एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग २१

शिक्षण आणि पत्रकारितेची सुरुवात

सुधीर भिडे

Human history becomes more and more a race between education and catastrophe.
– H. G. Wells

विष्णुशास्त्री चिपळूकरांनी इंग्लिश भाषेसाठी ‘वाघिणीचे दूध’ अशी संज्ञा वापरली. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला पुढे पुस्ती जोडली. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.

एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रांत काय बदल झाले ते आपण पाहात आहोत. परंतु शिक्षण आणि पत्रकारिता ही दोन क्षेत्रे अशी होती की त्यांत काय बदल झाले या प्रश्नाला अर्थ नाही. कारण आपण जी आधुनिक शिक्षण व्यवस्था समजतो ती त्या काळात अस्तित्वातच नव्हती. वर्तमानपत्रे म्हणजे काय, त्यांचा काय उपयोग, हे आपल्या समाजाला माहीतच नव्हते. शिक्षण आणि पत्रकारिता ही समाजात बदल घडवून आणण्याची प्रभावी साधने आहेत. या दोन्ही साधनांचा उपयोग याच काळात महाराष्ट्रात चालू झाला.

शिक्षण

इंग्रजांच्या काळापूर्वी सार्वत्रिक शिक्षण पद्धती अस्तित्वात नव्हती.

त्या काळी प्रजेच्या शिक्षणाची गणना सरकारच्या कर्तव्यात होत नव्हती. ज्याने त्याने आपल्या मुलांची तजवीज आपल्या इच्छेप्रमाणे आणि शक्तीप्रमाणे करावी. सर्वांना सारखी लागू पडणारी शिक्षणपद्धती तेव्हा अस्तित्वात नव्हती. ब्राह्मणास वेद, काव्य, न्याय, व्याकरण, इत्यादि शिकविण्याकरिता सरकारच्या आश्रयाने वेदशाळा चालविल्या जात. त्यावर गुरुजी नेमून त्यास वर्षासन द्यावे आणि विद्यार्थ्यास अन्नछत्र घालावे ही रीत होती.

पेशवेकालीन महाराष्ट्र, वा. कृ. भावे, १९३५

फक्त ब्राह्मण मुलांनाच शिक्षण घेता येई. मुलींना आणि ब्राह्मण नसलेल्यांना शिकता येत नसे. काही आखलेला ठरावीक अभ्यासक्रम नसे. वेद, धर्मशास्त्रे, न्याय शास्त्र, व्याकरण, अलंकार, पंचांग अशा स्वरूपाचे विषय शिकविण्यास पंतोजी नेमले जात. अशा प्रकारच्या शाळेत शिकविणार्‍या शिक्षकास पंतोजी म्हणत.

पुणे शहराचे वर्णन, ना. वि. जोशी, १८६८, पुनःप्रकाशन, शा. ग. महाजन, २००२

काही पंतोजींच्या शाळांतून मोडी लिपित लेखन आणि प्राथमिक अंकगणित शिकविले जाई. आधुनिक शिक्षणातील भूगोल, इतिहास, समाजशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित असे विषय शिकवले जात नसत. भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया तीन इंग्रज गृहस्थांनी घातला. – मेकॉले, एल्फिन्स्टन आणि कँडी. त्या शिवाय फुले, तर्खडकर, टिळक अशा भारतीय नेत्यांनीही राष्ट्रीय शिक्षणाचा पाया घातला. १८१८ ते १९२० या काळात कोणत्या शिक्षण संस्था स्थापन झाल्या –

बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा १८२०
पुण्यात हिंदू कॉलेज १८२०
बॉम्बे नेटीव एजुकेशन सोसाईटीची पहिली शाळा १८२७
एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई १८३५
ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई १८४५
जोतिबा फुले यांची मुलींची शाळा, पुणे १८५१
पूना इंजीनीयरिंग स्कूल १८५४
गव्हर्नमेंट लॉ स्कूल, मुंबई १८५५
बॉम्बे युनिव्हर्सिटी १८५७
न्यू इंग्लिश स्कूल, पुणे १८८०
फर्ग्युसन कॉलेज, पुणे १८८५
व्हि. जे. टी. आय., मुंबई १८८७
शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे १८८८
हाफकिन इन्स्टिट्यूट, मुंबई १८९९
ॲग्रिकल्चर कॉलेज, पुणे १९०७

हिंदू कॉलेजचे नाव पुढे पूना कॉलेज आणि मग १८६४मध्ये डेक्कन कॉलेज झाले. पूना इंजिनियरिंग स्कूल या संस्थेचे नाव पुढे पूना सिव्हिल इंजिनीअरिंग कॉलेज झाले आणि १९११मध्ये कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग – पूना असे झाले.

