एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २५

सैन्य, आरमार आणि शस्त्रास्त्रे

सुधीर भिडे

Peace cannot be secured without armies.
To preserve peace, countries need to prepare for war.

१८१८ आणि १९२० या कालखंडात सैन्य, आरमार आणि शस्त्रास्त्रे यात फारच बदल झाले. १८१८मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या आर्मीने भारतातील सर्व राजे लोकांना हरवून देशभर आपली सत्ता प्रस्थापित केली होती. १९२०मध्ये पाच लाखांची एक मोठी सेना उभी झाली होती. या सेनेला पहिल्या महायुद्धात लढण्याचा मोठा अनुभव मिळाला होता. भारतात शस्त्रांची निर्मिती चालू झाली होती. एक सशक्त आरमार बनले होते जे अरबी समुद्रावर पूर्णपणे वर्चस्व गाजवित होते.

प्रेसिडेंसी आणि प्रॉव्हिन्सेस

ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार भारताच्या किनाऱ्यावरच्या बॉम्बे, मद्रास आणि कलकत्ता या तीन ठिकाणाहून सुरुवात झाला. संरक्षणासाठी या तीन ठिकाणी त्यांनी प्रथम सैन्य उभे केले. मागून या तीन ठिकाणाजवळचा प्रदेश जिंकण्यास सुरुवात झाली. कारभारासाठी त्यांनी या तीन भागांना प्रेसिडेंसी असे नाव दिले.

बंगाल प्रेसिडेंसी जवळ जवळ पूर्ण उत्तर भारतावर प्रभुत्व ठेऊन होती. सध्याचे आसाम, बंगला देश, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल हे भाग बंगाल प्रेसिडेंसीच्या अधिकाराखाली येत. बॉम्बे प्रेसिडेंसीचा अधिकार बलुचिस्तान, सिंध, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकावर चाले. मद्रास प्रेसिडेंसीचा अधिकार तमिळनाडू, केरळ, दक्षिण कर्नाटक, ओरिसा या भागावर चाले. १८३३ पासून सबंध भारतासाठी गव्हर्नर जनरलची नेमणूक सुरू झाली जो कलकत्त्याहून काम करे.

पुढे या तीन प्रेसिडेंसींमधून सबंध देशाचा कारभार करणे अवघड होऊ लागले. पुढच्या शंभर वर्षात हळू हळू या प्रेसिडेंसीज मधून प्रॉव्हिन्सेस निराळे करण्यात आले. १९२०पर्यंत प्रेसिडेंसी ही कल्पना जाऊन प्रॉव्हिन्सेस बनले होते. स्वातंत्र्यानंतर या प्रॉव्हिन्सेसना स्टेट्स असे संबोधण्यात आले. पुढे भाषावार प्रांतरचना झाल्यावर स्टेट्सची पुनर्रचना करण्यात आली.

ईस्ट इंडिया कंपनीची आर्मी

ईस्ट इंडिया कंपनीने १७४६मध्ये बंगाल प्रेसिडेंसी, बॉम्बे प्रेसिडेंसी आणि मद्रास प्रेसिडेंसीमध्ये तीन निराळ्या आर्मीज बनविल्या. १७४९मध्ये सैन्याची संख्या ३००० होती. ती वाढून १७६३मध्ये २६००० झाली आणि १७७८मध्ये ६७००० झाली. १७७८मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य इंग्लंडच्या सैन्यापेक्षा मोठे होते.

बंगाल आर्मी

Structure and organization of Bengal army by Amiya Sen. Thesis submitted to University of Landon, 1961

खाली दिलेली बंगाल आर्मीविषयी माहिती वरील संदर्भातून घेतली आहे. बॉम्बे आणि मद्रास आर्मीत जवळपास अशीच स्थिती होती. याचे उल्लेख वरील प्रबंधात येतात.

