एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १८

१८५७ चा उठाव

सुधीर भिडे

Know thyself, know thy enemy - चिनी म्हण

सदर लेखमालेचे चार विभाग आहेत असे लिहिले होते.

 • अठराव्या शतकातील घटना ज्यामुळे १८१८ सालातील स्थिती तयार झाली.
 • एकोणिसाव्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक बदल.
 • १८५७चा उठाव.
 • एकोणिसाव्या शतकातील सांस्कृतिक, आर्थिक आणि शासकीय बदल.

पहिल्या १७ लेखांत आपण अठराव्या शतकातील घटना आणि एकोणिसाव्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक बदलांचा आढावा घेतला. पुढच्या तीन भागांत आपण १८५७च्या उठावाविषयी काही माहिती पाहू.

आपण ज्या घटनांचा विचार करीत आहोत त्या इतिहास किंवा राजकीय स्थित्यंतरे या स्वरूपाच्या नाहीत. खरे पाहता १८१८ ते १९२० या कालखंडात जास्त राजकीय घटना घडल्याच नाहीत. परंतु या कालखंडात अशी एक घटना घडली की ती पूर्णपणे राजकीय स्वरूपाची असूनही त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. १८५७चा उठाव देशातील काही भागात झाला पण परिणाम देशव्यापी झाले.

१७२० ते १८१८ या काळात महाराष्ट्रात अनेक युद्धे झाली. राजकीय अस्थिरता होती. त्याच्या तुलनेत १८१८ ते १९२० हा काळ शांततेचा राहिला. १८५७ ते १८५८ ह्या काळात देशात काही भागात अशांतता राहिली. पण या अस्थिरतेमध्ये महाराष्ट्रात अगदी तुरळक घटना घडल्या. उत्तरेत युद्धे होत असताना महाराष्ट्रात सामाजिक सुधारणांना सुरुवात झाली होती. या उलट उत्तर हिंदुस्थानात उठाव झाला त्या भागात सामाजिक सुधारणांचा गंधही नव्हता.

आपण विवेचन महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवले आहे. परंतु १८५७च्या उठावाचे परिणाम देशाच्या दृष्टीने दूरगामी ठरले. त्यामुळे त्याचा विचार आवश्यक आहे. हा इतिहास सर्वश्रुत आहे त्यामुळे घटना थोडक्यात सांगितल्या आहेत. या भागात असंतोषाची काय कारणे होती; याला उठाव म्हणावे, का बंड, का स्वातंत्र्ययुद्ध; या उठावाचे काय परिणाम झाले; यांचा आपण विचार करू. पुढच्या भागात ज्या ठिकाणी युद्धे झाली त्या संस्थानांची माहिती घेऊ.

एक द्रष्टा इंग्रज

मला अशी भीती वाटते की आपले भारतावरील साम्राज्य दीर्घ काळ टिकणारे नाही. ते कोणत्या मार्गाने लयाला जाईल ते सांगणे कठीण आहे. विभक्तीकरण झाले तर एका सुसंस्कृत देशापासून आपण दूर जात आहोत याचे आपल्याला समाधान मिळेल. अन्यथा हिंसक मार्गाने आपले संबंध तुटतील आणि या देशात आपण ज्या संस्था रुजू केल्या आहेत त्या नष्ट होतील.

– एल्फिन्स्टन १८१९

वरील वचन कंपनी सरकार, लेखक अ. रा. कुलकर्णी यांच्या पुस्तकातून उद्धृत केले आहे. हे एल्फिन्स्टन १७९६ साली भारतात आले. बनारस येथे न्यायखात्यात रुजू झाले. १८०१ साली त्यांची पुण्याचा साहाय्यक रेसिडंट म्हणून नियुक्ती झाली. १८०४ ते १८०८ या काळात त्यांनी नागपूरला भोसल्यांकडे रेसिडंट म्हणून काम केले. त्यानंतर पुढील दोन वर्षे काबूलमध्ये काम केल्यानंतर १८११ साली पुणे दरबारात रेसिडंट म्हणून त्यांची नेमणूक झाली. मग पेशवाईच्या पतनानंतरही ते पुण्यातच होते. हे लिहिण्याचा उद्देश हा की वरील उद्धृत केलेले वचन लिहिणाऱ्या व्यक्तीस हिंदुस्थानाची चांगली माहिती झालेली होती.

एल्फिन्स्टन म्हणतात त्याप्रमाणे १८५७च्या हिंसक मार्गाने इंग्रज येथून गेले नाहीत ते चांगलेच झाले. कारण त्याबरोबर आधुनिक समाजाच्या संस्था आणि कायदे जे इंग्रजांनी चालू केले होते ते लयास गेले असते.

