संपादकीय - सत्याची (असली-नसलेली) चड्डी

संपादकीय अंकाविषयी

संपादकीय - सत्याची (असली-नसलेली) चड्डी

- चिंतातुर जंतू

सत्य चड्डी घालेघालेपर्यंत असत्याची निम्मी पृथ्वीप्रदक्षिणा घालूनही झालेली असते.
- विन्स्टन चर्चिल

मजेशीर आहे ना उद्धृत? आणि तेही अगदी चर्चिलला साजेसं? माझ्याकडे त्याचा स्रोतही आहे. हा घ्या.
नाही तर हा चालेल?

किंवा गूगलमध्ये सर्च करा : churchill quote on truth. सत्य जसं व्यक्तिसापेक्ष असतं तसंच गूगलही. त्यामुळे तुमचं गूगल काय करेल मला माहीत नाही, पण मला गूगलनं हे उद्धृत २ नंबरवर दाखवलं.

आता आणखी एक करा : a lie can travel halfway around the world सर्च करा. मला १ नंबरवर हे आलं.

आता हे जरा लांबलचक, गुंतागुंतीचं आणि म्हणून कदाचित थोडं कंटाळवाणं होतं आहे हे खरं आहे, पण ते सगळं वाचलंत तर तुमच्या लक्षात येईल की चर्चिल असं म्हणाला आहे असं म्हणायला खात्रीशीर स्रोत नाही. थोडक्यात, सध्या उपलब्ध माहितीनुसार तरी चर्चिल असं म्हणाला होता असा निष्कर्ष काढता येत नाही. इतकंच नव्हे, तर ह्या किंवा तत्सम उद्धृतांना तब्बल ३०० वर्षांचा इतिहास आहे.

तर ते असो. आता आपल्याकडे वळू — गोडसे भटजींच्या १८५७च्या काळातल्या अनुभवांवरचं ‘माझा प्रवास’ हे पुस्तक त्यांच्या मृत्यूनंतर १९०७मध्ये प्रथम प्रकाशित झालं, पण त्यातले अनेक अप्रिय किंवा असभ्य तपशील गाळून. उदा. झाशीची राणी आणि तिचा पती ह्यांच्याविषयीचे काही धक्कादायक तपशील त्यातून गाळलेले होते. नंतर जेव्हा दत्तो वामन पोतदारांनी ते पुनर्प्रकाशित केलं तेव्हा हे गाळलेले तपशील त्यांनी त्यात पुन्हा आणले.

इतिहासात अशी अनेक उदाहरणं जगभर आढळतील. रेटून खोटं बोलणं, सत्य लपवून ठेवणं किंवा अगदी नकळत खोटं पसरवलं जाणं ह्याला जगभराच्या संस्कृतींमध्ये प्रदीर्घ इतिहास आहे. किंबहुना, सत्याचा आणि त्यापर्यंत पोहोचण्याचा ध्यास सर्वदूर प्रचलित झालेला आहे, असा सत्यवान समाज जगाच्या इतिहासात सापडणारच नाही.

आणि तरीही, ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या मते २०१६ हे साल ‘पोस्ट-ट्रुथ’ ह्या शब्दाचं होतं. हे का? मुळात पोस्ट-ट्रुथ म्हणजे काय? ‘जनमत घडवण्यामधला वस्तुनिष्ठ सत्याचा प्रभाव कमी पडत चालला आहे आणि त्याउलट भावनिक आवाहनं किंवा वैयक्तिक श्रद्धांना केलेली आवाहनं अधिक प्रभावी होत चालली आहेत अशी परिस्थिती’ असं ऑक्सफर्ड डिक्शनरी त्याचं वर्णन करते.

म्हणजेच, हे निव्वळ खोटं बोलणं किंवा खरं लपवणं नाही, तर त्याहून अधिक आहे. आपल्या विचारसरणीनुसार विशिष्ट प्रसारमाध्यमांना येता जाता झोडणं खूप जणांना आवडतं, पण अधिकाधिक ‘आयबॉल्स’ मिळवण्याच्या शर्यतीत प्रसारमाध्यमं आपली विश्वासार्हता गमावून बसलेली आहेत, हे अशा सगळ्या विचारसरणीच्या लोकांना सहज मान्य होतं. सत्याच्या शोधात महत्त्वाची कामगिरी बजावण्याचा एकीकडे दावा करणाऱ्या गूगलचं ‘अधिक क्लिक्स = अधिक पैसे’ हे जाहिरातींतून पैसे कमावण्याचं प्रारूप ह्याला जबाबदार आहे, हे मात्र अनेकांच्या लक्षातच येत नाही. आणि गूगलचं नाव घेतलंच आहे, तर ह्या संदर्भात व्हॉट्सअॅप आणि ट्विटरादि समाजमाध्यमांचा उल्लेख केला नाही, तर चुकल्याचुकल्यासारखं वाटेल. ‘गणपती दूध पितो’सारख्या अफवा आपल्याला नव्या नाहीत, आणि कॉन्स्पिरसी थिअरीज तर गावच्या गजालींबरोबरच वयात आल्या असाव्यात. रामानंद सागरांची रामायण मालिका टीव्हीवर सुरू झाली तेव्हा रस्ते ओस पडत. सुमारे चाळीस कोटी लोकांनी तेव्हा ती पाहिली असावी असा एक अंदाज आहे. आणि आज भारतात सुमारे २० कोटी लोक व्हॉट्सअॅप वापरतात असाही एक अंदाज आहे. म्हणजे कदाचित असं म्हणता येईल की रस्ते ओस न पाडता, असतील तिथून आभासी जगात गजाली करण्यात आजचे भारतीय कसून सहभागी होतायत, पण पुढचा पल्ला गाठायला त्यांना अद्याप बराच वाव आहे.

लोक समाजमाध्यमांतून कोणती असत्यं पसरवतात असं पाहिलं तर त्यातला एक मोठा भाग स्वतःवरच्या कथित अन्यायाबद्दलचा असतो असं दिसतं. उदाहरणार्थ, ब्रेक्झिटच्या बाजूनं असलेल्या लोकांना असं वाटत होतं की युरोपला स्थिर ठेवण्यासाठी ब्रिटनच्या खिशातून खूप पैसे ओतले जातात. म्हणजे हे लोक स्वतःला अन्यायाचे बळी मानत होते. किंवा, एलफिन्स्टन रोड स्थानकावरची चेंगराचेंगरी झाल्यानंतर बुलेट ट्रेनला शिव्या देणारे मुंबईकरही स्वतःला अन्यायाचे बळी मानत होते आणि बुलेट ट्रेन त्या अन्यायाचं प्रतीक झाली. ब्राह्मणांना, मराठ्यांना, दलितांना, हिंदूंना, मुस्लिमांना, मुंबईकरांना, वैदर्भीयांना, शेतकऱ्यांना, सगळ्याच गटांना एकाच वेळी आणि सारखंच असं वाटत राहतं की आपल्यावरच खूप अन्याय होतो आहे. ह्याचा एकत्रित परिणाम आता अधिकाधिक ध्रुवीकरणाकडे होताना दिसतो आहे. अमेरिकेतल्या जनमानसाचा अभ्यास करणाऱ्यांना आता डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन्समध्ये मोठं ध्रुवीकरण होताना दिसत आहे. (उदाहरणार्थ संदर्भ) भारतातही परिस्थिती फार वेगळी नसावी.

स्वतःला अन्यायाचा बळी मानणं, किंवा एखाद्या मतमतांतरांच्या गलबल्यात आपल्याला सोयीस्कर असेल तेवढ्याच भागावर विश्वास ठेवणं अशासारख्या गोष्टींचा अभ्यास गेली कित्येक वर्षं मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, गेम थिअरीवाले गणितज्ञ आणि मेंदूवैज्ञानिक असे अनेक ज्ञानशाखांतले लोक करत आले आहेत. इतर प्राण्यांच्या तुलनेत कमालीची प्रगत संवादाची क्षमता असलेला माणसासारखा सामाजिक प्राणी इतरांशी संवाद साधण्याला अतिशय महत्त्वाचं मानतो. त्यामुळे उत्क्रांतीच्या काही अभ्यासकांचं असं म्हणणं आहे, की खरं काय आहे ह्यापेक्षा कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवल्यामुळे आपल्याला आपल्या समाजात सामावून घेतलं जाईल, हे माणसाला अधिक महत्त्वाचं वाटतं. आपल्याला सोयीची फेक न्यूज शेअर करणं हा त्याचाच एक भाग असू शकतो.

थोडक्यात सांगायचं, तर हवामानबदलाला प्रलयघंटावाद मानणं किंवा न मानणं हा (बऱ्याच लोकांसाठी) विज्ञानाचा आणि पर्यायानं वस्तुनिष्ठ सत्यासत्यतेचा भाग नसून तो आपल्या आयडेंटिटीशी संलग्न होतो. हे धोक्याचं आहे पण अपरिहार्य आहे. मग ह्यात आजची परिस्थिती पूर्वीपेक्षा वेगळी कशी आहे? समाजमाध्यमांमध्ये लोक आपल्या मतांना पुष्टी देणाऱ्या लोकांकडे जेव्हा वळतात तेव्हा ते लोक आपल्या परिसरातले नसण्यामुळे एक नवा गोंधळ होऊ लागतो : आपल्याला असं वाटत राहतं की आपल्यासारखेच निष्कर्ष पुष्कळसे अनोळखी लोकही काढताहेत, म्हणजे ते निष्कर्ष वस्तुनिष्ठ सत्यं असणार. म्हणजे सारख्या मतांमुळेच एकत्र आलेल्या समूहात आपण समूहाचं शहाणपण पाहू लागतो.

मानवी संस्कृती जितकी प्रगत होत गेली तितकं वास्तव अधिकाधिक गुंतागुंतीचं होत गेलं. आज संशोधन करणारा वैज्ञानिक जी सत्यं शोधून काढत असतो, ती आणि त्यांच्यामागचं तर्कशास्त्र समजून घेणं हे न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम समजून घेण्यापेक्षा अधिक गुंतागुंतीचं आहे. त्याचप्रमाणे कलेच्या किंवा तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात आज जे नवं होत आहे, ते समजून घेणं अधिक कठीण झालं आहे. कलेत वास्तव किती असावं आणि खोटं किती, आणि त्याच्या आजच्या जगाशी कसा संबंध लागत असेल?

‘पोस्ट-ट्रुथ’ विषयावरच्या ‘ऐसी अक्षरे’च्या ह्या अंकात त्यामुळे राजकीय, सामाजिक, कलात्मक अशा वेगवेगळ्या अंगांनी आम्ही ह्या संकल्पनेकडे पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. जुन्या पिढीच्या लोकांनी पाहिलेली असत्याची परंपरा आणि आताच्या काळातलं त्याचं रूप असं दोन्ही त्यात आढळेल. काही लेख गंभीर आहेत, काही कोपरखळ्या मारतील, तर काही दोन्ही करतील. हताश होऊन डोळे झाकून घेण्यापेक्षा जे आहे त्याकडे लोकांनी अधिक डोळसपणे पाहावं हाच ह्या खटाटोपामागचा आमचा उद्देश.

कारण, जर पाहिलंच नाही, तर सत्याला चड्डी आहे की नाही हे कसं कळावं?

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

उत्तम जमलं आहे संपादकीय. विषय रोचक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

छान कन्फ्युजन आहे जंतुजी.
(चड्डी आहे का नाही हा गहन प्रश्न आहेच पण नाडी न बां कडे है. जपून)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

संपादकीय अतिशय आवडलं. आभार!

हे धोक्याचं आहे पण अपरिहार्य आहे. मग ह्यात आजची परिस्थिती पूर्वीपेक्षा वेगळी कशी आहे?
.....ह्याबाबतच्या विधानाव्यतिरिक्त आणखी एक भाग म्हणजे पूर्वीच्या काळी बातम्या प्रसवणारी आणि पसरवणारी केन्द्रं प्रत्येकाच्या ताब्यात नव्हती. आज आहेत; नि त्यांचा एकत्रित रेटा होऊ शकतो हे भानही बऱ्यापैकी आहे.

