वेदनाः शारीरिक इजा की मनाचा खेळ?

त्या दिवशी नाट्यगृह तुडुंब भरलेले होते. काही जण पायऱ्यावर, काही जण पॅसेजच्या रिकाम्या जागेत बसले होते. संयोजकांना शेवटच्या क्षणी टीव्ही स्क्रीनची व्यवस्था करावी लागली. त्यामुळे बाहेरचा व्हरांडाही भरला. स्टेजवरचा पडदा वर सरकू लागला. डॉ. परवेझ खंबाटा स्टेजवर उभे होते. संपूर्ण स्टेजला ऑपरेशन थेटरचे स्वरूप देण्यात आले होते. डॉक्टरांच्या समोर ऑपरेशन टेबल व त्यावर एक रुग्ण. कार्यक्रमाची सुरुवातच डॉक्टरांनी चेहऱ्यावर मास्क चढवण्यापासून झाली. त्यानंतर डॉक्टरांनी हातात ग्लोव्हज चढवले. शेजारच्या नर्सने त्यांच्या हातात इंजेक्शनची सिरिंज दिली. क्षणभर इंजेक्शनच्या सुईकडे निरखून बघत रुग्णाच्या मासल दंडात डॉक्टर सुई टोचतात. प्रेक्षकांना रुग्ण थोडीशी हालचाल करत आहे असे वाटले. काही क्षणात रुग्ण शांत होतो. व चक्क डोळे उघडून डॉक्टरांकडे बघत स्मित करतो.

“कसं वाटलं? ” डॉक्टरांचा प्रश्न.
“एकदम छान, डॉक्टर. तुम्ही अगोदरच सांगितल्याप्रमाणे इंजेक्शनची सुई शरीरात गेली हे मला जाणवले. परंतु मला वेदना काही जाणवल्या नाहीत. ”
“मग पुढच्या शस्त्रक्रियेच्या तयारीला लागू का? Anesthesia शिवायच्या ऑपरेशनला तुमची हरकत तर नाही ना? ”
“अजिबात नाही, डॉक्टर. बिनधास्त करा.”

डॉक्टर प्रेक्षकांकडे बघत “मी ऑपरेशनसाठी एक नवीन प्रक्रिया शोधली आहे. यात मी भूल देणे पूर्णपणे टाळलेले आहे. रुग्ण ऑपरेशनच्या काळात पूर्णपणे शुद्धीवर असतो, काय काय घडत आहे ते उघड्या डोळ्यानी पाहू शकतो. रुग्णाला कुठलीही वेदना जाणवणार नाही. मी शोधलेल्या या प्रक्रियेत वेदनेची आठवण पूर्णपणे पुसून टाकण्यात आली आहे. जर वेदनेची आठवणच येत नसल्यास त्याला भ्यायचेही कारण नाही. माझी ही ऑपरेशनपूर्व प्रक्रिया केवळ सैद्धांतिक स्वरूपात नसून त्याची व्यावहारिकता या रुग्णाने सिद्ध केलेले तुम्ही आताच प्रत्यक्षपणे पाहिलेले आहे. सुई टोचल्याच्या वेदना तुम्हालाही जाणवल्या. तो मात्र एका क्षणात सर्व काही विसरून गेला. यानंतरच्या अनुभवाची त्याला भीती वाटणार नाही. भूल देण्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामापासून आपण रुग्णाला वाचवू शकतो. हा एक वैद्यकशास्त्रासाठीचा सुवर्ण दिवस ठरू शकेल.” असे म्हणत त्यानी आपले भाषण आवरते घेतले.
“ठीक आहे तर. आता मला ऑपरेशन पूर्ण करू दे.”