असंतोषाची कारणे

 • शालेय पुस्तकातून आपण असे वाचतो की, सैनिकांत काडतुसांना गाय आणि डुकराच्या मांसातली चरबी लावली जाते, अशी माहिती पसरली. त्यामुळे सैनिकात असंतोष झाला. माझा प्रवास या विष्णुभट गोडश्यांच्या १८८३ साली लिहिलेल्या लिखाणातही हा उल्लेख येतो.
 • त्या काळातले इंग्रज पत्रकार असे लिहितात की असंतोषाचे खरे कारण राजे लोकांची सत्ता जाणे. ईस्ट इंडिया कंपनीने संस्थानिकांचा प्रदेश ताब्यात घेण्यासाठी दोन उपाय योजले.
  • काही संस्थानिकांशी कंपनीने मित्रत्वाचे करार केले. कंपनीने या संस्थानांना शस्त्रपुरवठा चालू केला. यात इंग्लंडमधील शस्त्रांच्या कारखान्यांचा फायदा होता. त्यानंतर कंपनीने संस्थानिकांना सुचविले की कंपनी संस्थानात सैन्य ठेवेल ज्यायोगे संस्थानिकांना सैन्य बाळगण्याची ‘कटकट’ राहणार नाही. ही एक प्रकारची मर्सिनरी आर्मी होती. मग एक-दोन वर्षांनी हे सैन्य ठेवण्यासाठी कंपनीने संस्थानिकांकडे पैशाची मागणी सुरू केली. जेव्हा संस्थानिकांना हे शक्य झाले नाही तेव्हा संस्थानिकांचा प्रदेश हळूहळू ताब्यात घ्यायला सुरुवात केली. आता या ‘मित्र’ संस्थानाच्या दरबारी कंपनीचा दूत राहू लागला. अशा प्रकारे कंपनीने हैदराबाद (१७९८), म्हैसूर (१७९९), अवध (१८०१), पेशवा (१८०२), नागपूरचे भोसले आणि ग्वाल्हेरचे शिंदे (१८०३), उदयपूर, जोधपूर, जयपूर (१८१८) या संस्थानांचा कब्जा मिळविला.
  • कब्जा मिळविण्याचा दुसरा मार्ग वारस नसणे आणि दत्तक नाकारणे हा होता. या उपायाने सातारा (१८४८), झाशी, संबलपुर (१८४९) या संस्थानावर कब्जा मिळविला.
 • इंग्रज सरकारने शेतसारा, मीठ, स्टँप ड्यूटी अशा प्रकारचे कर बसविले. त्यामुळे आधीच सामान्य जनतेची आर्थिक स्थिती नाजूक असताना अवस्था आणिकच घसरली.
 • इंग्रजांनी जी नवी न्यायव्यवस्था चालू केली त्यामुळे जुन्या धार्मिक श्रद्धांना धक्का पोचला.
 • संस्थानिकांची सत्ता गेल्यावर पुष्कळांच्या नोकऱ्या गेल्या.
 • ख्रिस्ती मिशनऱ्यांनी धर्मपरिवर्तन चालू केले त्याचीही भीती होती.

अशा प्रकारे असंतोषाची निरनिराळी कारणे होती.


१८५७च्या उठावातले शिपाई - कल्पनाचित्र
१८५७च्या उठावातले भारतीय शिपाई - कल्पनाचित्र; British National Army Museum यांच्या संस्थळावरून

पुष्कळशा इंग्लिश इतिहासकारांनी या उद्रेकाचे वर्णन शिपायांचे बंड असे केले. काही इंग्लिश इतिहासकारांच्या ही गोष्ट लक्षात आली की शिपायांच्या बंडापेक्षा याचे स्वरूप जास्त गंभीर होते. इंग्रजांचा सेनापती ह्यू रोज लिहितो,

जसजश्या घटना उलगडतात तसतसे लक्षात येते की हे बंड फक्त फौजेतील शिपायांचे नव्हते तर त्याचे मूळ राजकीय स्वरूपाचे होते. या उठावाचे प्रमुख राजे होते; दिल्लीचा बादशाह, अवधचा नवाब आणि नानासाहेब हे तिघेजण. त्यांना आपापली राज्ये परत हवी होती.

(झाशीची राणी लक्ष्मीबाई, पृष्ठ १७, प्रतिभा रानडे, राजहंस प्रकाशन) ह्यू रोजने झाशी जिंकून घेतली तरी तो झाशीच्या राणीचे नाव उठावाचे पुढारी म्हणून घेत नाही.

आपल्याला हे विचारात घेतले पाहिजे की जे भारतीय राजे बंडात सामील झाले त्यांचे काही वैयक्तिक प्रश्न होते. त्यांचा आपण पुढच्या भागात विचार करू.

उत्तर भारतातील उठाव

इंग्रजांनी ज्या राजांची सत्ता काढून घेतली ते अस्वस्थ होणे साहजिकच होते. परंतु या राजांना स्वतंत्र, अखंड भारताचे स्वप्न नव्हते. त्यांना आपले संस्थान आणि सत्ता परत हवे होते. सैनिकांचा विचार केला तर त्यांनाही स्वतंत्र भारताचे स्वप्न नव्हते. काडतुसांवरची चरबी हा एक धार्मिक प्रश्न होता. कानपूर आणि दिल्ली येथे इंग्रजी सत्ता उलथून लावल्यावर सैनिकांनी काय केले? त्यांनी बहादूरशाह आणि नानासाहेब यांस गादीवर बसविले. याचा अर्थ असा की समजा इंग्रजांची हार झाली असती तर भारतात परत सहाशे संस्थाने आणि तीच बजबजपुरी माजली असती.

माझा प्रवास हे लिखाण गोडसे भटजी यांनी सुमारे १८८३ साली केले. १९०७ साली हे लिखाण पहिल्यांदा पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध झाले. १९६६ साली व्हिनस प्रकाशनाने ते पुनर्मुद्रित केले. या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे की हे लेखक या घटना घडल्या त्यावेळी उत्तर भारतात, आणि झाशीत होते. अशा प्रकारे हा एक प्रत्यक्षदर्शी, Eye witness account आहे.

गोडसे कुटुंब अलिबागजवळ वरसई गावात राहात होते. घरातील गरिबीचे वर्णन विष्णुभट गोडसे ‘मागील दारी पुढील दारी दरिद्र फुगड्या घालीत होते‘ असे करतात. १८५६मध्ये विष्णुभटांस अशी माहिती मिळाली की ‘हिंदुस्थानात बायजाबाईसाहेब शिंदी मथुरेस सर्वतोमुख नावाचा यज्ञ करणार आहेत. त्यामध्ये सात आठ लक्ष रुपये धर्मादाय खर्च होणार.’ काही धनप्राप्ती होईल अशा आशेने त्यांनी जाण्याचे ठरविले. त्या संबंधात त्यांनी ग्वाल्हेरला पत्र लिहिले. बोलावणे आल्यावर जाण्याचे ठरविले. या मजकुरात काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत.

१८५६ साली डाक विभाग काम करू लागला होता. दुसरी गोष्ट म्हणजे विष्णुभट उत्तरेस जायचे म्हणजे हिंदुस्थानात जायचे असा उल्लेख करितात. उत्तरेला हिंदुस्तान म्हणणे हा उल्लेख त्या लिखाणात पुढेही दोन-तीन वेळेला येतो. या आधी शंभर वर्षे नानासाहेब पेशव्यांनी लिहिलेल्या एका पत्रात ते लिहितात, ‘तेथून मी जळगावला गेलो आणि त्यानंतर हिंदुस्थानात गेलो’ (नानासाहेब पेशवा, उदय कुलकर्णी, मुळामुठा पब्लिशर्स, २०२०, पृष्ठ ३२) लिहिण्याचा उद्देश असा की त्याकाळी जेव्हा हिंदुस्थानात उठाव झाला असा उल्लेख येतो तेव्हा त्याचा अर्थ उत्तर हिंदुस्थानात उठाव झाला असा घेतला पाहिजे.

