एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २८

राजकीय पक्ष आणि राजकीय नेतृत्व

सुधीर भिडे

Politics is the biggest lever of change
– Nandan Nilekani

धर्म आणि राजकीय प्रणाली यांचा समाजाच्या स्थितीवर मोठा परिणाम होतो. धर्माधिष्ठित हुकुमशाही – उदाहरणार्थ सौदी अरेबिया – आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही – उदाहरणार्थ फ्रान्स – या दोन समाजांत फार फरक आहे. आपण तत्कालीन धर्माच्या विचाराने सुरुवात केली. आता लेखमालेचा शेवट राजकीय प्रणालीच्या विचाराने करणार आहोत. या भागात आपण राजकीय पक्ष आणि राजकीय नेतृत्व यांचा विचार करणार आहोत. शासकीय संस्था आणि राजकीय प्रणाली यांत फरक आहे. शासकीय संस्था स्थायी असतात. राजकीय पक्ष आणि नेतृत्व अस्थायी आणि काळाप्रमाणे बदलणारे असतात. अमेरिकेत डेमोक्रट्स आणि रिपब्लिकन असे दोन पक्ष आहेत. या दोन पक्षांच्या आज ज्या सामाजिक आणि आर्थिक नीती आहेत त्या दीडशे वर्षांपूर्वी एकदम उलट्या होत्या.

लोकशाहीत राजकीय पक्षातून निवडून आलेली व्यक्ती देशाचे नेतृत्व करते; आणि शासनसंस्था आणि सैन्य यांवर अंकुश ठेवते.

पुणे सार्वजनिक सभा

महाराष्ट्रातील राजकीय आणि आर्थिक विचार करणारी पहिली संस्था पुणे सार्वजनिक सभा. ही संस्था खऱ्या अर्थाने राजकीय पक्ष नव्हती पण राजकीय पक्षाकडून ज्या गोष्टींची अपेक्षा असते त्यांपैकी बऱ्याच गोष्टी ही संस्था करत असे. १८७०मध्ये गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी या संस्थेची स्थापना केली.

सार्वजनिक काका जोशी सार्वजनिक सभेचे मासिक

संस्थेचे पहिले अध्यक्ष औंध संस्थानाचे पंतप्रतिनिधी होते. याशिवाय लोकहितवादी देशमुख, लोकमान्य टिळक, विष्णु मोरेश्वर भिडे, गणपतराव नलावडे, अण्णासाहेब पटवर्धन असे मान्यवर संस्थेचे अध्यक्ष राहिले. १८७१ साली महादेव गोविंद रानडे पुण्यात आले आणि त्यानंतर पंधरा वर्षे त्यांनी संस्थेला मार्गदर्शन केले. संस्थेचे सभासद होण्यास ५० व्यक्तींचा पाठिंबा लागे. अशा तऱ्हेने लोकप्रतिनिधित्व पाहिले जाई. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची संस्थेने पाहणी करून एक अहवालात्मक पुस्तक प्रसिद्ध केले. १८७४ साली इंग्लंड येथील पार्लमेंटमध्ये भारतीय प्रतिनिधी असावा याची सभेने मागणी केली. १८७६-७७च्या दुष्काळामध्ये संस्थेने दुष्काळग्रस्तांची स्थिती सरकारपुढे मांडली. सभेने स्वदेशी चळवळीचा प्रसार केला. संस्थेच्या संपूर्ण महाराष्ट्रात शाखा स्थापन झाल्या होत्या. १८८० साली सार्वजनिक काकांचे निधन झाले. त्यानंतर टिळक आणि गोखले यांच्यात सभेच्या कामाविषयी मतभेद झाले आणि १८८५ साली ही संस्था बंद पडली. त्याच वर्षी एका संपूर्ण राजकीय पक्षाची स्थापना झाली – इंडियन नॅशनल काँग्रेस.

(वरील माहिती मराठी विश्वकोशातून)

भारतीय राष्ट्रीय परिषद / Indian National Congress

भारतातील सर्वांत जुना आणि पहिला राजकीय पक्ष म्हणजे Indian National Congress. या पक्षाला आपण आता काँग्रेस पार्टी असे ओळखतो. राजकीय पक्ष म्हणजे काय हे जनतेला तोपर्यंत ठाऊक नव्हते. या पक्षाच्या स्थापनेविषयी थोडी माहिती करून घेऊ.

सन १८८०मध्ये इंग्लंडमध्ये लिबरल पक्षाचे राज्य आले. लॉर्ड रिपन या लिबरल व्यक्तीची व्हाईसरॉय म्हणून नेमणूक झाली. लॉर्ड रिपन भारतीयांत लोकप्रिय ठरले. त्यांनी ॲलन ह्युम यांना सुचविले असावे की एका राजकीय पक्षाची स्थापना करावी. ह्युम त्यावेळी भारतीय शासकीय सेवेतून निवृत्त झाले होते.


ॲलन ह्यूम

ह्युम यांनी त्या काळातील समाजातील मुख्य व्यक्तींशी संबंध साधला. त्या सर्वांनी मिळून १८८५ साली इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना मुंबई येथे केली.

पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात नवीन संस्थेचे उद्दिष्ट स्पष्ट केले –

 • The promotion of solidarity and friendship amongst the countrymen;
 • Eradication of all possible prejudices to race, creed or provinces;
 • Consolidation of sentiments of national unity;
 • Recording of the opinions of educated classes on pressing problems of the day;
 • Laying down of lines of future course of action in the public interest.

The main aim of the congress - was to obtain a greater share in government for educated Indians, and to create a platform for civic and political dialogue between them and the British Raj.

