एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २३

आर्थिक संस्था आणि उद्योग

सुधीर भिडे

एकोणिसाव्या शतकातील समाजाच्या ह्या पैलूंचा आपण मागील भागात विचार केला -

 • धार्मिक आणि सामाजिक सुधारणा
 • १८५७चा उठाव
 • शिक्षण, पत्रकारिता आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील बदल

आता आर्थिक संस्था, उद्योग, शेती आणि दळणवळण यांत काय बदल झाले ते पाहू.

आर्थिक आणि वित्तीय स्थिती

या काळाची आर्थिक स्थिती बघितली तर प्रथम आपल्याला सावकारीचा विचार करावा लागेल. देशाचा विचार केला तर चलनव्यवस्था कशी होती? उद्योगधंद्यांसाठी एक स्थायी चलन आणि बँक याची आवश्यकता असते. या काळात बँकांची काय स्थिती होती ते पाहू. उद्योग चालविणे हे सरकारी करांवरही अवलंबून असते. त्या काळात करव्यवस्था कशी होती? ही सर्व माहिती मिळाली की त्या काळातील आर्थिक स्थितीचा अंदाज येईल.

सावकारी

अनेक शतकांपासून भारतात आणि जगभरात सावकारी चालू आहे. शेक्सपियरचे तर या विषयावर एक नाटक आहे. अनेक शतकांपासून सावकारांनी भारतातील क्रेडिट मार्केटवर पकड ठेवली आहे. या काळातही ही पकड मजबूत होती.

भारतातील शेतकरी या सावकारांच्या जाळ्यात अडकला होता. एका बाजूला सरकार खूप जास्त शेतसारा घेत होते आणि दुसऱ्या बाजूला सावकार उत्पन्नाचे लचके तोडत होता. अशा अवघड परिस्थितीत शेतकऱ्याची जमीन गहाण पडे आणि त्या मागोमाग सावकाराची गुलामी येई.

सावकारी रोख रकमेच्या स्वरूपात (व्याज), धान्याच्या स्वरूपात (मनुती) किंवा व्याज / मनुती या स्वरूपात चालत असे. व्याजदर १२%पासून १००%पर्यंत असे. कर्ज धान्याच्या स्वरूपात घेतले असेल तर सहा ते आठ महिन्यांत दीड पटीने परत करावे लागे.

(डॉक्टर दिलीप वाणी, लाड शका वाणी समाजाचा इतिहास)

छोट्या शेतकऱ्यांना २५% व्याजाने सावकारांकडून कर्ज घ्यावे लागे. (टिळक आणि डेक्कन ॲग्रीकल्चरिस्ट रिलीफ ॲक्ट, परिमल राव इंडियन हिस्टरी काँग्रेस)

In 1851 it was estimated that about 95% of the peasants in Poona district were in debt to moneylenders and on an average, the interest paid by the villagers exceeded the state revenue demands. Peasants who were paying Rs 10 to 20, as tax owed as much as Rs 1,000 to Rs 2,000 to sahukars. By 1870, a large number of peasants were working on their own fields as hired labourers. Mahadev Govind Ranade proposed the establishment of agricultural-shetkari banks.

(Rural Indebtedness in 19th Century Deccan by Parimala Rao)

शहरातही सावकार होते. शाळा चालविण्यास जोतिबा फुल्यांनी सावकाराकडुन कर्ज घेतले होते. त्या काळात बँकिंग संस्था कमी असल्याने काहीही कारणासाठी पैश्याची गरज पडली की सावकाराकडे जाणे हाच उपाय असे.

चलन

(प्रथम प्रकाशित झाल्यानंतर लिखाणात काही चुका असल्याचे या विषयातील तज्ज्ञ श्री शैलेन भांडारे यांच्या ध्यानात आले . त्यांनी सुचविलेल्या सुधारणा या आवृत्तीत केल्या आहेत. तज्ज्ञांचे आभार.)

ईस्ट इंडिया कंपनीच्या लक्षात आले की या देशात वेगवेगळ्या चलनप्रणाली आहेत. त्यामुळे मुघल बादशहाची परवानगी घेऊन त्यांनी मुंबईत आपली टांकसाळ १६७२मध्ये चालू केली. १७१७ साली मुघल बादशाहाच्या नावाने नाणी पाडण्याचा परवाना कंपनीला मिळाला. जशी मुघलांची सत्ता ढासळली तसे इतरांनीही आपली नाणी पाडणे चालू केले.

इंग्रजांनी सोने, चांदी , तांबे आणि टिन या धातूची नाणी काढली. पुढच्या शंभर वर्षात इंग्रजांनी सबंध देशावर नियंत्रण मिळविले होते. १८३५ साली पूर्ण भारतात इंग्रजांनी एक चलनव्यवस्था चालू केली. याचबरोबर काही संस्थानांनी आपली नाणी १९४७पर्यंत चालू ठेवली. एक तोळा (सुमारे १२ ग्राम) वजनाचा चांदीचा एक रुपया व्यवहारात आला. त्याची आजची किंमत ७०० रुपये होईल. खालील चित्रात दाखविलेली एक मोहर म्हणजे १५ रुपये.


