटत नाहीत. गोष्टीपासून दूर होऊन विचार केला, तर त्यांचं वर्तन पटत नाही. पण चित्रपट त्यांची बाजू घेतो. आणि झटपट कट होणारे फ्लॅशेस, मनाची अस्थिरता व्यक्त करणारा कॅमेरा आणि अनुरूप संगीत, यांच्यामुळे ‘जीवनातल्या दुर्दैवी घटनांमुळे अतिसंवेदनशील झालेल्या दोन बहिणी विरुद्ध समाज,’ असा संघर्ष उभा करण्यात चित्रपट यशस्वी होतो. या संघर्षात सामोपचाराची भूमिका घेऊ पहाणाऱ्या एकीच्या नवऱ्याची कुचंबणासुद्धा स्पष्ट होते. बहिणींची कामं करणाऱ्या दोघी भूमिकेत पूर्ण समरस झाल्या आहेत. त्यांच्यातली रग, त्यांचा तापटपणा, नवऱ्यासकट साऱ्या जगाला दूर लोटू शकणारा त्यांच्यातला घट्ट बाँड अशा साऱ्या गोष्टी अंगावर येतात. त्यांच्या मनावरचं भूतकाळाचं ओझं - जे एका बहिणीने मागे टाकून पुढे जगत जाण्याचा प्रयत्न केलेला असतो – ‘दिसतं’. दोघी पक्की चावी देऊन ऊर्जा कोंडलेल्या स्प्रिंगसारख्या सदा स्फोटाच्या तयारीत असल्यासारख्या भासतात!

म्हणजे, एका बाईने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाच्या कथेचा आशय जरी विचारांती खटकला, तरी चित्रपट पहात असताना त्याच्याशी समरस होण्याला इलाज रहात नाही!

ला वेरोनिका जवळ जवळ संपूर्ण चित्रपट वेरोनिका झालेली नटी थेट कॅमेऱ्याकडे बघत बसून मुलाखतीतल्या प्रश्नांची उत्तरं देते. कॅमेरा स्थिर असतो. प्रश्न विचारणारा दिसत नाही. वेरोनिका थेट कॅमेऱ्याकडे बघतच बोलते. संपूर्ण चित्रपटभर हे असं चालू रहातं. यातून प्रतीत असं होतं की आख्खं जग आपल्याकडे टक लावून बघत असण्याला गृहीत धरणारी, जगाचं आणि आपलं नातं हे असंच असल्याचं मानणारी ही वेरोनिका उत्तरं देतानासुद्धा या नात्याला सुसंगत अशीच उत्तरं देते. वेरोनिका नटी आहे, मॉडेल आहे. आपल्या दिसण्यात जगाला रस आहे आणि आपलं दिसणं, नुसतं असणं, हाच आपल्यातला नातेसंबंध आहे, हे तिच्या दृष्टीने वैश्विक सत्य आहे.

La Veronica Leonardo Medel

चित्रपट बघताना प्रेक्षक वाट पहात रहातो, या मुलाखतीच्या फॉरमॅटने वेरोनिका या प्रमुख व्यक्तिरेखेची कल्पना दिली; आता केव्हा तरी चित्रपट सुरू होईल, काही तरी घडू लागेल. तसं होत नाही. हळू हळू लक्षात येतं की ही समोरची बाई स्वत:च्या प्रतिमेबाहेरच्या अस्तित्वाला पूर्ण विसरली आहे. इतकी, की नवरा, आई, या नात्यांना ती किंमत देत नाहीच; पोटच्या मुलीलादेखील मोजत नाही. तिला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये एक प्रश्नमालिका मुलीच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची आहे. त्याचे प्रश्न अर्थातच वेगळे आहेत. तिच्या रूपाच्या, आकर्षणाच्या पलीकडे जाणारे आहेत. मृत्यूला तिचं दुर्लक्ष किती कारणीभूत आहे, याचा शोध घेणारे आहेत. पण वेरोनिकाची उत्तरं तशीच आहेत! तिला काही फरक पडताना दिसत नाही. तिच्यासाठी ती आणि जग, यांचं नातं ठरलेलं आहे आणि नात्याच्या त्या एकारलेपणातून मुलीचा मृत्यूसुद्धा तिला बाहेर खेचून काढू शकत नाही.