Bonnerjee also made it clear that the educated Indian in general and the congress in particular were thoroughly loyal well-wishers of the government. The Congress was merely meant to be a forum to represent their views to the British authorities, in whose sense of justice they had tremendous faith


काँग्रेस

यावरून हे लक्षात येईल की स्थापना करताना स्वातंत्र्य हे काँग्रेसचे ध्येय नव्हते. स्थापना करताना देशभरातून ७२ व्यक्तींना निमंत्रित केले होते ज्यामध्ये दादाभाई नवरोजी, सुरेन्द्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता यांचा समावेश होता. अशी संस्था ब्रिटिशांनी स्थापन करण्यामागचा उद्देश काय असावा? त्या आधी, तीस वर्षांपूर्वीच १८५७चा उद्रेक झाला होता. इंग्रजांना एक असे व्यासपीठ बनवायचे होते ज्यायोगे भारतीयांना त्यांचे प्रश्न मांडण्याची संधी मिळेल आणि काही उद्रेक होण्याआधी थोडा अंदाज येईल. या उद्देशामुळे पहिली १० वर्षे या संस्थेत, पक्षात इंग्रजांचा प्रभाव राहिला. खुद्द गोपाळ कृष्ण गोखल्यांनीच १९१३ साली काँग्रेसच्या स्थापनेत इंग्रजांचा पुढाकार मान्य केला होता. काँग्रेसचे सुरुवातीचे सभासद हे निमंत्रित असत. हे सर्व सभासद कायदेपंडित, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ असे असत. सुरुवातीची काही वर्षे काँग्रेस वर्षातून एकदा भेटून गेल्या वर्षी सरकारने भारतात लागू केलेले कायदे आणि येऊ घातलेले कायदे यावर विचार करून आपले मत व्यक्त करीत असे.

The history of the Congress during 1885 to 1905 may be described as a period of petitions and prayers for redress of urgent grievances in administration. The National Congress used to hold annual meetings. The leaders believed that a direct struggle for the political emancipation of the country was not yet possible. Accordingly, their methods were in keeping with their faith in British liberalism: they believed in the peaceful presentation of their grievances to the Government in order to redress them.

(History of Indian National Congress, Thesis submitted to AMU by N. Niaz Ahemed, 1987)

टिळक अशा प्रकारच्या कार्यपद्धतीवर टीका करीत. टिळकांचे म्हणणे असे की केवळ आपले मत व्यक्त करून देशाचे प्रश्न सुटणार नाहीत. सन १९०५पासून हळूहळू काँग्रेसमध्ये दोन गट दिसू लागले. गोखले आणि काही मुंबईचे सभासद सरकारशी बोलणे करण्याचे सुचवत. त्यांना लोक मवाळ म्हणू लागले.


लाल बाल पाल

लो. टिळक, बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपत राय यांचे म्हणणे असे की चळवळीशिवाय बदल घडणार नाहीत. त्यांना लोक जहाल म्हणू लागले.

सुरुवातीची महत्त्वाची अधिवेशने

 • कलकत्त्याच्या १८९६च्या अधिवेशनात वंदे मातरम गायले गेले.
 • लखनौच्या १८९९च्या अधिवेशनात जमिनीचा महसूल निश्चित करण्यास सरकारला सांगण्यात आले.
 • कलकत्त्याच्या १९०१ च्या अधिवेशनाला गांधीजींची पहिली उपस्थिती राहिली.
 • बनारस येथील १९०५ सालच्या अधिवेशनाचे गोपाल कृष्ण गोखले अध्यक्ष. स्वदेशी चळवळीला सुरुवात.
 • दादाभाई नवरोजी यांच्या अध्यक्षतेखाली १९०६ साली स्वराज, स्वदेशी आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार यांचा पुरस्कार.
 • काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा ॲनी बेझंट - १९१७.
 • १९२० साली काँग्रेसचा खिलाफत चळवळीला पाठिंबा.

मुसलमानांच्या बाबतीत कॉँग्रेसची भूमिका पहिल्यापासूनच संदिग्ध राहिली आहे. पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीला तुर्कीच्या राजाला मुस्लीम लोकांचा खलिफा असा हुद्दा होता. महायुद्धांनंतर इंग्रजांनी तुर्कीचे साम्राज्य तोडून निरनिराळे देश बनविले. तुर्कीच्या राजाला खलिफा म्हणून मान्यता द्यावी यासाठी भारतात मुसलमानांनी खिलाफत चळवळ सुरू केली. भारतात अशा चळवळीचे प्रयोजन काय होते? आणि काँग्रेसने यात का पडावे? मुसलमानांच्या दृष्टीतून काँग्रेस ही हिंदूंची पार्टी होती. मुसलमानांना सामावून घेण्याचा काँग्रेस आटोकाट प्रयत्न करीत राहिली. (काँग्रेस अजूनही तसा प्रयत्न करत आहे.) खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यलढा १९२० नंतर गांधीजींच्या नेतृत्वाखाली चालू झाला. सुरुवातीपासून गांधीजींनी सामान्य माणसाला स्वातंत्र्यलढ्यात कसे सामावून घेता येईल याचा विचार केला. याचे एक उदाहरण म्हणजे प्रभात फेऱ्या. या उपक्रमात सामान्य माणसाने सकाळी एकत्र बाहेर पडून देशभक्तीपर गीते गात गावातून चालावे इतका साधा प्रयास होता.

राजकीय नेतृत्व

राजकारण आणि राजकीय नेतृत्व ही एक नवी कल्पना होती. याआधी राजकारण संस्थानिकाच्या दरबारात सीमित असे. राजकीय नेतृत्वाचा विचार करताना आपण फक्त महाराष्ट्रातील नेतृत्वाचा विचार करणार आहोत. इंग्रजांच्या तीन प्रेसिडेंसीज होत्या – कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास. या तीन ठिकाणी प्रथम पाश्चिमात्य शिक्षणाला सुरुवात झाली. आणि या तीन ठिकाणी प्रथम राजकीय नेतृत्व उदयास आले. हा निश्चितच योगायोग नाही. आपण महाराष्ट्रातील तीन महान नेत्यांचा विचार करणार आहोत त्यांनी येणाऱ्या काळातील राजकारणाला दिशा दिली.

