माणूस प्राणी नामशेष होणार का?
अमरत्वाचे स्वप्न पाहणाऱ्या मानवाला मृत्यूच्या बरोबरच्या झोंबाझोंबीत अजूनही म्हणावे तसे यश मिळालेले नाही. उलट हा लढा माणसाला गोत्यात आणत आहे. परंतु आता आपल्याला वैयक्तिक मृत्यूबद्दलचा (स्वार्थी!) विचार करायचा नसून संपूर्ण मानववंशाच्या अस्तित्वाबद्दल काळजी करायची आहे. विशिष्ट दिवशी हा मानव वंश नामशेष होणार, मानवासकट जगातील समस्त प्राणिवंश नष्ट होणार, महाप्रलय येणार, याबद्दलची भाकिते अधूनमधून वाचायला मिळत असतात. आजकाल असल्या अवैज्ञानिक भाकितांची भीती वाटेनाशी झाली आहे. आजच्या मानवाऐवजी दुसरा एखादा मानवसदृश प्राणी उत्क्रांत होत असल्यास त्याची भीती बाळगण्याचेही कारण नाही. फक्त अस्तित्वाच्या सातत्याचा विचार होत असल्यास उत्क्रांतीची कल्पना स्वीकारार्ह वाटते. परंतु हे कितपत शक्य आहे?
यासंबंधीची एक चांगली बातमी: आपल्याकडे भरपूर वेळ आहे. यापूर्वीच्या काही सस्तनी जाती 10 लाख वर्षे जगून नष्ट झाल्या व त्यातून उत्क्रांत होत होत दुसऱ्या जाती जन्माला आल्या. हेच खरे असल्यास होमो सेपियन मानववंशाची जात नष्ट होऊन दुसरी जात उत्क्रांत होण्यास अजूनही ८ लाख वर्षे शिल्लक आहेत. आपणही एक सस्तनी प्राणी आहोत हेच खरे असल्यास हा वेळ आपल्यासाठी उपलब्ध असेल. परंतु आपण इतक्या वेळा आपल्या वंशाबद्दल/जातीबद्दल उलट-सुलट विधाने करत आल्यामुळे सस्तनी प्राण्यांचे निकष आपल्याला लागू होतील की नाही याबद्दल शंका आहेत.
उत्क्रांतीचाच विचार केल्यास दोन ठळक गोष्टी आपल्या लक्षात येतील: एक विविधता व दुसरी निवड. जीववैविध्याला जनुकीय परिवर्तन कारणीभूत असून आपण त्यापासून अजूनही मुक्त झालेलो नाही. उलट जनुकीय परिवर्तनाचा वेग वाढतच आहे व मानवी कृत्रिम जनुकीय उत्परिवर्तनाला मर्यादा नाहीत अशी स्थिती आज आहे. त्याचप्रमाणे निसर्गावर मात करत नैसर्गिक निवडीतही आपण ढवळाढवळ करून त्याचे नियमही आपण बदलत आहोत. सामान्यपणे भोवतालच्या परिस्थितीप्रमाणे सजीवांचे अस्तित्व आकार घेत असते व त्यानुसार बदललेली जनुकांची रचना पुढच्या पिढीत दिसू लागते. परंतु माणसाने तंत्रज्ञान व वैद्यकीय ज्ञान यांच्या बळावर कुठल्याही भोवतालच्या नैसर्गिक परिस्थितीत तग धरू शकेल अशी व्यवस्था केलेली असल्यामुळे कदाचित नैसर्गिक निवडीला वाव नाही असेच वाटत असेल.
परंतु हे खरे नाही. जनुकीय विश्लेषणाच्या अभ्यासावरून अजूनही नैसर्गिक निवडप्रक्रिया चालूच आहे याबद्दल शंका नसावी. गेल्या ५० हजार वर्षात सुमारे १८०० जनुकीय उत्परिवर्तने (mutations) झालेली आहेत, असे एका अभ्यासाअंती लक्षात आलेले आहे. दुसऱ्या एका अभ्यासानुसार हा बदल फार वेगाने होत आहे. या जगावर प्रभुत्व गाजवण्याची मानवाची महत्त्वाकांक्षा व त्यातून उद्भवत असलेली गुंतागुंतीची संस्कृती यामुळे नैसर्गिक निवडीसाठीचा दबाव वाढत आहे व वाढतच जाणार आहे. त्यामुळे उत्क्रांती होत आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. फक्त ही उत्क्रांती आपल्याला कुठल्या दिशेकडे नेत आहे हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे.