मार्च १८५७मध्ये गोडसे कोकणातून ग्वाल्हेरला जाण्यासाठी निघाले. शिंद्यांच्या राणीसाहेब, ज्या वेळेला उठाव झाला त्याच वेळी आठ लक्ष रुपये (आजच्या हिशोबाने १६० कोटी) खर्च करून एक यज्ञ करण्याचा विचार करत होत्या. (नंतर हा यज्ञ रद्द करण्यात आला.) अर्थातच उठावात शिंद्यांचा काही सहभाग नव्हता. देशात काही उठाव चालू आहे याची कोकणात काही माहिती नव्हती.

गोडश्यांच्या लिखाणात आल्याप्रमाणे ते इंदूरजवळ आल्यावर त्यांना उठावाची पहिली चाहूल लागली.

उद्रेकाविषयी इंग्लिश इतिहासकार

इंग्रज इतिहासकार जस्टिन मकार्थीचे हे लिखाण पाहा.

एखाद्या सैनिक तुकडीचे हे बंड निश्चित नव्हते. काडतुसांना लावलेली चरबी हे एक निमित्त होते. ह्या नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी कारणाने उद्रेक झालाच असता.

इतिहासकार ब्रेंडन लिहितो (Decline of British Empire, Piers Brendon, Publisher Jonathan Cape, London, 2007)-

डलहौसीला शिपायांच्या असंतोषाविषयी सांगण्यात आले होते. पण त्यांनी त्या माहितीकडे दुर्लक्ष केले. सैनिकांना वाईट वागणूक मिळे. गोरे अधिकारी सैनिकांना ‘डुक्कर’ असे संबोधत. सैनिकांच्या राहण्याची व्यवस्था अतिशय खराब होती.

उद्रेक चालू झाल्यावर लाहोरपासून कलकत्त्यापर्यंत इंग्रजी कुटुंबांत भीतीचे वातावरण पसरले. परंतु हा उद्रेक स्वातंत्र्ययुद्धात परिवर्तित करण्यात भारतीय लोक यशस्वी झाले नाहीत. त्यांच्याकडे एक सशक्त नेता नव्हता, निरनिराळ्या ठिकाणी युद्धे करणाऱ्या सैनिकांत ताळमेळ नव्हता. गुरखा आणि शीख सैनिक इंग्रजांसाठीच लढले. इंग्रजांनी त्यावेळी टेलिग्राफचा वापर सुरू केला होता. त्याचा फायदा इंग्रजी सैन्यास मिळाला. जरुरीप्रमाणे सैन्याची हालचाल शक्य झाली.

मेजर कँपबेल लिहितो –

जेव्हा इंग्रजी सैन्य दिल्लीला पोचले त्यावेळी युद्ध संपलेलेच होते. इंग्रजी सैन्याचे दिल्लीतील वर्तन नृशंस होते. निर्ढावलेल्या सैनिकांनाही अंगावर काटा येईल अशी दृश्ये दिल्लीत दिसली. बहादूरशाहच्या राजपुत्रांना ते शरण आल्यावर मारून टाकण्यात आले. राण्यांच्या अंगावरचे दागिने ओरबाडण्यात आले. शहर उद्ध्वस्त करण्यात आले. मालमत्ता लुटण्यात आली.

महाराष्ट्रातील उठाव

महाराष्ट्रात उठावाची तीव्रता कमी असण्याची निरनिराळी कारणे होती.

 • इंग्रजांच्या हेरगिरीमुळे ज्या ठिकाणी असंतोषास सुरुवात होत होती, त्या ठिकाणी तीव्र कारवाई लगोलग करण्यात आली.
 • उत्तरेकडे ज्या प्रमाणात इंग्रजांच्या सैन्यातील भारतीय तुकड्यांनी उठाव केला त्या मानाने महाराष्ट्रात अतिशय कमी प्रमाणात सैन्यात उठाव झाला.
 • उत्तरेप्रमाणेच उठाव करणाऱ्यांत समन्वयाचा पूर्ण अभाव होता.
 • महाराष्ट्रात १८५७ साली असा एक विचारप्रवाह चालू झालेला होता की इंग्रजांच्या राज्यामुळे समाजाचा फायदा होत आहे. महाराष्ट्रात जी समाजजागृती त्या काळात चालू झाली होती ती उत्तरेत नव्हती. महाराष्ट्रात जे सामाजिक बदल चालू झाले होते त्याची आपण उजळणी करू.

महाराष्ट्रातील त्या वेळचे सामाजिक वातावरण पाहा.

 • साहित्य आणि कला क्षेत्रात तर्खडकरांचे व्याकरणाचे पुस्तक छापले गेले, विष्णुदास भाव्यांचे नाटक रंगभूमीवर आले, कित्येक भाषांतरित पुस्तके छापली गेली.
 • लोकहितवादींनी १८४८ ते १८५० या दरम्यान ‘प्रभाकर’मध्ये शतपत्रे लिहिली.
 • शिक्षण क्षेत्रात पुण्यात डेक्कन कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज चालू झाले होते. मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेज, ग्रँट मेडिकल कॉलेज आणि लॉ कॉलेज चालू झाले होते. बॉम्बे युनिवर्सिटीची स्थापना झाली होती.
 • मुंबईत बॉम्बे समाचार, दर्पण आणि टाइम्स ऑफ इंडिया ही वृत्तपत्रे चालू झाली होती. पुण्याहून ज्ञानप्रकाश प्रसिद्ध होत होते.

राजेरजवाडे आणि त्यांची आपल्या स्वार्थासाठीची युद्धे यांपासून महाराष्ट्रातील समाज पुष्कळ दूर गेला होता. या प्रकारचे बदल उत्तरेत नव्हते. तेथेच उठाव झाला.