दादाभाई नवरोजी

मुंबईतील एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमधून शिक्षण झाल्यावर नवरोजींनी बडोदा संस्थानाचे दिवाण म्हणून काम केले. त्यानंतर त्यांची कारकिर्द मुंबईत चालू झाली आणि त्यांनी १८५४ साली एक गुजराती वार्तापत्र चालू केले. १८५५मध्ये त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये गणिताचे प्रोफेसर म्हणून काम चालू केले. प्रोफेसरची पदवी धारण करणारे ते पहिले भारतीय होते. १८५५मध्ये ते लंडनला गेले आणि त्यांनी तेथेच स्वतःची व्यापारी पेढी चालू केली. त्याच साली त्यांची युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमध्ये प्रोफेसर म्हणून नेमणूक झाली आणि ते इंग्लंडनिवासी झाले. लंडनमध्ये त्यांनी इंडिया सोसायटी स्थापन केली.


दादाभाई नवरोजी

सन १८७६ साली दादाभाईंनी आपला प्रसिद्ध ग्रंथ 'भारतातील दारिद्र्य' प्रसिद्ध केला. ह्या ग्रंथात अतिशय तपशिलाने एक मुद्दा त्यांनी सिद्ध केला आहे. तो मुद्दा असा की इंग्रजी राजवट पद्धतशीरपणे भारताची प्रचंड लूट करीत आहे व त्यामुळे भारत क्रमाने दरिद्री होत आहे. 'भारतातील माणसाचे दरडोई उत्पन्न वार्षिक वीस रुपये इतकेच आहे. गरिबांचे उत्पन्न तर याहून कमी आहे. इंग्रज सरकार कैद्यांसाठी दरडोई किमान खर्च २७ रुपये करते. भारतातील स्वतंत्र माणूस कैद्याहून निकृष्ट जगतो. भारतात असणाऱ्या ह्या अफाट दारिद्र्याचे कारण येथील उत्पादनच गरजेहून कमी आहे हे आहे.

(प्रा. नरहर कुरुंदकर यांच्या राष्ट्रवाद आणि समाजवाद या निबंधातून) प्रा. कुरुंदकर दादाभाईंना भारताच्या आर्थिक राष्ट्रवादाचे जनक समजतात.

इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेत दादाभाईंचा मोठा वाटा होता. काँग्रेसच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला तेव्हा ते साठ वर्षांचे झाले होते. दादाभाई १८९२ साली ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मेंबर म्हणून निवडून आले आणि भारताची संपत्ती इंग्लंडमध्ये नेऊन त्याचा गैरवापर होत आहे असे विचार त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडले. इंग्लंडचे साम्राज्य भारतीय संपत्तीवर उभे आहे असे त्यांनी मत मांडले. त्यांच्या मते ३००० कोटी रुपये (आजच्या किमतीत) इंग्रजांनी भारतातून नेले. १९०६मध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांना भारतीय राजकारणाचे पितामह असे समजले जाते. १९१७मध्ये वयाच्या ९१व्या वर्षी त्यांचे मुंबईत निधन झाले.

विष्णुशास्त्री चिपळूणकर

(माहिती मराठी विश्वकोशातून)

चिपळूणकरांचा जन्म १८५० साली झाला. शालापत्रक (१८६८), निबंधमाला (१८७४), केसरी (१८८०) इत्यादी नियतकालिकांतून विष्णुशास्त्र्यांनी लेखन केले. राजकीय विचार मांडणारे ते आद्य विचारवंत आहेत. स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा ह्यांविषयीचा अभिमान ही त्यांच्या लेखनामागील प्रेरणा होती. ह्या तिन्ही संदर्भांत सामान्यतः उदासीन असलेल्या आणि इंग्रजी राजवटीच्या आहारी जाऊन स्वतःचा देश, त्याने दिलेला सांस्कृतिक वारसा आणि परंपरा ह्यांना कमी लेखणाऱ्या तत्कालीन सुशिक्षितांना चेतावणी देणे हा त्यांच्या लेखनामागील एक प्रमुख हेतू होता. आपला परंपराभिमानी राष्ट्रवाद जोपासण्याच्या भरात प्रार्थनासमाज, आर्यसमाज, सत्यशोधक समाज, आंग्लशिक्षित सुधारक मंडळी ह्यांना सरसकट परधार्जिणे ठरवून त्यांनी जी अनुदार टीका केली, तीत व्यापक सामाजिक जाणिवेचा अभाव होता. हे आता कालौघाबरोबर स्पष्ट झाले आहे.

लिखाणाशिवाय चिपळूणकरांनी राजकीय स्वरूपाचे काम केले नाही. पण टिळकांनी चिपळूणकरांची विचारधारा पुढे चालू ठेवून सुधारक मंडळींची टीका चालू ठेवली.

गोपाळ कृष्ण गोखले

गोखल्यांचा जन्म १८६६ साली कोकणात झाला. त्यांचे शिक्षण एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये मुंबईला झाले. त्यांच्या विचारावर एडमंड बर्क या ब्रिटिश विचारवंताचा प्रभाव पडला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकविणे चालू केले. फर्ग्युसन कॉलेजात गोखले राजकीय अर्थशास्त्र शिकवीत. १८९७ साली त्यांनी इंग्रज सरकारच्या हे ध्यानात आणून दिले की भारतीयांवर कराचा बोजा लादून मिळणारे उत्पन्न ब्रिटिश सैन्यावर खर्च करण्यात वापरले जात आहे.


गोपाळ कृष्ण गोखले

१८९९ साली गोखले बॉम्बे लेजिस्लेटीव कौन्सिलवर (विधानसभा) निवडून आले. १९०२ साली गोखल्यांची इम्पिरियल लेजिस्लेटीव कौन्सिलवर (लोकसभा) नेमणूक झाली. त्यांनी कायद्यासंबंधी मोठे काम केले आणि १९०९च्या मोर्ले-मिंटो प्रस्ताव बनविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. सनदशीर मार्गाने सुधारणा घडवून देशाची प्रगती करावी अशा विचारसरणीचे गोखले १९०५मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. गांधी आफ्रिकेतून भारतात परत आल्यावर ते गोखल्यांना भेटले. गांधी आणि गोखले यांची विचारसरणी पुष्कळ समान होती आणि गांधी त्यांना गुरुस्थानी मानीत.

लोकमान्य टिळक

आपण ज्या शतकाचा विचार करीत आहोत त्या काळात लोकमान्य टिळक ही फार मोठी व्यक्ती होती. त्यासाठीच टिळकांच्या मृत्यूपर्यंतच्या घटनांचा आढावा आपण घेतला आहे. टिळक हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. राजकारण, शिक्षण, पत्रकारिता, तत्त्वज्ञान, पंचांगरचना, गणित, अर्थकारण, कामगारहित या विषयांत त्यांनी मोठे काम केले आहे.

टिळकांच्या शिक्षण आणि पत्रकारिता या क्षेत्रांतील कार्याचा आधीच्या भागांत उल्लेख आला आहेच. त्यांचे समाजसुधारणांविषयीचे नकारात्मक विचार ह्याचा पण आधीच्या भागात उल्लेख आला आहे. या भागात आपण टिळकांच्या राजकीय क्षेत्रातील कामाचा विचार करणार आहोत.

टिळक १८९०पासूनच काँग्रेसच्या कामात भाग घेत असत. लवकरच काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह चालू झाले. ब्रिटिशांना सरळ विरोध न करता सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या पुढे ठेवाव्या असे विचार करणारा नेमस्त अथवा मवाळ गट, आणि आपल्या हक्कांसाठी चळवळ करणे आवश्यक आहे असे म्हणणारा जहाल गट असे हे दोन विचारप्रवाह होते. टिळक जहाल गटात होते. देशाच्या राजकारणात टिळकांनी १८९९पासून प्रामुख्याने भाग घेतला. लोकमान्यांचे चरित्रकार न. चिं. केळकर यांच्या मते टिळकाची राजकीय कारकिर्द खऱ्या अर्थाने १८९९ साली चालू झाली.

समाजाच्या प्रश्नांचा सखोल विचार करून समाजाशी आणि सरकारशी टिळक केसरीद्वारे संवाद साधत. याची दोन उदाहरणे आपण पाहू –

पहिले उदाहरण प्लेगची साथ हे आहे. १८९६ साली मुंबईत प्लेग चालू झाला. हा साथीचा रोग असल्याने हा रोग लवकरच पुण्यात पोचणार हे टिळकांनी ओळखले. लॅन्सेट या इंग्लंडमधून प्रकाशित होणाऱ्या पत्रात याविषयी काय माहिती आहे याचा त्यांनी अभ्यास चालू केला. अग्रलेखातून समाजाला याविषयी माहिती देणे सुरू केले. जेव्हा साथ पुण्यात सुरू झाली तेव्हा टिळकांनी प्लेगसाठी निराळे हॉस्पिटल चालू केले. हॉस्पिटलमध्ये जेवणाची व्यवस्था केली, ज्यायोगे घरच्या माणसांना हॉस्पिटलमध्ये जाऊन संसर्ग होऊ नये. ज्या घरात संसर्ग होईल त्या घरातील लोकांस गावाबाहेर क्वारंटाईन छावण्यांत जावे लागेल याची लोकांस कल्पना दिली. पुण्यात प्लेग वाढल्यावर आजार काबूत आणण्यासाठी इंग्रज अधिकारी रँड याची नेमणूक झाली. रँड यांनी पुण्यात अत्याचार सुरू केला. गोरे शिपाई तपासणी करण्याच्या नावाखाली घरात घुसून सामानाची नासधूस करू लागले. सर्वांत कहर म्हणजे गोरे शिपाई रस्त्यात पुरुषांचे आणि स्त्रियांचे कपडे उतरवून त्यांच्या खाकेत आणि जांघेत हात घालून गाठी नाहीत ना, हे तपासू लागले. या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी टिळक रँड यांना भेटले. अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यात सभा घेण्यात आली. व्यासपीठावर टिळक होते. सभेत दामोदर चाफेकर होते. ते उठून उभे राहिले आणि ओरडले, "व्यासपीठावरील सर्व षंढ आहेत." टिळकांनी प्रत्युत्तर दिले, "तू तर षंढ नाहीस ना? रँड जिवंत कसा?" लवकरच चाफेकरांनी रँडची हत्या केली. त्यानंतर सरकार पिसाळले. पुण्यात अत्याचाराचा कहर झाला. टिळकांनी अग्रलेखात लिहिले – "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" या प्रकरणात टिळकांना एक वर्षाची शिक्षा झाली. (माहिती अरविंद गोखले यांच्या पुण्यभूषण, २०२०मधील लेखातून घेतली आहे.)

दुसरे उदाहरण टिळकांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी लिखाण. टिळकांनी या विषयावर लिहिले,

हिंदुस्थानातील एकोणीस विसांश लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर चालतो. पण शेतकरी वर्गास कोण विपन्नावस्था आली आहे याचा विचार केला म्हणजे अंगावर काटा येतो. घरात अठरा विश्वे दारिद्र्य! कर्जाचा बोजा डोईवर इतका की घरदार गुरे ढोरे गहाण! शेतकरी सावकाराकडून गरजेकरिता कर्ज काढतो आणि ही गरज संपत नाही. शेतकऱ्यास हलक्या व्याजाने कर्ज मिळण्याची तजवीज झाली पाहिजे.

(टिळक आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, माधव भंडारी, म. टा. १/८/२१)

स्वदेशी चळवळ

(खालील माहिती टिळक आणि स्वदेशी चळवळ, डॉ. नलिनी वाघमारे, साहाय्यक प्राध्यापक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, यांच्या लेखातून घेतली आहे.)

स्वदेशी चळवळीचा बंगालच्या फाळणीशी संबंध राहिला. १९०५ साली बंगालमध्ये ही चळवळ चालू झाली. स्वदेशी मालाचा वापर आणि विदेशी मालाचा बहिष्कार असे तिचे स्वरूप होते. टिळकांनी प्रथमपासून या चळवळीस अनुमोदन दिले. टिळकांनी आपली चतुःसूत्री मांडली ती अशी – स्वराज, स्वदेशी, परदेशी मालावर बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. ही चतु:सूत्री काँग्रेसने १९०६ साली अवलंबिली.

स्वदेशी चळवळीच्या मागे भारतात वस्तूंचे उत्पादन होऊन त्यायोगे रोजगार मिळावा हा पण हेतु होता. विदेशी मालावरील बहिष्कार ही नाण्याची दुसरी बाजू होती. इंग्रजांचा प्रयत्न इंग्लंडमध्ये बनलेल्या मालाची भारतात विक्री असा होता. भारत ही त्यांच्या दृष्टीने एक बाजारपेठ होती.

अंताजीपंत काळे आणि सार्वजनिक काका यांनी पैसा फंड योजना चालू केली. टिळकांनी या कल्पनेला पाठिंबा दिला. या योजनेतून सुमारे चाळीस हजार रुपये जमा झाले. (आजच्या हिशोबाने सुमारे ८० लाख). या पैश्यांतून तळेगावला काचेचा कारखाना चालू केला. जपानी तंत्रज्ञांच्या मदतीने १९०८ साली उत्पादन चालू झाले. पुष्कळ चढउतार पाहूनही हा कारखाना आजच्या तारखेला चालू आहे.

सन १९०८मध्ये क्रांतिकारक खुदिराम बोस यांची तरफदारी केल्याबद्दल टिळकांना ६ वर्षांची शिक्षा झाली. मंडालेहून १९१४ साली सुटका झाल्यावर टिळकांनी होम रूल लीग चालू केली. यामध्ये ॲनी बेझंट, जोसेफ बाप्तिस्ता आणि जिना यांचे त्यांना सहकार्य लाभले. १९२० साली टिळकांचा मृत्यू झाला. या सुमारास भारतीय राजकीय पटावर एका नवीन ताऱ्याचा उगम झाला – मोहनदास गांधी.

टिळकांच्या मृत्यूने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका युगाचा अस्त झाला होता आणि नव्या गांधीयुगाचा उदयदेखील.

– डॉक्टर सदानंद मोरे.

क्रांतिकारकांचे योगदान

गांधीयुगाची सुरुवात १९२०पासून झाली. त्याआधी १० वर्षे गांधीजी सक्रिय होते. पण साधारणपणे स्वातंत्र्यलढ्याची सूत्रे त्यांच्या हाती १९२०पासून आली. १९४७पर्यंत गांधीजींचे व्यक्तिमत्व एवढे मोठे झाले होते की स्वातंत्र्यासाठी केल्या गेलेल्या इतर प्रयत्नांकडे दुर्लक्ष होते. गांधीजींनी अहिंसेचा मार्ग पत्करला होता. पण त्याचबरोबर इतर प्रयत्नही चालू होते. इंग्रजांना लढा देऊन घालविण्याच्या प्रयत्नांची सुरुवात १८५७च्या उठावाबरोबर झाली. नंतरच्या नव्वद वर्षांत अनेक क्रांतिकारकांनी हिंसक लढा चालू ठेवला. त्याचा सर्वात मोठा प्रयोग नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केला. सत्तेचाळीस साली इंग्रज सोडून जाण्याची निरनिराळी कारणे होती. गांधीजींचा लढा हे एक मोठे कारण होतेच. परंतु क्रांतिकारकांचे योगदान विसरून चालणार नाही. मुंबईतील नाविकांचे बंड हे एक महत्त्वाचे कारण आता समजले जाते.

आपण आपले विवेचन महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवले आहे. म्हणून चार मोठ्या मराठी क्रांतिवीरांची थोडी माहिती घेऊ – उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि चाफेकर बंधू.

उमाजी नाईक

माहिती मराठी विश्वकोशातून

उमाजी नाईक यांचा जन्म १७९१ साली झाला. (मृत्यु – ३ फेब्रुवारी १८३२). त्यांचे वडील दादजी खोमणे हे पुरंदर किल्ल्याचे रखवालदार म्हणून काम करत होते. इंग्रजांच्या सल्ल्यावरून १८०३मध्ये दुसऱ्या बाजीरावाने पुरंदर किल्ला रामोश्यांच्या ताब्यातून काढून घेण्याचा प्रयत्न केला, यावेळी रामोश्यांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या पेशव्यांनी रामोशी लोकांचे हक्क, वतने, जमिनी जप्त केल्या. उमाजींनी पेशव्यांच्या या अत्याचाराविरुद्ध संघर्ष केला. गोरगरिबांना लुटून सावकार झालेल्या मुंबईच्या चानजी मातिया या पेढीवाल्याचा माल उमाजींनी पनवेल-खालापूरजवळ धाड घालून पळविला. उमजी एका दरोड्यात पकडले गेले व त्यांना सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. कैदेत असताना ते लेखन-वाचन शिकले. सुटल्यावर उमाजींनी इंग्रजांविरुद्ध मोहीम सुरू केली. डिसेंबर १८२७ रोजी ठाणे व रत्नागिरी सुभ्यासाठी उमाजींनी स्वतंत्र जाहीरनामा काढला. या जाहीरनाम्यानुसार १३ गावांनी उमाजींना आपला महसूल दिला. ही घटना इंग्रजांसाठी धोक्याची घंटा होती. उमाजी आपल्या हातात येत नाही म्हटल्यावर इंग्रजांनी त्यांची पत्नी, दोन मुलगे व एका मुलीस कैद केले. तेव्हा उमाजी इंग्रजांना शरण गेले. इंग्रजांनी त्यांचे सगळे गुन्हे माफ केले व त्यांना नोकरीस ठेवले.

१८२८-२९ या काळात उमाजींकडे पुणे व सातारा या भागात शांतता ठेवण्याची जबाबदारी होती. या काळात त्यांनी अनेक मार्गांनी पैसा जमा केला. या काळात उमाजींनी इंग्रजांविरोधात सैन्य जमवण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर उमाजींनी इंग्रजांच्या विरोधात आपला जाहीरनामा काढला (१६ फेब्रुवारी १८३१). हा जाहीरनामा ‘स्वातंत्र्याचा जाहीरनामा’ म्हणूनही ओळखला जातो. यामध्ये त्यांनी दिसेल त्या युरोपियनाला ठार मारावे; ज्या रयतेची वतने व तनखे इंग्रजांनी बंद केली आहेत त्यांनी उमाजीच्या सरकारला पाठिंबा द्यावा; त्यांची वतने व तनखे आपण त्यांना परत मिळवून देऊ; कंपनी सरकारच्या पायदळात व घोडदळात असणाऱ्या शिपायांनी कंपनीचे हुकूम धुडकावून लावावेत, अन्यथा आपल्या सरकारची शिक्षा भोगण्यास तयार राहावे व कोणत्याही गावाने इंग्रजांना महसूल देऊ नये, नाहीतर त्या गावांचा विध्वंस केला जाईल; असा इशारा उमाजींनी दिला होता. उमाजींनी आपण सर्व हिंदुस्तानसाठी हा जाहीरनामा काढला आहे, असा उल्लेख होता. संपूर्ण भारत एक देश अथवा एक राष्ट्र ही संकल्पना यामध्ये दिसून येते. तसेच यामध्ये हिंदू-मुसलमान राजे, सरदार, जमीनदार, वतनदार, सामान्य रयतेचा समावेश होता. उमाजीचे दोन साथीदार काळू व नाना हे इंग्रजांच्या आमिषाला बळी पडले. त्यांनी उमाजींना १५ डिसेंबर १८३१ रोजी स्वत: पकडून इंग्रजांच्या स्वाधीन केले. त्यानंतर उमाजींना पुणे येथे ३ फेब्रुवारी १८३४ रोजी फाशी देण्यात आली.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील इंग्रज सत्तेच्या विरोधात तळागाळातील लोकांकडून घडून आलेला हा पहिला क्रांतिकारी प्रयत्न होता.

वासुदेव बळवंत फडके

वासुदेव बळवंत फडक्यांचा जन्म कोकणात १८४५ साली झाला. मुंबईला पदवीचे शिक्षण घेतल्यावर त्यांनी काही वर्षे सरकारी नोकरी केली. लवकरच पुण्यात इंग्रजी शासनाविरुद्ध त्यांनी भाषणे चालू केली. नंतर त्यांनी एक क्रांतिकारी संघटनेची सुरुवात केली. १८७६च्या भयंकर दुष्काळात त्यांनी लोकांचे भयंकर हाल पाहिले. इंग्रजी शासनाने शेतीकडे जे दुर्लक्ष केले होते त्याचा हा परिणाम आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांचे सहकारी – गद्रे, साठे, देवधर आणि कर्वे यांच्यासह त्यांनी २०० तरुणांची संघटना पुण्याजवळ लोणी येथे उभी केली. १८७९ साली त्यांनी सरकारी कार्यालयांवर पत्रके लावून सरकारने जनतेची पिळवणूक बंद करावी अशी मागणी केली. सबंध देशभर आणि इंग्लंडमध्येही याचे प्रतिसाद उमटले. लंडन टाइम्सने घटनेची दखल घेतली. इंग्रजी शिपाई मागे लागल्यावर ते आंध्र प्रदेशात पळाले आणि तिथे त्यांनी इंग्रजांविरुद्ध कारवाया सुरुवात केल्या. लवकरच ते पकडले गेले. १८८३ साली त्यांचा मृत्यू झाला. त्याच वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म झाला.

चाफेकर बंधू

दोन चाफेकर बंधूंचा जन्म १८७० आणि १८७३ साली झाला. त्यांच्या घराण्यातील परंपरेप्रमाणे दोघे बंधू कीर्तनकार आणि पुरोहित होते. इंग्रजांविरुद्ध काही केले पाहिजे याची दोन्ही भावांच्या मनाने उचल घेतली. पुण्यात १८९६ साली प्लेगची साथ आली. त्यावेळच्या इंग्रजी शिपायांच्या वर्तनाने दोन्ही भावांच्या मनात उद्वेग झाला. इंग्रजी शिपाई घरात घुसून स्त्रियांशी गैरवर्तन करीत. संधी साधून त्यांनी गणेशखिंडीत त्यावेळचा इंग्रज अधिकारी रँड यास मारले. लवकरच ते पकडले गेले आणि १८९८ साली त्यांना फाशी देण्यात आले.