वरील शैक्षणिक संस्थांच्या बाबतीत विशेष म्हणजे यातील बहुतेक सर्व आजही कार्यरत आहेत. यावरून हे दिसते की आधुनिक शिक्षणाचा पाया याच शतकात घातला गेला.

तीन इंग्रजांचे योगदान

१८१३ साली इंग्रज सरकारने कलकत्त्यात शिक्षणनीती प्रसिद्ध केली. ख्रिश्चन मिशनर्‍यांनी जे शिक्षणाचे काम चालू केले होते त्यास सरकारने पाठिंबा दिला. भारतात आधुनिक शिक्षण चालू करण्यात तीन इंग्रजांचा सहभाग होता. १८३४मध्ये मेकॉले भारतात आले. न्यायसंस्था आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी मोठे काम केले. मेकॉलेंची विचारसरणी White man’s burden अशी होती. ही विचारसरणी अशी की एतद्देशीय लोक अतिशय असंस्कृत असून त्यांना सुसंस्कृत बनविण्याची जबाबदारी गोर्‍या माणसावर आहे.

एल्फिन्स्टन १८११ ते १८१८ पुण्यात पेशवे दरबारात रेसिडेंट होते. पेशवाईचा अंत त्यांनीच करविला. पुढे ते बॉम्बे प्रॉव्हिन्सचे डेप्युटी गव्हर्नर होते. त्या काळात महाराष्ट्रात शिक्षण प्रसार व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. १८१९मध्ये ते बॉम्बे प्रेसिडेंसीचे गव्हर्नर झाले. मुंबईचे एल्फिन्स्टन कॉलेज त्यांच्या नावाने सुरू करण्यात आले. १८५०मध्ये त्यांचे पुतणे बॉम्बे प्रेसिडेंसीचे गव्हर्नर झाले.


बॉम्बे प्रेसिडेंसीचे गव्हर्नर एल्फिन्स्टन
बॉम्बे प्रेसिडेंसीचे गव्हर्नर एल्फिन्स्टन

(खालील माहिती मराठी विश्वकोशातून)

थॉमस कँडी हे ऑक्सफर्डमधून भारतीय भाषा शिकले. १८२२ साली ते इंग्रजी सैन्यात दुभाषी म्हणून कामास लागले. इंग्लिश – मराठी शब्दकोश बनविण्यात त्यांचा हात होता. त्यांनी मराठी शाळांसाठी क्रमिक पुस्तके बनविली. न्यायालयीन संहिता बनविल्या. 'विरामचिन्हांची परिभाषा’ हे पुस्तक १८५० साली लिहिले. डेक्कन कॉलेजचे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केले (१८५७-६०). १८६०मध्ये इंडियन पीनल कोड हे पुस्तक अनुवादित केले. त्यांचा भारतातच १८७७ साली महाबळेश्वर येथे मृत्यू झाला.


थॉमस कँडी

या सदगृहस्थाबाबत ना. वि. जोशी १८६८ साली लिहितात –

दयाळू क्यांडी साहेबास किती बरे दुःखे सोसावी लागली. पंतोजीनी संगितले की बूट घालून जाजमावर येऊ नये, वाड्यात नाश्ता करू नये तरी त्यांचे ऐकावे. आज पुण्यात विद्येचे सुख लोक भोगितात त्यांचे मूळ हे साहेबच आहेत. त्यांनी लोकास गुलवून लोकांची वेडी मते फिरविली. ब्राह्मणांनी या दयाळू साहेबाचे उपकार विसरू नयेत आणि त्यांचे स्मारक पुण्यात उभे करावे.