महाराष्ट्रात ज्या ठिकाणी थोडा उठाव झाला त्याविषयी थोडी माहिती – (ही माहिती अ. रा. कुलकर्णी यांनी लिहिलेल्या कंपनी सरकार या पुस्तकातून घेतली आहे; राजहंस प्रकाशन, २०००.)

साताऱ्यात रंगो बापूजी याने एक गुप्त संघटना उभी केली. इंग्रजांना याचा लवकरच पत्ता लागला. लोकांवर कारवाई चालू झाली. रंगो बापूजी बेपता झाला. अशा प्रकारे साताऱ्याचा उठाव चालू होण्याआधीच मोडण्यात आला.

कोल्हापुरात ३१ जुलैला रात्री सुमारे ३०० सैनिकांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या घरावर हल्ला केला. बाजारात लुटालूट केली. इंग्रजांना याची आधीच माहिती होती त्यामुळे एका रात्रीतच बंड शमले. ४ डिसेंबरच्या रात्री राजाचा भाऊ चिमासाहेब याच्या नेतृत्वाखाली दुसरा उठाव झाला. हा उठावही एका दिवसात मोडण्यात आला.

खानदेशात भिल्लांनी सप्टेंबरमध्ये उठाव केला. हा उठाव आठ महिने चालू राहिला आणि एप्रिल १८५८मध्ये या उठावाचा बीमोड करण्यात आला.

उठावाच्या काळात मुंबईतील स्थिती

गोविंद नारायण माडगावकर यांनी मुंबईचे वर्णन हे पुस्तक १८६३ साली लिहिले. (पुनर्मुद्रण समन्वय प्रकाशन, २०१२). हे गृहस्थ उठावाच्या वेळी मुंबईत हजर होते. ते काय लिहितात? (पृष्ठ १४४ – १५६)

सन १८५७मध्ये बंगाल इलाख्यात पलटणीच्या लोकांनी मोठे बंड माजविले. त्यामुळे हिंदुस्थानातील रयतेची आणि कंपनी सरकारची फारच नासाडी झाली. बंडवाल्यांनी इंग्रज लोकांच्या स्त्रिया आणि मुलांचा विनाकारण घात केला. मुंबईतील लोक भयभीत होऊन गेले होते. परंतू ईश्वरकृपेने मुंबई इलाख्यात पलटणींत काही बंड झाले नाही. हे बंड मोडून टाकण्यास सरकारास सुमारे कोट दोन कोट रुपये खर्च झाले. हे अरिष्ट उपस्थित झाल्यापासून ते नाहीसे होईतो मुंबईतील सर्व जातीच्या लोकांनी आपआपल्या देवालयात इंग्रजास जय प्राप्त व्हावा व त्यांचे राज्य कायम राहावे या साठी प्रार्थना केल्या.

वरील लिखाणात काही स्पष्टतेची आवश्यकता आहे. माडगावकर जेव्हा हिंदुस्थानातील रयत असा उल्लेख करतात तेव्हा त्याचा अर्थ उत्तर हिंदुस्थानातील काही भाग असा करणे जरूर आहे. हे आपण गोडसे भटजींच्या लिखाणातही पाहिले आहे. त्या वेळचे दोन कोटी रुपये आजच्या हिशोबाने ४,००० कोटी रुपये. हा खर्च अर्थातच मागून भारतीय जनतेकडून वसूल करण्यात आला.

गोविंद गणेश भागवत यांनी १९४० साली मराठ्यांच्या आपसांतील लढाया हे पुस्तक लिहिले. (पुनर्प्रकाशन २०१८, वरदा प्रकाशन) या पुस्तकात १८व्या प्रकरणात ते लिहितात –

बॅरिस्टर सावरकर यांनी जे प्रसिद्ध केले आहे की १८५७चे बंड हे स्वातंत्र्याकरिता युद्ध होते ते खरे नाही. या बंडात इंग्रजी सरकाराने कवायत शिकवलेल्या ज्या पलटणी बिथरल्या त्यात जास्त पुरभय्ये लोक होते. सामान्य जनतेला हे बंड नको होते. बंडवाल्या शिपायांत लष्करी शिस्त मुळीच नव्हती. बंडवाल्यांचे प्रथमपासूनचे धंदे असे होते की सरकारी खजिने फोडायचे आणि खिशात भरतील तितके रुपये भरायचे. याच्या उलट इंग्रजी अंमलदारांनी फार शिस्तीने बंड मोडण्याचे काम चालू ठेवले. बंडाची धुमश्चक्री जोरात होती तो प्रदेश इतका लहान होता की त्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांइतकेच होते.

ना. वि. जोशी यांनी १८६८ साली पुणे शहराचे वर्णन हे पुस्तक लिहिले. (पुनर्प्रकाशन वरदा प्रकाशन, २०२०). याचा अर्थ हे पुस्तक उठावानंतर दहा वर्षांनी लिहिले. त्या काळातील पुण्याचे वर्णन करताना ते पुण्यात पोळांचा (बैलांचा) कसा त्रास होता यावर ते परिच्छेद लिहितात. १८५७ साली नगरपालिकेने शहरात येणाऱ्या गुरांवर कर बसविला याचा ते उल्लेख करतात. पण सबंध पुस्तकात १८५७च्या उठावावर एक वाक्य लिहिलेले नाही.

यावरून पुण्यात उठावाचे काहीच वातावरण नव्हते असे वाटते.

उठावात भाग कोणी घेतला नाही?

