एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १९

१८५७ चा उठाव

सुधीर भिडे

Know thyself, know thy enemy
- चिनी म्हण


१८५७च्या उठावातले शिपाई - कल्पनाचित्र
१८५७च्या उठावातले भारतीय शिपाई - कल्पनाचित्र; British National Army Museum यांच्या संस्थळावरून

मागच्या भागात उठावाची सर्वसामान्य माहिती घेतली. या भागात आपण तीन संस्थानांचा / राजांचा विचार करणार आहोत ज्यांच्या कार्यक्षेत्रात लढाया झाल्या. भारताचा लहान भाग या उद्रेकात सामील झाला. हा भाग बहुतेकसा गंगा-यमुना दोआबाचा होता. उत्तर हिंदुस्थानात पाच जागी उठाव झाला. मीरत, दिल्ली, अवध, कानपूर आणि झाशी. मीरतला सैनिकांच्या छावणीत उठावाला सुरुवात झाली. मग ते लोण दिल्ली अवध, झाशी आणि कानपूरला पसरले. या ठिकाणी हे स्पष्ट केले पाहिजे की जेव्हा असे विधान केले जाते की चार ठिकाणी उद्रेक झाला या अर्थ इतर कुठे काहीच घडले नाही असे सांगणे नाही. बहुतेक इतर ठिकाणांचा उठाव चार-आठ दिवसांत संपला.


१८५७ - उठाव झालेले भूभाग

वरील नकाशात हे दिसते की मीरत, दिल्ली, झाशी, कानपूर आणि लखनौ हा भाग विचारात घेतला तो भाग भारताच्या त्या वेळच्या भूभागापैकी २० टक्केही भरत नाही.

मीरत आणि दिल्ली

१८५७च्या मे महिन्यात उठावाला मीरतमध्ये सुरुवात झाली. मीरत येथे इंग्रजांची मोठी लष्करी छावणी होती. त्या छावणीतील भारतीय सैनिकांनी उठाव केला. त्यानंतर हे सैनिक दिल्लीला आले. या उठाव करणाऱ्या सैनिकांनी दिल्ली ताब्यात घेतली आणि बहादूरशाहला बादशाह घोषित केले. त्यावेळी बादशाह ८२ वर्षाचे होते. सैनिकांनी दिल्लीतील इंग्रज बायका-मुलांची कत्तल केली. बहादूरशाहला हे मान्य नव्हते.

सत्ता किती चंचल असते! डावीकडे बादशाह, उजवीकडे ब्रह्मदेशात कैदी

बहादूरशाह बहादूरशाह

लवकरच इंग्रजांनी दिल्लीजवळ सैन्य जमविले आणि हल्ला केला. पंधरा दिवसांच्या लढाईनंतर इंग्रज सैन्याने दिल्ली परत जिंकली. दिल्लीत बेसुमार लुटालूट झाली. त्यानंतर बहादूरशाहवर गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात खटला झाला आणि बहादूरशाह यांना रंगून येथे हद्दपार करण्यात आले. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. वरील उजवीकडच्या चित्रात रंगून येथील स्थानबद्धतेत बहादूरशाह दिसत आहेत. दोन चित्रांतील फरक पाहा.

अवध

लखनौ-अयोध्या भागाला अवध / औध असे म्हणले जात असे. अवध संस्थानाची स्थापना १७७२ साली फैजाबाद येथे झाली. नंतर राजधानी लखनौ येथे नेण्यात आली. १८०१ साली इंग्रजांनी नवाबाशी करार केला आणि अवधची सत्ता आपल्या हातात घेतली. नवाब नाममात्र गादीवर होता. १८१६ साली आणखी एक करार करण्यात आला आणि अवधचे सैन्य इंग्रजांच्या हातात गेले. १८५६ साली नवाबाला पूर्णपणे पदच्युत करून कलकत्त्याला पाठविण्यात आले. त्यामुळे असंतोष झाला. दिल्लीतील उठावाच्या बातम्या जेव्हा लखनौला पोचल्या तेव्हा तेथील बंगाल आर्मीच्या सैनिकांनी उठाव केला. (हाच प्रकार झाशीत घडला.)

