एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २२

सांस्कृतिक क्षेत्रातील बदल

सुधीर भिडे

Medicine, law, business – these are all necessary to sustain life. But arts are what we stay alive for.
– John Keating

१८१८ ते १९२० या काळात सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रांत काय बदल झाले ते आपण आधीच्या भागांत पाहिले. मागील भागात आधुनिक शिक्षण आणि पत्रकारिता यांची कशी सुरुवात झाली या विषयी माहिती घेतली. या भागात सांस्कृतिक क्षेत्रात १८१८ ते १९२० या कालखंडात काय बदल झाले हे आपण पाहणार आहोत. या शतकात धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रांत बदलांना थोडी सुरुवात झाली. सांस्कृतिक क्षेत्रात मात्र फार मोठ्या प्रमाणावर बदल झाले ज्याचे दूरगामी परिणाम झाले.

पुरातत्त्व अन्वेषण आणि इतिहास लेखन

जॉन स्मिथ या इंग्रज अधिकाऱ्याने १८१९ साली अजिंठा गुंफांचा शोध लावला. भारतीय पुरातत्त्व अन्वेषण विभाग (Archaeological Survey of India) या संस्थेची स्थापना १८६१ साली झाली. पहिले डायरेक्टर कनिंगहम होते. या सोसायटीतर्फे या विषयाला वाहिलेले प्रकाशन १८७२ साली चालू करण्यात आले.

१८९६ साली बुद्धाच्या जन्मस्थळी, लुंबिनी येथे विभागाने शिलालेख शोधून काढले आणि लुंबिनी हे बुद्धाचे जन्मस्थान घोषित झाले.


शिलालेख
शिलालेखात लिहिले आहे – राजा देवनाम प्रिय प्रियदर्शी आपल्या राजवटीची वीस वर्षे पूर्ण केल्यावर या ठिकाणी आला आणि त्याने इथे पूजा केली कारण या ठिकाणी बुद्ध शाक्य मुनी जन्माला. (देवनाम प्रिय प्रियदर्शी ही सम्राट अशोकाची नाम बिरुदावली)

१९२१ साली पुरातत्त्व विभागाने मोहेंजोदारो आणि हडप्पा यांचा शोध लावला. ते उत्खनन पुढे वीस वर्षे चालू राहिले आणि जगाला एका लुप्त झालेल्या पण महान संस्कृतीची माहिती मिळाली.

आशियाटिक सोसायटीची स्थापना १७८४ साली कलकत्त्यात झाली. भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना १९१७ साली पुण्यात झाली. या दोन्ही संस्थांनी इतिहास आणि पुरातत्त्व अन्वेषण क्षेत्रात मोठे संशोधन केले आहे.

१८२६ साली ग्रँट डफ याने History of Marathas हा ग्रंथ तीन भागांत लिहिला. कित्येक दशके हा ग्रंथ महाराष्ट्राच्या इतिहासाचा प्रमाण ग्रंथ म्हणून वाचला जाई. या ग्रंथाच्या ७०हून अधिक आवृत्त्या निघाल्या आहेत. या लिखाणात काही अंशी ऐतिहासिक सत्याची कमतरता असली तरी खऱ्या अर्थाने इतिहासलेखनाची ही सुरुवात होती.

साहित्य, कला आणि क्रीडा

ज्या कालखंडाचा आपण विचार करत आहोत त्या काळात महाराष्ट्रात वाङ्मय, संगीत, चित्रकला, आणि खेळात नवीन प्रयोग आणि बदल झाले. सांस्कृतिक क्षेत्रात नवीन उपक्रम चालू झाले त्यापैकी महत्त्वाचे याप्रमाणे –