इंग्लिश एज्युकेशन ॲक्ट १८३५

इंग्लिश पार्लमेंटने १८१३ साली ईस्ट इंडिया कंपनीला अशी अट घातली की त्यांनी दर वर्षी एक लाख रुपये (आजच्या हिशोबाने वीस कोटी रुपये) शिक्षणासाठी खर्च करावेत.

For the revival and promotion of literature and the encouragement of the learned natives of India, and for the introduction and promotion of a knowledge of the sciences among the inhabitants of the British territories.

१८३५ साली इंग्लिश राजकारणी मेकॉले यांनी असे मत व्यक्त केले की तत्कालीन भारतीय शिक्षण पद्धती अतिशय वाईट असून त्या पद्धतीत सुधारणेची आवश्यकता आहे. या करता -

There was therefore a need to produce—by English-language higher education—a class of persons, Indian in blood and colour, but English in taste, in opinions, in morals and in intellect who could in their turn develop the tools to transmit Western learning in the vernacular languages of India.

(ठळक ठसा लेखकाचा)

मेकॉले यांनी सुचविले की ईस्ट इंडिया कंपनीने संस्कृत आणि अरेबिक पुस्तके छापणे त्वरित बंद करावे. कंपनीने भारतीय प्रणालीचे शिक्षण चालू ठेऊ नये. मेकॉले यांच्या सूचनेवर कार्यवाही करून गव्हर्नर जनरल बेंटिंक यांनी इंग्लिश एजुकेशन ॲक्ट लागू केला आणि भारतात आधुनिक शिक्षण प्रणालीची सुरुवात झाली.

शिक्षणाची सुरुवात

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस मुंबई हे एक श्रीमंतांचे शहर झाले होते. मुंबईत बरीच इंग्रज कुटुंबे राहात होती. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी १८१५ साली एक शाळा चालू करण्यात आली. लगेचच १८२० साली भारतीयांच्या मुलांसाठी शाळा सुरू केली. या सुमारास पुणे आणि नगर येथे मिशनरी शाळा चालू झाल्या होत्या. १८५१-५२मध्ये पुण्यात जोतिबा फुल्यांनी मुलींसाठी आणि अस्पृश्यांसाठी अशा दोन शाळा चालू केल्या. मुलींच्या शाळेत शिकविण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीस तयार केले. ही माहिती आपण बाराव्या प्रकरणात पाहिली आहेच. त्यांच्या ह्या कार्याबद्दल इंग्रज सरकारने त्यांचा पुण्यात विश्रामबागवाड्यात सत्कार केला.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला शिक्षण क्षेत्रात ब्राह्मण, प्रभू, वाणी आणि पारशी या वर्गांचे वर्चस्व होते. मुंबई इलाख्यातील साक्षरतेचे १८७२ सालाचे प्रमाण – आकडे दर हजारी

वर्ग पुरुष स्त्रिया
वाणी ४४० ८५
प्रभू ३३० ८७
ब्राह्मण ३२२ २७
मराठा आणि कुणबी ३९

इतर जातींत साक्षरता अतिशयच कमी होती.

स्रोत : डॉ. दिलीप वाणी, लाड सका वाणी समाजाचा इतिहास, फेसबुक

यानंतर आपण त्या काळी सुरू झालेल्या काही प्रसिद्ध शिक्षण संस्थांची माहिती घेऊ.

पुण्यातील डेक्कन कॉलेज ही भारतात सुरू झालेली तिसर्‍या क्रमांकाची शिक्षण संस्था आहे. १८२१मध्ये हिंदू कॉलेज या नावाने ही संस्था विश्रामबागवाड्यात चालू झाली. एल्फिनस्टन यांनी दक्षिणा फंडातून पैसा पुरविला. १८६४पासून ही संस्था नवीन जागेत डेक्कन कॉलेज या नावाने चालू झाली.


डेक्कन कॉलेज

डेक्कन कॉलेजमधून शिकलेल्या लोकांची नावे पाहा – टिळक, आगरकर, इतिहासकार राजवाडे, प्राच्यविद्याशास्त्री (इंडोलोजिस्ट) भांडारकर, डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस. आज डेक्कन कॉलेजात संशोधन कार्य चालते.