माणसाच्या निसर्गाला ओरबडण्याच्या हव्यासापायी निसर्गाची मूळ प्रभावशाली शक्ती कुंठित झाल्यामुळे आपली उत्क्रांती दिशाहीन ठरत आहे. तरीसुद्धा त्याचे परिणाम जाणवण्याइतपत आहेत. शेकडो – हजारो वर्षानंतरच्या माणसांतील जनुकांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बदल झाले असतील की त्यामुळे त्याला मानव वा होमो सेपियन म्हणणेसुद्धा चुकीचे ठरू शकेल. कदाचित त्याला होमो न्यूव्हो असे नाव द्यावे लागेल. ही आजच्या माणसापेक्षा सर्वस्वी वेगळी जात असेल. ती कशी दिसेल, ती काय काय करू शकेल याबद्दल आपण नेमके काही सांगू शकणार नाही.
परंतु काही नैसर्गिक नाट्यमय घटना वा उलाढालीमुळेसुद्धा या प्रक्रियेला वेग येईल. एखाद्या अनामिक रोगाच्या साथीमुळे जगातील 90 टक्के माणसं मरून जातील व उरलेल्या 10 टक्क्यामध्ये या साथीला प्रतिकार करू शकणारे जनुक असल्यामुळे त्यांच्या नंतरची पिढी सर्वस्वी वेगळ्या जातीचीच ठरेल. हवामानातील बदल टोक गाठल्यास पृथ्वीवरील माणूस प्राणी दुसऱ्या एखाद्या ग्रह-उपग्रहावर जाऊन राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. जी काही उरली सुरली माणसे या जगात अशा स्थितीतही तगून राहू शकतील, त्यांचीसुद्धा वेगळ्या जातींत गणना करावी लागेल.
अत्याधुनिक प्रजनन-तंत्रज्ञानामुळे माणूस कृत्रिमरीत्या जनुकीय बदल घडवून आपल्याला हव्या तश्या गुणविशेष असलेल्या पिढ्यांना जन्म देईल. संगणक तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान, रोबोटिक्स या क्षेत्रांतील प्रगत संशोधनामुळे सुपरह्यूमनची पिढी जगावर सत्ता गाजवेल. बहुतेक जण अशा गोष्टीमागे लागलेले असले तरी अपवाद म्हणून काही ‘मागासलेले’ या गोष्टीपासून दूर राहतील. अशा प्रकारे मानववंशातच दोन तट पडलेले दिसू लागतील.
तरीसुद्धा मानववंश पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता धूसर वाटते. डायनोसारसारख्या प्राणिजातीप्रमाणे स्पर्धेमुळे, किंवा इतर बलाढ्य प्राण्यांच्या शिकारीमुळे, किंवा जनुकीय दुर्बलतेमुळे कदाचित हा प्राणी निर्वंश होणार नाही. शिवाय याची वाढत असलेली प्रचंड संख्या व त्याची बुद्धिमत्ता यांच्या जोरावर तो अजूनही बराच काळ तगून राहू शकेल. त्यामुळे त्याची समूळ नष्ट होण्याची शक्यता फार कमी आहे. परंतु मानवाच्या हातात नैसर्गिक आपत्तींना थोपवण्याची शक्ती नाही हेही तितकेच खरे. मोठमोठे उल्कापात, अस्टेरॉइड्स कोसळणे यांना मानवीवंश थांबवू शकणार नाही. कदाचित नावीन्याच्या ध्यासापायी व अती उत्सुकतेपायी माणूसच रेणू, अणू, परमाणूत बदल करून एखाद्या नवीन सजीवाची निर्मिती करू शकेल. हा सजीव कुठल्याही नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्याइतका सशक्त असेल. किंवा जैवतंत्रज्ञानातील अत्युच्च संशोधनातूनसुद्धा एखादा सजीव निर्माण होईल व मानवीवंशाला आपत्तीतून वाचवेल.
भविष्यात काय घडणार आहे हे आज नेमके सांगता येत नसले तरी आपले अस्तित्व क्षणभंगुर आहे हे मात्र निश्चित!