पहिला इंग्रजी – मराठी शब्दकोश १८३१
तर्खडकरांचे मराठी व्याकरण १८३६
विष्णुदास भाव्यांचे पहिले नाटक १८४३
लोकहितवादींची शतपत्रे १८४८
कोलंबसच्या चरित्राचे भाषांतर १८४९
पहिले प्रवासवर्णन १८५७
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स स्थापना १८५७
पुण्यात बॅडमिंटनची सुरुवात १८६०
भारतातील पहिली फर्स्ट क्लास क्रिकेट मॅच १८६५
‘सर्व संग्रह’ मासिकात तुकारामांच्या अभंगांचे प्रकाशन १८६६
राजा रवि वर्मांच्या चित्रांना व्हिएन्नामध्ये पारितोषिक १८७३
पुणे नगर वाचन मंदिर स्थापना १८७९
हरी नारायण आपट्यांची पहिली कादंबरी १८८५
केशवसुतांचा कविता संग्रह १८९०
भातखंडे यांचे संगीतावर पुस्तक १८९०
पहिली फुटबॉल शील्ड मॅच १८९३
पलुस्करांनी गांधर्व महाविद्यालय स्थापिले १९०१
अब्दुल करीम खाँ यांनी आर्य संगीत विद्यालय स्थापिले १९१३

समाजाच्या सांस्कृतिक क्षेत्रात किती बदल झाला ते उघड आहे.

मराठी वाङ्मय – कविता

अठराव्या शतकात मराठीत तीन प्रकारचे काव्य रचले जाई. संत कवींची परंपरा १२७० सालापासून ज्ञानेश्वरांपासून सुरू झाली. संत तुकारामापर्यंत ती परंपरा चालू राहिली. सन १६००नंतर दोन निराळे काव्यप्रकार चालू झाले – पंत कवी किंवा पंडित कवी आणि शाहीर कवी. पंतकाव्यात अतिशय संस्कृतप्रचुर भाषा वापरली जाई. छंद आणि यमकाला फारच महत्त्व होते. त्यामुळे काव्य ही एक शाब्दिक कसरत होऊन बसली. मोरोपंतांच्या एका काव्यात ओष्ठ्य शब्द नाहीत हे त्या काव्याचे वैशिष्ट्य.

पंतकवींचे शिरोमणि म्हणजे मोरोपंत. मोरोपंत बारामतीचे. मोरोपंत तेथील जहागिरदाराचे पुराणिक होते. मोरोपंतांचे बहुतेक काव्य रामायण आणि महाभारत यांतील कथांवर आधारित आहे. केकावली हे त्यांचे बहुचर्चित काव्य. मोरोपंतांचा मृत्यू १७९४ साली झाला. मोरोपंतांचा काळ म्हणजे पेशवाईच्या अध:पतनाचा काळ. परंतु त्यांच्या काव्यात तत्कालीन समाजस्थितीचा जराही संदर्भ नव्हता. शंभर वर्षांनंतर आलेल्या केशवसुतांनी कवितेत सामाजिक भान आणले.

शाहीर काव्याचे पोवाडा आणि लावणी असे दोन भाग होते. शाहीर काव्य साधारण १७५०पासून पुढे आले. पोवाड्यात मराठ्यांच्या इतिहासातील प्रसंगांचे वर्णन असे. लावणी स्त्रियांनी गायची असे. लावणीत शृंगार हे प्रमुख अंग असे. पेशवाईच्या उत्तरकाळात जशी नीतिमत्ता खाली ढासळू लागली तसा लावणीतला उत्तानपणा वाढू लागला. पंतकवी असोत किंवा शाहीर कवी – त्या काळातील परिस्थितीचे कटू सत्य काव्यात प्रतिबिंबित होत नसे.

त्या शतकाच्या शेवटी काव्यात नव्या वाटा शोधणारा तारा उगवला. केशवसुतांनी आधुनिक मराठी कवितेचा पाया रचला. त्यांच्या काव्याची एक झलक पहा -

स्त्रीवर्गाला दास्यी दड्पुनि, दासीपुत्रचि मानव होतो
स्त्रीला अज्ञानात ठेवितो परिणामी दुर्दशेस जातो.
पडली छाया मनुजाची जर विटाळ होतो तर मनुजाला
काय म्हणावे या मूर्खाला, नरेचि केला हीन किती नर