आज संशोधन करणारा वैज्ञानिक जी सत्यं शोधून काढत असतो, ती आणि त्यांच्यामागचं तर्कशास्त्र समजून घेणं हे न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम समजून घेण्यापेक्षा अधिक गुंतागुंतीचं आहे.
.....पूर्ण लेखात हे एकच नीटसं कळलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

<<पूर्ण लेखात हे एकच नीटसं कळलं नाही.>>

म्हणजे थोडंसं असं की सतराव्या शतकात थोडं शिक्षण, थोडी हुशारी आणि थोडी चिकाटी एवढ्या बळावर एखादा माणूस उठून जर एखाद्या क्षेत्रातलं ताजं (Cutting Edge) संशोधन समजून घेण्याचा प्रयत्न करता तर ते आजच्या मानानं सोपं होतं. माणसाला जितकं अधिक माहीत झालं तितकं ताजं संशोधन समजून घेणं कठीण झालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लेख आवडला.

सत्य म्हणजे काय आणि ज्ञान नेमकं काय , आपल्या आजूबाजूचं वास्तव यांच्याबाबत , एकंदर संभाषिताचं प्रमाण विस्तृत आणि त्याचं स्वरूप सर्वदूर झाल्यामुळे गोंधळाचं स्वरूप प्राप्त होत गेलं. त्यातही "घेट्टो" करून राहणार्‍या, आपल्याला हवं तेच ऐकू पाहणार्‍या प्रवृत्तीना एकत्र बांधून त्यांचं रसायन करण्याची आणि त्यातून राजकीय फायदा करून घेण्याची अफाट क्षमता अणि पराकोटीचा धूर्तपणा यातून त्याला अक्राळविक्राळ स्वरूपही येत गेलं हा मुद्दा चांगला आलेला आहे.

मात्र या नाण्याची दुसरी बाजू म्हणजेच माहितीचं लोकशाहीकरण किंवा लोकशाहीमधला माहितीचा समान अ‍ॅक्सेस हा भाग आहे. आता हे बरोबरच आहे की सर्वांनाच माहितीच्या नाकातोंडामधे जाणार्‍या पाण्याला नेमकं कसं ग्रहण करावं हे उमजत नाही आणि बहुतांश लोकांना त्यामागे असलेल्या बिगडेटासारख्या यंत्रणा आणि यंत्रणा राबवणारे हात दिसत नाहीत. पण सुमारे पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत रोजच्या प्रादेशिक वर्तमानपत्राला अ‍ॅक्सेस नसलेला किंवा ती वाचता न येणारा वर्ग माहितीच्या गंगेचं पाणी आपापल्या स्वस्त पण स्मार्ट मोबाईलच्या नळातून पितो.

अतिसुलभीकरण करून सांगायचं तर शिक्षणाचा अभाव किंवा शिक्षणप्रसाराच्यी प्रक्रिया पूर्ण न झालेल्या समाजांमधे जे लोकशाहीचे जे प्रॉब्लेम्स आहेत तेच प्रॉब्लेम्स माहिती/सत्य/वास्तव यांच्या अ‍ॅक्सेसला वापरून स्वतःचं प्रबोधन करून घेण्याच्या प्रक्रियेचेही आहेत. या प्रक्रियेमधले खाचखळगे कसे टाळता येतील, त्यात व्हिसलब्लोअर्सचं, फॅक्टचेकर्सचं काम लोकांपर्यंत कसं पोचेल हा कळीचा मुद्दा.

प्रस्तुत अंकात याबद्दलही काही वाचायला मिळेल अशी अपेक्षा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

लेख आवडला. आपल्या भावकीच्या, आपलीच अस्मिता बाळगणारांच्या दुकानातून विकलं जाणारं तेच सत्य विकत घ्यायचं हा पोस्ट ट्रुथचा एक महत्त्वाचा पैलू आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चांगला प्रयत्न आहे. सत्य हे फारच थोड्यांना माहित असतं आणि ते संख्याबळावर हरतं. कधिकधी तर चड्डीतलाच विचारत फिरतो मी चड्डी घातली आहे का ते सांगा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संपादकीय खूप आवडले. सध्या भारतात व अमेरिकेत तरी हेच चित्र दिसत आहे. त्यावर नेमकेपणाने लिहीलेले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संपादकीय वाचून पोस्ट ट्रुथ चकलीची चव जिभेवर येऊ लागली.
दिवाळी मुबारक Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