क्रमशः
या पूर्वीचे
मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (1) , प्रश्न (2), प्रश्न (3), प्रश्न (4), प्रश्न (5) प्रश्न(6) , प्रश्न (7), प्रश्न (8) , प्रश्न (9), प्रश्न (10)
?
"उलट हा लढा माणसाला गोत्यात आणत आहे."
हे काही कळलं नाही. अर्थात, धागाकर्ते काही स्पष्टीकरण द्यायला येतील ही अपेक्षा खूपच जास्त आहे, नाही का?
अमरत्वाची आस
खरे पाहता अमरत्व वा तत्संबंधीची मांडणी हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. परंतु या लेखमालेचा विषय मानवी अस्तित्वाविषयी असल्यामुळे अमरत्वासंबंधी ओझरता उल्लेख केला आहे.
मानवी प्राण्याला अत्यंत प्राचीन काळापासून अमरत्वाची आस आहे. आपल्या हिंदू धर्माच्या पुराण कथेत अश्वत्थामा, बली, व्यासऋषी, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम (व मार्कंडेय ऋषी) या अमरत्व मिळविलेल्या पुराणपुरुषांचे नित्यनेमाने स्मरण केल्यास मृत्युमुक्त होत नसलो तरी आपण रोगमुक्त होऊ शकतो अशी गॅरंटी दिलेली आहे. इतर धर्मग्रंथामध्येसुद्धा अमरत्वासाठीच्या अमृताऐवजी होली ग्रिल वा तसलेच कुठले तरी पेय पिऊन अमरत्व साध्य करून घेतल्याचे उल्लेख सापडतील.
प्राचीन काळात कदाचित अरण्यात तपस्या करणारे अमरत्वासाठी जडी-बूटी शोधत असावेत. परंतु त्याच्या शोधात ते यशस्वी न झाल्यामुळे हे अमरत्व अजूनही मृगजळ ठरलेले असून कुणाच्याही हाती लागले नसावे. परंतु २१व्या शतकातील जनुकशास्त्र, नॅनो तंत्रज्ञान, रोबोटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादींच्या प्रगत व अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे व मृत्युबद्दलचे गूढ उकलले असे वाटत असल्यामुळे अमरत्वाच्या संशोधनासाठी (पुन्हा) एकदा प्रयत्न केले जात आहेत. अपघाती मृत्यु व निसर्ग संकटातून होणारी जीवीतहानी यांचा अपवाद वगळता गंभीर आजार व वृद्धत्वामुळे होणाऱ्या मृत्युवर मात करणे शक्य आहे असे या विषयातील अभ्यासकांना वाटत आहे. शरीरातील पेशींना पुनर्जिवीत केल्यास व जनुकांची पुनर्रचना करणे शक्य झाल्यास मृत्युवर मात करता येईल असे अभ्यासकांचे मत आहे. आजारपणामुळे आपल्या शरीरातील कुठल्याही अवयवाला इजा झाल्यास वा वय वाढत गेल्यामुळे अवयव निकामी होत असल्यास त्याची आपोआप दुरुस्ती करण्याची यंत्रणा शरीरात असल्यास आपण जास्तीत जास्त काळ आरोग्यमय जीवन जगत मृत्युला टाळू शकतो, असेही अभ्यासकांना वाटत आहे. गूगल कंपनीचे इंजिनियर व फ्युचरालॉजीचे अभ्यासक, रे कुर्झवेल यानी तर पुढील सात-आठ वर्षात आपण मृत्युवर मात करू शकू अशी भविष्यवाणी वर्तविली आहे. मृत्युवर मात करण्यासाठीच्या संशोधनाला आर्थिक बळ पुरविणाऱ्यात अमेझॉनच्या सर्वेसर्वा जेफ बेझोज, गूगलचे सहव्यवस्थापक, सेर्जाइ ब्रिन, पेपालचे पीटर थीअल व रशियातील अनेक अनामधेय नवश्रीमंत आहेत. आणि या संशोधनात चीनही मागे नाही.