केशवसुत
कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत

अशा शब्दांत केशवसुतांनी नवकवितेची तुतारी फुंकली. केशवसुतांच्या आधी काव्याचे विषय धर्माला आणि पौराणिक कथांना जोडलेले असत. केशवसुतांनी कवितेला जीवनाच्या जवळ आणले. कवितेतील कृत्रिमपणा गेला. केशवसुतांनी दाखविलेल्या वाटेवर गोविंदाग्रज चालू लागले. गोविंदाग्रज स्वत:ला केशवसुतांचा सच्चा चेला असे म्हणवत. त्यांच्या 'दसरा' कवितेत ते लिहितात –

चला रुढिंवर आता घसरा, टाकुनि सीमा मृत धर्माच्या।
दंभाच्या ह्या अंधपणाच्या, जुनेपणाच्या अहंपणाच्या।
सीमोल्लंघन कालची दसरा॥
श्रुतीस्मृतींना आता विसरा, अंधभक्तीचा पांगूळगाडा।
मोडुनी तोडुनि उपडापाडा, पाताळीतो नेऊन गाडा।
करा साजरा यापरी दसरा॥

गोविंदाग्रजांनी धर्मशास्त्रावर अवलंबित धर्मावर सरळ हल्ला केला आहे. २०२१मध्ये हवा परत बदलली आहे. आजच्या तारखेस कोणी कवी असे लिहू शकेल याची खात्री नाही. त्याच काळात बालकवी, भा. रा. तांबे आणि बहिणाबाईंनी अभिजात काव्य लिहिले.

मराठी गद्य लेखन

गद्य लेखनासाठी व्याकरणाची जरूर असते. त्या काळात मराठी व्याकरण विस्कळीत होत. पहिले व्याकरणाचे पुस्तक दादोबा तर्खडकर यांनी १८३६ साली लिहिले. दादोबांचे शिक्षण मुंबईतच झाले. ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करू लागले. त्याचवेळी त्यांनी हे पुस्तक लिहिले. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी त्यांचे मराठीचे पाणिनि असे गुणगान केले.

तर्खडकरांविषयी एक मनोरंजक माहिती त्या काळातील रस्त्यावरील दळणवळणाचा अंदाज देते. तर्खडकरांनी मध्यप्रदेशात एका संस्थानिकाकडे नोकरी केली. ती नोकरी संपल्यावर ते मुंबईला परतले. प्रवासात ते स्वतः घोड्यावर, कुटुंब मेण्यात आणि सामान गाढवावर अश्या लवाजम्यासह ते मुंबईपर्यंत एक महिना प्रवास करून पोचले.

या काळात कादंबरी, निबंधलेखन, प्रवासवर्णन आणि चरित्रलेखन नवीन प्रकार मराठी वाङ्‌मयात सुरू झाले. इंग्रजी शिक्षणांनंतर मराठी लेखकास गद्य लेखनाची नवी दारे उघडली. या चार प्रकारांतील चरित्रलेखन याआधी होत असे. परंतु जास्त करून राजे लोकांची चरित्रे त्यांच्या दरबारी माणसांनी लिहिलेली असत.

हरी नारायण आपटे हे मराठी कादंबरीचे जनक मानले जातात. ‘मधली स्थिति’ ही त्यांची पहिली कादंबरी १८८५ साली प्रकाशित झाली. त्यांची गाजलेली कादंबरी ‘पण लक्षात कोण घेतो’ १८९० साली प्रकाशित झाली. आपट्यांनी ११ सामाजिक आणि १२ ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या.

निबंधलेखनाची सुरुवात लोकहितवादींनी सुरू केली. लोकहितवादींचे नाव देशमुख होते. त्यांनी सामाजिक बदलावर १८४८ ते १८५०मध्ये १०८ निबंध लिहिले. हे निबंध लोकहितवादींची 'शतपत्रे' म्हणून प्रसिद्ध आहेत. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी १८७४मध्ये 'निबंधमाला' लिहिली.