वाह , झकास .. फार छान आहे हे संपादकीय ..
"आज संशोधन करणारा वैज्ञानिक जी सत्यं शोधून काढत असतो, ती आणि त्यांच्यामागचं तर्कशास्त्र समजून घेणं हे न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम समजून घेण्यापेक्षा अधिक गुंतागुंतीचं आहे. "
या नेमक्या शब्दात मांडलेल्या वाक्याबद्दल टाळ्या आणि अभिनंदन

"रेटून खोटं बोलणं, सत्य लपवून ठेवणं किंवा अगदी नकळत खोटं पसरवलं जाणं ह्याला जगभराच्या संस्कृतींमध्ये प्रदीर्घ इतिहास आहे."
"भारतातही परिस्थिती फार वेगळी नसावी."
या बाबतीतील भारतीय वर्तमानातील वास्तवाबद्दल फक्त संपादकीयच नाही तर एक विशेषांक सुद्धा कमी पडेल .. असे असताना हे इतपतच लिहून आपण का थांबला आहात हे कुतुहूल .. बिगडेटा देवाच्या तिसऱ्या डोळ्याचा दरारा कि काय ? असो .
अवांतर : बाकी रवी आमले यांची लेखमाला वाचत असणारच आपण ... सर्वसामान्य रयतेला नीट समजावून घेता येतंय त्यात . असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे हो !! मुखपृष्ठ भारी झालंय हे लिहायचं राहिलंच Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

संपादकीय तर उत्कृष्ट आहेच, त्याशिवाय हा विषय दिवाळी अंकासाठी घेणं, हे ही कौतुकास्पद आहे. हल्लीच्या जगांत, सत्य सुद्धा प्रत्येक माणसाला वेगवेगळं दिसत असावं, अशा तऱ्हेने त्याची मीमांसा केली जाते. धडधडीत, अनेक डोळ्यांसमोर केलेल्या हत्याही कोर्टात सिद्ध करता येत नाहीत.
एकाच राजकीय निर्णयातले सत्य लोकांना वेगवेगळे दिसते आणि मग भक्त आणि जहाल टीकाकार असे दोन पंथ निर्माण होतात.
थोडक्यांत सत्याला आपापल्या पसंतीच्या चड्ड्या चढवल्या जातात, आणि त्याही घट्ट इलॅस्टिकच्या! त्यामुळे कोणाला नाडी ओढण्याचीही संधी मिळत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

फारच आवडले. पोस्ट ट्रुथ जगात ट्रुथ इतके रिलेटिव्ह होत जाईल. १९८४मध्ये ऑर्वेलने 'सत्या'संदर्भात लिहिलेला हा उतारा या निमित्ताने वाचनीय आहे.

Winston sank his arms to his sides and slowly refilled his lungs with air. His mind slid away into the labyrinthine world of doublethink. To know and not to know, to be conscious of complete truthfulness while telling carefully constructed lies, to hold simultaneously two opinions which cancelled out, knowing them to be contradictory and believing in both of them, to use logic against logic, to repudiate morality while laying claim to it, to believe that democracy was impossible and that the Party was the guardian of democracy, to forget whatever it was necessary to forget, then to draw it back into memory again at the moment when it was needed, and then promptly to forget it again: and above all, to apply the same process to the process itself. That was the ultimate subtlety: consciously to induce unconsciousness, and then, once again, to become unconscious of the act of hypnosis you had just performed. Even to understand the word ‘doublethink’ involved the use of doublethink.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>मानवी संस्कृती जितकी प्रगत ... वास्तव अधिकाधिक गुंतागुंतीचं ... आज ... वैज्ञानिक ... सत्यं ... त्यांच्यामागचं तर्कशास्त्र ...अधिक गुंतागुंतीचं आहे.

सहमत. त्यातल्या त्यात स्वतःच्या ज्ञानेंद्रियाला जाणवणारे ते वस्तुनिष्ठ असण्याबाबत आपली बरीचशी खात्री असू शकते. (आणि तरी दृष्टिभ्रम, वगैरे चकवे असतातच). त्यामुळे नाइलाजाने का होईना, कामचलाऊ म्हणून थोडेसे शब्दप्रामाण्य मानावेच लागते. "नाइलाजाने" आणि "थोडेसे = कमीतकमी प्रमाणात" कडून वैचारिक आळसाने आपण घसरत-घसरत शब्दप्रामाण्याच्या आहारी जातो, आणि शब्दांच्या गोंगाटात आपल्याला हवे तेच शब्द ऐकून ते प्रमाण मानू लागतो, हा धोका आहे.
--
(वेगळा सहमतीचा मुद्दा)

>> की खरं काय आहे ह्यापेक्षा कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवल्यामुळे आपल्याला आपल्या समाजात सामावून घेतलं जाईल, हे माणसाला अधिक महत्त्वाचं वाटतं.

