ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १४-१५

(या आठवड्यात दोन भाग प्रसिद्ध होत आहेत भाग १४ ॲक्युपंक्चर आणि भाग १५ आयुष)

भाग १४ ॲक्युपंक्चर

सुधीर भिडे

विषयाची मांडणी

  • ची आणि ॲक्युपंक्चर
  • ॲक्युप्रेशर
  • ॲक्युपंक्चरला मान्यता
  • ॲक्युपंक्चरला शास्त्रीय पाया आहे का
  • समालोचन

***

ची आणि ॲक्युपंक्चर

खालील माहिती Acupuncture, John Hopkins Medicine आणि Is Acupuncture the Miracle Remedy for Everything?, Danielle Sinay , November 30, 2017, Healthline या दोन लेखांतून घेतली आहे.

ॲक्युपंक्चरचे मूळ पारंपरिक चिनी वैद्यकात आहे. या वैद्यकाची अशी समजूत आहे की आपल्या शरीरात ची नावाची एक शक्ती असते. आपल्या शरीरात १२ मार्ग असतात ज्यांतून ची ही शक्ती फिरत असते. या मार्गांना मेरिडियन असे संबोधले जाते. जेव्हा चीच्या हालचालीत बाधा निर्माण होते त्या वेळेस शरीरात आजार निर्माण होतो. शरीरात योग्य ठिकाणी सुया खुपसून चीचा मार्ग मोकळा केला जातो. ॲक्युपंक्चरचे एक सेशन साधारणपणे ३० मिनिटे चालते. बहुदा पंधरा सेशननंतर लक्षणात आराम पडतो, असे सांगण्यात येते.

ॲक्युपंक्चरने हे आजार बरे होतात असे सांगितले जाते - ॲलर्जी, मानसिक ताणतणावातून उद्भवणारे आजार, संधीवात, मानदुखी, पाठदुखी, डोकेदुखी, उच्च रक्तदाब, निद्रानाश, अर्धशिशी, पक्षाघात. आपण पाहू शकतो कि आधुनिक शास्त्राप्रमाणे या आजारांची कारणे अगदी निरनिराळी असतात.

चिनी धारणांप्रमाणे शरीरात २००० ॲक्युपंक्चर स्थाने असतात. काही स्थाने खालील चित्रात दाखविली आहेत.

ॲक्युप्रेशर

ॲक्युप्रेशरमध्ये शरीरावरच्या काही जागांवर दाब दिला जातो. याचा उगमही पारंपरिक चीनी वैद्यकात आहे. ॲक्युपंक्चरमध्ये सुया टोचल्या जातात, तर ॲक्युप्रेशरमध्ये त्याच जागांवर बोटाने किंवा इतर साधनांनी दाब दिला जातो. ॲक्युपंक्चरप्रमाणेच चीच्या प्रवाहातील बाधा दूर करणे हा उद्देश असतो. वर उल्लेखिलेल्या मेरीडियन्सवर दबाव देण्याचे बिंदू असतात.

ॲक्युपंक्चरला मान्यता

भारत सरकारने ॲक्युपंक्चरला एक वेगळी वैद्यकीय प्रणाली म्हणून मान्यता दिली आहे. Acupuncture Science Association यांची ही बरेच वर्षापासून मागणी होती. असोसिएशनचे सेक्रेटरी इंद्रजीत सिंग यांनी असे विधान केले आहे की ॲक्युपंक्चरचे शिक्षण देण्यासाठी लवकरच एक संस्था बनविली जाईल. या आधीच पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांनी ॲक्युपंक्चर ही एक निराळी वैद्यकीय प्रणाली आहे अशी मान्यता दिलेली आहे.

ॲक्युपंक्चरला शास्त्रीय पाया आहे?

'द गार्डियन'मधील Why acupuncture is giving sceptics the needle या डेव्हिड डर्बिशार यांच्या २६ जुलै २०१३ला प्रकाशित झालेल्या लेखातून –

निरनिराळ्या प्रयोगांतून आता हे सिद्ध झाले आहे की ची नावाची शक्ती, जी मेरीडियन्समधून फिरत असते असे मानले जाते, ती अस्तित्वात नसते. दोन हजार वर्षांपूर्वी मानवी शरीराची नीट माहिती नव्हती त्या वेळी अशा कल्पना मांडण्यात आल्या. परंतु या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे म्हणणे असे की ची ही संकल्पना खरी नाही; याकरता ॲक्युपंक्चर काम करीत नाही असे म्हणणे चुकीचे होईल. अशा प्रकारे ॲक्युपंक्चरने आपली चिनी वैद्यकाशी असलेली नाळ तोडून टाकल्यासारखी दिसते.