मराठीतील पहिले प्रवास वर्णन विष्णुभट गोडसे या गृहस्थांनी लिहिले. १८५७मध्ये गोडसे अलिबागहून पायी झाशीस जाण्यास गेले. त्याच वेळी उत्तरेत उठाव चालू झाला. आपला जीव वाचवत ते कसे तरी महाराष्ट्रात परतले. प्रवासाचा रोमहर्षक वृतांत त्यांनी ‘माझा प्रवास’ या पुस्तकात लिहिला. याचा संदर्भ आधीच्या भागांत आला आहेच. मराठीतील चरित्र वाङ्मयाची सुरुवात १८५० साली झाली. सुरुवातीला इंग्रजी भाषेतील चरित्र वाङ्मयाचे भाषांतर करणे हाच प्रकार होऊन बसला.

  • १८४९ साली कोल्हटकरांनी 'कोलंबसचा वृतांत' मराठीत भाषांतरित केला.
  • १८५२ साली कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी 'सॉक्रेटिसचे चरित्र' हे भाषांतर केले. त्याच्या तीन आवृत्या निघाल्या.
  • १८५२ साली वि. मो. भिडे यांनी खुसरू राजाचा इतिहास भाषांतरित केला.
  • १८६०मध्ये जोगळेकरांनी रूस देशाच्या कॅथरीन राणीचे चरित्र लिहिले.
  • १८७१ साली रानडे यांनी जॉर्ज वॉशिंग्टन याचे चरित्र भाषांतरित केले.

मराठी लेखकांनी परदेशी व्यक्तींची चरित्रे भाषांतरित करावी याचा उद्देश दक्षिणा कमिटीचे बक्षीस मिळवावे असा असू शकतो.

१८७१ नंतर भारतीयांची चरित्रे लिहिण्यास सुरुवात झाली. १८७१मध्ये चौबळ यांचे रामदास, १८७२मध्ये एकनाथ आणि १८७७मध्ये तुकाराम ही चरित्रे प्रकाशित झाली. १८७७मध्ये शाळिग्राम यांनी बापू गोखले यांचे चरित्र लिहिले. या काळातील इतिहासाचे एक प्रसिद्ध पुस्तक म्हणजे वासुदेव खरे यांनी १८९२ साली लिहिलेले नाना फडणवीस यांचे चरित्र. या पुस्तकाची नवी आवृत्ती वरदा प्रकाशन यांनी २०१२ साली प्रकाशित केली.

याच काळात १८३१ साली मोल्सवर्थ आणि कँडी या दोन इंग्रज व्यक्तींनी मराठी – इंग्लिश शब्दकोश लिहिला. हे पुस्तक आजही उपयोगात आहे. कँडी यांनी मराठीत ’विरामचिन्हे‘ हे पुस्तक लिहिले. मराठीत विरामचिन्हे त्यांनीच सुरू केली.

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स आणि चित्रकला

जमशेटजी जिजीभोय यांनी एक लाख रुपये (आजच्या किमतीत २० कोटी रुपये) रुपयाची देणगी देऊन हे कला विद्यालय १८५७ साली चालू केले. सुरुवातीला चित्रकलेचे शिक्षण सुरू करण्यात आले. येथील शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी १८७२ ते १८९१ या कालखंडात अजंठ्याच्या गुहांमधील चित्रांच्या प्रतिकृती तयार केल्या.


जे जे स्कूल ऑफ आर्ट्स

१९०० सालापासून या महाविद्यालयात आर्किटेक्चरचे शिक्षण सुरू करण्यात आले. जे. जे. स्कूलच्या पहिल्या विद्यार्थ्यापैकी महादेव धुरंधर हे त्याच संस्थेत शिक्षक झाले आणि नंतर संस्थेचे प्रथम भारतीय संचालक झाले.