ईस्ट इंडिया कंपनीच्या आर्मीत सर्वांत जास्त उठाव उत्तरेकडच्या बंगाल आर्मीत झाला. त्या आर्मीची ६४ रेजिमेंट्स बरखास्त करण्याची वेळ आली पण मद्रास आर्मीचे एकही रेजिमेंट बरखास्त झाले नाही. एकंदर ५६५ संस्थाने उद्रेकात सामील झाली नाहीत. ग्वाल्हेर, बडोदा, हैदराबाद, पटियाला, उदयपूर, जयपूर, काश्मीर अशी मोठी संस्थाने सामील झाली नाहीत. एवढेच नव्हे तर या संस्थानांनी इंग्रजास मदत केली. (गोडसे भटजी यांच्या लिखाणातील संदर्भ पुढील भागात येईल). इंग्रजांच्या सैन्यात युद्ध करणारे सैनिक भारतीयच होते. सर्व शीख सैनिक इंग्रजांसाठी लढले. पुष्कळसे शिक्षित लोक भारतात इंग्रजांचे राज्य चालू राहावे या मताचे होते. महात्मा फुले त्यांपैकी एक होते. मुंबईतील आणि पुण्यातील स्थिती आपण वर पाहिली आहेच.

खालील माहिती Revolt of 1857, Evaluating Sikh assistance to the British, Institute of Sikh studies, Chandigarh, Inderjeet Singh, या संदर्भातून घेतली आहे.

 • राजस्थानात लोक शांत राहिले. जोधपूरच्या आणि जयपूरच्या राजांनी इंग्रजांना मदत केली.
 • एक-दोन छोटे प्रसंग सोडता बंगालमध्ये शांतता राहिली.
 • बॉम्बे प्रेसिडेंसीमध्ये दोन-तीन छोटे प्रसंग सोडता शांतता राहिली.
 • ग्वाल्हेरचे शिंदे आणि इंदूरचे होळकर यांनी इंग्रजांना मदत केली.
 • जम्मू- काश्मीरचे राजा यांनी इंग्रजांना मदत केली.
 • मद्रास प्रेसिडेंसीत पूर्णतः शांतता राहिली.
 • बडोद्याचे खंडेराव गायकवाड इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे बडोद्यातील इंग्रजांच्या फौजा बिनधोकपणे दुसरीकडे पाठविणे शक्य झाले.

शिखांनी उठावाला का मदत केली नाही?

उठाव करणाऱ्यांनी शिखांना उठावाच्या बाबत कोणी काही सांगितले नव्हते. उठाव करणाऱ्यांचा हेतू बहादूरशाहला हिंदुस्तानचा बादशाह घोषित करणे हा होता. मुघलांनी शिखांवर केलेले अत्याचार शीख विसरले नव्हते. इंग्रजांनी धूर्तपणे शिखांना याची आठवण दिली. १८४५ ते १८५० या काळात झालेल्या अँग्लो-शीख युद्धात इंग्रजांच्या बंगाल आर्मीविरुद्ध शीख लढले होते. त्या युद्धात बंगाल आर्मीने शिखांना हरविले होत. ही आठवण पण शीख विसरले नव्हते.

पटियाला, नाभा आणि जिंद या तिघांनी स्वत:च्या खजिन्यातून इंग्रजांना मदत केली. दिल्लीवर ते इंग्रजांबरोबर चालून गेले. अत्यंत क्रूर रीतीने या गुरु गोविंदाच्या चेल्यांनी क्रांतिकारकांचा वध केला.

– (सावरकर, १८५७चे स्वातंत्र्य समर, पृष्ठ ११८)

ग्वाल्हेरचे शिंदे

शिंद्यांनी उठावात अजिबात भाग घेतला नाही. जेव्हा नानासाहेब, तात्या टोपे आणि लक्ष्मीबाई हे सैन्यासह ग्वाल्हेरच्या दिशेने कूच करू लागले तेव्हा त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी जयाजीराव शिंदे ग्वाल्हेरमधून आपल्या सैन्यासह निघाले. पेशव्याकडे १०,०००पेक्षा जास्त सैनिक होते. त्या तुलनेत ग्वाल्हेरचे सैन्य अगदी कमी होते. युद्धास पुरे तोंड फुटण्याआधीच ग्वाल्हेरचे काही सैनिक फुटून पेशव्यांच्या सैन्यास मिळाले. मग जयाजीराव शिंदे निसटून पळाले आणि आग्र्यास इंग्रजांच्या आसऱ्यास गेले. दोन दिवस पेशव्यांचे सैन्य ग्वाल्हेरमध्ये होते. लवकरच इंग्रजांचे सैन्य तिथे पोचले आणि युद्धात लक्ष्मीबाई लढता लढता वीरगती पावल्या. नानासाहेब आणि तात्या टोपे निसटून पळाले. त्यानंतर इंग्रजांनी जयाजीरावांना परत राज्यारोहण करण्यास सांगितले. हिंदुस्थानातील मोठ्या शहरातून जयाजीरावांना तोफांची सलामी देण्यात आली. ग्वाल्हेरमध्ये जलसा आणि मेजवान्या चालू झाल्या.

ग्वाल्हेर आणि इंदोर या दोन्ही संस्थानांतील नामर्द राजपुरुषांमध्ये जर झाशीच्या राणीच्या शतांश मर्दपणा असता तर तो अंमल पुन्हा इंग्रजांकडे जाता ना !

– सावरकर, १८५७चे स्वातंत्र्य समर, पृष्ठ ३९६

निष्कर्ष

इतिहासलेखन हा एक अवघड प्रकार आहे. त्याचे कारण लेखकांचे पूर्वग्रह आणि त्यांची सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवरची मते त्यांचे लेखन दूषित करतात. भारतात तर इतिहासलेखन दोन कारणांनी अवघड आहे. पहिले कारण म्हणजे भारतीय लोकांची व्यक्तिपूजा. एखादी ऐतिहासिक व्यक्ती एकदा महानायक मानली गेली की मग त्या व्यक्तीमधील दोषांविषयी बोलणे अशक्यच आहे.

दुसरे म्हणजे भारतात इतिहासाचे लेखक डावे आणि उजवे अशा दोन गटांत विभागले जातात. त्यामुळे इतिहासाचे लेखक पुराव्यांचा विचार करून योग्य त्या निर्णयाला येत नाहीत. ही स्थिती १८५७च्या उठावाबाबतीत प्रकर्षाने दिसते. डावे इतिहासकार याला शिपायांचे बंड म्हणतात. इतिहासकार सेन, मुजुमदार, न. र. फाटक यांनी या मताचे लिखाण केले आहे. (पृष्ठ ६, झाशीची राणी लक्ष्मीबाई, प्रतिभा रानडे, राजहंस प्रकाशन) तर उजवे इतिहासकार या उठावाला स्वातंत्र्ययुद्ध म्हणतात. खरी स्थिती या दोन टोकांच्या मध्ये दिसते.