काही अभ्यासकांच्या मते अमरत्व हे एकाच वेळी वरदानही आहे व शापही आहे. मृत्यु नसल्यास एवढ्या तोंडांना खायला अन्न कुठून आणायचे? माणसाबरोबरच इतर प्राणीवर्गही अमर राहील का? पुढील काही दशकात प्रत्येक घराघरात आजोबा, पणजोबा, आज्जी, आज्जीची आज्जीसकट सर्व गोतावळा एकाच (वा वेगवेगळ्या) ठिकाणी राहू लागल्यास रहायला जागा आणायचे कुठून? उपलब्ध संसाधनासाठी भविष्यातील तरुण पिढीबरोबर वृद्ध स्पर्धा करत राहतील का? खायला अन्नाचा तुटवडा पडल्यास भुकेने व्याकूळ झालेल्या माणसांना मृत्युही येत नसल्यामुळे त्यांनी नेमके काय करावे? (कदाचित विज्ञान-तंत्रज्ञान माणसासाठी फोटोसिंथेसिसची प्रक्रिया शोधू शकेल.)
हे अमरत्व नैतिकता व कायदा-सुव्यवस्था यांच्यावर काय परिणाम करू शकेल? जर मृत्युचीच जीवनातून हकालपट्टी झाल्यास जीवन निरर्थक ठरणार नाही का? आधुनिक जीवन पद्धती इतक्या वेगाने पळत आहे की प्रत्येक जण काही ना काही तरी करत असतो परंतु त्यातून काही निष्पन्न होत नाही. जर आपल्या आयुष्यात वेळच वेळ असल्यास त्या वेळेचे करायचे काय? मोबाइलवरील रील्स बघत वा वाट्सअॅप विद्यापीठातील बाष्कळ मेसेजेस वाचत आपण आयुष्य काढणार आहोत का? आपल्याला माहित असलेल्यांचे व माहित नसलेल्यांचे मेसेजेस फॉर्वर्ड करण्यातच आयुष्य ढकलणार आहोत का?
भगवान शंकरानी मृत्यु देवता, यमराजांची काही कारणास्तव हत्या केल्यामुळे या पृथ्वीवरील मृत्यु हा प्रकार हद्दपार झाला असेल असे वाटेल. महाभारतातील यक्ष-युधिष्ठिर यांच्या संवादात यक्ष “जगात सर्वात मोठी आश्चर्यजनक गोष्ट कोणती असेल?” असे धर्मराजाला विचारतो. “दररोज किती तरी प्राणी यमसदनी जातात. हे माहित असून देखील तरीही जे जिवंत असतात ते मात्र दररोज जगण्याची इच्छा ठेवतात. यापेक्षा दुसरे आश्चर्य काय असेल?” असे धर्म उत्तर देतो.
याच प्रमाणे या पृथ्वीवरील संघटित धर्म-व्यवहाराचे काय होणार? मुळात प्रत्येक धर्म मृत्युनंतरच्या ऐष-आरामी जीवनाचे गाजर दाखवत तगून आहेत. त्यातून मृत्युलाच वजा केल्यास देव-प्रेषित-धर्म-पाप-पुण्य-स्वर्ग-नरक-आत्मा-अध्यात्म इत्यादींचे काय होणार? खरे पाहता या पृथ्वीतलावरील माणसाचा वावर हजारो वर्षापूर्वीचा आहे. त्या तुलनेने धर्माचा उदय फार फार तर हजार-दोन हजार वर्षापूर्वी झाला आहे. त्यामुळे जर विज्ञान-तंत्रज्ञानामुळे माणसाला अमरत्व मिळाल्यास आता असलेल्या धर्माची हकालपट्टी होऊन एखाद्या नवीन धर्माचा उदय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इतका विचार करायची गरज नाही
आज तुमचे वय 30 वर्ष असेल तर जास्तीत जास्त पुढील 50 वर्षाचंच विचार करा.
उगाच लाख वर्षांनी काय होईल पुढील 200 वर्षात काय होईल.
माणूस जगेल की नष्ट होईल.
असले फालतू चे टेंशन घ्यायची काही गरज नाही.
निर्माता सक्षम आहे त्याचा विचार करण्यासाठी.
निसर्गावर मात करणे खूप लांबची गोष्ट आहे माणसाने साथी च्या आजारावर विजय मिळवला तरी खूप झाले.
तेच सर्वात मोठे आव्हान आहे.
Covid सारखी साथ येईल आणि सर्व नष्ट करून जाईल हीच शक्यता जास्त आहे