ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १९ (अंतिम)

प्रकरण १९ - ॲलोपथी हे सुनिश्चित शास्त्र नाही

सुधीर भिडे

या लेखमालेतील हा शेवटचा भाग आहे. पहिल्या भागापासून आत्तापर्यंत लिखाणावर प्रतिक्रिया येत राहिल्या. काही प्रतिक्रिया लिखाणावर टीका करणाऱ्या होत्या. जेव्हा गरज भासली तेव्हा त्यांवर मी माझे मत व्यक्त केले. जेव्हा माझे लिखाण अयोग्य वाटले तेव्हा माझ्या लिखाणात कोठे काय चूक आहे ते दाखवून देणे आवश्यक होते. आयुर्वेद आणि इतर प्रणाली यांविषयी मी जे काही मुद्दे मांडले त्यांत काय चूक होती हे टीका करताना सांगायला हवे होते. आयुर्वेदाविषयी मी स्पष्ट लिहिले होते की आयुर्वेदात सर्व टाकाऊ आहे असे मी म्हणत नाही. जे शास्त्राच्या कसोटीवर खरे उतरेल ते ठेवावे, इतर त्यागावे.

लेखमालेतील एक लेख वाचत असताना अशी शक्यता असते की वाचकाच्या मनात काही प्रश्न येतात त्यांची उत्तरे येणाऱ्या भागांतून मिळणार असतात. असे झाले असल्यास एक विनंती की जुने भाग परत नजरेखाली घालावे.

वैद्यकीय प्रणालीचे तीन भाग असतात. मूलभूत तत्त्वे, वैद्यकीय संस्था (हॉस्पिटले) आणि क्लिनिकल प्रॅक्टिस (डॉक्टर्स). माझ्या लिखाणात ॲलोपथीव्यतिरिक्त इतर प्रणालींच्या मूलभूत तत्त्वांवर मी भाष्य केले आहे, त्या प्रणालींच्या क्लिनिकल प्रॅक्टिसबद्दल नाही. कारण त्यांविषयी काही माहिती उपलब्ध नाही. या उलट ॲलोपथीमधील क्लिनिकल प्रॅक्टिसमधील उणिवांविषयी मी मागच्या भागात, भाग १८मध्ये लिहिले आहे. टीकाकारांनी हा फरक लक्षात घ्यावा.

मी स्वत: ॲलोपथी सोडून इतर प्रणालींवर विश्वास ठेवत नाही आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा, ॲलोपथीमधील उणिवा माहीत असूनही, फक्त ॲलोपथीचे उपचार घेतो. भविष्यातही तसेच करेन. जे ॲलोपथीवर टीका करतात ते ‘आम्ही ॲलोपथीचे उपचार घेतलेले नाहीत आणि भविष्यात घेणार नाही’ असे सांगू शकतील का?


आधुनिक वैद्यक ॲलोपथी

While in exact sciences, explanation and prediction have a logical structure; this is not so in inexact sciences. This permits methodological innovations in inexact sciences such as expert judgement.

In medicine, exact explanation of causes of diseases, concise diagnosis and absolute predictability of outcome of treatment are difficult, if not impossible!

Olaf Helmer and Nicholas Reshner – On the Epistemology of the Inexact Sciences – 1959

In recent years we have become much more aware that medicine is an inexact science.

British Medical Journal (2002)

***

खालील माहिती या लेखातून घेतली आहे.

Medicine is not science, July 2014, European Journal for Person Centered Healthcare 2(2):144-153
Authors: Clifford Miller, a Solicitor of the Senior Courts of England and Wales and former Lecturer in Law, Imperial College, London, UK
Donald Miller, Emeritus Professor of Surgery, Division of Cardiothoracic Surgery, University of Washington School of Medicine, Seattle, University of Washington Seattle

या लेखात वैद्यक हा शब्द वापरण्यात आला आहे. या संदर्भात या शब्दाचा अर्थ ॲलोपथीतली औषधे असा घेतला पाहिजे.

औषधांचा उद्देश व्यक्तीला आजारातून मुक्त करणे हा असतो. याचबरोबर हे लक्षात घेतले पाहिजे की कोणतीही एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते. यामुळे होते काय की उपचारांचा परिणाम एकसारखा राहत नाही आणि काही वेळेला अपयश हाती येते. वैद्यक परिणामांच्या शक्यतेवर (probability) आधारित असते. यामुळे वैद्यकाला शास्त्र म्हणणे योग्य आहे का हा प्रश्न निर्माण होतो.