एल्फिन्स्टन यांच्या स्मरणार्थ १८३५मध्ये एल्फिन्स्टन कॉलेज मुंबईत चालू झाले. भारतात प्रथमच विज्ञान आणि वाङ्मय यांचा अभ्यास चालू झाला. शिकविणारे प्राध्यापक इंग्रजी होते. या कॉलेजात शिकलेल्या व्यक्तींची नावे पहा – लोकमान्य टिळक, फिरोजशाह मेहता, जमशेदजी टाटा, भीमराव आंबेडकर.

या काळातच पश्चिम महाराष्ट्रात डॉक्टरांची कमतरता भासू लागली होती. मद्रास आणि कलकत्ता येथे वैद्यकीय शिक्षण चालू झाले होते. पण मुंबईत मेडिकल कॉलेज सुरू करण्यास ब्राह्मणांचा विरोध होता. १८३८ साली जमशेटजी जिजीभॉय यांनी या कॉलेजसाठी १ लाख रुपये देणगी दिली. (आजच्या किमतीत २० कोटी रुपये.) आता जगन्नाथ शंकरशेठ यांनी पुढाकार घेतला आणि ग्रँट मेडिकल कॉलेजच्या स्थापनेचा निर्णय झाला. १८४५ साली कॉलेजात प्रवेश सुरू करण्यात आला. पहिल्या बॅचमधील विद्यार्थी – भाऊ परसेकर, कर्व्हाल्लो, गोमेज, डुकले, आत्माराम पांडुरंग तर्खडकर.

त्याकाळी पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट चालू झाले होते. सरकारी इमारती, कालवे, रेल्वे यांची कामे सुरू झाली होती. या कामासाठी सुपरवायजरची गरज होती. त्यासाठी पुण्यात पूना इंजीनीयरिंग स्कूल १८५४ साली चालू करण्यात आले. शिकण्यासाठी दरमहा ६ रुपये (आजच्या काळात १२००० रुपये) शिष्यवृत्ती जाहीर झाली. हा दोन वर्षांचा कोर्स होता. १८६४ साली या संस्थेचे रूपांतर पूना सिविल इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये झाले. कॉलेजमधून लायसन्ड सिव्हिल इंजिनीअर ही पदवी देण्यात येई.


सीओईपी

१९११ साली या संस्थेचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये (सीओईपी) रूपांतर झाले आणि बी. ई. पदवी देण्यास सुरुवात झाली. १८८७ साली मुंबईस व्हि.जे.टी.आय. हे इंजिनीअरिंग कॉलेज चालू झाले.

१८५० साली मुंबईत पहिल्या कोर्टाचे काम चालू झाले. कोर्टाच्या कामाला कायद्याचे ज्ञान असलेल्या माणसांची गरज भासू लागली. १८५५ साली पहिले न्यायाधीश रीड यांनी कायदा शिकविण्याचे क्लासेस चालू केले. आणि त्यानंतर लगेच गव्हर्नमेंट लॉ स्कूल सुरू करण्यात आले.

१८८० साली टिळक, आगरकर, चिपळूणकर, नामजोशी या मित्रांनी मिळून न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा चालू केली. इंग्रजांनी काही शिक्षण संस्था चालू केल्या होत्या. या मित्रांचे असे मत की राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी भारतीयांनी चालू केलेली शाळा हवी. या उद्देशाने शाळा चालू झाली. दोन वर्षांत या शाळेने जी प्रगती केली त्याबद्दल सरकारकडून तारीफ करण्यात आली. १८८२ साली शिक्षण प्रसारासाठी डेक्कन एजुकेशन सोसायटीची स्थापना झाली. सोसायटीने १८८५ साली फर्ग्युसन कॉलेज चालू केले. लोकमान्य टिळक फर्ग्युसन कॉलेजात संस्कृत आणि गणित शिकवित.

फुले आणि टिळक या दोघांनी शालेय शिक्षणासाठी शाळा चालू केल्या. अर्थात या दोघांची उद्दिष्ट्ये निराळी होती. फुल्यांचे ध्येय समाजातील खालच्या थरातील घटकांना शिक्षण देणे हे होते. टिळकांचे उद्दिष्ट भारतीयांनी दिलेले राष्ट्रीय शिक्षण हे होते.

