एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २०

१८५७चा उठाव – झाशीतील घटना

सुधीर भिडे

Know thyself, know thy enemy
- चिनी म्हण

मागच्या भागात आपण मीरत, दिल्ली, अवध आणि कानपूर येथील घटनांचा आढावा घेतला. या भागात आपण झाशीतील घटनांकडे लक्ष देऊ.

खालील माहिती चार पुस्तकांतून घेतली आहे -
झाशीची राणी, द. ब. पारसनीस, शुभसूचक प्रकाशन, १८९४, पुन:प्रकाशन वरदा बुक्स, १९९६
झाशीची राणी लक्ष्मीबाई, प्रतिभा रानडे, राजहंस प्रकाशन, २०१३
माझा प्रवास, गोडसे भटजी, सुमारे १८८३, पुन:प्रकाशन व्हिनस प्रकाशन, १९६६
१८५७चे स्वातंत्र्यसमर, स्वातंत्र्यवीर सावरकर, १९०७, पुन:प्रकाशन ग्राहकहित प्रकाशन २००८.

यामध्ये पारसनीस यांनी लिहिलेल्या पुस्तकाला महत्त्व आहे कारण ते पुस्तक उठावानांतर चाळीस वर्षांनी लिहिले. दुसरे म्हणजे संदर्भ देऊन लिहिलेले ते इतिहास लेखन आहे. गोडसे भटजींचे लिखाण त्यांचा वैयक्तिक अनुभव अशा थाटाचे आहे. पारसनीस त्यांच्या लिखाणात गोडसे भटजींच्या लिखाणाचा उल्लेख करीत नाहीत. गोडसे आणि पारसनीस यांच्या लिखाणात त्याच घटनांचा उल्लेख येतो. पारसनीसांच्या लिखाणात विरोधाभास दिसतो. ते लक्ष्मीबाईंची स्तुती करतात आणि इंग्रजांचीही स्तुती करतात. अशी शक्यता आहे की त्या काळात इंग्रजांच्या विरोधात काही लिहिणे शक्य नसेल! सावरकरांच्या पुस्तकात पारसनीसांच्या पुस्तकाचा संदर्भ येतो पण सावरकर त्या पुस्तकातील माहितीचा वापर करत नाहीत.

झाशी संस्थान

 • झाशी हे ५ हजार चौरस मैल क्षेत्राचे, १० लाख वस्तीचे संस्थान होते. १७०७पर्यंत हे संस्थान मुघलांच्या ताब्यात होते. मुघलांच्या पतनानंतर ते छत्रसाल राजाकडे गेले. छत्रसालाने ते पहिले बाजीराव पेशव्यास दिले. १७५६ साली त्या भागात पुंडाई झाली. पेशव्यांनी त्यांचे सरदार नेवाळकर यांस सैन्यासह पाठविले. नेवाळकरांनी बंडाई मोडून टाकली. त्यामुळे पेशव्यांनी त्यांना झाशीची सुभेदारी सोपविली. अशा प्रकारे नेवाळकरांनी १७५६ ते १८५६ असे शंभर वर्षे राज्य केले.
 • बाजीराव आणि इंग्रज यांच्यात वसई करार झाला. त्याप्रमाणे झाशी संस्थान इंग्रजांच्या वर्चस्वाखाली गेले आणि पुण्याच्या पेशव्यांची हुकूमत संपली – १८०२.
 • इंग्रज आणि झाशीचे सुभेदार यांच्यात मैत्री करार झाला. झाशीच्या रक्षणाची जबाबदारी इंग्रजांनी घेतली. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की इंग्रज झाशीच्या शासकाला पेशव्यांचे सरदार समजत होते राजे नव्हे. (आणि पेशवे स्वत: राजे नव्हते) – १८०४.
 • इंग्रजांच्या बरोबर एक नवीन करार करण्यात आला. नेवाळकर घराण्याला संस्थानाचे कायमचे अधिकार देण्यात आले. झाशी संस्थानातील कोणताही वाद झाला तर त्याचा निवाडा करण्याची सत्ता इंग्रजांना मिळाली. झाशीच्या सरदाराला कोणत्याही परकीयाशी पत्रव्यवहार करण्याची बंदी करण्यात आली – १८१७.
 • इंग्रजांचे ब्रह्मदेशाशी युद्ध झाले. झाशी सरकारने इंग्रजांना ७०,००० रुपये मदत म्हणून दिले. (आजच्या हिशोबाने १४ कोटी.)
 • नेवाळकरांना “इंग्लंडच्या महान बादशाहाचा एकनिष्ठ सेवक” अशी पदवी देण्यात आली. शासनव्यवस्था पूर्णपणे इंग्रज रेसिडंटकडे गेली. झाशीच्या किल्ल्यावर युनियन जॅक इंग्रज राजाचा ध्वज लावला गेला – १८३२.
 • पहिला राजा मेल्यावर रघुनाथराव यांस इंग्रजांनी राज्यावर बसविले. (१८३५) हे अतिशय दुर्व्यसनी होते. त्यांनी संस्थानाची दुर्दशा केली. त्यामुळे इंग्रज सरकारने संस्थानाची पूर्ण व्यवस्था हातात घेतली.
 • रघुनाथराव १८३८मध्ये निवर्तले. इंग्रज सरकारने गंगाधरराव यास गादीवर बसविले. हेच लक्ष्मीबाईचे पती.