या पार्श्वभूमीवर आपल्याला भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांसारखी हार्ड सायन्सेस आणि वैद्यकासारखे सॉफ्ट सायन्स यांत फरक केला पाहिजे. हार्ड सायन्सेसमध्ये कोणत्याही प्रयोगाचा परिणाम प्रत्येक वेळी, न चुकता तोच येणे अपेक्षित आहे. ही गोष्ट वैद्यकासारख्या सॉफ्ट सायन्समध्ये शक्य नाही.

हार्ड सायन्सचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे ज्या परिस्थितीत प्रयोग केले गेले नाहीत त्या परिस्थितीत काय परिणाम येतील याचे अचूक अनुमान बांधणे. याचे उदाहरण म्हणजे अवकाशयान चंद्रावर उतरवण्यासाठी गुरुत्वाकर्षणातील बदलामुळे किती बल वापरावे लागेल याचे अचूक अनुमान करणे. असे अनुमान वैद्यकामध्ये शक्य नाही.

आपण आता विचार करू की वैद्यकीय संशोधन शास्त्रीय आहे का?

वैद्यकीय संशोधनात ह्या प्रश्नाचा विचार होतो की अ या कारणाने क प्रकारची लक्षणे दिसतात का? (क हा आजार होतो का?) दुर्दैवाने व्यक्तीमध्ये क प्रकारची लक्षणे केवळ एका कारणाने प्रतीत होत नाहीत. अच्या मागे निरनिराळ्या व्यवस्थांनी निर्माण केलेली स्थिती असते. या शिवाय दोन व्यक्तींत काही साम्य नसते. यामुळे प्रत्येक वेळी अमुळे क ही लक्षणे (क हा आजार) दिसतीलच असे सांगता येत नाही. बऱ्याच व्यक्तींत अमुळे क लक्षणे दिसली तरी काही व्यक्तींत दिसणारही नाहीत.

वैद्यकक्षेत्रात randomized, double blind controlled trials याला फार महत्त्व दिले जाते. RCT हे शास्त्र नव्हे. RCTमधून जी माहिती मिळते ती केवळ शक्यता (probability) दाखविते. RCT आपल्याला हे सांगत नाही की किती वेळा औषध काम न करण्याची शक्यता आहे.

लेखात वर हा उल्लेख आला आहे की प्रत्येक व्यक्ती निराळी असते. डॉक्टर विलियम्स यांनी १९५६ साली हा सिद्धांत मांडला. या सिद्धांताला Biochemical Individuality असे म्हणतात. या सिद्धांताप्रमाणे जे औषध एका व्यक्तीवर काम करेल ते दुसऱ्या व्यक्तीसाठी लागू पडेलच, असे सांगता येत नाही. ॲलोपथीच्या वैद्यकामध्ये आतापर्यंत सगळे लोक एकसारखेच (one size fits all) असा विचार केला जात असे. तो बरोबर नाही हे आता ध्यानात येऊ लागले आहे. आणि याच कारणामुळे ॲलोपथीच्या वैद्यकाला सुनिश्चित शास्त्र म्हणता येत नाही.

डॉक्टर सुरेश कटककर M.D. FRCPC, FACP, Sc.D. अमेरिकेत कॅलिफोर्निया राज्यात राहतात. त्यांचे स्पेशलायझेशन Haematology and Oncology असे आहे. त्यांचे स्वत:चे कॅन्सर हॉस्पिटल होते. त्यांच्या पंचेचाळीस वर्षांच्या प्रॅक्टिसच्या अनुभवावरून या विषयावर त्यांनी व्यक्तिगत संवादात काय लिहिले आहे ते पाहू. ते माझे मित्र असल्याने त्यांनी मला पाठविलेल्या ई मेलचा हा स्वैर अनुवाद आहे.

वैद्यकाची प्रॅक्टिस करताना बऱ्याच वेळेला डॉक्टरांना प्रश्न पडतो की वैद्यक पूर्णपणे शास्त्रीय वैद्यक आहे का? जे अनुभव येतात त्याचे केवळ तर्काने उत्तर सापडत नाही. कारण आणि परिणाम यांचे गणित बसत नाही. त्यामुळे हा प्रश्न मनात येतो.