स्वातंत्र्यवीर सावरकर

टिळकांप्रमाणेच सावरकरांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. लेखक, कवी, वक्ता, क्रांतिकारी, समाजसुधारक, राजकारणी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या चरित्राची माहिती बहुतेकांना असल्याने थोडक्यात चरित्रगाथा पाहू. सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यात १८८३ साली झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी देवीच्या समोर सशस्त्र क्रांतीची शपथ घेतली. पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी बी. ए. केले. त्यावेळी त्यांनी अभिनव भारत या संस्थेची स्थापना केली. पुण्यात विदेशी कापडाची होळी करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर ते इंग्लंडला गेले. तिथे त्यांनी बॅरिस्टरची पदवी मिळविली. सरकारविरोधी कारवायांसाठी त्यांना इंग्लंडमध्ये अटक करण्यात आली. १९१० साली त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. राजकीय स्वरूपाचे काम करणार नाही या अटीवर त्यांची १९२४ साली सुटका झाली. त्यानांतर पुढील काही वर्षे त्यांनी रत्नागिरीत समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यावरची बंदी उठल्यावर त्यांनी राजकारणात भाग घेतला.

निष्कर्ष

आधीच्या भागात आपण शासकीय संस्थांचा विचार केला. सैन्य, न्यायव्यवस्था आणि शासनसेवा (Indian Civil Service) यांचा लोकशाहीत राजकीय व्यवस्थेशी संबंध नसतो. हुकूमशाहीत या संस्था राजकीय रंग घेतात. लोकशाहीची विशेष बाब ही की राजकीय व्यवस्थेतून निवडून आलेली व्यक्ती / व्यक्तिसमुदाय या सैन्य आणि शासणा व्यवस्था यांवर अंकुश ठेवतात.

भारतात शासकीय संस्था आणि राजकीय व्यवस्था याच काळात – १८१८ ते १९२० – बनल्या. भारतीय समाजाला शासकीय संस्था आणि राजकीय व्यवस्था राज्य करणाऱ्या राजापासून आणि धर्मापासून स्वतंत्र असणे ही कल्पना नवीन होती. राजकीय पक्ष आणि राजकीय नेतृत्व म्हणजे काय, त्यांचे काम काय याची कल्पना नव्हती. पुण्यामध्ये राजकीय पक्षासारखे काम करणारी एक संस्था – सार्वजनिक सभा – १८७० साली स्थापन झाली.

पहिला राजकीय पक्ष – इंडियन नॅशनल काँग्रेस – इंग्रजांच्या पुढाकाराने चालू झाला. सुरुवातीला त्याचे स्वरूप इंग्रजांशी मैत्री ठेवणारा एक क्लब असे होते. त्यातून जे राजकीय नेतृत्व निर्माण झाले त्या नेतृत्वाने समाजाचे प्रश्न सरकारसमोर ठेवायला सुरुवात केली. आपण तीन नेत्यांचा विचार केला. हे भारताचे पहिले राजकीय नेतृत्व होते. आपण ज्या तीन व्यक्तींचा विचार केला त्या एकमेकांपेक्षा अतिशय भिन्न होत्या. या तीन व्यक्ती राजकीय क्षेत्रात निराळ्या प्रकारे काम करीत होत्या. दादाभाई नवरोजी यांनी भारताचा आवाज इंग्लिश पार्लमेंटमध्ये उठविला. गोखले यांनी कायदेविषयक काम केले. टिळक या दोन्ही क्षेत्रांपासून दूर राहिले. त्यांनी आपल्या वृत्तपत्रातून समाजाचे प्रश्न सरकारपुढे मांडले. टिळक हे लोकनेते होते. त्यांचे समाजातील प्रत्येक थरात संबंध होते.

टिळकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान फार मोठे आहे. स्वराज्याची निर्भेळ मागणी करणारी ती पहिली राजकीय व्यक्ती होती. प्लेगच्या साथीच्या वेळी टिळकांच्या वर्तनावरून हे दिसते की टिळक समाजासमोर येणाऱ्या प्रश्नाकडे लक्ष देऊन त्यावर समाजप्रबोधन करीत. टिळकांनी काँग्रेसला वर्षाकाठी काही ठराव पास करणाऱ्या संस्थेपासून स्वराज्याच्या मागणीसाठी चळवळ करण्यास उद्युक्त केले. गांधींनी हा वारसा पुढे चालविला. पण टिळकांचा आणि गांधींचा मार्ग निराळा होता. क्रांतिकारकांच्या कृतींचे टिळकांनी समर्थन केले. गांधींनी विरोध केला. टिळक इंग्रजांबाबत लिहिताना आक्रमक भाषा वापरीत, गांधी राजकीयदृष्ट्या योग्य भाषा वापरीत. समाजसुधारणेला टिळकांनी महत्त्व दिले नाही तर समाजसुधारणा हे गांधींच्या लढ्यातील एक अंग होते.

याच कालखंडात महाराष्ट्रात उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू आणि सावरकर यांनी आपल्या मार्गाने इंग्रजांशी लढा दिला.

युगपरिवर्तन

१९२० साली टिळकांचा मृत्यू झाला. त्यानंतर स्वराज्य चळवळीची सूत्रे गांधींकडे गेली. स्वराज्य चळवळीबरोबर समाजातील स्थैर्य संपले. १८१८ ते १९२० या काळात, १८५७च्या उठावाची दोन वर्षे सोडता, समाजात राजकीय स्थैर्य होते. स्वातंत्र्याची चळवळ ही पूर्ण राजकीय घटना होती. गांधींनी सर्व समाजाला चळवळीत आणले. स्वदेशी वस्तूंचा वापर, आयात केलेल्या वस्तूंवर बहिष्कार, सूतकताई, खादीचा वापर, सत्याग्रह, प्रभात फेऱ्या, असहकार अशी अनेक आयुधे त्यांनी सामान्य माणसाच्या हातात दिली. पुढची पंचवीस वर्षे स्वातंत्र्यलढा तीव्रतेने लढला गेला आणि देश १९४७ साली स्वतंत्र झाला.

या लेखाबरोबरच ही लेखमाला समाप्त होत आहे. वेळोवेळी बऱ्याच वाचकांनी लेखमाला आवडल्याचे विचार व्यक्त केले. त्या सर्वांचे आभार. ‘ऐसी अक्षरे’ यांनी माझे विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले याबद्दल त्यांचेही आभार.


(समाप्त)

मागचे भाग –

भाग १ – एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती
भाग २ – अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी
भाग ३ – अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती
भाग ४ – अठराव्या शतकातील शासनयंत्रणा
भाग ५ – धर्मशास्त्रे आणि कर्मकांडी धर्म
भाग ६ – अठराव्या शतकातील धर्माचे स्वरूप
भाग ७ – धार्मिक सुधारणांची आवश्यकता
भाग ८ – धार्मिक सुधारणांचे प्रयत्न
भाग ९ – समाजसुधारणा – दलित कोण आणि कसे?
भाग १० – समाज सुधारणा – दलितांच्या उद्धाराचे प्रयत्न
भाग ११ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १२ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १३ – समाजातील बदल
भाग १४ – समाजातील बदल – मुंबईचा विकास
भाग १५ – समाजातील बदल – पुण्याचा विकास
भाग १६ – समाजातील बदल
भाग १७ – दोन समाजसुधारक राजे
भाग १८ – १८५७चा उठाव
भाग १९ – १८५७ चा उठाव
भाग २० – १८५७चा उठाव – झाशीतील घटना
भाग २१ – शिक्षण आणि पत्रकारितेची सुरुवात
भाग २२ – सांस्कृतिक क्षेत्रातील बदल
भाग २३ – आर्थिक संस्था आणि उद्योग
भाग २४ – शेती आणि दळणवळण
भाग २५ – सैन्य, आरमार आणि शस्त्रास्त्रे

भाग २६ – शासकीय संस्था
भाग २७ – राष्ट्र आणि राज्य

लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.

सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण.

सुधीर भिडे

field_vote: 
0
No votes yet

फारच उत्तम आढावा. ही लेखमाला मराठीतील या विषयावरील एक अत्युत्कृष्ट दस्तैवज झाला आहे.
उमेशचंद्र बॅनर्जी हे नाव व्योमेशचंद्र असे हवे ना!
माझे मत: टिळकांच्या नंतरच्या लार्जर दॅन लाइफ इमेजमुळे झाकोळले गेले तरी लोकहितवादी, सार्वजनिक काका, भांडारकर, तेलंग, रानडे, गोखले, आगरकर आणि विशेषतः फुले यांच्या कर्तबगारीचे कौतुक करावे तितके थोडे आहे. तसल्या जुनाट, सनातनी विचारांच्या तर्कटी पुण्यात एवढे मोठे काम इंग्रजांच्या बरोबरीने तर कधी विरोधात जाऊन उभे करणे सोपे नव्हते. ह्या सगळ्यांनी इंग्रजीवर एवढे उत्तम प्रभूत्व कसे मिळवले असेल हा प्रश्न मला अनेकदा पडतो. असे प्रभूत्व मिळवल्यामुळेच समाजातील धुरीणत्व त्यांना मिळाले असेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

ज्याला भारतीय राष्ट्रवादाच्या विकासाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल त्याने न र फाटकांचे खालील पुस्तक जरूर वाचावे. वरील लेखातील सर्व मुद्द्यांचा अतिशय उत्तम विचार फाटकांनी केला आहे.
https://archive.org/details/in.ernet.dli.2015.366634/page/n17/mode/1up?v...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

तसेच नलिनी पंडित यांचे महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा विकास हे पुस्तकसुद्धा चांगले आहे.
https://epustakalay.com/book/183486-mahaaraashtrantil-raashtravaadaachaa...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

दोन्ही दुव्यांबद्दल आभार.

वाचनखुणा साठविल्या आहेत. पैकी, पहिल्या (न.र. फाटकांच्या पुस्तकाच्या) दुव्यावरील पुस्तक, तो दुवा आपण मागेच दिला होतात, तेव्हाच वाचावयास घेतले होते, ते अद्यापही वाचीत आहे. दुसऱ्या दुव्यावरील पुस्तकही यथावकाश वाचावयास घेईनच.

पुनश्च आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखमाला आवडली. दुव्यांसाठी पुंबा यांना धन्यवाद.

प्रताप भानूने एका लेखात त्याने खूप चांगले म्हटले होते. "गतकाळाविषयी चौकसपणे प्रश्न पडणे ठीक पण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळालेच पाहिजे असे नाही." पण अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करता येतो. तुमच्या लेखमालेत त्याची जाणीव दिसली. याचवेळी लोकसत्तामध्ये रविंद्र साठे यांचीही लेखमाला येत होती. टोकाच्या ध्रुवीकरणात जिथे आजकाल मनभेद सर्रास होताना दिसतात, तिथे दुसरी बाजूही वाचायला हवी या हेतूने मी सुरुवातीचे काही लेख वाचले. पण का कुणास ठावूक त्यांच्या लेखात प्रामाणिकपणाचा अभाव असल्याचे मला वाटले.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0