गंगाधररावांची कारकीर्द

 • गंगाधररावांची योग्यता पाहून झाशीचा कारभार गंगाधररावांच्या कडे परत देण्यात आला. खजिन्यातील ३० लक्ष रुपयांची शिल्लक गंगाधररावांना देण्यात आली. गंगाधररावांनी दौलतीची चांगली व्यवस्था सांभाळली.
 • इंग्रजांच्या सैन्याच्या खर्चाकरिता १८४२ साली अडीच लाख उत्पन्नाचा मुलूख इंग्रजांना देण्यात आला.
 • गंगाधररावांनी त्यांच्या खाशा हत्तीसाठी चांदीची अंबारी आणि सोन्याचे अलंकार केले.
 • संस्थानाची ५००० फौज होती आणि चार तोफखाने होते.
 • गंगाधरराव सहकुटुंब काशी यात्रेला गेले. कलकत्त्यातील इंग्रज सरकारने सर्व प्रवासात त्यांची उत्कृष्ट सोय केली होती.
 • गंगाधररावांना १८५१ साली पुत्ररत्न झाले पण मूल तीन दिवसातच गेले.
 • गंगाधरराव धर्मनिष्ठ असल्याने ते आजारी झाल्यावर त्यांनी इंग्रजी औषध घेण्यास नकार दिला.
 • गंगाधररावांच्या मृत्यूपूर्वी एक दिवस पाच वर्षांचे बालक दत्तक घेण्यात आले. (गोडसे भटजींचे लिखाण असे की दत्तकविधानाच्या आधीच गंगाधर रावांचे मरण झाले होते) – १८५३
 • लक्ष्मीबाईंनी दत्तकपुत्र मान्य करण्यासाठी गव्हर्नर जनरलला अर्ज केला – डिसेंबर १८५३.
 • लक्ष्मीबाईंनी दुसरा अर्ज पाठविला. – फेब्रुवारी १८५४
 • डलहौसी यांच्या जाहीरनाम्यानुसार झाशी संस्थान बरखास्त करण्यात आले. या जाहीरनाम्यात असे लिहिले होते की झाशी हे सार्वभौम संस्थान कधीच नव्हते. नेवाळकर पेशव्यांचे सुभेदार होते. त्यानंतर ते कंपनीचे मांडलिक झाले. ही बातमी ऐकताच राणीच्या तोंडून 'मेरा झांशी देएंगा नही' (मेरी झांसी नही दुंगी) हे उद्गार बाहेर पडले असे सांगितले जाते. लक्ष्मीबाईंनी जाहीरनाम्याला प्रत्यक्षात कोणताच विरोध केला नाही. – मार्च १८५४
 • लक्ष्मीबाईंना ६०,००० रुपयांचे (आताच्या किमतीने १२ कोटी) वार्षिक तनखा निश्चित करण्यात आला.
 • लक्ष्मीबाईंनी गव्हर्नर जनरलला अजून एक विनंतीपत्र पाठविले. – एप्रिल १८५४
 • लक्ष्मीबाईंनी ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टर्सना अर्ज केला. त्यासाठी त्यांनी दोन वकील इंग्लंडला पाठविले. त्यांना ६०,००० हजार रुपये (आजच्या हिशोबाने १२ कोटी रुपये) दिले. या व्यक्ती इंग्लंडला जाऊन गायब झाल्या. – डिसेंबर १८५४
 • १८५५ साली राणीसाहेबांनी एक लक्ष रुपये कर्ज काढून (आजच्या हिशोबाने वीस कोटी रुपये) पुत्राचे मौंजीबंधन केले.
 • यानंतर कंपनीने झाशीचा कारभार आपल्या हाती घेतला. लक्ष्मीबाईंनी काशीला जाऊन तेथेच उर्वरित आयुष्य व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली. – सप्टेंबर १८५५
 • यानंतर पुढील दोन वर्षे लक्ष्मीबाईसाहेब यांनी सर्वसंगपरित्याग करून ईश्वर चिंतनात व्यतीत केली. परंतु ध्यानीमनी नसता त्यांच्यावर संकट येऊन कोसळले. (पारसनीस, पृष्ठ ६६)