स्टेजचा पडदा हळू हळू खाली सरकू लागला.
** ** **
मूक प्राण्यावर दया दाखवावी (भूतदया परमो धर्मः) यासाठी आंदोलन करणाऱ्यांचा प्राणी मरत असताना त्यांना काय वाटते या प्रश्नापेक्षा प्राण्यांना वेदना होतात यावर नेहमीच भर असतो. परंतु वेदना म्हणजे नेमके काय हा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर देणे फार अवघड ठरते. वेदना हे काही दाखवता येत नाही. किंवा त्याचे वर्णनही करता येत नाही. ती एक प्रकारची संवेदना असते व जो कुणी ते अनुभवत असतो त्यालाच ते फक्त कळत असते. याचा अर्थ प्राण्यांनाही वेदना जाणवत असाव्यात. परंतु प्राण्यांना होत असलेल्या वेदना शब्दातून व्यक्त करता येत नसल्यामुळे त्यांना वेदना नाहीत या (गैर)समजुतीतून आपण त्यांच्याशी व्यवहार करत असतो. प्राण्यांनाही वेदना जाणवत असल्यास याचा नैतिकदृष्ट्या विचार करण्याची गरज आहे, असे पुरस्कर्त्यांचा आग्रह असतो.

वेदना ही मुळातच वाईट वा क्लेशदायक असते व जाणून बुजून काही कारण नसताना कुणाला तरी वेदनेच्या आहारी देणे हा निंदनीय प्रकार असू शकतो. एक मात्र खरे की वेदना आहे याबद्दल दुमत नसावे. परंतु ते कितपत वाईट आहे व या वाईटातून काही चांगले निघण्याची शक्यता आहे याचा अंदाज करता येईल का? मुळात शारीरिक वेदना व त्यामुळे मेंदूत होणाऱ्या संवेदना या दोन गोष्टी अत्यंत वेगळ्या आहेत. एखाद्याच्या मेंदूमध्ये वेदनेची आठवण रहात नसेल वा त्याची भीती वाटत नसल्यास त्याच्यावर वेदनेचा मारा करत राहावे की काय? जरी वेदनेची आठवण राहत नसली तरी वेदना तीव्र असतात व त्याचे अस्तित्व नाकारता येत नाही, ही वस्तुस्थिती लक्षात ठेवायला हवी.

एखाद्याला वेदनांची जाणीव होत नाही व त्याविषयी काही बोलत नाही म्हणून त्याला वेदना देत रहावे (व त्यातून आपला फायदा करून घ्यावा) हे सपशेल चुकीचे ठरेल. गंमत म्हणजे वेदनाच्या अनुभवाची संवेदना व वेदना होणार म्हणून वाटणारी भीती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. डॉक्टर खंबाटानी रुग्णाच्या मनात वेदनेची भीतीच वाटू न देणारी प्रक्रिया शोधल्यामुळे रुग्णाला ऑपरेशनच्या वेळी भूल देण्याची (व भूल देण्याचा धोका पत्करण्याची) गरजच उरली नाही. जे काही ऑपरेशनच्या वेळी करायचे ते बिनधास्त करण्याची मुभा यातून मिळते. काही कारण नसताना एखाद्याला वेदना देत राहणे ही फार चुकीची गोष्ट आहे. एखाद्या मनोरुग्णाला वेदनेची जाणीव होत नाही म्हणून त्याला वेदना देत राहणे कितपत योग्य ठरेल?