त्या शतकातील नावाजलेले चित्रकार राजा रवि वर्मा. त्यांचा जन्म केरळात मातृसत्ताक पद्धतीच्या घराण्यात झाला. साहजिकच ते मामाकडे वाढले. चित्रकला उपजतच होती. त्यांची कर्मभूमी मुंबई राहिली. त्यांनी बडोदे आणि म्हैसूर संस्थानासाठी काम केले. १८७३ साली व्हिएन्ना येथील प्रदर्शनात त्यांना पुरस्कार मिळाले. पुण्याजवळ कार्ले येथे त्यांनी भारतातील पहिला लिथो प्रिंटिंग प्रेस चालू केला. तिथे दोन जर्मन तंत्रज्ञ कामास नेमले.


रवि वर्म्याची चित्रं

आपली चित्रे सामान्याजनापर्यंत पोचावी यासाठी त्यांनी आपली चित्रे छापली. हिंदू धर्मातील स्त्रियांची चित्रे छापल्याबद्दल त्यांच्यावर कोर्टात खटला गुदरला गेला. त्यांनी राजमहालातून कला सामान्यांच्या घरात आणली. त्यांचे मूळ चित्र आज ३० कोटी रुपयाला विकले जाते.

संगीत

महाराष्ट्रामध्ये त्या काळी तीन प्रकारचे संगीत गायले जायचे.

  • वारकरी संप्रदायाचे अभंग
  • शाहीरांचे पोवडे आणि लावण्या
  • शास्त्रीय संगीत

यांपैकी पहिल्या दोन प्रकारांत या काळात फार फरक पडला नाही. तसे पाहिले तर आजही ते संगीत तसेच गायले जाते. शास्त्रीय संगीतात बदल झाला. पहिले म्हणजे त्या संगीताचे व्याकरण निश्चित करण्यात आले. दुसरे म्हणजे ते संगीत सामान्यांना उपलब्ध झाले. काही संगीतकारांच्या जीवनाकडे बघून हा बदल कसा झाला ते समजावून घेऊ.

भातखंडे यांनी शास्त्रीय संगीतावर एक पुस्तक लिहून संगीताचे काही नियम निश्चित केले. पलुस्करांनी संगीत विद्यालय स्थापन करून संगीत शिकण्याचा गुरू-शिष्य परंपरेपेक्षा एक निराळा मार्ग उपलब्ध करून दिला. आधी केवळ राजेराजवाड्याच्या कृपाछत्राखाली संगीतसाधना शक्य होती.

अब्दुल करीम खाँ हे किराणा घराण्याचे संस्थापक. बडोदे आणि म्हैसूर येथील राजांनी त्यांना छत्र दिले.


अब्दुल करीम खाँ
अब्दुल करीम खाँ

१९१३मध्ये त्यांनी संगीत विद्यालय चालू केले आणि ते मिरजला राहिले. अल्लादियां खाँ हे राजस्थानात वेगवेगळ्या संस्थानांत राहिले. शेवटी ते मुंबईत स्थायिक झाले आणि तेथेच त्यांनी संगीत शिकविले.

इनायत खाँ यांचे चरित्र आणखीनच निराळे आहे. इनायत खाँ यांचा जन्म १८८२मध्ये बडोद्यात संगीतात मोठे नाव असलेल्या घराण्यात झाला. ते उत्कृष्ट सतारवादक होते. १९१० साली ते युरोपला भारतीय संगीत शिकविण्यासाठी गेले. संगीताबरोबर त्यांनी सूफी विचार पश्चिमेला शिकविला.

या सर्व महान कलाकारांत एक गोष्ट समान दिसते. या कलाकारांनी सुरुवात कोणत्यातरी राजाच्या छत्राखाली केली. पण शेवटी स्वतंत्रपणे त्यांनी स्वतः संगीत शिकवायला सुरुवात केली.

नाट्यकला

महाराष्ट्रात १८१८पर्यंत नाट्यकला नव्हती. तमाशा ही कला नाटकाचा जवळ जात असे. तमाशात गाणे आणि नाच यांबरोबर एक वग चालू असे त्यात थोडे गोष्टीचे प्रमाण असे.