वरील माहितीवरून खालील निष्कर्ष काढता येतात – घटना वरील संदर्भांतून, निष्कर्ष माझे!

 • १८०७पासूनच झाशीचे राज्य इंग्रजांच्या ताब्यात गेले होते. १८५४पर्यंत नेवाळकरांची सत्ता पूर्ण संपलेली होती. अशा स्थितीत ‘मेरी झाशी नही दूंगी’ या विधानाला फारसा अर्थ नव्हता.
 • १८५४ साली इंग्रजांनी पूर्ण ताबा घेतल्यावर सामान्यजनांत काही असंतोष दिसला नाही.
 • १८५७पर्यंत लक्ष्मीबाईंनी स्वातंत्र्यलढ्याचा विचार केलेला दिसत नाही. या उलट लक्ष्मीबाईंनी इंग्रजांना एकामागून एक अर्ज पाठवून दत्तकाला मान्यता देण्याची विनंती केली. शेवटी तर काशीला जाण्याचा विचार व्यक्त केला.
 • वरील सर्व वागणे स्वातंत्र्याची तळमळ असलेल्या व्यक्तीचे वाटत नाही.

झाशीतील उठाव
यानंतर आपण प्रत्यक्ष उठावाकडे वळू. खालील माहिती वर उल्लेखलेल्या संदर्भांतूनच घेतली आहे.

 • झाशीतल्या इंग्रजी सैन्यातील भारतीय सैनिकांनी उठाव केला. सैन्याने लुटालूट केली. झाशीतील ७० इंग्रज नागरिकांना मारण्यात आले यात १९ स्त्रिया आणि २३ मुले मारण्यात आली. यात राणीचा काही हात होता असे दिसत नाही. यानंतर बंडखोर राणीच्या वाड्यासामोर आले आणि त्यांनी राणीच्या नावाचा जयजयकार केला. त्यानंतर बंडखोरांनी राणीकडे ३ लाख रुपयांची मागणी केली. राणीने निरोप पाठविला की माझ्याकडे पैसे नाहीत. बंडखोरांनी धमकी दिली की राणीचा महाल जाळून टाकू. निरुपायाने राणीने आपले एक लक्ष रुपयांचे दागिने बंडखोरांस दिले. बंडखोर पैसे घेऊन दिल्लीकडे रवाना झाले. जून १८५७
 • राणीसाहेबांचे बंडवाल्यास बिलकुल साहाय्य नव्हते यात काही शंका नाही. उलट किल्ल्यात अडकलेल्या इंग्रजास राणीसाहेबांनी अन्न पोचविण्याची व्यवस्था केली. (पारसनीस, पुस्तक पृष्ठ ८१ )
 • आता झाशीवर कोणाचेच राज्य राहिले नाही. तेव्हा दत्तकाच्या नावाने राणीने कारभार हाती घेतला. झाशीमधील सर्व इंग्रजी अधिकारी मारले गेले असल्याने लक्ष्मीबाईंनी जवळ असलेल्या सागर येथील इंग्रजी अधिकाऱ्याला पत्र लिहिले. “झाशीमधील इंग्रजांचे काळे सैन्य क्रूर निघाले. त्यांनी युरोपियन अधिकाऱ्यांना आणि कुटुंबीयांना मारून टाकले आहे. माझ्याकडे सैन्य नाही. बंडवाले माझ्याशीही क्रूरपणाने वागले. त्यांच्या कर्माचे फळ म्हणून ते नरकात जातील “. दिल्लीला जाताना ते, ‘खुल्क खुदाका, मुलक बादशाह का, अंमल लक्ष्मीबाईका‘ अशा घोषणा देत गेले. सध्या माझ्यातर्फेच शासन चालत आहे. या पत्राला उत्तर देताना सागरच्या इंग्रजी अधिकाऱ्याने अशी घोषणा केली की इंग्रजी सैन्य जोपर्यंत झाशीत पोचत नाही तोपर्यंत इंग्रजांतर्फे राणी अंमल करेल.
 • दुसऱ्या पत्रात लक्ष्मीबाई सागरच्या इंग्रज अधिकाऱ्याकडे सैनिकी मदत मागत आहेत.
 • ओरछा येथील राजाने झाशीवर हल्ला केला. लक्ष्मीबाईंनी इंग्रजांची मदत मागितली. मदत आली नाही. राणीने स्वबळावर हल्ला परतवून लावला. ही माहितीही लक्ष्मीबाईंनी इंग्रजी अधिकाऱ्यांना कळविली. राणीने परत इंग्रजांच्या मदतीची याचना केली. ऑगस्ट १८५७.
 • जनरल रोज यांच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्याने झाशीस वेढा घातला. चार महिने वेढा चालल्यावर लक्ष्मीबाईंना हार निश्चित दिसू लागली आणि त्या वेढा तोडून पळून गेल्या. यानंतर इंग्रजांच्या सैन्याने झाशीत बेसुमार कत्तल केली. सर्व मोठ्या वाड्यांना आगी लावण्यात आल्या. झाशी शहरात मृत्यूचे तांडव आणि लुटालुटीचा हैदोस सात दिवस चालू होता. शहराचे रस्ते प्रेतांनी भरून गेले होते. पाच हजार नागरिक मारले गेले असा अंदाज आहे. जानेवारी १८५८

वरील घटनाक्रमावरून काही प्रश्न निर्माण होतात.

 • इंग्रजांच्या बायकामुलांना मारणे हे कोणते नैतिक कृत्य होते?
 • बंडखोरांच्या घोषणेचा अर्थ हा होता की इंग्रजांऐवजी मुघल बादशाहाचा मांडलिक म्हणून राणीचे स्थान होते. हे स्वातंत्र्य अपेक्षित होते?
 • बंडखोर सैनिकांनीच राजा घोषित करणे हा प्रकार नानासाहेब पेशवे, झाशीची राणी आणि दिल्लीचा बहादूरशाह या तिघांच्या बाबतीत घडला. या तिघांनीही राजा होण्याची इच्छा व्यक्त केली नव्हती.
 • इंग्रज अधिकाऱ्यास लिहिलेल्या पत्रात सैनिकांचा उल्लेख लक्ष्मीबाई काळे बंडखोर (mutineers) असाच करतात. लक्ष्मीबाईंनी शेवटपर्यंत इंग्रजांशी समेट करण्याचा प्रयत्न केला. परंतु इंग्रजांच्या गोटात राणीविषयी मत निराळे होते. इंग्रजांशी दत्तक प्रकरणासंबंधी पत्रव्यवहार चालू असताना लक्ष्मीबाई आजूबाजूच्या राजांना पत्रे लिहीत होत्या का? त्यात इंग्रजाबरोबर लढा करावा लागेल असे त्या मत व्यक्त करीत होत्या का? इंग्रजांच्या हस्तकांना याची चाहूल तर लागली नसेल? इंग्रजांनी वेढा घालून राणीला शरण येण्यास सांगितले. पण लक्ष्मीबाईंच्या मंत्र्यांनी युद्धाचा निर्णय घेतला.


झाशीची राणी

लक्ष्मीबाईंना युद्ध हवे होते का?

पारसनीसांच्या लिखाणावरून एक गोष्ट स्पष्ट होते की युद्ध केवळ गैरसमज, आणि राणीसाहेब आणि इंग्रज यांच्यातील संवाद बंद होणे यांमुळे झाले. इंग्रजांच्या बाजूने एक गैरसमज हा होता की झाशीतले बंड राणीसाहेबांच्या चिथावणीने झाले. आपण पाहिले त्याप्रमाणे यात काही सत्य नव्हते. दुसरे म्हणजे खालच्या पातळीवरचे इंग्रज अधिकारी, ज्यांना राणीसाहेबांबद्दल सहानुभूती होती, ते सर्व मारले गेले. त्यामुळे इंग्रजांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सत्य पोचविण्यास कोणीच उरले नाही. पारसनीसांच्या पुस्तकातील प्रकरण ९ आणि १० मधील काही विधाने उद्धृत करतो.

राणीसाहेबांची राजनिष्ठा इंग्रज सरकारास विदित झाली नाही. कमिशनर साहेबांना पाठविलेले अनेक खलिते त्यांच्या पर्यंत पोचले की नाही हे स्पष्ट होत नाही. राणीसाहेबांची कल्पना ही की आपण करत असलेली राज्याची व्यवस्था इंग्रज सरकारास पसंत असून, बंडाचा बीमोड झाल्यावर इंग्रज योग्य अधिकारी पाठवून कारभार ताब्यात घेतील. राणीसाहेबाचा हेतू त्यांच्या कारभारी लोकांनी इंग्रजास कळविल्या नाही हे खेदाची गोष्ट आहे. ‘दुर्मंत्री राज्य नाशाय’ असे म्हणावे लागते. राणीसाहेबांनी ग्वालेरला मंत्री पाठवून सल्ला विचारला. ग्वाल्हेरहून ‘गैरसमज दूर करावा आणि सलोखा ठेवावा’ असा सल्ला आला. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी ‘ होऊन राणीसाहेबांनी युद्धाचा निर्णय घेतला.

झाशीतील प्रलय

खालील माहिती पारसनीस यांच्या पुस्तकातून (प्रकरण १२) घेतलेली आहे.

गोऱ्या सैनिकांनी झाशी शहर ताब्यात आल्यापासून दिसेल त्याला मारण्याचा सपाटा लावला. रस्त्यात जागोजागी प्रेतांच्या राशी लागल्या सर्व शहर स्मशानवत वाटू लागले. दर चव्हाट्यावर प्रेतांचे ढीग जळू लागले. हजारो जनावरे जागोजागी मरून पडली होती.

यानंतर गोरे सैनिकांस लुटालुटीची सूट देण्यात आली. सोने, रुपे, हिरे, मोत्ये, पाचू सापडेल तितके लुटून नेले. राजवाड्यातील एकही मूल्यवान वस्तू ठेवली नाही. त्यानंतर काळ्या सैनिकांना लुटीची परवानगी देण्यात आली. सामान्य नागरिकांची प्रत्येक चीजवस्तू लुटली गेली.

झाशी शहरात उत्तम पुस्तकशाला होती त्याचा नाश करण्यात आला. शेवटी सर्व मोठ्या इमारतींना आग लावण्यात आली. असे सात दिवस झाल्यावर इंग्रज सरकारने सैन्याला शहराबाहेर नेले आणि शांती प्रस्थापित केली. इंग्रजांच्या छावणीमध्ये लुटलेल्या गोष्टींचा लिलाव करण्यात आला. आजूबाजूच्या राजे लोकांनी वस्तू खरेदी केल्या. (प्रेताच्या टाळूवरचे तूप खाणे, अशी मराठीत म्हण आहे.)

इंग्रजांनी राणीच्या दत्तकाला मान्यता द्यावी यासाठी आपले सर्वस्व गमावण्याची तयारी किती नागरिकांनी दाखविली असती? आपण वर पाहिल्याप्रमाणे राणीची लढाईची इच्छा नव्हतीच.

लक्ष्मीबाईच्या मृत्यूनंतर त्यांचे दत्तक पुत्र देशोधडीला लागले. त्यांना कोणीही आश्रय दिला नाही. शेवटी इंग्रज सरकारास ही माहिती कळली आणि इंग्रजांनी त्यांना महिना २०० रुपये पेन्शन देऊन इंदूर येथे त्यांची सोय केली.

गोडसे भटांचे झाशीतील घटनांचे वर्णन

माझा प्रवास, हे लिखाण गोडसे भटजी यांनी सुमारे १८८३ साली केले. याचा संदर्भ गेल्या भागात आला आहेच. झाशीचे राजे गंगाधर (लक्ष्मीबाईंचे यजमान) यांच्याविषयी गोडसे भट लिहितात – ( पृष्ठ ३३ ).

हा राजा षंढ आहे. वाड्यात स्त्री वेष घ्यावा. पैठणी नेसून चोळी अंगात घालीत असे. केस लांब ठेऊन सुगंधी तेले लाऊन वेणी घालीत असे. कधी खोपाही वेणीत असे. गळ्यात मोत्याच्या माळा, हातात गोठ-पाटल्या, नाकात नथ, व पायात जोडवी वगैरे स्त्रियांचे सर्व अलंकार घालून स्त्रियांबरोबर बोलणे करीत असे. हा राजा स्त्रियांसारखा महिन्याचे महिन्यास बाजूस बसून अस्पर्श दशा तीन दिवस भोगून चवथे दिवशी नहाणाचा मोठा समारंभ करीत असे.

गंगाधरराव आजारी झाल्यावर त्यांनी रसिदंड गार्डन (रेसिडंट गॉर्डन) यास कळविले की ते दत्तक घेऊ इच्छितात. रसिदंडने सांगितले की दत्तक पुत्रास खाजगी संपत्ती मिळेल, राज्य मिळणार नाही. गंगाधरराव कैलासवासी जाहल्यानंतर रसिदंड गारदण याने राज्य घेतले. लक्षुंबाईला केशवपनासाठीपण बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. लक्षुंबाई साहेबांनी एक अकरा-बारा वर्षांचा मुलगा दत्तक घेतला. थोड्याच दिवसांत छावणीतील पलटणीत बखेडा माजला. सर्व गोऱ्या लोकांस पलटणीतील लोकांनी ठार मारीले. त्यानंतर राणीसाहेबांनी आपल्या नावाची दवंडी पिटविली. शत्रूक्षय व्हावा म्हणून नवचंडी, सहस्रावर्तने, आणि काम्यग्रह यज्ञ करण्यात आले. बाईसाहेबांनी नव्या बंदुका, तोफा बनविणे सुरू केले. दोन प्रहरी बाईसाहेब कचेरीचे गाडीवर येऊन बसत. कधी पुरुष वेष असावा तर कधी स्त्री वेष असे. सर्व कामे दिवाणी आणि फौजदारी असत. लढाई होणार याची सर्व तयारी लागली होती.


झाशीचा भुईकोट किल्ला
गोडसे या किल्ल्यात तीन महिने राहिले.