पुण्यात १८८३ साली नूतन मराठी विद्यालयाची सुरुवात झाली. पुढे १८८८मध्ये शिक्षण प्रसारक मंडळीची स्थापना झाली. १९१३ साली या संस्थेला टिळकांच्या मदतीने कॉलेजसाठी एक रुपयाच्या लीजने जागा मिळाली आणि कॉलेज चालू झाले. पुढे कॉलेजला पटवर्धंनांनी देणगी दिली आणि कॉलेजचे नाव एस. पी. (सर परशुरामभाऊ) कॉलेज ठेवण्यात आले.

१८९९ साली मुंबईत हाफकिन इन्स्टिट्यूट चालू झाली. हाफकिन नावाच्या रशियन शास्त्रज्ञाने या इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन करून प्लेगची लस शोधून काढली. आजपर्यंत ही संस्था काम करीत असून गेल्या वर्षी कोव्हिडकरिता लशीचे उत्पादन येथे करण्याचा प्रस्ताव होता.

पुण्यात शेतकी (ॲग्रीकल्चर) कॉलेजची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रेरणेने १८७९ साली झाली. त्यावेळी हे कॉलेज सायन्स कॉलेजचा भाग होते. १९०७मध्ये त्याचे रूपांतर ॲग्रीकल्चर कॉलेजमध्ये करण्यात आले.

निष्कर्ष

पेशवाईच्या अंतकाळात शिक्षणाचा जो प्रकार होता ते शिक्षण नव्या युगाला सामोरे जाण्यास पूर्ण अपुरे होते. इंग्रजांनी आधुनिक शिक्षण सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. या मागे मेकॉलेचा white man’s burden हा दृष्टीकोन होता आणि एल्फिन्स्टन आणि कँडी यांची उदारमतवादी दृष्टीही होती. राज्यकारभार चालविण्यासाठी शिक्षित माणसांची गरज होती. त्या गरजेपोटीही काही संस्था सुरू करण्यात आल्या. इंग्रजांनी चालू केलेल्या शिक्षण संस्थातून जे भारतीय बाहेर पडले त्यांना शिक्षणाचे महत्त्व लगेच कळले. जोतिबा फुले, लोकमान्य टिळक अशा महान व्यक्तींनी राष्ट्रीय शिक्षण संस्था सुरू केल्या. १८१८ ते १९२० या शतकात आधुनिक शिक्षणाचा पाया घातला गेला. विज्ञान, कायदा, वैद्यकी, आणि तंत्रविज्ञान याचे आधुनिक शिक्षण सुरू झाले. याचे पुष्कळसे श्रेय इंग्रजांना द्यावे लागेल. आज भारताची सर्वच क्षेत्रात जी प्रगती दिसत आहे ती या पायावरच उभी आहे.

वृत्तपत्रे

If I have to decide whether we should have a government without newspapers or newspapers without government, I would prefer the latter.
Thomas Jefferson

टेलिव्हीजनवरील २४ तास बातम्यांचे सत्र चालू होण्याआधी वर्तमानपत्र हे माहिती देण्याचे आणि मतपरिवर्तन करण्याचे महत्त्वाचे साधन होते. वर्तमानपत्र ही कल्पना भारतात नवीन होती. ज्ञानप्रकाश हे वर्तमानपत्र १८४९ साली पुण्यात चालू झाले. लोकहितवादींनी मोठ्या परिश्रमाने ते चालविले कारण ‘लोकांस वर्तमानपत्र वाचण्याची त्यावेळेस गोडी नव्हती व उपयोग काय तेही माहीत नव्हते.’ (पुणे शहराचे वर्णन, ना. वि. जोशी, १८६८)

आधीच्या प्रकरणात आपण शिक्षणाचा समाजसुधारणेसाठी कसा उपयोग झाला ते पाहिले. महाराष्ट्रातील विचारवंतांनी पत्रकारितेचा उपयोग समाजसुधारणा आणि राजकीय विचारांचा प्रसार यासाठी केला. वर्तमानपत्राचे प्रकाशन छापखाना उद्योगावर अवलंबून आहे. छापखाने आल्यावर पहिल्यांदा पुस्तके छापण्यास सुरुवात झाली. त्यानंतर मासिके, साप्ताहिके आणि वर्तमानपत्रे यांची कल्पना आली. १८१८ ते १९२० या काळात कोणत्या वृत्तपत्रांचे प्रकाशन चालू झाले?

