ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
माझा छोटा तान्त्रिक प्रश्न आहे. गूगलवर मराठी - देवनागरी शब्द टाकून शोध घेतला तर कधीकधी पुढे आलेले सर्व धागे हिंदी असतात. विशेषतः घातलेला शब्द मूळ संस्कृत असून हिंदी आणि मराठी ह्या दोन्ही भाषांमध्ये वापरला जाणारा असला तर असे फार होते.
उत्तरे मराठीवाली हवीत हे गूगलला कसे पटवायचे?