किल्ल्याच्या भोवती प्रचंड तट आहे. त्याची रुंदी १६ ते २० फूट आहे. तटावरून तोफा सहज नेता येतात. किल्ल्याच्या मध्यभागी इंग्रजांचा युनियन जॅक फडकत असे. किल्ल्यात जागोजागी पाण्याचे हौद केले होते. मुख्य राजवाड्यात दोनशे माणसे मावतील अशी तळघरे होती.किल्ल्याच्या भोवती एक मोठा खंदक बांधीला होता.

(पारसनीस, पृष्ठ १२३)

जेव्हा किल्ल्यावर तोफगोळ्यांचा मारा होऊ लागला त्यावेळी लक्ष्मीबाईंनी ब्राह्मणांस किल्ल्याखाली असलेल्या गावात जाण्यास सांगितले आणि त्या रात्रीच लक्ष्मीबाई निसटून इंग्रजांच्या वेढ्याबाहेर निघून गेल्या.

प्रतिदिवसी दोनशे ब्राह्मण जेवित असत. यानंतर काही महिने गोरे लोक हिंदुस्थानात नव्हते. (येथे हे लक्षात घेतले पाहिजे की गोडसे भटजींच्या विचारात हिंदुस्तान म्हणजे उत्तरेचा काही भाग) मागून विलायतेहून गोरी पलटणे मुंबईस आली या गोऱ्या पलटण्या सातपुड्यातून मोहूत पोचल्या. हैदराबादच्या निजामाने पाच हजार स्वार आणि पायदळ दिले. तसेच सिनदे, होळकर, गायकवाड, घोरपडे यांच्याही पलटणी इंग्रजास मिळाल्या. इंदुरात आणि उज्जैनीत बंडे मोडून इंग्रजी फौज झासीकडे निघाली.

साहेबांनी झासिपासी डेरे दिले. मग साहेबांनी स्वाराबरोबर राणीसाहेबांस पत्र दिले. असे लिहिले की राणीसाहेबांनी येऊन भेटावे. राणीसाहेबांनी लिहिले की मी बायको माणूस, सबब येणार नाही दिवाणजी येतील. यानंतर झासीच्या चारों बाजूस सैन्य जमा केले. झासीतील मारवाडी आणि सावकारांनी आपला पैसा आणि बायकामुले ग्वाल्हेरात पोचविली. (यावरून हे दिसते की सर्वांस माहीत होते की शिंदे उठावात भाग घेणार नाहीत.) यानंतर युद्धास सुरुवात झाली. आठ दिवसांच्या युद्धानंतर एके रात्री बाईसाहेबांनी किल्ल्यातील माणसांस बाहेर जाण्याची आज्ञा दिली. त्याच रात्री बाईसाहेब इंग्रजाच्या वेढ्यातून निसटून पळून गेल्या. आम्हीही निघोन शहरात मांडवगणे यांजकडे राहावयास गेलो. त्यानंतर झासीत सर्वत्र लुटमार आणि कत्तल झाली. सर्व शहरात अग्नि पेटविला होता. त्यामुळे फारच हल्लकल्लोळ माजला होता. लुटारू लोकांनी घरात काहीएक ठेवले नाही. सर्व रस्त्यात प्रेते जमा करून तेथेच अग्नि दिला.