बॉम्बे समाचार, मुंबई १८२२
दर्पण, पाक्षिक, मुंबई १८३२, पहिले मराठी वृत्तपत्र
टाइम्स ऑफ इंडिया १८३८
दैनिक प्रभाकर १८४१
ज्ञानप्रकाश, पुणे १८४९
केसरी आणि मराठा १८८०
हितवाद, नागपूर १८८२
सुधारक १८८७
काळ १८९८
पहिला दिवाळी अंक, मनोरंजन १९०९

यांपैकी बॉम्बे समाचार, टाइम्स ऑफ इंडिया, हितवाद ही पत्रे आजही प्रकाशित होत आहेत.

छापखाने

छापखान्याचे तंत्रज्ञान पश्चिमेकडून भारतात सोळाव्या शतकातच आले. १५५६ साली गोव्यात पोर्तुगीजांनी पहिला छापखाना आणला. भीमजी पारेख या सुरतच्या गृहस्थाने १६७५ साली मुंबईत छापखाना चालू केला. छापखाना चालू करण्यामागची भूमिका जुनी हस्तलिखिते छापणे अशी होती. एका पारशी गृहस्थाने १८१२मध्ये छापखाना आणला आणि गुजराती दिनदर्शिका छापण्यास सुरुवात केली.

यानंतर आपण काही महत्त्वाच्या वृत्तपत्रांविषयी माहिती घेऊ.

बॉम्बे समाचार

बॉम्बे समाचार हे आशियातील पहिले वृत्तपत्र आहे. या गुजराती वृत्तपत्राचे प्रकाशन आजही चालू आहे. हे वृत्तपत्र १८२२ साली मुराजबान या पारशी गृहस्थाने चालू केले. सुरुवातीस ह्या पत्रात देशाची स्थिती, सरकारी आणि कोर्टाच्या नोटिसा, कोणती जहाजे मुंबई बंदरात येणार आहेत आणि कोणती जहाजे निघणार आहेत याची माहिती असे. त्यानंतर कलकत्ता आणि मद्रास येथील बातम्या असत. याशिवाय चीनमधील अफूच्या भावाची माहिती असे. एकोणिसाव्या शतकात भारतातून मोठ्या प्रमाणावर अफू चीनला निर्यात होत असे. १८३८ साली २४०० टन अफू निर्यात झाली. १८६०पर्यंत ही निर्यात वाढून ३६०० टन एवढी झाली. ह्या व्यापारात मुंबईचे पारशी मोठ्या प्रमाणावर भाग घेत. त्यांना चीनमधील अफूच्या भावात रस असे. सुरुवातीपासून या पत्राने प्रामाणिकपणे आणि कोणाचीहि बाजू न घेता बातम्या देण्याचे धोरण ठरविले. त्यामुळे स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी बॉम्बे समाचारमध्ये काय छापून आले आहे हे लोक पाहात.

नुकताच या वृत्तपत्राचा दोनशेवा स्थापनादिवस पंतप्रधानांच्या उपस्थितीत साजरा केला गेला.

पहिले मराठी पाक्षिक दर्पण

बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२मध्ये मराठीतील पहिले वृत्तपत्र चालू केले. जांभेकरांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हटले जाते. लोकांना माहिती देऊन जनतेची स्थिती सुधारणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. शास्त्रीय दृष्टीकोन ठेवणे आणि विधवा पुनर्विवाह यांसारखे प्रश्न दर्पणने लोकांसमोर ठेवले.