हे भयंकर आहे; पण त्यातला भयंकरपणा तात्त्विक आहे. चित्रपटाच्या पटकथेतून, कॅमेऱ्याच्या भाषेतून तसं व्यक्त होत नाही. त्याही पलीकडे जाऊन वेरोनिकाच्या बघण्या-वागण्या-बोलण्यातूनही तसं जाणवत नाही. मग यात दिग्दर्शकाच्या (लिओनार्दो मेदेल) संयमाला आणि लक्ष्यापासून जराही न ढळण्याला जसा सलाम करावासा वाटतो, तसाच वेरोनिकाचं काम करणाऱ्या मारियाना दि गिरोलामो हिच्या अभिनयाला नमस्कार करावासा वाटतो. उत्तानपणा, लडिवाळ वा उत्तेजक अशा शारीरिक हालचाली, मन्रोटाइप मादक हावभाव, यातलं काही एक न अवलंबता तिने संपूर्ण चित्रपट धरून ठेवला आहे! ती प्रख्यात फुटबॉलपटूची पत्नी आहे. मॉडेल आहे. तिच्या देहबोलीत उतावळेपणाचा लवलेश नाही. स्वत:च्या प्रतिक्रियांना ती जसं नियंत्रणात ठेवते, अगदी त्याच प्रकारे तिच्या जगातल्या सगळ्या माणसांना तसंच कुठल्यातरी ‘शिस्तीत’ बांधून ठेवू बघते. बहुतांशी त्यात यशस्वीसुद्धा होते! त्या व्यक्तिरेखेचा राग येतो; पण कंटाळा येत नाही. तिने मुलीला मरू दिलं असणार, अशी प्रेक्षकाची खात्री पटते; पण त्यामागे ‘पुरावा’ नाही, तर तिच्या आत्ममग्नतेचा आलेला संताप, हे कारण असतं. तिच्या साऱ्या वागण्यामागे जास्तीत जास्त लाइक्स मिळवून अमुक नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर स्थान मिळवणे, हे एकमेव कारण असतं!

याला काय म्हणावं? कथाकल्पनाच अशी निवडली आहे की अभिव्यक्तीची शैली बदलून जावी. विषयाला मार्क देऊ नयेत; पण यात विषय, आशय, तंत्र, अभिनय यांची एकात्मता अचाट आहे. आणि हा प्रयोग यशस्वी झालेला आहे! सोशल मीडिया एका जिवंत माणसाचं कसं आणि किती वाटोळं करू शकतो, यावर याहून प्रत्ययकारी भाष्य अवघड आहे.

तसंच या चित्रपटाला ‘बाईचा चित्रपट’ म्हणून मोजणे साफ चूक आहे. मनुष्य भ्रष्टपणाच्या कोणत्या पातळीपर्यंत घसरू शकतो, हे दाखवताना निसर्गाच्या मूलभूत प्रेरणांपैकी एक असलेल्या अपत्यरक्षणाच्याही खाली जाताना दाखवणे, हेच बरोबर आहे. आणि तसं दाखवण्यासाठी मुख्य पात्र आई, म्हणजेच बाई दाखवण्याला इलाज नाही. बिरबलाच्या गोष्टीत पाणी नाकातोंडात जाऊ लागल्यावर पिल्लाला पायाखाली घेणारी माकडीण मादीच्या नाही, तर सजीवाच्या सहनशीलतेची मर्यादा दाखवते. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी जे कृत्य एक वेळ क्षम्य मानावं, ते सोशल मीडियाच्या लोभापोटी व्हावं, हा भ्रष्टपणाचा तळच होय!

भीती वाटते.

(क्रमशः)

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet