काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १३ (१५ नोव्हेम्बर २०२०)

सर्वार्थानी विचित्र आणि दोन दिवसांच्या लहानुल्या दिवाळीत चेपलेला आजचा भाकड रविवार!

आज सकाळी सकाळी टॅक्सी घेऊन वाट बघत होतो तर एक छान थोडी उग्र पण सेक्सी, फिटेड लाल कुर्ता घातलेली दोन्ही हातात कोपऱ्यापर्यंत लालच चुडा आणि मेहेंदी रंगवलेली पस्तिशीची स्त्री गाडीत बसली.

सागरमधल्या डिंपलच्या थोडीफार आगेमागे म्हणता येईलशी.

गाडी चालू करणार तेवढ्यात एक पोरगेलासा तगडा हॅण्डसम जवान धावत नारळ-पाणी घेऊन आला.

नेव्हीत होता (त्याच्या बोलण्यावरून कळलं).

तिला त्यानं प्रेमानं पाणी पाजलं आणि मग तो निघून गेला.

चांगली बाई होती.... रस्त्यात माझ्याशी पण थोड्या गप्पा मारल्या.

मग मी तिला तिच्या नवऱ्याच्या दुकानात पूजेला सोडलं.

कुठे पिकअप केलं आणि कुठे सोडलं ते मुद्दामच सांगत नाहीये.
कारण सोशल मिडीयाच्या एखाद्या रँडम बटरफ्लाय इफेक्टमुळे तिचं अफेअर पकडलं जावं आणि त्याला मी कारणीभूत व्हावं अशी माझी अजिबातच इच्छा नाहीये.
आपली सुखं आणि आपली आयुष्यं ज्यानी त्यानी आपापली हँडल करावीत.

पण अचानक चुकार विचार मनात आला,
समजा आपल्या खा SSS स एकदम गोटी मित्राची बायको आपल्याला दिसली अफेअर करताना तर काय प्रिसिडन्स घेईल?
त्या स्त्रीचं व्यक्तिस्वातंत्र्य की मैत्री?
कठीण चॉईस आहे...
पण असे पूल जेव्हा येतील तेव्हा पार करावेत हेच बरं.
...
...
...

ओके सॉरी पण सांगून टाकतो: माझ्यासाठी तरी मित्र प्रिसिडन्स घेईल.
...
...
...
आज एकंदरीत थोडी इंटरेस्टिंग भाडी मिळाली.
चैत्य भूमीवरून तीन 'पीस्-ड्रंक' पोरं उचलली त्यांना चित्रा टॉकीजला जायचं होतं.
मी उगीचच कन्फ्यूज होत चुकून आधी दादर स्टेशनच्या फ्लायओव्हरच्या ब्रीजच्या टोकाला त्यांना नेलं.
चित्रा टॉकीज खरं तर टिळक ब्रिजच्या टोकाशी आहे.
मग क्षमा मागत चूक सुधारली.
त्यांनीही विनातक्रार सहकार्य केलं.
देव त्यांचं भलं करो आणि दुसऱ्या दिवशी त्यांना (फारसा) हँगओव्हर न राहो Smile

मग शिवनेरीचा दादर टी. टी. चा स्टॉप आहे तिकडून एक दिव्यांग उचलला दोन्ही हातात कुबड्या खांद्यावर जड सॅक...
पण गाडी भर ट्रॅफीक मध्ये असल्याने त्याला मदत करता आली नाही...
अर्थातच त्याला गरज नव्हती त्याच्या सराईत रुटीनमध्ये तो शून्य मिनटांत आत शिरला.
त्याच्याशीही थोड्या गप्पा मारल्या...
मुलांची दिवाळी शॉपींग केल्याने आनंदात होता.

आज एकंदरीतच लोकांचा माझ्याशी गप्पा मारायचा मूड आहेय.
किंवा दिवाळी इज इन दी एअर Smile

मग दोन तरतरीत सावळ्याशा मुलींना मच्छीमार कॉलनीतून हिल रोडवर सोडलं.
आणि जेवायला घरी गेलो. मग माझ्या डाव्या डोळ्याला, जो पुणेकर आहे त्याला सरसरून झोप आली.
सो झोपलो (दोन्ही डोळ्यांनी Smile ओल्याबरोबर सुकं वगैरे)

ब्रेकनंतर अजून काही भाडी मारली आणि म्हटलं आता हळूहळू आवरतं घ्यावं.