सावरकर यांच्या लिखाणातून आलेली माहिती

सावरकरांनी १८५७चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक १९०७ साली इंग्लंडमध्ये लिहिले. ( पुन:प्रकाशन ग्राहकहित प्रकाशन २००८) सावरकरांच्या लिखाणात झाशीच्या संस्थानाचा इतिहास येत नाही. पण तो इतिहास महत्त्वाचा आहे. कारण इतिहास हे दाखवितो की झाशीचे संस्थान इंग्रजांनी केव्हाच गिळंकृत केले होते. त्याविषयी आपण वर माहिती घेतलीच. सावरकरांच्या लेखनात दुसरी एक गोष्ट पुढे येते की नानासाहेब हे त्या घटनेचे खरे महानायक आहेत. जनमानसात झाशीच्या राणीचे बलिदान ही घटना मोठे घर करून बसली आहे. त्यामुळे नानासाहेबांच्या कामाकडे दुर्लक्ष होते. सावरकरांच्या लिखाणात हा उल्लेख येतो की इंग्रजी सैन्यात हैदराबाद, भोपाळ आणि ‘बॉम्बे’ येथील सैन्य होते ज्यात मुख्यत्वेकरून भारतीय सैनिक होते. लढाईच्या निर्णयाबाबत सावरकर लिहितात – लक्ष्मणराव बांडे, मोरोपंत तांबे, ठाकूर सरदार आणि सेना यांनी लढाई करायचे ठरविले. सावरकरही हे लिहीत नाहीत की लढाईचा निर्णय लक्ष्मीबाईंनी घेतला. राणीच्या सैन्याची इंग्रजी सैन्याने धूळधाण केली. पुढील घटना सर्वश्रुतच आहेत.

निष्कर्ष

अवध आणि झाशी या ठिकाणच्या घटनांतही पुष्कळ साम्य आहे. पतीनंतर दोन्ही ठिकाणी त्यांच्या बायकांनी लढा दिला – लक्ष्मीबाई आणि हजरत महल. झाशी आणि अवध या दोन्ही ठिकाणी इंग्रजांनी १८०१पासूनच आपला अंमल चालू केला होता. लढा त्यावेळेपासून देण्याची गरज होती.

अवधचा नवाब, नानासाहेब किंवा झाशीची राणी यांनी दिलेल्या लढ्यामागे व्यक्तिगत फायदा होता. नवाब, नानासाहेब आणि झाशीची राणी यांच्या मागण्या इंग्रजांनी मान्य केल्या असत्या तर त्यांनी लढा केला असता का?

सर्वांत महत्त्वाची बाब ही की या राजेलोकांत स्वतंत्र भारताचे स्वप्न नव्हते. त्यांना इंग्रजांकडून पिढ्यान्‌पिढ्या पेन्शन हवे होते.

आधुनिक शिक्षण आणि पत्रकारितेची सुरुवात याच एकोणिसाव्या शतकात झाली. त्याची पुढच्या भागात – भाग २१ – माहिती घेऊ.

मागचे भाग -

भाग १ – एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती
भाग २ – अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी
भाग ३ – अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती
भाग ४ – अठराव्या शतकातील शासनयंत्रणा
भाग ५ – धर्मशास्त्रे आणि कर्मकांडी धर्म
भाग ६ – अठराव्या शतकातील धर्माचे स्वरूप
भाग ७ – धार्मिक सुधारणांची आवश्यकता
भाग ८ – धार्मिक सुधारणांचे प्रयत्न
भाग ९ – समाजसुधारणा – दलित कोण आणि कसे?
भाग १० – समाज सुधारणा – दलितांच्या उद्धाराचे प्रयत्न
भाग ११ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १२ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १३ – समाजातील बदल
भाग १४ – समाजातील बदल – मुंबईचा विकास
भाग १५ – समाजातील बदल – पुण्याचा विकास
भाग १६ – समाजातील बदल
भाग १७ – दोन समाजसुधारक राजे
भाग १८ – १८५७चा उठाव
भाग १९ – १८५७ चा उठाव

लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.

सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण.

सुधीर भिडे

field_vote: 
0
No votes yet

झाशी च्या राणी चा शाळेत शिकवले लं इतिहास आणि ह्या लेखात सांगितलेला इतिहास परस्पर विरोधी आहे

इतिहास हा सोयी नुसार लिहला जातो हवा तसा सांगितला जातो अस वाटणे चूक नाही.

पुरावे पण आपल्या मताला योग्य असतील असेच वापरायचे हा प्रकार इतिहासकार नक्की च करत असतील .त्यांच्या वर तरी का विश्वास ठेवावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0