काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १० (१ मार्च २०२०)

आज सकाळी बँड्रावरून नेहेमीप्रमाणे मलबार-हिलला जायला टॅक्सी पकडली.

वांद्र्याचे कॉलनीतले काही टॅक्सीवालेही आता ओळखीचे झालेयत.

आज असेच तोंडओळखीचे आफ्रोझभाई भेटले.

आता मलबार-हिलची दिनेशभाईंची टॅक्सी बऱ्यापैकी सेट आहे तशी पण मुंबईकर सदैव "ऑन" असतो.

म्हणूनच आफ्रोझभाईंनासुद्धा सगळी स्टोरी सांगितली... म्हणजे बँड्रातही शनिवारी टॅक्सी मिळण्याची शक्यता चाचपून पहावी हा हेतू.

तर ते माझ्या एकंदरीत प्रोजेक्टवर बेहद्द इंप्रेस झाले.

बहोत मेहनती हो, आपकी इन्शाल्ला बहोत तरक्की हो वगैरे तोंडभरून आशीर्वाद दिले.

अचानक काय वाटलं त्यांना... बोलले, "बेटे कभी मुमकीन हो तो माहीम दर्गेपे एक चादर चढाना!"

इतकी वर्षं मुंबईला राहून माहीम दर्गाही बाहेरूनच बघत आलोय... बघायला हवा तोही एकदा आतून...

मलबार-हिलवरून टॅक्सी घेतली आणि माझ्या नेहमीच्या आवडत्या जागी: मरीन लाईन्सला समुद्राच्या विरुद्ध रस्त्यावर थांबलो.

इस्लाम जिमखान्यासमोरून दोन सहावी सातवीतली मुलं आली. एकमेकांचे करकच्चून खास दोस्त असावेत.

दोघं एकमेकांना धपाटे मारत होती, हलक्या लाथा मारत बोचकारत होती, हुलकावण्या देत होती...

त्यांची ती निखळ भांडोभांड जिगरी दोस्ती बघून मला मस्तच वाटलं.

ह्या फोटोच्या आधी आणि नंतर कॉन्स्टन्ट मारामारी चालू होती त्यांची.

Dosti

ह्यातल्या गोरटेल्या गोल्याला आधी गोल मस्जिदीजवळ सोडला तिथे उतरल्यावरही तो दुसऱ्याच्या अंगावर पाणी ओतून गेला.

कमाल होते दोघंही.

मग एका पारशी कपलला ठाकूरद्वारहून ताडदेवला सोडलं.

समोरच "सरदार पावभाजी" बाबांचं फेव्हरेट.

कैक वर्षं झाली सरदारची पावभाजी खाऊन.

राहवेना... टॅक्सी साईडला लावून घुसलोच.
ह्यांची पावभाजी थोडी वेगळी असते म्हणजे आपल्या शिवसागर किंवा रादर इतर सगळीकडे मिळते तशी लालचुटूक नव्हे तर थोडी काळसर करड्याकडे झुकणारी.

थोडी जास्त दाटसुद्धा

चव अर्थातच छान... पाव बटरमध्ये निथळणारे...

पण मला शिवसागरचीच आवडते खरं सांगायचं तर.

टू इच हिज ओन वगैरे!

PB

तिकडून एक चैत्यभूमीचं भाडं मिळालं.

तिकडून दादर स्टेशनचा पूर्वेचा टॅक्सी स्टॅन्ड.

स्टॅण्डवर तर टॅक्सीसाठी क्यूच असतो त्यामुळे हमखास भाडं मिळतं.

तिकडून गांधी मार्केटचं भाडं मिळालं.

स्टेशनवरून माटुंग्याकडे जाताना मुद्दामहून गाडी रुईयावरून काढली.

प्रणव सखदेवची 'काळे करडे स्ट्रोक्स' आठवली.

माटुंगा जिमखान्याच्या मैदानात चायनीज हाणून आणि थम्सअपमध्ये टाकलेली रम मारून पहुडलेला त्यातला नायक आणि त्याचा अंध मित्र आठवला.

नंतर एक देखण्या सावळ्या साऊथ इंडियन माणसाला धारावीत सोडला आणि घरी जाऊन थोडा लंच ब्रेक घेतला.

ब्रेकनंतरही उलटसुलट बरीच भाडी मारली:

रे रोड - माझगांव - नागपाडा - मदनपुरा - अलेक्झांड्रा वगैरे.

मला नॉर्मली पोल्यूशनमुळे थोडा बारीक खोकला नेहेमी असतो.

तसंच टॅक्सीत खोकताना एका मुस्लीम चाचांनी एक बऱ्याच कॉम्प्लिकेटेड काढ्याचा उपाय सुचवला.

तो बनवायच्या स्टेप्स मी दुर्दैवाने विसरलो पण आजचा दिवस प्रेमळ मुस्लिम म्हाताऱ्यांचा आहे हे मात्र खरं.

(बाय द वे करोनाकाळात तो क्रॉनिक खोकला चक्क गायब झालाय, पोल्यूशन खरंच कमी झालंय बहुतेक)

नंतर चौपाटीवरून जाताना बाजून चक्क दिनेशभाई गेले आणि मी त्यांना आणि त्यांनी मला स्टायलीत हात दाखवला.

ही माझी फँटसी होती:

असे टॅक्सी/रिक्षावाले सुसाट जात असताना बाजूनी कोणतरी त्यांचा मित्र दुसऱ्या टॅक्सी/रिक्षावर दिसतो...

आणि दोघंही समांतर गाड्या थोड्या स्लो करून मोजून पाच सेकंदात फॅमिली-गाव आणि विश्वाला कव्हर करणाऱ्या गप्पा हाणतात, आणि सहाव्या सेकंदाला कस्टमरच्या आठ्या ओळखून परत सुसाट विलग होतात...

हे मला भारी चार्मिंग वाटत आलेलं.

आज तीही विच्छा पूर्ण झाली आणि टॅक्सीवाल्यांच्या ब्रेद्रनमध्ये शिरकाव झाल्यासारखं वाटून माझी कॉलर टाईट वगैरे.

आजची कमाई:

७५० रुपये

क्रमश:
आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ मे आणि २९ मे २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १५ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २२ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट माईलस्टोन: २० जुलै २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० जुलै ते डिसेंबर पहिला आठवडा २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १ (८ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २ (१५ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ३ (२२ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ४ (२९ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ५ (१९ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ६ (२६ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ७ (२ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ८ (९ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ९ (२३ फेब्रुवारी २०२०)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्त. झकास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळे भाग वाचून काढले. मस्त मस्त. वाचतोय याची पोच समजा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वांचे मनःपूर्वक आभार.
पोच दिल्यामुळे लोकांपर्यंत जातंय हे कळून आलं _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0