व्हिक्टोरियन मुहर
ब्रिटिश १० रुपये

निमसरकारी कागदी नोटा १८००पासूनच चालू झाल्या होत्या. १८६१ साली पहिल्या सरकारी कागदी बँक नोटा आल्या. या इंग्लंडमध्ये छापल्या जात. १८३५ साली मुंबईत टांकसाळ चालू झाली होती. १९२८ साली नाशिकला टांकसाळ चालू झाली . १९३५साली रिजर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली.
(शैलेन भांडारे यांच्या सौजन्याने)

बँकांची स्थापना

भारताची त्यावेळची राजधानी, कलकत्ता येथे १७७०मध्ये भारतातील पहिली बँक स्थापन झाली. त्यानंतर १७८६मध्ये जनरल बँक ऑफ इंडिया स्थापन झाली. त्याच्या मागोमाग, बँक ऑफ कलकत्ता, (१८०९), बँक ऑफ बॉम्बे (१८४०) आणि बँक ऑफ मद्रास (१८४३) अशा तीन बँका स्थापन झाल्या. १९२१ साली या तीन बँकांचे एकत्रीकरण होऊन इंपीरियल बँक ऑफ इंडिया बनली. याच बँकेचे पुढे स्टेट बँक ऑफ इंडिया असे नाव झाले.

पंजाब नॅशनल बँकेची स्थापना लाहोरमध्ये १८९४मध्ये झाली. १९०६ ते १९११ या काळात स्वदेशी चळवळीने जोर पकडला. या काळात आजच्या प्रमुख बँका – बँक ऑफ बरोडा, कॉर्पोरेशन बँक, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक यांची स्थापना झाली. या बँका भारतीय उद्योजकांनी सुरू केल्या होत्या. उदाहरण म्हणून कॅनरा बँक अमेंबल पै यांनी मंगलोरमध्ये १९०६ साली चालू केली. या बँका आजही सरकारी क्षेत्रातील बँका म्हणून कार्यरत आहेत.

स्टॉक एक्स्चेंज

१८३०पासूनच मुंबईमध्ये शेअर खरेदीविक्रीचा व्यवहार चालू झाला होता. १८५० साली एकंदर २२ ब्रोकर होते. ते एका वडाच्या झाडाखाली ट्रेडिंग करायचे. १८७४मध्ये दलाल स्ट्रीटवर बिल्डिंग झाली आणि शेअर बाजार सुरू झाला.. हे आशियातील सर्वात पहिले एक्स्चेंज होते.


बाँबे स्टॉक एक्सचेंज

मुंबईनंतर १८९४ साली अहमदाबाद, १९०८ साली कलकत्ता (आताचे कोलकाता) आणि १९२० साली मद्रास (आताचे चेन्नई) येथे एक्स्चेंजेस चालू झाली.

कर आकारणी

आपण तीन महत्त्वाच्या करांचा विचार करू – आयकर, शेतसारा आणि मिठावरचा कर.

आयकर

इंग्रजांनी १८६० साली आयकर चालू केला. (India's first income tax, C.L. Jenkins, British Tax Review 2012) हल्ली ज्याला progressive taxation म्हणतात त्या प्रकारची ही कररचना होती. वर्षाला २०० रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असल्यास कर भरावा लागत नसे. २०० ते ५०० उत्पन्नावर २ टक्के आणि ५००च्या वर ४ टक्के कर होता. (आजच्या किमतीत १० लाख उत्पन्नावर ४% कर) त्यावेळची लोकसंख्या (सध्याच्या पाकिस्तान आणि बांग्लादेशसकट) पंधरा कोटी होती. या लोकसंख्येपैकी ९,००,००० कर देणारे नागरिक होते. यामध्ये शेतीवरचे उत्पन्नही होते. अर्थातच शेतसाऱ्याशिवाय हा कर होता. तसे पाहिले तर सरकारच्या दृष्टीने आयकरामधून फार जास्त उत्पन्न मिळत नसे. आयकर सरकारी उत्पन्नाच्या केवळ ३ टक्के होता.

१८८६ साली करांमध्ये बदल करण्यात आले. कर न देण्याच्या उत्पन्नाची मर्यादा वार्षिक १००० रुपयांवर नेण्यात आली. (आजच्या किमतीत २० लाख) शिवाय उद्योगधंद्यासाठी ६ टक्के कर लावण्यात आला.

असे म्हणता येईल की आजच्या तुलनेत इंग्रज सरकार कमी कर घेत होते.

शेतसारा

मुघलांच्या काळात शेतकऱ्यांवर जबरदस्त कर होता. शेतकऱ्याला उत्पन्नावर ३० टक्के कर द्यावा लागे. इंग्रजांनी हा कर चालू ठेवला. १७९३मध्ये या करात वाढ करण्यात आली. इंग्रजाच्या लक्षात आले की जमिनीचा मोठा भाग जमीनदारांच्या हातात आहे. याशिवाय काही जमिनी शेतकऱ्यांच्या हातात होत्या. त्यासाठी कराची आकारणी जमीनदारी आणि रयत यांच्यासाठी निराळी करण्यात आली.

एकोणिसाव्या शतकात शेतीच्या उत्पन्नावर प्रोव्हिन्सेसमध्ये निरनिराळे कर लादलेले दिसतात. त्या वेळची स्थिती बाबासाहेब आंबेडकरांनी व्यवस्थितपणे समजावलेली आहे. (केसरी, १८ ऑगस्ट, १९२५). सरकारने शेतसारा किती घ्यावा या विषयावर त्यावेळी चर्चा चालू होती. त्या विषयावर आंबेडकरांनी आपले विचार केसरीत मांडले.

सरकारी शेतसाऱ्याचे प्रमाण शेतीच्या उत्पन्नाच्या मानाने इतके जबरदस्त आहे की शेतकऱ्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. शेतकऱ्याला जरी नीट उत्पन्न झाले नाही तरी ठरलेला सारा द्यावाच लागतो. याशिवाय शेतसारा हा दर एकरी लावला जात असल्याने शेकडो एकर लागवड करून २००० रुपये उत्पन्न मिळविणाऱ्या जमीनदारास ५०० रुपये आणि एका एकरात २० रुपयाचे उत्पन्न घेणाऱ्या नांगऱ्यास ५ रुपये सारा द्यावा लागतो. कराचे प्रमाण ऐपतीप्रमाणे असायला हवे. कमी उत्पन्नाला कर कमी हवा आणि जास्त उत्पन्नाला जास्त. यासाठी शेतसारा आयकर कायद्याखाली आणायला पाहिजे.

आंबेडकराच्या वरील विवेचनातून दोन गोष्टी स्पष्ट होतात.

 • सरासरीने शेतसारा उत्पन्नाच्या २५ टक्के असे.
 • शेतसारा आयकरापेक्षा निराळा होता.

मिठावरचा कर

गव्हर्नर हेस्टिंग्ज यांनी १७८० साली मिठाचे उत्पादन सरकारच्या हातात घेतले. त्यांनी चालू केलेली व्यवस्था भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत चालू राहिली. मणामागे दोन रुपये उत्पादनाच्या किमतीवर १.५ रुपये इतका प्रचंड कर होता. (एक मण म्हणजे सुमारे ३५ किलो) १७८१ ते १७८५ या काळात सरकारचे मिठावरचे उत्पन्न ३० लाखांवरून ६० लाखांपर्यंत पोचले. १७८८मध्ये हा कर मणामागे तीन रुपयापर्यंत वाढविण्यात आला. मिठाच्या किमती अशा वाढल्या की सामान्यास मीठ खरेदी करणे अवघड झाले. मीठ न खाण्याने जनतेची तब्येत खराब होऊ लागली. अशा स्थितीत मिठाची तस्करी चालू झाली. मग सरकारने २५०० मैल लांबीची कुंपणे उभारली. या कुंपणांवर १२,००० सैनिक पहारा देऊ लागले. १९०० सालापर्यंत भारतात मिठाचे उत्पादन १० लाख टन एवढे होत होते आणि त्यावर इंग्रजांना खूप उत्पन्न मिळत होते.

दरडोई उत्पन्न (GDP per capita)

(Historical Statistics of the World Economy:1–2008 by Prof. Angus Maddison (2010), University of Groningen)

वर्षे दरडोई उत्पन्न, रुपये
१८२० – १८७० ५००
१९१० ७००
१९६० ६००
१९७५ ९००
२०००-२०१० २१००
२०१५ ६०००

भारताचे जीडीपी १७९० साली जगाच्या जीडीपीच्या १६ टक्के होते. १८७०पर्यंत ते १२ टक्क्यांपर्यंत खाली आले. १९४७ साली भारताचे जीडीपी जगाच्या प्रमाणात ४ टक्क्यांपर्यंत उतरले होते.

निष्कर्ष

औद्योगिक प्रगती ही वित्तीय संस्था आणि आर्थिक स्थैर्य यावर अवलंबून असते. भारतात एकोणिसाव्या शतकात वित्तीय संस्था नव्हत्या. वित्तीय गरज पुरविण्याचा एकच मार्ग होता, तो म्हणजे सावकार. सावकारी व्यवस्थेवर आधुनिक उद्योग चालणे शक्य नव्हते. आता प्रश्न असा उभा राहतो की या सावकारी पद्धतीत या काळात काय बदल झाले. असे वाटते की काहीही नाही. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनीही परिस्थितीत फार सुधारणा झाली आहे असे म्हणता येत नाही. भारतात आता उद्योग सावकारांवर अवलंबून नाहीत. परंतु छोट्या शेतकऱ्यांचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत. छोट्या रकमेच्या आणि कमी कालावधीच्या कर्जासाठी सरकारने छोट्या को-ऑपरेटिव बँकेचा विचार केला. पण त्या क्षेत्रात इतका भ्रष्टाचार माजला की त्यावर उपाय दिसेना. खेडेगावातून अजूनही सावकारी गेलेली नाही.

दुसरा मुद्दा चलनाचा होता. यात मात्र एकोणिसाव्या शतकात आमूलाग्र बदल झाला. १८१८ साली भारतात किती प्रकारची चलने वापरात होती हे सांगणे कठीण आहे. इंग्रजांनी देशभर एक चलन लागू केले. चलनाच्या नियंत्रणासाठी रिझर्व्ह बँकेची स्थापना केली. यामुळे उद्योगांची सोय झाली. नाशिक येथे टांकसाळ चालू करण्यात आली. आजही आपण इंग्रजांनी १८१८ ते १९२० या काळात घालून दिलेली व्यवस्था वापरत आहोत.

चलनव्यवस्था लागू करण्याचे श्रेय इंग्रज सरकारला दिले पाहिजे पण बँका आणि स्टॉक एक्स्चेंज स्थापण्यात त्या वेळच्या भारतीय उद्योगपतींनी पुढाकार घेतला. सुरुवातीच्या बँका इंग्रज उद्योगजकांनी चालू केल्या. १९०९नंतर मात्र स्वदेशी चळवळीतून प्रेरणा घेऊन भारतीयांनी बँका चालू केल्या. शेअर बाजार चालू करण्यात पारशी आणि गुजराती व्यापाऱ्यांचा हात होता. उद्योगांना वित्त पुरवठ्यासाठी सशक्त बँका आणि शेअर बाजाराची आवश्यकता असते. त्याचा पाया याच काळात घातला गेला.