आधुनिक शास्त्रीय ज्ञानाचा वापर करून ॲक्युपंक्चर का काम करते याची दोन कारणे सांगितली जातात.

१. शरीरात विशिष्ट जागी सुया टोचल्यामुळे मेंदूतून एंडोर्फिन प्रकारची रसायने सोडली जातात; यांमुळे वेदना कमी होतात. हे अजूनही शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. परंतु हे जरी खरे मानले तरी हा प्रश्न निर्माण होतो की एंडोर्फिनचा परिणाम तात्पुरता असतो त्याने वेदना कायमच्या नाहीश्या कशा होणार?
२. दुसरे कारण हे सांगितले जाते की शरीरात मज्जासंस्थेत काही ठिकाणी वेदना बंद करण्याच्या जागा (pain blockage points) असतात. त्या ठिकाणी सुया टोचल्या तर वेदना कमी होऊ शकतात. ॲक्युपंक्चरमध्ये सुया तीन ते चार मी.मी. आतपर्यंत टोचल्या जातात. शरीरातील पेन ब्लॉकेज पॉईंट्स यापेक्षा बरेच आत असतात.

कोणतीही उपचार पद्धती काम करते का, हे तपासण्याचे एकच साधन आहे - randomised, double blind, controlled trials. अशा चाचण्यांत अर्ध्या रुग्णांना चाचणी होत असलेला उपचार देण्यात येतो आणि अर्ध्या रुग्णांना प्लॅसिबो – खरे वाटणारा पण खोटा – उपचार देण्यात येतो. कुणाला औषध आणि कुणाला न-औषध मिळत आहे, हे रुग्णांना माहीत नसते. प्रश्न असा निर्माण होतो की प्लॅसिबो सुया कशा टोचायच्या? अशा प्रयोगासाठी अशा सुया बनविण्यात आल्या की ज्या टोचताक्षणीच तीन मिमी मागे येतात. रोग्यास मात्र असे वाटत राहते की सुई टोचली. या शिवाय या सुया ॲक्युपंक्चरच्या योग्य जागा सोडून बाजूला टोचल्या जातात. रुग्णांना हे काही समजत नाही.

२००९ साली ब्रिटिश मेडिकल जर्नलने अशा निरनिराळ्या चाचण्यांचा अभ्यास करून एक रिपोर्ट बनविला.

A small analgesic effect of acupuncture was found, which seems to lack clinical relevance. Whether needling at acupuncture points reduces pain, independently of psychological impact, is unclear.

समालोचन

ॲक्युपंक्चरची सुरुवात पारंपरिक चिनी वैद्यकापासून झाली. परंतु आता ही प्रणाली जगभर एक निराळे वैद्यक म्हणून वापरली जाते. भारतातही त्यास मान्यता मिळाली आहे. या क्रियेचा काहीही फायदा होत नाही असे म्हणणे कठीण आहे. परंतु त्याच बरोबर शास्त्रीयदृष्ट्या हे सिद्धही झालेले नाही की ॲक्युपंक्चर काम कसे करते!

प्रकरण १५ – आयुष

विषयाची मांडणी

  • आयुष मंत्रालय
  • औषधांचे मानकीकरण (standardisation) आणि गुणवत्ता नियंत्रण
  • योग्य दिशा?
  • ॲलोपथीची औषधे इतर वैद्यकांनी देण्याची सूट
  • सरकारचे प्रयत्न कोणासाठी? आयुषवरची टीका - छद्म विज्ञान
  • समालोचन

***

आयुष मंत्रालय

२०१४ साली आयुष मंत्रालय बनविण्यात आले. (Aayurved, Yoga, Unaani, Siddha and Homeopathy). भारतातील पारंपरिक वैद्यकीय प्रणालींमधील शिक्षण आणि संशोधन यांना प्रोत्साहन देणे हा उद्देश होता. २०१५ साली भारतात ८०,००० वैद्य आणि हकीम काम करत होते. Confederation of Indian Industryच्या एका रिपोर्टनुसार ३२०० कोटी रुपयांची आयुष औषधे बाजारात विकली जात होती.