या आर्मीचे नाव बंगाल आर्मी असले तरी बहुतेक सैनिक बिहार आणि उत्तर प्रदेशातील होते. सैनिकांना सीपॉय असे म्हटले जाई. जास्त शिपाई ब्राह्मण आणि राजपूत जातीतील होते. प्लासीची लढाई या आर्मीनेच जिंकली. १७९६पर्यंत बंगाल आर्मी खूपच मोठी झाली. युरोपियन्स आणि भारतीय अशा निराळ्या रेजिमेंट्स होत्या.

  • युरोपियन तोफखान्याच्या ३बटालियन्स, युरोपीय पायदलाच्या ३ रेजिमेंट्स
  • भारतीय घोडदळाच्या १० रेजिमेंट्स, भारतीय पायदलाच्या १२ रेजिमेंट्स

एका पायदलाच्या रेजिमेंटमध्ये २००० शिपाई आणि अधिकारी असत. एका रेजीमेंटमध्ये १००० सैनिकांच्या दोन बटालियन्स असत. सैनिकात मुस्लिमांची संख्या १०% पण नसे. शिपायाच्या वर नाईक, हवालदार, जमादार आणि सुबेदार असे हुद्दे असत. या जागांवर पण भारतीय सैनिक असत. सैनिकांना स्वतःची झोपडी बांधावी लागे. दोन सैनिकांना राहता येईल अशी झोपडी ५ रुपयात बांधता येई. शिपायांना ६ ते ८ महिने शिक्षण देण्यात येई. शिपायांना दर महिना ७ रुपये पगार होता. (आजच्या हिशोबांनी १४००० रुपये) हवालदाराला ९, जमादाराला १७ आणि सुबेदाराला ५२ रुपये पगार मिळे. लढाई चालू असताना महिना १.५ रुपये जास्तीचा भत्ता मिळे. १८३७ पासून निवृत्त होणाऱ्या शिपायास महिना ३ रुपये पेन्शन चालू झाले. मागून पेन्शन ४ रुपये झाले (८०००), अशा प्रकारचे पगार पन्नास वर्षे तसेच राहिले.

या आर्मीचे अधिकारी इंग्रज असत. शिपाई आणि अधिकारी यांच्यातील संवादाचा मोठा प्रश्न असे. सुरुवातीला कंपनीने भाषांतर करणारे अधिकारी नेमले. या इंग्रजी अधिकाऱ्यांमध्ये असंतोषाची दोन कारणे होती. इंग्लंड मधून रोयल आर्मीतून आलेले अधिकारी आणि ईस्ट इंडिया कंपनीने नेमलेले अधिकारी यांच्या वेतनात फरक असे. दुसरे कारण हे की या अधिकाऱ्यांच्या बढत्या अतिशय हळू होत असत. लेफ्टनंट १५ वर्षे तर कॅप्टन २० वर्षे त्याच पदांवर रहात. या असंतोषामुळे अधिकारी अवैध मार्गाने पैसे करीत आणि कंपनी त्याकडे काणाडोळा करे.

१८४०पासून नेपाळमधील गुरखा आणि पंजाबमधील जाट बंगाल आर्मीत घेण्यात आले. १८४०पर्यंत बंगाल आर्मी कंपनीची सर्वात मोठी आर्मी झाली – बंगाल आर्मी – पायदळाच्या ७४ बटालियन्स, मद्रास आर्मी - ५२ बटालियन्स आणि बॉम्बे आर्मी २६ बटालियन्स

१८५७च्या उठावापर्यंत बंगाल आर्मीत १, ५०,००० शिपाई होते. त्यापैकि १,३०,००० भारतीय होते. १८५७च्या उठावात ६४ रेजिमेंट्सने बंड केले आणि त्या रेजीमेंट्स ना बरखास्त करण्यात आले. त्यानंतर उच्चवर्णीय ब्राह्मण आणि राजपूत शिपायांची भरती बंद करण्यात आली आणि अस्पृश्य जातीतील भरती वाढविण्यात आली.