शेकडो वर्षांपासून राज्यकर्ते सामान्य जनांवर कर लादत आले आहेत. पूर्वीचे राज्यकर्ते ‘हा कर तुमच्याच भल्यासाठी आहे’, असे म्हणतही नसत. हल्लीचे राज्यकर्ते तसा निदान आव तरी आणतात. इंग्रज याला अपवाद नव्हते. इंग्रजांनी १८६० साली आयकर लागू केला. त्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले. आजही दर वर्षी अर्थसंकल्पामध्ये करात बदल घोषित होतात. कराचे प्रमाण किती होते हे समजण्यासाठी आपण सोन्याच्या भावांचा उपयोग करू. सुरुवातीच्या भागात दाखविल्याप्रमाणे त्यावेळेच्या आकड्यांना २०००ने गुणले की आजच्या किमतीचा अंदाज येईल. १८८६मध्ये आयकरात सूट १००० रुपये वार्षिक उत्पन्नावर होती. आजच्या किमतीत सोन्याच्या भावाच्या तुलनेत ही रक्कम २० लाख होते. आज कराची सूट २.५ लाखांवर आहे. उद्योगांवर ६ टक्के कर होता, आता तो ३० टक्के आहे. वैयक्तिक कर ४ टक्के होता आता हा कर १० टक्क्यापासून ३० टक्क्यांपर्यंत आहे. असे लक्षात येते की आजच्या आपल्या सरकारने आयकराचा बोजा फार वाढविला आहे. मिठावरचा कर हा सामान्य जनतेवर लादलेला बोजा होता.

शेतसाऱ्यामध्ये चित्र निराळे दिसते. डॉ. आंबेडकराच्या अंदाजाप्रमाणे एकरी २० रुपये उत्पन्नावर २५ टक्के कर होता. आजच्या किमतीत एकरी ४०००० रुपये वार्षिक उत्पन्नावर १०,००० रुपये कर होता. हे चित्र भयंकर आहे. शेतकऱ्यांची स्थिती दयनीय झाली होती त्यात काही आश्चर्य वाटावयास नको. आजच्या काळात शेतकी उत्पन्नावर कर नाही. त्याचा परिणाम म्हणजे भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे.

शेवटी आपण आर्थिक प्रगतीचा विचार केला. दरडोई जीडीपीच्या आकड्यांवरून असे लक्षात येते की इंग्रजांच्या काळात आर्थिक प्रगती शून्य होती. भारताकडे इंग्रज त्यांच्या उद्योगासाठी बाजारपेठ म्हणून पाहत असत. येथील आर्थिक स्थिती सुधारावी असा त्यांचा उद्देश नव्हता. इंग्रजांची सत्ता होती तेव्हा दरडोई जीडीपीमध्ये वाढ झाली नाही. खरे पाहता नेहरू आणि इंदिरा गांधी यांची समाजवादी धोरणे संपल्यावर दरडोई उत्पन्नामध्ये वाढ चालू झाली.

आर्थिक आणि वित्तीय क्षेत्राचा विचार केला तर एक संमिश्र चित्र दिसते. चलनव्यवस्था आणि बँका या व्यवस्था चालू करण्यात इंग्रजांचे योगदान होते. त्यानंतर भारतीय उद्योजकांनी बँकिंग क्षेत्रात चांगली प्रगती केली. इंग्रजांनी एकोणिसाव्या शतकात चालू केलेली आयकर प्रणाली आपण अजूनही वापरतो. कराचे प्रमाण मात्र वाढले आहे. परंतु शेतसारा आणि मिठावरचा कर हा सामान्यांच्या सुखाचा जराही विचार न केलेला कर होता. स्वातंत्र्‍यानंतर हे दोन्ही कर हटविण्यात आले.

उद्योगविश्व

खालील तक्त्यावरून हे दिसून येईल की इंग्रजांच्या काळात भारताची उद्योगविश्वात अधोगती झाली. या बाबतीतील एका शोध निबंधातील उतारा –
India’s Deindustrialization in the 18th and 19th Centuries David Clingingsmith & Jeffrey G. Williamson, London School of Economics study

India was a major player in the world export market for textiles in the early 18th century, but by the middle of the 19th century it had lost all of its export market and much of its domestic market. India underwent secular deindustrialization as a consequence. While India produced about 25 percent of world industrial output in 1750, this figure had fallen to only 2 percent by 1900.

World manufacturing output, % contribution

Year India China
1750 24.5 32.8
1800 19.7 33.3
1830 17.6 29.8
1880 2.8 12.5
1913 1.4 3.6
1938 2.4 3.1

The literature attributes India’s deindustrialization to three causes

 • Britain’s productivity gains in textile manufacture
 • World transport revolution and lowering of freight rates.
 • Turmoil associated with political realignment ultimately led to aggregate supply-side problems for Indian manufacturing

आपण ज्या शतकाचा विचार करीत आहोत – १८१८ ते १९२० – त्या शतकात जे उद्योग भारतात सुरू झाले ते भारतीयांच्या प्रयत्नाने होते. इंग्रजांना येथील उद्योग वाढविण्यात काही रस नव्हता. देशात कोणते नवीन उद्योग सुरू झाले ते पाहा.

मुंबईत पहिली कापड गिरणी १८५६
बंगालमध्ये पहिली ज्यूट मिल १८५६
पंजाबमध्ये काडतुसांचे उत्पादन १८५७
हुगळीत पहिली कागदाची गिरणी १८६७
टाटा नगरला पहिला स्टीलचा कारखाना १८९०
दार्जिलिंगमध्ये पहिला जलविद्युत प्रकल्प १८९७
पहिला साबणाचा कारखाना मीरत येथे १८९७
बिहारमध्ये पहिला साखर कारखाना १९०४
खोपोलीला टाटा जलविद्युत प्रकल्प १९१४
पोरबंदरला पहिली सिमेंटगिरणी १९१४
पहिला थर्मल पॉवर प्लांट हैदराबाद येथे १९२०

आधुनिक उद्योगधंद्याचा पाया या शतकात घातला गेला. या उद्योगांविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ.