खालील माहिती Government of India, Indian Culture siteमधून घेतली आहे.

नवाबाला कलकत्त्याला पाठविल्यावर बेगम हजरत महलने सूत्रे आपल्या हातात घेतली.


बेगम हजरत महल

उठाव झाल्यावर थोड्या सैनिकांसह इंग्रज लोक बायका-मुलांना घेऊन गढीत गेले. त्या गढीला ८००० बंडखोरांनी वेढा घातला. हा वेढा सहा महिने टिकला. बाहेरून मदत आल्यावर वेढा तोडण्यात आला. इंग्रजांना नेपाळच्या राजाने मदत केली. ३००० गुरखा सैनिक इंग्रजांच्या बाजूने लढण्यास पाठविले. शेवटी इंग्रज यशस्वी झाले. बेगम आपल्या मुलाबरोबर नेपाळला पळून गेली. नेपाळमध्येच बेगमचा मृत्यू झाला.

नानासाहेब आणि कानपूर

आता आपण नानासाहेबांविषयी माहिती बघू. दुसऱ्या बाजीरावांचा मृत्यू १८५१ साली झाला. नानासाहेबांना बाजीरावाचा वंशज म्हणून अधिकार पाहिजे होते. इंग्रजांचे म्हणणे असे की पेशवे हे राजे नसल्याने बाजीरावांच्या वंशजाला मानधन दिले जाणार नाही. राजाच्या मंत्र्यांना फायदा देण्याला इंग्रजांनी नकार दिला. मग नानासाहेबांनी इंग्लंडला राणीकडे अर्ज पाठविला. राणीकडूनही नकार आला. १८५६ साली इंग्रजांनी नानासाहेबांना कानपूरमधील इंग्रजांच्या रक्षणार्थ २०० सैनिक घेऊन कानपूर येथे बोलविले. यात इंग्रजांचा असा हेतू असावा की नानासाहेबांवर लक्ष राहील. नानासाहेब २०० सैनिकांसह कानपूरला पोचले. त्या नंतरच्या घटनांवर नानासाहेबांचा अंकुश राहिला नाही. त्यांच्या सैनिकांनी बंड पुकारून नानासाहेबांना पेशवा घोषित केले. त्यानंतर सैनिकांनी कानपूरमधील २०० इंग्रजी स्त्रिया आणि मुलांची हत्या केली. यानंतरच्या घटना दुर्दैवी होत्या असेच म्हणावे लागेल. नानासाहेब लव्याजम्यासह ब्रह्मावर्तास परतले. याला काय अर्थ होता? ब्रह्मावर्तास ब्राह्मण भोजने, नाच, गाणे, तमाशे हा प्रकार चालू झाला. नंतर बातमी आली की इंग्रज कानपूरावर हल्ला करणार आहेत. मग सैन्यासह नानासाहेब कानपुरास परत आले. दोन चार दिवस युद्ध चालल्यावर हार दिसू लागली. नानासाहेब ब्रह्मावर्तास परतले आणि बोटीत बसून गंगा पार करून पळून गेले.

गोडसे भटजींचे कानपूर येथील घटनांचे वर्णन

पलटणी घेऊन तात्या कानपुरावर पोचले. बहुत दिवस लढाई सुरू होती. गोरे लोक बहुदा मरण पावले. काही गंगेकडील बाजूने बाहेर पडले त्यांना कैद केले. ईश्वराने जय दिल्हा. कानपूर हस्तगत जाले. कानपूर शहरात श्रीमंतांनी दवंडी पेटवून बाजार सुरू करविले. गोरे लोकांचे सामान, खजिना घेऊन ब्रह्मावर्ती जाण्याचा मुहूर्त काढीला. स्वारी ब्रह्मावर्तास येतायेता रात्र जाहली. नंतर लोकास आनंद होऊन रोज ब्राह्मण भोजने, नाच तमासे दिवसेदिवस करू लागले. असे पंधरा दिवस गेले.

कानपूर, झासी, दिल्ली, आग्रा असे ठिकठिकाणी गोरे लोकांच्या बायका व मुले मारीली. ते समयी शहाणे बोलू लागले की वेदांत व शास्त्रांत स्त्रियांचा वध मुळीच नाही. आता जय काळे लोकांस अजिबात मिळायचा नाही.

त्यानंतर पंधरा दिवसांनी इंग्रज लोकांच्या पलटणी कानपुरावर चारी बाजूने एकाएकी आल्या. ही खबर समजताच श्रीमंतांनी ब्रह्मावर्ताहून फौजेस रवाना केले. कानपूरास लढाई चालू झाली. उभय पक्षांतील मोठमोठे अप्पसर (ऑफिसर्स) स्वर्गवासी झाले. युद्धा दहा-बारा दिवस चालून वारा येकायेकी फिरला. काळे हतवीर्य होऊन पलायन करू लागले. नानासाहेब ब्रह्मावर्ताकडे निघून गेले. त्यानंतर श्रीमंत घरी येऊन स्त्रियांसह नावेत बसून गंगा पार लखनौ मुलखात गेले. त्यानंतर तिसरे दिवशी गोऱ्या लोकांचा ब्रह्मावर्तास हाला सुरू झाला. श्रीमंतांच्या वाड्यात लुटालूट करून जाळून टाकला. इंग्रजांनी दवंडी पिटून कलेक्टरचा अमल चालू केला.

नंतर प्रतिशोध इंग्रज सैन्याने घेतला. आजूबाजूची खेडी उध्द्वस्त करण्यात आली. हजारो नागरिकांना इंग्रजी सैन्याने मारले. ब्रह्मावर्त पूर्णपणे बेचिराख करण्यात आले. हार दिसता पळून जाणे आणि आपल्या नागरिकांना मृत्यूमुखी टाकणे हा प्रकार अवधची बेगम, झाशीची राणी आणि नानासाहेब यांनी केला. हे कुठले नेतृत्व?

सावरकरांनी लिहिलेली नानासाहेबांची माहिती

सावरकरांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक १९०७ साली लंडनमध्ये लिहिले. ( पुन:प्रकाशन ग्राहकहित प्रकाशन २००८) त्यावेळी इंग्लंडमध्ये जी कागदपत्रे आणि पत्रव्यवहार त्यांना मिळू शकला त्याचा आधार घेऊन हे लिखाण झाले. सावरकरांची लिखाणाची पद्धत ही दुधारी आहे. सावरकर त्यांना माहीत असलेल्या पुराव्यांवर इतिहासाचे लेखन करितात. पण त्यानंतर त्यांच्यातील देशाभिमान बाहेर येतो. त्यामुळे लिखाण फक्त इतिहास राहात नाही.

दुसऱ्या बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्यांचे दत्तक पुत्र नानासाहेब यांनी इंग्रजांशी पत्रव्यवहार केला. त्यांनी आपला वकील अझिमुल्लाखान यास इंग्लंडला त्यांची केस लढविण्यासाठी पाठविले. इंग्रजांनी त्यांचे कोणतेच हक्क मान्य केले नाहीत. इतकेच नव्हे तर ब्रह्मावर्त येथील जागा आणि वाडा यावरही हक्क नाकारला. अशाप्रकारे नानासाहेबांच्या हातात काहीही राहिले नाही. या नंतरची कहाणी सावरकरांच्या शब्दांत.


नानासाहेब

नानासाहेब आणि अझिमुल्लाखान या दोन महनीय विभूतींनी १८५६च्या आरंभापासून स्वातंत्र्याकडे हिंदुस्थानचे मन:परिवर्तन करण्यासाठी युद्ध संघटना सुरू केली. नानांनी प्रत्येक दरबारात आपले दूत पाठविण्यास प्रारंभ केला. मौलवी, फकीर आणि संन्यासी गावोगावी जाऊन हिन्दी अंत:करणात आत्मनिष्ठेची बीजे पेरीत होते. गावोगावी सार्वजनिक जाहीरनामे फडकू लागले. हे काम इतक्या गुप्तपणे करण्यात आले की सरकारला जराही दाद लागली नाही.

सत्तावनच्या एप्रिलमध्ये नानासाहेब दिल्लीला गेले. तेथून ते लखनौला गेले. या कार्यक्रमात हिंदू आणि मुसलमान या दोन जातींमध्ये अपूर्व सलोखा दिसत होता. असे निश्चित करण्यात आले होते की ३१ मेच्या रविवारी सबंध हिंदुस्थानात सगळीकडे युद्ध चालू होईल. पण मीरत येथील आगाऊ उठावणीने क्रांतिकारकांत गोंधळ माजला आणि त्याचा फायदा इंग्रजांनाच मिळाला.

सावरकरांच्या लिखाणात काही घटनांचे कागदपत्र/ पुरावे आहेत तर काहींचे नाहीत. सावरकरांच्या लिखाणातून मिळालेल्या माहितीप्रमाणे नानासाहेब १८५७च्या उठावाचे महानायक म्हणून पुढे येतात.

निष्कर्ष

ज्या तीन संस्थानांत / राज्यांत मोठ्या प्रमाणावर उठाव झाला त्याची या भागात आपण माहिती घेतली. काय चित्र पुढे येते? मीरत येथील छावणीत बंड करून सैनिक दिल्लीला आले. ब्याऐंशी वर्षांच्या मुघल बादशहाला त्यांनी राजा घोषित केले. बादशाहची इच्छा नव्हती पण नाही म्हणणेही शक्य नव्हते. सैनिकांनी इंग्रज बायका-मुलांची कत्तल केली. दोन महिन्यांत इंग्रज सैन्याने दिल्ली परत मिळविली. ही सर्व कथा कानपूरला अशीच्या अशी घडली. कानपूरला बहादूरशाहच्या जागी नानासाहेब होते.

टिळक, गांधी, वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या महान व्यक्तींनी इंग्रजांविरुद्ध दिलेला लढा पाहा. या महान व्यक्तींचा इंग्रज जाण्याने काही व्यक्तिगत फायदा होणार नव्हता. त्या तुलनेत अवधचा नवाब, नानासाहेब यांनी दिलेल्या लढ्यामागे व्यक्तिगत फायदा होता. अवधचे नवाब आणि नानासाहेब यांच्या मागण्या इंग्रजांनी मान्य केल्या असत्या तर त्यांनी लढा दिला असता का?

सर्वांत महत्त्वाची बाब ही की या राजेलोकांत स्वतंत्र भारताचे स्वप्न नव्हते. त्यांना इंग्रजांकडून पिढ्यान्‌पिढ्या पेन्शन हवे होते.

या उठावाचा एक परिणाम म्हणजे इंग्रजांच्या हे लक्षात आले की येथील राजे लोकांस खुश ठेऊनच देशावर राज्य करता येईल. शिंदे, होळकर, बडोदा, निजाम, म्हैसूर, त्रावणकोर आणि पंजाबातील संस्थानिक यांनी उठावात भाग न घेता इंग्रजांना मदतच केली. या सर्वांनी उठावात भाग घेतला असता तर इंग्रजांचा पराभव निश्चित होता. इंग्रजांच्या बरोबर संघर्षाचे एक कारण दत्तक नाकारणे हे होते. उठाव संपल्यावर एका जाहीरनाम्यानुसार सर्व संस्थानिकांना दत्तक घेण्यास परवानगी देण्यात आली.

पुढच्या भागात – भाग २०मध्ये आपण झाशीतील घटनांचा आढावा घेऊ.