टाइम्स ऑफ इंडिया

‘द बॉम्बे टाइम्स अँड कमर्शियल जर्नल’ या नावाने १८३८ साली या वृत्तपत्राचे पदार्पण झाले. पहिले संपादक जे. इ. ब्रेनन होते. पहिल्या पानावर जहाजे येण्याच्या आणि जाण्याच्या तारखा दिल्या जात. त्या शिवाय खरेदी आणि विक्रीच्या जाहिराती असत. १८६१मध्ये पत्राचे नाव बदलून ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ करण्यात आले. त्यावेळचे संपादक नाइट यांनी पत्राला सरकारी दबावापासून स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पत्राची विश्वसनीयता वाढली. १८९२ साली बेनेट अँड कोलमन कंपनीने हे वृत्तपत्र विकत घेतले. आजपर्यंत हीच कंपनी हे वर्तमानपत्र चालवीत आहे

महाजन यांनी चालू केलेल्या प्रभाकरमध्ये लोकहितवादींची शतपत्रे छापली गेली. रानडे यांनी १८४९ साली पुण्यात ज्ञानप्रकाश हे वर्तमानपत्र चालू केले. हरी नारायण आपटे हे पत्राचे पहिले संपादक होते. महादेव गोविंद रानडे आणि गोपाळ कृष्ण गोखले सामाजिक महत्त्वाच्या विषयावर या पत्रात लिखाण करीत. १८६२मध्ये मुंबईतून इंदुप्रकाश हे मासिक चालू झाले. त्यातही समाजसुधारणाविषयक लिखाण केले जाई. जोतिबा फुले यांनी १८७७मध्ये दीनबंधू चालू केले. हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. १८८२ मध्ये नागपूरहून हितवादचे प्रकाशन चालू झाले. काही वर्षांनी हे पत्र सर्व्हण्ट्स ऑफ इंडिया सोसायटीने विकत घेतले. १८८७ साली आगरकरांनी सुधारक चालू केले; त्यांचा उद्देश समाजासुधारणांविषयी लिहिणे हा होता.

केसरी आणि मराठा

टिळकांनी आपल्या मित्रांबरोबर केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे १८८१ साली चालू केली. १८८७मध्ये या वर्तमानपत्रांचे टिळक संपादक झाले. १९०८मध्ये केसरीचा खप २२००० झाला आणि केसरी-मराठा भारतातील सर्वाधिक खपाची वृतपत्रे झाली. आतापर्यंत आपण जी वृत्तपत्रे पाहिली त्यामध्ये माहिती आणि समाजसुधारणा या विषयांवर लेखन केले जात होते. टिळकांनी वेगळ्या प्रकारची पत्रकारिता सुरू केली. टिळकांचे केसरीतील संपादकीय हा एक चर्चेचा विषय होऊन जाई. टिळकांची भाषा आक्रमक होती. विषय अभ्यासपूर्ण रीतीने मांडला जाई. लोकांच्या जीवनाला स्पर्श करणारे विषय हाताळले जात. आपण आपल्या हक्कांसाठी लढा दिल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत हे सांगणे असे. टिळकांनी प्रथम राजकीय आणि आर्थिक विषयांवर वर्तमानपत्रात लेखन चालू केले. सामाजिक प्रश्नांकडे बघण्याचा टिळकांचा दृष्टीकोन निराळा होता. त्यांना राजकीय स्वातंत्र्य जास्त महत्त्वाचे होते. त्यामुळेच आगरकर आणि टिळक यांच्यात मतभेद झाले. त्यांच्या लिखाणाची आक्रमकता एका प्रसिद्ध संपादकीय मथळ्यावरून येते – सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?

याच धर्तीचे लिखाण शिवरामपंत परांजपे यांच्या काळमध्येही येत असे.