नेहमी चर्चा केली जाणारा प्रश्न – ही घटना शिपायांचे बंड होते की स्वातंत्र्ययुद्ध? आता सर्व इतिहासकार मान्य करतात की त्या घटनेला शिपायांचे बंड म्हणणे योग्य नाही. त्या घटनेला स्वातंत्र्ययुद्ध म्हणावे का? संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्यासाठी हे राजे लढले असे म्हणणेही धाडसाचे ठरेल. या दोन पर्यायांच्या मध्ये कुठे तरी त्या घटनेचा विचार करावा लागेल. डलहौसीनंतर लॉर्ड कनिंग पहिले व्हॉईसरॉय म्हणून आले. त्यांनी मागाहून लिहिले आहे - हा उद्रेक स्थानिक बंड नव्हता. राष्ट्रीय लढाईसारखे त्याचे स्वरूप होते.

१८५७चा उठाव हे केवळ शिपायांचे बंड नव्हते. उठावामागे बरीच कारणे होती. परंतु हा उठाव उत्तरेकडील थोड्या भागांत सीमित राहिला. ज्या संस्थानिकांनी उठाव केला त्यांची वैयक्तिक कारणे होती. उठाव करणाऱ्या सैनिकी तुकड्यांत काही ताळमेळ नव्हता. या सर्वांकडे एका स्वतंत्र भारत देशाची कल्पना नव्हती. इंग्रजांच्या ताकदीची कल्पना नव्हती. पुढील प्रकरणात आपण पाहणार आहोत की इंग्रजांचे केवढे मोठे सैन्य तयार झाले होते. आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी लढाई करणाऱ्या संस्थानिकांना इंग्रजांच्या सामर्थ्याची कल्पनाच नव्हती, अशा परिस्थितीत पराभव अटळ होता. या उठावानंतर इंग्लंडच्या पार्लमेंटने सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून आपल्या हातात घेतली. सबंध देश खऱ्या अर्थाने एक राज्य (State) बनला.

१८५७च्या घटनांचे परिणाम

१८५७ सालातील घटनांनंतर जी संस्थाने विलीन झाली नाहीत ती इंग्लंडच्या राणीची मांडलिक बनली. ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य संपून इंग्लंडच्या सरकारने सत्ता हातात घेतली. याचा परिणाम म्हणून भारत हे एक स्टेट बनण्यास मदत झाली. (आपण शेवटच्या प्रकरणात नेशन आणि स्टेट – राष्ट्र आणि राज्य – या दोन संकल्पनांचा विचार करणार आहोत.) इंग्रजांच्या राज्याचा परिणाम चलन, वित्तीय संस्था यांवर काय झाला याचा विचार पुढील भागात करू. इंग्लंडमधील उदारमतवादी लोकांचा आवाज या घटनेमुळे दाबला गेला.

पुढच्या एकोणिसाव्या भागात आपण ज्या संस्थानांत युद्धे झाली त्यांविषयी माहिती घेऊ.

मागचे भाग -

भाग १ – एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती
भाग २ – अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी
भाग ३ – अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती
भाग ४ – अठराव्या शतकातील शासनयंत्रणा
भाग ५ – धर्मशास्त्रे आणि कर्मकांडी धर्म
भाग ६ – अठराव्या शतकातील धर्माचे स्वरूप
भाग ७ – धार्मिक सुधारणांची आवश्यकता
भाग ८ – धार्मिक सुधारणांचे प्रयत्न
भाग ९ – समाजसुधारणा – दलित कोण आणि कसे?
भाग १० – समाज सुधारणा – दलितांच्या उद्धाराचे प्रयत्न
भाग ११ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १२ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १३ – समाजातील बदल
भाग १४ – समाजातील बदल – मुंबईचा विकास
भाग १५ – समाजातील बदल – पुण्याचा विकास
भाग १६ – समाजातील बदल
भाग १७ – दोन समाजसुधारक राजे

लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.

सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण.

सुधीर भिडे

field_vote: 
0
No votes yet

माझा प्रवास हे पुस्तक मी वाचायला घेतले आहे. अर्धे झाले आहे. मागे उपक्रमवर यावर इथे चर्चा झाली होती. त्यातला नितीन थत्ते आणि राही यांचा ऐतिहासिक संदर्भाच्या दृष्टीने मांडलेला मुद्दा पटतो. मी हे पुस्तक ऐतिहासिक संदर्भांसाठी नाही तर वेगळ्याकारणासाठी वाचतोय. मला एकंदर त्या काळात प्रवास कसा केला जात असावा याची उत्सुकता होती. त्यामुळे मी पुस्तकातले प्रत्येक ठिकाण गुगल मॅपवर पडताळून पाहत होतो. त्यात इंग्रजी मध्ये शोधताना एक ठिकाण (हरदेहांडे)सापडले नाही. म्हाणून देवनागरीत शोधले असता शैलेन यांचा दिवाळी अंकाचा हा लेख सापडला. आतापर्यंत वाचताना जे जाणवले त्याची शैलेन यांनी खूप चांगली नोंद घेतली आहे. अर्थात एका पुस्तकावर काही ठोस अनुमान काढणे योग्य नाही, केवळ अंदाज म्हणून काही नोंदी केल्या आहेत.

हिंदुस्तानचा (म्हणजे उत्तर भारताचा) उल्लेख सदर लेखात तसेच उपक्रमच्या चर्चेत आहेच. त्यामुळे "देश" ह्या संकल्पनेचा अभाव असावा असे वाटले.