एखादा संदेह असला, तर सत्य येणे-वा-तेणेप्रमाणे असल्यामुळे आपल्याला काय वैयक्तिक फरक पडणार आहे? जर फारसा फरक पडणार नसेल, मात्र अमुक किंवा तमुक बाजू मानून आपल्या मित्रांशी/आप्तांशी संबंध घनिष्ठ होणार असतील, तर तथ्य जोखूण मानण्याबाबत समदृष्टी राहात नाही. लोकशाहीत आपल्या मताने बरेचदा असे कित्येक निर्णय घेतले जातात, त्या निर्णयांनी आपले थेट काहीच सुधारत किंवा बिघडत नाही. अशा परिस्थितीत "आप्तांशी संबंध घनिष्ठ होणे" हा निकष प्राथमिक होऊ लागतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे असलं काहीतरी लिहिणाऱ्यांचं (आणि पर्यायाने समजणाऱ्यांचं) मला फार म्हणजे फारच कौतुक वाटते.
लगे रहो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पोस्ट्ट्रुथचे संदर्भ कळले.
अपेक्षाभंगानंतरचं कवित्व म्हणता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अंकाची संकल्पनाच खरंतर बऱ्यापैकी क्लिष्ट आहे. तरीही अगदी सोप्या भाषेत बरंच काही सांगून जाणारा हा लेख खरंच आवडला.

म्हणजे कदाचित असं म्हणता येईल की रस्ते ओस न पाडता, असतील तिथून आभासी जगात गजाली करण्यात आजचे भारतीय कसून सहभागी होतायत, पण पुढचा पल्ला गाठायला त्यांना अद्याप बराच वाव आहे.

ह्याच्याशी सहमत. ह्यामागच्या कारणाबद्दलचं चिंतनही असतं तर आवडलं असतं.

आपल्यावरच खूप अन्याय होतो आहे.

नेमकं निरीक्षण. खरंतर 'फक्त' आपल्यावरच अन्याय होतोय हे एकेका व्होटबँकेला पटवून देण्यात राज्यकर्ते कमालीचे यशस्वी ठरलेले आहेत. आणि लोक मात्र त्याच आभासात रमताहेत. भारतीय तर सगळ्यात जास्त. हे का, ह्याचं उत्तर मिळालं तर आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

ह्यामागच्या कारणाबद्दलचं चिंतनही असतं तर आवडलं असतं.

त्यामागे चिंतन नाही; निव्वळ आकडेवारी आहे. म्हणजे, गजाली करायला भारतीयांना आवडतंच, पण असतील तिथून आभासी जगात गजाली करण्यात अद्याप तेवढे भारतीय सहभागी होत नाही आहेत. थोडक्यात, प्रगतीला वाव आहे Smile

खरंतर 'फक्त' आपल्यावरच अन्याय होतोय हे एकेका व्होटबँकेला पटवून देण्यात राज्यकर्ते कमालीचे यशस्वी ठरलेले आहेत. आणि लोक मात्र त्याच आभासात रमताहेत. भारतीय तर सगळ्यात जास्त. हे का, ह्याचं उत्तर मिळालं तर आवडेल.

त्याचं एक उत्तर राजेश्वरी देशपांडेंनी दिलं आहे. दुसरं उत्तर आबनावेंच्या लेखात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चिंतातुर जंतू म्हणजे अवधूत डोंगरे असावेत असा माझा संशय अजून गडद झाला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आस्तिक नास्तिक लोकांनी एकमेकांच्या परंपरेचा काचून नव्हे पण निदान वरवर आदर करणं महत्वाचं वाटतं. सिंगल लोकांनी कपलचा आदर करण्याचं सौजन्य निदान दाखवावं ह्यात वावगं काही नसतंय.