कापड आणि ज्यूट

मुंबईचे वर्णन हे पुस्तक गोविंद नारायण माडगावकर यांनी १८६३ साली लिहिले. (पुन:प्रकाशन समन्वय प्रकाशन २०१२) या पुस्तकात ते कापडाच्या व्यापाराविषयी लिहितात –

मुंबईतून कापसाचा व्यापार १७५०पासून चालू झाला. मुंबई बंदराचा विकास होण्याआधी कल्याण बंदरातून व्यापार चाले. प्रतिवर्षी मुंबईहून दोन कोटींचा (आजच्या किमतीने ४००० कोटीचा) कापूस युरोप आणि चीनमध्ये जातो. अमेरिका आणि इंग्लंड यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून हिंदुस्तानी कापसाला मागणी आली आहे. मुंबईच्या व्यापाऱ्यांनी दोन-तीन वर्षांत लक्षावधि रुपये कमावले.

देशातील पहिली कापड गिरणी १८५६ साली मुंबईत चालू झाली. दावर नावाच्या पारशी माणसाने ही गिरणी चालू केली. एका इंग्रज तंत्रज्ञाने गिरणीचे डिझाईन केले. सुरुवातीचे अधिकारी इंग्रजच होते. त्यानंतर १८६१मध्ये अहमदाबादला शाहपूर मिल आणि १८६३ला कॅलिको मिल चालू झाल्या. १८७०पर्यंत देशात ४७ कापड गिरण्या होत्या, त्यांपैकी ३० मुंबईत होत्या.

ज्यूट, अंबाडीचा दोर आणि नारळाच्या काथ्याच्या दोराचा व्यवसाय जोरात चालला होता. कापसाप्रमाणेच जूटचा धागा वनस्पतीपासून बनतो. ईस्ट इंडिया कंपनीने १७९३ साली बंगालमधून ज्यूटचा धागा इंग्लंडला पाठवायला सुरुवात केली. इंग्लंडमध्ये या धाग्यापासून कापड बनविण्यात यश आले. ज्यूटच्या धाग्यापासून बनविलेल्या कापडाचा पोती बनविण्यास उपयोग होतो. १८३० साली इंग्लंडमध्ये ज्यूटचे कापड बनविण्यास सुरुवात झाली. बंगालमध्ये हुगळी नदीकाठी पहिली ज्यूट गिरणी १८५६ साली चालू झाली. या गिरणीची यंत्रसामुग्री इंग्लंडमधून आणली. मग या उद्योगात मोठी वाढ झाली. १९१० साली बंगालमध्ये ३८ गिरण्या काम करीत होत्या आणि दर वर्षी ४५ कोटी पोती बनविली जायची.

कागदाच्या गिरण्या

हुगळी नदीच्या काठी १८६७मध्ये पहिली कागदाची गिरणी चालू झाली. ही गिरणी इंग्लंडमधील एका कंपनीने चालू केली. त्यामुळे या कंपनीला सरकारी आधार राहिला. १८७९ पासून सर्व सरकारी कामांसाठी या गिरणीचा कागद वापरला जाऊ लागला. त्या वेळेपर्यंत सरकारने या गिरणीच्या कागदाला स्पर्धा करावी लागू नये म्हणून आणखी कागदगिरण्या चालू करण्यास परवानगी दिली नाही. परंतु त्यापुढे कागदाची मागणी एवढी वाढली की भारतीयांनी गिरण्या चालू केल्या. १९०३पर्यंत ९ गिरण्या चालू झाल्या आणि दर वर्षी २ कोटी टन कागद निर्मिती चालू झाली.

स्टील उत्पादन

टाटा कंपनीने १८८८मध्ये भारतातील जागांचा जिओलोजिकल सर्व्हे करून असा निर्णय काढला की भारतात पोलादाचे उत्पादन शक्य आहे. मग टाटांनी इंग्लंडमधील सरकारची परवानगी मिळविली. त्यानंतर जमशेटजी अमेरिकेला गेले. त्यांनी या कामासाठी दोन अमेरिकन तज्ज्ञ निवडले. हे होईपर्यंत १९०४ साल उजाडले. जमशेटजी यांच्या मृत्यूनंतर दोराबजी यांनी कार्यभाग घेतला. १९०७मध्ये टाटा स्टील कंपनीची स्थापना झाली. टाटांनी भारतातच भांडवल उभारले. १९१२ साली उत्पादनाला सुरुवात झाली. पहिल्या पाच वर्षांत टाटा स्टील कंपनीने इंग्लंडला ४००० कि. मी. लांबीचे रूळ पुरवले.

वीज निर्मिती

भारतातील पहिला वीज उत्पादनाचा उद्योग १८९७मध्ये दार्जिलिंगजवळ चालू झाला. १९११ साली टाटा पॉवर कंपनीने एक मोठा उद्योग चालू केला. ही योजना फार महत्त्वाकांक्षी होती. लोणावळ्याजवळ धरण बांधण्यात आले. धरणाचे पाणी मोठ्या पाईपातून ३०० मीटर खाली खोपोली येथे नेण्यात आले तेथे जनित्र बसवून वीजनिर्मिती करण्यात आली. उद्योगांसाठी विजेचा वापर होण्यापूर्वी उद्योगांची मशीन्स वाफेवर चालत असत.