बॉम्बे आर्मी

१७४२मध्ये १६०० युरोपीय सैनिकाचे एक दल मुंबईत बनविण्यात आले. १७८३पर्यंत बॉम्बे आर्मीची संख्या १५०००पर्यंत वाढविण्यात आली. या दलात महार जातीच्या शिपायांची मोठ्याप्रमाणावर भारती झाली. १७९६मध्ये भारतीयांच्या चार नवीन रेजिमेंट्स बनविण्यात आल्या. टिपू सुलतान, मराठा, आणि अफगाण यांच्या बरोबरच्या युद्धात याच आर्मीने भाग घेतला. कर्नाटकापासून अफगाणिस्तानपर्यंत ही आर्मी युद्धात होती. १८५७च्या उठावमध्ये बॉम्बे आर्मीच्या फक्त दोन रेजिमेंट्स नि उठाव केला. त्यांना निःशस्त्र करून बरखास्त करण्यात आले. बहुतेक बॉम्बे आर्मीच्या दलांनी मध्य भारतात उठाव करणाऱ्यांविरुद्ध लढाई करून उठाव करणाऱ्यांना हरविले.

मद्रास आर्मी

फ्रेंच आर्मीच्या बरोबर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर संघर्ष चालू झाल्यावर इंग्रजांनी मद्रास आर्मी उभारण्याचे ठरविले. १७५७मध्ये मद्रास आर्मीची पहिली दले तयार झाली. १८५७च्या उठावाचा मद्रास आर्मीवर काहीच परिणाम झाला नाही.

ब्रिटिश इंडियन आर्मी

१८९५ साली इंग्रज सरकारने ब्रिटिश इंडियन आर्मीची दले उभारली. १९०३ साली बंगाल आर्मी, बॉम्बे आर्मी आणि मद्रास आर्मी ही सर्व दले ब्रिटिश इंडियन आर्मी या नावाखाली एकत्रित करण्यात आली. या आर्मीला ब्रिटिश इंडियन आर्मी नाव देण्याचे कारण हे की या आर्मीशिवाय ब्रिटिश आर्मीची काही दले भारतात होती ज्यामधे फक्त इंग्रज सैनिकांना घेतले जाई. अशा प्रकारे भारतात ब्रिटिश इंडियन आर्मी आणि ब्रिटिश आर्मी अशा दोन संस्था एकाच वेळी अस्तित्वात होत्या. लॉर्ड किचनर पहिले आर्मी चीफ झाले. ब्रिटिश इंडियन आर्मीच्या १० डिविजन्स करण्यात आल्या. आर्मीचा मुख्य अधिकारी – Chief of Staff - गव्हर्नर जनरलच्या हाताखाली आणि आज्ञेवरून काम करीत असे. इंग्लंडमधील रोयल मिलिटरी कॉलेज मधून शिकलेल्या ऑफिसर्सची नेमणूक ब्रिटिश इंडियन आर्मीत होत असे.

पायदळाच्या लढाईच्या तंत्रात बदल

शिवाजी महाराजांपासून पहिल्या बाजीरावपर्यंत मराठे एक प्रकारचे युद्धं खेळले. घोडं सवार हे तलवारीने युद्धं करत. शत्रूशी सरळ सामना न करता घोड्यावरून वेगवान हालचाली करून शत्रूला हैराण केले जाई. तलवार हे मुख्य शस्त्र असे. एकोणिसाव्या शतकात युद्धे मस्केटच्या जोरावर होऊ लागली. गोलकोंडा, म्हैसूर, ग्वालेर या ठिकाणी युरोप एवढे चांगले मसकेट्स बनत असत. ईस्ट इंडिया कंपनीने इंग्लंडमध्ये बनलेल्या मसकेट्स भारतात आयात करण्यास सुरुवात केली. १७७० पासून १८१५पर्यंत लाखो मसकेट्स भारतात आयात केल्या गेल्या. यात स्थानिक उत्पादन मारणे हा हेतू होता.