साध्या खोकल्याचे उदाहरण घेऊ. एक प्रकारच्या जिवाणूंचा घशात संसर्ग झाला तर घसा खराब होऊन खोकला येतो. अशा प्रकारचा खोकला पेनिसिलीनसारख्या साध्या प्रतिजैविकामुळे बरा होतो. हा झाला कारण-परिणाम संबंध. परंतु खोकला निराळ्या प्रकारच्या जिवाणूंमुळे किंवा विषाणूंमुळेही होऊ शकतो. विषाणूंमुळे झालेला संसर्ग प्रतिजैविकांनी बरा होत नाही. साध्या वाफाऱ्याने बरा होतो. म्हणजे एक कारण – एक परिणाम आणि एक उपचार हा संबंध धोक्यात येतो. या संदर्भात मला एका रुग्णाचा अनुभव सांगतो. या पेशंटला रात्री जास्त खोकला यायचा. घसा तपासला तर काही संसर्ग दिसेना. मी अटकळ बांधली की या व्यक्तीच्या घशाच्या रचनेत काही प्रॉब्लेम असावा. त्या व्यक्तीचा आडव्या स्थितीत आणि उभ्या स्थितीत एक्स रे काढले. असे दिसून आले की लिंफ नोड्स श्वासनलिकेवर दाब आणत होते. मग त्या व्यक्तीची सर्जरी करून त्रास देणारे नोड्स काढण्याचे ठरले. का कोणास ठाऊक मला असे वाटले की पेशंटचा परत एक्स रे काढावा. पहिल्या चाचणीनंतर पंधरा दिवस गेले होते कारण शल्यक्रियेसाठी त्या व्यक्तीच्या निरनिराळ्या चाचण्या कराव्या लागल्या. या वेळी केलेला एक्स रे नॉर्मल आला. आणि पेशंटचा खोकलाही बरा झाला होता. असे म्हणले पाहिजे की त्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीने जो काही संसर्ग होता तो बरा केला, लिंफ नोडची सूज गेली आणि खोकला गेला. आता पाहा की –

लक्षण एक - खोकला. कारणे तीन आणि उपचार तीन. आता याला exact science कसे म्हणावे?

वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये हा अनुभव येतो की एकाच आजारावर तीच औषधे सर्व रुग्णांवर तोच परिणाम दाखवत नाहीत. याचा अर्थ रुग्णांमध्ये काहीतरी जैविक फरक असणार. दोन व्यक्तींना झालेल्या फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये असणाऱ्या कॅन्सरच्या पेशी सूक्ष्मदर्शकाखाली एकसारख्या दिसल्या तरी त्यांच्या जनुकांत फरक असतो; तो सूक्ष्मदर्शकात दिसत नाही. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीवर उपचार निरनिराळ्या प्रकारे करावा लागतो. जरी एकच औषध दोन व्यक्तींवर काम करताना दिसले तरी एखादवेळेस औषधाचे प्रमाण कमीजास्त करावे लागते. एका पेशंटची मूत्रपिंडे त्याच औषधाचा लवकर निचरा करतील तर दुसऱ्याची उशिराने. एका पेशंटचे यकृत व्यवस्थित काम करून औषध योग्य प्रकारे मार्गी लावते, तर दुसऱ्या पेशंटचे यकृत नीट काम करत नाही आणि त्या पेशंटला औषधाच्या प्रतिक्रिया येतात. यासाठी डॉक्टरांना प्रत्येक पेशंटसाठी निराळे ‌वेळापत्रक बनवावे लागते.

हा प्रकार exact science या सदरात मोडत नाही.

आजच्या युगात प्रत्येक गोष्टीचे शास्त्रीय कारण आपण शोधत असतो. यामुळे ॲलोपथीचे वैद्यक आपल्याला भावते. दुर्दैवाने जीवनातील प्रत्येक गोष्ट काळी किंवा पांढरी नसते. ॲलोपथीचे वैद्यक याच प्रकारचे आहे. ते अशास्त्रीय निश्चितच नाही पण पूर्णपणे शास्त्रीयही नाही.

अभियंत्याने एकदा एक इंजिन डिझाईन केले आणि प्रथम एक इंजिन बनविले की त्या नंतर त्या प्रकारची तशीच्या तशी शेकडो इंजिने बनविता येतात. मानवी प्राण्याचे तसे नाही. प्रत्येक व्यक्ती एकमेवाद्वितीय असते. आपल्यासारखी दुसरी कोणतीच व्यक्ती नसते. आपण प्रत्येक जण जनुकीयदृष्ट्या, जीव-रसायनदृष्ट्या आणि शरीररचनादृष्ट्या निराळे असतो. साहजिकच प्रत्येक रुग्णाला एकाच उपचाराचे येणारे अनुभव निरनिराळे असतात.

आपल्या प्रत्येकीच्या शरीरातील बदलाशिवाय रुग्णाची मानसिकताही रोगनिवारणात मदत करते. आणि प्रत्येकीची मानसिक स्थिती निराळी असते. जे रुग्ण सकारात्मक विचार करतात ते लवकर बरे होतात.