आयुष मंत्रालयाखालील संस्था
भारत सरकारने पारंपरिक वैद्यकीय प्रणाल्यांचे शिक्षण, संशोधन आणि उपयोग वाढविण्यासाठी AYUSH (Ayurved, Yoga, Unani, Siddha, Homeopathy) मंत्रालय २०१४ साली बनविले. २०१७-१८ साली या मंत्रालयाचे बजेट १५०० कोटी रुपयांचे होते. पुढे ते वाढून ३००० कोटी झाले. मंत्रालयातर्फे खालील संस्था चालविल्या जातात
National Institute of Homeopathy , National Institute of Siddha , National Institute of Unani Medicine, National Research Institute for Panchakarma, National Institute of Ayurveda , All India Institute of Ayurveda, National Institute of Naturopathy, Morarji Desai National Institute of Yoga, North Eastern Institute of Ayurveda & Homeopathy

Central Council of Indian Medicine (CCIM) ही संस्था आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध या प्रणालीतील शिक्षणावर अंकुश ठेवते. होमिओपॅथीच्या शिक्षणासाठी Central Council of Homeopathy ही संस्था आहे.

सरकारी योजनेप्रमाणे देशात १०० नवी आयुष कॉलेज चालू केली जातील. पुण्यातील इंस्टिट्यूट ऑफ नेचरोपथीला १००० कोटीचे अनुदान देऊन सुधारणा केल्या जातील. ४००० आयुष पदवीधरांना नोकऱ्या दिल्या जातील.

अशा तऱ्हेने सर्व बाजूंनी सरकार आयुष वैद्यकीला मदत करीत आहे.

औषधांचे मानकीकरण (standardisation) आणि गुणवत्ता नियंत्रण

सरकारने आयुष औषधांसाठी फार्माकोपिया कमिशन बनविले आहे. या संस्थेकडे आयुष औषधांचे माहिती पत्रक बनविण्याची जबाबदारी आहे. या संस्थेकडे Ayurvedic Pharmacopoeia of India (API), Siddha Pharmacopoeia of India (SPI), Unani Pharmacopoeia of India (UPI) and Homoeopathic Pharmacopoeia of India (HPI) असे ग्रंथ बनविण्याची जबाबदारी आहे. या संस्थेने आत्तापर्यंत ९८६ औषधांची माहितीपत्रके छापली आहेत. या पत्रकात औषधे बनविण्यासाठी काय पदार्थ वापरावेत याची माहिती दिलेली आहे.

गुणवत्तेसाठी सरकारची Quality Council of India ही संस्था आहे. ज्या उत्पादकांची इच्छा असेल ते या संस्थेकडून गुणवत्ता प्रमाणपत्र घेऊ शकतात. पण हे अनिवार्य नाही.

योग्य दिशा?

आयुष मंत्रालयाने नवीन औषधांचे शोध, टॉक्सिसिटी अभ्यास आणि RCT यांवर चांगली माहिती २०१८ साली प्रसिद्ध केली. यावरून मंत्रालय आयुर्वेदाला योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न करीत आहे असे दिसते. पण या क्षेत्रात काम करणाऱ्यांना हे सर्व करण्याची इच्छा आहे? हे सर्व न करताच काम छान चालू आहे मग या उद्योगात कशाला पडा?

Volume-I: Guidelines for Drug Development of Ayurvedic Formulations
Volume - II: Guidelines for Safety/Toxicity Evaluation of Ayurvedic Formulations
Volume – III: Guidelines for Clinical Evaluation of Ayurvedic Interventions

आता इतक्या चांगल्या गाईडलाइन्स असताना प्रश्न कुठे आहे? कायदा आयुर्वेदाच्या औषधांचे दोन प्रकारांत वर्गीकरण करतो. क्लासिकल औषधे जी आयुर्वेदाच्या ५४ जुन्या ग्रंथांत वर्णिली आहेत, त्यांना हा कायदा लागू होत नाही. याचा अर्थ ४-५ हजार औषधे आणि विविध चिकित्सा पद्धती यांत आपण आपली प्रॅक्टिस सीमित ठेवली की आपल्याला काही कायदा लागू होत नाही.

मग या कायद्याचा अर्थ काय? जर एखादे औषध आपल्या नावाने आपण बाजारात आणत असाल तर हा कायदा लागू होतो. आणि पतंजलीने करोना काळात हीच "चूक" केली. त्यांनी आपल्या नावाने करोनावर औषध आणले. लगेच ते या कायद्याच्या सीमेत आले आणि त्यांना ते औषध मागे घ्यावे लागले. कारण Clinical Evaluation of Ayurvedic Interventions याच्या आवश्यक पायऱ्या त्यांनी पार पाडल्या नव्हत्या.