आवरण तोंडाने फाडून

काडतुसावर लावलेले कव्हर/ आवरण तोंडाने फाडून मग काडतुस नळीत ठेवले जात असे. या आवरणाला गाईची चरबी लावलेली असते अशी माहिती पसरल्याने १८५७ साली अशांतता सुरू झाली.

युरोपमध्ये मस्केट्समध्ये सुधारणा होऊन रायफल्स बनु लागल्या. राईफलमध्ये बॅरलच्या आतल्या बाजूला कंगोरे असतात. त्यामुळे दूरवर ज्यादा अचूक नेम लागतो. त्याच काळात राईफलला बायोनेट बसविण्यात आले. त्यामुळे तलवारीचा फायदा संपुष्टात आला.

राईफल राईफलिंग

राईफल

चित्रात डाव्या बाजूस राईफल दाखवली आहे. खालच्या बाजूला बायोनेट (bayonet) आहे जे राईफलच्या तोंडावर बसविता येते. उजव्या बाजूस राईफलच्या नळीमधील कंगोरे दिसत आहेत. याला राईफलिंग असे म्हणतात. मस्केटला राईफलिंग केले की राईफल बनते. या कंगोऱ्यामुळे गोळी / काडतुस वेगाने गोल गोल फिरत राईफलमधून बाहेर पडते. त्यामुळे गोळीच्या/ काडतुसाच्या फ्लाइट पाथला स्थैर्य येते. मस्केटच्या तुलनेत राईफलचा नेम जास्त दूर आणि जास्त अचूक लागतो. राईफलमध्ये पाच गोळ्यांचे मॅगजिन बसविले जाते. याचा अर्थ एका वेळेस पाच गोळ्या/ काडतूसे मारता येतात.

१८५८ नंतर कंपनी सरकार जाऊन इंग्लंडच्या पार्लमेंटने कारभार हातात घेतला. १८५९ पासून भारतात राईफल्स येऊ लागल्या आणि हळू हळू मस्केट्स कमी होत चालल्या.

शस्त्रास्त्र निर्मिती

(संदर्भ - History of ordnance Establishments of British India: 1700-1947, Kaushik Roy, Journal of History of Science, 47.1 (2012) 145-155)

इंग्रजांजवळ शस्त्राविषयी श्रेष्ठ तंत्रज्ञान होते. त्यामुळे ते भारतीयांविरुद्ध लढाया जिंकू शकले. हे श्रेष्ठत्व टिकविण्यासाठी त्यांच्या जवळ दोन पर्याय होते. एक तर इंग्लंड मधून येणाऱ्या शस्त्रांवर अवलंबित राहणे. किंवा शस्त्रांचे भारतात उत्पादन करणे. त्यांनी हळूहळू भारतात उत्पादन करणे चालू केले. त्यांनी काडतुसांची दारू, बंदुका आणि तोफा भारतात बनविणे चालू केले. काडतुसांच्या दारूला लागणारे पदार्थ भारतात उपलब्ध होते. १७४१मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या असे ध्यानात आले की भारतात बनविलेली काडतुसाची दारू इंग्लंड मधून आणलेल्या बंदुकीच्या दारूपेक्षा जास्त चांगली आहे. १७७९मध्ये मुंबईत बंदुकीच्या दारूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन चालू झाले. १८३०पर्यंत सर्व प्रेसिडेंसीच्या राजधान्यात बंदुकीच्या दारूचे उत्पादन चालू झाले. या नंतर जबलपुर येथे तोफा वाहून नेणाऱ्या गाड्यांचे उत्पादन सुरू झाले. Director General of Ordnance Factories (DGOF) हा उच्च श्रेणीचा अधिकारी नेमण्यात आला. स्वातंत्र्यानंतर पंचाहत्तर वर्षांनंतर आजही ती पोस्ट अस्तित्वात आहे. या सर्व बाबतीत इंग्रजांना एक दुविधा होती. भारतात जेव्हढे उत्पादन वाढेल तितका इंग्लंडमधील कारखान्यांचा धंदा जात होता. पण भारतातील सैन्याची संख्या जशी वाढत गेली तसे दारूगोळ्याचे भारतात उत्पादन करणे सोयीचे होऊ लागले.

दोन विश्वयुद्धे

पहिले विश्वयुद्ध चालू झाले तेव्हा ब्रिटिश इंडियन आर्मीत दोन लाखापेक्षा जास्त सैनिक होते. महायध्द्ध संपेपर्यन्त सैनिकात वाढ करून पाच लाखापेक्षा जास्त सैनिक झाले. युद्धधात १,४०,००० सैनिकांनी भाग घेतला. हे सर्व सैनिक युरोपमध्ये युद्धासाठी गेले. त्यानंतर मध्य पूर्वेत ७०,००० सैनिक पाठविण्यात आले. या युद्धात ४७,००० भारतीय सैनिक मारले गेले आणि ६५,००० जखमी झाले.

(राधिका सिंघा, द कूलीज ग्रेट वॉर, यांच्या आकड्यांप्रमाणे १४लाख भारतीयांनी युद्धात भाग घेतला. त्यांपैकी ५ लाख भारतीय प्रत्यक्ष युद्धाशिवायच्या इतर कामाला गेले होते – अन्न शिजविणे, साफसफाई, बूट शिवणे, जखमी सैनिकास हॉस्पिटलमध्ये पोचविणे अशा तऱ्हेची कामे)

पहिल्या महायुद्धानंतर डेहराडून येथे Indian Military Academyची स्थापना १९३२ साली करण्यात आली. भारतातच सैन्याच्या अधिकाऱ्यांचे शिक्षण चालू करण्यात आले.

दुसरे विश्वयुद्ध आपण जो कालखंड विचारात घेत आहोत त्यानंतर झाले. पण ब्रिटिश इंडियन आर्मीची पूर्ण कथा माहीत करून घेण्यासाठी या युद्धाचाही विचार करावा लागेल. दुसऱ्या विश्वयुद्धात ब्रिटिश इंडियन आर्मी जगातील सर्वात मोठी आर्मी झाली. या आर्मीत २५ लाख सैनिक होते. आधुनिक शस्त्रांसह ब्रिटिश इंडियन आर्मी स्वयंपूर्ण झाली. आफ्रिका आणि पूर्वेतील देश याठिकाणी या आर्मीने युद्ध केले. या युद्धात ८७,००० भारतीय सैनिक मारले गेले.

भारतीय आरमार

ईस्ट इंडिया कंपनीने सुरतला आपल्या वखारीच्या संरक्षणासाठी आरमार ठेवण्यास सुरुवात केली. या आरमारानेच भारतीय किनाऱ्याचा नकाशा तयार केला. १६३५मध्ये कंपनीने सुरतला जहाजे बनविणे सुरू केले. १६८६पर्यंत व्यापारचे केंद्र मुंबई झाले होते. म्हणून या आरमाराला बॉम्बे मरीन्स असे नाव देण्यात आले. १८०९मध्ये बॉम्बे मरीन्सच्या १२ युद्धनौका होत्या आणि त्यांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रभुत्व मिळविले होते. १८२९मध्ये बॉम्बे मरीन्समध्ये पहिली वाफेवर चालणारी युद्धनौका आली. ही ४०० टनाची युद्धनौका मुंबईच्या माझगाव गोदीत बनली. भाग १४मध्ये या विषयावर माहिती आलेली आहेच. १८३०मध्ये बॉम्बे मरीन्सचे नाव इंडियन नेव्ही ठेवण्यात आले. हे आरमार सुएझपर्यंत सर्व भागावर नियंत्रण ठेवून होते. १८४५पर्यंत शिडाच्या नौका जाऊन सर्व युद्धनौका वाफेच्या इंजिनावर चालणाऱ्या झाल्या. १८५७ साली आरमाराचे नियंत्रण इंग्लिश पार्लमेंटकडे गेले आणि आरमाराचे नाव रॉयल इंडियन नेव्ही झाले.


Suez Canal

१८६९ साली सुएझचा कालवा वाहतुकीसाठी खुला झाला. त्यानंतर मुंबई बंदराचे महत्त्व वाढले. इंग्लंडशी व्यापार जास्त करून मुंबई बंदरातून होऊ लागला. सागरी वाहातूकीकरिता मुंबई येथील आरमाराचे महत्त्व वाढले. १८७७मध्ये आरामाराचे दोन भाग करण्यात आले. पूर्व भाग कलकत्त्याला आणि पश्चिम भाग मुंबईला. त्यावेळी आरमारामध्ये ५० युद्धनौका होत्या. पहिल्या विश्वयुद्धाच्या वेळी आरमारात माइन स्वीपर्स आणण्यात आल्या. पहिल्या विश्वयुद्धात नेव्हीने प्रत्यक्ष युद्धात भाग घेतला नाही पण रसद पोचविण्याचे काम केले.

स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी आरमारात ४५००० नौसैनिक आणि अधिकारी काम करत होते. नौदलाची ७५ जहाजे होती. केवळ मुंबई बंदरात ६० जहाजे आणि २०००० नौसैनिक होते. (भारतीय नौकानयनाचा इतिहास, डॉक्टर केतकर, मर्वेन टेक्नॉलॉजीज, २०१९)

निष्कर्ष

ईस्ट इंडिया कंपनीने त्यांच्या वखारींच्या संरक्षणासाठी सतराव्या शतकात गार्ड नेमले. (व्यापारासाठी गोडाऊन आणि ऑफिसेस चारी बाजूंनी भिंती बांधून बंद केलेल्या जागेत असत. त्यास वखार असे म्हणत). व्यापारासाठी स्थानिक संस्थानिकांनी काही अडचणी उत्पन्न केल्या तर त्यास तोंड देण्यासाठी हळूहळू या गार्डात वाढ करण्यात आली. त्यानंतर कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्याच्या पुढाकाराने वखारीच्या जवळील भागावर नियंत्रण करणे चालू झाले. त्यासाठी सैन्याची गरज पडली. या सैन्याला ईस्ट इंडिया कंपनीची आर्मी म्हटले जाई. खरे पाहता या तीन निराळ्या आर्मीज कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे येथून काम करीत होत्या, या तीन आर्मीजनी भारत देशावर नियंत्रण प्रस्थापित केले. एका व्यापारी कंपनीने एक अवाढव्य आणि उज्ज्वल इतिहास असलेला देश याच देशातील सैनिकांचा वापर करून जिंकला.

१८५७चा उठाव उत्तरेकडे सीमित राहिला. याचे एक परिमाण म्हणजे बंगाल आर्मीच्या ६४ रेजिमेंट्स आणि बॉम्बे आर्मीच्या २ रेजिमेंट्स बरखास्त झाल्या. मद्रास आर्मीची एकही रेजिमेंट बरखास्त झाली नाही. १८५७च्या उठावानंतर महार लोकांची आर्मीत भरती वाढली. इंग्रजांच्या हे लक्षात आले की हा समाज जातिव्यवस्थेत विभागला गेला आहे आणि अस्पृश्यांची तत्कालीन व्यवस्थेवर नाखुशी आहे. हे अस्पृश्य इंग्रजांसाठी लढण्यास तयार झाले. याआधी एक विचार आला आहे की हिंदू धर्माने हिंदू राष्ट्राचे नुकसान केले आहे. हे त्याचेच उदाहरण नाही का?