मागचे भाग -

भाग १ – एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती
भाग २ – अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी
भाग ३ – अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती
भाग ४ – अठराव्या शतकातील शासनयंत्रणा
भाग ५ – धर्मशास्त्रे आणि कर्मकांडी धर्म
भाग ६ – अठराव्या शतकातील धर्माचे स्वरूप
भाग ७ – धार्मिक सुधारणांची आवश्यकता
भाग ८ – धार्मिक सुधारणांचे प्रयत्न
भाग ९ – समाजसुधारणा – दलित कोण आणि कसे?
भाग १० – समाज सुधारणा – दलितांच्या उद्धाराचे प्रयत्न
भाग ११ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १२ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १३ – समाजातील बदल
भाग १४ – समाजातील बदल – मुंबईचा विकास
भाग १५ – समाजातील बदल – पुण्याचा विकास
भाग १६ – समाजातील बदल
भाग १७ – दोन समाजसुधारक राजे
भाग १८ – १८५७चा उठाव

लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.

सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण.

सुधीर भिडे

field_vote: 
0
No votes yet

टिळक, गांधी, वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या महान व्यक्तींनी इंग्रजांविरुद्ध दिलेला लढा पाहा. या महान व्यक्तींचा इंग्रज जाण्याने काही व्यक्तिगत फायदा होणार नव्हता. त्या तुलनेत अवधचा नवाब, नानासाहेब यांनी दिलेल्या लढ्यामागे व्यक्तिगत फायदा होता. अवधचे नवाब आणि नानासाहेब यांच्या मागण्या इंग्रजांनी मान्य केल्या असत्या तर त्यांनी लढा दिला असता का?

ही एक कॉमेंट सोडली तर लेखातून छान माहिती मिळाली
वैयक्तिक फायदा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मिळवण्यासाठी च सर्व धडपडत असतात.
ती इच्छाच सजीव मध्ये नसती तर सृष्टी जागेवर थांबेल.

राजे महाराजे ह्यांचे राज्य होत .टिळक ,पटेल ह्यांची राज्य नव्हती .
बस इतकाच फरक आहे.
टिळक,पटेल राजे असते तर ते काही वेगळे वागले नसते.
ह्या नियमाला कोणी अपवाद असेल तर तो करोडो मध्ये एक असतो . .ही पण संख्या जास्त च आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाच गाणी, ब्राह्मण भोजन हे मला सांगोवांगी वाटतात. खरे असेलही. नानासाहेबांनी निवडक १०-१२ लोकांबरोबर गंगा कशी पार केली, चिखलातून वाट कशी काढली, पलिकडे बेगमच्या राज्यात मारुतिच्या मंदिरात कसा आसरा शोधला, एवढा मोठा पेशवा पण मातीची भांडी, लाकूडफाटा, वाणसामान आणून मंदिराजवळ जेवण बनवितो इ. बाबी मला निव्व्ळ काल्पनिक वा गावगप्पा वाटल्या. कारण, गोडसे ब्रम्हावर्त, चित्रकुट येथे पोहोचले तेव्हा लुटालुट आणि "बिज्यन" (त्या प्रदेशातल्या दिसेल त्याला - ५ वर्षावरील आणि ८० वर्षाच्या आतील - मारून टाकणे) होऊन गेले होते त्यामुळे पाठी उरल्या होत्या त्या गावगप्पा.