खरे पाहता वेदनेची जाणीव कशी होते हे समजून घेणे महत्वाचे ठरेल. आपल्या पायाच्या आंगठ्यावर कुणाचे तरी बुटाचे पाय पडल्यास असह्य वेदना जाणवतात. किंवा टेनीससारखा खेळ खेळत असताना बॉल उंचावरून मारल्यास पाठीला कळ आल्याने मरणांतिक वेदना होतात. त्या वेदनांची जाणीव मेंदूला पोचते. तेथील नसांची chain reaction सुरू होते. शरीरावरील घाव pain receptorला जागे करतात. व तेथून रासायनिक स्राव होतो व हे रसायन वेदनेची जाणीव देते. मज्जारज्जूमधून हा संदेश मेंदूपर्यंत पोचतो. मेंदू ताबडतोब संबंधित भागाला (Somato-sensory Area) सूचना देते. व आंगठा मागे सरकवला जातो ( वा टेनिस खेळाडू खेळ थांबवून विश्रांती घेतो) परंतु एवढ्यावरच हे थांबत नाही. अशा प्रकारच्या वेदनेची जाणीव उत्क्रांतीच्या काळापासून मानवी मनात दडलेली असल्यामुळे fight or flight च्या स्थितीला पोचते. याचाच अर्थ ही वेदना मानवी अस्तित्वासाठी प्रतिबंधात्मक व शरीराला सुरक्षित ठेवणारी यंत्रणा आहे. त्यामुळे आपण पूर्णपणे वेदनेला सुट्टी देऊ शकत नाही. (वा वेदनेपासून पूर्णपणे मुक्त होऊ शकत नाही) दात दुखत असल्यास प्रचंड वेदना होतात. परंतु काही काळाने त्या थांबतात. आपल्या जिवाला धोका नाही हा संदेश मेंदू पोचवतो. परंतु हीच वेदना अनेक वेळा होऊ लागल्यास दातावर उपचार केल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणजेच या वेदनेची स्मृती धोक्याची सूचना देते. व त्यातून तुमच्या शरीराचे रक्षण होऊ शकते.

हे सर्व खरे असल्यास मूक प्राण्यांच्या बाबतीत काय घडत असावे याचा विचार करावा लागेल. मूक जनावरांना वेदना जाणवत असतील का? त्या वेदनांची जाणीव त्यांच्या स्मृतीपटलात साठवलेली असेल का? वेदनेतून ते काही तरी शिकत असतील का? खाटिक सुरी घेऊन आल्यानंतर प्राणी पळून जाण्याचा प्रयत्न करत असतील का? एखाद्या पाळीव कुत्र्याला मालक सातत्याने त्रास देत असल्यास, मारहाण करत असल्यास, कुत्रा चवताळून मालकाला चावेल का? किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करेल का? आपल्या (?) जिव्हाचापल्यासाठी माशाला सळीवर बांधून भाजत असताना त्याला वेदना जाणवत असतील का? किंवा काही क्षणापुरतेच त्या वेदना रहात असतील का? हळू हळू आपण मरून जाऊ ही जाणीव येत असेल का?

डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतींच्या संवेदनाविषयी भरपूर प्रयोग केले होते. खरेखरच वनस्पतीनाही संवेदना असल्यास अहिंसा हे एक मूल्य मानणारे, शाकाहारी अन्नाचाही त्याग करतील का? किंवा भाजीपाला खात असताना वनस्पतींना वेदना जाणवू नयेत यासाठी काही तजवीज करता येईल का? किंवा जीवो जीवस्य जीवनम्! या उक्तीचे तंतोतंत पालन करत या प्रश्नाकडे पाठ फिरवायचे का?

वेदना म्हणजे वेगवेगळ्या प्रसंगातील अनुभवांचीच मालिका असल्यास, डॉक्टर खंबाटा यांनी प्रात्यक्षिकेत दाखविल्याप्रमाणे, काही क्षणच वेदनेचा अनुभव (व आयुष्यभर त्याची भीती) येत असल्यास घाबरण्याचे काहीच कारण नाही हे कितपत योग्य ठरेल?

(या चर्चेत आपण फक्त वेदनेशी संबंधित गोष्टींचा विचार करत असून पूर्ण जग मांसाहारी झाल्यास पर्यावरणाचे, इकॉलॉजीचे, जैव वैविध्यतेचे काय होईल वा पूर्ण शाकाहारी झाल्यास तितक्या प्रमाणात भाजीपालाचा पुरवठा होईल का इत्यादी प्रश्न चर्चेपुरते बाजूला ठेवलेले आहेत, याची कृपया नोंद घ्यावी. )

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बऱ्याच‌दा वेद‌ना या शारिरिक‌ वेद‌ना म्ह‌णून‌च‌ मान‌ल्या जातात‌. मान‌सिक‌ वेद‌नेचे काय‌? मान‌सिक‌ अस्व‌स्थ‌त‌तेला मान‌सिक‌ वेद‌ना म्ह‌ण‌ता येईल‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आवडला लेख .माझा नवीन ललितलेख वाचा,नुकताच लिहीला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™