१८५७च्या उठावानंतर सत्ता इंग्लंडच्या पार्लमेंटकडे गेली.लवकरच या तीन आर्मीज एक करून ब्रिटिश इंडियन आर्मी बनली. लवकरच ही आर्मी जगातील एक मोठी आर्मी बनली. ह्या आर्मीने इंग्रजांसाठी दोन विश्वयुद्धात भाग घेतला. जवळ जवळ दीड लाख भारतीय सैनिक मारले गेले. या दोन्ही युद्धात इंग्रजांच्या विजयाचे श्रेय काही अंशी भारतीय योद्ध्यांना जाते.

एवढे नुकसान सोसून भारताला काही फायदा झाला का? स्वातंत्र्यावेळी आपल्याला एक battle hardened सैन्य मिळाले. हे सैन्य निवडून आलेल्या सरकारच्या आज्ञेत राहिले. आपल्या नेभळ्या राजकीय नेतृत्वाने ही शक्ती वाया जाऊ दिली तो भाग निराळा.

सुरुवातीपासूनच ईस्ट इंडिया कंपनीने आरमाराचे महत्त्व ओळखले होते. इंग्लंड बरोबरच्या व्यापाराचा दृष्टीने त्यांच्यासाठी मुंबई हे महत्त्वाचे बंदर होते. साहजिकच सुरुवातीला आरमार मुंबईत ठेवण्यात आले. मुंबईत वाफेवर चालणारी पहिली युद्धनौका १८२९ साली बनविण्यात आली. या आरमारात एकोणिसाव्या शतकापर्यंत पद्धतशीर रितीने वाढ करण्यात आली. स्वातंत्र्यावेळी सैन्याप्रमाणे भारताला एक सशक्त आरमार मिळाले.

इंग्रजांचे येथील सैन्य वाढू लागल्यावर शस्त्रांची गरज वाढत चालली. इंग्लंड मधून शस्त्रे आयात करणे हे लॉजिस्टिकली अवघड होत चालले. त्यामुळे हळूहळू भारतात शस्त्रे बनविण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळी भारतात मोठ्या प्रमाणावर शस्त्रांचे उत्पादन चालू झाले. स्वतंत्र भारताला ह्याचा मोठा फायदा झाला. अशाप्रकारे स्वतंत्र भारताला सशक्त सैन्य, आरमार आणि शस्त्र उत्पादनाचे कारखाने मिळाले.

पुढच्या भागात – भाग २६मध्ये आपण स्वतंत्र भारताला न्यायव्यवस्था आणि शासनव्यवस्था कशी मिळाली हे पाहणार आहोत. या सर्व गोष्टी नव्या देशाच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या होत्या.

मागचे भाग -

भाग १ – एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती
भाग २ – अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी
भाग ३ – अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती
भाग ४ – अठराव्या शतकातील शासनयंत्रणा
भाग ५ – धर्मशास्त्रे आणि कर्मकांडी धर्म
भाग ६ – अठराव्या शतकातील धर्माचे स्वरूप
भाग ७ – धार्मिक सुधारणांची आवश्यकता
भाग ८ – धार्मिक सुधारणांचे प्रयत्न
भाग ९ – समाजसुधारणा – दलित कोण आणि कसे?
भाग १० – समाज सुधारणा – दलितांच्या उद्धाराचे प्रयत्न
भाग ११ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १२ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १३ – समाजातील बदल
भाग १४ – समाजातील बदल – मुंबईचा विकास
भाग १५ – समाजातील बदल – पुण्याचा विकास
भाग १६ – समाजातील बदल
भाग १७ – दोन समाजसुधारक राजे
भाग १८ – १८५७चा उठाव
भाग १९ – १८५७ चा उठाव
भाग २० – १८५७चा उठाव – झाशीतील घटना
भाग २१ – शिक्षण आणि पत्रकारितेची सुरुवात
भाग २२ – सांस्कृतिक क्षेत्रातील बदल
भाग २३ – आर्थिक संस्था आणि उद्योग
भाग २४ – शेती आणि दळणवळण

लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.

सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण.

सुधीर भिडे

field_vote: 
0
No votes yet