झासीच्या लढाईत मात्र ते प्रत्यक्ष किल्ल्यात होते. त्यामुळे त्यातले किस्से बरेचसे विश्वासार्ह असावेत. आणि लढाई तरी कसली... दोन्ही बाजूंचा तोफगोळ्यांचा वर्षाव... त्यात त्यांनी तोफगोळ्यांचे आकारमान, वजन आणि एकेका तोफगोळ्याची किंमत इ. माहिती पुरविली आहे. दुर्बिणीचा इंग्रजांना फायदा होत होता असे ते म्हणतात. ही दुर्बिण साधारण दोन ते अडीज हजारापर्यंत असावी असे ते म्हणतात. आणि इंग्रजांनी या तोफ गोळ्यांवर युद्धासाठी किती पैसा ओतला असेल याचा अंदाज वर्तवतात. तसेच किल्ला सर करण्यासाठी इंग्रजांनी गवातचे भारे आणून जिन्यासारखे कसे रचले असा उल्लेख येतो. ही पण बाब खरी असावी. किल्ल्यात प्रवेश मिळाल्यावर त्यांच्या मते "शुद्ध भारतीय युद्धाची" सुरुवात होते. (त्यांच्या भाषेत "वीररस बहुत माजला"- एकंदर भाषा वाचायला गोड वाटते.). कुणीतरी एक फितूर होतो. झाशीची लढाई अवघी ७-८ दिवसात संपते. राणी किल्ला सोडून कालपीला (~१५० कि.मी. अंतरावर) तात्यासाहेब टोपे (त्यांच्या भाषेत "टोपी") यांच्याकडे नेसत्या कपड्यानीशी (पुरुषी वेशात) जाते. तात्या टोपे त्यांना १०-१० रुपयाच्या लुगडी आणि बरेच काही देतो (हे सांगोवांगी असावे पण महागड्या साडीच्या किंमती १० रुपयाच्या घरात असावीत). आणि त्यानंतर पुढचे आठ-दिवस "काळ्या मंद्राजी" सैनिकांकडून आणि इंग्रजांकडून निव्वल लुटालुट आणि (सामान्य लोकं सोडून) बिज्यन चालू असते. त्यात त्यांचे आतापर्यंत कमावलेले जवळजवळ २५० रुपये (तुलना - परत भावाचा ५० रुपये वार्षिक पगार, म्हणजे बर्‍यापैकी रक्कम) पण लुटले जातात. पण प्राणावरचे पैशावर निभावते. या लुटालुटीत अजून एक समजते की, भांडी तसेच पितळ, तांबे, कासे, कथील, लोखंड इ. धातूच्या वस्तू हा सुद्धा वैयक्तिक संपत्तीचा एक मोठा भाग होता. कारण भांडी सुद्धा लूटून नेली जात होती. म्हणून लोकं भांडी-कुंडी विहिरीत वा खड्ड्यात लपवत होते.

इंग्रजांनी झाशीच्या लुटीचा लिलावपण तिथल्या तिथे केला. त्यातले हत्ती, घोडे, उंट होळकर, शिंदे, गायकवाड यांनी घेतले. असा उल्लेख आहे. त्यात पण तत्थ्य असावे. कारण ही मंडळी तटस्थ होती.

या लुटालुटीतही त्यांनी तंबाखू गोड गोड बोलून मिळविला आणि पुरवून पुरवून वापरला. हे त्यांचे स्वभाव वैशिष्ठ्य मात्र मला खूप आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सावरकरांचे लिखाण पुरावे नाहीत म्हणून नाकारायचे आणि ह्या लेखातील पुराव्याशिवाय असलेली वाक्ये स्विकारायची हा दुटप्पीपणा आहे. अर्थात डाव्या विचारसरणीची भलामण करतांना असली कसरत केली जातेच आणि ती उत्तम केली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

लेख आवडला. माझेही मत असेच आहे की या सो कॉल्ड स्वातंत्र्यसमरातील धुरीणांना, नेत्यांना दुरदृष्टी नव्हती ना त्यांच्यापुढे कोणता कार्यक्रम होता. उठाव करुन इंग्रज हाकलायचे, पण पैसा, शस्त्र, मनुष्यबळाचे काय याचे उत्तर एकाकडेही नव्हते. भले त्या वेळेस त्यांना थोडेसे यश मिळाले असते तरीही त्यांचे राज्य टिकले नसते. शिस्त, कररचना, व्यापार-उदीम-पेढ्या यांना संरक्षण या गोष्टींची वानवा होती आणि या एकाकडेही भविष्यासंबंधी कोणतीही योजना नव्हती. नंतरच्या काळातील नवरोजी, रानडे, गोखले, टिळक प्रभुती मात्र सुरुवातीपासुन शत्रुला पुरेपूर ओळखून, त्याचीच शस्त्रे वापरून लढाईत उतरले होते. त्यांनी गांधींच्या पुढच्या कामासाठीची जमीन उत्तम तयार करुन ठेवली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************