याच बरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे की ॲलोपथीची औषधे ही संख्याशास्त्राच्या दृष्टीतून बहुसंख्य पेशंटना उपकारक ठरलेली असतात. याचा अर्थ अशी शक्यता राहते की ती औषधे काही रुग्णांवर काम करणार नाहीत. भविष्यात याची कारणे शोधून काढण्याचा शास्त्रज्ञ निश्चितच प्रयत्न करतील आणि त्यावर इलाज सांगितले जातील. आज मात्र औषधे शक्यता या प्रकारात काम करतात.

ॲलोपथीला शास्त्रीय वैद्यक म्हणता येईल का?

या भागात आपण हे पाहिले की ॲलोपथी हे exact science नाही. त्या क्षेत्रात काम करणारे त्याला inexact science समजतात.

इतर प्रणालींना लावले ते मानदंड ॲलोपथीला लावले तर काय दिसते?

ज्या मूळ सिद्धांताच्या पायावर हे वैद्यक उभे आहे हे सिद्धांत कसे सिद्ध झाले? परत प्रयोग करून हे सिद्धांत पाहिजे तेव्हा सिद्ध करता येतील का? या प्रयोगातून काय प्रकारचे मोजमाप वापरण्यात आले? सुरुवातीला ग्राह्य धरलेले कोणते सिद्धांत नंतर चूक ठरले?

आपण हे पाहिले की इतर वैद्यकीय प्रणाली काही थोड्या मूलभूत सिद्धांतावर आधारित आहेत. ॲलोपथीचे तसे नाही. ॲलोपथीच्या मूलभूत सिद्धांताचे एक स्वतंत्र शास्त्रच आहे – फिजिऑलॉजी. इथे काही थोडके मूलभूत सिद्धांत नाहीत; शेकडो आहेत. हे सर्व सिद्धांत शास्त्रीय प्रयोगांती सिद्ध झाले आहेत. ते आजही प्रयोगाने पडताळून पाहता येतात. या शास्त्रात अव्याहत संशोधन चालू आहे. एक जीव कसा निर्माण होतो आणि कसा जगतो, आजार कसे होतात, एका पेशी पासून ते अवयवापर्यंत कसे काम होते याचा निरंतर तपास केला जातो.

अशा प्रयोगांचे शोधनिबंध इतर तज्ज्ञांनी तपासून मग प्रसिद्ध केले जातात का?

शास्त्रीय प्रयोग झाल्यावर जगाला माहिती देण्यासाठी शोधनिबंध प्रकाशित होतात. कोणीही ते प्रयोग पडताळून पाहू शकते. प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात काही उणिवा आढळल्या तर त्या लगेच निदर्शनाला आणल्या जातात.

रोगाच्या निदानासाठी काय प्रकारच्या चाचण्या वापरल्या जातात. या चाचण्यांत काय मोजमाप केले जाते? चाचण्यांच्या निष्कर्षांची नोंद मानवी हस्तक्षेपाशिवाय होऊ शकते का?

शरीरातील द्रवपदार्थ, रक्त, मूत्र इत्यादी, यांचे रासायनिक विश्लेषण (ॲनालिसिस) आणि नवी इमेजिंग टेकनिक्स या दोन्हीचा वापर करून शेकडो चाचण्या केल्या जातात. या चाचण्याचे निकाल मानवी हस्तक्षेपाशिवाय नोंदले जातात (रेकॉर्ड होतात); यामुळे रोग निदानाच्या चाचण्या ह्या पूर्णपणे वस्तुनिष्ठ (objective) आहेत, व्यक्तिनिष्ठ (subjective) नाहीत.

औषध देण्याअगोदर RCT केल्या जातात का? RCT कुठल्या संस्थेमार्फत केली जाते? या संस्थेची स्वायत्तता कशी राखली जाते?

प्रत्येक देशात RCT करणारी एक स्वायत्त संस्था असते (भारतातही आहे). १९९०पासून प्रत्येक औषध बाजारात आणण्यापूर्वी RCT केली जाते.

आता या भागात जे लिखाण आले आहे त्याचा विचार करू. प्रथमत: हे विचार करण्यासारखे आहे की वैद्यक हे पूर्ण शास्त्र आहे का, याविषयी शंका वैद्यकातील तज्ज्ञ घेत आहेत. असे विचार आणि असे लिखाण कोणत्या आयुर्वेदाच्या वैद्याकडून अपेक्षित करता येणार नाही. दुसरे म्हणजे वैद्यक पूर्णपणे अशास्त्रीय आहे असे कोणी म्हणत नाही. वरील लिखाणात वैद्यकाचा उल्लेख soft science or inexact science असा येतो.

या भागातील लिखाणावरून असे दिसते की वैद्यकाचा जेव्हा रुग्णांशी संबंध येतो तिथे अनिश्चितता चालू होते. यावरून असे वाटते की शरीरविज्ञान – फिजिऑलॉजी – यातील संशोधन हे शास्त्रीय संकल्पनेच्या जवळ जाते. कारण शरीरविज्ञानातील संशोधनात रुग्ण ही संकल्पना कमी महत्त्वाची असते. क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये रुग्ण केंद्रस्थानी असते. आणि त्यामुळे कशा प्रकारचे प्रश्न उभे राहतात ते आपण पाहिले. RCTमधील अनिश्चितता याचाही वर विचार झाला. परंतु RCT बंद करणे हे तर उत्तर ठरत नाही? RCTमध्ये काय सुधारणा करता येतील त्याचा विचार व्हावा.

निष्कर्ष म्हणून आपण एवढेच म्हणू शकतो की इतर वैद्यकांच्या तुलनेत ॲलोपथी शास्त्रीय संकल्पनांच्या जवळ जाते.

(समाप्त)
***

भाग १ - शास्त्रीय दृष्टीकोनातून निरनिराळ्या वैद्यकीय प्रणालींचे मूल्यांकन
भाग २ - ॲलोपथीच्या आधीचे पाश्चिमात्य वैद्यक
भाग ३ - आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त
भाग ४ - आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त – त्रिदोष
भाग ५ - परीक्षा आणि चिकित्सा
भाग ६ - आयुर्वेदाची औषधे – भाग १
भाग ७ - आयुर्वेदाची औषधे – भाग २
भाग ८ - आयुर्वेदाचे शिक्षण आणि नंतर
भाग ९ - आयुर्वेदाची प्रॅक्टीस
भाग १० - युनानी आणि सिद्ध
भाग ११ - निसर्गोपचार
भाग १२ - होमिओपॅथी आणि बाराक्षार
भाग १३ - होमिओपॅथी आणि बाराक्षार
भाग १४, १५ - ॲक्युपंक्चर आणि आयुष
प्रकरण १६ - ॲलोपथी
प्रकरण १७ - ॲलोपथीतील बदल
प्रकरण १८ - ॲलोपथीतील उणिवा

field_vote: 
0
No votes yet

सर
आपले सर्व लेख आणि दोन्ही मालिका मी आवडीने वाचल्या. इतक्या शास्त्र शुध्द पद्धतीने केलेले लिखाण विरळाच. अनेक आभार.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मालिका अतिशय मेहनत घेउन, अभ्यासपूर्ण लिहीली आहे. अनेक गोष्टी नव्याने कळल्या. भिडे साहेब धन्यवाद आणि आपल्या कार्याला नमस्कार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे सर्व लेख मी वाचले आहे. फक्त एक मिक्सोपेथी वर लिहायचे राहून गेले. करोंना काळात/ काळानंतर अनेक हॉस्पिटल्स त्यात देशातील मोठे हॉस्पिटल्स ही आहेत. एकाच आजारावर अलोपेथी आणि आयुर्वेदिक औषधी वापरू लागली आहे. बाकी अधिकान्श व्याधीपासून रोगमूक्त करण्यासाठी भविष्यात हर्बल औषधींचा प्रयोग जास्त होणार, हे ही निश्चित आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

माझा अॅॅलोपाथी वर पूर्ण विश्वास आहे पण डॉक्टरवर ?
चांगला डॉक्टर भेटण्यासाठी नशीब लागत. स्वानुभव! म्हणूनच म्हटले आहे,
वैद्यराज नमस्तुभ्यं यमज्येष्ठसहोदर। यमः तु हरति प्राणम् डॉक्टर प्राणम् धनानि च ।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॉक्टर प्राणम् धनानि च ।

- ‘डॉक्टर’ऐवजी ‘डॉक्टरः’ पाहिजे काय?

- ‘प्राणम्’ऐवजी ‘प्राणान्’ पाहिजे काय? (दोन्ही ठिकाणी?)

- (‘धनानि’वरून) (एकवचन नव्हे, द्विवचनही नव्हे, परंतु बहुवचन) याचा ‌अर्थ, डॉक्टराची फी ₹२/-पेक्षा अधिक असावी काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संस्कृत शिकून आता किती वर्ष झाली? आठवत नाही. जसंं आठवल तसंं लिहिलंय.
अपुनको मतलबसे मतलब है. आयी बात समझमे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0