मराठीत पहिले नाटक जोतिबा फुले यांनी लिहिले. त्याचे नाव 'तिसरे रत्न'. या नाटकाचे किती आणि कुठे प्रयोग झाले त्याची खात्रीलायक माहिती दिसत नाही. खऱ्या अर्थाने विष्णुदास भावे यांनी 'सीता स्वयंवर' हे नाटक १८४३ साली रंगभूमीवर आणले ते पहिले नाटक. भाव्यांनी यानंतर एक नाटक मंडळी बनविली आणि अजून चार नाटके प्रेक्षकांसमोर आणली. त्यानंतर किर्लोस्करांनी संगीत नाटकाची परंपरा चालू केली जी विसाव्या शतकापर्यंत चालली. संगीत नाटकातून बालगंधर्व पुढे आले.


बालगंधर्व
बालगंधर्व

त्यानंतर काकासाहेब खाडिलकरांनी 'मानापमान' (१९११), 'विद्याहरण' (१९१३), आणि 'स्वयंवर' (१९१६) ही संगीत नाटके रंगभूमीवर आणली. १९२०मध्ये त्यांनी 'द्रौपदी' हे नाटक आणले. या नाटकाच्या सेट्स आणि ड्रेपरीसाठी ७२,००० रुपये खर्च केले असे सांगण्यात येते. आताच्या कालानुसार हा खर्च ७२ लाख रुपये म्हटला पाहिजे. शून्यातून चालू झालेली ही नाट्यकला शंभर वर्षांत कुठे पोचली! हा प्रवास फार विस्मयकारक आहे. (सुरेश साखवळकर, म. टा., २९ नोव्हेंबर २०२०)

खेळ

कुस्ती, हुतुतू, मल्लखांब हे महाराष्ट्रातील खेळ १८१८साली खेळले जायचे. 'व्यायाम ज्ञानकोश' नावाचे खेळांविषयी खंड १९३६ साली प्रसिद्ध झाले. त्यात असे लिहिले आहे की १९०० साली आट्यापाट्या आणि खोखो हे खेळ खेळले जात. इंग्रज आले आणि त्यांच्या बरोबर पाश्चिमात्य खेळ आले. पुढच्या दोनशे वर्षांत आपण पाहतो की भारतीय खेळांची पीछेहाट होत असून पाश्चिमात्य खेळ खेळले जात आहेत.

मजेची गोष्ट म्हणजे बॅडमिंटन ह्या खेळाची सुरुवात पुण्यात झाली. छावणीमधील इंग्रज सैनिक वेळ घालविण्यासाठी अशा तऱ्हेचा खेळ खेळू लागले.

जुन्या काळचं बॅडमिंटन आजचं बॅडमिंटन

हा खेळ लवकरच भारतात इतर छावण्यांत पसरला. या खेळाला सुरुवातीला 'पूनाई' म्हणत. प्रथम लोकरीचा चेंडू वापरला जाई त्यानंतर शटलकॉक बनले. मग 'टॉम फूल' असे नाव पडले – शटलकॉकला फूल म्हणत. वरील दोन चित्रांत दोनशे वर्षांत या खेळात किती बदल झाला आहे ते दिसते. आजचे खेळाडू किती चपळ आणि सुदृढ दिसतात. २०२२ साली भारताने बॅडमिंटन खेळाचा थॉमस कप पहिल्या वेळेला जिंकला.

ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरवर्गाने भारतात १७३७ साली क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. १८९२ साली कलकत्त्यात क्रिकेट आणि फुटबॉल क्लब सुरू झाला. क्रिकेटची पहिली फर्स्ट क्लास मॅच १८६४ साली खेळली गेली. १८७७ साली मुंबईत चौरंगी सामने सुरू झाले त्यात इंग्रज, हिंदू, पारसी आणि मुस्लीम टीम्स असत.

१८९३ साली पहिली फुटबॉल शील्ड मॅच खेळली गेली. लवकरच कलकत्ता या खेळाचे केंद्र बनले. आजही कलकत्त्यात फुटबॉल मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. १८८९ साली भारतातील सर्वात जुन्या फुटबॉल क्लबची – मोहन बागान – स्थापना झाली. १८९९मध्ये इंडियन फुटबॉल असोसिएशन स्थापली गेली.