ॲलोपथीची औषधे इतर वैद्यकांनी देण्याची सूट

सद्यस्थिती

१. इंडियन मेडिकल कौन्सिल ॲक्ट १९५६प्रमाणे स्टेट मेडिकल कौन्सिलच्या रेजिस्टरमध्ये नोंद नसलेली व्यक्ती ॲलोपथीक औषधे देऊ शकत नाही.
२. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे स्टेट मेडिकल कौन्सिलच्या रेजिस्टरमध्ये नोंद असलेली व्यक्ती, जिचे शिक्षण आयुर्वेदिक, होमिओपथी अगर युनानी पद्धतीने झाले आहे, अशी व्यक्ती ॲलोपथीक औषधे देऊ शकते. प्रत्येक स्टेट सरकारला हे निश्चित करावे लागेल.
३. महाराष्ट्र सरकारने एका ओर्डिनन्सद्वारे आयुष डॉक्टरांना ॲलोपथीक औषधे देण्याची परवानगी दिली. असाच अध्यादेश आता तमिळनाडू, गुजरात, पंजाब हिमाचल प्रदेश या राज्यांनी काढला आहे.
४. केंद्रीय सरकार आयुष डॉक्टरांसाठी एक वर्षाचा एक कोर्स सुरू करण्याच्या विचारात आहे, ज्यायोगे हे डॉक्टर ॲलोपथीक औषधे देऊ शकतील.

आयुष पदवीधरांनी ॲलोपथीची औषधे देणे किती योग्य?

आयुष डॉक्टरांनी त्यांच्या शिक्षणात शास्त्रीय वैद्यकातील फार्मकोलॉजीचे शिक्षण घेतले नसेल तर नैतिकदृष्ट्या या डॉक्टरांनी शास्त्रीय वैद्यकातील औषधे देणे योग्य नाही. आपण हे पाहिले की BAMS आणि BHMS या दोन्ही पदवी शिक्षणात ॲलोपथीचे विषय शिकविले जातात. जर सरकारची अशी इच्छाच असेल की आयुर्वेद आणि होमिओपथीच्या पदवीधरांनी ॲलोपाथीची औषधे द्यावीत तर त्या अभ्यासक्रमात शास्त्रीय फार्मकोलॉजीचे शिक्षण जास्त प्रकर्षाने द्यावे.

याशिवाय हा प्रश्न निर्माण होतो की दोन हजार वर्षांची महान परंपरा असलेल्या आयुर्वेदास आणि दोनशे वर्षांपूर्वी उदयास आलेल्या होमिओपॅथीस, सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी उदयास आलेल्या शास्त्रीय वैद्यकापासून काही शिकावे का लागते?

दुसरा असा प्रश्न निर्माण होतो की जर आयुष डॉक्टरांनी ॲलोपथीची औषधे द्यायची असतील तर सरकारचा या प्रकारच्या वैद्यकीला आयुषद्वारा पुढे आणण्याचा प्रयत्न सुरुवातीलाच विफल ठरतो.

आय एम ए आणि औषध कंपन्या

इंडियन मेडिकल कौन्सिल ॲलोपथीची औषधे आयुषच्या डॉक्टरांनी देण्यास विरोध करत आहे, तर औषध कंपन्या अशी परवानगी द्यावी असा प्रयत्न करीत आहेत. औषध कंपन्यांचा प्रयत्न केवळ त्यांचा फायदा बघण्याकडे आहे. रोग्यांचे नुकसान झाले तर त्याची या कंपन्यांना काळजी वाटत नाही असे दिसते.

सरकारचे प्रयत्न कोणासाठी?

आयुर्वेद आणि होमिओपथीच्या पदवीधरांसाठी आयुष्मान भारत योजनेअंतर्गत १,२०,००० नोकऱ्या देण्यात येणार आहेत. या पदवीधरांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करायचे आहे. या पदवीधरांना सुरुवातीला २५००० रुपये दर महिना पगार दिला जाणार आहे. (Business standard, डिसेंबर १९१९ आणि टाईम्स, डिसेंबर २२)

आयुषच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील दिसते. यावर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. आपण पाहिले त्याप्रमाणे या सर्व वैद्यकीय प्रणाली शास्त्राच्या मानदंडांत उत्तीर्ण होत नाहीत. या शास्त्रावर आधारित प्रणाली नाहीत. केवळ या लेखमालेत असे सिद्ध झालेले नाही तर जगभरात जे या विषयावर संशोधन झाले आहे त्या सर्वांचा हाच निष्कर्ष आहे.