निष्कर्ष

१८१८ ते १९२० या काळात आपल्या समाज जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांत काय बदल झाले आणि त्या बदलांचे काय दूरगामी परिणाम झाले ह्याचा आपण विचार करीत आहोत. यांपैकी काही बदल इंग्रजांनी घडवून आणले. पत्रकारितेतील बदल त्या प्रकारचा नाही. तसे पाहिले तर पत्रकारितेत बदल झाला असे म्हणताच येणार नाही कारण आपल्या समाजासाठी वर्तमानपत्र ही गोष्ट नवीन होती. जसे आधुनिक शिक्षण ही गोष्ट समाजाला नवीन होती त्याप्रमाणेच वर्तमानपत्र ही पण नवीन गोष्ट होती. अशा प्रकारे पत्रकारितेची सुरुवात १८१८ ते १९२८ या काळातच झाली. इंग्रजांनी शिक्षण सुरू करण्यात मदत केली. वृत्तपत्रांचे तसे झाले नाही. टाइम्स ऑफ इंडिया वगळता इतर सर्व वर्तमानपत्रे भारतीयांनी चालू केली. सुरुवातीच्या वर्तमानपत्रांतून माहिती आणि समाजसुधारणा हे विषय हाताळण्यात येत होते. यामुळे समाजजागृती झाली आणि समाजात हळूहळू बदल चालू झाले. याचा परिणाम म्हणून समाजातील पुष्कळ अनिष्ट प्रथा आज गेलेल्या दिसतात. पत्रकारितेत टिळकांनी नवा पायंडा पाडला. हे माध्यम त्यांनी राजकीय विचार मांडण्यासाठी वापरले. त्याचा परिणाम म्हणजे स्वातंत्र्याविषयी लोकांच्या मनात विचार सुरू झाले. याच पायावर गांधींनी स्वातंत्र्याचा लढा तीव्र केला.

आजच्या मराठी संस्कृतीत दिवाळी अंकाचे महत्त्व आहे. पहिला दिवाळी अंक – मनोरंजन – या काळातच छापला गेला. मनोरंजन मासिकाचे प्रकाशन १८९५ साली चालू झाले. १९०९ मध्ये त्यांनी दिवाळीला स्पेशल अंक काढला.

पुढच्या भागात – भाग २२ – एकोणिसाव्या शतकात सांस्कृतिक क्षेत्रात काय बदल झाले याची माहिती घेऊ.

मागचे भाग -

भाग १ – एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती
भाग २ – अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी
भाग ३ – अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती
भाग ४ – अठराव्या शतकातील शासनयंत्रणा
भाग ५ – धर्मशास्त्रे आणि कर्मकांडी धर्म
भाग ६ – अठराव्या शतकातील धर्माचे स्वरूप
भाग ७ – धार्मिक सुधारणांची आवश्यकता
भाग ८ – धार्मिक सुधारणांचे प्रयत्न
भाग ९ – समाजसुधारणा – दलित कोण आणि कसे?
भाग १० – समाज सुधारणा – दलितांच्या उद्धाराचे प्रयत्न
भाग ११ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १२ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १३ – समाजातील बदल
भाग १४ – समाजातील बदल – मुंबईचा विकास
भाग १५ – समाजातील बदल – पुण्याचा विकास
भाग १६ – समाजातील बदल
भाग १७ – दोन समाजसुधारक राजे
भाग १८ – १८५७चा उठाव
भाग १९ – १८५७ चा उठाव
भाग २० – १८५७चा उठाव – झाशीतील घटना

लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.

सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण.

सुधीर भिडे

field_vote: 
0
No votes yet

ह्यांचा उल्लेख पण लेखात हवा होता.सर्वसामान्य लोकांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी रयत शिक्षण संस्था चालू केली.
आणि ह्या संस्थेच्या शाळा महाराष्ट्रा भर पसरलेल्या आहेत.
स्वलंबी शिक्षण हा मंत्र त्यांनी दिला.
तुम्ही अनेक लोकांना हिशोबत च घेत नाही.ह्यांची कार्य पण खूप उत्तुंग आहेत.
टिळक,फुले,इंग्रज ह्यांच्या पुढे तुमची गाडी जात च नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप लोकांनी खूप मोठे उत्तुंग कार्य केलेले आहे ते पण १९ vya शतकात.

एक दोन माणसामुळे क्रांती किंवा बदल होत नसतो.
अनेक लोकांची साथ असतें

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रयत शिक्षण संस्थेचे काम १९१९नंतर राहिले, याकरिता या लेखात त्यांचा उल्लेख नाही. आधीच्या लेखातून महर्षी शिंदे, ताराबाई शिंदे यांच्या कामाचा आढावा घेऊन टिळक, फुले यांच्यापर्यंत मांडणी केली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0