पुण्यात डेक्कन जिमखाना ह्या संस्थेची १९०६ साली दसऱ्याला स्थापना झाली (अमित गोळवलकर, पुण्यभूषण, २०२०,) टिळक आणि न. चिं. केळकर यांचा स्थापनेत मोठा वाटा होता. शिरोळे यांनी या कामासाठी आपली २५ एकराची जागा दिली. १९१८ साली जिमखान्यावर कुस्तीचा आखाडा बांधला गेला. देशाच्या सर्व भागातून कुस्ती खेळण्यास खेळाडू पुण्यास येत. १९२० साली भारताचा संघ पहिल्यांदी ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेला. या संघाची पूर्वतयारी डेक्कन जिमखान्यावर झाली.

निष्कर्ष

देशातील सामाजिक आणि आर्थिक स्थितीचा देशाच्या संस्कृतीवर परिणाम होतो. जर सामाजिक आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होत असेल तर सांस्कृतिक क्षेत्रात नवे कोंब उगवतात. जर स्थिती उतरणीला लागली तर संस्कृती लयास जाते. १८१८ ते १९२० या कालखंडात असे दिसते की भारतातील कलावंतांना साखळदंडातून मुक्तता झाल्यासारखे वाटले. वाङ्मय, संगीत, चित्रकला, खेळ सर्वच क्षेत्रांत नवनवीन प्रयोग याच काळात का व्हावेत?

ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्या वेदांची महत्ता, आपला अजिंठ्यासारखा सांस्कृतिक वारसा, बुद्धांच्या जन्मस्थळाचा शोध आणि मोहेंजोदारोचा इतिहास याची जाणीव आपल्याला परदेशी लोकांनी करून दिली.

येथील ज्या लोकांनी इंग्रजी शिक्षण घेतले त्यांना ही जाणीव झाली की वाङ्मयात बरेच प्रकार आहेत की जे येथील साहित्यिकांनी हाताळले नाहीत. निबंध, प्रवासवर्णन, चरित्रलेखन, आधुनिक कविता या प्रकारांची सुरुवात या काळातच झाली. नाट्यकलेला सुरुवात झाली. कला शिक्षणाची सुरुवात झाली. रवि वर्मांनी चित्रकलेत नवीन दिशा शोधल्या. पाश्चिमात्य खेळांची सुरुवात झाली. संगीत राजवाड्यातून निघून सामान्यापर्यंत पोचले.

या कालखंडात जे नवीन प्रयोग झाले त्या दिशेने आजही सांस्कृतिक क्षेत्रात वाटचाल चालू आहे.

आर्थिक आणि उद्योगक्षेत्रात एकोणिसाव्या शतकात काय सुधारणा झाल्या ते भाग २३मध्ये पाहू.

मागचे भाग -

भाग १ – एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती
भाग २ – अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी
भाग ३ – अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती
भाग ४ – अठराव्या शतकातील शासनयंत्रणा
भाग ५ – धर्मशास्त्रे आणि कर्मकांडी धर्म
भाग ६ – अठराव्या शतकातील धर्माचे स्वरूप
भाग ७ – धार्मिक सुधारणांची आवश्यकता
भाग ८ – धार्मिक सुधारणांचे प्रयत्न
भाग ९ – समाजसुधारणा – दलित कोण आणि कसे?
भाग १० – समाज सुधारणा – दलितांच्या उद्धाराचे प्रयत्न
भाग ११ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १२ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १३ – समाजातील बदल
भाग १४ – समाजातील बदल – मुंबईचा विकास
भाग १५ – समाजातील बदल – पुण्याचा विकास
भाग १६ – समाजातील बदल
भाग १७ – दोन समाजसुधारक राजे
भाग १८ – १८५७चा उठाव
भाग १९ – १८५७ चा उठाव
भाग २० – १८५७चा उठाव – झाशीतील घटना
भाग २१ – शिक्षण आणि पत्रकारितेची सुरुवात

लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.

सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण.

सुधीर भिडे

field_vote: 
0
No votes yet