त्यांचे शिक्षण घरीच झाले असावे (कारण वडिलांकडून मोडी लिहिणे आणि जुजबी गणिताची शिकवणी मिळाल्याचे ते म्हणतात.) शाळेचा उल्लेख येत नाही. (त्यांचा जन्म साधारण जुलै-ऑगस्ट १८२७ चा असावा... )
लहान भाऊ एक (सरकारी?) नोकरीच्या परीक्षेसाठी ठाण्याला जातो असे उल्लेख आहे. पण त्यात त्याची निवड होत नाही तेव्हा तो पेण मध्ये वार्षिक ५० रुपयाची नोकरी एका सावकाराकडे पत्करतो असा उल्लेख आहे. (पुढच्या पैशाच्या नोंदींची तुलना करताना हा आकडा मी संदर्भ म्हणून वापरला)

पोस्ट सुविधा १८५२ च्या आसापास चालू झाली होती त्यामुळे त्याचा उल्लेख पुस्तकात येतो.

बहुदा गोडसे वरसई ते पुणे (~१०० कि.मि.) चा प्रवास अधनं मधनं बैलगाडीने करत असावेत. खोपोली मार्गे. (खोपोलीच्या धर्मशाळेत रात्र काढून भल्या पहाटे घाट चढला जात असावा). बैलगाडी भाड्याची मिळत होती. अगदी उत्तर हिंदुस्तानातही. उदा. उज्जैनी ते ग्वाल्हेर, ग्वाल्हेर ते झासी इ. प्रवासात बर्‍याचवेळा निवारा म्हणून धर्मशाळा होत्या. (काही ठिकाणी उदा. महू, धर्मशाळेऐवजी बंगला असा उल्लेख येतो. जिथे सैनिकांनीही आसरा घेतलेला होता). धर्मशाळेत अगदी श्रीमंत माणसेही असायची (उदा. मालेगावच्या धर्मशाळेत, वार्षिक दोन ते अडीच हजार उत्पन्न असेलेल्या व्यक्तीने - तुलना वार्षिक ५० रुपये - आसरा घेतला होता). या प्रवासात स्त्रिया आणि एक आठ वर्षाची मुलगीही होती. पण एखाद्या इप्सित स्थळी पोहोचल्यावर मात्र आत्पेष्टांकडे वा स्वजातियांकडेच निवारा शोधला जात असावा. धारचे राजे पवार यांच्या मृत्यूनंतर धार मध्ये दक्षिणेच्या आशेने भरपूर ब्राह्मण जमा होतात. तेव्हा तिथे राहायची सोय शुद्राकडे होणे दुर्लभ होते असे ते म्हणतात. एका दक्षिणी सोनारास ते (तंबाखू-पान-सुपारीच्या सहाय्याने) मनवतात. तसेच लांबच्या प्रवासात काही दिवस वा काही आठवडे मधल्या मुक्कामात जात असावेत. कदाचित बैलगाडीची सोय आणि सहप्रवाशांची सोबत असावी हा उद्देश असावा. नर्मदा नदीचा उल्लेख आढळला नाही. (निदान जातान, परतीच्या प्रवासाबाबत अजून वाचले नाही). पण धारजवळ चर्मावती गंगा नदीचा उल्लेख आहे. पण ही कुठली नदी ते कळले नाही. माझ्या अंदाजाने हा प्रवास साधारण दिवसाकाठी ३०-८० किलो मिटर असावा. कधीकधी थेट २०० किलो मिटरवर पेक्षा अधिकची नोंद आढळते. पण मधल्या थांब्याच्या नोंदी घेतल्या नसाव्यात.

प्रवासात एखादी एकटी व्यक्ती मृत झाल्यास त्याचे अंतिम संस्कार परस्पर त्रयस्ताकडून होत असावेत. (सर्पदंशामूळे मृत्यू झालेल्या एका ब्राह्मणाचे अंतिम संस्कार वर उल्लेखलेली श्रीमंत व्यक्ती करते.) अशावेळी एकट्याने प्रवास करणार्‍या मृत व्यक्तीच्या घरच्यांना कसे/वा किती दिवसांनी कळत असेल असा प्रश्न पडला.

गोडसेंच्या पुस्तकात काळाचा उल्लेख हा शालिवाहन शकामध्ये येतो (स्वतःची जन्मतारीख, प्रवासाला निघण्याचा मुहुर्ताचा दिवस इ.). इंगजी कॅलेंडरचा उल्लेख उत्तरेकडील शिपाई करतात (३ जूनची तारीख). पण वेळेची नोंद कधी घटका तर कधी अमूक अमूक (उदा. ९) वाजता अशी येते. ती कशी मोजली जात होती ते कळले नाही.

लेखनाचे साहित्य (बाजारात?) कसे उपलब्ध होते ते कळत नाही पण गोडसेंनी धारच्या दानाध्यक्षांकडे प्रवेश मिळविण्यासाठीअर्ज लिहिला आणि त्यांच्याकडून परवानगिच्या चिठ्ठ्या मिळविल्या असा उल्लेख आहे. तसेच श्रीमंत माणसाकडे काही धार्मिक ग्रंथ होते (बहुतेक छापिल असावेत).
ब्राह्मण म्हणून दक्षिणा मिळत होत्या. पण त्या जास्त नसाव्यात. शिंदे संस्थानात (ग्वाल्हेर मध्ये) त्यांना महिन्याला जेवण्यासाठी १० रुपये मिळत होते असा उल्लेख येतो (१५०/१२ केले तर एक महिन्याच्या पगारापेक्ष थोडे कमी. नॉट बॅड). पण समारोपाच्या वेळी १५० रुपये मिळाल्याचे ते सांगतात म्हणजे भावाच्या वार्षिक पगाराच्या ३ पट (अगेन नॉट बॅड).

धार मधल्या एका दानात "दासीदान" हा प्रकार विचित्र वाटला.

हे पुस्तक प्रथम लिहिले गेले / प्रकाशित झाले गेल तेव्हा त्यांचे काका हयात होते का? काही घटना मला अतिशयोक्त वाटतात काकांनी हयातीत त्याला दुजोरा दिला असता तर शिक्कामोर्तब झाले असते (असो.)

तूर्तास माझा प्रवास विषयी इतकेच.