सिमेंट उत्पादन

भारतातील पहिला सिमेंट उद्योग १९१४ साली पोरबंदर येथे चालू झाला. त्यावेळेपर्यंत भारतात इंग्लंडमधून सिमेंट आयात केले जात असे. भारतात सिमेंट उद्योगासाठी लागणारे सर्व खनिजे मिळत असल्याने मागणी वाढल्यावर १९१५मध्ये कटणी येथे आणि १९१६मध्ये लाखेरी येथे कारखाने लागले. १९२४मध्ये भारतात २,६७,००० टन सिमेंट बनत असे.

साखर कारखाने

भारतातील पहिला साखर कारखाना १९०४ साली बिहारमध्ये चालू झाला. हा कारखाना इंग्रज उद्योगपतींनी चालू केला. त्या वेळेस भारतातील नीळ उद्योग संपुष्टात येत होता. निळीच्या धंद्यात असलेल्या उद्योगपतींनी साखर कारखान्यात गुंतवणूक केली. १९२०पर्यंत भारतात १८ साखर कारखाने चालू झाले.

पारशी समाजाचे योगदान

मुंबईतील पारशी समाजाने उद्योग क्षेत्रात मोठे योगदान दिले. मुंबईतील पहिला छापखाना एका पारशी गृहस्थाने १८१२ साली चालू केला. देशातील आणि आशियातले पहिले वृत्तपत्र ‘बॉम्बे समाचार’ पारशी गृहस्थाने चालू केले. दादाभाई नवरोजी यांना भारतीय राजकारणातील पितामह असे समजले जाते.

जमशेटजी जिजीभॉय हे मोठे व्यापारी होते. त्यांची स्वतःची जहाजे होती. मुंबईचे ग्रँट मेडिकल कॉलेज चालू करण्यासाठी जमशेटजी जिजीभॉय यांनी १,००,००० रुपये दिले (आजच्या किमतीने २०० कोटी) पुण्यात पाणी योजनेसाठी त्यांनी पैसे दिले.

मुंबईच्या पारशी समाजाने चीन बरोबरच्या अफूच्या व्यापारात खूप पैसा मिळविला. जेव्हा तो धंदा अवघड होऊ लागला तेव्हा पारशी उद्योगपती कापड धंद्याकडे वळले. मुंबईतील कापड उद्योगात पारशी समाजाचा मोठा हात होता. मानेकजी पटीट यांनी १८५५ साली पहिली टेक्स्टाइल मिल चालू केली. जमशेटजी टाटा यांनी १८६९मध्ये अलेक्झांड्रा मिल चालू केली. नुसेरवानजी वाडिया यांनी १८८९ साली बॉम्बे डाईंग मिल चालू केली.

टाटा समूहाने कापड उद्योगाबरोबर वीज उत्पादन आणि स्टील उत्पादन यांसारखे मोठे उद्योग देशात चालू केले.

कामगारांचे जग

खालील माहिती सकलजनसंवाद लेखक रा. ना. चव्हाण, प्रकाशक रमेश चव्हाण या पुस्तकातील प्रकरण २६मधून घेतली आहे.

आपण वर पाहिल्याप्रमाणे, १८५० पूर्वी भारतात उद्योगधंदे नव्हते. मुंबईत आणि अहमदाबादला कापड गिरण्या या सुमारास चालू झाल्या. नोकरीसाठी खेडेगावातून नोकरवर्ग शहरात आला.

कामगारांचे जिणे फार बिकट होते. अत्यल्प मजुरी आणि अमर्याद काम यांनी कामगार पिसून गेला होता. मजुरांची अवास्था नरकासमान होती असे म्हटल्यास अतिशयोक्ती वाटू नये.

या काळात कामगारांचे पहिले पुढारी, नारायण मेघाजी लोखंडे पुढे आले. लोखंडे हे माळी जातीत १८४८ साली जन्मले आणि शिक्षण संपल्यावर त्यांनी पोस्टात नोकरी केली. ते महात्मा फुल्यांच्या संपर्कात आले आणि त्यांचे शिष्य बनले. १८७७ सालापासून त्यांनी मुंबईत ‘दीनबंधु’ हे साप्ताहिक चालवले. दीनबंधुत त्यांनी गिरणी कामगारांची दु:खे हिरीरीने मांडली. मुंबईतील पहिल्या कामगार सभेचे ते अध्यक्ष झाले. १८९० साली नेमलेल्या लेबर कमिशनसमोर त्यांनी साक्ष दिली. लोखंड्यांच्या प्रयत्नाने मुंबईतील कामगारांच्या प्रश्नांना मँचेस्टरच्या कामगार सभेचे पाठबळ मिळाले, त्यामुळे इंग्रज सरकारला कामगारांच्या प्रश्नांवर विचार करण्याची आवश्यकता भासली. १८८१ साली पहिला फॅक्टरी कायदा झाला.

लोखंडे हिंदू आणि ब्राह्मण यात फरक करीत आणि उच्चवर्णीयांवर आग पाखडीत.

त्या काळात हिंदू आणि ब्राह्मण यांत फरक केला जात असे हे ह्या लेखमालेत आपण दुसऱ्यांदा पाहिले. ब्राह्मणांनी स्वत:ला समाजापासून किती वेगळे ठेवले होते हे त्याचे द्योतक आहे.

निष्कर्ष

उद्योग आणि कारखान्यांच्या वाढीसाठी काही गोष्टी आवश्यक असतात. त्यामध्ये दळणवळणाची साधने, दूरसंचार व्यवस्था (टेलिकम्युनिकेशन्स), स्थिर वित्तीय संस्था आणि चलन, वास्तववादी कर आकारणी असे घटक असतात. याशिवाय अजून एक महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे सरकारी मदत. स्वातंत्र्‍यानंतर सरकारने प्रत्येक राज्यात Industrial Development Corporations स्थापन केल्या. उद्योजकांसाठी औद्योगिक क्षेत्रे चालू केली. त्यामुळे उद्योजकांचा जमीन शोधण्याचा त्रास वाचला.