सरकार आयुर्वेद आणि इतर देशी प्रणालींना पूढे आणण्याचा प्रयत्न करीत आहे. या विषयी एक लेख मटामध्ये ३० डिसेंबर २०२२ला प्रसिद्ध झाला. लेखक डॉक्टर नितिन पाटणकर – मधुमेह तज्ज्ञ. त्या लेखातील काही विधाने विचार करायला लावणारी आहेत.

सर्व मेडिकल कॉलेजेस आणि सरकारी रुग्णालये यांत पारंपरिक आणि आधुनिक उपचारपद्धती एकत्र वापरण्यात येणार आहेत. या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केला आहे. रुग्णाला मिश्र उपचार देण्यात आले तर ते घातक ठरू शकतात. आयुर्वेद आणि ॲलोपथी यात असंकरिय फरक आहे.

सध्याच्या केंद्र सरकारचा आणि त्यांच्या शीर्ष नेतृत्वाचा ॲलोपाथीवरचा आकस दिसून आलेला आहे. तसेच त्यांचे ‘भारतीय’ म्हणून आयुर्वेदाचे प्रेम लपून राहिलेले नाही. अर्थात सरकारला ते स्वातंत्र्य नक्कीच आहे. परंतु दोन्ही पथींना स्वतंत्रपणे वाढू दिले पाहिजे. अनैसर्गिक एकत्रीकरण करू नये. सरकारने हवे तर प्रत्येक इस्पितळात आयुर्वेदासाठी निराळी जागा द्यावी. परंतु ॲडमिशनपासून डिस्चार्जपर्यंत उपचार एकाच पथीप्रमाणे व्हावेत. कोणता उपचार घ्यायचा ते पेशंट ठरवेल. एकाच वेळी दोन पथींची औषधे घेण्याने भांडणे आणि वाद होतील

खरे तर स्वतंत्र आयुष रुग्णालये चालू करावीत. आयुष उपचार पद्धती स्वतंत्रपणे मोठी झाली तर चांगलेच आहे. मिश्र उपचारपद्धतीमुळे स्वास्थ्यावर वाईट परिणाम होतील.

याच विषयावर डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांचा लेख वाचनीय आहे
शंतनू उवाच, २७ डिसेंबर २२, सर्व-पॅथी-समभावाचा आविष्कार, डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

आयुषवरची टीका - छद्मविज्ञान

आयुषसंबंधी काही आरोग्य मंत्रालयाची काही परिपत्रके टीकास्पद ठरली.

गर्भवती स्त्रियांनी अंडी आणि मांसभक्षण करू नये; डेंगी आणि चिकनगुनिया आजारांवर आयुषची औषधे वापरावी (या संदर्भात डॉक्टरांचे म्हणणे असे की या आजारांवर आयुष पद्धतीचे कोणतेही औषध काम करते हे सिद्ध झालेले नाही). मधुमेहावर कडू कारले काम करते असे आयुषचे म्हणणे, याला काही आधार नाही.

भारताचे सरकार ज्या वैद्यकीय प्रणालींना हजारो कोटी रुपये खर्च करून (जे आपल्या खिशातून जातात) पुढे आणण्याचा प्रयत्न करीत आहे, (Budget 2021 -22 Rs 2970 Cr, 2022 – 23 – Rs 3050 Cr) त्या सर्व वैद्यकीय प्रणाली जगभर छद्मविज्ञान ठरल्या आहेत.

समालोचन

एका मुख्याध्यापकांना असे वाटले की आठवीच्या एका वर्गाला विशेष सुविधा देऊन बारावीपर्यंत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या प्रबळ असा वर्ग तयार करावा. त्यांनी ही कल्पना शिक्षणमंत्र्यांना सांगितली. मंत्र्यांना कल्पना पसंत पडली आणि निधी मिळाला. मुख्याध्यापकांनी एक छान वसतिगृह बांधले. मुलांच्या जेवणाची उत्तम सोय केली. मुलाच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी उत्तम शिक्षक नेमले. प्रयोग चालू झाला. मुलांना सकाळी मैदानाला पळत तीन फेऱ्या मारण्यास सांगितले गेले. मुलांनी कंटाळा केला. मग शिक्षक म्हणाले, ठीक आहे सायकलवरून फेऱ्या मारा. मुले म्हणाली, अभ्यास फार पडतो. शिक्षक म्हणाले ठीक आहे प्रत्येक विषयातील दोन कठीण धडे काढून टाकू.

हाच प्रकार पारंपरिक वैद्यकाबाबतीत चालू आहे. सरकारने उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले. मग वैद्यक म्हणाले आम्हाला RCT जमणार नाही. सरकार म्हणाले ठीक आहे RCT करू नका. पारंपरिक वैद्यक म्हणाले आम्हाला ॲलोपाथी शिकायची आहे. सरकार म्हणाले शिका. पारंपरिक वैद्यक म्हणाले, आम्हांला ॲलोपाथीची औषधे द्यायची आहेत. सरकार म्हणाले, ठीक आहे, द्या.

क्रमशः

***

भाग १ - शास्त्रीय दृष्टीकोनातून निरनिराळ्या वैद्यकीय प्रणालींचे मूल्यांकन
भाग २ - ॲलोपथीच्या आधीचे पाश्चिमात्य वैद्यक
भाग ३ - आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त
भाग ४ - आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त – त्रिदोष
भाग ५ - परीक्षा आणि चिकित्सा
भाग ६ - आयुर्वेदाची औषधे – भाग १
भाग ७ - आयुर्वेदाची औषधे – भाग २
भाग ८ - आयुर्वेदाचे शिक्षण आणि नंतर
भाग ९ - आयुर्वेदाची प्रॅक्टीस
भाग १० - युनानी आणि सिद्ध
भाग ११ - निसर्गोपचार
भाग १२ - होमिओपॅथी आणि बाराक्षार - भाग १
भाग १३ - होमिओपॅथी आणि बाराक्षार - भाग २

field_vote: 
0
No votes yet

आयुषच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील दिसते. यावर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. आपण पाहिले त्याप्रमाणे या सर्व वैद्यकीय प्रणाली शास्त्राच्या मानदंडांत उत्तीर्ण होत नाहीत. या शास्त्रावर आधारित प्रणाली नाहीत. केवळ या लेखमालेत असे सिद्ध झालेले नाही तर जगभरात जे या विषयावर संशोधन झाले आहे त्या सर्वांचा हाच निष्कर्ष आहे.

सरकार आयुर्वेद आणि इतर देशी प्रणालींना पूढे आणण्याचा प्रयत्न करीत आहे. या विषयी एक लेख मटामध्ये ३० डिसेंबर २०२२ला प्रसिद्ध झाला. लेखक डॉक्टर नितिन पाटणकर – मधुमेह तज्ज्ञ. त्या लेखातील काही विधाने विचार करायला लावणारी आहेत.

भारतातल्या जुन्या उपचारपद्धती जाऊन नवीन अलोपथी कशी घुसली म्हणजे वापर वाढला आणि जुने मागे पडत चालले यांचा विचार करणारी लेखमालिका अपेक्षित आहे. त्या विचाराने 'युनानी, आयुर्वेद पद्धती आणि पर्यायी अलोपथी हा विषय योग्य ठरावा.
उगाचच छद्मविज्ञान हा जयघोष कशाला हवा? एक इतिहास म्हणून पाहायचं आणि सोडून द्यायचं.
उलट्या विचारांची सध्याची लेखमाला आहे. किंवा शैक्षणिक चिकित्सा ( अकेडमिक इंटरेस्ट) म्हणू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Allopathy उपचार घेवून सर्व आधुनिक उपचार टेस्ट करून .
पण चुकीचे निष्कर्ष आणि चुकीचे उपचार होतात... किरकोळ आजारात पण चुकीचे निष्कर्ष,आणि चुकीचे उपचार झाल्या मुळे लोकांचे जीव जातात..आणि हे प्रमाण खूप मोठे आहे.
ह्याचे स्पष्टीकरण कसे देणार..स्वतःच्या खालीच अंधार आहे त्यांनी पाहिले स्वतःला सुधारावे..
आणि नंतर दुसऱ्याच्या चुका काढाव्यात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दा तो नाही.

रस्त्याकडे कशीही रांगत वाढणारी छोटी वनस्पती पुनर्नवा ही सूज नाशक, मूत्ररोगावर आहे हे कुणी कसं शोधलं? पण त्यांच्याकडे अलोपथीसारखा methode in madness नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0