याव्यतिरिक्त (त्याकाळातल्या भारतातल्या) प्रवास या विषया ला धरून पुस्तक चाळत असताना ही दोन पुस्तकं सापडली. (पुस्तक १ , पुस्तक २ ). अर्थात या जेन ऑस्टीन वा ब्राँटे भगिनींसारख्या नावाजलेल्या सिद्धहस्त लेखिका नसल्याने या पुस्तकांचा उल्लेख इतरत्र कुठेही नाही. दोनही पुस्तके स्त्रियांनी लिहिलेली आहेत. त्या काळात केलेला तो प्रवासही धाडसीच म्हटला पाहिजे. त्यातल्या एकीचा सातार्‍याहून पुण्यात आल्यावर मृत्यू झाला. दोघींनीही एकाच प्रवासावर पुस्तक वा पत्रलेखन केले आहे. सहज, बाँम्बे वरचं प्रकरण चाळताना, केळे (हिरवे आणि पिवळे त्यातले हिरवे केळे आता दिसत पण नाही.) या फळाची आणि भेंडी या भाजीची घेतलेली नोंद लक्षात राहिली. त्याकाळात नाशवंत (फळे इ.) वस्तूंचा व्यापार होत नसावा त्यामुळे युरोपियनांना त्याचे आकर्षण असावे. अगदी डार्विनच्या बिगलच्या पुस्तकातही ट्रॉपिकल फळांचा उल्लेख आढळला. (पण कालच्या एका लोकसत्ताच्या लेखात पपई हा शब्द आणि फळसुद्धा पोर्तुगिजांकडून भारतात आल्याचे कळले तेव्हा आश्चर्य वाटले. मला वाटत होते पपई हे फळ भारतातलेच असावे. इथे संस्कृतचे जाणकार बरेच आहेत. जुन्या संस्कृत साहित्य/ग्रंथात मध्ये पपयाचा उल्लेख बिलकूलच नाही का? )

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(पण कालच्या एका लोकसत्ताच्या लेखात पपई हा शब्द आणि फळसुद्धा पोर्तुगिजांकडून भारतात आल्याचे कळले तेव्हा आश्चर्य वाटले. मला वाटत होते पपई हे फळ भारतातलेच असावे. इथे संस्कृतचे जाणकार बरेच आहेत. जुन्या संस्कृत साहित्य/ग्रंथात मध्ये पपयाचा उल्लेख बिलकूलच नाही का? )

पपई हे मुळातले मेक्सिको तथा मध्य अमेरिकेतील फळ आहे. स्पॅनिशांबरोबर युरोपात आणि त्यानंतर पोर्तुगीजांमार्फत हिंदुस्थानात आले असणे सहज शक्य आहे.

(तसेच चिक्कूसुद्धा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिक्कू सुद्धा? ओह... परसावतली पपई आणि चिक्कू ही झाडे इतक्या लांबून आली आहेत हे आजच कळले.

अजून एक, माझा प्रवास वाचताना, डोळ्यासमोर मोहन गोखलेचा चेहरा येत होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फळ झाडांचा प्रसार कसा होवू शकतो. झाड काही स्वतः जागेवरून हलत नाही
ज्या फळांच्या बिया लहान आहेत ती फळं पक्षी खातात आणि लांब कुठे तरी जावून विष्ठा टाकतात त्या मध्ये त्या बिया पण असतात योग्य वातावरण असेल तर ते झाडे तिथे उगवते.एक पक्षी किती तरी किलोमीटर प्रवास करत असतो तितका अंतर पर्यंत ते बीज वाहून नेवून प्रसार करतात.
ज्या फळांची बी आकाराने मोठे असते .म्हणजे आंब्याच्या आकाराची फळं त्यांचा प्रसार प्राणी करतात.
त्यांचा वावर पण खूप अंतर पर्यंत असतो.
फळ झाडांचा प्रसार असाच झाला असावा.
त्याच बरोबर वाहणारे पाणी,हवा ह्यांच्या बरोबर बियांचा प्रसार झाला असेल.
फक्त योग्य हवामान जिथे त्या झाडाला मिळाले तिथे ते वाढले .
पोर्तुगाल मधून माणसाने पपई आणली आणि इथे भारता मध्ये उगवली हे लॉजिक काही पटत नाही.
झाडे निर्माण होवून लाखो वर्ष झाली त्यांचा प्रसार जगभर लाखो वर्ष पूर्वीच झालेला असला पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रथम स्पेनमधल्या माणसाने मेक्सिकोत/मध्य अमेरिकेत गेल्यावर पोटभर पपया (बियांसकट) खाऊन घेतल्या, नि युरोपात पोहोचल्यावर (पुन्हा, पोटभर) विष्ठा टाकली. त्यातून पपयांची झाडे युरोपात फोफावली. त्या झाडांना येणारी रसाळ गोमटी फळे पुढे पोर्तुगालमधल्या माणसाने पोटभर खाल्ली, नि नंतर मग हिंदुस्थानात येऊन पोटभर, वगैरे वगैरे.

असो चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ध्यानी मनी नसताना चुकून अनेक नवीन शोध लागले आहेत.
तसे चुकून तुम्ही मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे .
कुठेच उत्तर सापडत नव्हते.
" निसर्ग चक्रात माणसाची नक्की भूमिका आणि जबाबदारी काय" हा प्रश्न खूप दिवस पडला होता.
निसर्ग चक्र सुरळीत चालण्यासाठी माणसाची नक्की भूमिका काय आहे बुवा.
अगदी व्हायरस, bacteria पासून विशाल जीवांची पण काही तरी भूमिका असते.
माणसाची अशी काहीच भूमिका नाही.
तुम्ही त्याचे उत्तर दिले .
विष्ठा टाकून माणूस वनस्पती चा प्रसार जगभर करत आहे.(drainage line मधून.बघा समुद्रात नवीन जाती ची झाडे निर्माण झाली असतील)
निसर्ग चक्रात माणसाचे काही योगदान नाही असेल तर निसर्ग चक्र मध्ये

विकृती निर्माण करण्यात आहे.माणूस निसर्गाच्या काही कामाचा नाही असला तर निसर्ग बरबाद होईल माणूस नसेल तर निसर्ग अजून सशक्त होईल पृथ्वी सुखी होईल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0