या बाबतीत १८१८ते १९२०मध्ये काय स्थिती होती? सरकारचे धोरण भारतीय उद्योगांना वाव देणे हे निश्चितच नव्हते. कारण त्यामुळे इंग्लंड मधील उद्योगांची बाजारपेठ कमी होत होती. वर विचारात घेतलेल्या उद्योगांचा विचार केला तर असे दिसते की कागद, साखर, वीज उत्पादन हे उद्योग भारतात सुरुवातीला इंग्रजी उद्योजकांनी चालू केले. आणि ते इंग्रजी उद्योजकांनी चालू केले म्हणून इंग्रज सरकारने त्यांना मदत केली. सिमेंट, स्टील आणि कापड या क्षेत्रांत स्थिती निराळी राहिली. भारतीयांनी स्वतःच्या हिमतीने या तीन क्षेत्रांत उद्योग चालू केले.

कापड, उत्पादन, कागद, साखर, लोह या क्षेत्रांत उत्पादन भारतात १८१८ सालच्या आधीही होत होते. मग या शतकात फरक काय झाला ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. पहिला फरक असा की विज्ञान आणि तंत्रज्ञान याची सांगड. भारतातील या वस्तूंचे उत्पादन हे वैयक्तिक कौशल्यावर अवलंबून होते. उत्पादनामागे वैज्ञानिक विचार नव्हता. या आधीच्या शतकात युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती. मानवी कौशल्य काढून मशीनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झाले होते. कागदाचे उदाहरण पाहू. १४०० सालापासून भारतात कागद बनत असे. हाती बनलेला कागद सामान्यांपर्यंत पोचत नसे. जेव्हा १८६७ साली कागदाची गिरणी चालू झाली त्यानंतर मुलांसाठी शालेय पुस्तके छापणे शक्य झाले.

हे सर्व बदल या काळात भारतात आले. यासाठी आपण असे म्हणू शकतो की औद्योगिक क्षेत्राचा पाया या काळात घातला गेला - श्रेय काही अंशी इंग्रजांना आणि बऱ्याच अंशी भारतीय उद्योजकांना.

एका उद्योगाचा उल्लेख केलेला नाही तो म्हणजे नीळ उद्योग. अठराव्या शतकात इंग्रज उद्योजकांनी भारतात निळीचे उत्पादन चालू केले. त्याला जगात मोठी मागणी होती. एकोणिसाव्या शतकात निळा रंग कृत्रिम रीतीने बनविण्यास सुरुवात झाली आणि नीळ उद्योग बसला.

पुढच्या भागात- भाग २४ - शेती आणि दळणवळण क्षेत्रांतील बदल आणि प्रगती याचा विचार करू.

मागचे भाग -

भाग १ – एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती
भाग २ – अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी
भाग ३ – अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती
भाग ४ – अठराव्या शतकातील शासनयंत्रणा
भाग ५ – धर्मशास्त्रे आणि कर्मकांडी धर्म
भाग ६ – अठराव्या शतकातील धर्माचे स्वरूप
भाग ७ – धार्मिक सुधारणांची आवश्यकता
भाग ८ – धार्मिक सुधारणांचे प्रयत्न
भाग ९ – समाजसुधारणा – दलित कोण आणि कसे?
भाग १० – समाज सुधारणा – दलितांच्या उद्धाराचे प्रयत्न
भाग ११ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १२ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १३ – समाजातील बदल
भाग १४ – समाजातील बदल – मुंबईचा विकास
भाग १५ – समाजातील बदल – पुण्याचा विकास
भाग १६ – समाजातील बदल
भाग १७ – दोन समाजसुधारक राजे
भाग १८ – १८५७चा उठाव
भाग १९ – १८५७ चा उठाव
भाग २० – १८५७चा उठाव – झाशीतील घटना
भाग २१ – शिक्षण आणि पत्रकारितेची सुरुवात
भाग २२ – सांस्कृतिक क्षेत्रातील बदल

लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.

सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण.

सुधीर भिडे

field_vote: 
0
No votes yet

लेखात काही तपशील चुकले आहेत.

ईस्ट इंडिया कंपनीच्या लक्षात आले की या देशात वेगवेगळ्या चलनप्रणाली आहेत. त्यामुळे मुघल बादशहाची परवानगी घेऊन त्यांनी मुंबईत आपली टांकसाळ १७१७मध्ये चालू केली.

मुंबईत टाकसाळ १६७२ सालीच चालू झाली होती. १७१७ साली मुघल बादशहाच्या नावे नाणी पाडण्याचा परवाना कंपनीला मिळाला. १८ व्या शतकात मुघल साम्राज्य जसजसे ढासळत गेले तसतसे इतर सत्तांनीही परवाना / विनापरवाना आपापली नाणी सम्राटाच्या नावे पाडणे चालू केले.

त्यांनी सोने, चांदी, तांबे आणि टिन या धातूची नाणी काढली.

यातली तांबे आणि टिनची नाणी मुघल बादशहाच्या नावाची नव्हती.

पुढच्या शंभर वर्षांत इंग्रजांनी सबंध देशावर नियंत्रण मिळविले होते. १८३५ साली पूर्ण भारतात इंग्रजांनी एक चलनव्यवस्था चालू केली.

पूर्ण भारतात म्हणजे पूर्ण "ब्रिटिश भारता"त. संस्थानी प्रदेशांत अनेक रुपये विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत पाडणे चालू होतेच. उदा. बडोदा, हैदराबाद, इंदोर, जयपूर, मेवाड, कच्छ इ. इ. काही तर १९४७ पर्यंतही चालू होते.

१२ ग्रॅम वजनाचा चांदीचा एक रुपया व्यवहारात आला. त्याची आजची किंमत ७०० रुपये होईल.

रुपयाचे वजन १ तोळा म्हणजे ११.६६ ग्रॅम्स

व्हिक्टोरियन मुहर म्हणजे ब्रिटिश १० रुपये

१ ब्रिटिश मोहर = पंधरा रुपये, दहा नव्हे. दहाचा भाव अकबराच्या काळात होता.

१८६१ साली पहिल्या कागदी बँक नोटा आल्या. या इंग्लंडमध्ये छापल्या जात.

कागदी नोटा १८०० च्या आसपासच आल्या होत्या. पण त्या खाजगी आणि निमसरकारी बँकांच्या होत्या. १८६१ साली पहिल्या पूर्णपणे सरकारी कागदी नोटा आल्या.

१९२८ साली नाशिकमध्ये भारतातील पहिली टांकसाळ चालू झाली. त्यानंतर देशातच बनलेल्या चलनाचे देशात वितरण सुरू झाले.

१९२८ मध्ये नाशिकला नोटांचा छापखाना सुरु झाला (इंडिया सिक्युरिटी प्रेस). टांकसाळी पुष्कळच आधी सुरू होत्या. पूर्णपणे यांत्रिक टाकसाळ मुंबईत १८३५ साली कार्यरत झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पूर्ण भारतात म्हणजे पूर्ण "ब्रिटिश भारता"त. संस्थानी प्रदेशांत अनेक रुपये विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत पाडणे चालू होतेच. उदा. बडोदा, हैदराबाद, इंदोर, जयपूर, मेवाड, कच्छ इ. इ. काही तर १९४७ पर्यंतही चालू होते.

हे (अधोरेखिताच्या बाबतीत) झाले चलनी नाण्यांच्या बाबतीत. (त्यातसुद्धा, सर्वच संस्थानांतील चलनी नाण्यांचे नाव ‘रुपया’ हेच नसावे, आणि त्यांचा ब्रिटिश हिंदुस्थानी रुपयाशी विनिमयदर हा सर्वत्र एकास एक नसावा. उदाहरणार्थ: १. कच्छमधील कोठल्याश्या छोट्यामोठ्या संस्थानातील चलनी नाण्याचे नाव ‘दोकडा’ असे असल्याचे वाचलेले आहे. (चूभूद्याघ्या.) २. हैदराबादेतील रुपया (उस्मानी सिक्का) आणि ब्रिटिश हिंदुस्थानी रुपया (आणि पुढे स्वातंत्र्यानंतर भारतीय रुपया) यांच्यातील विनिमयदर एकास एक नव्हता.)

याव्यतिरिक्त, हैदराबाद संस्थानास चलनी नोटा जारी करण्याचासुद्धा अधिकार होता, नि तशा त्या जारी केल्या जात/सर्रास प्रचलित होत्या. (बहुधा जम्मू आणि कश्मीर संस्थानाससुद्धा असे अधिकार असावेत, असे पुसटसे उल्लेख वाचनात आहेत; मात्र, अधिक तपशील न मिळाल्याकारणाने त्याबद्दल संदेह आहे.)

गंमत म्हणजे, हैदराबाद संस्थानाचे हे वेगळे चलन, ब्रिटिशांच्या जमान्यात तर सोडाच, परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर पोलीस अॅक्शन होऊन हैदराबाद संस्थान भारतात विलीन करवून घेतल्यानंतरसुद्धा कित्येक वर्षे हैदराबाद संस्थानात भारतीय रुपयाच्या बरोबरच अधिकृतरीत्या, आणि अधिकृत विनिमयदराने चलनात होते. त्याचे डीमॉनेटायझेशन बऱ्याच उशिराने झाले. (भारतीय स्वातंत्र्य १९४७चे; पोलीस अॅक्शन/हैदराबादचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण १९४८चे; भारतीय प्रजासत्ताक १९५०चे; (विलीनीकृत) हैदराबाद संस्थानात भारतीय रुपया लागू झाला १९५० साली; हैदराबादी रुपयाची नोटानाणी नव्याने पाडण्याचे बंद झाले १९५१ साली; हैदराबादी रुपयाचे (उस्मानी सिक्क्याचे) संपूर्ण डीमॉनेटायझेशन १९५९ सालचे. १९५०-१९५९दरम्यानचा विनिमयदर: ७ हैदराबादी रुपये = ६ भारतीय रुपये. (सर्व माहिती विकीपीडियातून.))

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारत हा एकसंघ भू भाग ब्रिटिश पूर्व अस्तित्वात होता का?
एक संघ म्हणजे एकाच केंद्रीय सत्तेखाली
.ह्या प्रश्नांचे उत्तर कुठेच मिळत नाही.
भारत नावाचा देश ब्रिटिश पूर्व अस्तित्वात होता आणि त्याच्या सीमा अमक्या तमक्या होत्या.
ह्या वर कोणी तरी प्रकाश टाकावा.
खूप वर्ष पासून हा प्रश्न मनात आहे.

.
भारत हे नाव.
इंडिया हे नाव च ब्रिटिश राज्य किंवा ब्रिटिश राज्य नंतर अस्तित्वात आले हे खरे आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0