तितक्यात सिटीलाईट वरून एक भंगार गोळा करणारी बाई आणि तिच्या मुलानी टॅक्सी थांबवली.
त्यांना वाशी नाक्यावर जायचं होतं. मानखुर्दपाशी.
तगडूस भाडं मिळालं म्हणून मी खुष.
पण माटुंग्याच्या लेबर-कॅम्पचा ब्रिज गाडी चढता-चढेना.
ऍक्सीलरेटर दाब दाब दाबतोय.
गाडी आपली नुसती वॉंव वॉंव करतेय पण पिक-अपच नाय
१५-२० च्या वर स्पीड जाईच ना!
क्लच-प्लेटची भानगड बहुतेक.
माझा मूडच गेला...
अशी गाडी वाशी नाक्यापर्यंत जायला पहाट झाली असती.
माय-लेकाला रिक्वेस्ट केली तर आई तणतणायला लागली.
"आता दुसरी टॅक्सी रिक्षा कुठे मिळणार वगैरे"

त्यांना कसंबसं समजावून सायन सर्कलला उतरवलं आणि सरळ 'U' मारला.
गाडी मलबारहीलला जागेवर एकदा लावली की सुटलो.
माझी गोगलगाय राईड चालू झाली.
नशीबाने गॅस भरला होता त्याची चिंता नव्हती.
पण १५ चा स्पीड आता १० वर आला.
सायन, किंग्ज-सर्कल, टी. टी. चे फ्लायओव्हर कसेबसे चढलो आणि उतरताना न्यूटन साहेबांचं नाव घेऊन पुढच्या अंतरासाठी उतारावर मोशन किंवा ज्याला टॅक्सीवाले "मोसम" बोलतात तो पकडून थोडीफार मजल मारली.
... वडलांच्या सपोर्टवर तीन पिक्चर घेऊन नंतर फुस्स झालेल्या बावेजापुत्रासारखी.

(ही उपमा कंगनाला आवडावी...
कंगना मला आवडते आणि बहुतेक सगळ्या मुद्द्यात मी तिच्याबरोबर आहे.
काही एक्झिक्यूशन्स चुकली असतील तिची कदाचित पण ती कशीही असली तरी ओरिजिनल किंवा आमच्या कॉलनीच्या भाषेत वर्जिनल आहे.
तसं मला काय कुणी हिंग लावून विचारलं नाय पण सांगून टाकलं
तसंही गिरीश कुबेरांनी लोकसत्तेत सांगितलंय ना कुंपणावर बसून सेफ गेम्स खेळण्यापेक्षा काय त्या सायडी घ्या वगैरे...
)

तर टॅक्सीचा स्पीड आता ५ वर आलेला किंवा ३ ही.

बेसिकली ती वॉंव वॉंव करत जागेवरच पळत होती असं म्हणता यावं.
आता हे वर्णन आपल्या बऱ्याच राजकारण्यांना लागू व्हावं... तर असो.
नशिबानी आता महालक्ष्मी स्टेशनच्या ब्रिजपर्यंत कुठे चढाव नव्हता.

गाडी डकाव डकाव करत कशीबशी आणली.
महालक्ष्मीचा ब्रिजही चढलो कसाबसा.
आता हिरा-पन्नावरून गाडी मलबारहीलला टाकली की सुटलो.
पण मलबार "हिल" आहे हे मी विसरलोच.
हिरा-पन्नावरून पेडर रोड जिथे स्टार्ट होतो तिथे चांगलाच चढ आहे.
गाडीनी हिरा-पन्नाच्या गेटवर फायनली मान टाकली.

मम्मी... बायको SSS
माझ्यातल्या बबड्याला गाडी तिथे टाकून घरी जाऊन मस्त एसीत झोपायला कधी एकदा जातो असं झालेलं.
भोसड्यात गेलं बाकी सगळं

पण माझ्यातला सेन्सीबल 'अभिजीत' किंवा 'कार्तिक' किंवा 'अरुंधती' मला तसं करू देई ना.
(ह्या तीन सिरीयल्स कानावर पडत असतात Smile )

शेवटी दिनेशभाईंचा धावा केला
थोड्या वेळात ते आले.
त्यांच्यानेही गाडी चालू होईना.
क्लच प्लेट साफ बाद झाली होती.

आधीच सांगितल्याप्रमाणे ह्या पाच-पाच लाख किलोमीटर चालेल्या गाड्या असतात सो असे प्रॉब्लेम्स येत रहातात.

गाडी मग तिकडेच एका शांत रस्त्याला लावली.
हा दिनेशभाईंचाच एरिया असल्याने गाडी इकडे सेफ होती. उद्या 'टो' च करावी लागणार तिला.

शेवटी पहाटे दोन वाजता हेकडी निघालेला मी टॅक्सी पकडून घरी निघालो.
मम्मी... बायको SSS

पण ह्या आडाने का होईना मुंबईचे चढ-उतार, वळसे-वळणं कधी नव्हे ते बारकाईने बघितले गेले.
आणि सवयीच्या, थोडंफार गृहीतही धरलेल्या आपल्या बाईचे चढ-उतार, वळसे-वळणं नव्याने बघणं... हे मस्तच Smile

आजची कमाई: २६० रुपये.

क्रमश:
आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ मे आणि २९ मे २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १५ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २२ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट माईलस्टोन: २० जुलै २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० जुलै ते डिसेंबर पहिला आठवडा २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १ (८ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २ (१५ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ३ (२२ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ४ (२९ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ५ (१९ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ६ (२६ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ७ (२ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ८ (९ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ९ (२३ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १० (१ मार्च २०२०)
टॅक्सी दिवस ११: ८ मार्च २०२० (विमेन्स डे)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १२ (१नोव्हेम्बर २०२०)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet